Monday, 8 March 2021

झोपडपट्टी, दादा आणि ताई

पुण्यातील कोथरूडमधल्या एका गुंडाला साताऱ्यात ताब्यात घेण्यात आलं आणि आता येरवडा तुरुंगात स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं. अशा बातम्या आजच वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या आहेत. शिवाय आज ८ मार्च हा महिला दिन असल्याचंही कळतं. 

या बातम्यांमध्ये एक वाक्य असं आहे: '...झोपडपट्टी दादा प्रतिबंंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली (लोकसत्ता, ८ मार्च). किंवा काही ठिकाणी नुसता '...एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव मंजूर केला होता', असं उल्लेख दिसला (लोकमत, ८ मार्च).

या कायद्याचं पूर्ण नाव इंग्रजीत असं आहे: 'The Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords, Bootleggers, Drug Offenders and Dangerous Persons Act, 1981'. मराठीत ते बहुधा असं होईल: 'महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, अंमलीपदार्थविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या धोकादायक /विघातक कृत्यांना प्रतिबंधक करणारा अधिनियम, १९८१'. बातमीत एवढं लांबलचक वापरणं शक्य नाही, हे बरोबरच. म्हणूनच काही बातम्यांनी नुसतं 'एमपीडीए' एवढंच लिहिलेलं आहे. काहींनी ते कंसात लिहून आधी कायद्याचा संक्षिप्त निर्देश केला आहे. आत्ताच्या आणि पूर्वीहीच्याही अशा काही बातम्यांमध्येही संक्षिप्त निर्देश 'झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा' असा आल्याचं दिसतं.

पण हा निर्देश करताना 'झोपडपट्टी दादा' असा शब्दप्रयोग करणं टाळता येईल, असं वाटतं. तसंही 'एमपीडीए' या लघुरूपात फक्त 'महाराष्ट्र धोकादायक कृत्यं प्रतिबंधक कायदा' एवढाच निर्देश होतो, कायदा करणाऱ्यांनी 'स्लमलॉर्ड' शब्द वापरला, त्यामुळे त्यातला पूर्वग्रह मराठीत येणार, मग 'झोपडपट्टी' हा शब्द वापरावा लागणार, पण 'स्लमलॉर्ड'चं मराठी भाषांतर 'झोपडपट्टीतील गुंड' असंही करता येईल. कारण, अनौपचारिकरित्या बोलताना जरी 'दादागिरी' हा शब्द वापरला जात असला, तरी कायदा मात्र 'गुंड' असलेल्या ताईंनाही लागू होणारच. त्यामुळे औपचारिकरित्या 'दादा' शब्दाऐवजी 'गुंड' शब्द वापरणं रास्त राहील (गुंड हा शब्दही पुल्लिंगी असला, तरी 'दादा'च्या तुलनेत जरा अधिक सार्वत्रिक वापरता येईल असा असेल बहुधा. म्हणजे गुंडगिरीचा उल्लेख मुलींच्या संदर्भातही करता येईल). 

कायदा व न्याय विभागाच्याच एका कागदपत्रात हा मुद्दा संबंधितांच्या लक्षात आल्याचं दिसतं, त्याचा दाखला हा पाहा:


पण खुद्द या दस्तावेजात पुढे तो बदल करून घेतलेला नाही. कायद्यातील सर्व शब्दांची व्याख्या या दस्तावेजात दिलेली आहे, त्यात असं म्हटलंय: 

"झोपडपट्टीदादा" याचा अर्थ जी व्यक्ती, बेकायदेशीरपणे कोणत्याही जमिनीचा (मग ती जमीन शासनाच्या मालकीची असो किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या वा अन्य एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असो) ताबा घेते किंवा अशा जमिनीत प्रवेश करते किंवा बेकायदेशीरपणे त्या जमिनीच्या संबंधात भाडेदारीचा अथवा संमती व परवानगीचा करार वा अन्य कोणताही करार करते, किंवा जी व्यक्ती विकण्याच्या वा भाड्याने देण्याच्या उद्देशाने त्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम करते, किंवा अशा जमिनी कोणत्याही व्यक्तीला, भाड्याने अथवा संमती व परवानगी तत्त्वावर बांधकामासाठी किंवा त्यावरील अनधिकृत बांधकामाचा वापर वा भोगवटा करण्यासाठी देते, किंवा जी व्यक्ती, अशा जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेण्याकरिता किंवा ज्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम करण्याकरिता दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला जाणीवपूर्वक पैशाची मदत देते, किंवा जी व्यक्ती, अशा जमिनीवर राहणाऱ्या रहिवाशांकडून भाडे, भरपाई म्हणून किंवा इतर रकमा धाकदपटशाने वसूल करते वा वसूल करण्याचा प्रयत्न करते, किंवा जी व्यक्ती, कोणत्याही कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता तेथील भोगवटादारांना बळजबरीने हुसकावून लावते वा तसा प्रयत्न करते, किंवा जी व्यक्ती, वर नमूद केलेल्यापैकी कोणतीही गोष्ट करण्यास अन्य कोणत्याही मार्गाने अपप्रेरणा देते, ती व्यक्ती असा आहे.

या परिच्छेदातला सर्व अर्थ 'स्लमलॉर्ड' या इंग्रजी शब्दामधून निपजलेले दिसतात. कायदा लिहिणारे त्या भाषेला प्राधान्य देत असावेत. पण असे शब्द अशा विशिष्ट संदर्भांमध्ये टाळता येऊ शकतात. 'झोपडपट्टी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी काही समस्याच नसतात, किंवा तिथे काही वेगळ्या गंभीर समस्या नसतात, अशा  भाबड्या कल्पनेने हे नोंदवलेलं नाही. पण विविध संदर्भांमुळे माणूस एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहत असतो- तशी निवड तो करतो त्यात अनेक अपरिहार्यता असतात. कोणी तीन मजली किंवा तीस मजली इमारतीत फ्लॅट घेतला तरीही, किंवा कोणी बंगले बांधले तरीही किंवा कोणी झोपडं भाड्याने घेतलं तरीही अपरिहार्यता असतातच- कोणाला त्यात सुख वाटतं, कोणाला दुःख वाटतं. पण 'झोपडपट्टी'चा उल्लेख 'वरच्या' वर्गांमध्ये तुच्छतेनेही होत असतो. कोणीतरी अस्वच्छ वागलं, शिव्या दिल्या, रूढार्थाने घाण वागलं, तर 'झोपडपट्टीतून आलाय का?' इत्यादी शब्दप्रयोग होताना दिसतं. तर, या अवकाशातल्या समस्या सोडवण्यासाठी एखादा कायदा असेल तर त्यात त्या अवकाशावर विपरित शिक्का मारणं टाळायला हवं. 'वस्तीतील गुंडगिरी' इत्यादी शब्दही उपलब्ध आहेत, ते वापरणं शक्य असतं. तरी कायदा करणाऱ्यांना ते शक्य झालं नसेल, तर बातमी देणाऱ्यांनी तरी तो शिक्का टाळायचा प्रयत्न करायला हरकत नाही. बातमी गुंडगिरीबद्दलची असताना तितकीच ठेवावी, अन्यथा 'झोपडपट्टीत हे असलंच चालतं', असा भाव बाकीच्या 'सुसंस्कृत' वाचकांच्या मनात अजाणतेपणी वाढवायचा कशाला! तसंही या विशिष्ट बातमीतली झोपडपट्टी जिथे आहे तो 'कोथरूड' हा भाग म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतला अतिसुसंस्कृत भाग म्हणून ओळखला जातो. अशा वेळी स्वतःचा तथाकथित सुसंस्कृतपणा/सभ्यपणा/अतिसुरक्षितपणा तपासण्यासाठी या बातम्यांचा उपयोग करायला हवा. नाहीतर ते 'त्यांचं' असंच असतं, 'आपण आपले' सुरक्षित नि सुसंस्कृत आहोत, असे भास टिकून राहतील, असं वाटतं.

Saturday, 27 February 2021

बघण्यापुरत्या भाषेचा गौरव

आज २७ फेब्रुवारी. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने या तारखेला 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. कुसुमाग्रजांचे एक चाहते असलेले जी. ए. कुलकर्णी यांच्या मावसबहीण नंदा पैठणकर यांनी 'प्रिय बाबुआण्णा' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे (पॉप्युलर प्रकाशन, पहिली आवृत्ती: २०१२). त्यात पान ९६वर पुढचा मजकूर येतो:

"मुलींना शाळेत घालण्याआधी, मी त्यांना कोणत्या शाळेत घालावं (इंग्लिश मिडियमच्या की मराठी मिडियमच्या) याविषयी त्याचा [म्हणजे बाबुआण्णा म्हणजे जी.ए. कुलकर्णी यांचा] सल्ला विचारला होता. तेव्हा त्याने सांगितलं होतं की, 'मुलींना जगाच्या पाठीवर कोठेही जावं लागलं तरी त्यांना धीटपणे सगळ्या गोष्टींना सामोरं जाता आलं पाहिजे, त्यांचं कोठे अडता कामा नये; म्हणून चांगलं इंग्रजी लिहिता, बोलता आलं पाहिजे. त्यासाठी त्यांना कॉन्व्हेंट शाळेत घालायला हवं. पण याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी मातृभाषेकडे संपूर्ण दुर्लक्ष करावं. आपली मातृभाषा, मराठीही येणं तितकंच महत्त्वाचं आहे!' त्याच्या म्हणण्यानुसार मी त्यांना 'सेंट हेलिना' या शाळेत घातलं आणि सुट्टीत त्या मराठीही शिकल्या. पण मामाच्या कथा वाचण्याजोगं आणि त्या कथा समजण्याजोगं त्यांचं मराठी परिपक्व मात्र झालं नाही याची मात्र मला राहून राहून खंत वाटते. पुढे मुग्धा लग्न झाल्यावर अमेरिकेला गेली तेव्हा तिथून लिहिलेल्या पत्रात तिनं पहिलंच वाक्य असं लिहिलं होतं की 'आम्हांला कॉन्व्हेंट शाळेमध्ये घालायचा मामाचा आणि तुमचा निर्णय किती योग्य होता हे संपूर्ण प्रवासात आणि इथं आल्यावर चांगलंच पटलं!' मनीषाचंही इंग्रजी चांगलंच आहे. शिवाय ती कॉम्प्युटरच्या क्षेत्रातली आहे. त्यामुळे मलाच तिचा सल्ला बरेचदा घ्यावा लागतो."
मुखपृष्ठ: सुभाष अवचट

जी. ए. कुलकर्णींचे एक चाहते आहेत चित्रपट दिग्दर्शक राही अनिल बर्वे. मध्यंतरी 'तुंबाड' नावाचा त्यांचा हिंदी चित्रपट चर्चेत होता. चित्रपटाची कथा नारायण धारपांच्या मूळ कथेवर बेतलेली आहे, आणि शीर्षक काय द्यावं हे सुचत नव्हतं, म्हणून मग समोर मराठी पुस्तक पडलेलं 'तुंबाडचे खोत', त्यावरून 'तुंबाड' असं नाव देऊन टाकलं! 'असे विषय इथे भारतात चालणार नाहीत, हॉलिवूडला जा', असं बऱ्याच लोकांनी आपल्याला सांगितल्याचं बर्व्यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितलं होतं. तसंही चित्रपट माध्यमाला असल्या प्रादेशिक भाषाबिषांचं बंधन नाही, असंही म्हटलं जात असल्यामुळे पटकन जागतिक झाल्यासारखंही वाटत असावं. त्यानुसार 'तुंबाड' चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट-महोत्सवांमध्ये दाखवला गेला. म्हणजे धारपांना, 'तुंबाडचे खोत' लिहिलेल्या श्री. ना. पेंडसे यांना जे बंधन पडलं, ते बर्व्यांना नसणार. त्यामुळे बहुधा, बर्वे यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं:

"माझ्या लेखी खरं जागतिक तोडीचं मराठी लेखन जी.एं.पासून सुरू झालं आणि जी.एं.सोबत संपलं. पण त्यात कुणालाही वाईट वाटण्यासारखं काहीही नाही. कुठल्याही भाषेत असा एखादा लेखक शतकांतून एकदा केव्हातरी चुकून अपघाताने येऊन जातो. त्यामुळे ठीक आहे." 

दुसऱ्या एका मुलाखतीत बर्व्यांना त्यांच्यावरच्या साहित्यिक संस्कारांविषयी विचारल्यावर ते म्हणतात: 

"जागतिक साहित्यातली घ्यायची झाली तर असंख्य नावं आहेत. पण दुर्दैवानं मराठीत फक्त जीए. जेव्हाजेव्हा त्यांच्याहून काहीतरी श्रेष्ठ शोधायचा, वाचायचा प्रयत्न केला तेव्हा फक्त निराशा पदरी पडली. संपूर्ण मराठी साहित्य एका बाजूला आणि जीए दुसर्‍या बाजूला. १९८७ साली जीए गेले. इतकी वर्षं झाली तरी अद्याप त्यांच्या जवळपास पोचणारा एकही लेखक निर्माण होऊ नये हे खरंच आपलं दुर्दैव आहे. आणि गेल्या अनेक दशकांमधे झालेल्या मराठी भाषेविषयीच्या अनास्थेमुळे, पुढील पिढ्या मराठी भाषेत न शिकता इंग्रजी माध्यमांमधे गेल्यामुळे मराठी भाषा जणू अखेरचे श्वास घेत असल्यासारखी भावना झालेली आहे."

आता ते पुढचा चित्रपट जी. ए. कुलकर्णी यांच्या 'विदूषक' या कथेवर करत असून त्याचं नाव 'रक्तब्रह्मांड' असं आहे. 'तुंबाड ही सोपी फिल्म होती रक्तब्रह्मांड महत्त्वाकांक्षी आहे,' असंही त्यांनी तिसऱ्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. म्हणजे आता मराठी 'परिपक्व' नसलेल्या प्रेक्षकांना भाषेचं बंधन एका कथेसाठी सहज ओलांडता येईल. आणि 'शतकांतून एकदाच होणारी जागतिक तोडी'ची अभिव्यक्ती नेत्रसुखद पद्धतीने आणि 'धीटपणे' अनुभवता येईल. मराठीही 'परिपक्व' असलेल्यांना तर दुहेरी आस्वाद घेता येईल. 'तुंबाड' चित्रपटाचं विषयसूत्र 'हाव' हे असल्याचं दिग्दर्शक सांगतात. शेवटी ती हावच माणसाला खाते, इत्यादी. बाकी, पात्रं, कथानक यात काहीच गुंतागुंत नसली, भयाचेही सोपेच साचे वापरलेले असले, तरी तांत्रिक सफाई, व्हीएफएक्स, इतर काही साउंड डिझाइन वगैरे गोष्टी भाषेची बंधनं ओलांडतात. आणि 'जगाच्या पाठीवर कोणत्याही गोष्टीला धीटपणे सामोरं जाण्या'साठी कलाकृती सज्ज होते.

खरं म्हणजे चित्रपटही फक्त बघून किंवा ऐकून संपत नाही, त्याचं काहीएक कमी-अधिक 'वाचन' आपण सर्व जण आपापल्या परीने करू शकतो बहुधा. पण सध्या बघण्याचे नि दिसण्याचे दिवस असल्यामुळे कदाचित जागतिक होणं म्हणजे जग 'बघणं' किंवा जगाने 'बघणं', असा अर्थ जास्त दिसत असावा, (चित्रपट, पुस्तकं, पर्यटनस्थळं, वृत्तवाहिन्या, अगदी समोर प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना- या सगळ्यांना हे लागू होईल). अशा रितीने जगासमोर स्वतःला धीट म्हणून पेश करण्यासाठी लागेल ती खटपट करत राहणं आवश्यक ठरतं. धीट नसलेल्या कितीतरी गोष्टी जगात असतात, त्यांना यात पुरेशी जागा नाही. शिवाय, साध्या पातळीवर आपण व्यक्ती म्हणून जग 'वाचणं' असा अर्थ या जागतिकपणात दिसत नाही. हे वाचन करण्यासाठीची भाषा कोणती असते?

०००

या धाग्याशी संबंधित आधीच्या काही नोंदी:

आणि

जागतिकपणा कमी लाभलेल्या मराठीतल्या इतर काही लिहिणाऱ्यांविषयी:

Friday, 16 October 2020

अति मुलाखती आणि कंटाळा

एक

भालचंद्र नेमाडे यांच्याविषयी वेळोवेळी बरंच बोललं जातं. वर्तमानपत्रांपासून समाजमाध्यमांपर्यंत. स्वतः तेही स्वतःविषयी वेळोवेळी बोलत असतात. अलीकडेच 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीला दहा वर्षं पूर्ण झाल्याबद्दल त्यांची आणखी एक मुलाखतही एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाली (लोकसत्ता, लोकरंग, ० ऑगस्ट २०२०). त्यांच्या विरोधात आणि बाजूनेही बरंच बोललं जातं. स्वतः ते शेरेबाजी करतात, त्यांचे समर्थक आणि विरोधकही शेरेबाजी करतात. या सगळ्यात पडून काही फारसं साधतही नाही, फक्त वेळ जातो. पण आपल्या आजूबाजूला बरेचदा हे घडत असेल, तर कधीतरी आपला वेळ त्यात जातो. कंटाळा यावा इतकं हे सगळं एकांगीही झालेलं आहे. एका बाजूला, नेमाड्यांचं गौरवीकरण- खरं म्हणजे आता ते दैवतीकरण झालेलं आहे. आणि उलट्या बाजूने त्यांचं खलनायकीकरण, असं.

लेखक-व्यक्ती म्हणून भालचंद्र नेमाडे कसे वागतात, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या व कविता कशा आहेत, त्यांची लेख स्वरूपातली नि भाषणं-मुलाखती यांमधली समीक्षा किंवा शेरेबाजी कशी आहे, साहित्य अकादमीसारख्या काही संस्थांमधे ते धुरीण राहिलेले आहेत किंवा आणखी कुठे अजूनही असतील तर तिथे त्यांचं काम कसं परिणामकारक राहिलं- असे काही स्तर इथे आहेत. असे कमी-अधिक स्तर प्रत्येकच व्यक्तीबाबत असत असावेत, पण प्रत्येक व्यक्ती इतकी प्रसिद्ध नसते, इतकी प्रकाशात नसते, त्यामुळे हे स्तर सतत सार्वजनिक पातळीवर मिसळले जात नाही. नेमाड्यांच्या बाबतीत (मराठी साहित्याच्या आणि आता अलीकडच्या काळात मराठी वर्तमानपत्रं व टीव्ही इत्यादींच्या अवकाशापुरतं) हे सतत होताना दिसतं. त्यांचा प्रभावही असाच विविध स्तरांवरचा आहे. आपली नोंद मुख्यत्वे दुसऱ्या- समीक्षा, शेरेबाजी या- स्तरासंबंधीची आहे.

कोणाशी/अनेकांशी ते व्यक्तीशः प्रेमळपणे, मोकळेपणाने वागलेले असतील, मग त्याचा प्रभाव म्हणून संबंधित व्यक्ती त्यांच्या शेरेबाजीलाही त्या प्रेमळपणाचा भाग म्हणून समजून घेते. नेमाडे दीर्घ काळ प्राध्यापक राहिलेले असल्यामुळे कुठे कुठे विद्यार्थी पसरलेले असतात, ते आपापल्या अनुभवानुसार नेमाड्यांकडे गुरू म्हणूनच पाहत राहतात. कोणाला त्यांच्या कविता-कादंबऱ्यांमध्ये गुण दिसलेले असतात, मग शेरेबाजीकडे तात्पुरतं दुर्लक्ष करणं रास्त वाटतं. साहित्य अकादमीसारख्या संस्थेच्या उपक्रमांचं विकेंद्रीकरण करण्यात त्यांचा हातभार असेल, मग त्याचा प्रभाव पडून विकेंद्रीत अवकाशातल्या व्यक्तींना काहीएक किमान कृतज्ञता वाटत राहते. (हे अर्थातच आपण थोडे अंदाज आणि थोडी प्रत्यक्षातली निरीक्षणं नोंदवतो आहोत. या गोष्टींना काही आकडेवारी किंवा तसं मोजमाप नसतं).

काही ठिकाणी मानापमानामुळे नेमाड्यांवर वैयक्तिक चिखलफेकही होते, किंवा सगळंच राजकारण आहे- ज्ञानपीठ पुरस्कारही लॉबिंगने मिळाला, त्यांचं सगळं साहित्य पोकळ आहे, इत्यादी. यात बरेच वैयक्तिक संबंधांचे संदर्भ असतात, अनेक लोक आधी त्यांच्याशी ओळख असल्याचं वारंवार सांगून काही दाखवू पाहत असतात, पण मग मानापमान झाल्यावर नेमाड्यांचं पूर्ण साहित्य पोकळ असल्याची भाषणं करतात- असा एक सांस्कृतिक केंद्रांमध्ये कायमच दिसणारा भागही यात आहे. पण आपण तो सोडून देऊ. हा शेवटी ज्याच्यात्याच्या स्वभावाचा आणि समजुतीच्या मर्यादेचाही भाग राहत असावा. कोणी कुठे लॉबिंग केलं, इत्यादी सगळं गॉसिप म्हणून मजेशीर वाटतं, पण केवळ आपल्याला न पटणाऱ्या, किंवा आपल्या जास्त जवळ नसलेल्या, किंवा आपल्यासारखी जाणीव नसलेल्या व्यक्तीला काही मिळालं की त्याबद्दल आपण कुत्सितपणेच बोलायचं, असाही प्रकार दिसतो. नेमाड्यांच्या शेरेबाजीत, त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमधल्या विरोधाभासात अहंकार आहे, अनेकदा अप्रामाणिक अपमानही त्यात केला जातो, पण खास सांस्कृतिक केंद्रांमध्ये आढळणाऱ्या कुचकेपणापेक्षा नेमाड्यांचा विरोधाभास आणि शेरेबाजी वेगळ्या प्रकारचे आहेत. किंबहुना, कुठल्याही लोकप्रियतेला अनेक कारणं असतील, तसं नेमाड्यांच्या लोकप्रियतेचं एक कारण कदाचित हेही असावं. मराठी साहित्यातल्या अभिव्यक्तीचं विकेंद्रीकरण झालं, त्याच काळात नेमाड्यांची लोकप्रियता वाढत गेलेली आहे. आणि आता ते स्वतःच केंद्रस्थानी आलेले आहेत ('जर्नल ऑफ पोस्टकलोनिअल रायटिंग' या नियतकालिकाच्या ऑगस्ट २०१७च्या अंकात प्रकाशित झालेल्या मुलाखतीत त्यांनीही हे मान्य केल्याचं दिसतं. मग त्यावर आपण कोणते उपाय करतो, याची काही माहितीही ते देतात. शिवाय, 'द हिंदू' या वर्तमानपत्राला जुलै २०१०मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'नेमाडपंथी' असा शब्दच आता रुजलेला असल्यामुळे आपली जबाबदारी कशी वाढलेय, असाही उल्लेख केलेला दिसतो!). बाकी, कोणत्याही पुरस्काराच्या काही मर्यादा राहतातच. त्या स्वीकारून त्याला तितपत महत्त्व द्यावं किंवा अजिबात देऊ नये. रेकॉर्ड असेल तर त्यासह टीकाही करावी. किंवा साहित्यिक गुण-दोष हवे तितक्या तीव्र भाषेत नमूद करणंही ठीक. अगदी कोणाचं काहीच लिखाण न आवडणंही शक्य. पण नेमाड्यांना काही मिळालं, एवढ्याचंच वाईट वाटत असेल, तर ते ठीक वाटत नाही.

पण नेमाड्यांवर टीका करणारे अर्थातच विविध प्रकारचे आहेत. त्यातले काही रास्तपणे आणि समंजपणे टीका करत आले असले, तरी त्यांना कधीच काही नीट उत्तरं दिली गेली नाही. नेमाडेप्रणित देशीवादी मांडणीबद्दल कितीही मोकळेपणाने कोणी प्रतियुक्तिवाद केला, तरी तो पोकळीत निघून जातो- अशी परिस्थिती आजूबाजूला दिसते. अशा सगळ्या वातावरणात आपण आणखी एका नोंदीची भर घालावी का, असा प्रश्न होता. पण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही अगदीच थोड्या घटनांविषयी आपण इथे नोंदी करत असतो, तसंच घटना किंवा घटित म्हणून याकडे पाहून नोंद करावी, असं वाटलं.

दोन

वरच्या मुलाखतीत एक प्रश्न असा आहे: ‘हिंदू’चा पहिला भाग वाचल्यानंतर ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत गेल्या त्या पाहता तुम्ही ज्या व्यापक पद्धतीने ‘हिंदू’ ही संकल्पना वापरताय, ती समजून घ्यायला वाचक कमी पडतायत, ते फारच संकुचित पद्धतीने त्याकडे पाहतायत असं नाही का वाटत?

म्हणजे नेमाडे कमी पडत असतील ही शक्यता यात गृहितही धरलेली नाही. किंवा कोणी त्यांच्या 'हिंदू' संकल्पनेवर आक्षेप घेतला, तरी त्याला उत्तर देण्याच्या खटपटीत पडण्याऐवजी संबंधितांची समजूत कमी असल्याचं गृहित धरायचं. त्यामुळेच नेमाड्यांचं यावरचं उत्तरही वेळोवेळी उगाळून झालेलंच आहे आणि त्यात आधी नोंदवलेला आत्मकेंद्रीपणा आहेच: "हो, तसं असू शकेलही. पण तेही फ्रीडम आपण त्यांना दिलं पाहिजे. आपल्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स सगळ्यांकडून मिळाला नाही तरी त्यांचं त्यांना हवं तसं इंटरप्रिट करायचं फ्रीडम आहेच. आपल्याकडे काही अशी अ‍ॅक्टिव्ह मंडळी आहेत, ती चुकीच्या मूल्यांना फॉलो करत असतात. त्यातून मग ती काहीतरी वेगळे अर्थ काढत असतात. आपण म्हणतो त्यापेक्षा वेगळ्या अर्थाचं काहीतरी त्यांना दिसत असावं. पण माझ्या मते, हिंदू हा अगदी अफगाणिस्तानापासून ते ब्रह्मदेशापर्यंत पसरलेला सांस्कृतिक प्रदेश आहे. यात आधी दोन-तीनच देश होते. आता चार-पाच वेगवेगळे देश झालेले आहेत. पुढे आणखीनही पाच-पंचवीस होतील. तरी पण हे सगळे हिंदूच आहेत. या सगळ्यांना मिळून मी ‘हिंदू’ असा शब्द वापरतोय. त्याच्याशी धर्माचा संबंध नाही. या उपखंडातील सगळे धर्म मी ‘हिंदू’चाच एक भाग मानतो. बौद्ध धर्म म्हणा, जैन धर्म म्हणा, हे आपल्याच मातीतून जन्मलेले धर्म आहेत. नावं वेगवेगळी दिलेली आहेत. काही परक्या लोकांनी दिलीत, काही आपली स्वत:ची आहेत. काही शाक्य वगैरे लोकांची नावं तर हेटाळणीपूर्वकच होती. हे सगळे आपल्या भूमीचे उद्रेक आहेत. त्यामुळे मग आपण ‘हिंदू’ ही संकल्पना त्या अर्थाने अत्यंत उदार, व्यापक स्वरूपात घ्यायला हवी असं मला वाटतं. हा अर्थ जे संकुचित करू पाहतायत, त्यांच्याकडे आपण जरा सहानुभूतीनेच पाहावं लागतं. काय आहे की, त्यांना वाटतंय- त्याचं म्हणणं बरोबर आहे. पण ते चुकतायत. कधीतरी ते नीट मार्गावर यायला हवे आहेत."

नव-अनुष्टुभ, मे-जून २०१८
'नव-अनुष्टुभ' या नियतकालिकाच्या मे-जून २०१८च्या अंकामध्ये "देशीवाद: राष्ट्रवादाला आणि एकूणच अस्मितावादी राजकारणाला समर्थ पर्याय" अशा शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला. अनेक परस्परविरोधी विधानं या लेखात आहेत. आपण थोडंच नोंदवू. या लेखात सुरुवातीलाच (नेमाड्यांचा) सांस्कृतिक देशीवाद आणि (बाळ ठाकरे, डोनाल्ड ट्रम्प इत्यादींचा) राजकीय देशीवाद असा सोयीस्कर भेद नोंदवलेला आहे. संस्कृती आणि राजकारण हे परस्परांपासून भिन्न असल्याचं भाबडं गृहितक यातून पुढे येतं. इतकंच नाही, तर लेखात लगेच असंही म्हटलेलं आहे- "राष्ट्रवादाला पर्याय देऊ शकेल अशा ज्या एका सशक्त सांस्कृतिक देशीवादाची आपण चर्चा करणार आहोत तो या हलक्या पातळीवरच्या राजकीय देशीवादापासून वेगळा दाखवता येतो- साहित्य आणि संस्कृती राजकारणापेक्षा वरच्या पातळीवर असतात म्हणून नव्हे, तर नुसत्या राजकारण्यांपेक्षा विचारवंतांचं राजकारण अधिक वरच्या पातळीवरचं असतं आणि सांस्कृतिक प्रवाहांना विधायक आणि एका चांगल्या भविष्याची दिशा दाखवणारं असतं, म्हणून." हेही वरच्या प्रश्नोत्तरासारखंच आहे. स्वतःला वरचं मानायचं. प्रत्यक्षात मानवी संस्कृतीत पैसा, शस्त्रं, इतर विविध घटकांची भूमिका काहीही राहिलेली असू दे, आम्ही साहित्य-संस्कृती यांचं राजकारण वरचं मानणार. 

नव-अनुष्टुभमधल्या या लेखाचा शेवट असा आहे: "हा नुसता सैद्धांतिक किंवा करिअरिस्ट मुद्दा नसून काय प्रकारच्या व्यवस्थांमध्ये आपण जगतो आणि त्या व्यवस्था तुमचं, तुमच्या सामाजिक-व्यावसायिक शक्यतांचं काय करतात हा खरा यक्षप्रश्न आहे. या प्रश्नांचं उत्तर आपल्याला प्रामाणिकपणे देता आलं नाही, तर विक्रम-वेताळाच्या गोष्टीत सांगतात तशी आपल्या डोक्याची शंभर शकलं होऊन आपल्याच पायाशी लोळतील." लेखात बरेच मुद्दे उत्तेजित विधानांच्या स्वरूपात आलेले आहेत. सुरुवातीला राजकारण आणि विचारवंतांचं राजकारण असा भेद लेखिकेने केला असला, तरी पुढे सरकारकडून काही अपेक्षाही केल्या आहेत, आर्थिक रचनांबाबत निराशाही व्यक्त केली आहे, शाळेच्या भाषिक माध्यमांपासन इतर विविध मुद्द्यांवर उत्कट भावूक विधानंही आहेत. पण हे कोणत्याही सर्वसामान्य माणसाला भेडसावणारे प्रश्न आहेत. ते नुसते थोड्या परिभाषेसह नोंदवून 'देशीवाद' होतो का? आणि या प्रश्नांची उत्तरं शोधणं लेखिकेला अपेक्षित असताना स्वतः मात्र त्यांनी तसा प्रयत्नही केलेला नाही. स्वाभाविकपणे ती शंभर शकलं या लेखातच पाहायला मिळतात. हेच नेमाड्यांच्या मुलाखतींमध्ये आणि त्यांच्या निमित्ताने होणाऱ्या विविध चर्चांच्या रूपातही पाहायला मिळतं.

उदाहरणादाखल: ‘पाञ्चजन्य’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदी मुखपत्रात मार्च २०१५मध्ये आलेली नेमाड्यांची मुलाखतही आपल्याला वाचायला मिळते. वास्तविक, ‘देशीवाद: राष्ट्रवादाला आणि एकूणच अस्मितावादी राजकारणाला समर्थ पर्याय’ अशा शीर्षकाच्या लेखाला ही संपूर्ण मुलाखत आपोआपच छेद देणारी आहे. ‘मातृभाषेत प्राथमिक शिक्षण’, ‘स्वातंत्र्यानंतर हिंदी राष्ट्रभाषा करणं’, ‘भारतातले सगळेच हिंदू असणं’, असे अनेक मुद्दे यात आहेत. प्रश्नकर्त्याची आणि नेमाड्यांची या मुद्द्यांवर सहमती असल्याचं त्यातून दिसतं. त्या सहमतीचे आधार वेगवेगळे आहेत की सारखेच आहेत, हे काहीच स्पष्ट होत नाही. देशीवादाचा वापर राष्ट्रवादी अस्मितेच्या राजकारणासाठी कसा केला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरणच या मुलाखतीत मिळतं. नेमाड्यांची स्वतःची आत्तापर्यंत इतरत्र व्यक्त झालेली मतं (त्यांची साहित्यिक अभिव्यक्ती) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी मिळतीजुळती आहेत, असं सदर वाचकाला वाटत नाही. (शिवाय, संघाच्या मुखपत्राशी बोलण्याचा त्यांचा निर्णय आत्तापुरता बाजूला ठेवू. ती वैयक्तिक निवड आहे, संवाद करणं रास्त वाटणं शक्य आहे, असं तात्पुरतं म्हणू. पण त्या-त्या अवकाशात काय बोललेलं कसं सादर होऊ शकतं किंवा आपल्याला मुळात काय कसं बोलायचंय, याचं भान आवश्यक आहे, असं वाटतं). पण नेमाड्यांना अपेक्षित असलेला भूसांस्कृतिक देशीवाद (किंवा त्यांचा ‘हिंदू’ शब्दाचा अर्थ) आणि संघाचा धार्मिक राष्ट्रवाद यात नक्की कोणता भेद आहे? तो पुरेसा स्पष्टपणे मांडला गेला आहे का? नसेल, तर देशीवाद पटलेल्यांनी तशी स्पष्ट मांडणी करायला नको का?  राष्ट्रवादाला देशीवाद हा पर्याय आहे, असं ढोबळपणे म्हटल्यामुळे हे काम होईल की, दोन्हीतल्या कथित भिन्न तपशिलांची स्पष्ट मांडणी करावी लागेल? तसं न करता ‘राजकीय देशीवाद’ आणि ‘सांस्कृतिक देशीवाद’ अशी सोपी विभागणी करणं घातक वाटतं. संस्कृती रूढ अर्थानेही राजकारणाशिवाय उभी असते, असं काहीतरी भयंकर गृहितक यामागे असल्यासारखं दिसतं. हे गृहितक किती घातक आहे, यासाठी ‘पाञ्चजन्य’मधली मुलाखत वाचावी. 

आणखी एक उदाहरण: "या नियतकालिकाच्या प्रकाशनार्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्याकडून अनुदान मिळाले आहे. असे असले तरी या नियतकालिकातील विचारांशी मंडळ व राज्य शासन सहमत असेलच असे नाही", अशी ओळ 'नव-अनुष्टुभ'च्या अंकात सुरुवातीला तळामधे असते. तर, मे १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, मग सुरुवातीच्या उत्साहात, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना, चांगल्या उद्देशाने 'साहित्य आणि संस्कृती मंडळा'ची स्थापना झाली, त्यात परदेशातल्या महत्त्वाच्या ग्रंथांची मराठीत भाषांतरं करून घेणं, मराठी साहित्यातल्या ग्रंथांना व नियतकालिकांना अनुदान देणं, अशी उद्दिष्टं ठेवण्यात आली. यातली काही सुरुवातीला पूर्णही झाल्याचं दिसतं. नंतर गोष्टी बऱ्याच संथ झाल्या. तरीही, अनेक नियतकालिकांना हे अनुदान मिळतं, ते ठीकही आहे. अलीकडे, नामदेव ढसाळांचं समग्र साहित्य, कृष्णराव अर्जुन केळूसकरांचं समग्र साहित्य- असेही काही प्रकल्प या मंडळाने पूर्ण केल्याचं दिसतं. यात मर्यादा नाहीत असं नाही. पण लोकशाही आणि पक्षीय राजकारणातल्या सगळ्या गुंतागुंतीसह ते राजकारण आणि साहित्य-संस्कृती यांच्या परस्परसंबंधाचा आणि कदाचित परस्परप्रभावाचा हा एक छोटा, ठळक दिसणारा दाखला नोंदवला. याहून सूक्ष्म स्तरावर आणखी सापडेलच. पण तो वेगळा विषय होईल. 

मानवी व्यक्तींचं परस्परसंबंधांचं राजकारण, मानवी समूहांचं परस्परसंबंधांचं राजकारण, या सगळ्यातूनच राजकीय पक्षांच्या राजकारणापर्यंतचा प्रवास होत असेल, हे काहीच विचारातही न घेता विचारवंतांचं राजकारण अधिक मार्गदर्शक असल्याचं विधान 'नव-अनुष्टुभ'मधल्या लेखात केल्याचं दिसतं. याने काय होणार? एकंदर मानवी व्यवहारांच्या प्रवाहातून साहित्य-संस्कृतीचा प्रवाह असा वेगळा काढता येतो का? शेती, जेवणखाण, शाळा-कॉलेजांमधलं शिक्षण, कपडालत्ता, लैंगिक संबंध, उद्योगधंदे- अशा सगळ्या मानवी व्यवहारावर कशाचा प्रभाव पडत असतो, हे अशा सोप्या विभागणीतून समजून तरी घेता येईल का? मानवी व्यवहारांसारखंच पक्षीय राजकारण आदर्श नसतं, सगळं क्रौर्य, खोटेपणा, चढाओढ त्यात येणार. पण म्हणून त्यापासून साहित्य-संस्कृती नि तिचं राजकारण वेगळं असतं, असं मानणं ठीक वाटत नाही. साहित्य-संस्कृतीतही क्रौर्य, हिंसा, चढाओढ राहतच असते. उलट, विचारवंतांच्या, साहित्य-संस्कृतीच्या प्रवाहाचा सोयीस्कर वापर पक्षीय राजकारणाच्या प्रवाहाद्वारे कसा होऊ शकतो, याचा एक दाखला 'पाञ्चजन्य'मधल्या मुलाखतीत मिळतो. 

विरोधाभास आपल्या जगण्यात असतो, वागण्यातही असतो. पण सार्वजनिक पातळीवर बोलताना-लिहिताना आपण त्या-त्या वेळी वाट्टेल तसं विरोधाभासीच बोलत राहणं, रेटत राहणं ठीक नसावं बहुधा. त्याने काहीसं ढोंग निर्माण होण्याची शक्यता राहते. उदाहरण म्हणून वर उल्लेख आलेल्या मुलाखतीतलं आणखी एक प्रश्नोत्तर पाहावं.
प्रश्न: आणखी एक निरीक्षण असं आहे की, तुमच्या आधीच्या कादंबऱ्यांपेक्षा ‘हिंदू’मधील स्त्रीव्यक्तिरेखा अधिक प्रभावी आहेत. किमान पहिल्या भागामध्ये तरी हे जाणवतं की, यातल्या स्त्रीव्यक्तिरेखा अगदी ठळक आहेत.. काही अस्सल भारतीय स्त्रीत्वाचा नमुना म्हणता येतील अशा आहेत.

उत्तर: हो, आधीच्या कादंबऱ्यांमध्ये स्त्रीव्यक्तिरेखा काहीशा दुय्यम म्हणाव्यात अशा होत्या. याचं कारण कदाचित आधीचे नायक बॅचलर होते. त्या कादंबऱ्यांच्या थीममध्ये ते बसत नव्हतं. म्हणजे आता ‘कोसला’चं पहा. तिथे बॉईज होस्टेलभोवतीच बहुतेक सगळं कथासूत्र फिरत असल्याने तिथं स्त्रियांचा फारसा काही संबंध येऊ शकत नव्हता. त्यामुळे पांडुरंग सांगवीकरचा स्त्रियांशी संबंध तिथे फक्त त्यांच्याविषयीची त्याची निरीक्षणे नोंदवण्यापुरताच येतो. उदाहरणार्थ, वर्गातल्या मुली बघून तो म्हणतो, ‘यांना चित्रविचित्र नवरे मिळतील. यांना मुलं होतील, पण आपल्याला काहीच होणार नाही.’ नंतरच्या ‘बिढार’, ‘जरीला’ वगैरे चतुष्टय़ामध्येही विशेषकरून काऱ्या लोकांचंच सगळं असल्यामुळे तिथेही स्त्रीव्यक्तिरेखा फारशा ठळकपणे येऊ शकत नव्हत्या. पण आता ‘हिंदू’ची जी काही अनेक आशयसूत्रं आहेत, त्यापैकी एक मातृसत्ताक पद्धतीकडे पुन्हा जाण्याचा प्रयत्न करणे, हे असल्यामुळे यापुढच्या भागांमध्येही वेगवेगळ्या स्त्रीव्यक्तिरेखा ठळकपणे आलेल्या दिसतील. मुळात मानवी संस्कृतीमध्ये मातृसत्ताच होती. नराचा संबंध फक्त बीजधारणेपुरताच होता. नराची निवडही स्त्रीच करू शकत होती. निसर्गात कायमच हे आपल्याला दिसून येतं. ते एक तत्त्व म्हणून मला महत्त्वाचं वाटतं. तर आता ‘हिंदू’च्या चारही भागांमध्ये हे एक मध्यवर्ती सूत्र आलेलं आहे, की मातृसत्ताक अशा पद्धतीचं जे काही हिंदुत्व असेल त्याच्याकडे ही कादंबरी नेते. पहिल्या भागात नुसती सुरुवात आहे याची. पण पुढच्या भागांत ते अधिकाधिक स्पष्ट होत जाईल. दुसऱ्या भागातही आर्किओलॉजिस्ट असलेला नायक अनेक देशांमध्ये आर्किओलॉजीच्या अभ्यासाच्या निमित्ताने जेव्हा जातो तेव्हा त्याला असं दिसतं की, सगळीकडेच बायकांना वाईट दिवस येत चाललेत. एकीकडे सुधारणा होत असताना दुसरीकडे स्त्रियांची परिस्थिती मात्र अधिकाधिक बिघडताना दिसते आहे. मानवी उत्क्रांतीमध्ये बायकांचे वाईट दिवस येणं हे त्याला खटकत राहतं. कधीतरी  ते उघड केल्याशिवाय आणि मातृसत्ता पुन्हा रिस्टोअर झाल्याशिवाय जगातले स्त्रियांचे प्रॉब्लेम्स कमी  होणार नाहीत अशा निष्कर्षांपर्यंत तो येतो.
आधीचे नायक बॅचलर होते, मग 'हिंदू'चा नायक खंडेराव बॅचलर नाहीये का? तोही बॅचलरच आहे, मग हे कारण कशाच्या आधारावर दिलं? मुलाखतीत लगेचच ते निदर्शनासही आणून दिलं गेलं नाही. शिवाय, बॅचलर पुरुषांच्या आयुष्यात प्रत्यक्षाप्रत्यक्ष रितीने स्त्रिया नसतात की काय? की, 'भारतीय स्त्री'चा आपला साचा सापडेपर्यंत पुरुष लेखकाने स्त्री-पात्रांची दखल घ्यायची नसते? (याचा अर्थ कादंबरीत पुरुष किंवा स्त्री पात्रं असावीत किंवा नसावीतच, किंवा ती अमुक अशीच असावीत, त्यांनी अमुक असंच वागायला हवं, असा आग्रह नाही. पण इथे मुलाखतीत दिली जाणारी कारणं सुसंगत नाहीत. शिवाय, भारतीय स्त्री- या साच्यावर कोणाला वेगळंच बोलावं लागेल). दुर्दैवाने नेमाड्यांची उत्तरं इतकी सरसकट विधानं करणारी आहेत की त्यावर आणखी युक्तिवादही अशक्य होतो, कंटाळवाणा होतो, असं वाटतं. (त्यात पुन्हा 'हिंदुत्व' हा शब्दही वापरून टाकलेला आहे. तो शब्द कोणत्या राजकारणातून निपजला आणि वास्तवातल्या सामायिक तरीही बहुप्रवाही हिंदू जाणिवांशी त्याची सांगड घातलेली तुम्हाला हवी आहे का, याचा काही विचारही नाही).

ललित, जून २०१५
'ललित' मासिकाच्या जून २०१५च्या  भालचंद्र नेमाडे विशेषांकात 'भाषा, इतिहास व संस्कृती : नेमाडे आणि एंगूगी' हा प्राची देशपांडे यांचा लेख प्रकाशित झालेला आहे. त्यात 'हिंदू' कादंबरीबद्दल एक चांगलं निरीक्षण नोंदवलेलं आहे, ते असं: "खंडेरावच्या भविष्याचा निर्णय हा भ्रष्ट गाइडच्या कटकटीचा किंवा चांगल्या करियरचा प्रश्न नाही, तर निव्वळ बौद्धिक दृष्टिकोनातून आपल्या संस्कृतीचे अस्सल आकलन शक्य आहे का, असा ज्ञानमीमांसक प्रश्न आहे. सामूहिक स्मृती आणि भाषेच्या दैनंदिन, वैविध्यपूर्ण वापरातून मिळवलेल्या सांस्कृतिक वारशात सहभागी होऊन ते स्वतः जगावं, की त्याला शास्त्रीय भाषेतून तटस्थपणे, पाय न बुडवता समजून घ्यावं या दोन जीवनकृतींमधली एक त्याला निवडायची आहे. दोन्ही एकाच वेळेस करणे केवळ अशक्य आहे, हे स्वतःच्याच शिक्षणाचा, आणि हळूहळू शेतकामाशी घडलेल्या दुराव्याचा अनुभव त्याला सांगतो." (ललित, जून २०१५, पान १७)

खंडेरावाची द्विधा हीच नेमाड्यांच्या देशीवादाची द्विधा आहे, असं वाटतं. वास्तविक, त्यातल्या देशीवादी मांडणीने दुसरी निवड केलेली आहे. वर्तमानाच्या वास्तवात पाय न बुडवता आपल्या देशी सांस्कृतिक वारशाबद्दल भावूकतेने किंवा दुराभिमानाने बोलणं, एवढाच उपाय त्यात सुचवलेला आहे. या सगळ्या संस्कृतीला वर्तमानात कशाला सामोरं जावं लागतंय, तरीही त्यातून काही मार्ग असतात का, यातून काय पेच निर्माण होतात, याची दखल घ्यायचा प्रश्न नाही. (रेघेवर काही महिन्यांपूर्वी पुरुषोत्तम बोरकरांच्या 'मेड इन इंडिया' या कादंबरीबद्दल नोंद केली होती. बोरकरांच्या लेखनात आपल्या आजूबाजूच्या वातावरणात मिसळलेली अभिव्यक्ती आहे, पण त्याच वातावरणाचं वर्तमान काय आहे याबद्दल जागं राहण्याचं भानही आहे).

तीन

'लोकरंग'मधल्या मुलाखतीत नेमाडे म्हणतात: "खरं म्हणजे लिहिण्यामध्ये मला कसलाच अडथळा नको होता. लिहिण्यासाठी जी ऊर्जा लागते ती मला दुसऱ्या कशासाठीही संपवायची नव्हती. त्यामुळे मी ते टाळायलाच बघत होतो. पण [कोलकात्यात शांतिनिकेतनमध्ये व्याख्यानासाठी निमंत्रण देणारे] ते लोक काही केल्या ऐकायला तयार नव्हते. तिथे जायचं म्हणून मग मी जळगावहून मुंबईला आलो. त्याचदरम्यान अचानक सगळीकडे लॉकडाऊन सुरू झालं. तो कार्यक्रमही पुढे ढकलला गेला. पण या सगळ्या भानगडीत माझ्या फाइल्स, कादंबरीचे लिहिलेले खर्डे, कच्ची टिपणं, संदर्भ.. सगळं तिकडेच राहिलं. म्हणजे ‘हिंदू’ तिकडे आणि मी इकडे मुंबईत अडकून असं सगळं झालं."

'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी लिहायला तीस-बत्तीस वर्षं लागली, असं वेळोवेळी कुठे ना कुठे ऐकू येतं. अगदी काही महिन्यांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर एक निवेदिकाही दुसऱ्या एका लेखकाची मुलाखत घेताना हे बोलून गेली. तीस वर्षं हा जगण्याचा कालावधी विविध अपरिहार्य, अटळ कामांसाठी वापरावा लागणं स्वाभाविक आहे. त्यामुळे कादंबरी लिहायला उशीर झाला, किंवा ती गडबडीत लिहिणं योग्य वाटलं नाही, इतर कामं प्राधान्यक्रमात वरती होती, अशी कारणं नोंदवली जात नाहीत. कधीतरी इतर कोणत्या मुलाखतीत ती ओझरती येतात- कौटुंबिक जबाबदाऱ्या, प्राध्यापकीय कामं, इत्यादी. हे गैर नाही. पण जणू काही तीस वर्षं एका कादंबरीचा ध्यास लेखकाला आणि वाचकांनाही होता, अशी मांडणी केली जाते. मग याची मिथकं तयार होतात. कादंबरी लिहिणं हे कष्टाचंच काम असतं, त्यासाठी कोणी प्रवास केला, वाचन केलं, तर ते त्या-त्या विषयसूत्रानुसार करावंच लागतं. पण ते नुसतं करून पुरत नाही. त्यासाठी एक मिथक तयार करावं लागतं- मोठ्ठा कालावधी, मोठ्ठं वाचन, इत्यादी. मग ते खरोखर महत्त्वाचं असल्याचं ठसवलं जातं. लेखकाचं स्वाभाविक काम म्हणून ते उरत नाही.

'हिंदू'चे खर्डे जळगावला आणि लेखक नेमाडे मुंबईत- हाही एक प्रतिकात्मक उपरोध म्हणावा लागेल. एका अर्थी, ते खर्डे आजच्या जळगावातही नाहीत, ते आहेत भूतकालीन जळगावाच्या एका विशिष्ट प्रतिमेमध्ये आणि लेखक आहे वर्तमानातल्या (वर्तमानपत्रं, टीव्ही, कोलकात्याला जाण्यासाठी विमानतळ असलेल्या) मुंबईत. पण इथे नेमाड्यांच्या कादंबरीबद्दल मूल्यमापन करणं हा या नोंदीचा उद्देश नाही, त्यांच्या सुंदर भाषाभुरळीबद्दलही इथे काही मत देणं ही नोंद लिहिणाऱ्याला शक्य नाही. पण या निमित्ताने थोडं नोंदवायचं ते एवढंच: नेमाड्यांचा नायक असू दे किंवा देशीवादाची मांडणी असू दे, त्यात भूतकाळाला जास्त महत्त्व आहे. भूतकाळ आपल्याला बऱ्यापैकी नोंदींच्या स्वरूपात उपलब्ध असतो, किमान तो पूर्ण झालेला असल्यामुळे त्याचं बौद्धिक / भावनिक विश्लेषण शक्य असतं, किंवा सोपं असतं. त्यातले गुण-दोष आपल्याला चटकन कळू शकतात, आणि भूतकाळ जगून झालेला असतो, त्यात आपण टिकून पुढे जगलेले असतो, न टिकलेले खलास होतात, पण किमान सामूहिक स्तरावर कसंबसं जगणं तरी टिकून भूतकाळ पार करून वर्तमानात आलेलं असतं. त्यामुळे टिकण्याच्या कसोटीवर भूतकाळ परीक्षा पास झालेला असतो. हे सगळंच काहीसं सोपेपण त्यात आहे. पण आपण जगतो तर वर्तमानात, आणि वर्तमान पटापट भूतकाळात जातं नि भविष्य वर्तमानात येतं. ही आता अधिकच वेगवान झालेली प्रवाही प्रक्रिया समजून घेणं जास्त अवघड असतं. भूतकाळाचं विश्लेषण गरजेचं नसतं, असा याचा अर्थ नाही. पण ते कुंठित असून काही उपयोग नाही. ते वर्तमानाचा भाग म्हणून करावं लागेल. नेमाड्यांचा देशीवाद हे करत नाही. किमान आता तरी ते तसं करत नाहीत. मानवी संस्कृतीची अर्थव्यवस्था कशी बदलली, तंत्रज्ञानाने मानवी संस्कृतीचं काय करून ठेवलं आहे नि काय होऊ घातलंय, हे प्रश्न त्यामुळेच देशीवादाच्या आस्थेचेही होत नाहीत. वास्तविक आपण चर्चा करताना याच काळातली साधनं वापरतो, तंत्रज्ञान वापरतो, हीच अर्थव्यवस्था आपल्या कादंबरीला-कथेला-कवितेला क्रयवस्तू करत असते, या काळाने अधिक जोम दिलेल्या वृत्तवाहिन्या आणि तसलीच वर्तमानपत्रं इतर वेळी साहित्याबद्दल फारशी सजग उरलेली नसतानाही आपल्याला का उचलतात, हे सगळं त्यात यावं लागेल. तरीही आपण लिहितो, हे खरंच (गुगलच्या ब्लॉगर सेवेचा वापर करून ही नोंद लिहिली गेली, इत्यादीही खरंच). पण लिहिताना या अंतर्विरोधांची बोच असायला हवी, की भूतकाळाचा कुंठित विचार करून समाधान मानायला हवं, हा प्रश्न आहे. दुर्दैवाने हा प्रश्न मराठी साहित्याच्या अधिकाधिक संकुचित होणाऱ्या अवकाशात चर्चेत येत नाही. वृत्तवाहिन्यांना मानवी व्यवहाराची (पक्षीय राजकारण, क्रिकेट, सिनेमा, पोलिसांच्या कागदपत्रांपुरता क्राइम अशी) दोन-चार क्षेत्रं सोडून इतर क्षेत्रांची दखलच घ्यायची नसते, वर्तमानपत्रांना संपादकांच्या ओळखीतल्या प्रकाशनसंस्था वगळता इतर साहित्यव्यवहाराची दखल घ्यायची नसते, साहित्यविषयक मराठी नियतकालिकांची संख्या तशीही मर्यादितच होती ती अधिकाधिक रोडावलेली- त्यातही वाचकांचा पत्रांद्वारे सहभाग नगण्य, मराठी संकेतस्थळांना काही मर्यादित सामाजिक घटकांच्या अभिव्यक्तीची अप्रत्यक्ष मर्यादा पडलेली, अशा परिस्थितीत ही चर्चा होण्याची शक्यताही वाटत नाही. समाजमाध्यमांवर- फेसबुकवर कोणी असे काही ओझरते मुद्दे मांडले, आणि त्यावर थोडी संक्षिप्त परिच्छेदांची उत्तरं-प्रत्युत्तरं आली की, 'या माध्यमावरही चांगली चर्चा होऊ शकते, हे यातून दिसतं' अशा आशयाच्या प्रतिक्रिया लोक देतात, हे खरं. पण 'चर्चा' या शब्दाचा अर्थ काही तात्कालिक मतांपुरता राहणार असेल, तरच हे ठीक म्हणावं लागेल. बाकीचं जरा बाजूला ठेवलं, तरी त्या मंचाचा काहीएक मर्यादित उपयोग असेल, माहिती, दुवे देण्यासाठी उपयोग होईल, संपर्कासाठी उपयोग होईल, पुस्तकांची नावं कळणं, इतरांना कळवणं, इत्यादी. पण समीक्षा किंवा सखोल चर्चा यांना इतर काही मंच गरजेचे आहेत का, असतील तर तसे पुरेसे मंच उपलब्ध आहेत का, तिथे काही विविधांगी चर्चा होते का, असे प्रश्न समाजमाध्यमांवरच्या समाधानापोटी बाजूला सारले जात असावेत.

हे आता फारच नकारात्मक वाटत असेल, तरी ठीक. पण हे खरं म्हणजे नवीनही नाही. नेमाड्यांचा 'हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो कां?' हा लेख शेवटी अशा परिस्थितीला दिलेला प्रतिसादच होता. त्यातही शेरेबाजी असली, तरी त्यातला मूळ आस्थाविषय कायमच राहणारा आहे. दुर्दैवाने, आपला लेख आपल्यालाच कमी-अधिक लागू व्हावा, अशा रितीने रूढ परिस्थितीच आपल्याला वापरत असावी, असंही या घटिताच्या निमित्ताने म्हणता येईल.

चार

राजहंस प्रकाशन, ऑगस्ट २०१८
अलीकडे, म्हणजे ऑगस्ट २०१८मध्ये, सुधीर रसाळ यांचं 'समीक्षक भालचंद्र नेमाडे' यांचं पुस्तक प्रकाशित झालं. या ११५ पानांच्या पुस्तकात दोन दीर्घ लेख आहेत: 'भालचंद्र नेमाडे यांची वाङ्मयसमीक्षा' आणि 'भालचंद्र नेमाडे यांची तुकाराममीमांसा'. आपण नेमाड्यांच्या परस्परविरोधी विधानांचे, शेऱ्यांचे काही दाखले नोंदवले आहेत, त्याहून अधिक दाखल्यांसाठी रसाळांचं पुस्तक वाचता येईल. शिवाय, अनेकदा कोणताही ऐतिहासिक तपशील आपल्या सोयीनुसार मोडून वापरणं, इत्यादींसंबंधी नेमाड्यांच्या लेखनातले दाखले पुस्तकात आहेत. "नेमाड्यांची समीक्षा प्रस्थापित साहित्याला आणि प्रस्थापित समीक्षेला भावनिक पातळीवर नकार देणारी आहे. म्हणूनच ते आपल्या समीक्षेत तार्किक युक्तिवादांपेक्षा शाब्दिक ताडनाची योजना करतात. त्यांच्या समीक्षेतला नकार आणि विद्रोह हा वैचारिक असण्यापेक्षा तो भावनिक स्वरूपाचा आहे. समीक्षेतील ज्या वादाला नेमाडे नकार देतात, त्याच वादाच्या चौकटीत ते समीक्षाही करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या समीक्षेतील नकाराला आणि विद्रोहाला अर्थपूर्णता लाभत नाही." (पान ७५). नेमाड्यांच्या समीक्षा-लेखनातले विरोधाभास, विपरित मांडणी यांचा तपशील नोंदवण्यात रसाळांच्या पुस्तकाचा बराच भाग स्वाभाविकपणे खर्च झालेला आहे. त्यांनी बहुतांशाने काटेकोरपणे हे विरोधाभास नोंदवले आहेत, त्यासाठी आवश्यक संदर्भही दिले आहेत. पण 'हाउ मच स्पेस अ‍ॅन इंडियन रायटर नीड' ही साहित्य अकादमीने आयोजित केलेल्या नेमाड्यांच्या व्याख्यानाची पुस्तिका आणि 'नेटिव्हिझम (देशीवाद)' हे शिमल्यातल्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज्'ने काढलेलं पुस्तक यांचा धांडोळा रसाळांच्या पुस्तकात नाही. अर्थात याने कदाचित तपशिलात भर पडण्याव्यतिरिक्त काही झालं नसतं. नोंदीच्या सुरुवातीला उल्लेख आलेल्या मुलाखतीनुसार नेमाड्यांच्या संकल्पना संकुचित करणाऱ्यांच्या यादीत बहुधा रसाळांचा क्रमांक लागत नसावा, कारण रसाळ स्वतः देशीयतेचा पुरस्कार करताना दिसतात. दुर्दैवाने त्यांनीही या संकल्पनेबद्दल काही पुरेशी स्पष्ट मांडणी (या पुस्तकात किंवा इतरत्रही)  केलेली दिसली नाही. उदाहरणार्थ पुढील परिच्छेद पाहा:
"आपले काही लेखक (यात 'कोसला'कार नेमाडेही आले) पाश्चात्त्य संस्कृतीत जन्मलेले वाङ्मयीन वाद, तात्त्त्विक व्यूह आणि संवेदनशीलता स्वीकारून, पाश्चात्त्य वाङ्मयातील संकेतव्यवस्थांच्या साह्याने आपल्या जीवनाच्या वास्तवाच्या सामग्रीतून निर्मिती करताना दिसतात. त्यामुळे कृत्रिम, नकली अशी साहित्यकृती घडते. ती आपल्या वाचकांना परकी वाटू लागते आणि ती कलानुभव देऊ शकत नाही. म्हणून देशीयतेचा आग्रह आहे. अस्तित्ववाद, आधुनिकतावाद, उत्तर आधुनिकतावाद, मानवाचे अमानवीकरण, व्यर्थतावाद, परात्मभाव हे आणि वाङ्मयातले असे सर्व प्रवाह पाश्चात्त्य संस्कृतीत होत गेलेल्या बदलांमुळे आणि त्या संस्कृतीत निर्माण झालेल्या समस्यांमुळे त्या संस्कृतीत जन्मले आहेत. परात्मभावाबद्दल बोलायचे झाल्यास, आपल्या मध्ययुगीन साहित्यात संस्कृतिजन्य आध्यात्मिक परात्मभाव होता. परंतु आजच्या पाश्चात्त्यांकडून आयात केलेल्या परात्मभावाशी मात्र आपल्या देशी परात्मभावाचा संबंध नाही. [...] पाश्चात्त्य जीवनपद्धतीतून निर्माण झालेले वाद फक्त पाश्चात्त्य संस्कृतीच्या संदर्भात आणि त्या संस्कृतीपुरतेच अर्थपूर्ण आहेत." (पान ३७)"
'संवेदनशीलता' ही एखादी डोळ्यांना प्रत्यक्ष दिसणारी, प्रत्यक्ष स्पर्श करता येईल अशी, पाकिटात बंद करून इकडून-तिकडे वाहून नेता येईल अशी वस्तू असल्यासारखा भास रसाळांच्या या वाक्यातून होण्याची शक्यता आहे. शिवाय, साहित्याचा मुद्दा सोडून देऊ. पण आपल्या आजूबाजूला बहुसंख्य लोक आपापल्या हातातल्या चौकटीमधून कोणता आशय रिचवतायंत हे जरी पाहिलं, तरी त्यांना कदाचित काही वाक्यं बदलावीशी वाटू शकतील. [शिवाय 'कोसला' आणि नेमाड्यांचं इतर साहित्यही त्यांनी अशा पाश्चात्त्य प्रभावाखालचं मानलं आहे, ते खरं असेल तर त्यांचं साहित्य तर मराठी वाचकांनी तुलनेने मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या अर्थाने स्वीकारलेलं आहे की. वाचकांना ते साहित्य परदेशी वाटल्याचा काही विशिष्ट प्रमाणातला पुरावा आहे का? 'आपला वाचक' म्हणून रसाळ नक्की कोणाला गृहित धरत आहेत?]. अमुकएक साहित्यकृती 'वाचकांना परकी वाटू लागते आणि ती कलानुभव देऊ शकत नाही' असं रसाळ लिहितात, पण अगदी वर्तमानपत्राचेही वाचक नसलेले याच देशी संस्कृतीतले अधिकाधिक लोक परदेशांमधले बरेवाईट चित्रपट रिचवतायंत, किंवा असे बरेवाईट परके प्रभाव असलेले हिंदी चित्रपट रिचवतायंत, कपड्यांची पाश्चात्त्य फॅशन रिचवतायंत, इकडून-तिकडून बाहेरून आलेले स्मार्ट-फोन हातात वागवतायंत, इकडून तिकडे चिन्हांचा मारा सुरू आहे- तरीही 'संवेदनशीलता', 'तात्त्त्विक व्यूह' यांच्याबाबतीत मात्र आपण परक्यांपासून अस्पर्शित राहावं, हा आग्रह नक्की वास्तवात कसा अंमलात आणायचा, याचा उहापोह रसाळांच्या पुस्तकात नाही. आणखीही काही अस्पष्ट विधानं आहेत. पण 'नेमाड्यांची देशीयतेची संकल्पना [...] कालबाह्य होऊ पाहणाऱ्या समाजव्यवस्थेशी निगडित असल्यामुळे संकुचित स्वरूपाची आहे. [...] देशीयता हा जर वाङ्मयाचा स्वाभाविक घटक असेल, तर तो विशिष्ट काळातल्या समाजव्यवस्थेशी जोडलेला असणार नाही,' (पान ३८-३९) अशी काही निरीक्षणं रसाळांनी नोंदवली आहेत, ती ठीक वाटतात. कुंठित भूतकाळ समजायला सोपा जातो, विश्लेषणाला सोपा जातो, तेच नेमाड्यांच्या समीक्षासदृश लेखनातून-मुलाखतीतून केलं जातं- असं आपण नोंदीत आधी म्हटलं आहे, ते रसाळांशी इतपत जुळणारं वाटलं. पण त्याव्यतिरिक्त त्यांचीही मतं पुरेशी वर्तमानाचा विचार करणारी वाटली नाहीत. तंत्रज्ञान, माध्यमं, या गोष्टींनी प्रत्यक्ष, भौतिक पातळीवर फारशी हालचाल न करताही आपल्या जाणिवा-संवेदनशीलता काबीज करण्याचे मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. अशा वेळी ही मंडळी साहित्य-संस्कृती इत्यादी व्यवहारांना वेगळं काढून त्यात अमुक वाद परका, तमुक वाद इथला, असं म्हणताना दिसतात. यात पुन्हा महानगरी-ग्रामीण अशी विभागणी कदाचित कोणी करू शकतील. पण स्मार्ट-फोन, इंटरनेट यांचा सतत विस्तारता वापर बघता या विभागण्यांचा पुनर्विचार वाटला तर यांना करता येईल. पाश्चात्त्य आणि पौर्वात्त्य- असा भेद नसतो, किंवा आता कोणीही काहीही कुठूनही बोलू शकतं, असा याचा अर्थ नाही. किंवा युरोपाकडे बघूनच इथलं सगळं तुच्छ लेखणारी वृत्ती अजूनही सांस्कृतिक अवकाशात असते, तीही अपुरी आहे, हे सगळंच खरं. पण सर्वांच्याच जाणिवांवर-संवेदनशीलतांवर पडणारे प्रभाव पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचे झालेले आहेत, त्यासाठी वापरली जाणारी तंत्रज्ञानाची-माध्यमांची साधनं कोणाच्या हातात असतात हा मुद्दाही अधिक गुंतागुंतीचा झालेला आहे- याची दखल तरी घ्यायला हवी, असं वाटतं. त्यावर उपायच सुचवायला हवा असं नाही. तसा सापडला तर सुचवावा. पण इथे या बदललेल्या वास्तवाची दखल तरी घ्यावी. ती न घेता संस्कृती आणि संवेदनशीलतेच्या काहीशा मर्यादित विभागण्या वापरलेल्या दिसतात. तसंही किती लेखक-व्यक्ती असं ठरवून अमुक वाद किंवा व्यूह स्वीकारून लिहू पाहत असतील! प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रभाव अर्थातच असतील, पण ते कोणत्या सामाजिक कोलाहलातून निपजले, हा कोलाहल कोणत्या बदलांमुळे होतोय, याबद्दल काहीच न बोलता संवेदनशीलतेची सोपी विभागणी आताच्या वास्तवातही या मंडळींना करावीशी वाटते, आणि आपल्या आजूबाजूला (मराठी साहित्यापुरतं) हेच जास्त सुरू असतं, हे कंटाळवाणं आहे.

पाच

परिवर्तनाचा वाटसरू, दिवाळी २०१३
'परिवर्तनाचा वाटसरू' या पाक्षिकाच्या २०१३ सालच्या दिवाळी अंकात (पान २५) आलेल्या मुलाखतीत नेमाडे म्हणतात:
मी वृत्तीनं चक्रधरांच्या जास्त जवळचा आहे. म्हणजे मी 'एक्स्ट्रिमिस्ट'च आहे- विचारामध्ये. तरी असं म्हणा, मला ते 'मॉडरेट' असं काही आवडत नाही. पण त्याचबरोबर मी समूहाची कदर करायला अग्रक्रम देतो. निर्विघ्न जगण्यासाठी हा एक कायमचा कॉम्प्रोमाईज मी केलेला आहे आणि तो पाळलाच पाहिजे असं ठरवून टाकलं आहे. आपला समाज कुठल्या मार्गाने चालतो आहे, ते टाळून तुम्ही काही करू शकत नाही हे मला पटलं आहे. ह्या द्वंद्वामुळे मी नेहमी मागे पडतो ते मला चालतं, पण त्यामुळे सुखानं जगणं होतं.

या परिच्छेदातही त्यांच्या विरोधाभासाचं सार आलेलं आहे. मनातून 'एक्स्ट्रिमिस्ट' असावंसं वाटणं, पण वास्तवात निर्विघ्न जगण्यासाठी कायमचा कॉम्प्रोमाईज करून 'मॉडरेट' होऊन जाणं. हे एक प्रकारचं सुखी जगणं. 'दुःखाचा अंकुश असो सदा मनावर' अशी सुंदर ओळ कवितेत लिहिणारा, 'दुःखाला सामोरे जाण्याची कुणाची तयारी नाही' म्हणून संतापून 'लेखकाचा लेखकराव...' हा लेख लिहिणारा लेखक या मुलाखतीत सुखी जगण्याचा छोटेखानी मूलमंत्र सांगतो, हे एक आपल्या वर्तमानातलं घटित झालं. जगणं सुखी असावं, असं वाटण्यात काही गैर नाही, पण यातल्या अंतर्विरोधांचा नि त्या दुःखाचा अंकुश कसा नि कुठे ठेवायचा, एवढा मुद्दा विचार करण्यासारखा असावा. आता असं असतानाही ही लेखक-व्यक्ती इतका आक्रमकपणा मुलाखतीत कुठून आणते, असा प्रश्न पडलाच तर नेमाडे यांचाच खालचा परिच्छेद वाचा:

काही झालं की आपण केवळ आत ओढूनच दरवाजा उघडतो. अशा आत्मघातकी नैतिकतेमुळे आपण स्वतःला स्थानबद्ध करतो आहोत. तो बाहेर ढकलूनही उघडेल अशी जगावर अतिक्रमण करत जगण्याची नैतिकता हुडकली पाहिजे. आक्रमण. आजच्या स्पर्धेच्या सभ्यतेत टिकून राहण्याचा हा मध्यवर्ती संघर्ष कोसलात मी सोडवला होताच. 

'कोसला' या कादंबरीची सुवर्ण महोत्सवी आवृत्ती नोव्हेंबर २०१३मध्ये आली होती, त्याला नेमाड्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतली वरची वाक्यं आहेत. सप्टेंबर २०१४च्या आवृत्तीत (पॉप्युलर प्रकाशन) परिशिष्ट म्हणून ही प्रस्तावना आहे, त्यातून ही वाक्यं इथे नोंदवली आहेत (पान ३१५). एका अर्थी, नेमाडे स्वतःच्या अशा अंतर्विरोधांचं रेकॉर्डही अप्रत्यक्षपणे उपलब्ध करून देतात, त्यामुळे या त्यांच्या घटिताची चर्चा आपल्याला संदर्भासहित करता येते. पण हे त्यांच्यापुरतं मर्यादित नसावं.

नेमाडे आणि त्यांच्या मुलाखती या घटिताबद्दलच्या या नोंदीचा शेवट इथे होतोय. मनातून चक्रधरासारखं एक्स्ट्रिमिस्ट असावं, पण निर्विघ्न जगण्यासाठी मॉडरेट व्हावं. स्पर्धेच्या सभ्यतेत टिकायचं तर जगावर अतिक्रमण करत, आक्रमण करत जगणं रास्त. ही तत्त्वं स्वीकारली की, मग आपण कोणतंही विधान आत्मविश्वासाने करू शकतो, दुसऱ्यांच्या विधानांना सहज बेदखल करू शकतो, फारसे संदर्भ न देता, इतिहासबितिहासाची फारशी कदर न करता बेधडकपणे मतंही मांडू शकतो. शक्यतो सूत्र वजा, एखाद्या शेऱ्यामध्ये संपवावं. हे काही नेमाड्यांनीच करायला हवं असं नाही. नेमाड्यांची विधानं 'लोकरंग'मधे येतील, आपली 'फेसबुक'वर येतील. काही हरकत नाही. स्पर्धेची सभ्यता पाळली की झालं. स्पर्धा लावणारी कंपनी परदेशी असली तरी चालेल किंवा देशी असली तर सुखासोबत थोडं समाधानही.

*

काही जुन्या नोंदी

Thursday, 17 September 2020

पेद्रो आणि पद्मा

हे चित्र पद्मा सहस्रबुद्धे यांनी काढलेलं आहे
'माचीवरला बुधा' या गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीत, पान १९, मॅजेस्टिक प्रकाशन, जुलै २००८


पद्मा सहस्रबुद्धे यांनी अनेक मराठी पुस्तकांची मुखपृष्ठं तयार केली, अनेक पुस्तकांच्या मजकुरासोबत जाणारी रेखाटनं काढली. त्यातलंच एक वरती दिलं आहे. ते 'माचीवरला बुधा' या कादंबरीतलं असलं, तरी तिच्यापासून सहज वेगळंही होणारं आहे. वेगळं, असं का?

गेली ४५ वर्षं अर्जेन्टिनातील टुकुमान डोंगररांगांमध्ये एका गुहेत राहणाऱ्या पेद्रो लुका नावाच्या इसमाबद्दल एक छोटीशी फिल्म मॅथ्यू ऑर्सेल यांनी तयार केली. ती 'अल-जझीरा'वर १ जुलै २०२० रोजी प्रसिद्ध झाली आहे. मुळात त्यांना पेद्रो यांच्यावर माहितीपट करायचा होता, त्यासाठी ते जून २०१८मध्ये पॅरिसहून टुकुमान भागात येऊन काही चित्रीकरण करून गेले होते. त्याचाच पुढचा भाग चित्रित करण्यासाठी ते आता २०२०च्या पहिल्या तिमाहीत अर्जेन्टिनाला आले, पण ब्वेनस एअरिझमधे ते उतरले आणि कोरोनाच्या साथीसंदर्भातल्या टाळेबंदीची घोषणा झाली. त्यामुळे त्यांना काही दिवस तिथेच एका फ्लॅटमधे अडकून पडावं लागलं आणि विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर पॅरिसला परतावं लागेल, असंही त्यांना कळलं. त्यामुळे त्यांनी मूळ माहितीपटाऐवजी 'दोन विलगीकरणांची कहाणी' सांगायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी पेद्रो यांच्या परिसरात चित्रित केलेला आधीचा भाग वापरला आणि पेद्रो यांच्या एका नातलगाच्या मदतीने आत्ता काही चित्रीकरण करवून घेतलं. मग या दोन्हीतून ही सुमारे १५ मिनिटांची व्हिडिओ रूपातली कहाणी तयार झाली. यात त्यांनी पेद्रो यांचं जगणं आणि आता कोरोना-काळामध्ये शहरी मानवी वसाहतींवर गुदरलेलं जगणं यांची तुलना केलेली दिसते. मॅथ्यू यांनी 'अ टेल ऑफ टू आयसोलेशन्स' या शीर्षकाचा लेखही 'अल जझीरा'च्या संकेतस्थळावर लिहिला आहे.  

पेद्रो यांनी पस्तिशीतून चाळिशीत जायच्या आधीच मधल्या काळात असा दूर जाऊन एकट्याने राहण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. गो. नी. दांडेकरांच्या बुधा चऱ्हाटे यांनी वय झाल्यानंतर आठवणीपोटी पुन्हा राजमाचीवरल्या आपल्या गावाकडे परतायचा निर्णय घेतलेला आहे. विविध कारणांमुळे चऱ्हाटे कुटुंबियांना (बुधाच्या वडिलांच्या पिढीत) उपजीविकेसाठी मुंबई गाठावी लागली, तिथे हमाल म्हणून, गिरणीकामगार म्हणून काम करत ते जगले. ही ओझरती पार्श्वभूमी आहे. कामातून निवृत्त झालेला बुधा त्याच्या मुलासोबत नि सुनेसोबत चाळीत राहतोय, इथूनचा काळ कादंबरीत येतो. 'होता होता बुधाच्या दुसऱ्याही डोळ्याला कमी दिसायला लागलं. काडीचं काम होईना. नुसतं बसून राहायचं. भिव्याला अजून मुलं झाली नव्हती. चाळीतली सगळी माणसंही आपापल्या कामावर जात. मग बुधानं काय करावं दिवसभर. [...] दिवसाचा सगळा वेळ जसा त्याला खायला उठायचा. मग बुधा नेसत्या धोतराचं टोक पांघरून झोपून राहाचा. पडल्या पडल्या त्याला सगळं जुनं आठवायचं...' (ही शेवटची तीन टिंब मुळाबरहुकूम. पान १३)

आपल्या बालपणाची, जुन्या काळाची आठवण येत राहणं- हा भाग बुधाच्या माचीवर परतण्याचं एक कारण म्हणून ठळकपणे येतो. 'असं बुधाला फार फार आठवायचं. आठवण येताच त्याचं मन मुंबईच्या धकाधकीतून उठायचं, अन् माचीवर जाऊन तिथं भटकत राहायचं. शेवरीच्या कापसाच्या म्हाताऱ्या उडतात तसं. तो अस्वस्थ व्हायचा. झोपलेला असला तर उठून बसायचा. बसला असला, तर हिंडायला लागायचा. मुंबईचा गदारोळ तर त्याच्या ओळखीचा झालेला. पाकातल्या आवळ्यासारखा बुधा त्यांच्यात मुरलेला. पण बाळपणीचा सुखाचा काळ आठवताच त्याला त्या गलबल्याची शिसारी यायची. ती त्याच्या म्हाताऱ्या मुद्रेवरही स्वच्छ दिसायची.' (पान १६).

पुन्हा माचीवर आल्यानंतरही: 'अगदीच क्वचित त्याला मुंबईची आठवण होई. एकदा मुलाला पाहावंसं वाटे.' (पान ३९), किंवा 'त्याला मुंबईची किती तरी माणसं आठवली. गोरी गोरी पान. कापराच्या भावल्यांसारखी. नाजुक कपडे. साजुक बोलणं. जपून हसणं. हळूच बोलणं. अरे हुडूत! हे देवानं दिलेलं रान पाहा म्हणावं! आरडा की मोठमोठ्यानं! कोण तुम्हाला काय म्हणतंय्! हसा. खिदळा. कष्ट करा. मग खा पोटभर.' (पान ४५). गावात उपजीविकेची साधनंच उरली नाहीत, या कारणामुळे मुंबईचा रस्ता धरावा लागलेल्या चऱ्हाटे कुटुंबातला बुधा मुंबईत आयुष्य घालवतो, कामगार म्हणून जगतो, पण म्हातारपणी त्याला शहरातल्या 'गोऱ्या, साजुक, नाजुक' लोकांच्या तुलनेत गावचं आयुष्य बरं वाटतं, असं दांडेकरांचं म्हणणं आहे. यातला आणखी विरोधाभास त्यांनी शोधलेला नाही, सूचितही केलेला नाही. चऱ्हाट्यांना गाव का सोडावं लागलं, याचं एक कारण सुरुवातीला देऊन झालं. बुधा परत माचीवर येतो, याचीही काही कारणं दिली जातात, ती वर आली आहेत. बुधाचे वडील मुलाबाळांसह मुंबईला आले आणि बुधा सुट्टीच्या काळात वडिलांसोबत गावात जायचा, तेवढाच. शिवाय, त्याला मुंबईत स्वीकारावा लागलेला पेशा बघता 'बालपणाचा काळ' आणि 'सुट्टीचा काळ' किती असेल, याचा अंदाज बांधता यावा. रूढार्थाने तो गावात 'मुंबईकर' ठरेल. तर अशा या बुधाच्या मनामध्ये 'गोरी गोरी, नाजुक, साजुक माणसं' विरुद्ध 'कष्ट करून रान पिकवून खिदळणारं गाव' असा दुहेरीपणा कसा निर्माण झाला, याचा थांग इथे लागत नाही. असा दुहेरीपणा मनात नसतो असं नाही. पण कामगार म्हणून त्याच शहरी अवकाशात जगलेल्या, गावाने उपजीविका दिली नाही म्हणून कसंबसं मुंबईत मर्यादित जागेत जीवन काढलेल्या कष्टकरी माणसाच्या मनातलं गाव आणि लेखक श्री. गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर यांच्या मनातला गाव यांच्यात काही सरमिसळ झाली असावी, अशी शंका येते. त्यामुळे उपजीविका नसताना गाव सोडावं लागणं आणि मग गावात कष्ट करून पोटभर खाता येईल असं काही वर्षांनी- तेही म्हातारपणी वाटणं- यातला पेच शोधला जात नाही. हा पेच बुधा या पात्राने त्याच्या मनाने-विचाराने सोडवावा, असं नव्हे. पण लेखकानेही हा पेच हाताळल्याचं दिसत नाही. त्यामुळे, आठवणी-वर्तमान यांचं आणि शहर-गाव यांचं द्वंद्व सोपं होतं. शेवटी म्हातारपणी गतकाळाकडे परत जायची ओढ म्हणून बुधा माचीवर जातो, त्यासोबत कादंबरीचा लेखकही तिथे जातो. निसर्गाची तपशीलवार सुंदर वर्णनही करतो. त्या तपशिलांची जाण त्याला आहे. तपशिलांसह पण तपशिलांपलीकडे जाऊन काही म्हणता येईल का?

पद्मा सहस्रबुद्धे यांनी केलेली अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं आणि आतली रेखाचित्रं अशी तपशिलांपलीकडे जात काही मांडू पाहतात, असं वाटतं. त्यांना निमित्त त्या पुस्तकाने दिलेलं असतं, हे खरं. पण खुद्द त्यांची चित्रं मात्र त्यापलीकडे जाऊ शकतात. ए. वि. जोशी यांची 'काळोखाचे अंग' (मौज प्रकाशन) नावाची कादंबरी आहे. त्यावरही मुखपृष्ठातून सहस्रबुद्धे यांनी उभा केलेला काळोखाचा अर्थ बराच गहिरा होत जाणारा वाटतो. सध्या आपण बुधासंदर्भात बोलू. सहस्रबुद्धे यांचं जे चित्र नोंदीच्या सुरुवातीला दिलंय, ते पेद्रो लुका यांनाही लागू होतं. पण पेद्रो यांचा दूर डोंगरात जाऊन राहण्याचा निर्णय आठवणीतून, किंवा गतकाळाच्या ओढीने झालेला नाही, तो वर्तमानातला निर्णय आहे. ते पस्तिशी ओलांडत होते, तेव्हाच त्यांनी हा निर्णय घेतला आणि आता ते ऐंशी पार करून गेले, तरीही ते त्यानुसार राहत आहेत. या पंधरा मिनिटांच्या फिल्ममध्ये काही मर्यादित धागेदोरे सापडतात, त्यानुसार पेद्रो यांनी शहरापासून, किंबहुना कोणत्याही मानवी वसाहतीपासून दूर जाण्याचं असं कारण दिलेलं आहे: "शहरात इंजिनांचा गोंगाट असतो, खूप त्रास होतो, अजून काय, खूप गरम होतं. त्यापेक्षा इथे थंड आहे, मोकळी हवा आहे, सगळं शांत आहे." मॅथ्यू यांनी पाठवलेल्या इतरही काही प्रश्नांची उत्तरं पेद्रो देतात, ती अशी:

गुहेत का राहता? तर: "धोका टाळायला. लोकांसोबत राहून काही समस्या उद्भवायला नकोत म्हणून. मला डोंगरातल्या जनावरांची तितकीशी भीती वाटत नाही, पण आपल्यासारख्याच लोकांची वाटते, त्यांचा काही कुठला वाईट उद्देश असेल, त्याची भीती वाटते."

तुम्हाला कधी कशाबद्दल चुकचुकल्यासारखं वाटतं का? "नाही, मला असं काही वाटत नाही".

नंतर पेद्रो असं म्हणतात: "जगापासून दूर इथे आपल्यासमोर अध्यात्मिक वाट खुली होते, हे कोणाला पटेल का. मी घरांपासून, रस्त्यांपासून दूर आहे, याचं अतिशय सुख वाटतं. आपण सगळे एकाच समूहाचा भाग आहोत. जगण्याचा आपल्या सर्वांचा उद्देश सारखाच आहे. आपण सगळेच माणूस आहोत. आपण एकमेकांकडे दुर्लक्ष करता कामा नये."

गुहेतल्या कोनाड्यात मेणबत्ती लावलेली आहे. तिथे ते हात जोडून उभं असल्याचंही दिसतं. ईश्वरावर पेद्रोंचा विश्वास असावा. वरच्या काही वाक्यांमधून त्यांचा हा कल दिसतो. त्यांना एकटेपणा हवा वाटत असला, तरी जगापासून तुटलेपणाची भावना त्यांच्यात नसावी, असं साधारण त्यांच्या वाक्यावरून दिसतं. बाकी, त्यांची मतं पटतात किंवा नाही, ते प्रत्येकाला आपापलं ठरवता येईल. पण त्यांनी केलेली निवड वर्तमानातली आहे. ते तरुण असताना आणि आता म्हातारे असतानाही त्यांनी प्रचलित मानवी सभ्यतेच्या बरीचशी विरोधात जाणारी ही निवड केल्याचं दिसतं. त्यात स्मरणरंजन नाही, स्वप्नरंजनसुद्धा नाही, गतकातरतासुद्धा नाही. रोजच्या व्यावहारिकतेमधून पळवाट म्हणून , थोडंसं मनोरंजन म्हणून या गोष्टी वापरल्या जाण्याची शक्यता असते. ते तितपत ठीकही असेल कदाचित. पण पेद्रो यांनी रोजच्या व्यवहारापासून पळ काढलेला नाही, त्यांनी या व्यवहाराचाच वेगळा पर्याय निवडलेला आहे. त्यामुळे त्यांच्या समोरचा प्रश्न नि त्याचं उत्तर तितकंसं सोपं नसावं. बाकी, पद्मा सहस्रबुद्धे यांच्या चित्रातली काळ्या-पांढऱ्या चौकटीबाहेर जाणारी आकृती पेद्रोचीही असणं शक्य आहे. आता ही पंधरा मिनिटांची फिल्म:

Thursday, 10 September 2020

हाक अयोध्येची आणि टाकीबंद स्मृती

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. इसवी सन १५२८मध्ये इथलं मूळचं राम मंदिर बाबराच्या हुकुमावरून उद्ध्वस्थ करण्यात आलं, असं म्हणत देशातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन उभारलं, त्या कार्यक्रमाची सांगता ६ डिसेंबर १९९२ रोजी त्या ठिकाणी असलेली बाबरी मशीद पाडून झाली. यानंतर उभ्या राहिलेल्या न्यायालयीन खटल्याचा अंतिम निकाल ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार वादग्रस्त अडीचेक एकराच्या जागेवर ट्रस्टद्वारे राम मंदिर उभारण्यास सांगण्यात आलं, आणि मशिदीसाठी दुसरी पाच एकरांची जमीन उपलब्ध करून द्यावी, असं न्यायालयाने सांगितलं. न्यायालयीन विजय पुरेसा वाटला नाही, म्हणून कदाचित पंतप्रधानांच्या उपस्थितीत ५ ऑगस्टचा विजयोत्सवासारखा पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. विविध दूरचित्रवाणी-वाहिन्यांवरून, समाजमाध्यमांवरून, आपापल्या मोबाइलांवरून अनेकांनी या उत्सवाला पूरक छायाचित्रं, व्हिडिओ असं सगळं फिरवलं. 

बाबरी मशीद पाडली, त्यासंबंधीच्या प्रकरणात अजून कोणालाही शिक्षा झालेली नाही. असा खटला सुरू असतानाही त्यामागच्या घडामोडींना अधिकृतता देण्याचा, किंबहुना भारताच्या स्वातंत्र्यचळवळीइतक्याच या घडामोडी महत्त्वाच्या होत्या, असा एक इतिहासच रचण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी भाषणातून केला. पण या सगळ्याची सुरुवात खूप आधीपासून झाल्याचं आपण जाणतोच. या सगळ्याबद्दल बरंच काही बोललं गेलेलं आहे, अनेक रास्त गोष्टीही बोलल्या गेल्या आहेत आणि अजूनही काही ना काही बोललं जाताना दिसतं. त्यातले मुद्दे गृहीत धरून इथे काही नोंदवायचा प्रयत्न केला आहे. 

आधुनिक प्रतीक

पाच ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधानांनी पुढील विधानं केली:
"साथीओं, श्री राम का मंदिर, हमारी संस्कृती का आधुनिक प्रतीक बनेगा. और मैं जान बुझकर यहाँ आधुनिक शब्द का प्रयोग कर रहां हूं. हमारी शाश्वत आस्था का प्रतीक बनेगा. हमारी राष्ट्रीय भावना का प्रतीक बनेगा. और ये मंदिर करोडोंं करोड लोगों की सामूहिक संकल्पशक्ती का भी प्रतीक बनेगा. ये मंदिर आनेवाली पिढींओं को आस्था, श्रद्धा, और संकल्प की प्रेरणा देता रहेगा."
'आधुनिक' हा शब्द पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक वापरला आहे. आधुनिक हा शब्द 'अधुना' या शब्दावरून आल्याचं आपल्याला कळतं. 'अधुना' म्हणजे 'आत्ताचं', 'या क्षणाचं'. तर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आता पंतप्रधान असलेल्या या व्यक्तीच्या लेखी आपल्या सर्वांच्या 'आज'चं प्रतीक म्हणजे हे राम मंदिर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद आणि त्यांच्या इतर कमी-अधिक महत्त्वाच्या संघटनांच्या पुढाकाराने पूर्णत्वाला गेलेलं हे प्रतीक आहे. त्यांची 'काल'च्या खऱ्या-खोट्या वास्तवाविषयीची/अवास्तवाविषयीची, इतिहासाविषयीची कल्पना आपल्या 'आज'च्या वास्तवावर प्रभाव गाजवणार, गाजवते आहे, याचा हा बहुधा सर्वाधिक अधिकृत स्थानावरून झालेला उच्चार होता.

रामायण हे कथन अनेक ठिकाणी पसरलेलं आहे, त्याच्या अनेक आवृत्त्या आहेत, विविध दृष्टिकोनांमधून या कथनाची पुनर्रचना विविध ठिकाणी झाल्याचं सापडतं, इत्यादी सर्व तपशील आपल्याला इतरत्र वाचायला मिळतो. हे कथन वेगवेगळ्या आणि काही वेळा परस्परविरोधी दृष्टीने मांडलं गेलेलं आहे, एवढं तरी आपल्याला कबूल होऊ शकतं. यातल्या एकाच कथनाला एकसाची स्वरूपात अधिकृतता देण्याचा प्रयत्न अयोध्येतल्या 'राम मंदिरा'ने होईल. एका अर्थी हा हिंदू लोकांच्या, किंवा हिंदू प्रदेशात वावरलेल्या विविध लोकांच्या बोलण्याचालण्यातला 'राम' नव्हेच. अधिक मुख्यप्रवाही झालेल्या रामायणामध्ये रावण हा खलनायक असला तरी त्याची पूजा करणारे, रावणाचा मुलगा मेघनाद याची पूजा करणारे, रामावर टीका करणारे, रामावर टीका न करणारे पण अशी टीका झाली तर ऐकून घेणारे- असे विविध समूहसुद्धा आहेत- ही जाणीव या घडामोडींमध्ये दडपली जाईल. (उदाहरणादाखल दोन बातम्या: आदिवासी संस्कृतीच्या मेळघाटात मेघनाथ यात्रेची धूम, लोकमत, २४ मार्च २०१९ । महिषासुरावर भुरळ घालणारी देवी म्हणून दुर्गेकडे पाहणारी एक परिघीय जमात- असूर, इंडियन एक्सप्रेस, ८ डिसेंबर २०१६. आपण जाणीवपूर्वक इथे बातम्यांचे संदर्भ दिले आहेत. पण या विषयाबाबत आपापल्या इच्छेनुसार विविध संदर्भ तपासता येतील).

प्रतीक, पाणी आणि परंपरा

अनिकेत जावरे यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे:
ब्राह्मणी आणि दलित परंपरेत व प्रतिगामी विचारात भारतीय हिंदू परंपरा अचल कशी आहे, याचा आग्रह स्पष्टपणे दिसून येतो. एका परंपरेत हजारो वर्षं चालत आलेले मौखिक व इतर ज्ञान, पावित्र्य, शुचिता इत्यादी, तर दुसऱ्या परंपरेत तितक्याच वर्षांचे शोषण, अत्याचार इत्यादी. हीच अनैतिहासिक प्रतिमा सामाजिक विचारविश्वात आणि व्यवहारात आजही सापडते. 
('मराठी दलित काव्य : एक पुनर्विचार', काळे पांढरे अस्फुट लेख
हर्मिस प्रकाशन, पहिली आवृत्ती- १ एप्रिल २०११: पान ६)

परंपरा प्रवाही असते, याकडे पाठ फिरवून 'आज'चं होणं बरं नाही, असा याचा अर्थ आपल्याला लावता येतो. निसर्गातल्या वाहत्या पाण्याचं रूपक परंपरेला लावणं बरं असावं. एका कादंबरीत पुढील ओळी सापडतात:  कधीकधी टाकीत, बाटलीत, बादलीत पाणी साठवायला लागतं गरजेनुसार. पण सारखं तसंच ठेवून दिलं तर कसं होईल पाण्याचं? तसंच गोष्टीचंही. खुली नि खुळी राहील तितकंच बरं.

आपण पिण्यासाठी पाणी साठवतो, ती वेगळी गोष्ट. साठवलेलं पाणी वापरतो, पितो, यातून त्यात प्रवाहीपणा राहतोच. पण पंतप्रधानांनी मांडलेलं प्रतीक आज कसं वापरायचं आहे? गांधींना अपेक्षित असलेलं रामाचं प्रतीक त्यांच्या दृष्टीने आज वापरण्यासारखं होतं. आंबेडकरांच्या लेखी 'रामा'चं प्रतीक आज वापरण्यासारखं नव्हतं, तसं आवाहनच त्यांनी केलं, बावीस प्रतिज्ञांमध्येही त्याचा उल्लेख केला आणि हिंदू धर्म सोडला. या व्यतिरिक्त काही समूह पूर्वीपासूनच रामाच्या विरोधी असलेली प्रतीकं वापरत आलेली आहेत, पूजनीय मानत आलेली आहेत, हे आपण वर नोंदवलं आहेच. पण मोठा समूह राम हे प्रतीक वापरतो, त्यांनी काय करायचं, हा प्रश्न रूढ सेक्युलर, पुरोगामी, डाव्या, इत्यादी विविध प्रवाहांनी कितपत हाताळला, हेही परत विचारात घेता येईल, असं वाटतं. या प्रवाहांमध्येही बरेच फरक आहेत, पण तो आत्ताचा विषय नाही. पण राम हे प्रतीक वापरणारा समूहसुद्धा एकसाची नाही. याचा एक दाखला म्हणून ट्विटरवरचा ५ ऑगस्टचा एक छोटा संवाद नोंदवूया:

राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक सुहास पळशीकर यांना ५ ऑगस्ट रोजी ट्विटरवर एका व्यक्तीने 'जय श्रीराम सर' असं म्हटलं, त्यावर पळशीकर लिहितात: 'नाही, मराठी परंपरेत "रामराम" म्हणतात, त्याबद्दल न्या. रानड्यांनी पूर्वीच लिहिले आहे.' यानंतर पळशीकरांनी रानड्यांच्या 'धर्मपर व्याख्याने' या पुस्तकातला लहानसा उतारा दिला आहे, तो असा- रानडे लिहितात: 'तुम्ही रस्त्यात भेटला तर नम्रतादर्शक नमस्कार किंवा रामराम करावा इत्यादि विहीत आहे; ते करू नये असे कोणी म्हणणार नाही. पण फलाण्याने नुस्ता नमस्कार केला, किंवा सलाम केला की जय गोपाळ म्हटले इत्यादि पोकळ व द्वेष वाढवणारे वितंडवाद... मात्र नकोत. त्यांच्या योगे नम्रता वाढण्याचा उद्देश एका बाजूस राहून आपण जय होतो, अभिमानाचे दास बनतो...' 

यातले रानडेही अनेकदा ब्राह्मणी छावणीचं अंशतः प्रतीक ठरतात, कधी एखाद्या लोकप्रिय मराठी मालिकेतले नायक असतात आणि गांधी व जिना यांच्या तुलनेत रानड्यांच्या दृष्टिकोनाची पाठराखण करत आंबेडकरांनी लिहिलेला निबंधही आपल्यासमोर असतो. 

थोडक्यात, भारतासारख्या अनेक नद्या असलेल्या, अनेक परंपरा असलेल्या, बहुप्रवाही भूभागामध्ये एकाच टाकीत पाणी साठवून, ते तुंबवून त्या टाकीवर आपला शिक्का मारणं, ही कृती 'अभिमानाचे दास' बनवणारी आहे. आणि 'गर्व से कहों हम हिंदू है' या अयोध्येतील आंदोलनामधल्या एकसाची घोषणेतून तेच होत आलेलं आहे. आता 'हिंदू' शब्दासोबत 'राष्ट्रवादी' हा शब्द अधिक ठोसपणे जोडला गेला आहे आणि 'प्राउड नॅशनलिस्ट', 'राष्ट्राभिमान' असे शब्दप्रयोग अधिक बटबटीतपणे होताना आपण ऐकतो-पाहतो आहोत. पंतप्रधानांच्या भाषणातही 'अभिमानाचे दास' होण्याची अप्रत्यक्ष हाक होतीच.

टाकीत बंद पाणी

मोरया प्रकाशन। मुखपृष्ठ: मनोज चौधरी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी संलग्न 'तरुण भारत' (बेळगावचा 'तरुण भारत' नव्हे) या वर्तमानपत्राचे संपादक राहिलेले चं. प. भिशीकर यांनी 'हाक अयोध्येची' या नावाची एक पुस्तिका लिहिली होती. २० सप्टेंबर १९९० रोजी प्रकाशित झालेल्या या पुस्तिकेमध्ये राम मंदिर आंदोलनासाठी आवश्यक भावना जागवणारा बराच ऐवज नोंदवलेला आहे. परकीय आक्रमणं, त्यात विशेषतः बाबराच्या आज्ञेने काय घडलं, इत्यादी तपशील या पुस्तिकेत आहे. त्यात 'प्रास्ताविका'मध्ये भिशीकर म्हणतात:
"माझी अशी दृढ श्रद्धा आहे की आपले राष्ट्र सध्या एका संक्रमण काळातून जात आहे आणि अखंड व एकात्म स्वरूपांत त्याचा नवा तेजस्वी आविष्कार आता अगदी अटळ आहे. तो अगदी समीप आहे. या देशाचा प्राचीन काळपासूनचा इतिहास सांगतो की शासनसत्ता ही राष्ट्राची प्राणनाडी नसून अध्यात्मिक अधिष्ठानावर निर्माण झालेली श्रेष्ठ संस्कृतिधारा हेच त्याचे जीवननिधान आहे. अंधाऱ्या कालखंडात धर्मपुरुष भ्रांत समाजात चेतना फुंकतात, मार्ग दाखवितात, आघात झेलतात आणि राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा मार्ग प्रशस्त करतात.

अयोध्येतील राममंदिराच्या निमित्ताने नेमके हेच घडत असल्याचे आपण पाहात आहोत. दि. ३० ऑक्टोबरला रामजन्मभूमीवर श्रीराम मंदिराच्या प्रत्यक्ष उभारणीला प्रारंभ होणार असा गंभीर शंखनाद धर्मसंसदेतील साधुसंतांनी आणि धर्माचार्यांनी केला व राष्ट्रांत चैतन्याची लहर पसरली. शासनाच्या मर्जी-नामर्जीची चिंता न करता साऱ्या राष्ट्रवादी शक्ती आता या महान् संकल्पामागे एकवटल्या आहेत. 'अयोध्येची हाक' म्हणजेच राष्ट्रीय चैतन्याला हे आवाहन- देशाच्या कानाकोपऱ्यातील अखेरच्या हिन्दूपर्यंत पोचविण्याचा भगीरथ प्रयत्न चालू आहे. "
भिशीकरांच्या वाक्यांमधलेच अनेक शब्द स्वाभाविकपणे तीस वर्षांनी पंतप्रधानांच्या भाषणातही जसेच्या तसे सापडतात, हे स्वाभाविकच आहे. भिशीकरांना अपेक्षित असलेला 'संकल्प'च पंतप्रधांच्या भाषणात 'संकल्पशक्ती' म्हणून अवतरलेला आहे, दोघांनीही या राममंदिराला राष्ट्राशी जोडलेलं आहे. पण भिशीकरांच्या या वाक्यांमध्ये एक महत्त्वाचा उल्लेख दोनदा आलेला आहे: 'शासनसत्ता ही राष्ट्राची प्राणनाडी नसून अध्यात्मिक अधिष्ठानावर निर्माण झालेली श्रेष्ठ संस्कृतिधारा हेच त्याचे जीवननिधान आहे', आणि 'शासनाच्या मर्जी-नामर्जीची चिंता न करता साऱ्या राष्ट्रवादी शक्ती आता या महान् संकल्पमागे एकवटल्या आहेत'. 

शासन- ढोबळ अर्थाने बोलायचं तर लोकशाही मार्गाने आलेलं सरकार- ही गोष्ट अध्यात्मिक अधिष्ठानापेक्षा कमी मानणं, आणि त्याहीपुढे जाऊन या शासनाच्या मर्जी-नामर्जीची चिंता न करता आपला कार्यक्रम पुढे रेटणं, हा या सर्व संकल्पशक्तीचा पाया त्यांनी नोंदवला आहे. पण आता हेच तत्त्व मानणाऱ्या विचारसरणीचं शासन आल्यावर मात्र सरकारविरोधी असलेले सूर सरसकटपणे राष्ट्रविरोधी, किंवा नक्षलवादी असल्याचा शिक्का मारला जाताना आपण पाहतोय.

विशेष म्हणजे 'कोणत्याही सरकारचं प्रस्थापित सरकार- निवडणुकांच्या आधारे विधिमंडळांमध्ये पोचलेलं सरकार' विशिष्ट निमसरंजामी-निमभांडवली वर्गाचंच असतं, आणि ते उलथवल्याशिवाय खरं स्वातंत्र्य मिळणार नाही, असं भारतातल्या माओवादी पक्षाचं म्हणणं आहे. त्यांच्यावर बंदीही आहे. त्यांनी प्रस्थापित सरकारांविरोधात सशस्त्र युद्धच पुकारलेलं आहे. पण मग भिशीकरांच्या म्हणण्यात वेगळं काय आहे? त्यांना सरकार उलथवायचं नाहीये, पण एका विशिष्ट उद्दिष्टासाठी ही चौकट न मानायची त्यांची तयारी आहे. त्यांच्या तथाकथित अध्यात्मिक अधिष्ठान मानणाऱ्या विचारसरणीनेही हिंसक मार्गाने, रूढ शासनाच्या कायद्याचा भंग करतच आपला कार्यक्रम पूर्णत्वास नेला, बाबरी मशीद पाडली आणि आता त्या कृतीला गैर न मानता, या हिंसक मार्गाचा अप्रत्यक्ष गौरवच आपल्या शासनातील सर्वांत अधिकारी पदावरच्या व्यक्तीने ५ ऑगस्टला केला. या मार्गाला, त्यामागच्या धारणांना अप्रत्यक्ष अधिकृतता देण्याचा हा समारंभ पार पडला.

या पार्श्वभूमीवर नक्षलवादी असल्याचा आरोप झालेल्या किंवा दोष सिद्ध झालेल्या सर्वसामान्य आदिवासींपासून महानगरांमधल्या बुद्धिजीवींपर्यंत अनेकांना तुरुंगात डांबलं जातं, हे कसं पाहायचं? आपल्याला कोणाचे विचार पटतात, हा मुद्दा इथे नाही. पण कोणी माओवादाचं समर्थक असेल, तरी त्या व्यक्तीला तुरुंगात डांबण्यासाठीचा आधार हे शासन कुठून मिळवणार? महानगरी अवकाशातल्या घडामोडींचा किमान आवाज होतो, पण कानाकोपऱ्यात जीव आणि जीवन गमावणाऱ्या आदिवासी लोकांवर (मग काही अपरिहार्यतांमुळे त्या लोकांचा संबंध हिंसेशी आला असेल तरीही) कारवाया करण्याचं समर्थन कशाच्या बळावर केलं जातं? हा नुसता या एका विचारसरणीपुरता किंवा हिंसेपुरता मुद्दा नाही. या संदर्भातली गुंतागुंत नोंदवायचा प्रयत्न आपण रेघेवरच्या काही नोंदींमध्ये केला होता. (पाहा: एवढं एकसुरी एकरेषीय! आणि दोन टोकांदरम्यानचं अंतर). फक्त फरक इतकाच की, सध्याच्या रूढ लोकशाही मार्गाने माओवादी सत्तेत येण्याची शक्यता नाही, किंबहुना त्यांना डावपेच म्हणूनही ते मान्य नाही आणि कोणत्याही मार्गाने का होईना पण सत्तेत येणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला शक्य झालेलं आहे. यात रूढ लोकशाही चौकटीचीही मर्यादा दिसते का, याचा विचार करता येईल, असं वाटतं.

राममंदिराच्या पायाभरणीनिमित्ताने झालेलं दृश्य सादरीकरण आपण टीव्हीवरून पाहिलं असेल, इंटरनेटवर कुठे पाहिलं असेल, आपल्याच ओळखीपाळखीतल्या अनेकांनी समाजमाध्यमांवरून याचा प्रसार केला असेल. घडणारा कार्यक्रम योग्यच आहे, पंतप्रधानांचं बोलणं हीच राष्ट्रीय अभिव्यक्ती आहे, असा सूर या सर्वांनी मान्य केला, त्याचा प्रसारही केला. हे सर्व 'शासनाच्या मर्जी-नामर्जीची चिंता न करणारे' मानावेत का? तसं असेल तर सध्याच्या तर्कानुसार ते राष्ट्रविरोधीही ठरतात का? तसं ठरत नसेल, तर मग टोकाच्या डाव्या विचारसरणीबद्दल नुसती तोंडी सहानुभूती राखणारे राष्ट्रविरोधी ठरवायचा आधार काय? असे प्रश्न यातून नोंदवता येऊ शकतात. हा मुद्दा एखाद्या विचारसरणीपुरताही नाही. ढोबळ अर्थाने डाव्या विचारसरणीचं प्रभुत्व असलेल्या काही अवकाशांमध्ये पुरेसं डावं नसलेल्या घटकांना दाबलं जातं, किंवा माओवादी वर्चस्व असलेल्या प्रदेशांमधले अंतर्विरोध आणखी गुंतागुंतीचे राहतात, हे सगळं स्वतंत्रपणे तपासता येतंच. (दुर्दैवाने मुख्यप्रवाही पुरोगामी मानले जाणारे घटक, समाजमाध्यमांवर किंवा इतरत्र बोलताना सरसकटपणे काही साचे वापरताना दिसतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने अनेकदा स्वतःचं माओवादी असणं नमूद केलेलं असेल, तरी मग समाजमाध्यमांवरील पुरोगामी घटक मात्र त्या व्यक्तीला केवळ मानवाधिकार कार्यकर्ता किंवा कवी म्हणत राहू शकतात. आणि कोणी ठोस माओवादी नसेल, तरीही ती व्यक्ती विविध प्रासंगिक कारणांमुळे एखाद्या प्रकरणात अडकली, तरी तिच्याकडेही याच मर्यादित दृष्टीने पाहिलं जातं. असं केल्याने सगळं बोलणं अपरिणामकारक आणि मर्यादित वर्तुळांमधे एकमेकांची वाहवा करण्यापुरतं राहतं, असं वाटतं. आपल्या बुद्धिजीवी-साहित्यिक-अकादमिक वर्तुळांपलीकडे उर्वरित लोक आहेत, ते सगळे डावे-उजवे कोणीच नाहीत, किंवा त्यांचे प्रतिगामी-पुरोगामी या बायनरीतल्या चर्चेत विशेष काही प्रत्यक्ष हितसंबंधही नाहीत, हे लक्षात ठेवणं बरं, असं वाटतं. शिवाय, सर्व प्रकारची हिंसा प्रत्यक्ष भोगणारे लोक तर आहेतच, किमान हा हिंसेचा संदर्भ लक्षात ठेवून तरी संवादाची वर्तुळं जाणीवपूर्वक संकुचित करू नयेत. पूर्वीच्या नोंदींमध्ये म्हटल्यानुसार, जे उघड सार्वजनिक स्तरावर बोललं गेलेलं आहे, तथ्य म्हणून समोर आहे, ते कबूल करण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो. ते कबूल करून मग तरीही काही बोलण्यासारखं उरेल ते बोलावं. सत्ताधाऱ्यांनी विशिष्ट साचा वापरून एखादं पाऊल उचललं, तर सत्ताधाऱ्यांचं न पटणाऱ्या मंडळींनी तो साचा न वापरता त्यातले अंतर्विरोध नोंदवणं गरजेचं आहे, असं वाटतं. त्याऐवजी फक्त साच्यावरचं नाव बदलून उपयोग नाही). पण इथे एखाद्या छोट्या प्रदेशावर किंवा काही बुद्धिजीवी वर्तुळांवर नव्हे, तर अख्ख्या देशावर वर्चस्व गाजवणाऱ्या सत्तेचा मुद्दा आहे. शिवाय, धार्मिक राष्ट्रवाद मानणारी ही विचारसरणी प्रचलित लोकशाही मार्गांनी सत्तेवर आली, हा मुद्दाही लोकशाही चौकटीच्या मर्यादा अधोरेखित करणारा राहतो. फक्त एखाद्या विचारसरणीपुरता हा मुद्दा नाहीच, रूढार्थाने डाव्या नसलेल्या दलित संघटनांनाही राष्ट्रविरोधी असल्याचा शिक्का सहन करावा लागतोच, आणि या सगळ्या व्यतिरिक्त विविध छोट्यामोठ्या परंपरा, वेगवेगळी कथनं, वेगवेगळ्या धारणा, वेगवेगळ्या देवदेवता असलेल्या अवकाशाच्या पार्श्वभूमीवर एकसाचीपणा घातक वाटतो, इतकाच मुद्दा आहे. अलीकडेच गणपती उत्सव होऊन गेला. तर या एका देवाचीही विविध रूपं, विविध आवृत्त्या दिसतात, अशा वेळी एकच मूर्ती अधिकृत म्हणून लादली तर काय होईल! (सनातन प्रभात हे वर्तमानपत्र अशी अधिकृतता आणू पाहत असतं, 'श्री गणेश मूर्ती शास्त्रानुसारच असावी' असं पुस्तकही त्यांनी काढलेलं आहे. पण वास्तवात विविध ठिकाणी विविध रूपांमधल्या गणेश मूर्ती अस्तित्वात असल्यामुळे अडचण होत असावी, तरीही पूजनासाठी मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली मूर्तीच आवश्यक आहे, असं ते नमूद करत असतात.)

तर, या ५ ऑगस्टच्या निमित्ताने झालेल्या एकसाची प्रभुत्व गाजवू अभिव्यक्तीची मुळं भिशीकरांनी लिहिलेल्या पुस्तिकेसारख्या अनेक गोष्टींमधून उगवलेली आहेत. ही त्यांची गोष्ट आधी नोंदवल्याप्रमाणे खुली आणि खुळी नाही, ती बंदिस्त आहे आणि त्यात परस्परविरोधी कथनांना जागा नाही. तरीही याच अभिव्यक्तीचा गवगवा केलेल्या वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रं आणि समाजमाध्यमं यांना आपण लोकशाही संवादाचे अवकाश मानत राहतो, हे कसं? की, आपल्याला तेही भाग पडत असतं?  

मनं घडवणारी माध्यमं

प्रकाशक-मुद्रक: दिगंबर द. जोशी, डिसेंबर १९९१
आपण वरती एका पुस्तिकेचा उल्लेख केला, तशीच आणखी एक पुस्तिका पाहण्याजोगी आहे. पुस्तकाचे लेखक कोण ते लिहिलेलं नाही, पण 'ह्या पुस्तकाचे पुनर्मुद्रणाचे अधिकार आचार्य श्री. बाळाराव सावरकर यांनी आम्हाला दिले आहेत. त्यांचे आभारी आहोत.' अशी टीप इम्प्रिन्ट पानावर आहे.

या पुस्तिकेतलं पहिलं वाक्यच असं: 'युरोप अमेरिकेत सर्वांना, झाडूवाल्यापासून राजकारणी नेत्यापर्यंत प्रत्येकाला विख्यात फ्रेंच-ज्युईश द्रष्टा नॉस्ट्राडेमस याची ख्याती माहीत आहे. ४०० वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या या ज्योतिषाला भरपूर लोकप्रियता मिळाली याचे कारण साधे सरळ आहे. नॉस्ट्राडेमस याने केलेली भाकिते सन १५५५मध्ये प्रसिद्ध झाली. गेल्या ४००हून अधिक वर्षात त्याची अनेक भविष्ये काळाच्या कसोटीला पूर्णपणे उतरली. १५५५ पूर्वीच त्याने विसाव्या शतकातली दोन महायुद्धे वर्तविली. त्याने हिटलरचे नावही जवळपास अचूक जाणले. तत्पूर्वी १७९२मध्ये फ्रेंच राज्यक्रांती नॉस्ट्राडेमसच्या द्रष्टेपणाचा खणखणीत पुरावा देअून गेली.' एकंदरितच बहुसंख्याकवादी हिंदू अस्मितेचा वापर राजकारणासाठी करावा वाटत असला, तरी त्यासाठी युरोप-अमेरिकेकडे पाहणं गरजेचं वाटणारी ही वृत्ती आहे. सध्याच्या पंतप्रधानांनीही पदाची सूत्रं हाती घेतल्यावर चारेक महिन्यांदरम्यान अमेरिकेचा ठळक दौरा केला होता (त्याआधी पूर्वेकडचे तीनेक देश झाले असले, तरी अमेरिकादौऱ्याच्या सादरीकरणाशी या आधीच्या दौऱ्यांची तुलनाही शक्य वाटत नाही), तिथे मुलाखती झाल्या, त्यांच्या नावाचा गुंगी आणेल असा जयघोष उपस्थितांनी केला, हे आपण पाहिलं असेलच. अगदी अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही भारतात आले, तेव्हा त्याचा एक प्रेक्षणीय कार्यक्रम केला गेला, हेही आपण जाणतो. थोडक्यात, ही अस्मिता 'आज' आपल्याला नक्की कोणता अभिमान पुरवते, या अभिमानाने कोणते प्रश्न सुटतात, याबद्दलही काहीच कार्यक्रम असल्याचं दिसत नाही. या अस्मितेच्या गवगव्याबाबत काही नकारात्मक बोललं गेलं की, इस्लामी राष्ट्रांचे दाखले दिले जातात, किंवा तथाकथित विकसित राष्ट्रांच्या संदर्भात बढाई मारली जाते. हे सर्व या पुस्तिकेतही आहे.

या पुस्तिकांव्यतिरिक्त विविध चित्रं-छायाचित्रं-व्हिडिओ यांच्या माध्यमातून हे पूर्वीही केलं गेलं आणि आता अधिक जोमाने हे केलं जातंय, त्यावर या नोंदीत वेगळं नोंदवण्यासारखं काही नाही. आपल्या खोलवरच्या जाणिवा गतकालीन ठेवून स्वतःची समकालीन सत्ता टिकवण्यासाठी माध्यमांचा वापर कसा केला जातो, याची ही उदाहरणं आहेत. अशा जाणिवा असलेली मनं दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी पुरेशी खुली असत नाहीत, हे आपण विविध स्तरांवर पाहत असतो. (जुनी नोंद: सेन्सॉरलेली मनं: अर्थातच, दुसरी बाजू लोकांना कशाला कळावयास हवी?)

टाकीबंद स्मृतींची गोष्ट

मिलान कुंदेरा यांच्या 'द जोक' नावाच्या कादंबरीत चेकोस्लोव्हाकियातल्या कम्युनिस्ट राजवटीमध्ये घडणारी एक गोष्ट आहे. दूरचा इतिहास, नजीकचा इतिहास, सत्ताबदल, सामूहिक नि वैयक्तिक स्मृती- इत्यादींच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींमधले संबंध नोंदवणारी ही गोष्ट आहे (खरं तर कोणतीही गोष्ट या पार्श्वभूमीवरच घडत असावी, पण इथे थोड्या ठोसपणे राजकीय सत्तेचा संबंध आहे). आपलंच शहर आपल्याला आपलं न वाटणं, आपल्याला जाणवणाऱ्या / जवळच्या वाटणाऱ्या काही पारंपरिक धारणांना विशिष्ट टाकीत भरलं जाणं, अधिक प्रबळ धार्मिक (ख्रिस्ती) धारणा आणि जमातीय पातळीवरच्या लोकस्मृतींच्या धारणा यांच्यातली गुंतागुंत, या सगळ्या गुंतागुंतीला फाटा देत एकच प्रभुत्वशाली कथन लादू पाहणारे सत्ताधारी- असं काहीएक सूत्र यात दिसतं. या कादंबरीत पहिल्या सहा प्रकरणांमध्ये चार पात्रं आपापल्या दृष्टिकोनातून प्रथमपुरुषी कथनं नोंदवतात, (एक पात्र तीनदा बोलल्यामुळे सहा प्रकरणं) आणि मग सातव्या प्रकरणामध्ये त्यातल्या तीन पात्रांना एकत्र आणून प्रथमपुरुषी कथनं आहेत. तर, ही कथनांची रचनाही खूप नावीन्यपूर्ण नसली, तरी या विशिष्ट संदर्भापुरती त्या प्रस्थापित एकसाचीपणाला छेद देणारी दिसते. आपण इथे बोलतोय ती भारतीय संदर्भातली गोष्ट याहून अधिक गुंतागुंतीची आहे. इथल्या धारणा आणि स्मृतींच्या गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या आहेत, त्यांची संख्याही प्रचंड आहे आणि त्यातले परस्परविरोधी दृष्टिकोनही प्रचंड आहेत. त्यामुळे इथला खुलेपणा आणि खुळेपणा अधिक तीव्र असायला लागेल. 

सत्ताधारी कोण होतं, यावर अनेक गोष्टी अवलंबून राहणंही स्वाभाविक असेल. पण त्यामुळे सत्ताधारी कोण आहेत, आणि त्यांचं काय सुरू आहे याबद्दल जास्त बोललं जाणंही स्वाभाविक मानायला हवं. पण तसं मानलं जात नाही आणि लगेच टोकांवरचे शिक्के मारले जातात. 

पर्मनन्ट ब्लॅक, २०१३ । डिझाइन- अनुराधा रॉय
Cover: "View of Poona, near Bombay"
Illustrated London News, 1875

आता एका पुस्तकाच्या उल्लेखाने नोंद संपवू. प्राची देशपांडे यांनी 'क्रिएटिव्ह पास्ट्स' या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. बखरवाङ्मयापासून ते मराठीतल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांपर्यंत विविध कथनांमधून-कवनांमधून 'महाराष्ट्र धर्मा'ची जडणघडण कशी झाली, त्यावर कोणत्या धारणांचा प्रभाव राहिला, जाणीवपूर्वक कोणता प्रभाव पाडला गेला, असा एक लेखाजोखा या पुस्तकात आहे. हा सगळा विषय आपल्या कक्षेतला नाही आणि नोंदही या मुख्य विषयाबद्दलची नाही. (पुस्तकाच्या विषयाच्या अनुषंगाने अनिकेत जावरे यांनी लिहिलेलं या पुस्तकाचं परीक्षण, राहुल सरवटे यांनी लिहिलेलं परीक्षण). पण साधारणतः आपलं मन, आपल्या स्मृती यांना भावनिक स्तरावर कसं वापरलं जाऊ शकतं, याचा एक दाखला या पुस्तकातल्या तपशिलातून आपल्याला मिळतो. पूर्वीपेक्षा अशा वापरासाठीची साधनं-माध्यमं आता वाढलेली आहेत, अधिक व्यामिश्र झालेली आहेत. डोळे-कान यांना पूर्ण काबीज करणारी साधनं आलेली आहेत. नायक-खलनायकांची, आपल्या दृष्टिकोनांची निर्मिती कशी होत जाते, याचीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चर्चा या  इतिहासलेखनाचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकात येते. समकालीन इतिहासाच्या बाबतीत हा स्मृतींचा खेळ कसा खेळला जातो, हेही तपासण्याजोगं असावं. मानवी मनांना काबीज करणारी, अधिक पोहोच असलेली माध्यमं वरचढ ठरलेल्या काळात हे जास्त गरजेचं वाटतं. (आत्तापर्यंतचा सर्वाधिक पैसे कमावणारा भारतीय चित्रपट ठरलेला 'बाहुबली' इथे उदाहरणादाखल पाहता येईल. एका कल्पित ऐतिहासिक राज्यातली जनता कधी त्यांच्या स्मृतीतला प्रिय राजा म्हणून, तर कधी त्यांना हवा असलेला राजा म्हणून 'बाहुबली, बाहुबली, बाहुबली' किंवा 'बाहुबली जय हो, बाहुबली जय हो, बाहुबली जय हो', असा गुंगी येईल इतका जयघोष करताना दिसते. कॅमेरा त्या जनतेचे डोळे टिपतो, त्या डोळ्यांना आधीच 'बाहुबली'च्या अचाट सामर्थ्याने टिपलेलं असतं, असं आपल्याला प्रेक्षक म्हणून कळतं. बहुधा आपणही प्रेक्षक म्हणून टिपले गेलेले असतो. असाच दुसऱ्या एका शब्दाचा जयघोष अलीकडच्या काळात आपण वेळोवेळी पाहिलेला-ऐकलेला असेलच: 'मोदी, मोदी, मोदी, मोदी, मोदी').

देशपांडे यांनी प्रस्तावनेत एलॉन कॉन्फिनो यांचं एक निरीक्षण नमूद केलेलं आहे, ते इथे आपल्या नोंदी संदर्भात लक्षात घेणं आवश्यक वाटतं. ते निरीक्षण साधारणतः असं आहे: विभिन्न भौगोलिक रचनांमध्ये सामूहिक स्मृती घडवण्यासाठी व त्यांच्या नूतनीकरणासाठी विविध माध्यमांचा वापर कसा झाला, याचं सुलभ दस्तावेजीकरण करून थांबता कामा नये. काही प्रतिरूपं लोकस्मृतींचा भाग होतात, तर इतर प्रतिरूपं लोकस्मृतींचा भाग होत नाहीत, यामागील विविध संदर्भ तपासण्यासाठी सांस्कृतिक इतिहासाची कोटी (कॅटेगरी) म्हणून 'स्मृती'चा वापर अधिक उपयुक्त ठरू शकतो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, विशिष्ट प्रतिरूपं सामूहिक स्मृतींचा विषय कशी होतात एवढंच तपासण्याऐवजी, असं का होतं तेसुद्धा तपासायला हवं.

हे निरीक्षण रास्त वाटतं. पण एका मर्यादेपलीकडे ते ताणणंही ठीक नाही. 'का' आणि 'कसं' या दोन्ही प्रश्नांना समान महत्त्व द्यावं, एवढ्यापुरतंच हे निरीक्षण आपण समजून घेऊ. 'का' अशा धाटणीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सापडणं काही वेळा अशक्यही असतं. या नोंदीच्या विषयासंदर्भात बोलायचं तर, 'का'चं उत्तर आपल्याला रोजच शोधावं लागत असावं. एकसुरीपणा कसा आहे, हे नोंदवणं हा एक भाग झाला, पण असा एकसुरीपणा आपल्याला का भावतो? प्रतिगामी घटकांनी टाकीबंद स्मृतींचा प्रभावी वापर केला, तर प्रतिगामित्व मान्य नसणाऱ्यांनाही (अपवाद वगळता) टाकीच बांधायची गरज का भासते? स्वतःला व्यक्ती म्हणून काही वेगळं समजण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्यायच्या आधीच विशिष्ट सुरात सूर मिळवण्यामध्ये काही सामूहिक सुरक्षितता लाभते का? कधी ही सामूहिकता खूप मोठी असते, तर कधी आपापल्या छोट्या गटांची असते, पण तग धरून राहण्यासाठी ती गरजेची ठरते, म्हणून हे घडतं का? असे हे 'का'शी निगडित प्रश्न असावेत. टाकीबंद पर्याय रोजच आपल्या समोर येत असतात. दुर्दैवाने पटकन तहान भागवण्यासाठी अशा टाक्या आपण सोयीच्या मानतो, प्रवाही पाण्याला महत्त्व देत नाही.

Friday, 17 July 2020

मेड इन इंडिया : 'काया वाच्या मनाचा अस्सल टाहो'

पुरुषोत्तम बोरकर यांचं १७ जुलै २०१९ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात सुटाळा इथे निधन झालं. आज १७ जुलै २०२०. थोडी त्यांच्याबद्दल आणि बरीचशी त्यांच्या 'मेड इन इंडिया' या कादंबरीबद्दल बोलू पाहणारी ही नोंद.

१. मृत्यूनंतर छापून आलेल्या मजकुरांबद्दल
    "वऱ्हाडी भाषेला लोकप्रिय करण्यात योगदान देणाऱ्या वैदर्भियांमध्ये पुरुषोत्तम बोरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आपल्या विनोदी लेखनासाठी साक्षात पुलंच्या कौतुकाची थाप मिळवून ‘पुलकित’ झालेला हा लेखक आपल्या मातीत राहात होता, हे अनेकांना त्यांच्या जाण्यानंतर कळावे हे दुर्दैवी आहे." 
बोरकर गेल्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स' या वर्तमानपत्रात (२० जुलै २०१९) रोजी प्रसिद्ध झालेल्या 'माणसं' सदरातल्या स्फुटामधली पहिली दोन वाक्यं वरती नोंदवली आहेत. या दुर्दैवी वाक्यांमधे अनेक खटकण्यासारख्या गोष्टी आहेत.
  • 'वऱ्हाडी भाषेला लोकप्रिय': वऱ्हाडी भाषा, निरनिराळ्या तऱ्हेच्या वऱ्हाडी भाषा किंवा बोली विदर्भात विविध ठिकाणी बोलल्या जातात, प्रत्यक्ष माणसं/लोक ती भाषा बोलतात. विदर्भाची एकूण लोकसंख्या, २०११च्या जनगणनेनुसार, दोन कोटींहून अधिक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे अठरा ते वीस टक्के लोकसंख्या विदर्भात राहते. त्यातले सगळेच काही वऱ्हाडी बोलणारे नसणार. शिवाय, त्या सगळ्यांची बोलण्याची भाषा काटेकोरपणे एकसारखी नसली, तरी ती 'वऱ्हाडी' मानली, तर एवढ्या लोकांच्या रोजच्या बोलण्यातल्या भाषेला 'लोकप्रिय करणं' म्हणजे काय? की, विदर्भाबाहेर लोकप्रिय केली, असा त्याचा अर्थ घ्यायचा? तसा असेल, तरी त्याचा आधार काय ते कळत नाही. मुळातच, मोठ्या समूहात रोजच्या वापरात असलेली, जिवंत, प्रवाही भाषा अलोकप्रिय असेल, या अप्रत्यक्ष पूर्वग्रहाशिवाय असं वाक्य लिहिता येईल का? 
  • 'आपल्या विनोदी लेखनासाठी साक्षात पुलंच्या कौतुकाची थाप मिळवून पुलकित': पुलकित या शब्दाचा अर्थ, रोमांच उठणं, असा शब्दकोशात दिलेला आहे. बोरकरांचं पुलंनी कौतुक केलं ही चांगली गोष्ट आहे, पण साक्षात पु. ल. देशपांडे यांनी मारलेली कौतुकाची थाप हा एक मोठा मानदंड मानणं, त्याने बोरकरांना 'पुलकित' व्हायला भाग पाडणं, हे कंटाळवाणं आहे. शिवाय, 'वऱ्हाडी लोकप्रिय केली', 'साक्षात पुलंनी थाप मारली', तरीही 'हा लेखक आपल्या मातीत राहात होता, हे अनेकांना त्यांच्या जाण्यानंतर कळलं', यातला विरोधाभासही यात दुर्लक्षित राहतो. पण यावर आता वेगळं बोलण्याची गरज नाही. आणि वर उल्लेख केलेल्या 'म.टा.'तल्या स्फुटामध्ये त्या दोन वाक्यांनंतर- म्हणजे '...हे दुर्दैवी आहे' यानंतर, म्हटलंय की, 'पण, ते वास्तव आहे.' तर हे असं वास्तव आहे. खुद्द बोरकरांचं महत्त्व त्यांच्या साहित्यावर जोखण्यापेक्षा कुठल्यातरी मानदंडाला त्यांच्याशी जोडूनच त्यांचा थोडाफार गौरव करण्याकडे कल दिसतो. 

वरती पु. ल. देशपांडे झाले. आता भालचंद्र नेमाडे.

२८ जुलै २०१९ रोजी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्येच आलेल्या 'गरसोळीकर' होऊन गेलेला लेखक या लेखामधला पुढील मजकूर पाहा:
सुजाण मराठी वाचक सातत्याने एका नायक/नायिकेच्या शोधात राहत आला आहे. मराठी भाषेत महत्त्वाच्या ठरलेल्या प्रत्येक कादंबरीकारानं या वाचकाला किमान एक नायक/नायिका दिलेली आहे. या नायक-नायिकेशी समकालीन पिढीने आपले एक प्रकारचे जैविक नाते त्या त्या काळात प्रस्थापित केल्याचे दिसते. हे नाते अतिशय टोकदार आणि संवेदनशील अशा प्रकारचे आहे. पण लक्षात कोण घेतो, रणांगण, गारंबीचा बापू, कोंडूरा, बनगरवाडी, धग, आनंदओवरी, पाचोळा, माणूस अशा अनेक कादंबऱ्यांतील नायक-नायिकेशी वाचकांचे हे नाते त्या त्या टप्प्यावर दिसते. हे नाते शुष्क, कोरडे, दगडी असे नसून त्यात एक प्रकारचे रसरशीतपण आहे. वाचक आणि कादंबरीचा नायक यांच्या संवादी नात्यांचा साठोत्तरी काळातील सर्वोच्च आविष्कार म्हणजे नेमाडेंच्या कोसलातला पांडुरंग सांगवीकर. 'पांडुरंगा'च्या पूर्वी एवढा गडद प्रभाव मराठी तरुण मनावर दुसऱ्या कोणत्या नायकाने पाडला नव्हता. त्याची टोकाची परात्मता ही या पिढीला आपली वाटत होती.
नेमाडेंचे साहित्य आणि त्याचा मराठी कादंबरीवरील प्रभाव हा सातत्याने चर्चेत राहत आलेला विषय आहे. साधारणपणे ऐंशी-नव्वदोत्तरी कालखंडात खेड्यापाड्यातून आलेले जे लेखक मोठ्या प्रमाणात लिहू-वाचू लागले, त्यांना इतर कोणत्याही लेखकांपेक्षा माडगूळकर, यादव, नेमाडे, उद्धव शेळके असे लेखक जवळचे वाटत होते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या कादंबरीतील पर्यावरण, पात्रे आणि लिहू लागलेल्या नव्या लेखकांचे जैविक पर्यावरण यात असणारे साधर्म्य. कोसलातल्या पांडुरंग सांगवीकरबद्दल जे घडले तेच किमान काही प्रमाणात कोणाबद्दल घडले याचा शोध जेव्हा आपण घेऊ जातो तेव्हा 'पंज्याबराव गरसोळीकर-पाटील' ह्या 'मेड इन इंडिया'तल्या नायकाशिवाय दुसरा नायक दिसत नाही. 'कोसलाचा पुढचा टप्पा म्हणून मेड इन इंडियाचा नायक पंज्याबराव हा आपल्या वाङ्मयीन संस्कृतीचा एक वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणून दीर्घकाळ गाजत राहील', ही शंकर सारडा यांची त्यावेळेची प्रतिक्रिया आजही तितकीच महत्त्वाची वाटावी, यातच या कादंबरीचे कालातीत असणे आहे. याचा संबंध बोरकरांनी किती कादंबऱ्या लिहिल्या याच्याशी नाही! 
यातही बरीच गुंतागुंत टाळल्यासारखं वाटतं. सुजाण मराठी वाचक खरोखरच सातत्याने एका नायक/नायिकेच्या शोधात राहत आले असतील, तर तेही दुर्दैवीच म्हणावं लागेल. साहित्यकृतीतून कोणत्या जाणिवा व्यक्त झाल्या, यापेक्षा त्यात ठळक नायक-नायिका असणं अपरिहार्यच असतं का? या प्रश्नाला सामोरं न जाणारं हे विधान आहे. तेही नेमाड्यांच्याच प्रभावातून आहे. नायककेंद्री कादंबरी, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, ते त्यांचं असणं ठीक आहे, पण तो मूल्यमापनाचा निकष मानणं अवाजवी वाटतं. खुद्द नेमाड्यांच्या समीक्षेतही अशा नायककेंद्री असण्याला उठाव दिलेला असतो, हेही ठीक. पण ते त्यांना योग्य वाटतं, एवढाच त्यातला मुद्दा आहे. तो कालातीत निकष कसा होईल? शिवाय, 'मेड इन इंडिया'ला 'कोसला'च्या प्रभावाखाली असल्याचं मानणंही असंच अवाजवी वाटतं, त्याबद्दल आपण नोंदीच्या पुढच्या भागात बोलू. मराठीव्यतिरिक्त विविध भाषांमध्ये कोणी ना कोणी नायक असलेल्या कथा-कादंबऱ्या पूर्वीपासून लिहिल्या गेलेल्या आहेत, परात्मता आलेले नायक-नायिकाही विविध कथा-कादंबऱ्यांमधे सापडतील, पण असा दुसरा कोणी नायक (नायिका नव्हे) दिसला, की ती साहित्यकृती लगेच 'कोसला'शीच जोडणं हा आपल्या मर्यादेचा भाग आहे, त्यात कालातीत असं काहीच नाही. शिवाय, मध्यवर्ती पात्र / प्रोटॅगनिस्ट / नायक-नायिका असणं- तसं एकच पात्र असणं किंवा तशी साधारण समसमान ठळकपणाने अनेक पात्रं असणं, यात बऱ्याच छटा असू शकतात. काही पात्रं/नायक-नायिका प्रसिद्ध होतात, हे खरंच. पण सुजाण वाचक त्यांच्याच शोधात असेल का? असेल तर ते बरं आहे का? असे प्रश्न यात विचारात घेण्यासारखे वाटतात. आपण त्याबद्दलही नोंदीच्या पुढच्या भागात थोडं बोलू.

पु. ल. देशपांडे किंवा भालचंद्र नेमाडे यांच्यावरची ही नोंद नाही. त्यांना मराठी समाजात वेगवेगळे लोक मापदंड आणि मानदंड म्हणून वापरतात, त्यावरही इथे टिप्पणी करायला नको. हे असं कदाचित अपरिहार्यच असेल. 'मेड इन इंडिया' कादंबरीबाबतही कोणाला पु.ल. किंवा नेमाडे या अधिक लोकप्रिय असलेल्या लोकांचा उल्लेख गरजेचा वाटला, तर तो करावाही (आपणही नोंदीत आता तो करणार आहोत), पण तो सुसंगत हवा, असं वाटतं.  तुलना होणंही अपरिहार्य, पण त्याचे निकष काय ते खोलात पाहायला हवं. नाहीतर, नायक-नायिकेचं असणं, परात्मता येणं, अशा ढोबळ पातळ्यांवर ते उरेल. निव्वळ कोणीतरी अधिक मोठे किंवा लोकप्रिय झाले म्हणून त्यावर सगळं जोखत राहणं बरं नाही, असं वाटतं. किमान एखादा लेखक गेल्यावर तरी त्याच्या साहित्यकृतीचं मूल्यमापन एवढ्याच मर्यादित मापदंडांनी करणं बरं वाटत नाही. किंवा त्यात पुन्हा त्या मापदंडांच्या अवाजवी गौरवाला वाव देणं- म्हणजे साक्षात पुलंच्या कौतुकाची थाप मिळवून पुलकित झाले, असं म्हणणं किंवा 'कोसला'च्या नायकाबाबत जे घडलं तेच किमान काही प्रमाणात ज्याच्याबद्दल घडलं तो नायक म्हणून 'मेड इन इंडिया'तल्या गरसोळीकर पाटलाकडे बोट दाखवणं, आणि त्यातच 'मेड इन इंडिया'चं कालातीत असणं शोधणं, हेही दुर्दैवी वाटतं.

कोणतीही साहित्यकृती दिसली की ती मुळात कोणत्या मापाची आहे हे न बघता याच मर्यादित निकषांनुसार मोजत राहणं म्हणजे त्या संबंधित लेखक-व्यक्तीच्या संवेदनाला काहीच मान न देण्यासारखं वाटतं. शिवाय, मराठी साहित्यात मधले काही टप्पेच नाहीत, अशीही स्थिती त्यातून दिसते. कोणी म्हणेल, तसंच आहे- आम्ही म्हणतो तेच महान! तर तेही ठीकच. 

भालचंद्र नेमाड्यांच्याच एका भाषणातला (वेगळ्या संदर्भातला) लोककथेचा किस्सा सांगायचा तर: एका म्हातारीची बुगडी हरवली, तर ती झोपडीबाहेर प्रकाश होता तिथे शोधायला लागली. मग कोणीतरी तिला विचारलं, अगं म्हातारे, बुगडी हरवली कुठे नक्की. तर म्हातारी म्हणाली, झोपडीत हरवली. तर, दुसरी व्यक्ती म्हणते, मग झोपडीत शोध की. तर, म्हातारी म्हणते, झोपडीत अंधार आहे, इथे उजेडात दिसली तर बघते. [हे आठवणीतून नोंदवलं आहे, पण लोककथेच्या बाबतीत हे चालेल, असं वाटतं. लोकालोकांमधे बदलली तर बदलली कथा]

तर, हे असं होतं. उजेड आहे तिथेच सगळा शोध घेण्याकडे कल असतो. उजेड- किंवा भगभगाट कोणाचाही असू दे. आणि मग तिकडे अंधारात काय पडलंय तिकडे दिवा घेऊन जायला नको वाटतं. याचंच बोरकरांच्या संदर्भातलं आणखी एक दुर्दैवी उदाहरण नोंदवू:

देशोन्नती, बुलडाणा लाइव्ह- आरडीएक्स, २२ जुलै २०१९

वर दिलेला लेख 'देशोन्नती' या वर्तमानपत्राच्या बुलडाण्यातील स्थानिक पुरवणीत तिसऱ्या पानावर प्रकाशित झालेला आहे. त्यात सर्वांत वरती जांभळ्या अक्षरांत दिसतेय ती पुरुषोत्तम बोरकरांची कविता आहे, ती त्यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांवरून काही चाहत्यांमध्ये पसरल्याचं दिसतं, इतरत्रही काही ठिकाणी ती दिसली. 'मेड इन इंडिया'मधे शेवटी पंजाब गरसोळीकर पाटील हे पात्र स्वतःच्या कल्पनेतल्या मरणाचं वर्णन करतो, त्यातला थोडा भाग वरच्या लेखात जसाच्या तसा नोंदवलाय, आणि हे वर्णन आता बोरकरांनाच लागू झाल्याचं दुसऱ्या रकानाच्या सुरुवातीला म्हटलंय. त्यानंतर दुसऱ्या रकान्यात खाली, 'महाराष्ट्र टाइम्स'मधलं वर उल्लेख झालेलं स्फुट जसंच्या तसं छापलेलं आहे. फक्त शेवटची दोन वाक्यं काढून बाकी प्रत्येक शब्द जसाच्या तसा. 'वऱ्हाडी भाषेला लोकप्रिय करणारे लेखक', 'पुलंच्या कौतुकाची थाप मिळवून पुलकित झालेले लेखक' हेही जसंच्या तसं. बोरकर मूळचे अकोल्याचे होते, नंतर गेला काही काळ ते बुलडाण्यातल्या खामगाव इथे राहत होते, तिथेच ते मरण पावले, आणि तिथल्याच स्थानिक पुरवणीत त्यांचं हे असं वर्णन होणं, यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत असाव्यात असं वाटतं. बुलडाण्यातल्या बातमीदाराला तिथल्याच लेखकाबद्दल दोन रकान्यांचा मजकूर उभा करायलाही 'महाराष्ट्र टाइम्स'मधल्या दुर्दैवी मजकुराचा आधार घ्यावासा वाटला, त्यातली आपल्या परिसराबद्दलची/भाषेबद्दलची अजाणता अपमान करणारी वाक्यंही जशीच्या तशी छापावी वाटली (तेही स्वतःचं नाव आणि मोबाइल नंबर देऊन), हेही सगळं झालं. हेही कमी होतं म्हणून बहुधा, या वरच्या लेखाच्या खाली अगदी लागूनच चारेक कॉलमांची पुढील बातमी वाचायला मिळते:

देशोन्नती, बुलडाणा लाइव्ह-आरडीएक्स

पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त... खामगांव येथे स्टँड अप कॉमेडी स्पर्धेचे आयोजन
 - अशी ही बातमी आहे. त्यातही बातमी एवढी मोठी असली, तरी ती झालेल्या कार्यक्रमाची नाही, दोन दिवसांनी कार्यक्रम होणार असल्याची बातमी आहे. 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पू. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून राज्य शासनामार्फत पु.लं. जन्मशताब्दी निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांतर्गत स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. [...] मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. [...] सध्या तरुणाईत [स्टँड अप कॉमेडी] हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होत आहे, याच धर्तीवर पु.लं.चे साहित्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित केली आहे'- असं बरंच काही या बातमीत लिहिलेलं आहे. वरच्या फोटोवर क्लिक केल्यावर बातमी मोठी करून वाचता येईल (अख्ख्या पानासाठी इथे पाहावं). यातून आता आपल्याला पुरेसा उलगडा होईल, असं वाटतं. सरकारला काय लोकप्रिय करायचंय, खामगावतच वारलेल्या लेखकाबद्दल कोणाला काय करायचंय (बोरकरांच्या निधनाबद्दल शोकसभा झाल्याची लहानशी बातमीही नंतर आली होती, पण त्याने वरच्या तपशिलाला काही बाधा पोचणार नाही), आपल्या परिसरातला लेखक वारल्यावरही आपण त्याबद्दल काय लिहितो, याचा अंदाज यावरून यावा.

२. पुरेशा उजेडात नसलेली 'मेड इन इंडिया'

पु. ल. देशपांडे 'मेड इन इंडिया' या कादंबरीबद्दल असं म्हणाले होते:
गेल्या कित्येक वर्षांत अशी हसविणारी आणि तितकीच अस्वस्थ, अंतर्मुख करणारी कादंबरी मी वाचली नव्हती. 'मेड इन इंडिया'तील विनोद हा अंतिम सत्याकडे नेणारा परिपक्व 'शॉर्टकट' आहे. आजच्या सुशिक्षित तरुणाची नेमकी शोकांतिका आणि विदारक कोंडी या कादंबरीतून अतिशय प्रगल्भपणे मांडली गेली आहे.
वऱ्हाडी बोलीबरोबरच काव्यात्म, वृत्तपत्रीय, राजकीय आणि चिंतनशील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचा वापर या लेखनात अतिशय खुबीने केला गेला आहे. बोलीभाषा, ग्रांथिक मराठी, हिंदी, इंग्रजी यांच्या मिश्रणातून लेखकाने एक वेगळीच भाषा निर्मिली आहे. या रसायनाचा भाषातज्ज्ञांनी गांभीर्याने अभ्यास केला पाहिजे. कारण ही नव्या पिढीची भाषा आहे.
आधुनिक ग्रामीण-शहरी जीवनाचे एवढ्या समर्थपणे केलेले चित्रण मराठीत दुसरे नाही. मराठीत 'मैलाचा दगड' ठरावी अशी ताकद या कादंबरीत आहे. या कादंबरीने मला खूप हसविले आणि तितकेच डोळ्यांत पाणी यावे असे अस्वस्थही केले. मी मनात जपलेल्या मोजक्या पुस्तकांपैकी एक म्हणजे 'मेड इन इंडिया'!
यातला दुसरा परिच्छेद खरोखरच महत्त्वाचा आहे, आणि मराठीत भाषेचा इतका वैविध्यपूर्ण पट मांडणारं दुसरं पुस्तक नसावं. किमान ही नोंद लिहिणाऱ्या वाचनात तरी तसं पुस्तक आलेलं नाही. याचे दाखले नोंदवायचे तर सगळी कादंबरीच इथे नोंदवावी लागेल. भाषेचा वैविध्यपूर्ण पट असणं, एवढंच वैशिष्ट्य काही कादंबरीला सखोल करायला पुरेसं नाही, हे खरं. पण या कादंबरीत भाषेचा असा वापर असल्यामुळेच बहुधा ती फक्त एका नायकाची, एका पंजाबराव गरसोळीकर-पाटलाची कथा राहत नाही.

१९८१ साली 'अनुष्टुभ' द्वैमासिकाच्या लघुकादंबरी स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेल्या रचनेला दीर्घरूप देऊन ही कादंबरी लिहिली गेल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे. 'मेड इन इंडिया' कादंबरीची पहिली आवृत्ती १५ डिसेंबर १९८७ साली आली. १९८८-८९चा महाराष्ट शासनाचा राज्यपुरस्कार या कादंबरीला मिळाल्याचं दिसतं. इतरही दोनेक पुरस्कार आहेत. कादंबरीचं मुखपृष्ठ असं:

श्रीविद्या प्रकाशन, २००८ । मुखपृष्ठ: सुभाष अवचट

'मेड इन इंडिया' कादंबरीत तत्कालीन अनेक तपशील सहजपणे आलेले आहेत, हे खरं. पण केवळ त्या काळातले राजकीय नेते, क्रिकेटपटू, अभिनेते-अभिनेत्र्या, काही वस्तूंचे ब्रँड आणि टीव्ही-व्हिडिओ इत्यादींचा वाढलेला वावर- अशा चिन्हांपुरती ही कादंबरी मर्यादित नाही. त्यात अख्खं भारतीय गाव आहे, शहराशी घसट होऊन आलेलं पात्र आहे, विविध जाती-जमातींच्या परस्परसंबंधांचा पट आहे, अलीकडच्या काळात आत्महत्यांमुळे बातम्यांचा विषय होत राहणारी शेतकऱ्यांची समस्याही आहे- हा सगळा पट काही मर्यादित दृश्य तपशिलांच्या चौकटीत बसवणारं हे कव्हर कादंबरीवर अन्याय करतं, असं वाटतं. आपल्याकडे २००८ सालची, तिसरी आवृत्ती आहे. पहिल्या व दुसऱ्या आवृत्तीचं कव्हर वेगळं असण्याची शक्यता कमी आहे. आणि आता इथून पुढे मुद्दाम नवीन मुखपृष्ठ करून ही कादंबरी चांगल्या डीटीपीसह बाजारात येण्याची शक्यताही कमी वाटते. अलीकडे आलेली आवृत्ती जुन्याच डीटीपीसह, जुन्याच बांधणीसह, त्याच मुखपृष्ठासह, फक्त किंमत वाढवून आलेली आहे. कागदाचे वाढलेले दर, वाढलेले कर यांमुळे किंमत वाढली असेल. पण २००८ साली शंभर रुपयांना मिळणारं पुस्तक आता तीनशे रुपयांना विकायचं असेल, तर जाता-जाता त्यातलं डीटीपी कम्प्यूटरच्या मदतीने नव्याने सुबकपणे करून घेणं, इत्यादी गोष्टी काही अतोनात खर्चिक नाहीत. किंबहुना, किंमतीत हा बदल करताना, इतक्या कालांतराने नवीन आवृत्ती येत असताना, दरम्यानच्या काळात तंत्रज्ञानाने काही गोष्टी सहजपणे उपलब्ध करून दिलेल्या असताना, इतपत बदल करणं आवश्यक आणि व्यावसायिकदृष्ट्या बरं वाटतं. (पण मुळात श्रीविद्या प्रकाशनाने अशी साचेबद्ध नसलेली कादंबरी प्रकाशित केली, ही चांगलीच गोष्ट आहे). तर ही नोंद लिहिणाऱ्याला मुखपृष्ठ आवडलं नाही, म्हणून ते बदलावंच, असा आग्रह नाही. पण त्या काळी कादंबरी काढताना हे मुखपृष्ठ योग्य वाटलं असेलही समजा (खरं तर त्या काळाचा विचार केला तरीही अशा तपशिलांपुरता चेहरा कादंबरीला देणं अपुरं), तरी आता वाढीव किंमतीत थोडा खर्च नवीन मुखपृष्ठावरही करणं अव्यावहारिक नि अवाजवी, ठरलं नसतं. या कादंबरीवर आधीच उजेड कमी, तो अधिकाधिक कमी करत नेण्याची तजवीज अशा घटकांमुळे होते, असं वाटतं.

३. जाणिवा

"पुढे बसलो त धुरजळ, मांगे बसलो त उलाय अन मंधात बसलो त बैलबुजाळ; असा हा माहोल. अख्खी जिंदगी अधूनतथून मीजमाशी पळल्यावानी! माही अन ह्या गावाचीही" (पान १)- ही कादंबरीतली पहिली तीन वाक्यं आहेत. वऱ्हाडी भाषेशी, त्यातही ग्रामीण बोलीशी परिचय नसलेल्या व्यक्तीला हे समजून घेणं अवघड जाईल, त्यामुळे पुस्तकाशेवटी अशा काही शब्दांचे अर्थ दिले आहेत. त्यानुसार, 'धुरजळ' म्हणजे 'जूजड, बैलगाडीचा पुढील भाग जड होऊन जूवर दाब येणं'. 'उलाय' म्हणजे 'बैलगाडीच्या मागील भागी ओझं जास्त झाल्यामुळे समोरचा भाग वर जाणं'. आणि 'बैलबुजाळ' म्हणजे 'बैलांना बुजवणारा, घाबरविणारा'. समोर दाब नको, मागे ओझं नको, मधल्यामधेही बसलं तर बैल बुजतील- अशा सगळ्या विवंचनेला सामोरी जाणारी व्यक्ती आणि गाव यात आहे. अनेक बदलत्या जागतिक नि देशी संदर्भांनी निर्माण झालेले हे पेच आहेत. ते सगळे या वैशिष्ट्यपूर्ण शब्दांमधून आपल्यासमोर येतात. या भाषेशी परिचय नसलेल्या वाचकांना, शेवटी निवडक शब्दार्थांची यादी दिलेली असली तरी, कादंबरी वाचताना सुरुवातीला अडखळायला होऊ शकतं, हे खरं. पण थोडी पानं गेल्यानंतर त्यात वाचक रुळेल, असं वाटतं. काही शब्दांचे काटेकोर अर्थ कळले नाहीत, तरीही जाणीव समजण्याची शक्यता राहते. तर, बैलगाडीशी संबंधित हे तीन शब्द म्हणजे शेवटी काही जाणिवांना वाहून नेणाऱ्या खुणा असतात. तर इतक्या स्थानिक खुणांनाही ही कादंबरी बिनदिक्कतपणे, आत्मविश्वासाने जागा देते. आपण एवढ्या स्थानिक जाणिवा धरल्या, तर आपण जास्त लांबवर पोचणार नाही, अशी भीती लेखकाला वाटत नाही.

शिवाय, त्याला आपल्यासाठी स्थानिक नसलेल्या दुसऱ्या प्रदेशांमधल्या जाणिवांनाही सामोरं जायला काही भीती वाटत नाही. "कधी ना कधी आपण आठबारी रिव्हॉल्वर खरेदी करूच करू. अन सिन कॉनरीसारखं कमरीले लटकावून चले पटेल गावमे घुमने..." (पान १२४) असा तो 'वेस्टर्नपटां'नाही हात लावतो. आणखी एक उदाहरण: "मानसाले जे आवळते, ते कराले तो जवा प्रारंभ करते; तव्हाच त्याच्या अत्यंत बिकट अळीअळचनीलेही प्रारंभ होत असते- टी. यच. हक्सले" (पान १३०). बरेचदा सतत उजेडात नसलेल्या, सांस्कृतिक-आर्थिक राजधान्यांजवळ नसलेल्या तपशिलांचा वापर ढोबळ विनोदासाठी केला जातो, त्यात तसा विनोद नसतोच, फक्त आपले काही पूर्वग्रह तयार करून दिलेले असतात आणि त्यामुळे काही गोष्टी परस्परांशी कधीच संबंध न येणाऱ्या आहेत, असं आपोआपच आपल्याला वाटू लागलेलं असतं. उदाहरणार्थ, 'पीके'सारख्या एखाद्या हिंदी चित्रपटात परग्रहावरून पृथ्वीवर आलेला माणसासारखा प्राणी दाखवला असेल आणि तो पृथ्वीवरची एक भाषा आत्मसात करून त्यात बोलू लागतो, असं दाखवलं- तर त्यात तपशील म्हणून काही विनोद नाही. हिंदी चित्रपटातल्या या परग्रहवासी इसमाने आपल्या पृथ्वीवरची इंग्रजी किंवा मुख्यप्रवाही वापरातली हिंदी आत्मसात केली, तर त्यात काहीच विनोद नसेल. पण तो इसम भोजपुरीत बोलतोय, असं दाखवलं, की आपोआप मुख्यप्रवाही हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक हसायला लागतात. प्रत्यक्ष संवादात विनोदी असं काहीच नसतं, फक्त परग्रहावरचा, प्रचंड प्रगत तंत्रज्ञानाचं प्रतीक असलेल्या यानातून आलेला माणसासारखा प्राणी- बहुधा त्या ग्रहावरचा खगोलशास्त्रज्ञही असेल असा इसम, एकदम भोजपुरीसारखी ग्रामीण बोली बोलतो, याला विनोद मानलं जातं. कारण, भोजपुरी बोलणारे या प्रगत ज्ञानाशी जोडलेले नाहीत, ते चारा घोटाळाच फक्त करत असतील, किंवा गुंडगिरी करत असतील, अशा प्रतिमा असतात, त्यांना त्या प्रदेशातल्या समस्यांचा आधार नसतोच असं नाही, पण प्रतिमा बटबटीतपणे आपल्या मनावर थोपवल्या जातात, मग विनोद होतो. तसं कदाचित 'मेड इन इंडिया' कादंबरीबाबत काहींचं होऊ शकेल. पण त्यातला विनोद असा नाही. त्यातल्या निवेदकाची स्वाभाविक-नैसर्गिक अभिव्यक्ती वऱ्हाडी, हिंदी, दख्खनी, इत्यादी विविध भाषांनी होणारी आहे. त्यात स्वाभाविकपणे टी. एच. हक्सले या इंग्रजी माणसाचं अवतरण नेहमीच्या बोलीतून येतं. दुर्दैवाने, आपल्याकडे विविध माध्यमांमधे, मंचांवर, आणि आता समाजमाध्यमांवर खुद्द त्या-त्या बोलीतले लोकही थोडसा ग्रामीण ढंग दिला की विनोद निर्माण होतो, या पूर्वग्रहाचा वापर करून मजकूर लिहिताना दिसतात. ढोबळ अर्थाने, ग्रामीण ढंगात लिहिणं, हाच विनोद असल्यासारखं ते होतं. काय लिहिलं, यावर ते ठरत नाही. पण 'मेड इन इंडिया'त तसं नाही. त्यातली वैविध्यपूर्ण भाषा आणि बोली विनोदही करताता आणि गंभीर जाणिवाही पेलून धरतात. आणखी एक उदाहरण: "डॉन क्विक्झोटची लक्तरं लपवून सॅन्को पांझासारखी खुशालीची गाजरं खाता खाता खत होने हा याईचा मोक्ष होय भाऊ पंज्याब!" (पान १३२-१३३). बैलगाडीसंदर्भात वर उदाहरण दिलं तितकं स्थानिकही याच भाषेत बोललं जातं आणि या वरच्या सिन कॉनरी किंवा टी. एच. हक्सले किंवा डॉन किहोते यासारखे खूप दूरच्या अंतरावरचे तपशीलही याच भाषेत जगण्याशी जोडून घेतले जातात. हे या कादंबरीचं बहुधा विलक्षण भाषिक काम आहे.

या कादंबरीतल्या भाषेचा अभ्यास तज्ज्ञांनी करायला हवा, हे खरंच आहे. आपण तज्ज्ञ नसल्यामुळे नुसती नोंद करतो आहोत. वरती स्थानिक जाणीव आणि दूर अंतरावरची जाणीव याचं उदाहरण दिलं. आता आणखी एक उदाहरण थोडंसं देऊ. कादंबरीचं मध्यवर्ती पात्र असलेला पंजाब रेडिओ ऐकतोय. यात त्याची आधीची नेहमीच्या बोलीतली अभिव्यक्ती आणि अचानक रेडिओवरून त्याला ऐकू आलेल्या तथाकथित प्रमाण मराठीतली अभिव्यक्ती- या दोन्ही अगदी सहजपणे मिसळतात:
...लावल्यावर स्टेशन लागलं. ट्रांजिस्टर मुंगाच्या पोत्यावर ठेवून पाय लंबे केले. अन् आयकू लागलो... सायाचं मंधातूनच लागलं वाटते!... कथा आहे की कविता लेक?... जे असनं ते असनं... आपल्याले आईकाले त मनाई नाही ना?...
...काळ जोवर डोळेझाक करतोय् तोवर जडवून घेऊ एकदुसऱ्याला भरभरून निखळपणे. आपण गृहीत धरलाय् तेव्हढा तो निष्ठुर नाहीय्. कारण त्याला ठाऊक आहे माझ्या आयुष्याची वाटणी- तुझ्याही. त्याला माहीत आहे माझे सढळ नाकर्तेपण अन तुझा अढळ विश्वास माझ्यावरचा... 
आपण एकमेकास न दिसू एवढं अपार अंतर अथवा दिसूनही न दिसायला लावणारी माणसांची अदृश्य भिंत. यालाच वाटणी म्हणायची का? आणि हे खरं आहे असं गृहीत धरलं तर हे किती खोटं? आतही तू कित्येक कोसांवरून अलगत येऊन माझ्यात विसावतेस नि तळहातावर जमू लागतात दवबिंदू, पापण्यांत ओल... त्याचं काय? (पान ६२)
असा हा, रेडिओवर वाचला गेलेला दीर्घकवितेसारखा मजकूर तीन पानं येतो. दैनंदिन नाद असलेली बोली, त्यातून मधेच काव्यात्म नाद असलेला मजकूर, अशी अफरातफर या कादंबरीत अगदी सहजपणे आहे. थोडी पुस्तकात येईल अशी काव्यात्म जाणीवही या कादंबरीसाठी अस्पृश्य नाही. पण थोडी पुस्तकात येईल अशी काव्यात्म जाणीव असतानाही सर्वसामान्य जगण्यातली बोलीही दुरावलेली नाही.

४. 'नायक'

भालचंद्र नेमाडे यांची चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली मुलाखत 'टीकास्वयंवर' (साकेत प्रकाशन, दुसरी आवृत्ती- २००१) या पुस्तकात आहे, त्यात ३४९-३५० पानावर पुढचं प्रश्नोत्तर येतं:
प्र: बिढारच्या पहिल्या भागात तुम्ही केलेला मराठी लघुनियतकालिकांच्या चळवळीचा ऊहापोह सहानुभूतिशून्य वाटतो. मला व्यक्तिशः हे अन्यायकारक वाटतं. तुम्हाला?
नेमाडे: मी लिहिताना माझा प्रोटॅगनिस्ट सोडल्यास कशाचाही सहानुभूतिपूर्वक विचार करत नाही. एकदा तुम्ही तुमच्या प्रोटॅगनिस्टला कादंबरीतील अवकाशाचा संदर्भ किंवा चौकट मानली की सगळे व्यवहार अतिशय तटस्थपणे पाहणं फारच आवश्यक असतं. लघुनियतकालिकांचं कार्य असामान्य आहे ह्या मताचा मी आहे, पण ह्या चळवळीच्या सगळ्या बाजू मांडतांना असं अन्यायकारक चित्र उभं राहिलं तर नाइलाज आहे. एवढंच की मी सांगितलेलं खोटं नाही.
'मेड इन इंडिया'च्या नायकाची तुलना काहींनी 'कोसला'शी केल्याचं आपण नोंदीत सुरुवातीला नमूद केलंय. पण हा पंजाब गरसोळीकर पाटील पांडुरंग सांगवीकरासारखा नाही, किंवा त्याहून महत्त्वाचं म्हणजे 'मेड इन इंडिया'मधे नायक / प्रोटॅगनिस्ट / मध्यवर्ती पात्र म्हणून पंजाब आला असला, तरी फक्त त्याच्या चौकटीचाच सहानुभूतिपूर्वक विचार या कादंबरीत नाही. म्हणूनच तीन-तीन पानं रेडियोवरची दीर्घकविताही त्यात येते- ही दीर्घकविता त्या नायकाची नसते, तिसऱ्याच कोणातरी अज्ञात व्यक्तीची रेडिओवर लागलेली- त्या तिसऱ्याच व्यक्तीच्या भाषेतली कविता, पण तिलाही इथे बराच मोठा वाव दिला जातो. असं नेमाड्यांच्या कादंबरीत होत नाही. ही मूलतः त्रुटीच आहे, असा दावा नाही. तर, नेमाड्यांची मतं ही त्यांच्या कादंबऱ्यांपुरती ठीक आहेत. पण इतरांनी मध्यवर्ती पात्राचा वापर तसा केला नसतानाही केवळ अविवाहित तरुण दिसला की त्याला 'कोसल्या'तच ढकलणं गैर वाटतं (पंजाबचं नंतर लग्न होतं, आणि तशाही काही गोष्टींचा ताण कादंबरीत आलेला आहे). शिवाय, नेमाड्यांचे सरधोपट शेरेही समीक्षेचे निकष मानले जाण्याइतकी परिस्थिती दिसते. तेही कंटाळवाणं आहे, त्यात आता नको जाऊया. मुद्दा एवढाच की, पंजाबची जाणीव, अभिव्यक्ती, समज, हे सगळंच वेगळं आहे. नेमाड्यांचा विद्यापीठीय अर्थाने बुद्धिमान, आक्रमक, नैतिक नायक इथे तसा सापडत नाही. नेमाड्यांचाही भाषेचा वापर सुंदर असतो, पण तो मुख्यत्वे विद्यापीठीय अर्थाने बुद्धिमान नायकाने किंवा निवेदकाने केलेला असतो. फक्त त्याचाच विचार सहानुभूतिपूर्वक केल्यामुळे तसं होतं का, हे वेगळं तपासावं लागेल. आणि ती त्यांची शैली म्हणून ठीकही आहे. त्यावर अनेक जण बोलत आलेले आहेत, बोलतील. पण 'मेड इन इंडिया'चा मुळातला पटच वेगळा आहे. त्यात अशा विद्यापीठीय बुद्धिमान व्यक्तीचा दृष्टिकोन स्वीकारलेला नाही. विविध कारणांनी गाव स्वीकारलेल्या एका व्यक्तीचा तो दृष्टिकोन आहे (या व्यक्तीने भौतिक अर्थाने गाव स्वीकारलेलं आहे, जाणिवेच्या स्तरावर तेवढीच भौतिक मर्यादा तिने ठेवलेली नाही). पंजाब गरसोळीकर-पाटलावरचा व्यावहारिक ताणही अधिक मोठा आहे, त्याला आसपासच्या पोकळपणाबद्दल भडकपणे, बहिर्मुखतेने फारसं बोलण्यात रस दिसत नाही किंवा त्याला तसं येत नाही, किंवा तो त्यापलीकडेच उभा आहे, त्याचं असं बोलणं मनातल्या मनात होतं. इतर पात्रांचं त्याच्याशी होणारं बोलणंही अनेकदा त्याच्या बोलण्यापेक्षा ठळकपणे येतं. या पंजाबला सोपा बुद्धिजीवीपणाही जवळचा वाटणार नाही, हे स्वाभाविक आहे.

कथा-कादंबरी-कविता लिहिण्याच्या कितीतरी तऱ्हा असू शकतात, त्यातली एक तऱ्हाच ठळक किंवा प्रभुत्वशाली मानणं घातक वाटतं. नेमाडे या लेखक-व्यक्तीचं मूल्यमापन वेगळं करावं, पण त्यांच्या मतांच्या मर्यादाही पाहायच्या नाहीत, हे बरं वाटत नाही. तरीही कोणाला 'कोसला' किंवा नेमाड्यांच्या कादंबरीत आणि 'मेड इन इंडिया'त साधर्म्य वाटत असेल, तर त्यांनी नोंदवणं रास्त राहील. पण आपल्याला तशी तुलना इथे वाजवी वाटत नाही, त्यामुळे ती करण्यात मतलब नाही. आपण फक्त पंजाबबद्दल थोडं बोलू.

अकोल्यातल्या गरसोळी गावात एका सरंजामी कुटुंबात जन्मलेला हा पंजाब आहे. त्याला आता वडिलांच्या दबावामुळे सरपंच व्हावं लागणार आहे, तसा तो होतोही. जग-भारत-महाराष्ट्र राज्य-आपलं गाव- या सगळ्या व्यवहारातले अंतर्विरोध त्याला कळतात, तरीही त्याला त्या सगळ्याला सामोरं जाणं भाग पडतं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी साताठ वर्षं तो शहरात होता, पण जाणीवपूर्वक तो गाव स्वीकारतो, त्याची अशी कारणंही तो नोंदवतो. ती ढोबळ कारणं नाहीत.  त्यातली गुंतागुंत तो जाणतो. म्हणून एका ठिकाणी तो असंही म्हणतो:
मी कॉलेजात असतानाही हप्त्यातून दोनतीन चकरा गावाले होतंच. म्हणजे मी ना धळ अर्बन ना धळ रूरल असा घळलो. मले काही गोष्टी गावातल्या आवळत त काही शहरातल्या प्यार होत्या. संपुर्न शहर किंवा संपुर्न गांव मले कधीच आवळलं नाही. (पान ६७)
पण तरी शहरापेक्षा गावाची निवड केल्याबद्दल, थोडंफार तसं करायला भाग पडलं याबद्दल त्याचं काहीतरी म्हणणंही आहे:
[...] याले काही अर्थ नाही. हे शहर काही लाठी नाही आपल्याले. भेटलीही नोकरी त आपन या बगिच्यात फारहीफार काढू चारदोन सालं. पन मरू काही नाही अथी. रात्री येकाच ताटात जेवून दुसऱ्यादिवशी अजनबी होनारा हा माहोल काही आपल्याला कलम होनार नाही. हे असं भारतीय समाच्यार चित्रासारखं जगनं आपल्याले ना जमे. [...] (पान ४७)
विठ्ठल वाघ यांनी 'मेड इन इंडिया'बद्दल दिलेली प्रतिक्रिया इथे नोंदवावीशी वाटते (या प्रतिक्रिया पुस्तकातच शेवटी दिलेल्या आहेत):
भाषेला एक परंपरा असते. त्या परंपरेतच लोकव्यवहार, संभाषण, लेखन होत असते. या प्रवाहाला वळण देणे कठीण असते. ज्ञानेश्वर-तुकारामाची ताकद त्यासाठी लागते. तेव्हा कुठे जुनीपुराणी कात टाकून भाषा नव्याने उजळते. ती मनाला झपाटून टाकते. असं वेड लीळाचरित्र अन एकूणच महानुभावीय लेखनानं लावल्याचं मी अनुभवतो. त्यानंतर अशी किमया फक्त पुरुषोत्तम बोरकरांच्या लेखणीनं केलेली दिसली. 
वऱ्हाडीला एक नवा बाज, नवा साज त्यांनी दिला. भाषेत लेखक अडकतात. भाषेभोवती घुमतात. बोरकरांनी वऱ्हाडी भाषा घुमवली, वाकवली, झुकवली, वळवली. हिंदी, उर्दू, इंग्रजी शब्दांची वऱ्हाडीशी सांगड घालून नवाच चेहरामोहरा तिला बहाल केला.
लेखनात शैलीएवढंच महत्त्व आशयाला असते. काय अन कसे हे दोन्ही भाग लेखनाच्या दृष्टीने मोलाचे! इतर ग्रामीण लेखकांप्रमाणे बोरकर 'पूर्व दिव्या'त गटांगळ्या खात नाहीत. ते आजच्या कालप्रवाहात स्वतःला कोलंबसाच्या निधडेपणाने झोकून देतात. स्वातंत्र्योत्तर काळात लागलेली, समाजजीवन पोखरून काढणारी कीड- तिचा सर्वदूर होणारा प्रादुर्भाव- हे विनोदानं, उपहास-उपरोधानं खमंगपणे हाताळण्याचं अफाट कौशल्य 'मेड इन इंडिया'त आहे. इंडियातल्या ग्रामीण भागातील घराघरात पोचली पाहिजे अशी ही आधुनिक 'ग्रामगाथा'च आहे!
यातला अतिशयोक्तीचा भाग सोडून देऊ, कोलंबसाचं उदाहरणही सोडून देऊ, पण मूळ मुद्दा खराच आहे. बोरकरांनी रूढ वऱ्हाडी भाषेत विलक्षण आशय उभा केला आणि त्यांचं लेखन 'पूर्वदिव्यात गटांगळ्या न खाता आजच्या कालप्रवाहाला सामोरं जाणारं आहे'.

५. आज-काल-उद्याचा प्रवाह

भारताची आर्थिक धोरणं बदलत होती त्या सांध्यावर ही कादंबरी प्रकाशित झाली. पक्षीय राजकारणांमधले बदलही अधिक वेगाने होत होते. जातीय समीकरणं बदलत होती. टीव्ही-व्हिडिओ इत्यादींचा वावर वाढू लागला होता. बाहेरच्या जगात, चारेक वर्षांनी बर्लिनची भिंत पडली, शीतयुद्ध संपलं, इत्यादी बऱ्याच गोष्टी. याचे संकेतही कादंबरीत आहेत. काही गोष्टी कादंबरी लिहितानाच्या आणि काही प्रकाशित झाल्यानंतर लगोलग घडलेल्या पण आधीपासून जाणवत होत्या अशा. तर या गोष्टी कादंबरी लिहिली गेली/ पहिल्यांदा प्रकाशित झाली त्या काळात 'आज'च्या होत्या, पण आज 'काल'च्या झाल्या आहेत, (तरी त्यांचे प्रभाव राहतात). त्यामुळे अशा कादंबरीच्या नंतरच्या आवृत्तीमध्ये काही तपशिलांचे संदर्भ देण्यासाठी तळटिपाही टाकाव्या लागतील. इथे नोंदवले तेवढेच तपशील नव्हेत, पण इतरही अनेक वाक्यांमधे आलेले संदर्भ हळूहळू अंधुक झालेले आहेत, ते आणखी अंधुक होतील. पण ही कादंबरी म्हणजे फक्त त्या काळातले तपशील नव्हे. त्यात कालप्रवाह आहे. या प्रवाहीपणामुळे ती फक्त कालच्या काळाची राहणार नाही, असं वाटतं.

उदाहरणार्थ, शेतकऱ्यांची आजची परिस्थिती या १९८७ सालच्या कादंबरीत सूचित झालेली आहे (शिवाय, त्यात फक्त शेतकरी पुरुष नाही, बाईचीही दखल आहे). खालच्या ओळी पाहा:
शेती म्हन्जे चोवीसतास पॅड बांधून रेडीच पाह्यजे मानूस. पान्याचा ठोक आला अर्ध्याराती त उठा, आंगनातले ढोरं गोठ्यात बांधा... मुंगावर ताळपत्री टाका. वारंवायदन आलं भरदुपारी अच्यानक त वाऊ घालेल मिर्च्या काढा टिनावरून... हे झाका ते झाका.
धन्याच्या नावानं कुकू लावून आल्या येकडावच्या घरात की ह्या म्हन्जे त्याईच्या मरेपर्यंत कुक! (पान १३३)
म्हटलं तर पाटीलकी आहे, पण घराण्याची जुनी गढी खलास झालेली, स्वतःला या सरंजामी डोलाऱ्याचा फोलपणा कळलेला, पण कुणबी असणं तर सुटलेलं नाही- अशा पेचात पंजाब अडकलेला आहे. त्याचे वडीलही विविध कारणांमुळे आत्महत्या करतात. पंजाबलाही शेतीत रुजता येत नाही.

गेला काही काळ महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघाले, आत्ताही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बरंच बोलणं सुरू असतं. आरक्षणाने समस्या सुटेल का, हा भाग वेगळा. पण त्यातला एक युक्तिवाद असा आहे की, काही मोजक्या मराठा घराण्यांचं भलं झालं, पण सर्वसामान्य मराठा शेतकरी इत्यादी समुदाय खचत गेला. [काही कारणामुळे या खटल्याशी संबंधित सुरुवातीची कागदपत्रं ही नोंद लिहिणाऱ्याला पाहायला मिळाली, त्यावरून हा एका त्या युक्तिवादाचा आधार नोंदवला आहे. इतरही मुद्दे अर्थातच त्यात होते]. पण मोर्चे निघाले, तेव्हा त्याचंही एकंदर दृश्यरूप या कुणबीपणाच्या समस्येला अधोरेखित करण्यापेक्षा दुर्दैवाने सरंजामी चिन्हांना अधोरेखित करणारं होतं, काही समर्थकांची भाषाही त्या दिशेने जाणारी होती. खरी भयानक समस्या निव्वळ आरक्षणाने सुटेल का, याची कल्पना नाही. याचं भविष्यही माहीत नाही. पण 'मेड इन इंडिया'मधे या घडामोडींची पार्श्वभूमी खूप आधीच उलगडलेली आहे. तरीही, पंजाबची अभिव्यक्ती सरंजामी नाही, उलट अशा डोलाऱ्याचा त्याला उबग येतो, त्यावेळी त्याचा उपरोधही दिसतो, पण त्या सरंजामी रचनेला दूर ठेवलं तरी कुणबीपणाच्या समस्येचं काय करायचं? हा प्रश्न त्याच्यापुढे उरतोच.

'मेड इन इंडिया'तलं कुणबीपण आणखीही एका अर्थी विशेष आहे. 'बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतर दंभेची असतो मेलो', ही तुकारामाची ओळ आहे (बहुधा मूळ ओळीत किंचितसा फरक असेल), ती इथे जुळते. 'मेड इन इंडिया'त कुणबीपणाची आर्थिक वाताहात कशी होत गेली याचे संकेत आहेत, पण सांस्कृतिक-भाषिक इत्यादी पातळ्यांवर आपलं असणं बरंच आहे, असा मोकळेपणा त्यात आहे. म्हणजे अभिजनांचं अभिजनपण त्यांच्यातल्या दंभामुळे अपुरंच असतं, आपण तसे अपुरे नाहीत, त्यामुळे आपली जाणीव बरीच मग- असा तो भाव दिसतो. कादंबरीतला एक प्रसंग नोंदवण्यासारखा आहे:
येकेकाळी कॉलेज्यात माह्यासंग शिकत असनारा अन आता यम्यशीबीत नोकरीले लागेल वसंत उमाळे नावाचा दोस्त भेटीसाठी आला. मटनाचा पाहुन्चार केला. त मसालेदार सुगंधी ज्येवताखेपी तो म्हने, हैट लेकहो. आपण यानंच त सुधरलो नाही. त्याईच्या बुद्धिमत्तेचं रहस्य केवळ येकाच वस्तूत येकवटलेलं आहे. अन ते वस्तू म्हन्जे कढी ऊर्फ आमटी! कढीत ज्येवढे व्हिटॅमिन असतात, तेवढा नसतात इंडियातल्या कोन्त्याच खाद्यपदार्थात! (पान १३२)
हे त्या मित्राला वाटतं, इतकंच. पण पंजाबची दृष्टी तशी नाही. कढी खाणारे (ब्राह्मण) बुद्धिमान, असा काही गंड त्याला नाही. म्हणूनच आधी म्हटल्याप्रमाणे तो बऱ्याच गोष्टी रिचवू शकतो. किंबहुना, कादंबरीही पंजाबला जागा देते, त्याच्यासारखं मत नसलेल्याही अनेकांना जागा देते, वऱ्हाडी बोलीला जागा देते, हिंदीला, इंग्रजीला, इतकंच नव्हे तर (विशिष्ट प्रदेशातल्या ब्राह्मणांच्या बोलीचं वर्चस्व असलेल्या) प्रमाण मराठीलाही जागा देते, पण आपल्या नेहमीच्या अभिव्यक्तीला कमी लेखत नाही, त्यातले तपशिलांचे बारकावे 'जागतिक' नसतील (म्हणजे सध्याच्या अर्थानुसार एकसाची, सगळीकडच्या ग्राहकांना पटापट स्वीकारता येतील असे नसतील), तरीही फिकीर करत नाही. जाणिवेच्या पातळीवर मात्र प्रादेशिक आणि जागतिक (जगातलं इतर विविध ठिकाणचं, अशा अर्थी) असं सगळं ठीकठाक मानते.

तर, असे या कादंबरीतले प्रवाह फक्त कालपुरते किंवा आजपुरते नाहीत, ते उद्याही असतील, असं वाटतं. त्यात पंजाबची व्यक्ती म्हणून होणारी तगमग आहे, गाव-शहर यांच्यातल्या गुंत्यामधलं त्याचं गुंतणं आहे, तरीही परिसराशी जोडून घेण्याची ओढ आहे, आपल्या वातावरणातल्या तपशिलांबद्दल तुच्छता नाही, इत्यादी. इतरही अनेक गोष्टी कादंबरीत आहेत. 'आपुले मरण पाहिले म्यां डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य' ही तुकारामाची ओळही कादंबरीच्या शेवटच्या चारेक पानांशी जवळीक सांगणारी आहे. पण आपण इथे तुकाराम हाच एक मापदंड घेऊन हे नोंदवलेलं नाही, संवेदनेमधली जवळीक नोंदवली. पण तुकारामाचं पद्य होतं, इथे कादंबरीतलं गद्य आहे, तरी ते पद्यही होत जातं. 'मेड इन इंडिया' कादंबरी म्हणून तिच्या काळाला प्रतिसाद देत व्यापक संवेदनांबद्दलही बोलते. कादंबरीच्या शेवटी पंजाब स्वतःच्या भविष्यातल्या मरणाची कल्पना नोंदवतो:
समजा येखांद्यानं न्युट्रानबॉम्ब इस्तेमाल करून अन सोताचा पेशल बच्याव करून या अख्ख्या दुनियेतली अख्खी संपदा काबीज केली. अन त्ये खर्च करून सुवर्नाक्षरात येकच पाटी लिहिली की परवानगीशिवाय आत येऊ नये. त यम काय येनार नाही म्हन्ता? तो यिनच. पाटी या दारावर असन् त तो त्या दारातून यिन. पन यिनच. त्याले कोनीच चकोन्या दाखू शकत नाही. कितीही आकोमाको मले सकाय दाखो म्हटलं तरी तो यिनच. आखीन लेट येनार नाही, राईट टाईम यिन. तथी कोनाचा मुलाहिजा नसे. माह्याही नाहीच. आखीन खुदाच्या लाठीचा आवाजही होत नाही, हेबी विशेष.
या लाठीचा तळाखा मलेही बसन. फटालकन. अन मी चुपच्याप मरून पळीन कुठीतरी. (पान १४८)
इथून पुढे स्वतःच्या मरणाचं अडीच-तीन पानं विस्तृत वर्णन आहे. ते मेल्यानंतरच्या कार्यक्रमांपासून शेवटी सृष्टीत मिसळण्यापर्यंत बरंच काही नोंदवणारं आहे. म्हटलं तर ते शोकात्म आहे, म्हटलं तर त्याचा शेवटी सोहळा होतो. त्यात पंजाबचं कुणबी असणं आहे, पण त्यापलीकडचं व्यक्ती असणंही आहे, त्याचसोबत व्यक्तीचं आजूबाजूच्या वास्तवाशी जोडलेलं असणंही आहे, परिसराशी जोडलेलं असणंही आहे. त्यात तत्कालीन तपशील स्वाभाविकपणे आलेले असले, तरी तेवढ्यापुरतीच ती कादंबरी उरत नाही. विविध रचनांना सामोरं जाताना व्यक्तीचं/व्यक्तींचं काय होतं, त्याचा लेखाजोखा किंवा कादंबरीतच आलेले शब्द वापरायचे तर 'काया वाच्या मनाचा अस्सल टाहो' इथे सापडतो. तो आजही सापडावा आणि उद्याही सापडावा असा आहे. म्हणून पुस्तकाच्या कव्हरवरचं चित्र बदललं तर बरं, कदाचित हळूहळू काही वाक्यांना तळटिपाही टाकाव्या लागल्या तरी ठीक, पण ही कादंबरी आणखी उजेडात यावी / राहावी, एवढ्यापुरती नोंद करायचा प्रयत्न.

पुरुषोत्तम बोरकर
(फोटो: परवानगीने इथून. मूळ सौजन्य: बोरकर कुटुंबीय)
०००

कदाचित खालच्याही नोंदी या जोडीने पाहता येतील: