Monday, 7 January 2013

साधे होके बुढ्ढेका येह पहिला सलाम लेव

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक व संभाजी ब्रिगेड व संजय राऊत यांना ही नोंद अर्पण.
(सूचना : हे वाक्य उपरोधिकपणे लिहिलेले आहे.)  
आणि १० ते १४ जानेवारीला हे ८६वे संमेलन चिपळूणला होत आहे.
 ***

'विकिपीडिया' : ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन 'ज्ञानप्रकाश'मधे (फेब्रुवारी १८७८) प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार ११ मे १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.

या संमेलनाच्या आमंत्रणाला उत्तर देत जोतिबा फुले यांनी रानडे यांच्यामार्फत पाठवलेलं पत्र

मराठी ग्रंथकारसभेस पत्र

वि. वि. आपलें ता. १३ माहे मजकूरचें कृपापत्रासोबतचें विनंतिपत्र पावलें. त्यावरून मोठा परमानंद झाला. परंतु माझ्या घालमोठ्या दादा, ज्या गृहस्थाकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यांस ते हक्क त्यांच्यानें खुषीनें व उघडपणें देववत नाहींत, व चालू वर्तनावरून अनुमान केलें असतां पुढेंही देववणार नाहींत, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांशी व त्यांनी केलेल्या पुस्तकांतील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही. कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हांवर सूड उगविण्याच्या इराद्याने, आम्हांस दास केल्याचें प्रकर्ण त्यांनी आपल्या बनावट धर्मपुस्तकांत कृत्रिमानें दडपलें. याविषयीं त्यांच्यातील जुनाट खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत. त्यावरून आम्हां शूद्रादि अतिशूद्रांस काय काय विपत्ति व त्रास सोसावे लागतात, हें त्यांच्यांतील उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस व मोठमोठ्या सभास्थानीं आगांतूक भाषण करणारांस कोठून कळणार? हें सर्व त्यांच्या सार्वजनिक सभेच्या उत्पादकांस जरी पक्कें माहीत होतें, तरी त्यांनी फक्त त्यांच्या व आपल्या मुलाबाळांच्या क्षणिक हिताकरितां डोळ्यांवर कातडें ओढून त्याला इंग्रज सरकारांतून पेनशन मिळतांच तो पुनः अट्टल जात्याभिमानी, अट्टल मूर्तिपूजक, अट्टल सोंवळा बनून आपल्या शूद्रादि अतिशूद्रांस नीच मानूं लागला, व आपल्या पेनशनदात्या सरकारनें बनविलेल्या कागदाच्या नोटीसुद्धां सोवळ्यानें बोट लावण्याच विटाळ मानूं लागला. अशीच कां शेवटीं ते सर्व आर्य ब्राह्मण या हातभाग्य देशाची उन्नति करणार. असो, आतां यापुढें आम्ही शूद्र लोक, आम्हांस फसवून खाणाऱ्या लोकांच्या थापांवर भुलणार नाहींत. सारांश, त्यांच्यांत मिसळल्यानें आम्हा शूद्रादि अतिशूद्रांचा कांहीं एक फायदा होणं नाहीं, याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे. अहो, त्या दादांना जर सर्वांची एकी करणे असेल, तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यांत परस्पर अक्षय बंधूप्रीति काय केल्यानें वाढेल, त्याचें बीज शोधून काढावें व तें पुस्तकद्वारे प्रसिद्ध करावें. अशा वेळीं डोळे झांकणें उपयोगाचें नाहीं. या उपर त्या सर्वांची मर्जी. हें माझें अभिप्रायादाखल छोटेखानी पत्र त्या मंडळींच्या विचाराकरितां तिजकडे पाठविण्याची मेहेरबानी करावी. साधे होके बुढ्ढेका येह पहिला सलाम लेव.
आपला दोस्त,
जोतिराव गो. फुले

(प्रसिद्धी : ज्ञानोदय, दि. ११ जून १८८५. 'लोकराज्य' जानेवारी-फेब्रुवारी २०१२ अंकातून इथे)
***

चिपळूणवरून आठवलं, हमीद दलवाई यांचा जन्म चिपळूण तालुक्यातल्या मिरजोळी इथे झाला होता.
***


हे सगळं कोणासाठी चाललंय, याचं राहून राहून आश्चर्य वाटतं!

searchingforlaugh.blogspot.in या अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या ब्लॉगवरची नोंदही या संदर्भात वाचता येईल. त्यातलंच हे कार्टून, मूळ 'स्पेक्टेटर'मधे प्रसिद्ध झालेलं.

सौजन्य : द स्पेक्टेटर
I sometimes wonder who all this is really for

1 comment:

  1. Ek Regh,

    You are so optimistic. I have given up on many things some time ago.

    But MSS remains a good place to buy Marathi books. At Pune event, I could buy quite a few books I had been wanting to buy for a very long time. I could not believe my luck.

    So those who can go, please go there to buy Marathi books. As Nicholas Carr observed recently on his blog- http://www.roughtype.com/?p=2296- printed books are doing well vis-a-vis e-books.

    ReplyDelete