Friday 31 August 2012

जीव देऊ पण जमीन नाही

'इंडिया अनहर्ड' हे एक संकेतस्थळ. 'व्हिडियो व्हॉलन्टीअर्स' ही आंतरराष्ट्रीय संस्था. ज्यांचे आवाज मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये ऐकले जात नाहीत त्यांना त्यांचे आवाज व्हिडियोच्या माध्यमातून मांडण्याची संधी देणं हे या संस्थांनी उभारलेल्या संकेतस्थळाचं काम. वेगवेगळ्या विषयांसंबंधी, घटनांसंबंधी हे ग्रामीण भागातले, आदिवासी भागातले समूह प्रतिनिधी (कम्युनिटी करस्पॉन्डंट) आपलं म्हणणं मांडत असतात.

आपण 'रेघे'वर जी नोंद टाकतोय ती नाग्री गावातल्या आदिवासींच्या जमिनीच्या, अस्मितेच्या नि अस्तित्त्वाच्या लढाईसंबंधी 'इंडिया अनहर्ड'वरती सापडलेल्या मजकुराची. मूळ संकेतस्थळाकडे लक्ष वेधण्यापुरतंच या मजकुराचा उपयोग. २४ जुलैला हा मजकूर तिथे प्रसिद्ध झाला होता, त्या संदर्भात तो वाचावा.

या संकेतस्थळासंबंधी 'द हिंदू'मध्ये पूर्वी आलेला लेख - यात वरच्या संकेतस्थळाची कल्पना आणि इतर माहिती बऱ्यापैकी आली आहे, बाकी प्रत्येक जण आपलं आपण खरं-खोटं काय ते तपासू शकतोच.
'इंडिय अनहर्ड'वरच्या व्हिडियोचा फोटो
'इंडिया अनहर्ड'ची रांचीतली समूह प्रतिनिधी प्रियशीला हिने नाग्री गावातील आदिवासींनी आपल्या जमिनीसाठी सरकारविरोधात उभारलेल्या लढ्याची माहिती देणारा व्हिडियो चित्रीत केला, त्यासंबंधी तिच्याशी संवाद साधण्यासाठी जेव्हा फोन केला तेव्हा ती मशाल मोर्चाच्या तयारीत गुंतली होती. न्यायाची मागणी करत वादग्रस्त जमिनीवरून मशाल मोर्चा नेण्यासाठी हजारो लोक जमले होते. प्रियशीला सांगते की, झारखंडमधील आदिवासींची भावना ध्वनित करणारी या मंडळींची घोषणा होती - 'आम्ही आमचा जीव देऊ पण जमीन देणार नाही.' उद्या या मुद्द्यावर राज्य पातळीवर बंदची घोषणा निदर्शकांनी केलेय. शिवाय इतर काही आंदोलनंही आखण्यात आल्याचं प्रियशीलाने सांगितलं. लोकांच्या मागण्या जोपर्यंत सरकार ऐकत नाही आणि न्यायालय जोपर्यंत त्यांचं म्हणणं निःपक्षपातीपणे ऐकून घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

''सरकारच्या तथाकथित विकासासाठी आदिवासींनी कायम जागा करून द्यावी अशी अपेक्षा केली जाते'', असं सांगून प्रियशीला म्हणते, ''आदिवासींच्या सततच्या आंदोलनांमुळे जेव्हा २००० साली झारखंड राज्याची निर्मिती झाली, तेव्हा आम्हाला वाटलं की, आम्हाला आता आमचे अधिकार मिळतील. पण सरकारमधील आमच्या प्रतिनिधींनी आम्हाला निराशच केलं. त्यामुळे आमची स्वतःच्या हक्कांसाठीची लढाई सुरूच आहे.''

२३ नोव्हेंबर २०११ रोजी झारखंड सरकारने नाग्री गावातील लोकांकडून २२७.७१ एकरांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. १९८४चा भूसंपादन कायदा पुढे करून 'सार्वजनिक कामा'साठी जमीन 'संपादित' केली गेली आणि 'आयआयएम', 'आयआयटी', 'लॉ युनिव्हर्सिटी' अशा प्रतिष्ठीत संस्थांना दिली गेली. लोकांचा आवाज पोलीस आणि सैन्याच्या मदतीने सरकारने दडपून टाकला. लोकांनी जेव्हा आपल्या जमिनी सोडण्यास विरोध दर्शवला तेव्हा सरकारी फौजा गावात घुसल्या आणि शेतांची नासधूस केली. ज्या गावकऱ्यांनी विरोध करण्याचं धाडस दाखवलं त्यांना ताब्यात घेतलं. लोकांनी दाखल केलेली याचिका आधी उच्च न्यायालयानं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली.

अखेरीस सरकारी यंत्रणेवरच्या रागापोटी आणि असमाधानापोटी लोक निदर्शनांना उतरले. ४ जुलै २०१२ रोजी त्यांनी 'आयआयएम'नं बांधलेली हद्द दर्शवणारी भिंत तोडून टाकली. यावेळी निदर्शकांवर लाठीमार करण्यात आला. काहींना अटक झाली. सरकारच्या या कठोर प्रतिक्रियेनं लोकांच्या भावनांचा आणखीच भडका उडाला. हजारो लोकांनी निदर्शनांमध्ये सहभाग घेतला, काहींनी व्यक्तिगत स्तरावर तर काहींनी संस्थांच्या स्वरूपात. महामार्गावर अमर्यादित काळासाठी 'रास्तारोको' करण्यात आला. यानंतर या मुद्द्यावर चर्चा होऊ लागली. राज्यात वेगवेगळ्या वादांना यामुळे तोंड फुटलं. विरोधी पक्षानं आपण निदर्शकांच्या बाजूनं असल्याचा दावा केला. मान्सून येऊ घातलाय आणि काहीही झालं तरी आम्ही आमच्या शेतात पीक पिकवणारच, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

विरोधी पक्षांच्या भूमिकेनं आंदोलनाला फायदा झाला का, असं 'इंडिया अनहर्ड'नं प्रियशीलाला विचारलं. त्यावर तिचा प्रतिसाद तितकासा आशादायक नव्हता. ''ते काहीही म्हणाले तरी सर्व राजकारणी एकच आहेत. तुमच्या प्रश्नाला मी उत्तर द्यायला हवं असं मला वाटत नाही'', असं ती म्हणाली. ''हे लोकांच्या भावनांनी चाललेलं लोकांचं आंदोलन आहे आणि त्यातला आवाज लोकांचा आहे. प्रत्येक आदिवासी मुलाला माहित्ये की ही लढाई त्यांच्या जमिनीसाठी आणि जीवासाठी आहे.''

''आम्ही 'आयआयएम' किंवा इतर संस्थांच्या विरोधात नाहीयोत. झारखंडमध्ये 'आयआयएम' असेल तर आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल. पण आमच्या कुटुंबांची पोटं भरणाऱ्या सुपीक शेतजमिनीवरच ते उभारण्याची गरज आहे का?'' असा प्रियशीलाचा सवाल आहे.

Friday 24 August 2012

दुष्काळ, गुरं नि शेतकरी

'अल-जझीरा' या कतारमधल्या (नि एकूणच आखाती देशांमधल्या) प्रसिद्ध वाहिनीच्या इंग्रजी संकेतस्थळावर महाराष्ट्रासह पश्चिम भारतातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. एकूण ११ फोटो आणि १,३३० शब्द आणि दोन मिनिटं चाळीस सेकंदांचा एक व्हिडियो एवढ्याच सामग्रीने बनलेला हा रिपोर्ट. परदेशातील माध्यमसंस्था असूनही ज्या पद्धतीने हा रिपोर्ट तयार केलाय ते विशेष आहे आणि अर्थात दुष्काळही! या रिपोर्टमधील थोड्याशा भागाचं हे भाषांतर -


ती अकरा वर्षांची आहे आणि बोनेवाडी (जिल्हा- सातारा) इथे तिची आई, दोन बहिणी आणि एक भाऊ यांच्यासोबत राहाते. ती सहावीत आहे आणि शाळेत जाण्यासाठी तिला तीन किलोमीटर चालावं लागतं. संध्याकाळी आपल्या गाईंना चारा देण्यासाठी तिला सात किलोमीटर चालून चारा छावणीवर जावं लागतं. तिचं नाव आशा. साधारण परिस्थिती एका कुटुंबाच्या गरजा भागवू शकेल अशी ११ एकरांची जमीन असलेल्या एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेली आशा.

आणि हे आहेत दिगंबर पांडुरंग आटपाडकर, वय ७० वर्षं वरकुटे मलवडी गावात त्यांची ६० एकर जमीन आहे नि चार विहिरी आहेत. गुरांना चारा देण्यासाठी ते आणि त्यांची पत्नी १० किलोमीटर चालून या छावणीवर आलेत. आपल्या आठ प्राण्यांना जगवण्यासाठी अन्न आणि निवारा पुरवणाऱ्या या छावणीवर त्यांना यावं लागलंय.

भारतात दुष्काळाचा फटका बसलेल्या अनेकांपैकी आशा आणि आटपाडकर हे दोघं. विशेष म्हणजे जनावरांसाठीच्या या छावण्यांकडे वळावं लागलेले बहुसंख्या शेतकरी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहेत. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा लोकसभा मतदारसंघात असलेल्या या भागात या वर्षी २१ चारा छावण्या उभारण्यात आल्यात. महाराष्ट्रातील सिंचन योजनांसाठी लाखो रुपये खर्च केल्याचा दावा त्यांनी नुकताच केला होता.साताऱ्यातली एक चारा छावणी. फोटो- माणदेशी फौंडेशन / अल-जझीरा
प्राण्यांना फटका़
भारतात २००९नंतर पहिल्यांदाच पडलेल्या या दुष्काळाने धान्याचा तुटवडा जाणवणार नाही, कारण देशाची धान्यकोठारं तांदूळ नि गव्हानं वाहून जातायंत आणि सलग तिसऱ्या वर्षी साखरेचं उत्पादन मागणीपेक्षा जास्त झालंय. पण जनावरांच्या चाऱ्यासाठी लागणाऱ्या धान्यांच्या पिकाला मात्र या दुष्काळाचा फटका बसणार आहे. गाईगुरं आणि जमिनीचा तुकडा हीच मुख्य संपत्ती असलेल्या अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

'चारा उपलब्ध होण्यात अडचण आल्यामुळे गुरांच्या संख्येवर परिणाम होणार आहे.. पण गरीबी रेषेखालील व्यक्तींना शासकीय वितरण व्यवस्थेमार्फत अन्नधान्य पुरवलं जाऊ शकतं, जेणेकरून त्यांना आपलं कुटुंब जगवता येईल', असं 'ऍक्शन एड' संस्थेचे अमर नायक 'अल-जझीरा'शी बोलताना म्हणाले.

कर्नाटक, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे.

'आमच्या गावात पाणी नसल्यामुळे आम्ही इथे आलोय. जनावरांसाठीही नाही आणि आमच्यासाठीही पाणी नाहीये. इथे आमच्या गुरांना ऊस, मका, चारा, सुका चारा, हिरवा चारा मिळतो नि आम्हाला तांदूळ नि इतर धान्य मिळतं' - आपल्या अमूल्य गुरांचा जीव वाचवण्यासाठी घर सोडलेले आडपाडकर म्हणाले.

Thursday 23 August 2012

आठवड्याचा बाजार भरलाच नाही..

छत्तीसगढमधल्या नारायणपूर जिल्ह्यातल्या ओर्छा इथं आठवडा बाजारादरम्यान संरक्षण दलाच्या जवानांनी गावकऱ्यांना मारहाण केली. त्यापूर्वी नक्षलवाद्यांनी याच बाजारात एका जवानाला ठार मारलं. या गदारोळात पंचक्रोशीतले आठवडा बाजार काही दिवस भरलेच नाहीत नि गावकऱ्यांच्या पोटांचा खोळंबा झाला इतकंच. त्यासंबंधी तेहेलकात आलेल्या बातमीवजा लेखाच्या काही भागाचं हे भाषांतर-


छत्तीसगढ : नारायणपूर जिल्ह्यातल्या ओर्छा इथे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. स्थानिकांच्या मनात पोलीस आणि नक्षलवादी दोघांचीही भीती आहे. जंगलाच्या कायद्याने हा परिसर चालवला जातो. एक ऑगल्टला नक्षलवाद्यांनी गर्दी झालेल्या बाजारात घुसून छत्तीसगढ सशस्त्र दलाच्या (छत्तीसगढ आर्म्ड फोर्स - सीएएफ) एका जवानाला ठार केलं नि पळून गेले. हा बाजार पोलीस स्टेशनापासून हाकेच्या अंतरावर आहे. वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत, प्रत्युत्तर म्हणून जवानांनी आदिवासींवर आणि बाजारातील विक्रेत्यांवर हल्ला केला. त्यांनी आदिवासींवर नि विक्रेत्यांवर गोळीबार केला, बंदुकीच्या दस्त्याने लोकांना मारलं, बाजारातील दुकानं लुटली आणि गाड्यांना आग लावून टाकली.

ओर्छामध्ये १ ऑगस्टला आठवडा बाजारात छत्तीसगढ सशस्त्र दलाच्या जवानांनी अंदाधुंदी माजवली. (फोटो सौजन्य- अनिल मिश्रा / तेहेलका)
अभुजमाड - बस्तरमधला ४,४०० चौरस किलोमीटरचा परिसर, टेकड्या आणि गडद जंगलांनी वेढलेला, बाहेरच्या जगासाठी एक कोडं असलेला. अनुसूचित माडिया आदिवासी जमातीचं या जंगलांमध्ये वास्तव्य आहे. या परिसरातील २३७ गावांमध्ये माडिया लोक राहातात आणि प्राथमिक गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी ते ओर्छा इथे भरणाऱ्या आठवडा बाजारावर अवलंबून असतात. पण ८ ऑगस्टला लंका, आदेर, गोलेगल, तोंदाबेडा, तुतुली, आसनार, जुआदा, जगुंडा, ओर्छामेता, मार्देल अशा गावांमधून मैलांची पायपिटी करून आठवडा बाजारासाठी आलेल्या गावकऱ्यांना रिकाम्या हातांनी परत जावं लागलं.. कारण बाजार भरलाच नव्हता.

जिल्हा पोलीस दलातील ६६ जवान आणि छत्तीसगढ सशस्त्र दलाची एक तुकडी ओर्छा पोलीस स्टेन आणि कॅम्पाच्या परिसरात तैनात केली गेलेय. या परिसरातील आठवडा बाजारांमधले सोने-चांदीचे विक्रेते मनोज सोनी म्हणाले, ''गावकऱ्यांसारखेच कपडे घालून माओवादी ओर्छा बाजारात येतात हे सगळ्यांना माहीत आहे. पोलीसही त्यांना ओळखतात, पण माओवादी आणि पोलिसांच्यात एक अलिखित करार आहे - पोलीस माओवाद्यांना पकडत नाहीत आणि माओवादी ओर्छा पोलीस स्टेशन आणि कॅम्पावर हल्ला करत नाहीत. त्यामुळे जवान शस्त्रांशिवाय बाजारात येतात.''

पण, सार्केगुडा हिंसाचाराच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी २६ जुलैला काढलेल्या मोर्चावेळी सुरक्षा दलांनी गावकऱ्यांना मारहाण केली. प्रत्युत्तरादाखल १ ऑगस्टला गावकऱ्यांच्या वेषातील नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे जवान आनंद राठोड यांना कुऱ्हाडीने ठार मारलं. राठोड त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह बाजारात आले असताना दुपारी तीन वाजता ही घटना घडली.

या घटनेची बातमी इतर जवानांपर्यंत पोचली तेव्हा ते बाजारात आले आणि त्यांनी गावकऱ्यांना आणि विक्रेत्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. 'जवान कॅम्पातून बाहेर आले आणि पुढचे दोन तास ते बंदुकींमधून गोळ्या झाडत होते. त्यांनी बाजारात लुटमार केली, दिसेल त्याला क्रूरपणे मारहाण केली. काही जखमी व्यक्ती लांबच्या गावातून आले होते. सध्याच्या पावसाळी दिवसांत त्या ठिकाणी जाणं अवघड असतं, काही जण या गंभीर जखमांनी जीवालाही मुकले असतील. किमान बाजार गावकरी आणि विक्रेते पोलिसांच्या या क्रूर कृत्याने गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांनी बायका-पोरांनाही सोडलं नाही', ओर्छाच्या सरपंच चमिला बाई सांगत होत्या.

जंगलात ३१ किलोमीटर आत असलेल्या तुतुली गावातले सन्नू आणि बुधू प्रचंड पावसातून चालत आठवडा बाजारात आले तेव्हा निराश होते. त्यांच्याकडे तांदळाचा अजिबात साठा नाहीये आणि बाजार उघडत नाही तोपर्यंत त्यांना झाडांच्या मुळांवर भूक भागवावी लागणार आहे. त्यांनी सांगितलं की, परवाच्या हाणामारीत मुरुमवाडा गावातल्या वट्टे कुंजमच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय, पण त्याचे कुटुंबीय त्याला डॉक्टरांकडे न्यायला तयार नाहीयेत. कारण हॉस्पीटलमधे जायचं तर जंगलाबाहेर पडावं लागेल आणि त्यात त्यांना पोलिसांची भीती वाटतेय.

ओर्छामधले एक दुकानदार बिर्जुराम चौधरी यांचा डावा पाय पोलिसांच्या मारहाणी फ्रॅक्चर झाला, त्यामुळे त्यांना आता चालता येत नाहीये. नक्षलवाद्यांनी जवानाला कधी मारलं तेही आपल्याला माहीत नसल्याचं ते म्हणतात. 'एकदम गोळीबार सुरू झाला आणि बाजारातील वातावरण दंगलीसारखं झालं. भातबेडा गावच्या लालूला जवान मारत होते ते मी पाहिलं. त्याच्या डोक्याला मार बसलाय. नंतर त्यांनी मला धरलं आणि बेशुद्ध पडेपर्यंत मारलं', आपला डावा पाय दाखवत चौधरी सांगतलं. ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांना त्यांचं दुकान लुटलं गेल्याचं लक्षात आलं.

रेशन न मिळाल्यामुळे अभुजमाडमधल्या सरकारी शाळाही या घटनेनंतर बंद आहेत. या घटनेचे साक्षीदार असलेले शाळा-शिक्षक जयसिंग कर्मा आणि लंकेश्वर सलाम म्हणाले, ''बाजारातील सगळी वाहनं जवानांनी उद्ध्वस्त केली. मोटरसायकलींच्या पेट्रोलच्या टाक्या त्यांनी कुऱ्हाडींनी फोडल्या, टायरांवर गोळ्या झाडल्या, एक मिनी-ट्रक आणि एक गाडी जाळली.'' गुदादी इथल्या सरकारी आश्रम शाळेत तांदळाचा दाणा नसल्यामुळे शाळेतील शिपाई कमलुराम उसेन्दी चिंताग्रस्त आहेत. पन्नास मुलांची पटसंख्या असलेल्या या शाळेसाठी तांदूळ आणायला ते बाजारात गेले होते.

बाजारात हैदोस घातल्यानंतर जवानांनी ओर्छा गावावरही हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या किशन लवात्रे यांनी त्यांची जवानांनी उद्ध्वस्त केलेली मोटारसायकल दाखवली. त्यांनी पोलीस स्टेशनजवळच्या झेरॉक्स दुकानाचीही नासधूस केली. याचं तर ओर्छा पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर एन. एल. घ्रितलहरे यांनासुद्धा आश्चर्य वाटलं. 'पोलीस स्टेशनमधली अनेक कामं या दुकानाच्या माध्यमातून होतात. दुकानाचा मालक भानुरामने गोंधळ सुरू झाल्याचं दिसल्यावरच दुकान बंद केलं होतं, पण त्यांनी कुलूप तोडून लुटमार केली', असं त्यांनी सांगितलं. त्यांनी जेव्हा जवानांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा जवानांनी शिवीगाळ केली नि त्यांना भ्याड ठरवलं. 'बांगड्या घाल आणि खोलीत बसून राहा', असं त्यांनी घ्रितलहरेंना सांगितलं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात पाच तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या घटनेत १४ गावकरी आणि चार जवान जखमी झाले असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, विक्रेत्यांनी नुकतीच एक बैठक घेतली असून २० ऑगस्टला सुरू झालेल्या आठवड्यात परिसरातील काही ठिकाणी आठवडा बाजार भरवावा असं त्यांनी ठरवलंय.

Wednesday 22 August 2012

इंग्रजी देवीतला 'ई'!

उत्तर प्रदेशातल्या इंग्रजी देवीची चर्चा गेली दोन वर्षं आहे. या देवीच्या मूर्तीसाठीच्या मंदिराची तयारी पुन्हा सुरू झाल्याबद्दल 'ओपनसाप्ताहिकात एक टीपण नुकतंच प्रसिद्ध झालं. त्या टीपणाचं भाषांतर-


'बीबीसी'वरच्या मूळ फोटोतून कापलेला फोटो
उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या अवाढव्य पुतळ्यांच्या तुलनेत अडीच फुटांची काशाची मूर्ती म्हणजे काहीच नाही! ढगळ झगा घातलेली, लांब हॅट आणि हातात पेन अशी ही मूर्ती मायावतींच्या पुतळ्याला स्पर्धा ठरू शकत नाही.

उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातल्या बांका गावात २०१०मध्ये या मूर्तीसाठीची पायाभरणी करण्यात आली तेव्हा 'कोण आहे ही नवीन दलित देवी?' असा सवाल मायावतींनी त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारल्याचं सांगितलं जातं. ती कोणीही असेल, मायावतींना ती आसपास नको होती.

ही नवीन देवता होती, इंग्रजी देवी. चंद्रभान प्रसाद या दलित संशोधकाने मांडलेली कल्पना. दलितांना त्यांच्या दुर्दैवापासून मुक्ती हवी असेल तर इंग्रजीतून शिक्षण हाच एक मार्ग असल्याचं प्रसाद यांचं मत.

पण आता बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा आणि दलित अधिकार आणि कल्याणाच्या स्वघोषित प्रवक्त्या मायावती उत्तर प्रदेशात सत्तेवर नाहीयेत. त्यामुळे काशाची ती मूर्ती शाळेच्या आवारात पुन्हा प्रस्थापित केली जाणार आहे.

मूर्तीसाठी पायाभरणी होत होती तेव्हा मायावतींच्या अधिकाऱ्यांनी तिथलं काम थांबवलं होतं. अशा बांधकामाला परवानगी घेतली नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण आता दोन महिन्यांत मंदीर तयार असेल आणि २५ ऑक्टोबरला इंग्रजी भाषा दिवस साजरा केला जाईल, असं प्रसाद म्हणतात. भारतात इंग्रजी भाषक वर्ग तयार करण्यात ज्यांनी हातभार लावला त्या लॉर्ड मॅकॉलेची जयंतीसुद्धा याच तारखेला असते.

पासी या पूर्वी अस्पृश्य गणली गेलेल्या जातीमध्ये प्रसाद यांचा जन्म झाला. ते संशोधक असून परदेशातल्या विद्यापीठांमध्ये दलित समाजाशी संबंधित मुद्द्यांवर काम करतात. दलितांच्या मुक्तीचा एकमेव मार्ग असलेल्या इंग्रजीचा प्रसार करण्यासाठी भारतभर अशी आणखी मंदिरं उभारण्याची त्यांची योजना आहे.

प्रसाद म्हणतात - ''परंपरेनुसार दलितांना मंदिरांमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यांना देव म्हणून बुद्ध मिळाला पण देवी मात्र नव्हती. दलित देवीची कमतरता होती. त्या जागी वेगाने आणि खोलवर पसरेल असं एखादं रूपक का वापरू नये, अशी कल्पना माझ्या मनात आली. (अमेरिकेतला) स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आहे, त्यात स्वातंत्र्य आणि आधुनिकता सामावलेली आहे. इंग्रजी देवीसमोर सरस्वती निरक्षर वाटते. तिच्याकडे पेन नाही, कम्प्युटर नाही. आमची देवी आधुनिक आहे. तिचा तर ई-मेल आयडीही आहे- pioneercbp[at]yahoo.com''
***

'ओपन'वाल्यांनी वरचा ई-मेल पत्ता म्हणून poineercbp@yahoo.com असा दिला आहे. हा पत्ता चुकीचा असल्याचं तिथे पाठवलेली ई-मेल परत आल्यावर कळलं. म्हणून त्यातल्यात्यात त्यातलं स्पेलिंग बरोबर करून poineerचं pioneer केलं. या दुरुस्त स्पेलिंगसह तयार झालेल्या  पत्त्यावर तपासणीची मेल गेली, पण तो पत्ताही कितपत बरोबर आहे ही शंका राहातेच, पण तिथे पाठवलेली मेल परत आलेली नाही.
***

याच विषयावर
'बीबीसी'च्या संकेतस्थळावरचा लेख
'न्यूयॉर्क टाईम्स' मध्ये मनू जोसेफचा लेख
'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या संकेतस्थळाच्या खास भारतीय आवृत्तीवरचा लेख
'ओपन'मधेच पूर्वी आलेला एस. आनंदचा लेख

Thursday 16 August 2012

माझी ओडिया

- आळश्यांचा राजा


ओरिसात प्रशासनातील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या एका मराठी अधिकाऱ्याचा हा लेख आहे. हे अधिकारी गृहस्थ स्वतः 'आळश्यांचा राजा' या टोपणनावाने 'शाणपट्टी' हा ब्लॉग लिहितात. त्यांच्या ब्लॉगबद्दल 'लोकसत्ते'तल्या 'वाचावे नेट-के' या सदरात मजकूर प्रसिद्ध झाला होता. त्या मजकुरावरून ब्लॉग पाहिला, त्यात 'माझी ओडिया' ही त्यांची पोस्ट वाचायला मिळाली. त्यानंतर ई-मेल पाठवून त्यांची परवानगी घेऊन ही पोस्ट 'रेघे'वर प्रसिद्ध होत आहे. ही पोस्ट 'आळश्यांचा राजा' या नावाने प्रसिद्ध व्हावी अशी त्यांची इच्छा असल्यामुळे इथे लेखकाचं टोपणनावच दिलं आहे. याशिवाय त्यांच्या ब्लॉगवरची 'नक्षलवादाच्या निमित्ताने' ही पोस्टही वाचनीय. आता वाचा 'माझी ओडिया' -भाषावार प्रांतरचनेमुळे मला वाटत होते की ओडिया ही बऱ्यापैकी एकसंध भाषा असून संपूर्ण ओरिसा राज्यात थोड्याफार फरकाने एक प्रमाण भाषा म्हणून प्रचलित असेल. पण हे तितकेसे खरे नाही. अर्थात विविधता ही सर्वच भाषांमध्ये असते. माझा एक मित्र यवतमाळहून पुण्याला शिकायला आला होता तेव्हा त्याचे मित्र त्याला म्हणाले होते, सांभाळ बे, तिकडचे लोक छापल्यासारखे बोलतात! भाषा दहा कोसांवर बदलते म्हणतात. पण ओडियामध्ये असे बदल लक्षणीय आहेत. संबलपूर भागातील ओडिया ही कटक – पुरी भागातील ओडियापेक्षा इतकी निराळी आहे की आपल्याला आपल्या कोंकणी, अहिराणीची आठवण व्हावी. इथे एका भाषातज्ज्ञांनी तर संबलपुरी – ओडिया शब्दकोषच काढला आहे. भुवनेश्वरमध्ये सुरुवातीला आलो तेव्हा सुलभाने एका अटेण्डण्टला विचारले, वो सुरेश को हिंदी आती नही क्या? तर तो म्हणाला, मॅडम, उसे तो ओडिया भी नही आती, वो संबलपुरीया है! संबलपूर भागातील जुनी माणसे अजून कटक – पुरी ला जायचे असेल तर म्हणतात, ओडिसाला जायचे आहे! (इथे प्रादेशिकता फार. कटकिया, अंगुलिया, ढेंकेनालिया, संबलपुरिया, इ. ओडिया कुणीच नाही. बाहेरच्या माणसांनी या सर्वांना म्हणायचे.)

आपल्या प्रमाण मराठीमध्ये (असला काही प्रकार आहे हे गृहीतक!) जसे लिहिले असेल तसे उच्चारण असते (तुलना सोपी व्हावी म्हणून इंग्लिश शब्दांची उदाहरणे देतो) उदा. हॉटेल, बँक. हिंदीमध्ये उलट, जसा उच्चार तसे लिखाण उदा. होटल, बैंक. पण ओडियामध्ये उच्चार वेगळा, लिखाण वेगळे: म्हणतील 'होटेल' आणि लिहितील 'हटेल'. 'फोटो' म्हणणार पण लिहिणार 'फट'. 'लॉज' म्हणणार पण लिहिणार 'लज'. 'कॉट'ला 'कट'. (एकदा माझ्या असिस्टंटने 'सी ओ टी'ऐवजी 'सी यू टी' असेच स्पेलिंग लिहिले होते.) खरंतर इथे 'ओ' पण स्पष्ट नसतो. अ, ओ आणि ऑ च्या मधला एक स्वर असतो. तोच ‘अ’ ला पण चालतो. बारकाईने ऐकला तर लक्षात येतो. कसे साधतात आश्चर्यच आहे. या भाषेत ‘व’ नाही. ‘व’ ला ‘ब’ म्हणतात. ‘व्ह’ ला ‘भ’ म्हणतात. 'ड्राइव्हिंग'ला लिहितात 'ड्राइभिं'. 'प्रभात'ला 'प्रवात'. स, श, आणि ष तिन्ही लिहितात वेगवेगळे, पण उच्चार एकच – स. म्हणूनच 'ओडिशा'ला 'ओडिसा' म्हणतात. (ओड्र विशय – ओडि विशा – ओडिशा). बऱ्याच जणांना हलका ‘ड’ चा उच्चार नीट जमत नाही. घोडा सडकपे दौडा असे म्हणणार – घोरा सरकपे दौरा. म्हणून ओरिसा. आपण मराठी बिचारे जसे ते बोलतात अगदी तसे बोलून दाखवतो – आपले संस्कार करत बसत नाही!

आम्हाला भाषा शिकवायला एक तज्ज्ञ येत असत. त्रिपाठी नावाचे. ते म्हणायचे ओडिया इज अॅन ‘अ’फुल लॅंग्वेज! ('अ'चा उच्चार 'ऑ'सारखा). म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी ‘अ’ हे जोडायचेच. हलन्त ठेवायचा नाही. म्हणजे अमिताभ नाही, अमिताभं. जोडाक्षरांची पण गंमत. इतर लिप्यांमध्ये एका ओळीत जोडाक्षरे असतात. इथे एकाखाली एक. त्यामुळे मुद्रणात अडचणी येतात. मग जोडाक्षर आले की फाँट साइझ एकाच शब्दामध्ये दोन अक्षरांसाठी वेगवेगळा!  

त्रिपाठी सर वयस्क असले तरी काळाच्या बरोबर चालणारे होते. त्यांनी ओडियातले बरेच बारकावे आम्हाला समजावून दिले. त्यांच्या मते भाषा जिवंत ठेवायची असेल तर नवीन तंत्रज्ञानाच्या सोबत तिने चालायला हवे. मोबाइल फोन, इंटरनेटवर सहजरीत्या व्यक्त होऊ शकली पाहिजे. त्यासाठी लिपीतले बोजड कालबाह्य प्रघात काढून टाकायला हवेत असे ते म्हणत. हिंदी, मराठी, बांग्ला, तेलुगू इ. भाषा ज्या गतीने इंटरनेटवर आणि मोबाइलवर पसरत आहेत त्या तुलनेत ओडिया बरीच मागे आहे याची त्यांना खंत वाटे. पण ते गप्प बसणारातले नव्हेत. भाषातज्ज्ञ, प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक आणि सॉफ्ट्वेअर डेव्हलपरांच्या एका सेमिनारमध्ये त्यांनी आपले मुद्दे ठासून मांडले आणि मान्य करवून घेतले. या प्रयत्नांनी इंटरनेटवर ओडिया किती पसरते ते पहावे लागेल.

भाषेवर संस्कृतीची छाप असतेच असते. जसा लोकस्वभाव तशी भाषा. मराठी आणि उर्दू पहा. उर्दूतले आर्जव, ‘दरबारी’ औपचारिकता साध्या सरळ रांगड्या मराठीत नाही. ‘आइये, आइये, तशरीफ रखीये’ला मराठीत म्हणतील, ‘या, बसा.’ त्याच न्यायाने ओडिया स्वभावही या भाषेत दिसतो. हे लोक बंगाली लोकांप्रमाणे बोलण्यात पटाईत. यांना संस्कृतचे फार प्रेम. आपल्याला एखादा शब्द आठवला नाही तर खुशाल संस्कृत शब्द ठोकून द्यायचा! उदाहरण म्हणून सांगतो, कमी दाबाचा पट्टा तयार होण्याला इथे ‘लघुचापसृष्टी’ म्हणतात! म्हणजे पारिभाषिक शब्द नव्हे, बोलण्यात वापरतात. एकदा मला माझ्या अॅकॅडमीतल्या मॅडमना विचारायचे होते, आपली तब्येत बरी आहे ना? मी माझ्या अंदाजाने म्हणालो, आपणंकं प्रकृति भलं अछि तो? त्यांनी मला दुरुस्त केले – आपणंकं देहं भलं अछि तो? विचार करा, मराठीत मी बाईंना विचारतो – आपला देह बरा आहे ना! बाई काय अर्थ घेतील सांगता येणार नाही. माणूस मरण्याला चक्क ‘नष्ट’ होणे म्हणतात. पण शब्द थोडे विचित्र असले तरी व्याकरण मराठीच्या तुलनेत फारच सोपे. क्रियापदाला ब, छ, ल जोडले की झाले भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ. म्हणजे मु खाइबि – मी खाईन, मु खाइछि – मी (नुकतेच) खाल्लेले आहे, मु खाइलि – मी खाल्ले. असो. बोलण्याची ढब अशी की आळसावून बोलल्यासारखी. (ओडिया लोक उद्योगी म्हणून मुळीच प्रसिद्ध नाहीत.) म्हणूनच ते व, व्ह असले आवाज काढण्याचे कष्ट घेत नाहीत.

माझ्या हिंदी मित्रांना आश्चर्य वाटते की मी इथल्यासारखेच उच्चार कसे काय करू शकतो. पण त्यांना काय माहीत की मी आळश्यांचा राजा आहे, आणि ही माझीच भाषा आहे !

Wednesday 1 August 2012

पाऊस : थेंब

थेंबात कोसळलेला पाऊस   (फोटोंचे हक्क 'रेघे'कडे)
त्या ठिकाणी पाऊस नुसता कोसळतोच. 'पडणं' वगैरे गोष्टी त्याच्या लेखी फुटकळ आहेत. नुसता बेफाट कोसळतो पाऊस. बेफाट कोसळतो ते कोसळतोच, वर बोंबलतो. बोंबलतो ते बोंबलतोच, पण माणसांचे आवाज बंद होतात त्याच्यापुढे. उरलेल्या वेळात माणूस प्राण्याला तोड नाही. पण त्या वेळी माणसांचे आवाज त्या ठिकाणी तरी बंद झालेले असतात. हे काही खूष होऊनच लिहिलंय असं नाही, किंवा खूप काही वाईट म्हणून लिहिलंय असंही नाही. पण दिसतं ते तरी असं असतं, माणसांचे आवाज ऐकू येईनासे होतात असा तो बोंबलणारा पाऊस त्या ठिकाणी कोसळतो.

असा पाऊस थेंबाथेंबांमधून कोसळत राहातो. पाण्याचा पडदा नुसता सरसरत असतो इकडेतिकडे. छत्र्याबित्र्या, रेनकोटबिनकोट हे तर निरर्थकच ह्या पावसापुढे.

त्या ठिकाणी एक रस्ता आहे मोठाच्या मोठा. किती मोठा, तर खूप मोठा. असा खूप मोठा रस्ता आहे, पण गाड्यांपुढे रस्त्यांना काय किंमत असतेय ओ. तर पाऊस पडला नि फाफलला रस्ता. गाड्या तुंबल्या पाण्यासारख्या. वरतून पाऊस, डावीकडून पाऊस, उजवीकडून पाऊस, खालून वाहणारा पाऊस नि गाड्या एकामागे एक तुंबत गेलेल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तुफान लाल मातीचं पाणी वाहत निघालेलं.

गाड्यांचं तसं झाल्यामुळे झालं काय की, चालणाऱ्यांची किंमत वाढली, कारण ते काय भिजतभिजत त्यांचं त्यांचं चालत राहिले.

थेंबात दुनियेला उलटं फिरवणारा पाऊस
तिथून बाजूला गेलेला रस्ता एकटा गपगार. तिकडे गाड्या वळण्याची शक्यताच नव्हती कारण पुढे काही मुद्दाम जाण्यासारखं नव्हतं. म्हणजे नाही म्हणायला घरं आहेत, पण फार काही वेगळं नाहीये. निव्वळ रस्ता आहे, मोठा नाहीये, पण आहे, त्याचात्याचा आहे.

तर त्या रस्त्यावरही चालता येतं. तसं चालताना पाऊस जास्त दिसला. आणि अजून एक असं झालं की थेंबात कोसळलेला पाऊसही दिसायला लागला. चालताना जरा तो स्पष्ट दिसू शकतो. थेंबात कोसळलेल्या पावसात दुनिया उलटी फिरते. पाऊस मुद्दाम काही करत नाही, पण होतं ते असं. किंवा दिसतं ते तरी असं. थेंबातल्या पावसात आजूबाजूचं जग उलटं लटकतं.

थेंबात दुनियेला उलटं फिरवणाऱ्या त्या पावसासमोर आपण काय बोलणार? सुन्नच झालं सगळं.

सगळं गडद दाट होत गेलेलं. मळभ वर पसरलेलं. आजूबाजूला पाऊस पसरलेला. आणि समोर पन्हळीतून गेलेल्या जाड तारेत थांबलेला थेंब दिसला. तिथेही जग उलटच टांगलेलं. पण जग होतं, पाऊस होता आणि थेंबसुद्धा होता. थेंबाथेंबात पाऊस कोसळत होता आणि पसरत होता-
तारेवरची कसरत