Tuesday, 4 September 2012

हिंदी आणि उर्दू - सआदत हसन मंटो

सआदत हसन मंटो
स्वतंत्र भारतात प्रादेशिक भाषांना त्या त्या राज्यांमध्ये प्राधान्य देण्याबरोबरच हिंदीला राष्ट्रीय व्यवहारात प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. भारत-पाकिस्तान फाळणीपूर्व काळात दिल्ली व उत्तर भारतात 'हिंदुस्तानी' भाषेचं प्राबल्य होतं. हिंदी नि उर्दू यांच्या सरमिसळीतून बनलेली 'हिंदुस्तानी' भाषिक सहिष्णुतेचं प्रतीक होती (आणि खरंतर आहेही). स्वतंत्र भारत सरकारनं हिंदीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्यानं उर्दूचं अस्तित्त्व धोक्यात येईल अशी ओरड सुरू झाली. फाळणीनंतर पाकिस्तानला आपलं घर मानलेले थोर उर्दू लेखक सआदत हसन मंटो (११ मे १९१२ – १८ जानेवारी १९५५) यांनी हिंदी-उर्दू वादावर त्यांच्या खास शैलीत टीप्पणी केली होती. भाषेसंबंधी सार्वकालिक विधान ठरू शकणाऱ्या मंटो यांच्या लेखाचं मराठी भाषांतर त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'रेघे'वर -
***

 हिंदी आणि उर्दू 
- सआदत हसन मंटो

गेला काही काळ हिंदी नि उर्दूचा वाद मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मौलवी अब्दुल हक साहेब, डॉ. तारा सिंग आणि महात्मा गांधी यांना या वादाबद्दल जेवढं काही माहिती असू शकतं तेवढं माहिती आहे. माझ्यासाठी मात्र हा वाद आकलनापलीकडचा आहे. मी खूप प्रयत्न केला, पण काहीच समजू शकलेलो नाही. हिंदू लोक हिंदीच्या समर्थनार्थ आणि मुस्लीम उर्दूच्या संरक्षणासाठी वेळ का वाया घालवतायंत? भाषा निर्माण केली जात नाही, ती स्वतःच स्वतःला निर्माण करते. कोणत्याही मानवी प्रयत्नांनी भाषेला मारता येत नाही. मी जेव्हा या सध्याच्या गोंधळावर काही लिहायचा प्रयत्न केला तेव्हा मला खालील संभाषण हाती लागलं -

मुन्शी नरेन प्रसाद : इक्बाल साहेब, तुम्ही हा सोडा पिणार आहात काय?

मिर्झा मुहम्मद इक्बाल : होय, पिणाराय.

मुन्शी : पण तुम्ही लिंबू सरबत का पीत नाही?

इक्बाल : तसं काही विशेष कारण नाही. पण मला सोडा आवडतो. आमच्या घरी सगळ्यांनाच सोडा प्यायला आवडतो.

मुन्शी : म्हणजे वेगळ्या भाषेत सांगायचं तर, तुम्हाला लिंबू सरबताचा तिटकारा आहे.

इक्बाल : नाही नाही तसं अजिबातच नाही. मी कशाला त्याचा तिटकारा करू मुन्शी नरेन प्रसाद? कसंय की, घरी सगळे सोडा पितात, त्यामुळे पूर्वीपासून मला त्याची सवय झालेय इतकंच. खरंतर तुम्ही मला विचाराल तर साध्या सोड्यापेक्षा लिंबू सरबताची चव कधीही चांगलीच.

मुन्शी : म्हणूनच तर.. तुम्ही एखाद्या गोड पेयापेक्षा खारट पेयाला प्राधान्य कसं काय देताय याचं मला आश्चर्य वाटतं. आणि लिंबू सरबत फक्त गोड असतं असंच नाही, त्याला खास स्वाद आहे ओ. तुम्हाला काय वाटतं?

इक्बाल : एकदम बरोब्बर बोललात तुम्ही. पण...

मुन्शी : पण काय?

इक्बाल : तसं नव्हे. मी आपलं म्हणणार होतो की मी सोडाच पिईन.

मुन्शी : परत तोच बाष्कळपणा. मी तुम्हाला विष पिण्याची जबरदस्ती करत नाहीये. करतोय का? मित्रा, दोन्हींत काय फरक आहे? दोन्ही बाटल्या एकाच कारखान्यात तर बनल्यात. एकाच यंत्रानं दोन्हींमध्ये पाणी भरलं गेलंय. लिंबू सरबतातून जर गोडवा आणि स्वाद काढून घेतला, तर राहिलं काय?

इक्बाल : फक्त सोडा... मीठ घातलेलं पाणीच एक प्रकारचं...

मुन्शी : मग, लिंबू सरबत पिण्यात तोटा काय आहे?

इक्बाल : तोटा तर काहीच नाही.

मुन्शी : मग प्या!

इक्बाल : मग तुम्ही काय पिणार?

मुन्शी : मी दुसरी बाटली मागवतो.

इक्बाल : दुसरी बाटली कशाला मागवताय? साधा सोडा पिण्यात काय तोटा आहे?

मुन्शी : ह्म्मम्म. . तोटा काहीच नाही.

इक्बाल : मग, हा घ्या की सोडा. प्या.

मुन्शी : मग तुम्ही काय पिणार?

इक्बाल : मी दुसरी बाटली मागवतो.

मुन्शी : तुम्ही कशाला दुसरी बाटली मागवताय? लिंबू सरबत पिण्यात काय तोटा आहे?

इक्बाल : हम्म्म्. . तोटा तर काहीच नाही. पण सोडा पिण्यात काय तोटा आहे?

मुन्शी : काहीच नाही.

इक्बाल : खरंतर सोडा जरा चांगलाच असतो.

मुन्शी : पण मला वाटतं की लिंबू सरबत जरा जास्त चांगलं असतं.

इक्बाल : असेल, तुम्ही म्हणताय तर. पण मी आमच्या कुटुंबातल्या ज्येष्ठांकडून ऐकलंय की, सोडाच चांगला आहे.

मुन्शी : आता यातून काय करावं बरं माणसानं- आमच्याकडचे ज्येष्ठ म्हणतात की, लिंबू सरबत जास्त चांगलं आहे.

इक्बाल : पण तुमचं स्वतःचं मत काय?

मुन्शी : तुमचं काय?

इक्बाल : माझं मत... अं... माझं मत... माझं मत एवढंच आहे की... पण तुम्ही तुमचं का नाही सांगत?

मुन्शी : माझं मत... अं... माझं मत एवढंच आहे की... पण तुम्ही तुमचं पहिल्यांदा का नाही सांगत?

इक्बाल : अशा पद्धतीनं आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू असं मला वाटत नाही. हे बघा, तुमच्या ग्लासावर जरा झाकण ठेवा. मी पण तसंच करतो. आणि नंतर आपण निवांतपणे चर्चा करू.

मुन्शी : नाही, आपण असं करू शकत नाही. आपण आधीच बाटल्यांची बुचं काढलेली आहेत. आता आपल्याला प्यायलाच लागेल. चला. एकदाचं ठरवून टाका, हा फेस जायच्या आत. फेस गेला की ही पेयं अगदीच पुळचट होतात.

इक्बाल : होय बरोबर. आणि तुम्हाला एवढं तरी मान्य आहे की, लिंबू सरबत आणि सोड्यामध्ये तसा काही फरक नाही.

मुन्शी : मी तसं कधी म्हटलेलं? दोन्हींत खूप फरक आहे, रात्र आणि दिवस यात जेवढा फरक आहे तेवढा. लिंबू सरबत गोड असतं, त्याला स्वाद असतो, काहीसा आंबटपणाही आहे- सोड्यापेक्षा तीन जास्तीच्या गोष्टी. सोड्याला फक्त फेस आहे. आणि तोसुद्धा एवढा की आपल्या नाकात जाईल. तुलना केली तर लिंबू सरबत जास्त चवदार असतं. एका बाटलीत तुम्हाला काही तास ताजतवानं ठेवण्याची ताकद असते. सोडा शक्यतो आजारी माणसांसाठी असतो. शिवाय, तुम्हीच आत्ता मान्य केलंत की लिंबू सरबत सोड्यापेक्षा चवदार असतं.

इक्बाल : हो ते मी म्हणालो हे आहेच. पण लिंबू सरबत सोड्यापेक्षा चांगलं असतं असं काही मी म्हटलेलं नाही. चवदार गोष्ट फायदेशीर असलीच पाहिजे असं काही नाही. लोणच्याचं उदाहरण घ्या, ते खूपच चवदार असतं, पण तुम्हाला त्याचे दुष्परिणाम माहीत असतीलच. गोडवा आणि चवदारपणा असणं याचा अर्थ ती वस्तू चांगली आहे असा नाही. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलात तर ते तुम्हाला सांगतील, पोटाला लिंबामुळे किती त्रास होतो ते. पण सोडा, त्याची गोष्टच वेगळी. त्याच्यामुळे पचनाला मदत होते.

मुन्शी : असं करू, आपण दोन्हींना मिसळून हा मुद्दाच मिटवून टाकू.

इक्बाल : हां, तसं चालेल.

मुन्शी : ठिकाय तर, हा ग्लास सोड्यानं अर्धा भरा.

इक्बाल : तुम्ही का तुमच्या लिंबू सरबतानं आधी अर्धा ग्लास भरत नाही? त्यावर मी सोडा ओततो.

मुन्शी : त्यानं काय फरक पडतो? तुम्ही तुमचा सोडा पहिल्यांदा का ओतत नाही?

इक्बाल : कारण मला सोडा-लिंबू सरबत असं मिश्रण प्यायचंय.

मुन्शी : आणि मला लिंबू सरबत-सोडा असं प्यायचंय.

***

मंटो यांच्या मूळ उर्दू लेखाचं डॉ. मुहम्मद उमर मेमन यांनी केलेलं इंग्रजी भाषांतर त्यांच्याच संपादनाखाली प्रसिद्ध होणाऱ्या ‘दी अॅन्युअल ऑफ उर्दू स्टडीज्’मध्ये प्रसिद्ध झालं होतं, ते 'काफिला'वर प्रसिद्ध झालं होतं. तिथून मेमन साहेबांच्या इंग्रजी भाषांतरापर्यंत पोचता आलं, त्यावरून हे मराठी भाषांतर केलं आहे. सगळे आभार ह्या परिच्छेदातल्या संस्थांना, व्यक्तींना आणि अर्थातच मंटोंना.

4 comments:

  1. Abhijeet Deshmukh wrote on Facebook-

    खूप छान काम करताय,मी 'रेघ'वर प्रसिद्ध झालेले लेख नियमित वाचतो.

    या विषयामध्ये वेळ हि सर्वात महत्वाची भूमिका निभवते.काळासोबत चालावे असे म्हणतात...
    पण तुम्हाला आधी 'लिंबू सरबत' किंवा 'सोडा' आवडत होता ..
    आणि आता तुम्हाला 'कोका कोला' आवडत...... असे म्हणून चालणार नाही....

    काळासोबत चालत असताना, आपल्या गोष्ठी जपणे आवश्यक असते आणि त्यातील गोडवा नवीन गोष्ठी शिकून आणखी कसा वाढवता येईल या कडेच लक्ष दिल्या गेले पाहिजे(पण नवीन गोष्ठीनशी तुलना न करता)

    ReplyDelete
  2. एकच नंबर, भयंकरात भारी...!!

    ReplyDelete
  3. Mayuresh konnur - through e-mail-

    अंबरीश मिश्र यांच्या 'शुभ्र काही जीवघेणे'मधला मंटोवरचा लेख वाचण्यासारखा आहे.

    ReplyDelete
  4. लेख छान आहेच. 'कोणत्याही मानवी प्रयत्नांनी भाषेला मारता येत नाही' या वाक्यावर मात्र कदाचित अजून विचार, चर्चा व्हायला हवी.

    ReplyDelete