Saturday, 25 May 2013

आशिष खेतान यांची बेचकी, म्हणजे 'गुलेल'

'पत्रकारिता' ह्या शब्दाचा थोडा प्रॉब्लेम असा की, त्यात 'पत्र' असण्यासोबत काही 'करणं' अपेक्षित असावं. म्हणजे नुसती पुरवलेली माहिती इकडून तिकडे करणं नव्हे, तर काही किमान प्रश्न विचारावेत, काही किमान शहानिशा करावी, थोडी स्वतःचीही तपासणी करावी, आपल्या परिसराबाबतीची माहिती घेत राहावं, इत्यादी गोष्टी. पण 'माध्यमं' (मीडिया) असं म्हटलं की हे सगळं 'पत्रकारिता' ह्या शब्दाचं लफडं अपेक्षित नसावं. कधी मनोरंजन इकडून तिकडे करा, कधी दुसरं काहीतरी इकडून तिकडे करा, इतपत पातळीवरून व्यवहार चाललेले असल्यासारखं चित्र आहे. आणि फार काही टेन्शन घ्यायला नको. अगदीच कोणी फार प्रश्न विचारायला लागलं, तर टाकून द्या की पुरवणीच्या 'मास्ट-हेड'खालीच 'अॅडव्हर्टोरियल, एन्टरटेन्मेंट, प्रमोशनल फिचर' अशी ओळ. मग कामच झालं. जबाबदारी नावाची गोष्टच नको. वाचकांनी त्या पुरवणीतला कुठला मजकूर पैशामुळे छापला गेलाय आणि कुठला 'पत्रकारिते'च्या निकषांमुळे छापला गेलाय हे त्यांचं त्यांनी ठरवावं. हे फक्त वृत्तपत्रांनाच लागू आहे असं नाही, तर साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं सगळ्यांना लागू आहे. बहुतेक जण कुठल्याच स्पष्टीकरणाची कुठलीच ओळ देत नसले आणि दावे कसलेही करत असले तरी अगदीच अपवाद वगळता ही ओळ म्हणजे माध्यमांचा नियम होऊ घातलाय, अशी परिस्थिती आहे. हे 'अपवाद' असं आपण म्हणतोय तेव्हाही ते संस्थात्मक पातळीवर नसून वैयक्तिक पातळीवर काही पत्रकारांचे अपवाद, असं आहे. आणि ते असणारच. बाकी यात क्षेत्राचीही मर्यादा नकोच, म्हणून चित्रपटप्रसिद्धीपासून व्हाया वैचारिकता देशाविरोधातील गुन्ह्यांपर्यंत किंवा जागतिक घडामोडींपर्यंत सगळंच अशा 'ओळी'खालून येऊ शकतं. कधी पैशाच्या संदर्भात, कधी अडाणीपणाच्या संदर्भात, कधी हितसंबंधांच्या संदर्भात जो मजकूर माध्यमांमधून आपल्यापर्यंत येतोय तो तपासण्याची जबाबदारी मग वाचकांवरच पडणार हे उघड आहे. आपण 'रेघे'वर ही जबाबदारी पार पाडण्याचा मर्यादित प्रयत्न अफझल गुरूसंबंधीच्या नोंदीत आणि अलीकडच्या नक्षलवादासंबंधीच्या एका लेखाच्या नोंदीत केला. हे अर्थात फारच मर्यादित होतं. पण तरी आपले मुद्दे एवढेच की, पत्रकारिता आणि माध्यमं यात फरक आहे आणि आता तपासणीची जबाबदारी वाचकांवर पडते.

आशिष खेतान
हे वाचकावरच्या जबाबदारीचं बोलणं होण्याचं निमित्त ठरलेय ती आशिष खेतान यांची बेचकी. म्हणजे त्यांनी सरत्या आठवड्यात सुरू केलेली वेबसाइट 'गुलेल' (मराठीत अर्थ : बेचकी). आशिष खेतान 'तेहेलका' साप्ताहिक सोडून आता ह्या कामाला लागलेले आहेत. 'तेहेलका'त त्यांनी गुजरातमधल्या दंगलींपासून काळ्या पैशासंबंधीच्या काही प्रकरणांपासून ते अलीकडच्या महाराष्ट्रातल्या सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यापर्यंत अनेक ठिकाणचे काही काळेबेरे व्यवहार उघडे पाडल्याचं काहींना माहीत असेल. ह्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं की नाही हाही महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण खेतान यांनी त्यांच्या परीने काही प्रयत्न केल्याचं वाचक म्हणून आपल्याला कळू शकतं. (त्यांचे इतर काही प्रयत्न इथे पाहता येतील).

आता खेतान यांनी 'गुलेल' ह्या वेबसाइटच्या माध्यमातून काम सुरू केलंय. सुरुवातीलाच त्यांनी मुंबईतील लोकल रेल्वे गाड्यांमधील ११ जुलै २००६ रोजी झालेले बॉम्बस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट व २००६ ला मालेगावला झालेले स्फोट या तीन प्रकरणांमधील काही आरोपींना फसवेपणाने या प्रकरणात गोवण्यात आलंय किंवा कसं, यासंबंधीचे खुलासे करणारा रिपोर्ट 'गुलेल'वर प्रसिद्ध केलाय. (एकदोन).

आपल्या ह्या नोंदीचा उद्देश खेतान यांच्या 'बेचकी'ची ओळख करून देणं हा होता. त्याच्या पार्श्वभूमीसाठी आपण जो परिच्छेद सुरुवातीला लिहिला, त्याच अर्थाचं काही 'गुलेल'च्या ओळखीतही लिहिलेलं आहे, ते असं : आम्ही एक असं वृत्तीय पर्यावरण विकसित करू, ज्यात आमचे वाचक केवळ बातम्यांचे ग्राहक नसतील तर ते आमचा संपादकीय कार्यक्रमही घडवतील.

त्यामुळे वाचकांवर जबाबदारी पडणारच. आणि त्यामुळेच खेतान जे म्हणतायंत तेही तपासून घ्यावं लागेल. कारण जर सगळा बाजार आहे हे मान्यच करायचं असेल, तर मग वस्तू तपासून घ्यायला नको काय? विकत घेतलेले कपडे फाटके निघाले तर, किंवा प्लॅस्टिकची बादली घरी आणल्यानंतर तिला खालून लहानसं भोक असल्याचं कळलं तर, किंवा मिसळीच्या रश्श्यात अजिबात मीठ पडलं नसेल तर काय करता? तितपतच करायचंय. कारण, 'अॅडव्हर्टोरियल, एन्टर्टेन्मेंट, प्रमोशनल फिचर' ही ओळ कुठे लपलेली असेल ते सांगता येत नाही. बाकी, 'बेचकी' नाव फार सुंदर ठेवलंय खेतान यांनी. कोण किती ताकदीने मारू शकेल, किती वजनाचा खडा मारू शकेल, नेम कसा बसेल, नेमबाजीत कोण कितपत इंटरेस्ट घेईल, ह्या गोष्टींची उत्तरं वेगवेगळी असतील, पण 'बेचकी' आहे एवढं खरं.

1 comment:

  1. http://kafila.org/2013/08/05/terror-and-the-indian-mujahideen-a-response-to-ashish-khetan-sharib-ali/

    ReplyDelete