Tuesday, 9 February 2016

सांस्कृतिक राजधानीबाहेरची 'एकोणिसावी जात'

सांस्कृतिक राजधानीत एक पुस्तकांचं प्रदर्शन भरलेलं असतं. शहरातल्या तशा एका मोठ्या चौकाजवळच्या एका सभागृहात. तिथं मग प्रदर्शनाच्या जाहिरातीसाठीच्या फलकांवर, पत्रकांवर एक अभिनेत्री असते. ती एकदम आनंदानं आश्चर्य वाटल्यासारखा चेहरा करून असते. त्या शेजारी उद्गार लिहिलेले असतात: "आईशप्पथ! थेट प्रकाशकांकडून पुस्तकांवर महासवलत!" तिथंच '४० ५० ६० ७० टक्के सवलत' असेही शब्द असतात. ही अर्थात वस्तुस्थितीही असते. म्हणजे प्रदर्शनात काही पुस्तकं एवढ्या सवलतीत मिळत असतातच. फक्त थोडीशी ट्रिक यात असते. तिथंच चौकात एक मोठी कमान-टाइप एक जाहिरात केलेली असते, त्यात दोन्ही बाजूंना अभिनेत्री एकेक पुस्तक हातात घेऊन उभी असते. यातलं एक पुस्तक असतं भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी आणि दुसऱ्या बाजूला लोकसत्ता नावाच्या एका दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांचं 'टाटायन' हे पुस्तक असतं. इतरही काही पुस्तकं दुसऱ्या पोस्टरवर असतात, त्यात ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरच्या कादंबऱ्या, शास्त्रज्ञांविषयी-लेखकांविषयी चरित्रात्मक माहिती देणारी पुस्तकं, सामाजिक कार्यकर्त्यांची आत्मचरित्रं, अशी थप्पी असते. पण सत्तर टक्के सवलतवाली पुस्तकं ती ही नव्हेत. सत्तर-साठ टक्के सवलत म्हणजे न-के-बराबर मार्जिन उरत असावं प्रकाशकाला. त्यामुळं ही पुस्तकं म्हणजे न खपणारी, पिवळी पानं पडलेली, विस्मृतीतली. स्टॉक क्लिअरिंग करून टाकण्यासारखी. थोडक्यात- जाहिरात ही गोष्ट अशी दिसते: वस्तुस्थिती नाकारणारी नव्हे, तर वस्तुस्थितीला फिरवणारी. त्यामुळं या जाहिरातीतल्या सत्तर टक्के सवलतीच्या आकड्यांशी थेट संबंधित पुस्तकं तशी शक्यतो पोस्टरवर दिसणार नाही. ती (तथाकथित) मातब्बरी त्यांना लाभू शकत नाही. तसं याचं कारण आणखीही काही गोष्टींमधे असेल. त्या पुस्तकांचं सांस्कृतिक मूल्यच तेवढं नसेल, किंवा सांस्कृतिक राजधानीच्या टेहळणी-बिंदूच्या कक्षेत अशी पुस्तकं येत नसतील. हे विधान अगदी काळं-पांढरं करता येणार नाही. हा सगळा राखाडी छटांचा आणि विरोधविकासी मामला असावा. बहुतांश पुस्तक-प्रकाशक पुण्या-मुंबईत; राज्यस्तरीय मानल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांची मुख्य कार्यालयं याच शहरांमधे; वृत्तवाहिन्यांची दखल घेण्याएवढा त्यांचा पुस्तकांशी संबंध नाहीच येत, पण तरी अगदीच चुकून काही आला संबंध तर तो याच शहरांपुरता; अशा अनेक संदर्भांनी सांस्कृतिक सत्ता इथं केंद्रित झालेली असेल तर त्यामुळं आपसूक सगळ्यांचाच याच्याशी संबंध येणारच. काहीच नाही तरी शाळेत 'बालभारती'ची पुस्तकं असतात, ती 'बालभारती' (म्हणजे तिचं मुख्य कार्यालय) पुण्यात. पुढं क्रमिक पुस्तकापेक्षा जास्त 'नवनीत'ची गाइडं वापरली असतील, तर तीही इथूनच प्रसिद्ध होणारी. बाकी गाणी-चित्रपट-नाटकं यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सव इत्यादी तपशील तर आणखीच मोठा. कोणाला असा सांस्कृतिक व्यवहार पटला नाही, तरी ते न पटणंही यातल्याच कुठल्यातरी मार्गांनी पुढं येत जातं. म्हणजे जाहिरातींच्या पोस्टरवर असं म्हणणं झळकणार नाही, पण इथल्या संकुचित सत्ताकेंद्रांमधेच कुठंतरी फट मिळेल तिथून हे म्हणणं बाहेर झिरपणार- अशा अर्थी हा विरोधविकासी मामला म्हणतोय आपण.

(इतर सत्ताकेंद्रांप्रमाणेच) या सांस्कृतिक राजधानीत माहितीचा अर्धवटपणा झाकण्यासाठी तुच्छतावादाचा बुरखा सापडू शकतो, अभिरूचीचे विविध रंगी बुरखे सापडू शकतात, प्रसारमाध्यमांची तर खैरात; आणि या सगळ्यासोबत काही सोबर संपन्न स्त्रोतही असत असतील. पण पहिला प्रकार जास्त जोमात असतो, हे तसं सगळीकडचंच वर्णन इथंही लागू.

काहीएक दबदबा असलेले आणि १९४० साली स्वतःहूनच वारलेले जर्मन विचारवंत वॉल्टर बेंजामिन म्हणतात त्यानुसार, 'सभ्यतासंस्कृतीचा प्रत्येक दस्तावेज हा क्रौर्याचाही दस्तावेज असतो. आणि असे दस्तावेज नुसतेच क्रौर्याचा स्पर्श झालेले असतात असं नव्हे, तर एका मालकाकडून दुसऱ्याकडं त्यांचं हस्तांतरण होण्याची प्रक्रियाही क्रौर्यानंच रंगलेली असते'. (बेंजामिन साहेबांचं हे म्हणणं रेघेनं त्यांच्या मूळ पुस्तकात वाचलं नव्हतं. काहीएक काम करण्यासाठी समोर आलं, त्या कामामधे बेंजामिनचे बरेच संदर्भ होते, हे काम काही भारी नव्हतं, तरी त्यामुळं बेंजामिनचा संदर्भ इथवर आला, हे भारी झालं. मूळ संदर्भ असा: वॉल्टर बेंजामिन, 'थिसीस ऑन द फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री', इल्युमिनेशन्स, भाषांतर- हेरी जोहन. मराठी भाषांतर रेघेचं). आपला मुख्य मुद्दा एवढ्या मोठ्या गप्पांचा नाहीच. आपला मुद्दा- आपण जी भाकरी किंवा चपाती/पोळी खातो, ती तयार करण्यापूर्वी पीठ रेडीमेड आणतो किंवा गिरणीतून दळून घेतो, ते- पीठ दळणाऱ्या गिरणीशी संबंधित आहे. (मुळात ते पीठ कोणीतरी पिकवलेल्या धान्याशी संबंधित असतं. आणि ते धान्य कोणीतरी शेतात पिकवलेलं असतं, असं आणखीही मागं मुळांपर्यंत गेलं तरी चालेल खरं म्हणजे. नायतर आपली सांस्कृतिक पोळी भाजून खाताना मूळ संदर्भ विसरायची सवय लागू शकते. अशी सवय सांस्कृतिक राजधानीच्या टिकाऊपणासाठी गरजेचीही असेल काय?)

मुखपृष्ठ: चंद्रमोहन कुलकर्णी [मेहता पब्लिशिंग..]
वर ज्या प्रदर्शनाचा उल्लेख केला, तिथं सत्तर टक्के सवलतीमधे रेघेला एक पिवळ्या पडलेल्या पानांचं पुस्तक मिळालं. हे पुस्तक म्हणजे महादेव मोऱ्यांची कादंबरी: 'एकोणिसावी जात'. महादेव मोरे हे मराठीतले एक लेखक निपाणीमधे साधारण पन्नासेक वर्षं पिठाची गिरणी चालवत लिखाणही करत राहिलेले. ते आहेत, पण गिरणी आता ते चालवत नाहीत बहुधा. ‘एकोणिसावी जात’ नावाची त्यांची कादंबरी (दुसरी आवृत्ती- फेब्रुवारी २००३; मेहता पब्लिशिंग हाऊस. पहिली आवृत्ती- सप्टेंबर १९६८ची होती. २०१५मध्ये तिची तिसरीही आवृत्ती आली. सदर प्रदर्शनात मिळालेली प्रत दुसऱ्या आवृत्तीची आहे). कादंबरीचे प्रकाशक तसे मूळचे कोल्हापूरचे असले तरी त्यांचं ऑफीस पुण्यात आहे, आणि पुस्तकांवर तर पत्ता पुण्याचाच असतो. मोऱ्यांची निपाणी खूपच दूर असली, तरी मराठी लोकांच्या सांस्कृतिक राजधानीत ती 'एकोणिसावी जात' बनून उपस्थित झालीच.

कादंबरी वाचायला रोचक आहे. ट्रकवर क्लिनर म्हणून काम करणारा, कधी मधेच हळूहळू ड्रायव्हरकीपर्यंत मजल मारू पाहणारा नारायण नावाचा पोऱ्या वजा इसम कादंबरीत मुख्य पात्रासारखा आहे. आणि इतर पात्रंही अर्थात आहेतच. बाकी कथानक वगैरे अनेक वाचकांना माहीतही असेल, किंवा सहज माहीत करूनही घेता येईल, कारण कादंबरीच्या प्रकाशकांचं वितरण व्यवस्थित असावं, त्यामुळं दुकानात मिळेल किंवा ई-दुकानातही मिळेल. अगदीच झलक हवी असेल तर कादंबरीच्या मलपृष्ठावरचा मजकूर असा आहे:
"ग्रामीण कथा व कादंबरीकार श्री. महादेव मोरे यांची ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली ग्रामीण कादंबरी. अठरापगड जातींच्या पंक्तीत 'मोटार लायनी'तल्या माणसांची आगळी एकोणिसावी जात बसवून, लेखकानं एक वेगळंच जग साऱ्या तपशिलांनिशी वाचकांसमोर उभं केलं आहे. मुळात हे धगधगीत जीवनानुभवांचं चित्रण आहे. अनुभव घेण्यातील उत्स्फूर्तपणा, रोमॅन्टिक वृत्ती, अभिव्यक्तीतील ताजेपणा आणि अत्यंत ओघवती, चित्रदर्शी शैली यांमुळे कादंबरीतील वास्तव काळजाला भिडतं..."
कादंबरीची ओळख करून देताना 'ग्रामीण' हा शब्द पहिल्या एका वाक्यातच दोनदा वापरण्याची गरज प्रकाशकाला-संपादकांना वाटलेली दिसतेय. तर, मुळात कादंबरीत नक्की काय काय ग्रामीण आहे? कादंबरीच्या कव्हरवर एक ट्रक, काही मोठे टायर, त्या टायऱ्यांच्या गड्डीवर बसलेला मळका टीशर्ट-पॅन्ट घातलेला एक पोऱ्यासारखा इसम, असं रंगीत चित्र आहे. चांगलंय. कादंबरीतली पात्रं 'प्रमाण' मराठी बोली बोलत नाहीत. साधारण निपाणी साइडची भाषा बोलतात. पण निवेदनात प्रमाण मराठीही येत राहाते. असं सहज भाषेची अदलाबदल (बोलतानाही अनेकांची होत राहते तशी) या कादंबरीत आहे. एक उदाहरण पाहा: “इतका टाईट स्कर्ट तिनं अंगात तरी कसा घातला असेल, याचं कुतूहलात्मक अजबपण नारायणला वाटत होतं. तिच्या रुंद छातीवरील बुंद गेंद ऐन बहरात कैफ कहरात होते”. 'कुतूहलात्मक अजबपण' हा प्रमाणाबाहेर प्रमाण भाषेचा वापर नि लगेच दुसऱ्या वाक्यात एकदम आजूबाजूची रस्त्यावरची लयदार भाषा. हे मराठीत सहजी होऊ शकतं. अमुकतमुक 'गाव' आल्याचे उल्लेख कादंबरीत येतात, पण वर्णनावरून ते तालुक्याचं ठिकाण वाटतं. पूना-बंगलोर रोडवरचं गाव मुख्यत्वे कादंबरीत आहे. ते गाव म्हणजे निपाणी. निपाणी ही २०१६ साली तरी एकतीस वॉर्डांची नगरपालिका आहे. सध्या तिची सुमारे साठ हजार लोकसंख्या आहे. कादंबरी मुळात प्रकाशित झाली तेव्हा- १९६८ साली परिस्थिती साहजिकपणे वेगळी असणार, पण खुद्द कादंबरीकडं पाहिलं तर त्यातले तंबाखूच्या बाजारपेठेचे, विडी-उद्योगाचे, प्रवासी वाहतुकीचे संदर्भ, विविध जाती-धर्मांचे तपशील हे सगळं एकसाची 'ग्रामीण' म्हणून खपवायचा अट्टासास का करायचा? “गावात सिटी व रुरल अशी दोन पोलिस स्टेशनं होती”, “गावात चाळीसवर टॅक्श्या” होत्या, हे कादंबरीतले तपशील पाहिल्यावर हे 'गाव' नक्की केवढं आहे असं वाटतं? शिवाय निपाणीतल्या शाळा, महाविद्यालयं, हॉस्पिटलं, आजूबाजूची सुपीक जमीन, साखर कारखाने, चाळीस किलोमीटरांवरचं कोल्हापूर (आत्ताची लोकसंख्या सुमारे सव्वातीन लाख) हा सगळा पार्श्वभूमीवरचा तपशील पाहिला, तरी हे 'ग्रामीण' साहित्य म्हणायचं का? ते खुद्द या कादंबरीवरच अन्यायकारक होणार नाही का?

शहरी नि ग्रामीण हे भेद नसतातच असं आपण म्हणत नाहीयोत, पण हे भेद पगारवाढीसाठी लोकसंख्येच्या निकषावर जसे वापरतात, तसे साहित्याचा मूलभूत निकष असल्यासारखे वापरता येतील का? पण मराठीत ते वापरले गेले. अजूनही जातात. त्याचं कारणही पुन्हा त्या वरच्या सांंस्कृतिक राजधानीतल्या (आणि आर्थिक राजधानीतल्या) साहित्यकेंद्रातच होतं. या केंद्रांना विरोध करणं, हा एक हेतू या सगळ्या व्यवहारात दिसतो. "आधुनिक साहित्याच्या आरंभकालापासून ज्या पुण्या-मुंबईच्या भौगोलिक पट्ट्यात साहित्य-निर्मिती होत होती, त्या पट्ट्यातील ही शहरे साहित्य संस्कृतीची आद्य केंद्रे म्हणून प्रस्थापित होऊन प्रतिष्ठा पावली होती. साहित्यविषयक संस्था, निर्मिती, मुद्रण, प्रसिद्धी, वितरण, क्रयविक्रय, समीक्षा व साहित्यविषयक व इतर व्यवहार यांची एकसत्ताक विपुलता इथे निर्माण झाली होती. सबंध महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रावर ती अधिसत्ता गाजवीत होती", असं ग्रामीण साहित्य चळवळ नावाच्या गटाचे धुरीण राहिलेले आनंद यादव म्हणतात. या वाक्यांमधे त्यांनी 'संस्कृतीची आद्य केंद्रे' असे शब्द वापरलेत. 'आद्य'चा कुठलाही अर्थ घेतला, तरी या म्हणण्यातला तो अर्थ तोकडाच वाटतोय. आपण संदर्भासाठी घेतलेल्या लेखात यादवांनी गांधीवादी, मार्क्सवादी, समाजवादी- असे शब्दही वापरलेत, पण ते असेच आपले आहेत म्हणून आहेत, काही स्पष्टीकरण नाही. त्यापेक्षा म्हणजे यादवांनी 'आधुनिक' असाही शब्द वापरलाय. पण विभागणी करताना मात्र, ग्रामीण आणि शहरी! (यापेक्षा शरद् पाटलांनी केलेली ब्राह्मणी-अब्राह्मणी विभागणी जास्त स्पष्ट आहे, असं वाटतं. पण तो आपल्या नोंदीचा विषय नाही). यादवांची विभागणी ही प्रतिक्रिया आहे, पण मुळात शहरीपणाचा रूबाब दाखवणारी सत्ताकेंद्रातली काही मंडळी असतात, हीसुद्धा क्रिया आहेच. त्याला मग आणखी ही ग्रामीण प्रतिक्रिया. तेच ते बेंजामिनांनी नोंदवलेले दस्तावेज.

या संदर्भात अनेकदा शहर म्हणजे फक्त मुंबई नि पुणे एवढीच मर्यादा दिसते. ही मर्यादा मराठी वृत्तवाहिन्यांसारखी झाली. त्यांच्या लेखी 'गावाकडच्या बातम्या' म्हणजे मुंबई-पुणे सोडून उर्वरित महाराष्ट्र असतो (काही वाहिन्या नाशिक नि नागपूरही शहरांमधे गणतात म्हणून ही शहरं गावात जमा होत नाहीत). पण हे पुरेसं वाटत नाही. शहरांना पाणी कुठून येतं, गावात टीव्हीवर पाहिल्या जाणाऱ्या मालिकांचं चित्रीकरण कुठं होतं, राज्यस्तरीय मानली जाणारी प्रसारमाध्यमं कुठं असतात, नागपूर-अकोला-औरंगाबाद-चंद्रपूर-कोल्हापूर ही शहरं आहेत की गावं, हा मजकूर ज्या यंत्रावर लिहिला जातोय ते यंत्र शहरात तयार झालं की गावात? म्हणजे अगदी सुरुवातीपासून यंत्राला लागणारा कच्चा माल जिथून आला तिथपासून शोधत आलं तर? आणि हे यंत्र पूर्ण खराब होईल तेव्हा याचे अवशेष शहरात जमा होतील की गावात? असे प्रश्न नोंदवतच राहाता येतील आणि अनेक सीमारेषांची सरमिसळ होत राहील. शिवाय मुंबई हे अनेक अर्थांनी आपल्यापुरतं तरी अपवादात्मक महानगर आहे. तुलनेला आणखी अमेरिका-युरोपातलं एखादं शहर घेतलं, तर मग आपल्याकडं आणखी कमीपणाही घेता येईल. यातला शहरी-ग्रामीण परस्परपूरकपणा न नोंदवता ठोस मांडणी केल्यासारख्या बाजू घेणं अपुरं वाटतं. त्यापेक्षा 'आधुनिक' शब्द रोचक होता. तो शब्द 'एकोणिसावी जात'च्या ब्लर्बमधे घालता आला नसता का? आपली नोंद काही आधुनिकता, आधुनिकवाद- यांच्या थिअरीत जाणारी नाही; पण आपण चित्रपट तर पाहू शकतो ना. मग सरळसोट 'मॉडर्न टाइम्स' या नावाचा चार्ली चाप्लीनचा चित्रपटच आहे. त्यातल्या नुसत्या दृश्यावरूनच अनेक गोष्टी स्पष्ट होतात:

चार्ली चाप्लीन दिग्दर्शित 'मॉडर्न टाइम्स'मधलं एक दृश्य

यंत्रतंत्र, भांडवलशाहीचा व्यवहार, त्यातून आलेली-गेलेली स्वातंत्र्यं, व्यक्तीचं असणं-नसणं, इत्यादी अनेक 'आधुनिक' तपशील आपसूकच यातून स्पष्ट होतात. मग ते 'एकोणिसावी जात'मधे 'मोटर लाइनी'त काम करणाऱ्या नारायणसंदर्भातही लक्षात येणारे नाहीत का? नारायणचे तसे बऱ्यापैकी प्रेमानं वारंवार शरीरसंबंध येतात ती मुस्लीम मुलगी विड्यांच्या कारखान्यातच कामाला जात असते. तर या सगळ्या तपशिलांची तीव्रता, धाटणी, इत्यादी वेगळं असेलच; मुळात दोन कलाकृतींची तुलना करण्याचा आपला हेतू नाही, पण पार्श्वभूमी 'आधुनिक' काळाशी कमी-अधिक तीव्रतेनं संबंधित असेल, तर तसा उल्लेख करणं जास्त न्याय्य होणार नाही का? मुळात आधी असा उल्लेख करावाच असं नाही. पण कादंबरीची ओळख करून देताना पहिल्याच वाक्यात ठासून 'ग्रामीण' हा शब्द वापरण्यापेक्षा वेगळं वर्णन करता आलं असतं. त्यासाठी अगदी ठोस शब्दच वापरायचा असता, तर 'आधुनिक' शब्दही कदाचित वापरता आला असता. कादंबरीतल्या निपाणी गावात औद्योगिकीकरण कसं असेल, त्यावरून मग 'आधुनिक' शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. तिथं काही वरच्या चाप्लीनच्या दृश्यासारखं यंत्र दिसणार नाही कदाचित अगदी. पण तरी वेगवेगळी यंत्रं दिसतीलच. पिठाच्या गिरणीचं यंत्र म्हणा, टॅक्सी म्हणा, ट्रक म्हणा, किंवा असं काही ना काही. त्यासोबत सरंजामी वृत्तीचे कुठं काही मालकही सापडतील. हे 'एकोणिसावी जात'मधल्या कथानकापुरतं मनात आलं, म्हणून नोंद.

या सगळ्यामधे राखाडी छटांचा उल्लेख आपण केला. त्या अशा: मोऱ्यांची काही पुस्तकं मेहता पब्लिशिंग हाऊस या व्यावहारिकदृष्ट्या टिकलेल्या प्रकाशनसंस्थेनं काढली, याचा उल्लेख आलाच आहे. शिवाय, २००७ साली (अमेरिकास्थित)  'महाराष्ट्र फाउन्डेशन'चा विशेष पुरस्कार मोऱ्यांना देण्यात आला. नंतर अलीकडं २०१५ साली 'शब्द बुक गॅलरी'तर्फे देण्यात येणारा 'भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला. दोन्ही पुरस्कार सोहळे त्या त्या वेळी देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईत पार पडले. पुरस्कारांनी बाकी काही होतं की नाही, हा वेगळा मुद्दा; पण कदाचित त्यातून कधीकधी कुठंतरी सांस्कृतिक फटीतून वेगळ्या गोष्टी झिरपायला थोडी मदत होत असावी.
०००

महादेव मोरे
[बेळगाव- तरूण भारत, 'अक्षरयात्रा' पुरवणी/ २१ जून २०१५]
छायाचित्रकार: संदेश भंडारे [टीप पाहावी]
०००

संस्कृती/सांस्कृतिक/राजधानी वगैरे फारच मोठे शब्द नोंदीत आले. त्या निमित्तानं बेंजामिन यांच्या ज्या निबंधाचा उल्लेख वर आलाय, तो तरी आपल्याला सहज पूर्ण वाचायला मिळतो (पीडीएफ). या निबंधात वर उल्लेख केलेल्या म्हणण्यापेक्षा सुंदर असं एक म्हणणं बेंजामिन नोंदवतात, ते असं: 'जो बखरकार* घटनांमध्ये लहान-मोठा भेद न करता त्यांची नोंद करतो तो पुढील सत्याला धरून वागत असतो: कधीही घडून गेलेली कुठलीही गोष्ट इतिहासाच्या दृष्टीनं व्यर्थ नसते'. (a chronicler who recites events without distinguishing between major and minor ones acts in accordance with the following truth: nothing that has ever happened should be regarded as lost for history).

*टीप: क्रोनिक्लर (chronicler) या इंग्रजी शब्दासाठी इथं 'बखरकार' असा शब्द वापरला आहे. 'बखर' हा शब्द 'ख़बर' या पारशी शब्दापासून आला असण्याचा धागा 'मराठी विश्वकोशा'तल्या नोंदीत सापडतो. शिवाय विश्वकोशातले नोंदकार असंही म्हणतात: 'बखरलेखनाची परंपरा ही मूलतः ऐतिहासिक स्वरूपाची असली, तरी उपलब्ध प्रत्यंतर–पुराव्यांच्या आधारे घटनांची नोंद करण्यापेक्षा समाजमनामध्ये बध्दमूल झालेल्या आख्यायिकांना प्राधान्य देण्याची प्रवृत्ती त्यांतून प्रत्ययास येते'. 'Chronicle' या इंग्रजी शब्दाचा 'ऑक्सफर्ड'च्या शब्दकोशातला अर्थ असा आहे: 'a factual written account of important or historical events in the order of their occurrence' किंवा 'a fictitious or factual work describing a series of events'. त्यामुळं आपण आपल्या नोंदीपुरता 'बखरकार' शब्द वापरला आहे. 'क्रोनिक्लर' म्हटल्यावर जो अर्थ मनात येतो, तो अगदी जसाच्या तसा 'बखरकार' म्हटल्यावर येत नसावा बहुधा. पण इथं या नोंदीपुरता तरी तो तसा मानावा. रेघेपुरता मानता आला तरी चालेल. छोट्या-मोठ्या सभ्यतासंस्कृतींमधल्या छोट्या-मोठ्या गोष्टी.
०००

१७ डिसेंबर २०२०: नोंदीत वापरलेला फोटो 'तरूण भारत'च्या पुरवणीत सापडला असला, तरी तो संदेश भंडारे यांनी काढलेला असून 'महाराष्ट्र फाउन्डेशन'च्या २००७ सालच्या स्मरणिकेत प्रकाशित झाला होता. नोंद लिहिताना हा तपशील माहीत नव्हता. 'तरूण भारत'ने फोटोच्या स्त्रोताचा कोणताही उल्लेख केलेला नव्हता, पण नंतर शोधाशोध केल्यावर कळल्यामुळे इथे नोंदवणं गरजेचं वाटलं.

2 comments:

 1. पोस्ट वाचनीय आहे.
  पण वाचताना सांस्कृतिक राजधानीवर राग असल्यासारखं वाटतंय. वैयक्तिक.
  अशी राजधानी वगैरे असूच नये कि काय?
  आणि तुम्ही म्हणताय तसं प्रत्येक गोष्टीत मूळचा संदर्भ लक्षात ठेवणं किंवा त्याचा विचार करणं किंवा त्याची जाणीव ठेवणं शक्य आहे का हो?
  रेघ वाचनीय आणि विचार करायला लावणारी आहे, हे नक्की.

  ReplyDelete
 2. पिठाची गिरणी चालवून लिखाण करणारा लेखक :) उपजीविका आणि लिखाण ह्यांच्यात इतका फरक असल्याची मराठी लिहिणाऱ्या माणसांची किती उदाहरणे आहेत ह्याचा मी विचार करतो आहे. बाकी हे खरं आहे सांस्कृतिक राजधानी किंवा काही शहरांचा पुस्तक बाजार-मिडिया ह्यांवरचा वरचष्मा. पण मुळात हा वरचष्मा विकत घेण्याच्या क्षमतेतून निर्माण होत असावा. आणि विकत घेण्याची क्षमता ही आर्थिक आणि राजकीय कारणांनी ठरते. आणि त्यातून सांस्कृतिक संकल्पना निर्माण होत असाव्यात. त्यामुळे संस्कृतीची जी 'ताकदवान' संकल्पना अस्तित्वात असते ती ह्या आर्थिक/राजकीय सत्ताकेंद्रांना भावणारी, पटणारी आणि सोयीची असणारीच असते असं असतं का? एनी वे, माझ्या मते तुम्ही सांस्कृतिक ट्रिकल डाऊनच पकडलं आहे ह्या रेघेत.
  धन्यवाद.

  ReplyDelete