Thursday, 25 March 2021

विलास वाघ- अच्छा!

विलास वाघ (१९३९-२०२१)
[फोटो: 'प्रा. विलास वाघ : प्रबोधनपर्व' या धनंजय भावलेकर दिग्दर्शित माहितीपटातून. निर्मिती: विलास वाघ अमृत महोत्सव गौरव समिती]

विलास वाघ आज सकाळी गेले. कोरोनामुळे ते काही दिवस आजारी होते, असं कळतं. 'सुगावा' प्रकाशनाच्या माध्यमातून आणि इतर विविध मार्गांनी त्यांनी केलेल्या विस्तृत कामाबद्दल कुठे ना कुठे छापून येईल, किंवा समाजमाध्यमांवरही काही ना काही बोललं जाईल. वैयक्तिक भावना व्यक्त करणं बऱ्याच वेळा शक्य असतं, पण ते पुरेसं वाटत नाही. ही नोंद लिहिणाऱ्याचा त्यांच्याशी पहिला प्रत्यक्ष संबंध व्यावसायिक भाषांतरकार म्हणून आला. त्यांच्याइतकं व्यावसायिकतेने, मायाळूपणाने आणि सहभावाने वागणारा माणूस मराठी प्रकाशनव्यवहारात किमान ही नोंद लिहिणाऱ्याला तरी भेटलेला नाही. हे केवळ औपचारिकतेने लिहिलेलं नाही आणि खुद्द वाघांचं हे वागणं सार्वजनिक मुखवट्यासारखं नव्हतं. आपण एखाद्या विशिष्ट विचारसरणीचे आहोत, किंवा कोणत्याही चळवळीशी जोडलेले आहोत, किंवा आपण सांस्कृतिकदृष्ट्या अभिजन किंवा बहुजन आहोत- इत्यादी गोष्टी म्हणजे काही खास प्रमाणपत्रं नसतात. पण कोणी स्वतःच्या पेशाला, कोणी स्वतःच्या पैशाला किंवा कोणी स्वतःच्या अभिरूचीला किंवा वाचन-लेखनाला, आणखीही कोणकोणत्या गोष्टींना असंच प्रमाणपत्रासारखं वापरत वागत असतात. काहीएका विशिष्ट संदर्भांमध्ये, सामाजिक व्यवहारांसंबंधीची काही धारणा अथवा भूमिका असणं, हा वेगळा भाग. व्यक्ती म्हणून वागताना आपण या सगळ्यासह असलो तरी त्यापलीकडेही काहीतरी उरतच असतं, किंबहुना बरंच काही उरत असतं. वाघांच्या बाबतीत जाणवलेलं हे 'बरंच काही' विलक्षण जमिनीवरचं होतं. एकास-एक संभाषण असू दे किंवा चार लोकांसमोरचं बोलणं असू दे, ते अत्यंत मायेने बोलायचे आणि फक्त बोलायचेच नाहीत तर इतर काही औपचारिक-अनौपचारिक व्यवहारही मायेने करायचे, असा अनुभव वारंवार आला. त्यांना सहज फसवता येईल, इतकी ती माया कधीकधी असायची. पण काही वेळा असंही दिसलं की, एखादी व्यक्ती त्यांना फसवू पाहतेय, तरीही त्यांनी बरोबर त्या व्यक्तीला एका क्षणात ताळ्यावर आणलं. म्हणजे त्या व्यक्तीचं अवाजवी आरोपाचं बोलणं ऐकून न घेता त्याला जमिनीवर आणून ठेवलं, पण त्या व्यक्तीशीही नंतर ते आर्थिक बाबतीत सामोपचारानेच वागल्याचं दिसलं. म्हणजे असंही त्यांना जमत असावं. मराठीत अनेकदा आर्थिक व्यवहारांबाबत भलीभली मंडळी विनाकारण रडगाणी गातात, मोकळेपणाने बोलत नाहीत, स्वतःसकट सर्वांची अप्रतिष्ठा झालेलीही त्यांना चालते, वरकरणी तोंडी वाफा टिकवायच्या फक्त. यातलं काही वाघांच्या वागण्याबोलण्यात कधीही पाहायला मिळालं नाही. छापून आलेलं पुस्तक ही एक क्रयवस्तू (कमॉडिटी) असते, पण अशा वस्तूंचा आशय केवळ बाजारपेठेच्या मूल्यांवर ठरवून चालत नाही- या दोन्ही गोष्टींचा समतोल त्यांच्या व्यवहारात जाणवला. त्यामुळे खोटी आशा किंवा खोटी निराशा असलं काही त्यांच्याशी बोलताना जाणवायचं नाही. काम आहे, ते करावं, जमला तर आनंद घ्यावा, चहा प्यावा. असा प्रत्येक वेळी चहा पिऊन दुसऱ्याचा प्लास्टिकचा कप ते स्वतः सहजपणे उचलून कचऱ्याच्या टोपलीत टाकायचे. अशा या मायाळू माणसाला आदरांजली म्हणून ही छोटीशी नोंद. वैयक्तिक भावना व्यक्त करणं पुरेसं वाटत नाही, असं म्हणूनही थोड्या भावना व्यक्त झाल्याच. तितकं होतंच. पण या नोंदीत आता खाली दिलेला अनुभव मात्र विलास वाघ या व्यक्तीविषयीचं एक सुटं संवेदनशील तथ्य म्हणून वाचता येईल, असं वाटतं. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'ॲनाहिलेशन ऑफ कास्ट' या संहितेची एस. आनंद यांनी संपादित केलेली व त्यांनीच टिपा जोडलेली आवृत्ती दिल्लीतल्या ‘नवयान पब्लिशिंग’ने मार्च २०१४मध्ये प्रकाशित केली. या ग्रंथासाठी सुमारे दोनशे छापील पानांची प्रस्तावना ‘द डॉक्टर अँड द सेन्ट’ या शीर्षकाखाली अरुंधती रॉय यांनी लिहिली. या संपूर्ण प्रस्तावनेचं मराठी भाषांतर 'सुगावा प्रकाशना'नं 'वंश, जात व जातिव्यवस्थेचं उच्चाटन' या शीर्षकाखाली (उपशीर्षक: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर व मोहनदास करमचंद गांधी यांच्यातील वाद) स्वतंत्र पुस्तक म्हणून २०१६ साली प्रकाशित केलं. रॉय यांच्या या पुस्तकाचं इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्याचं काम वाघ यांनी आपल्याकडे दिलं होतं. त्यानुसार त्यांना काम करून दिलं. पण रॉय यांची मांडणी, शैली, त्यांच्या इंग्रजी पुस्तकासंदर्भात केलेली गेलेली विधानं, इत्यादी गोष्टी भाषांतरकार म्हणून आणि वाचक म्हणून खटकत राहिल्या. या विशिष्ट मजकुराबाबत रॉय यांच्यावर इंग्रजीतून काही वैयक्तिक हेत्वारोप झालेले होते, आणि काही समंजस टीकाही झालेली होती. त्या व्यतिरिक्तही मराठी वाचक म्हणून काही आक्षेप मनात येत राहिले. वैयक्तिक पातळीवर टीका न करताही बरेच मुद्दे उरत होते. त्यांचं एक टिपण भाषांतराच्या कामाला समांतरपणे केलं होतं. रॉय यांना आणि वाघ यांनाही याबद्दल संक्षिप्तपणे कळवलं. तर, वाघ स्वतःहून म्हणाले की, याची आपण वेगळी पुस्तिका छापू. 

रॉय यांच्या पुस्तकाची निवड 'सुगावा'ने स्वतःहून भाषांतरासाठी केली होती. रॉय यांच्याशी प्रत्यक्ष भेटीत त्यांचं बोलणंही झालं होतं, नंतर ई-मेलवरही व्यवस्थित बोलणं होऊन, रॉय यांनी आनंदाने 'सुगावा'ला भाषांतराची परवानगी दिली. यात एखाद्या व्यावसायिक भाषांतरकाराच्या आक्षेपाला फारसं काही स्थान आहे, असं कोणी सर्वसाधारणतः मानणार नाही. कोणी अभ्यासक असेल, किंवा इतर कोणी विशिष्ट विषयात काहीएक स्थान लाभलेली व्यक्ती असेल, तर तिचं ऐकून घेणं, ही वेगळी गोष्ट आहे. पण फक्त भाषांतरापुरती एखाद्याची व्यावसायिक सेवा घेतली असताना, त्याच्या अशा बोलण्याला काहीएक वाव देणं, सहजी होत नाही. इथे हे व्यावसायिक काम असा उल्लेख जास्त ठळकपणे केला असला, तरी वाघ यांच्यासोबतचं बोलणं तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलं नव्हतंच. तर त्या एकंदर सगळ्या प्रवासात वाघ सरांनी भाषांतरकाराच्या म्हणण्यालाही जागा करून दिली. रॉय जगद्विख्यात असल्या तरी त्याचा दाब आपल्यावर येण्याचं खरं म्हणजे काही कारण नसतं. पण वास्तवात आजूबाजूला हा दाब घेऊन व्यवहार होताना दिसतो. पण वाघ यांनी ते रूढ व्यवहारासारखं न करता व्यावसायिक भाषांतरकाराच्या टिपणालाही तेवढीच वैधता दिली. कोणतीही अप्रतिष्ठा नाही, किंवा आपण खूप काही प्रोत्साहनपर करतोय असा आव नाही. एखाद्या व्यक्तीचं काहीएक म्हणणं आहे, ते पुरेशा तपशिलात मांडलेलं असेल तर ते ऐकावं, इतकं सहज नि स्वाभाविक. मग त्यांनी मूळ पुस्तकाच्या दरम्यानच ती पुस्तिकाही छापली. त्यात काही बदल करावा, अशीही त्यांची अपेक्षा नव्हती. म्हणजे प्रकाशक म्हणून पुढाकार घेऊन आपण एक पुस्तक काढतोय आणि त्याच पुस्तकातल्या त्रुटी दाखवायचा प्रयत्न करणारी, त्या पुस्तकात नवीन काही नसल्याचं म्हणणं मांडू पाहणारी पुस्तिकाही त्याच वेळी प्रकाशित करतोय, अशी ही घटना होती.

एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून खुद्द त्या पुस्तकाची चिकित्सा, समीक्षा, टीका झाल्याची उदाहरणं मराठीत आहेत. भाषांतरांबाबत बोलायचं तर गणेश देवी यांच्या 'आफ्टर ॲम्नेसिया' या पुस्तकातल्या मांडणीविषयी मूलभूत मतभेद असतानाही म. सु. पाटील यांनी त्या पुस्तकाचं मराठी भाषांतर केलेलं आहे ('स्मृतिभ्रंशानंतर', पद्मगंधा प्रकाशन, २००८). पाटील यांनी त्यांचे मतभेद सविस्तरपणे प्रस्तावनेत मांडले, आणि काही ठिकाणी भाषांतरकाराच्या टिपांमधूनही देवींच्या चुका नोंदवल्या. पण म. सु. पाटील भाषांतराचा व्यवसाय करत नव्हते, या भाषांतरामागची त्यांची भूमिका वेगळी होती. त्यांना देवी यांची 'देशीवादी मांडणी' पटत नसली तरी मराठी साहित्यात या मांडणीचा बोलबाला आहे, त्यामुळे अशा मांडणीचं समर्थन करणारं एक मुख्य पुस्तक मराठीत आणायचं, आणि तसं आणत असताना त्यातल्या मर्यादा दाखवायच्या, अशा स्पष्ट हेतूने पाटील यांनी हे भाषांतर केलं. या मतभिन्नतेची कल्पना त्यांनी देवी यांना आधी दिली होती. पाटील यांनी नमूद केलेल्या मुद्द्यांवर देवी यांचा प्रतिवाद सदर मराठी पुस्तकात नाही, इतरही कुठे त्यांनी तो केलेला दिसला नाही. हे सगळं स्वाभाविकच झालं. पण अशी काही मतभिन्नतेला वाव देणारी उदाहरणं मराठीत आहेत. पण 'स्मृतिभ्रंशानंतर' या पुस्तकाच्या मलपृष्ठावर शेवटी अशी ओळ आहे- 'मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांनी ह्या पुस्तकाचा अनुवाद करतानाच प्रदीर्घ प्रस्तावनेच्या साहाय्याने काही वाङ्मयीन चर्चा केली आहे.' मतभिन्नतेला पुस्तकात प्रशंसनीय वाव मिळाला असला, तरी क्रयवस्तू म्हणून पुस्तक वाचकासमोर येतं, तेव्हा त्याच्या आवरणावर तरी 'गंभीर टीका', 'मूलभूत मतभेद' अशा आशयाचे शब्दप्रयोग न होता 'काही वाङ्मयीन चर्चा' असा थोडा काहीसा सरधोपट शब्दप्रयोग होतो. औपचारिक पातळीवर हे गैर असतं असं नाही. किंवा काही वेळा औचित्य म्हणूनही हे गरजेचं ठरत असणार. पण कथित औचित्यभंग न करता, अशा औपचारिकतांपलीकडेही जाता येऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर वाघांच्या बाबतीत होकारार्थी मिळालं. त्यामुळे रॉय यांच्या भाषांतरित पुस्तकात मराठी भाषांतरकाराचं टिपण न देता, त्याची स्वतंत्र पुस्तिका छापण्याचं त्यांनी ठरवलं. तसं करताना पुस्तिकेला पूर्ण वाव दिला. म्हणूनच सदर पुस्तिकेच्या मलपृष्ठावर पुढील मजकूर छापून आला:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'ॲनाहिलेशन ऑफ कास्ट' या संहितेची एस. आनंद यांनी संपादित केलेली व त्यांनीच टिपा जोडलेली आवृत्ती 'नवयान पब्लिशिंग'नं मार्च २०१४मध्ये प्रकाशित केली. या ग्रंथासाठी एक दीर्घ प्रस्तावना 'द डॉक्टर अँड द सेंट' या शीर्षकाखाली अरुंधती रॉय यांनी लिहिली. या संपूर्ण प्रस्तावनेचं मराठी भाषांतर 'सुगावा प्रकाशना'नं 'वंश, जात व जातिव्यवस्थेचं उच्चाटन' या शीर्षकाखाली स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रसिद्ध केलं. रॉय यांच्या मांडणीसंदर्भात मराठी भाषांतरकाराचे काही तीव्र मतभेद आहेत. या मतभेदांची त्यानं केलेली नोंद स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपात प्रसिद्ध करण्याचं ठरलं, ती ही पुस्तिका. 

'स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण' हा मजकूर रॉय यांच्या पुस्तकाचा समांतरपणे लिहिला गेला, हे खरं. पण स्वतंत्रपणे वाचताना हा निबंध सध्याच्या काळातल्या अभिव्यक्तीविषयीचा एक अगदी लहानसा घटना-अभ्यास वा व्यक्ति-अभ्यास (केस-स्टडी) म्हणूनही वाचता येईल, असं वाटतं.

सुगावा प्रकाशन, नोव्हेंबर २०१६

छापील पुस्तकाच्या निर्मितीला अनेकांचे हात लागलेले असतात. प्रकाशक हा त्यातला एक महत्त्वाचा हात असतो. एका अर्थी लिहिलेल्या मजकुराला तो क्रयवस्तूचं रूप देत असतो. हा व्यवहार मोकळेपणाने केला, तर व्यवहारही टिकवणं, पण त्याचसोबत विचारांचा मोकळेपणाही टिकवणं, असं काही जमवता येऊ शकतं. कदाचित व्याप्ती कमी राहील, म्हणजे नुसतं बाजारपेठेपुरतं बोलायचं तर, 'सुगावा'ने प्रकाशित केलेलं रॉय यांचं पुस्तक स्वाभाविकपणे जास्त खपेल, त्या तुलनेत 'सुगावा'नेच प्रकाशित केलेली ही पुस्तिका खपणार नाही. त्याचे संदर्भ वेगळे राहतात, पण इथे मराठी व्यवहारात तरी कोणी जाणीवपूर्वक काही दडपलेलं नसल्यामुळे कोणावर दोषारोप किंवा हेत्वारोप करण्यासारखं किंवा तक्रार करण्यासारखं काही नाही. बाकी, या पुस्तिकेवर ज्याचं लेखक म्हणून नाव आहे, त्यानेच ही नोंद लिहिली असली, तरी इथला मुद्दा या विशिष्ट लेखकाचा नसून प्रकाशक या घटकाशी संबंधित आहे. एकाच प्रकाशकाला असे दोन परस्परविरोधी सूर एका वेळी प्रकाशात आणावेसे वाटणं, ही लक्षणीय बाब आहे. यातली एक क्रयवस्तू बाजारात अधिक मागणीची असली, तरी त्या क्रयवस्तूच्या काही मर्यादा आहेत असा आपल्या परीने दावा करणारी दुसरी क्रयवस्तूही त्याच वेळी बाजारात आणावीशी वाटणं, हे दुर्मिळ वाटतं. शिवाय, यातल्या एका सुराचे आवाज जगभर गुंजत असतात, तसं दुसऱ्या सुराबाबत म्हणता येत नाही. तरीही दुसऱ्या सुराला कमी न लेखणं, हे तर त्याहूनही लक्षणीय. विलास वाघ यांनी हे असं केलं, त्यातून त्यांना वैयक्तिक पातळीवर काहीच लाभ नव्हता. किंवा याचा काही गहजबही होत नसतो. पण एकंदरित धोरण म्हणूनच असा मतभिन्नतेला वाव देण्याचा त्यांचा स्वभाव दिसला. वाघसरांना लक्षात ठेवायला इतरही अनेक कारणं असतील, त्यातलं हेही एक कारण असावं. म्हणून त्यांच्या आठवणीत ही छोटीशी नोंद करावीशी वाटली.

No comments:

Post a Comment