मूळ पोस्टरची घडी घातल्यावर |
आज २ ऑक्टोबर, गांधी जयंती. त्या निमित्तानंच आपण वसंत दत्तात्रेय गुर्जर ह्या कवीबद्दल 'रेघे'वर ही नोंद करतोय. गांधी जयंतीच्या निमित्तानं गुर्जरांबद्दल नोंद का? तर, गुर्जरांनी लिहिलेली 'गांधी मला भेटला' ही कविता. ह्या कवितेबद्दल आपण एका मर्यादेपलीकडं बोलू शकत नाही, कारण ही कविता बीभत्स असल्याचा आरोपावरून गुर्जरांना न्यायालयातल्या खटल्याला गेली काही वर्षं तोंड द्यावं लागतंय. ह्या कवितेबद्दल काही माहिती इथं पाहाता येईल - 'गांधी मला भेटला' कवितेसंबंधी.
आज गांधी जयंतीच्या निमित्तानं 'रेघे'वर गुर्जरांची 'मुलाखत' प्रसिद्ध होतेय. ही मुलाखत म्हणजे सहज मारलेल्या गप्पांमधून लिहून काढलेला मजकूर आहे. २०१० सालच्या ह्या गप्पा आहे, एका कामासाठी त्या तयार केल्या होत्या, पण त्या प्रसिद्ध मात्र आत्ताच होतायंत. ज्यांनी गुर्जरांच्या कविता वाचल्यात त्यांना कदाचित हे वाचायला बरं वाटेल आणि -
गुर्जर कोण ते माहीत नसल्यास ही त्यांची लहानशी ओळख-
वसंत दत्तात्रेय गुर्जर (जन्म- २१ जानेवारी १९४४, मुंबई) गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये शिक्षण. साठ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन रूपारेल व सिद्धार्थ महाविद्यालयात इंटर आर्ट्सपर्यंत शिक्षण. पुढे मुंबई बंदर विश्वस्त (बॉम्बे पोर्ट ट्रस्ट) कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी. १९५७पासून कविता लिहायला सुरुवात. साठ-सत्तरच्या दशकातल्या अनितकालिकांच्या चळवळीतून कवी म्हणून पुढे आलेल्यांपैकी एक. गोदी (१९६७), निव्वळ (१९७०), अरण्य (१९७३), समुद्र (१९७९) हे तीन कवितासंग्रह व गांधी मला भेटला (पोस्टर कविता, १९८३) प्रसिद्ध.
शिवाय, 'रेघे'शी संबंधितच एक प्रकल्प म्हणून गुर्जरांसंबंधी एक लहानसा ब्लॉगही आहे, तोही वाटल्यास अधिक माहितीसाठी पाहता येईल - वसंत दत्तात्रेय गुर्जर
०००
‘कवी कविता लिहितो म्हणजे मरतच असतो’
- वसंत दत्तात्रेय गुर्जर
वसंत दत्तात्रेय गुर्जर [फोटो: रेघ] |
(कुठलीही ठरवून प्रश्न-उत्तरांची मुलाखत घ्यायची म्हणून नव्हे पण सहज बोलताना एकदा गुर्जरांकडून काही सूत्रानं बोलणं होतंय असं वाटलं. नेमकं तेव्हा रेकॉर्ड करायला जवळ यंत्र होतं त्यामुळं ते सुरू केलं. त्यात जे रेकॉर्ड झालं त्याचं हे शब्दांकन. बोललेलं लिहिल्यानंतर त्यांना दाखवलं आणि नंतर फायनल केलं. सुरुवात, शेवट आणि मुद्दे एकदम वेगवेगळे असू शकतील, पण साधारण गुर्जरांच्या कवितेसंदर्भात काही सूत्रं हातात येतील असं वाटतं. गुर्जर ज्या उत्साही स्टाईलमध्ये बोलत होते ती तशीच ठेवून शब्दांकन करण्याचा प्रयत्न केला आहे. एका संशोधनाभ्यासाच्या निमित्तानं गुर्जरांशी भेट झालेली, त्यामुळे साहित्याच्या अंगानं काही मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न या गप्पांमध्ये नाही. काही प्रश्न अगदीच सामान्य कुतुहलामुळं विचारलेले आहेत. तरीसुद्धा कोणाला या गप्पांमधून काही सापडलं तर चांगलंच.)
- ‘समुद्र’ या संग्रहातल्या एकतिसाव्या ‘चित्रा नाईक’ ह्या कवितेविषयी..
शालेय वयातील स्वप्नं आणि पुढे प्रत्यक्ष जीवनात उतरतो तेव्हा दिसतं ते वास्तव हे भीषणच आहे पुढे. त्यातली ती खिन्नता नि उदासीनता पकडता आली त्या कवितेत. शाळा-कॉलेजातली स्वप्नं आणि वास्तव. सगळे असे काहीतरी अनुभव घेत असतात आणि पुढे म्हणजे सगळ्या अनुभवातला फोलपणा कळतो, पण त्यातून तुम्ही उभे कसे करता ते महत्त्वाचं आहे. त्यात शेवटी लिहिलंय ना -पण असं वेडी म्हणून घ्यायलाचित्रा नाईक कधी आलीच नाहीदिवास्वप्नाशिवायमी अशी स्वप्नंच पहात राह्यलो तिच्या येण्याचीती कधीच नाही आलीमी फक्त एकटा इथे
शाळेतून देशाचे आधारस्तंभ बाहेर पडलेचित्रा नाईकही घरी गेली...मी फक्त एकटा इथेआता यात जो लोनलीनेस आहे तो लोकांना आवडला. की, मी फक्त एकटा इथे. दर वर्षी शाळेत स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला पाव्हणे येतात आणि ते सांगतात तुम्हाला, तुम्हीच देशाचे आधारस्तंभ आहात आणि प्रत्यक्षात आपण येतो तेव्हा त्यातला फोलपणा कळतो, म्हणजे बरेचसे कारकून म्हणूनच बाहेर पडतात, आधारस्तंभ बाजूला, जगण्याच्या याच्यातच असतात बरेचसे. ती कविता बघा- संपूर्ण गद्यप्राय संग्रह आहे तो आणि त्याच्या बरोब्बर मध्यावर ती कविता टाकलेय. म्हणजे कविता ही अशी पण लिहिलेली आहे, ते नीट वाचेल त्याला कळेल.शाळेतला जो अनुभव आहे तो, माझा एक मित्र होता, तो दुसऱ्या एका मुलीच्या वहीखाली स्वतःची वही ठेवायचा, ते मी माझ्या अंगाने घेतलं म्हणजे मीच जणू काही ते करतोय. सगळं आपलं ते स्वप्नच असतं ना. एक जण मला भेटला तो बोलला, 'माझं पण असंच घडलं, मी पण असंच करायचो.'
- कवितेचं कसं असतं,
आता ती सोपी आहे कविता म्हणून कळते, पण कठीण कविता पण कळू शकते, कारण का तुमचं अनुभवविश्व जसं समृद्ध होत जातं आणखीन, तसं तुमच्या अनुभवाशी तुम्ही ताडून बघता ती कविता, आपल्या जवळपास काही येतं का. मग जसं अधिक डेव्हलप होत जातं ते, तशी कठीण कविता पण कळते. मग ती कोलटकरांची ‘ज्ञानेश्वरसमाधीवर्णन’ असेल किंवा बालकवींची ‘औदुंबर’ किंवा मर्ढेकरांची ‘शिशिरर्तुच्या पुनरागमे’. त्या दोघांच्यातली उदासी बघा. त्या दोन्हीत उदासी आहे. म. म. देशपांड्यांची ‘अंतरिक्ष फिरलो पण’ घ्या. त्यात पण उदासी आहे. या तिघांत उदासी आहे, पण ह्या उदासीनतेच्या वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत.आता बघा ती ‘अंतरिक्ष फिरलो पण’. ती ५६ सालची कविता आहे. आज २०१० साल आहे.अंतरिक्ष फिरलो पणगेली न उदासीगेली न उदासीलागले न हातालाकाही अविनाशीकाही अविनाशी
क्षितीज तुझ्या चरणांचेदिसते रे दूरदिसते रे दूरघेऊन मी चालु कसाभरलेला ऊरभरलेला ऊरजरी वाटे जड कळलेतळ कळला नाहीजड म्हणते ‘माझा तू’क्षितीज म्हणे ‘नाही’अंतरिक्ष फिरलो पणगेली न उदासीलागले न हातालाकाही अविनाशीम्हणजे अंतिम सत्याकडेच ती कविता जाते. की, काय एवढा हा सगळा भौतिक पसारा आहे, त्यातून तुम्ही जाताना काय होतं. कवी जेव्हा अशा तऱ्हेची कविता लिहितो. . . अशा तऱ्हेची कविता केव्हा होते, तो रिता होतो तेव्हा ती होते. तो आपलं सर्वस्व तिच्यात ओतत असतो. वेगळ्या अर्थाने तो मरतच असतो म्हणजे.
- कधीपासून लिहिताय कविता -
साठपासून जास्ती. आधी शाळेत एकदा बाईंनी निबंध दिला होता. तेव्हा त्यांनी शांताबाई शेळक्यांची एक ओळ दिली होती ‘आहा ते सुंदर दिन हरपले’ आणि त्यांनी असं केलं की ज्यांनी निबंध लिहायचाय त्यांनी निबंध लिहा नि ज्यांना कविता लिहायचेय त्यांनी कविता लिहा. पस्तीस मिनिटांत. तेव्हा एक प्रयत्न केला होता आणि ती कविता लिहिली. नंतर मग साठनंतर कॉलेजला आलो तेव्हा सुरुवात झाली. आधी रुपारेलला होतो, नंतर सिद्धार्थला होतो. तिथे मग साहित्यिक सगळे मिळाले. सिद्धार्थला आरती प्रभू होते, राजा ढाले, केशव मेश्राम, चंद्रकांत खोत, वसंत सावंत.
- कवितेच्या पसाऱ्यात कोणाचा प्रभाव जाणवतो स्वतःवर. (किंवा साध्या शब्दात, आवडते कवी कोण) इत्यादी.
माझं म्हणजे एकदम दोन तऱ्हेचं आहे. एकीकडे मर्ढेकर आवडतात, तर दुसरीकडे पु. शि. रेगे पण आवडतात. पण माझ्यावर तुम्हाला पुशिंचा प्रभाव दिसणार नाही. पण पुशिंच्या कविता मला आवडतात. कमी शब्दांत ते अधिक बोलतात. त्यांची कादंबरी ‘सावित्री’ म्हणजे तर मास्टरपीसच आहे, ती कविताच आहे खरी. मर्ढेकर, पु. शि. रेगे, सदानंद रेगे, अरुण कोलटकर हे जास्ती आवडतात. पूर्वीच्या काळातले, तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर, भा. रा. तांबे मला आवडतात. पण माझ्यावर त्यांचा परिणाम दिसणार नाही. म्हणजे प्रभाव पडतो का, असं सांगता येणार नाही. सुरुवातीच्या काळात तशा मी लयबद्ध कविता लिहिलेल्यात, अष्टाक्षरी वगैरे स्वरूपात. पण त्या अशा संग्रहात नाहीत.
- ‘लिट्ल मॅगझिन्स’मधून बऱ्याच परदेशी कवींच्या अनुवादित कविता प्रसिद्ध झालेल्या, त्या कवितांबद्दल काय वाटलं?
तेवढं मला म्हणजे. . . लिट्ल मॅगझिन्समधून वाचलं तेवढंच, पण त्याचा प्रभाव काही . . नाही म्हणजे तसं.
- कवी कविता लिहितो म्हणजे तो मरतच असतो, असं तुम्ही मगाशी म्हणालात त्याच्यावर अजून थोडं बोला, काहीही, सूत्रबद्ध असं काही सांगता येणार नाही पण काही वाटेल ते बोला.
आता मी फिरत असतो आणि शेकडो माणसं बघत असतो. काही रस्त्यांवर. . . संवादसुद्धा ऐकू येतात म्हणजे. एकदा मी इराण्याच्या हॉटेलात चहा पिताना, एक गांधीवादी माणूस दुसऱ्याशी बोलताना ऐकलं. तो स्वातंत्र्यसैनिक वगैरे होता. तो सांगत होता की, 'बघा स. का. पाटील, केशवराव बोरकर, आम्ही सगळे वगैरे एकत्र काम केलंय. आता स. का. पाटील कुठेयत, बोरकर कुठेयत आणि माझी अवस्था काय आहे'. ते एक उदाहरण झालं. आणि लहानपणापासून रेडियोवर मी 'गांधीवंदना' हा कार्यक्रम ऐकतोय. काय होतं, अप्रत्यक्ष असा परिणाम होत असतो. कित्येक वर्षं ती 'गांधीवंदना' ऐकून ‘गांधी मला भेटला’, ती तयार झाली कविता. म्हणजे कित्येक वर्षं मी ते ऐकतोय. समाजात कायकाय बघत असतो वगैरे, म्हणजे माणसं, त्याच्यातून ती कविता स्फुरत जाते.म्हणूनच सांगितलं की, कवी हा मरतच असतो. आता ‘गांधी मला भेटला’मध्ये माझं मानसिक मरणच झालंय. राम पटवर्धन म्हणाले की, ‘या कवितेने माझा गिल्टी कॉन्शन्स जागा झाला’. म्हणजे काय अपराधीपणाची जाणीव होणं, म्हणजे त्या कवितेनं करून देणं, ते त्रासदायक असतं.आणि माझी कविता लिहिण्याची पद्धत पण त्रासदायक आहे. कित्येक दिवस माझ्या मनात ती कविता चालू असते. मी एकदम कागदावर उतरत नाही. एकदा मनात तयार झाली की कागदावर झरझर उतरते. कुठलीतरी एखादी ठिणगी पडली की ते लिहून होतं. कारण रॉ मटेरियल चिकार जमा होत असतं विविध ठिकाणांहून. एखाद्या बातमीनेसुद्धा आपल्या मनात घर केलेलं असतं, पण कधी स्पार्क मिळेल नि ते निर्माण होईल ते सांगता येत नाही.आता ही ‘चित्रा नाईक’ होती ती काय गंमत झाली बघा, एक शाळेतले शिक्षक होते, त्यांना शिक्षकी पेशाविषयी तिटकारा होता, तर ते आम्हाला अकरावीला गेल्यावर सांगायचे नेहमी, ‘शाळा अडीचशे कारकून दर वर्षी बाहेर काढते, बाकी काही होत नाही’. ते वाक्य मनात ठसलं कुठेतरी. नंतर ते पंधरा ऑगस्टला होतं, ‘तुम्ही देशाचे आधारस्तंभ आहेत’. नंतर ते मित्राचं होतं, त्याची वही त्या मुलीच्या वहीखाली ठेवायचा तो. या तीन गोष्टी. त्याने ठिणगी पडली.एका मित्राच्या बायकोने ती कविता वाचली. ती म्हणाली की, ‘‘डोळ्यात पाणी की पाण्यात डोळे’ हे मला अतिशय आवडलं, बरोबर वर्णन केलंय तुम्ही’ वगैरे. तशी मुलगी आमच्या शाळेत होती पाणीदार डोळ्यांची. पण एकच व्यक्ती सांगता येणार नाही, अनेक व्यक्तींचं मिश्रण आहे ते- ‘चित्रा नाईक’.कविता सुचणं म्हणजे. . प्रक्रिया म्हणजे चिकार त्याच्यावर काम होत असतं. मनात आणि डोक्यात.
मध्येच चाळीतली दोन मुलं गुर्जरांच्या खोलीजवळ येऊन ‘साखर द्या’ म्हणत होती, गुर्जर उठले ‘शुगरफ्री’च्या डबीतल्या दोन गोळ्या काढून त्यातल्या एकाच्या हातात दिल्या. डिजिटल कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा त्याच दरम्यान संपली. आणि रेकॉर्ड झालेल्या गप्पा संपल्या.
'गांधी मला भेटला' यावर अजून वाचयला आवडलं असतं. 'चित्र नाईक' ने उत्सुकता वाढवलीये.
ReplyDelete'गांधी मला भेटला' ही वसंत दत्तात्रेय गुर्जरांची पोस्टर कविता प्रसिद्ध झाली 1983मध्ये. ही कविता आक्षेपार्ह आहे, असं काहींचं म्हणणं पडलं. अगदी महाराष्ट्र शासनालाही 1995मध्ये तसं वाटायला लागलं. कोर्टकचेऱ्यांचे खेळ सुरू झाले. लातूरपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत. अजून हा खेळ सुरूच आहे. त्यामुळं तसं त्या खेळासंबंधी काही खुलेपणानं बोलणं आपल्याला जमणारच नाही. पण तूर्तास खेळाचं मूळ असलेल्या या कवितेच्या निमित्तानं काही गोष्टी बोलता येतील.
Deleteगुर्जर राहातात मुंबईत - गिरगावात - चाळीत. थेट तिथंच त्यांची कविता नि तिची भाषा तयार होते. मध्यमवर्गीय आयुष्य आणि आजूबाजूचा बकालपणा, त्यातून संवेदनशील मनाला येणारी अलिप्तता, प्रचंड मानवी करुणा या त्यांच्या कवितेतून दिसणाऱ्या गोष्टी. गुर्जरांची भाषाही खास. एकदम सरळ नि साधी. पण ती एवढी सरळ असते की वास्तव अगदीच स्पष्ट दिसतं. आणि वास्तवापासून दूर पळायचं ही आपली अगदी कायमची सवय. म्हणून मग वास्तवातला गांधी दाखवणारी गुर्जरांची कविता आक्षेपार्ह ठरते नि अवास्तव 'गांधीगिरी' नावाची 'फॅशनेबल फिलॉसॉफी' भाव खाऊन जाते. 'गांधी मला भेटला'मध्ये भेटतो तो स्वातंत्र्यानंतरच्या काळातला आपला सामाजिक भंपकपणा, अनागोंदी, बुडता आदर्शवाद, आणि असं बरंच काही. गुर्जरांना भेटला तो गांधी हा 'महात्मा' गांधींचा शेवट झाल्याचं सुचवत होता. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य म्हणवणाऱ्या माणसामध्येच तो होता. 'स्वातंत्र्य' या शब्दाचा विरोधाभास वाटले अशी सामाजिक, राजकीय नि सांस्कृतिक परिस्थिती भेदक उपरोधिक भाषेत गुर्जरांच्या कवितेत नोंदवलेली आहे. आणीबाणीच्या थोड्या आधी, 1973मध्ये इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांना तडकाफडकी निलंबित करून अजितनाथ राय यांना देशाच्या सरन्यायाधीशपदी नेमलं. या घटनेत गुर्जरांसारख्या कवीला गांधी दिसला तो आरोपीच्या पिंजऱ्यात -
गांधी मला
अजितनाथ रेच्या न्यायालयांत
आरोपीच्या पिंजऱ्यांत दिसला
सत्याचे प्रयोग करून
देश धोक्यात आणल्याबद्दल
राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली
त्याला फाशी दिला
असा हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अर्थी फाशी दिला जाणारा गांधी गुर्जरांना भेटला. आणि तो जसा भेटला तसा त्यांनी मांडला. पण कवितेची भाषा विसरलेल्या आपल्याकडे त्यांना कायद्याची भाषा ऐकायला लागली हेच काय ते सत्य-
गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हात ठेवून म्हणाला-
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानांच्या विश्वात
मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणि देवमाणसाला तर नाहीच नाही
- आणि क्षणार्धात तो समाधीत गेला.
2020मध्ये महासत्ता होणार म्हणतात, त्या भारतातील सहिष्णुतेची पातळी किमान गांधी जयंतीच्या नि या कवितेच्या निमित्तानं तपासून पाहायला हरकत नाही.