Saturday, 7 November 2015

मखमली पोटावरची थरथर

राजस्थानातला मोठा महाल. तिथं लग्नाची लगबग. लग्नापूर्वीचा कुठलातरी छोटामोठा कार्यक्रम असल्यासारखं वातावरण. मग वधू दिसते. एकदम श्रीमंत घरचं लग्न आहे हे तर आधीच कळलंय आपल्याला. मग लग्नाची सगळी देखरेख करणारी मॅनेजर टाइप मुलगी येऊन वधूला सांगते, 'ज्वेलरी डिझायनर आलाय.' वधू उठून आत महालात जाते. सगळंच ऐसपैस आहे. मोठ्या दरवाजातून आत गेल्यावर तिला काहीतरी सुंगध आला असावा असं वधूच्या थबकण्यावरून वाटतं. म्हणून ती डावीकडं बघते, तर तिथं हा ज्वेलरी डिझायनर दागिन्यांच्यासोबत उभा असतो. मग ती तिथं जाते. तो 'लेट्स ट्राय' असं (दागिन्यांच्या संदर्भात!) म्हणतो. आणि काही दागिने तिला घालतो, ते तिनं समोरच्या आरशात पाहून काय ते ठरवायचं असावं. तर गळ्यापासून हळूहळू दागिने घालायच्या या काळात तो तिला कमरपट्टा घालतो तेव्हा या वधूचं पोट एकदम हलकेच शहारा आल्यासारखं आत खेचलं जातं. या क्षणाला कॅमेरा तिच्या पोटावर फोकस झालेला आहे. आणि अर्थातच प्रेक्षकांना तिच्या मखमली पोटावरची थरथर जाणवावी इतपत हा क्लायमॅक्स गाठलेला आहे. हे सगळं कथानक सुरू असताना महालात आल्यानंतर मादक आवाजात असं गाणं सुरू होतं: सांस खनकके, लाज छनकके, बहकन लागी मै>> भूल भटक गई, तुममे सिमट गई मै चटकन लागी मै>> इश्क लिपट गयो.....आके अंग से>> रंगी रंग गुलाबी...गुलाबी..मैं>> बहकन लागी मैं।।

ही जाहिरात कदाचित तुम्ही टीव्हीवर किंवा अलीकडं कुठला चित्रपट पाहिला असाल तर त्या दरम्यान मोठ्या पडद्यावर पाहिली असाल. जाहिरातीतल्या वधूला जो सुंगध येतो, तो 'वाइल्ड स्टोन' डिओचा आहे. एकीकडं लग्न जवळ आलेलं असतानाही या  वधूला एका 'परक्या' पुरुषाबद्दल आकर्षण वाटतं. आणि या पुरुषालाही ते माहीत असावं, असं त्याच्या डोळ्यांमधल्या सूक्ष्म भावनांवरून वाटतं. अशा जाहिरातींमध्ये इतर वेळी पुरुष जसे वागताना दाखवतात त्यापेक्षा इथं जास्त सूक्ष्म आहे, असं वाटलं. अशा पुरुषांच्या डिओच्या जाहिरातींमधले पुरुष थोडे लगेच आपली भावना दाखवतात, ते डॉमिनेटिंग किंवा जास्तच वाइल्ड वाटू शकतात. पण इथला हा नील भूपालननं अभिनय केलेला पुरुष त्या स्त्रीच्या वरचढ ठरू पाहतोय, असं जाहिरात पाहाताना तरी वाटलं नाही. तिला आपल्याबद्दल आकर्षण वाटलंय, हे तर हा समजून आहे. तो ते तिला जाणवूनही देतोय. पण लगेच जास्त कायतरी वखवख-खळबळ त्याच्या डोळ्यांत दिसत नाही. खिडकीतून मस्त ऊन येतंय आणि हा इथं आकर्षणाचा सुंदर खेळ चाललाय. हा अर्थात भूपालनच्या अभिनयाचा भाग असेल, पण त्यामुळं डिओच्या इतर जाहिरातींपेक्षा ही थोडी जास्त सहज वाटली. मखमली पोटवाल्या बाईंचं नाव डॅनिएला आहे, असं इंटरनेटवर शोधल्यावर सापडलं. त्या कोणी आंतरराष्ट्रीय मॉडेल आहेत. त्यांच्या पोटाचा अभिनय तर खतरनाकच म्हणायला हवा. वर जे गाणं वाजल्याचा उल्लेख आहे ते गाणं इला अरुण यांच्या आवाजात आहे. आणि या जाहिरातीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत पियुष पांडे. (पियुष पांडे आणि इला अरुण ही भावंडंच आहेत आणि त्यांचं कुटुंब राजस्थानातलंच आहे, हेही एक).

पाहिली नसेल जाहिरात, तर ही पाहा:या जाहिरातीची शक्कल लढवणाऱ्या पियुष पांडे यांनीच २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचार मोहिमेसाठीही शक्कली लढवल्या होत्या. त्या वेळी त्यांना विकायचं होतं ते प्रोडक्ट होतं 'नरेंद मोदी'. आणि 'मोदी वॉज अ फँटास्टिक प्रोडक्ट', असं पांड्यांनी नंतर 'मिंट' या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. या मुलाखतीत एका ठिकाणी पांडे म्हणतात:
कोणत्याही (जाहिरात) मोहिमेतला कळीचा मुद्दा असतो ते खुद्द 'उत्पादन'. कोणत्याही प्रकारची जाहिरात खराब उत्पादन विकू शकत नाही. श्री. मोदी हे फँटास्टिक उत्पादन होते आणि या उत्पादनाला आपलं मूल्य माहिती होतं. आपण कशाचं प्रतिनिधित्व करतोय, हे लोकांना सांगण्याचं कसब या उत्पादनात होतं. संदेश पोचवणं, हाही एक कळीचा मुद्दा आहे. आणि (मोदींच्या बाबतीत) तो खूप वर्षांपासून अंमलात आणण्यात आला होता. समाजमाध्यमांमधून आणि इतरही मार्गांनी लोकांशी संवाद साधून हे संदेशवहनाचं काम सुरू होतं. कोणत्याही उत्पादनासाठी हे एक आदर्श उदाहरण ठरावं. उत्पादन चांगलं असेल, तर त्याने संवाद साधला पाहिजे. उत्पादन खराब असेल आणि त्याला अगदी थोर संवादरूपांची जोड दिली, तरी त्याला कधीच यश येणार नाही. लोकांशी संवाद साधणं, त्यांना सामावून घेणं, त्यांचा सहभाग वाढवणं, या गोष्टी मोदींच्या जाहिरात मोहिमेच्या यशामागे आहेत, असं मला वाटतं. इथं मी प्रसारमाध्यमांमधून झालेल्या प्रचारमोहिमेबद्दल बोलत नाहीये, तर भारतीय जनतेशी त्यांनी जो संवाद साधला, तो इथं महत्त्वाचा ठरला.
जाहिरात करून झाल्यावरही जाहिरात संपलेली नसते, एवढं पांडे यांच्या मुलाखतीवरून स्पष्ट होऊ शकतं. आणि वाइल्ड-स्टोन डिओसारखाच उत्पादनाचा खरा उपयोग कायतरी वेगळाच असतो, पण उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी दिला जाणारा संदेश कायतरी वेगळाच असतो, हेही कळतं. पांडे यांनी यापूर्वीही अनेक गाजलेल्या जाहिराती केलेल्या आहेत. आणि त्यांचं एक पुस्तकही अलीकडंच बाजारात आलेलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे 'पांडेमोनियम' (Pandeymonium). 'लोकसत्ते'त या पुस्तकाचा परिचय आज प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटलंय की, '‘पँडेमोनियम’ म्हणजे उच्चरवात सुरू असणारा गोंधळ. वस्तू आणि सेवांच्या बाजारात या गोंधळातून वाट काढत नेमका आशय जाहिरातींद्वारे पोहोचवला कसा, याच्या काही कहाण्या सांगणाऱ्या पुस्तकाचे नाव मात्र ‘पांडे’मोनियम, कारण लेखक जाहिरातप्रभू पियूष पांडे!'

तर परिचय म्हणतो त्यानुसार मूळ शब्द आहे तो: Pandemonium - अर्थात, पँडमोनियम / पँडेमोनियम. त्याचा 'गोंधळ व गोंगाट' हा अर्थ वरच्या परिचयामध्ये आलेला आहेच. आणखी थोडा अर्थ शब्दकोशात शोधला, तर असा मिळाला: a scene of anarchy । जेथे गोंधळ, पुंडाई अगर अराजक माजले आहे अशी जागा. (सोहोनी इंग्रजी-मराठी शब्दकोश). तर अशा जागेतून कोण स्वतःची वाट काढतं आणि कोणता आशय पोचवतं? मोदी आणि पांडे हे या खेळातले मोठे- म्हणजे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय असे खेळाडू असले, तर आपणही कुठल्या ना कुठल्या पातळीवरचे खेळाडू असूच की. वर उल्लेखलेल्या परिचयातच पांड्यांच्या पुस्तकाबद्दल एक सकारात्मक मत देताना असं म्हटलंय की, 'या पुस्तकातून ‘आपल्यासाठी हे नाही’, अशी भावना येत नाही. उलट, ‘हे सांगताहेत ते आपल्यालाच’ ही भावना शेवटपर्यंत कायम राहते'. ही भावना फक्त या पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता पाहिलं, तर असं वाटू शकतं की, आपणही एक उत्पादन आहोत आणि आपणही स्वतःबद्दल या गोंगाटात कायतरी वेगळाच संदेश पोचवू पाहतोय की काय! 

त्यामुळं मग दोन प्रश्न: 
१. आपला नक्की उपयोग काय आणि आपण संदेश काय पोचवतोय?
२. डॅनिएलाच्या पोटावरची थरथर बघायला आपल्याला मजा आली की नाही? किंवा / नील भूपालनच्या डोळ्यांकडं बघून आपल्याला काय वाटलं?

अब दुनिया बेहेकेगी!

No comments:

Post a Comment