Wednesday, 23 March 2016

नांगर टाकण्याऐवजी सुकाणू घेऊन भुर्रर्र

'हातात सुकाणू घेऊन भुर्रर्र' हे मनस्विनी लता रवींद्र यांच्या 'ब्लॉगच्या आरशापल्याड' (शब्द पब्लिकेशन, नोव्हेंबर २०१४) या कथासंग्रहातल्या एका कथेचं शीर्षक आहे. सगळी गोष्ट वेगळी आहे, त्यातला सुकाणू सगळा जगण्याचाच आहे, पण योगायोगानं या गोष्टीत केंद्रस्थानी असलेली गोष्टीची निवेदक मुलगी मोठं झाल्यावर एका वृत्तवाहिनीत काम करत असते. त्यातही योगायोग म्हणजे चर्चेच्या कार्यक्रमांची एक्झिक्युटिव्ह प्रॉड्युसरकी करत असते. तिची एक मैत्रीण असते लहानपणची, अरू नावाची. लहानपणी टाइमपास करताना या दोघींनी असं बोटीतून जग फिरायचं स्वप्न रंगवलेलं असतं. त्या प्रवासात बोटीचं सुकाणू अरूच्या हातात असतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात मग वेगळ्याच घडामोडी घडतात, या मैत्रिणी काही काळासाठी दुरावतात, मग काय होतं ते सगळं मूळ गोष्टीत वाचता येईल. ते संदर्भ वेगळे आहेत. आणि आपल्या नोंदीत योगायोगानंच हे आलंय. म्हणजे गोष्टीतली केंद्रस्थानी असलेली मुलगी एकदा विचार करते:
आणि मला प्रश्न पडतो अरू कुठे आहे? अरूच्या हातातला सुकाणू? त्याचा रिमोट कंट्रोल कुणा दुसऱ्याच्याच हातात होता तर. आणि तिला वाटत होतं आपणच बोट चालवतोय. असंच सगळ्यांना वाटतं. आपणच चालवतोय बोट आणि आपणच याचे सूत्रधार. पण नाही, बोट कोणीतरी दुसराच चालवत असतो आणि तो दुसराही ठरलेला असतो. त्याचा रंग, त्याचा वर्ण, त्याचं लिंग सगळं ठरलेलं आहे. 
या नोंदीत या टीव्हीतल्या मुलीचं म्हणणं योगायोगानं यायचं कारण महिन्याभरापूर्वी घडलं होतं. १९ फेब्रुवारीला एनडीटीव्ही-इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर रवीश कुमार यांनी हळूहळू स्वतःला अंधारात नेलं आणि ते म्हणाले:

.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निमित्तानं वृत्तवाहिन्या ज्या पद्धतीनं वागल्या त्याबद्दल रवीश कुमारांनी या साधारण चाळीस मिनिटांच्या अंधारातल्या कार्यक्रमात आक्षेप व्यक्त केले. कोणा विद्यार्थ्यांनी विद्यापीठातल्या कार्यक्रमात देशाविरोधात घोषणा दिल्या, त्याची खातरजमा न करता अदलाबदल केलेले व्हिडिओ काही वृत्तवाहिन्यांनी दाखवले, वगैरे गोष्टी पुरेशा गाजलेल्या आहेत. यात देशप्रेमाच्या बोटीचं सुकाणू आपल्या हातात असल्याप्रमाणे काही वृत्तवाहिन्यांचे अँकर वागत होते, त्यात मग पोलीस, न्यायव्यवस्था यांच्या आधी आपणच सगळ्याचा निकाल लावण्याचं काम प्रचंड आक्रमकपणे व पूर्वग्रहानं आणि वस्तुस्थितीपासून फारकत घेत या अँकरांनी करून टाकलं ही भीषण गोष्ट आहे, असा आशय रवीश कुमार यांच्या या अंधारातल्या निवेदनातून नि त्यात ऐकू येणाऱ्या आवाजांमधून नि पडद्यावरच्या ओळींमधून आपल्यापर्यंत पोचतो. (त्यात मग खुद्द रवीश कुमारांच्या निवेदनावरही काही ओझरते आक्षेप नोंदवले गेलेले आहेत. काश्मीर प्रश्नाचा मुस्लिमांशी काहीच संबंध नाही, या त्यांच्या विधानावर उजव्या नसलेल्या व्यक्तींकडूनही आक्षेप नोंदवले गेेले. त्यावर कुमारांनी प्रतिसादही दिला. नंतर त्यांच्या निवेदनात, 'तुम्ही तुमच्या आईला असं बोलता का', 'बहिणीला असं बोलता का' हे फक्त पुरुषकेंद्री उल्लेख वृत्तवाहिनीच्या स्त्रीग्राहकांना वगळणारे असल्याचेही आक्षेप समाजमाध्यमांमधून दिसतात. आणखीही काही मुद्दे असतील).

मुख्य मुद्दा वृत्तवाहिन्यांच्या अँकरांसंबंधीचा. हा मुद्दा खुद्द एका अँकरानंच नोंदवल्यामुळं त्याच्याकडं लक्ष वेधलं गेलं असावं. शिवाय रवीश कुमारांनी हे म्हणणंही लक्षवेधी पद्धतीनं मांडलं, असंही असेल. मुद्दा म्हणून ही गोष्ट आधीही अनेक मनांमधे घोटाळत असेलच, अजूनही घोटाळत राहीलच. पण कदाचित अशा अपेक्षा ठेवणं हीच काहीशी गफलतीची गोष्ट असावी. म्हणजे "डिबेट का आगमन हुआ था मुद्दों पर समझ साफ करने के लिए", असं रवीश कुमारांनी निवेदनात म्हटलं असलं, तरी कदाचित (टीव्हीवरच्या) डिबेटचं आगमन समज वाढवण्यासाठी झालेलंच नसेल तर? करायला बहुतेक वृत्तवाहिन्या मोठमोठेच दावे करतात: 'चला जग जिंकूया' (आयबीएन-लोकमत), 'आता जग बदलेल' (महाराष्ट्र-वन), 'उघडा डोळे बघा नीट' (एबीपी माझा), 'राहा एक पाऊल पुढे' (झी-चोवीस तास)- या काही उदाहरणादाखल टॅगलाइन पाहाता येतील. जग जिंकणं, कोणाच्यातरी पुढं आपलं पाऊल राहाणं, हे तरी फक्त आत्मप्रौढीपर दावे आहेत. त्यापेक्षा भारी म्हणजे, 'उघडा डोळे बघा नीट' हा तर प्रेक्षकांना दिलेला आदेशच दिसतो. टॅगलाइनची वृत्ती पडद्यावर दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वांनाही सांभाळावी लागणं, हा कामाचा भाग म्हणूनच होत असेल. ही वृत्ती कशी असते, याबद्दल एक बिंदू गेल्या वर्षी सापडला होता, पण तेव्हापासून तो रेघेवर नोंदवता आला नाही. आता येईल.

हा बिंदू म्हणजे ए.जी. नुरानी यांनी 'फ्रंटलाइन' पाक्षिकाच्या १५ मे २०१५ रोजीच्या अंकात लिहिलेलं एका पुस्तकाचं परीक्षण. या परीक्षणाचं शीर्षक होतं: 'शाऊट-शो टीव्ही'. अनेक अर्थांनी खूपच ज्येष्ठ असलेल्या नुरानींचं लेखन तसं जनरली इंग्रजी इस्त्री मारलेलं असतं, पण या परीक्षणात ते थोडे चिडचिडल्यासारखे वाटू शकतात. त्यांच्या परीक्षणाच्या सुरुवातीचे शेरे पाहा:
'फ्रंटलाइन'वरून
वृत्तवाहिन्या बदलतात तसे अँकर बदलत जातात, पण सर्वांसाठीचा साचा सारखाच आहे. दररोज संध्याकाळी 'डिबेट'साठीचा विषय घोषीत केला जातो. औपचारिकतेपुरते बातम्यांचे मथळे दाखवून झाले की 'डिबेट' सुरू होतं. यात सहभागी होणाऱ्यांमधे राजकीय पक्षांचे प्रवक्ते असतात, राज्यसभेच्या खासदारकीची आकांक्षा असलेले प्रसारमाध्यमांमधलेच सहप्रवासी असतात आणि बाकीचे कोणी कोणी रिकाम्या जागा भरतात. आपलीच री सगळ्या वक्त्यांनी ओढावी अशी अँकरची इच्छा असते, त्यासाठी पक्ष-प्रवक्त्यांनी आपल्या पक्षाची दोरीही सोडून द्यावी अशी अपेक्षा केली जाते. लक्ष वेधून घेण्याच्या या स्पर्धेत आसुसलेले सहप्रवासी पत्रकार असतातच. स्वतंत्र वृत्तीची मंडळी अशा परिस्थितीत शरमून जातात.

हे अर्थातच वैश्विक सत्य नाही. काही सज्जन आणि सक्षम अँकरही आहेत. पण ते खूपच दुर्मीळ. एकदा एक अँकर-व्यक्ती लडाखला प्रत्यक्ष ताबा रेषेवर जाऊन म्हणाली: 'माझ्या मागं मॅकमहॉन रेषा आहे'. दुसरी व्यक्ती काश्मीर विद्यापीठात गेली आणि चर्चेच्या शेवटी उपस्थितांची मतं मागितली. बहुतेकांनी भारतापासून फुटून निघण्याच्या बाजूनं मतं दिल्यावर, अँकर-व्यक्ती म्हणाली: 'हा व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनाचा भाग आहे'.
नुरानींनी ज्या पुस्तकाचं परीक्षण लिहिलंय त्या पुस्तकाचं नाव आहे: 'इन-यूअर-फेस पॉलिटिक्स: द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अनसिव्हिल मीडिया'. लेखिकेचं नाव: डाएना सी. मुत्झ. प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेसनं प्रकाशित केलेल्या या २८८ पानांच्या पुस्तकाची किंमत १९.४५ पौंड इतकी आहे. म्हणजे तेराशे-चौदाशे भारतीय रुपये पडत असतील. लेखिका पेन्सिल्वानिया विद्यापीठात राज्यशास्त्र व संवादविद्येच्या प्राध्यापिका असल्याचं नुरानी सांगतात. पुस्तकही तसं विद्यापीठीय टाइपचं असल्याचं ते नोंदवतात. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरचं राजकीय वार्तांकन-विश्लेषण यांचा अभ्यास पुस्तकात केलेला असल्याचं कळतं. पण परीक्षण वाचून पुस्तकाविषयी पुरेशी समाधानकारक माहिती मिळाल्यासारखी वाटली नाही. अभ्यास कसा केलाय, वगैरेचा फारसा तपशील परीक्षणात नाही. तरी काही ना काही नोंदवण्यासारखं असतं, तसे या परीक्षणातले काही बिंदू सरळ बुलेट-पॉइंटांसारखे नोंदवू:
  • "आपले ज्यांच्याशी मतभेद असतात त्यांच्यापासून आपण सर्वसाधारणपणे अंतर राखतो. पण आधुनिक माध्यमं आपल्या नावडत्या व्यक्तींचे चेहरे आपल्यावर असे काही थोपवतात की आपल्या नकारात्मक प्रतिक्रिया आणखी तीव्र होतात", असं लेखिका म्हणते.
  •  परस्परविरोधी राजकीय दृष्टिकोनांबद्दल आदर राखण्याची वृत्ती आणि राजकारण्यांबद्दल व राजकीय प्रक्रियेबद्दल नागरिकांना वाटणारा विश्वास यांना हानी पोचवण्याचं काम असभ्य माध्यमं करतात. सकारात्मक अर्थानं बोलायचं तर, यातून राजकारणातला लोकांचा रस वाढतो. पण एकुणात राजकीय चर्चाविश्वाचा दर्जा खालावत जातो, हेही खरं.
  • "दूरचित्रवाणीवरून दाखवल्या जाणाऱ्या हिंसाचाराचा प्रत्यक्षातील वर्तणुकीवर संभाव्य परिणाम काय असतो हा मुद्दा बाजूला ठेवला, तरी या प्रक्रियेत प्रेक्षकांच्या भावना चेतवण्याचं काम अतिशय तीव्रतेनं होतं, यावर सर्वसाधारणपणे सहमती दिसते. शारीरिक हिंसाचाराच्या तुलनेत राजकीय चर्चाविश्वातील असभ्यतेची तीव्रता फिकीच पडते; पण प्रमाण कमी असले तरी त्याचे परिणाम सारखेच असतात. दूरचित्रवाणीवर प्रसिद्धी पावणाऱ्या बहुतांश राजकीय संभाषिताचा सूर प्रचंड असभ्य असतो. विल्सन नोंदवतो त्याप्रमाणे, 'पूर्वी माध्यमं आपल्याशी बोलायची, आता ती आपल्यावर खेकसतात.'"
  • समोरासमोर बोलताना पाळले जाणारे सभ्यतेचे सामाजिक नियम दूरचित्रवाणीवर नियमितपणे मोडले जात असतात. विशेषतः राजकीय विषयांवरच्या चर्चा-कार्यक्रमांमधे हे ठळकपणे दिसतं- रोजच्या जगण्यात सर्वसाधारण नागरिक जे सामाजिक नियम पाळत असतात ते धुडकावून लावण्याचं काम या कार्यक्रमांमधून अगदी उघडपणे होतं. 
  • "संवादाचे नियम मोडणं दूरचित्रवाणीवरच्या या कार्यक्रमांमधे नेहमीचं झालेलं आहे. निर्मिती मूल्य आणी तीव्र बाजारपेठीय स्पर्धा यातून संघर्ष व नाट्य यांच्यावर भर दिला जातो. परिणामी विविध राजकीय मतांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दूरचित्रवाणीवर दिसणारे चेहरे एकमेकांवर ओरडणारे-किंचाळणारे ओंगळ व उद्धट स्वरूप धारण करू शकतात".
  • "(या सगळ्या व्यवहारात) दोन प्रकारच्या वाढत्या स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात. एक- पूर्वी संध्याकाळी सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांवर एकाच वेळी बातम्यांचं प्रसारण व्हायचं, पण आता दिवसातल्या अशा ठराविक वेळेवर राजकीय बातम्यांची मक्तेदारी राहिलेली नाही. आता चित्रपट, नाटकं, विनोदी कार्यक्रम यांच्याशी राजकीय दूरचित्रवाणी वाहिन्यांना स्पर्धा करावी लागते. शिवाय राजकारणात पराकोटीचा रस असलेली व्यक्तीही पाहू शकणार नाही इतके राजकीय कार्यक्रम आता प्रसारीत होत असतात. प्रेक्षकांसाठीच्या या वाढत्या स्पर्धेत राजकीय कार्यक्रमांनी विविध प्रकारचे लक्षवेधक डावपेच लढवणं साहजिक आहे". 
यातला शेवटचा मुद्दा आता तितकासा नवा राहिलेला नाही. भारतापुरतं एक उदाहरण नोंदवायचं तर, साधारण अकरा वर्षांपूर्वी (मे २००५मधे) 'बंटी और बबली' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमोहिमेचा भाग म्हणून अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी 'एनडीटीव्ही'वरच्या 'प्राइम टाइम'च्या बातम्या वाचल्या होत्या. त्या वेळी 'एनडीटीव्ही मीडिया'च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं 'बिझनेस स्टँडर्ड'शी बोलताना सांगितलेलं की, 
'तारेतारकांच्या लोकप्रियतेचा लाभ घेऊन आमच्या प्रेक्षकांसमोर बातम्या सादर करायचा आमचा प्रयत्न आहे. बातम्या न पाहणारे प्रेक्षकही या तारांकित मूल्यामुळं आमची वाहिनी पाहतील, अशी आम्हाला आशा आहे'.
या दूरचित्रवाणी कार्यक्रमांच्या संदर्भात 'अँकर' हा शब्द का वापरतात? किनाऱ्यावर लावलेली बोट वाऱ्यासोबत भरकटू नये म्हणून नांगर टाकतात, तसं एका शांत स्थैर्याशी संबंधित हा शब्द जुळवलेला असतो का? पण नांगर टाकण्यापेक्षा सुकाणू घेऊन भुर्रर्र उडण्याचं स्वप्न जास्त पाहिलं जात असावं. बोटीचा सूत्रधार कोणतरी वेगळाच असतो, हे वरच्या अवतरणावरून दिसतंच. रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात असतो, या प्रश्नाच्या उत्तरामधे अगदी आपले डोळे नि कानही सापडतील कदाचित.

बंटी और बबली, चुप चुप के चुप चुप के चोरी से चोरी/ स्क्रिन-शॉट

No comments:

Post a Comment