Tuesday 6 January 2015

बेकार चित्रपट, चिकार वाद!

- आनंद मा्नवी


'पीके' या चित्रपटासंबंधीच्या वादावर टिप्पणी करणारा सच्चिदानंद शेवडे यांचा लेख [नाहक (?) वाद] तरूण भारत या बेळगावहून प्रसिद्ध होणाऱ्या मराठी वर्तमानपत्राच्या 'अक्षरयात्रा' (४ जानेवारी) पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटात केवळ हिंदूंवरच जास्त 'प्रहार' करण्यात आले आहेत, असा एकूण लेखाचा सूर आहे. हा गैरसमज जास्त वाढू नये, यासाठी वाचकाच्या भूमिकेतून हे टिपण लिहिलं. अक्षरयात्रा पुरवणीच्या संपादकांशी यासंबंधी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या सदरांनी सर्व जागा व्यापली असल्यामुळं वाचकांच्या प्रतिसाद रूपातल्या लेखनाला पुरवणीत जागा देणं शक्य होत नाही. लेखातील आशयाबद्दल त्यांच्याशी बोलणं झालं नव्हतं, त्यामुळं त्यांचा नकार आशयासंबंधीचा नव्हता. जागेबद्दलच्या अडचणीमुळं ठरलेला एक संपादकीय नियम म्हणून त्यांची भूमिका समजून घेता येते. पण प्रतिसादाचा प्रयत्न त्या पुरवणीच्या कक्षेबाहेरही करता येऊ शकतो, असं वाटल्यामुळं 'रेघे'ला हा लेख पाठवत आहे.

(काही कारणामुळं एखाद्या ठिकाणी प्रसिद्ध न झालेलं कोणाचं लिखाण यापूर्वीही रेघेवर प्रसिद्ध केलेलं आहे, त्याला धरून ही नोंद होते आहे. मानवी यांचे आभार.)

पीके या चित्रपटाचं पोस्टर

या चित्रपटातील एका प्रसंगात, मुख्य पात्र असलेला हा परग्रहवासी 'पीके' चर्चमध्ये नारळ फोडून फुलं अर्पण करायला जाताना दाखवला आहे. देवळात पाहिलेलीच गोष्ट चर्चमध्ये तो करायला जातो, तेव्हा त्याला ख्रिश्चन मंडळी मूर्खात काढतात आणि त्याच्यासारख्याच माणसांमुळे जीझस ख्राइस्टला सुळावर जावं लागल्याचं सांगत त्याची खरडपट्टी काढतात. त्याच वेळी चर्चमधे ख्रिस्ताला वाइन अर्पण केली जात असल्याचं पीके पाहतो. मग वाइन विकत घेतो नि वाटेत भेटलेल्या एकाला, 'इथं भगवानाचं घर कुठाय' असं विचारतो. तो माणूस मुसलमान असतो आणि तो इलाकाही मुसलमानांचा असल्यामुळे मग त्याला मशिदीचा पत्ता दिला जातो. मग मशिदीत 'वाइन' अर्पण करायला जाणाऱ्या या 'पीके'ला अडवलं जातं आणि हे नापाक कृत्य करू पाहणाऱ्या त्याच्या पाठीमागे मुसलमान मंडळी तलवारी घेऊन लागतात. 

यावर असा युक्तिवाद केला जाईल की, हे एकटेदुकटे प्रसंग आहेत आणि एकूण मिळून हिंदू लोकांवरच टिकेचा मुख्य रोख आहे. शेवडे यांच्या लेखात अशा इतर धर्मांवरच्या टीकेच्या प्रसंगांचा उल्लेख टाळून हाच युक्तिवाद करण्यात आलाय. या चित्रपटातील मुख्य बुवाचे पात्रही पीकेच्या धर्माविषयीच्या प्रश्नांना उत्तरं न देता आपल्याच धर्मावर प्रहार होत असल्याचा असाच युक्तिवाद करतं. पण त्या युक्तिवादामध्ये फारसे तथ्य नाही.

चित्रपटात एका मुस्लीम दहशतवादी संघटनेने घडवलेल्या रेल्वेस्थानकावरच्या बॉम्बस्फोटात पीकेचा (हिंदू) मित्र मारला जातो, असंही दाखवलं आहे. यावर समजा, एखाद्या मुस्लीम व्यक्तीने आक्षेप घेतला आणि म्हटलं की, नुकतीच दहशतवादी हल्ल्यात शंभरहून अधिक मुस्लीम मुलं मारली गेली, त्यांचा उल्लेखही न करता केवळ मुस्लीमांच्या दहशतवादात हिंदू मेल्याचे चित्रण अयोग्य आहे. दहशतवाद केवळ मुस्लीम लोकच करतात काय? शिवाय त्यात मुस्लीमही मरतात त्यांचं काय?’ तर हा आक्षेप या संदर्भात हास्यास्पद ठरेल. कारण मुलं मारली जाण्याचा अतिशय भीषण प्रसंग पाकिस्तानात (शेवड्यांच्या भाषेत- ‘पापस्तान) काही दिवसांपूर्वी वास्तवात घडलेला आहे आणि चित्रपटाचे कथानक भारतामध्ये, दिल्लीत वेगळ्या संदर्भात घडतं आहे, त्यामुळं इथं सार्वजनिक ठिकाणी मरणाऱ्यांमध्ये मुस्लीमही असले, तरी हिंदूच जास्त दिसतील, हे साहजिक आहे. असे त्या त्या ठिकाणचे संदर्भ लक्षात न घेता केलेली कोणतीही टीका गैरसमजांना खत घालणारीच ठरू शकते. भारतात रेल्वेस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी एखाद्या सर्वसाधारण दिवशी (विशिष्ट उत्सव वगैरे टाळून) जाऊन तपासणी केली, तर हिंदूच संख्येनं जास्त सापडतील, हे जितकं प्राथमिक तथ्य आहे, तितपतच प्राथमिक पातळीवर चित्रपटात आलेल्या हिंदूंवरच्या टीकेचे प्रसंग संख्येनं जास्त आहे. 

२००७ साली खुदा के लिए नावाचा एक पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यात मुस्लीम धर्मावर टीका होती. चित्रपट म्हणून काही कमी-जास्त असेलही- तो आपला विषय नाही, पण हा चित्रपट पीकेपेक्षा फारच जास्त प्रामाणिक हेतूने बनवलेला होता. तर, त्या चित्रपटात मुस्लीम धर्मावरच का टीका करण्यात आलेय, अशा प्रश्नाला अर्थ नसतो. एक तर, ते गोष्ट सांगणाऱ्याचं स्वातंत्र्य आहे आणि ज्या प्रदेशात, ज्या संदर्भांमध्ये गोष्ट घडतेय, त्यावरून त्यातला तपशील ठरणार हे साहजिक आहे. 

त्यामुळे एखादा परग्रहावरचा प्राणी भारतासारख्या देशात उतरला तर त्याला इथे कोणत्या धर्माचे प्राणी प्रामुख्याने भेटतील, इतपत प्राथमिक अंदाज बांधत कोणी कथा लिहिली, तर हिंदूच लोक या चित्रपटातल्या कथानकात जास्त का आहेत, हा मुद्दा उलगडू शकतो. आणि त्यानं भावना दुखावण्याचं काहीच कारण नाही. कारण मुळात चित्रपटात भावना दुखावण्याएवढं मूलभूत काही म्हटलेलंच नाही.

हा परग्रहावरचा, माणसासारखाच दिसणारा प्राणी (म्हणजे आमिर खान) पृथ्वीवर येतो नि एका महिलेकडून हात-हातात घेऊन तिला येणारी भाषा आपल्या मेंदूत फीड करून टाकतो. ही महिला भोजपुरी बोलत असल्यामुळे त्यालाही भोजपुरीच यायला लागते. विशेष म्हणजे सहा तासांमध्ये हात-हातात घेऊन भाषा शिकणारा हा एवढा बुद्धिमान प्राणी नंतर दुसऱ्या एखाद्या भाषेसंबंधी तसा प्रयत्न करत नाही. त्यामुळं बाकीची पात्रं प्रमाण हिंदी किंवा इंग्रजी बोलत राहिली, तरी हा भोजपुरीच बोलत राहतो. आणि शिवाय परग्रहावरून आल्यामुळं व्यक्तिमत्त्वाभोवती एक वलय आहेच. चेहऱ्यावरच्या भावभावना इथल्या लोकांपेक्षा वेगळ्या दाखवायचा प्रयत्न आहेच. मुळात चित्रपटातला बराचसा विनोद, हा असा चेहऱ्यावर वेगळ्या भावना आणि तोंडात भोजपुरी यांमधून आलेला आहे. ज्यांनी चित्रपट पाहिला असेल, त्यांनी तो सगळा भोजपुरी संवादांमध्ये असेल तर कसा वाटेल किंवा पीके या पात्राचे संवाद बाकीच्या पात्रांसारख्याच हिंदीत बोलले गेले तर कसं वाटेल, याची कल्पना करून पाहावी. संस्कृती-संस्कृतीत काही विरोध असतो, विरोधाभास असतो, निराळेपणा असतो. ह्या संस्कृतीतले नियम त्या संस्कृतीत हसण्याचा विषय ठरू शकतात. सध्या आपल्या देशातल्या मुख्य ग्राहकांना हसवण्यासाठी हिंदी चित्रपटांमधून व इतर मीडियामधून बिहार, यू.पी., लालूप्रसाद यादव, इत्यादींमधून ठसलेली भोजपुरीची गावंढळ प्रतिमा ह्या अल्ट्रा-परकीय पात्रावर रुजवून झालेला विनोद ही चित्रपटाची मुख्य कळ आहे. ती वेळोवेळी दाबून लोकांना हसवण्याचा प्रयत्न आहे. त्यात मूळ मुद्दा ताकदीचा असण्याऐवजी ह्या विरोधाभासातील विनोदाचा खेळ जास्त आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश नि बिहार या राज्यांमध्येच तिथल्या सरकारांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. म्हणजे, त्यांनाही आपल्यावरचा विनोद योग्य वाटत असेल कदाचित. 

या चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या राजकुमार हिरानी यांच्यासाठी अशा उथळ कसबी वापरण्याचे तंत्र नवे नाही. यापूर्वी थ्री इडियट्समधे नाही का, एका गरीब मित्राच्या घरची परिस्थिती दाखवताना त्याच्या घरी चपात्या लाटणारी आई, बेडवर आजारी पडलेल्या बारक्या म्हाताऱ्या वडिलांच्या पाठीला खाज उठल्यावर, लाटण्यानंच पाठ खाजवते, आणि ती सगळी पात्रंही आक्रस्ताळेपणाने रडवेली झालेली असतात. ही अशी असंवेदनशी टिंगल आपल्याकडे विनोदाच्या नावावर खपवली जाते.

इतपत वरवरचा विनोद करणारा हा चित्रपट धर्मावरही वरवरचंच काहीतरी बोलू पाहतो. फक्त हिंदू नव्हे तर कुठल्याही धर्मावर तो असं वरवरचंच बोलतो. त्यामुळं पांढरी साडी घालून बसलेली हिंदू विधवा पाहिल्यावर पीके पांढऱ्या रंगाला दुःखाचा रंग समजतो. मग नंतर लग्नासाठी जाणाऱ्या पांढऱ्या पोशाखातल्या ख्रिश्चन तरुणीला दुःखी समजून तिच्याशी तसं कायतरी सांत्वनपर बोलायला जातो. मग ख्रिश्चनांमधे माणूस मेल्यावर काळे कपडे घालतात हे पाहून, काळ्या बुरख्यातल्या मुसलमान बाईला नवरा मेल्याबद्दल सांत्वनपर बोलायला जातो. ती-ती संस्कृती, धर्म, भाषा वेगवेगळ्या प्रदेशात कशी विकसित होते, समूहमन कसं घडतं,  यातले आपण तज्ज्ञ नाही. पण तरी या सर्वांमधलं वैविध्य एवढ्या वरवरच्या टिंगलीनं दाखवून देण्यातून वरवरच्या हसण्यापलीकडं काहीच होत नाही, एवढं आपल्याला कळू शकतंच. आणखी एक वेगळं उदाहरण द्यायचं तर, आपल्याकडे आफ्रिकेतली एखादी काळ्या रंगाची स्त्री दाखवली नि ही किती सुंदर आहे ना, असला संवाद टाकला की लोक हसणारच. कारण सध्या सौंदर्याचा रंग गोरा आहे. तो विविध जाहिरातींमधून आपल्याला सांगण्यात आलेला आहे. आणि आपल्याला भारतापुरतं जे बिहार-उत्तर प्रदेशाबद्दल वाटतं, ते जागतिक पातळीवर आफ्रिकेबद्दल वाटत असेल, असंही असेल. (पण अशा वेळी हिंदू संस्कृतीतल्याच द्रौपदीसारख्या स्त्रीचा कृष्णरंग आपण विसरतो. एवढंच काय, आपण स्वतः अमेरिका-युरोपच्या- म्हणजे तिथल्या बहुसंख्यांच्या तुलनेत काळेच ठरू, हेही विसरतो. मुळात रंगाचा नि भूगोल-हवामान यांचा संबंध असल्याचंही विसरतो. हे असं सोईसोईनं गोष्टी विसरणं गैरसमज जोपासण्यासाठी बरं असतं)

बाकी धर्म, भाषा ह्या गोष्टींबद्दल इतपत वरवर कायतरी मांडणाऱ्या चित्रपटावरून आपल्या भावना दुखावल्या जात असतील, तर त्याही वरवरच्याच म्हणाव्या लागतील. त्या जितक्या वरवरच्या तितकीच चित्रपटावरची टीकाही वरवरची. भाषा हे माध्यम संवादापेक्षा विसंवादाला कसं उपयोगी पडू शकतं, याबद्दल काही लहान-मोठं शेरेवजा बोलण्याचा प्रयत्न या चित्रपटात आहे. खुद्द हा चित्रपट बोलण्याच्या भाषेचा आणि दृश्यांच्या भाषेचाही वापर पोकळ संवादासाठी करतो. धर्म-भाषा-संस्कृती यांबद्दलच्या अनेक मुद्द्यांवर बोलताना चित्रपट हे माध्यमही पोकळपणे वापरतो. या पोकळपणाबद्दल त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ अभ्यासकच बोलू शकतील. आपण तर सामान्य प्रेक्षक-वाचक म्हणून हे टिपण लिहिलं. आणि आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांमुळेच हा चित्रपट आत्तापर्यंतचा सगळ्यांत जास्त पैसे कमावणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. त्यामुळेच चित्रपट बेकार असला तरी त्याच्यावर चिकार चर्चा होणं साहजिक आहे. पण असल्या बेकार-चिकारपणातून आपली अवस्था बडा घर पोकळ वासा अशी (संख्येनं जास्त पण विचारांनी कमी) होत चाललेय की काय, अशी शंका कोणाला येणं अगदी शक्य आहे.
***

'रेघे'ची भर-
पी.के. पाहिलेला नाही, पण वरच्या लेखावरून अंदाज घेतला, तर -
वि. वा. शिरवाडकर यांच्या 'कल्पनेच्या तीरावर' या कादंबरीतला नायक नेपाळला जात असतो. पण काही विचित्र घडामोडींमुळे तो शशशृंग या अज्ञात देशामध्ये जाऊन पोचतो. तिथल्या नीतीनियमांच्या वेगळेपणानं चक्रावून जातो. तिथं जेवणं ही खाजगी बाब आहे, तर लैंगिक भूक उघडपणे बोलली जाते. शिवाय कोणी पार्टी केली, तर आपल्याकडे स्नेहभोजन होईल, तसं तिथं वेगवेगळे सुवासिक रुमाल आणले जातात आणि सगळे पाव्हणे त्यांचा वास घेतात, दाद देतात. असं काय काय या कादंबरीत आहे. (कादंबरीचा आणखी अंदाज येण्यासाठी प्रतिक्रियेमधील मजकूर पाहावा). पण त्यात तसा तीरावरच फेरफटका मारलाय, जास्त खोलात बुडी मारलेली नाही. तरी-

कॉन्टिनेन्टल प्रकाशन । ७० रुपये

3 comments:

  1. interesting...I didn't know about this novel of Shirwadkar...तसा तीरावरच फेरफटका मारलाय, जास्त खोलात बुडी मारलेली नाही...nice attempt though....I liked it....

    ReplyDelete
    Replies
    1. More about this novel, on following link-
      Article by Rajeev Khandekar, published in LokSatta on 27 Feb 2006.

      http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:4IoOEZHr46oJ:www.loksatta.com/daily/20060227/opd01.htm+&cd=1&hl=en&ct=clnk&gl=in

      Excerpt from the article-
      1---- ''या कादंबरीचा नायक विश्वनाथ विशाळकर हा एक उमदा तरुण आहे. नेपाळला जाताना अपघाताने एका भलत्याच देशात येऊन पडतो. हा देशही असा की, त्याचा बाहेरच्या जगाला ठावठिकाणाही नाही. या देशाचे नाव शशशृंग. बाकी जगापासून लांब राहण्यातच आपले हित आहे अशी या देशातील लोकांचीही भावना आहे. विश्वनाथ तिथे अपघातानेच पोहोचतो, पण नंतर तिथल्या रीतीरिवाजांनी आणि संस्कृतीने हबकून जातो. त्यांच्या सगळ्या चालीरीती आपल्यापेक्षा वेगळ्या असतात. दैनंदिन आयुष्यातील गोष्टींकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वेगळी असते. आपल्या दृष्टीने जे चांगले ते त्या देशामध्ये चांगले असतेच असे नाही. आपण ज्याला वाईट, अनैतिक समजतो, ते तिथे अनैतिक असतेच असेही होत नाही. त्यामुळे, स्वर्गीय सुखाची लयलूट असलेल्या त्या देशामध्ये राहताना विश्वनाथची विलक्षण गोची होत राहते. त्या परिस्थितीशी तो जमवून घेतो, पण मनोमन हे मान्य करून टाकतो की, आपल्या रोजच्या आयुष्यातील बर्याीचशा गोष्टी अखेरीला मानण्यावरच असतात. श्लील- अश्लील, नीतीनियम सारे काही.
      त्याची खरी पंचाईत होते ती तिथल्या पहिल्या पार्टीमध्ये. तो एक धमाल किस्सा आहे. विश्वनाथने शशशृंगचे नागरिकत्व स्वीकारले म्हणून ही शाही मेजवानी आयोजित केलेली असते. शहरातील बडे-बडे लोक तिथे सहकुटुंब हजर असतात. सगळी मंडळी आसनस्थ झाल्यावर सगळ्यांना सुंदर पुष्पगुच्छ आणि हार देण्यात येतात. मग गुलाबपाण्याचे सिंचन, मग मधुर अत्तराचे छोटे रेशमी रुमाल सगळ्यांना देण्यात येतात. प्रत्येक जण आपल्याजवळील रुमालाचा वास घेण्यात गर्क होऊन जातात. भरपूर वेळ वास घेऊन झाल्यावर सगळेजण आपापले रुमाल बाजूला ठेवतात. मग सेवक येतात आणि ते एका तबकामध्ये गोळा करून घेऊन जातात आणि वेगळे रुमाल ‘सर्व्ह‘ करतात. पुन्हा मघाचाच प्रकार. असे पाच-सहा प्रकारांचे रुमाल झाल्यावर सगळेजण त्या सुगंधाची मुक्तकंठाने प्रशंसा सुरू करतात. शेवटचे रुमाल टाकताना आपल्याकडच्या पंगतीत होतो तसा आग्रहही सुरू होतो. ‘टाका, टाका, आणखी एक टाका‘ वगैरे.

      excerpt continues..

      Delete
    2. 2------या सगळ्याने वातावरण धुंद झाल्यावर पुस्तके येतात. ही चित्रांची पुस्तके असतात आणि मग त्या चित्रांचा आस्वाद घ्यायला सुरुवात होते. विश्वनाथ अवघडून जातो. कारण त्याच्या हातातील पुस्तकामध्ये खूप शृंगारिक चित्रे असतात व त्याच्या शेजारी दोन सुंदर तरुणी बसलेल्या असतात. त्या मात्र निःसंकोचपणे त्यांचे रसग्रहण करीत असतात. एकमेकांना ती चित्रे दाखवून ‘हे किती छान आहे‘, असे हर्षाने चित्कारत असतात. विश्वनाथ हे सगळे अवाक्‌ होऊन पाहात असतो. त्याला भूक लागलेली असते, पण तिथे खाण्याचे कुणी नावही काढत नसते. चित्रे पाहून झाल्यानंतर संगीताची मैफल होते आणि कार्यक्रम संपतो. मग सगळी स्थानिक मंडळी विश्वनाथला भेटायला, त्याच्याशी हस्तांदोलन करायला पुढे येतात. तेव्हा तो सहजपणे म्हणतो, ‘हा कार्यक्रम आणखी चालला असता तरी मजा आली असती, पण आता तुम्हालाही जायला हवे. कारण तुमची जेवणखाणे अजून बाकी असतील.‘ त्याच्या या वाक्याने सगळेजण गोरेमोरे होऊन जातात. बायका माना खाली घालून सगळ्यांच्या नजरा चुकवू लागतात. विश्वनाथच्या लक्षात येते, आपण काही तरी चुकीचे बोललो म्हणून तो म्हणतो, ‘माफ करा, माझ्या बोलण्याचा काही तरी गैरअर्थ निघतोय. मी एवढंच म्हणालो, आपली भोजनं अजून व्हायची असतील !‘
      त्याच्या या बोलण्यानं तर तिथं बॉम्ब पडल्यासारखं वातावरण होतं. दोन बायका किंकाळ्या फोडतात. पुरुष मंडळी त्यांच्या भाषेत संतापून काही तरी बोलू लागतात. विश्वनाथकडे रागावून बघू लागतात.
      आणि मग विश्वनाथच्या लक्षात येते, या देशामध्ये भोजन ही अत्यंत खासगी बाब मानली जाते. त्याचा चारचौघात उच्चार करता येत नाही. ते अश्लील आहे.
      शृंगाराविषयी पूर्ण मोकळेपणा आणि भोजनाबद्दलचा कर्मठपणा पाहून हादरून गेलेला विश्वनाथ नंतर तिथल्या एका आचार्यांशी या विषयावर वाद घालतो आणि स्वतःच निरुत्तर होतो. तिथे अन्नसेवनाला आलेले अनैतिक स्वरूप आणि कामसंबंधाबाबत असलेली अनिर्बंध मुक्तता यामुळे नीतीव्यवस्थेचा वध होतोय, असे वाटत नाही का, असा प्रश्न तो करतो तेव्हा हे आचार्य महाशय म्हणतात, ‘नीतिमत्तेचा वध तुम्ही जिथून आला आहात त्या देशात होतो आहे. तिथे लोक कसलीही लाजलज्जा न बाळगता एकत्र बसून जेवतात. भर बाजारात खाद्यपेयांची दुकाने घालतात.‘
      विश्वनाथ म्हणतो, ‘जेवण ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे, त्यात अनैतिक काय आहे?‘
      आचार्य- तसं असेल तर स्त्री-पुरुष संबंधही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात अनैतिक काय आहे? पण आम्हीही काही सनातनी नाही. आमच्याकडच्या संस्कृतीरक्षकांना ‘भोजन‘ या शब्दाचा उच्चारदेखील मान्य नाही, पण गेल्या काही काळापासून आमच्या साहित्यात जी पुरोगामी वैचारिक चळवळ सुरू झाली, त्यामुळे नैतिक बंधने थोडी सैल होऊ लागली आहेत. बंडखोर कवी आणि कथाकार भोजनाचा स्पष्ट उल्लेख करू लागले आहेत. ‘तो एका तरुणीला जवळ घेऊन कामक्रीडा करीत होता‘, अशी परंपरागत सुरुवात करण्याऐवजी ‘त्याला भूक लागली होती‘, ‘तो अन्नग्रहणाचा विचार करीत होता‘, ‘तो दिवाणखान्यात एका तरुणीसमवेत पेयपान करीत होता‘ असे अश्लील प्रारंभ आता आमच्याकडे सुरू झाले आहेत. त्यामुळे आमच्याकडचे संस्कृतीरक्षक संतप्त आहेत. संस्कृतीरक्षकांचा नेता पंडित कुस्त्र याने तर साहित्यातील या अश्लीलतेच्या विरोधात मोठी मोहीम उघडली आहे. खरे तर, लेखकांनीही जरा संयम पाळला पाहिजे. भूक लागल्यावर माणूस काय करतो, ते सर्वांना माहिती आहे. मग नायक पाटावर बसला आणि नायिका त्याला वाढू लागली, अशी अश्लील वर्णने करायची गरज काय ? कलेचे साैंदर्य संयमात आहे, अनिर्बंधतेत नाही.
      या विवेचनाने हतबुद्ध होऊन विश्वनाथ आचार्यांना विचारतो, असे असेल तर माणसाने लग्न कशासाठी करायचे? त्यावर आचार्य म्हणतात - लग्न करतात ते भोजनासाठी! म्हणूनच तर आमच्याकडच्या लग्नात ‘मी तुझ्याचसाठी अन्नसिद्धी करीन आणि तुझ्याचकडून अन्नग्रहण करीन‘ हा प्रमुख मंत्र असतो.
      विश्वनाथ - म्हणजे आपल्या दृष्टीने पत्नी ही निव्वळ स्वयंपाकीण झाली!
      आचार्य - होय. आमचे नवमतवादीही असेच म्हणतात की, पत्नी ही पुरुषांची स्वयंपाकदासी झाली आहे. पण माझ्या मते त्याला आक्षेप घेण्याचे कारण काय? भोजनसिद्धी हे स्त्रीचे जन्मसिद्ध कार्य आहे आणि त्याचा संबंध तिच्या मातृत्वाशी आहे.
      ‘‘म्हणजे इकडे पुरुष कधी स्वयंपाक करत नाही काय?‘‘
      ‘‘काही तसे असतातही. चोरून मारुन काही पुरुष स्वयंपाक करतात. पण ते अनैतिक आहे. कायद्याने तो अनैसर्गिक गुन्हा ठरविला आहे.‘‘
      ‘‘पण मग जे पुरुष लग्न करत नाहीत, त्यांचे काय?‘‘
      ‘‘असे फार पुरुष नाहीत. पण जे लग्न करत नाहीत किंवा जे आपल्या पत्नीच्या अन्नसिद्धीवर संतुष्ट नाहीत, त्यांच्यासाठी वेश्यावर्ग आहेच की!‘‘
      या सार्या युक्तिवादाने विश्वनाथ बेशुद्ध पडण्याच्या स्थितीला जाऊन पोहोचतो.

      Delete