Wednesday, 3 April 2013

काळ नावाचं उत्तर, बंद दरवाजा व लक्ष्मण माने

लक्ष्मण माने ज्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, त्या संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमधल्या पाच कर्मचारी महिलांनी माने यांच्यावर बलात्काराचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सध्या माने फरार आहेत, त्यांचा मोबाइल बंद आहे. या प्रकरणी बातम्या, लेख, अग्रलेख असा मजकूर वर्तमानपत्रांमधून येतो आहे. या प्रकरणाचा शेवट काय होणार हे आपल्याला सांगणं शक्य नसलं, तरी माने यांनी 'बंद दरवाजा' या त्यांच्या पुस्तकामागची 'भूमिका' मांडताना काय म्हटलंय, याची लहानशी नोंद आपण करून ठेवूया. हे पुस्तक १९८४ साली 'ग्रंथाली'ने प्रकाशित केलं होतं.

पान क्रमांक अठरावर माने म्हणतात :
बंद दरवाजा
पण चळवळींचा रेटा जसा वाढू लागला तशी आपसातही स्पर्धा सुरू झाली. तू मोठा का मी मोठा, तू नेता की मी नेता अशी हातघाईवर लढाई सुरू झाली. जोवर चळवळ नव्हती तोपर्यंत गल्लीबोळात पडलेले पुढारी ज्यांना कुणी विचारत नव्हते तेही जागे होऊ लागले. राजकीय पुढाऱ्यांनाही या चळवळींची दखल घ्यावी लागली आणि भटक्या विमुक्तांच्यात स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा, आरोप, प्रत्यारोप, भांडणे, मतभेद सुरू झाले. कोण चूक-कोण बरोबर ते काळ ठरवील आणि त्याने त्याच्या कसोटीवर ठरवलेही. पण त्या त्या काळात मनस्ताप व्यायचा तो झालाच. प्रत्येकाला आपला माल खपवायचा असतो. त्याने इतरांना शिव्या दिल्या. शिवाय, गिऱ्हाईक आपल्या दुकानात येत नाही. हळुहळू अशी दुकाने निघू लागली. त्याने आणखी एक गडबड झाली. मला मिळालेले मानसन्मान हे चळवळीला बळ मिळायला एकीकडे उपयोगी पडत होते. मिळणारी प्रसिद्धी एकीकडे चळवळीला शक्ती देत होती तर दुसरीकडे किडक्या मनोवृत्तीच्या समाजामुळे त्यातही अभावग्रस्त समाजामध्ये स्पर्धा ही तशीच सुरू झाली. जे जे 'उपरा' वाचत त्यांना त्यांना ते दुःख आपलेच वाटे. हे झाले त्याचे यश. पण मीही लिहू शकतो म्हणून 'उपरा'च्या नावे बदलून कॉप्या निघू लागल्या, कारण लाखात बक्षिसे मिळत होती. देशी-परदेशी प्रवास, मानमरातब, पैसा, प्रसिद्धी सारे मिळते. हा नवा शोध कार्यकर्त्यांना लागला होता. त्यामुळे आपणही असे लिहू शकतो म्हणून ते स्वप्न पाहू लागले. शेख महंमदासारख्या मलाही लाथा बसू लागल्या. मी मनाशी पक्का निर्णय केला, पाणी उदासले आहे तेव्हा धक्के बसणार, आपण या गदारोळात खाली उतरायचे नाही. त्यामुळे मला अनेकांनी शिव्या दिल्या. जाहीर आणि खाजगीतपण, मी तिकडे लक्ष दिले नाही. त्यांची नोंद घेतली नाही. आरोप-प्रत्यारोप हा चळवळीतल्या राजकारणाचा भाग म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो. माझ्या दृष्टीने काळ हे त्याचे उत्तर होते आणि आजही काळ हेच त्याचे उत्तर आहे. याचा अर्थ मनस्ताप होत नव्हता असे नाही. पण जिथे जन्मला होतो तो उकिरडा उपसणे भाग होते. पळून जाता येत होते. पण पळायचे नाही हा निर्णय पक्का करून कामाला लागलो.
***

सध्या पळून गेलेल्या माने यांचं 'बंद दरवाजा' हे पुस्तक म्हणजे त्याच नावाने त्यांनी 'सकाळ'मधे लिहिलेल्या सदरातील लेखांचं संकलन आहे. बाकी अशा प्रकरणांची उत्तरं बंद दरवाज्याच्या आतच राहत असल्यामुळे सामान्य नागरिक काळ नावाचं उत्तर स्वतःच स्वतःला मिळवून घेतील आणि समाज सुखाने नांदू लागेल.
***

चळवळ म्हणजे वळवळ की कळवळ की जळजळ की मळमळ की खळखळ की पळपळ?

4 comments:

 1. I read as a school/college kid both the 'era defining' books by Mr. Pawar and Mr. Mane....was hugely disappointed by both....Today, I don't remember a single word from either of them other than their catchy titles...On the other hand, I read and re-read Jyotiba Phule, Dr. B R Ambedkar, Keshav Meshram, Namdev Dhasal and above all Jani, Nama, Chokha and Tuka...

  ReplyDelete
 2. आपण अचूक संदर्भ देता त्याबद्दल धन्यवाद. परंतु ब्लॉगवर मतप्रदर्शन वा भूमिका मांडणं वा एखाद्या प्रश्नाची वा मुद्द्याची उकल करणंही अपेक्षित आहे. असो.

  ReplyDelete
 3. उपरा, बंद दरवाजा दोन्ही पुस्तकं वाचलेली आहेत. पण सध्या जे चालू आहे त्यावर काही बोलवं वाटत नाही.
  सुनील, 'रेघे'वरची पोस्ट बऱ्याचदा काहीतरी 'भाष्य' असते असे नाही का वाटत? म्हणजे थेट नसली तरी भूमिका असतेच, असं एक नियमित वाचक म्हणून वाटतं.

  ReplyDelete
 4. काळ बदलतो आणि माणसंही बदलतात!!
  - जे चांगलं असतं बरेचदा आणि वाईटही असतं बरेचदा!!

  ReplyDelete

डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.