Tuesday, 30 April 2013

सैलीचा हँग-ओव्हर व प्रामाणिक लेखनाचा एक नमुना

 मुखपृष्ठ : अंजलीन इला मेनन यांच्या
कन्डोलिम (१९८५, ४८ X ३६) - या चित्राचा भाग
श्रीकांत सिनकर हे नाव ज्यांना माहीत असेल, त्यांना ते बहुधा पोलीस चातुर्यकथा नि तश्याच पद्धतीच्या कादंबऱ्यांच्या संदर्भात माहीत असण्याची शक्यता जास्त आहे. पण सिनकर हे त्यापलीकडेही काही लिहून गेले. याचा एक दाखला आपल्याला यापूर्वी 'रेघे'वरच्या एका नोंदीत दिसला आहे, तो 'निवडक अबकडइ'तल्या एका लेखासंबंधी. पण आता हा दाखला अधिक ठळकपणे, एका पुस्तकातूनही आपल्याला सापडू शकतो. हे पुस्तक आहे 'सैली : १३ सप्टेंबर'. हा खरं म्हणजे व्यक्तिचित्रणपर पाच लेखांचा संग्रह आहे, पण सिनकरांच्या मते हा कथासंग्रह आहे, किंवा वाचकाला असंही वाटतं की, लेखक आपल्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तींच्या सोबतीने घालवलेल्या काळाची नि त्यातल्या आनंदाची, चुकांची प्रामाणिक कबुली या लिखाणातून देतोय, म्हणजे आत्मकथनासारखं काहीतरी दिसतंय. तर साधारण असं हे सगळंच असलेला मजकूर या पुस्तकात आहे. आणि या सगळ्या मजकुराचा एक अतिशय चांगला नि महत्त्वाचा गुण आहे तो प्रामाणिकपणा. 

या पुस्तकाची पहिली आवृत्ती फेब्रुवारी १९८१मध्ये पुण्याच्या 'रविराज प्रकाशना'तर्फे आली होती. त्यानंतर आता तीस वर्षांनी दुसरी आवृत्ती (एका लेखाची भर टाकून) 'लोकवाङ्यमय गृहा'ने काढलेय. 

'न्यूयॉर्कचा जगन', 'दत्तू बॉयलर', 'सैली : १३ सप्टेंबर', 'जिन 'जिमलेट'' आणि 'सुंदर सावली सापडली' असे पाच लेख आहेत या पुस्तकात. यात 'न्यूयॉर्क' म्हणजे मटक्याचा अड्डा, दत्तू बॉयलर हा एका दारूच्या गुत्त्यावरचा पोऱ्या असलेला आणि नंतर दुसरीकडे मॅनेजर झालेला गडी, सैली म्हणजे सिनकरांनी जिच्यावर मनापासून प्रेम केलं नि जिच्याशी लग्न करण्याची त्यांची इच्छा होती अशी वेश्या. सिनकरांचं अनुभवविश्व हे असं होतं. पण केवळ त्यातल्या अनुभवविश्वाला भुलून आपण हे पुस्तक चांगलं आहे असं म्हणत नाहीयोत, तर अनुभव कोणताही असला तरी तो सांगण्यातला लेखकाचा प्रामाणिकपणा हा गुण अतिशय महत्त्वाचा, असं मानून आणि तो गुण या पुस्तकात मुबलक प्रमाणात आहे म्हणून ही नोंद करतोय. शिवाय इतर कोणत्या गोष्टीपेक्षाही 'लिहिण्याचं काम' हा 'रेघे'चा अगदीच महत्त्वाचा भाग असल्यामुळे ही आणि अशा नोंदी 'रेघे'वर आपण करत आलोय नि करत राहू शक्यतो.

तर सैली... ह्या पुस्तकातल्या फक्त 'सैली : १३ सप्टेंबर' या लेखाबद्दलच आपण बोलूया. कारण पुस्तकाचा सगळ्यात सुंदर भाग हाच आहे, असं मला वाटतं. आणि त्याबद्दल बोललं की बाकीच्या लेखांचाही अंदाज येऊ शकतो. 

सैली ही नेपाळी वेश्या होती. सिनकरांच्या आयुष्यात ती आली. किंवा खरं तर सिनकर तिच्या आयुष्यात गेले असं म्हणणं जास्त बरोबर आहे. तर हे दोघंही एकमेकांच्या आयुष्यात आले. आणि त्यांनी एकमेकांवर मनापासून प्रेम केलं. हे 'मनापासून' म्हणजे इतकं की ते सगळं ह्या लेखात सारखं वाचकाच्या मनालाही धक्का देईल इतकं. १९६४ साली सैली नि सिनकर एकमेकांच्या आयुष्यात आले आणि १९७१ साली त्यांचं प्रकरण संपलं. हे प्रकरण म्हणजेच हा लेख.

सिनकरांच्या लिखाणात आपण असं असं जगलो याचं फुशारक्या मारणारं वर्णन नाही, आपण असं जगलो म्हणून बाकीचे जगतात ते भुक्कड आहे असला आव नाही. (तरी सिनकरांबद्दल जे तुरळक लोक बोलतील ते मात्र असंच बोलतील. त्यांनी अधोविश्वाबद्दल लिहिलं वगैरे, याचाच गवगवा होईल आणि त्यांच्यावर काहीतरी शिक्का बसवला जाईल. अधोविश्वाबद्दल लिहिलं हे एक वैशिष्ट्य आहेच, पण त्यातले प्रामाणिकपणासारखे इतर गुण असतील, ते शोधायला हवेत. पण आपण एखादं वैशिष्ट्यच फक्त बोलल्यामुळे लेखक म्हणून त्यांच्याबद्दल अधिकचं काही बोलणं थांबेल. आणि असली वरवरची वैशिष्ट्यं आपल्यातही आहेत असंही काही लोकांना वाटत राहील. ठीकच तेही).

जे आहे ते आहे, जे झालं ते झालं - असं साधारण सिनकरांचं दिसतं. अशाच जगण्यात त्यांचं सैलीवर प्रेम बसलं. वास्तविक वेश्यावस्तीत ज्या कामासाठी जातात त्या कामासाठीच सिनकर गेलेले, पण सैलीच्या बाबतीत त्यांना जे वाटायला लागलं ते केवळ एवढ्या कामापुरतं उरलं नाही. आणि नुसतं हे शारीरिक काम तर सिनकर तसंही बाहेर मैत्रिणींच्या संगतीत भागवू शकत होते, असं तेच सांगतात. पण सैलीची गोष्टच वेगळी होती. तिच्यासोबत संसार मांडणंच सिनकरांच्या मनात होतं, पण सैलीने या प्रस्तावाला दाद दिली नाही :
नवीन आवृत्तीत बाळ ठाकूरांच्या रेखाचित्रांचीही
जोड लेखांना दिलेय. त्यातली सैली.
कोणत्या भाषेत नि कोणत्या शब्दांत या मूर्ख मुलीला समजावू की माझ्याबरोबर लग्न करण्यात तुझं भलं आहे? मी तिला नेहमी म्हणायचो, मी जगाची पर्वा करत नाही. जेव्हा मी असं ठरवतो, तेव्हा सर्व गोष्टींचा सर्व बाजूंनी मागचा-पुढचा विचार केलेला असतो. माझ्या डोक्यात किडा वळवळत होता, तो हाच की अगोदर लग्न करून मग कादंबरी लिहायची. सैली वेश्या आहे म्हणून मला तिचा उद्धार करायचा नव्हता. उद्धार वगैरे गोष्टी मला समजल्याच नाहीत. मला एक आणि एकच कळत होतं, सैली हीच माझ्या जीवनातील यशस्वी जोडीदारीण होऊ शकते. सेक्सचा काहीच प्रश्न नव्हता. सेक्सपेक्षा जास्त जमल्या होत्या एलिमेंट्स गेल्या सहा वर्षांत! दोन उदाहरणं देतो :
एकदा अचानक आजारी पडलो. तीन दिवस सैलीकडेच होतो. काही फ्ल्यू वगैरे असेल. पण बाई घाबरली. फॉकलंड रोडवरील बहुतेक सर्व वेश्या नजीकच्या 'गोल देवळा'पाशी असलेल्या डॉक्टर मंडळींकडे उपचारासाठी जातात आणि तिथून परतताना त्या देवळात जात. मी आजारी असताना ती म्हणाली,
''तुम जल्दी ठीक हो जाओगे!''
''कैसे?''
''मैने मंदिर में भगवान की प्रार्थना की है।''
मी मंद स्मित केलं. मी देवळात जात नाही. माझ्या विचारी बुद्धीला जाणं शोभणारं नाही. मी बरा होईन तो कुणा एम.बी.बी.एस. डॉक्टरच्या ट्रिटमेंटनेच होईन हे मला कळतंय. प्रार्थनेने तर अजिबात बरा होणार नाही. पण तरीही कुठेतरी असं भोळंभाबडं रूप जवळ असावं, कायमचं असावं, असं मला नेहमीच वाटायचं.
दुसरं उदाहरण इथे देत नाही. पण अशा काही गोष्टी जुळल्या नि त्यामुळे सिनकरांनी सैलीशी लग्न करायचं ठरवलं. अर्थात सैलीला सिनकरांबद्दल प्रेम वाटत असूनही तिला लग्न करण्यासाठी तयार होता येईना. का? माहीत नाही. पण लग्न काही झालं नाही. अर्थात लग्न करायचं ठरल्यावर सिनकर कुठेतरी त्याबद्दल बोलले नि मग झाली चर्चा सुरू :
... मग माझ्या लग्नाची चर्चा गावभर सुरू झाली. जो तो विचारायचा, ''हे खरंय?'' मी म्हणायचो, ''हो हे खरं आहे.'' एकदा लायब्ररीत बसलो असताना एका विद्वान गृहस्थांनी मला संदर्भ विभागातून बाहेर काढलं.
''द्या, द्या, तुमची एक सिगरेट!''
मला या गाडीचा पुढचा सिग्नल समजला होता. आम्ही खाली भटाच्या बाकावर चहा घेऊ लागलो... आणि मग त्यांच्या स्टाइलमध्ये ते, ''तो हा कोण तो आपला परवा भेटला होता, काय त्याचं नाव...''
''ठीक आहे. नाव सोडून द्या! म्हणत काय होता तो?''
''म्हणजे तसं तो म्हणत होता, हं... काय बरं...''
''तो हेच म्हणत असेल की मी एका नेपाळी वेश्येबरोबर लग्न करतोय!''
''अं... हो... असंच काहीतरी!''
''काहीतरी नाही. ते खरं आहे.''
आपल्या विद्यार्थ्यांवर प्राणापलीकडे प्रेम करणारे हे मध्यमवर्गीय विद्वान प्राध्यापक ज्यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे.. आता ते हाताने डोकं खाजवू लागले.
''मी जर लग्न केलं तर तुम्ही याल ना?''
''हो, हो, येईन ना!''
''मग सर...'' मी सिगरेट पेटवीत म्हणालो, ''मी टॅक्सी थांबवतो. चला, येता माझ्याबरोबर फॉकलंड रोडवर? मी तुमची आणि तिची आत्ताच ओळख करून देतो.''
सरांना घाम फुटला. ''नाही. मी आलो असतो पण आता लेक्चर आहे...'' वगैरे म्हणून गायब!
चर्चांमध्ये जसे वरचे प्रोफेसर भेटतात तसेच कार्यकर्ता प्रकारातले लोकही आहेत. पण सिनकरांना त्यांच्यातही इंटरेस्ट दिसत नाहीये :
एका प्रसिद्ध युवक संघटनेचा कार्यवाह येऊन भेटला. ''हे तू फार चांगलं करतोयस. असं धाडस कोणी दाखवत नाही.'' मनात म्हटलं, ''मग तू दाखव!'' तो पुढे असंही म्हणाला, ''तू लग्न करच. आमची संघटना तुला संपूर्ण सहकार्य करील.''
मी म्हणालो, ''मित्रा, आभारी आहे. तुमच्या संघटनेचं संपूर्ण सहकार्य लाभावं म्हणून काही मी सहा वर्षं घालवली नाहीत. मी जेव्हा या प्रकरणात पडलो तेव्हा तुमची संघटना जन्मली पण नव्हती. आणि कधीकाळी एक संघटना जन्मणार आहे, आणि ती आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहे; तेव्हा आपण वेश्येबरोबर लग्न करावं, असा विचार काही माझ्या डोक्यात आलेला नव्हता.''
मी जे करणार होतो ते पूर्णपणे माझ्या जबाबदारीवर करणार होतो. पुढील बऱ्यावाईट परिणामांची पूर्ण जबाबदारी माझीच होती. माझ्या खाजगी जीवनात कोणत्याही सामाजिक संघटनेचा स्पर्श किंवा राजकीय रंग मला नको होता.
असं होतं सिनकरांना सैलीबद्दल जे वाटत होतं ते. त्यात आपल्याला वाटतंय त्याची जाणीव फक्त होती, बाकी त्यातून काही दाखवू पाहावं असला हेतू नाही. हे दाखवेगिरी न करण्याच्या भूमिकेमुळे सिनकरांचं या पुस्तकातलं लेखन तरी सुंदर झालंय.

एखाद्या सभ्य माणसाला कशाबद्दल बोलताना सर्वाधिक आनंद होईल? < उत्तर : स्वतःबद्दल. < बरंय, तर मग मीही स्वतःबद्दलच बोलत जाईन. : या दस्तयेवस्कीच्या 'नोट्स फ्रॉम अंडरग्राउन्ड' कादंबरीतल्या शब्दांचा आणि त्या कादंबरीचाही संदर्भ 'रेघे'वर मागे एकदा माध्यमांसंबंधी येऊन गेलाय. हे किती ठिकाणी जुळतंय बघा! सिनकरांनीही या पुस्तकात स्वतःबद्दलच लिहिलंय. पण तरी ते 'फेसबुक'वरती असतं तसं नैतिकतेच्या प्रदर्शनासारखं होत नाही. याचं कारण काय? तर आपण आधी म्हटलंय तेच : प्रामाणिकपणा.

प्रामाणिकपणामुळेच सिनकर सैलीबद्दल झालेल्या आपल्या चुकांचीही जबरदस्त कबुली देतात. आणि ही कबुली अशी नाहीये की ती एकदा करून झाली की आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटेल. उलट आपल्यालाही हा काय वेडेपणा चाललाय असं वाटून राग येऊ लागेल. म्हणजे सैलीने सिनकरांच्या दारू पिण्याबद्दल केलेल्या तक्रारीचा राग डोक्यात घालून निव्वळ एका क्षणाच्या दारूच्या नशेत हा माणूस पोलीस स्टेशनात जाऊन सैलीविरोधात खोटी तक्रार देतो. कसली तर, आपण रस्त्यावरून जाताना ह्या बाईने वरतून 'शुक शुक' करून पाणी फेकल्याची. पोलीस येऊन सैलीला उचलतात. नंतर सिनकरांना शुद्ध येते तेव्हा ते पोलिसांना आपलं साधं भांडण झालेलं नि त्याचा राग म्हणून आपण असली तक्रार केल्याचं सांगतात नि तक्रारीचा भाग मिटतो. पण सैली पुन्हा सिनकरांना जवळ करत नाही कधीच :
माझ्या उभ्या आयुष्यात मी कोणाविरुद्ध तक्रार नोंदवली नव्हती. नोंदवली ती पहिलीच! चक्क सैलीविरुद्ध!! तीही निखालसपणे खोटी!! माझ्याविरुद्ध मीच तक्रार नोंदवल्यासारखं झालं मला. वास्तविक ड्यूटी-ऑफिसरने माझ्या कानफटात मारून किंवा किमान माझी कानउघाडणी करून मला अगोदरच हाकलून दिलं असतं तर ते मला जास्त बरं वाटलं असतं.
अधिकारी तक्रार लिहून घेत असताना सैली माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. मी अवाक् होऊन तिची नजर टाळू लागलो. कसेबसे शब्द उच्चारत सैली सावकाश म्हणाली,
''तेरी कसम लेकर कहती हूँ...''
माझं हृदय धडधडू लागलं.
''इसके बाद मेरे पास कभी गलती से भी मत आना राजा!''
सैलीने केलेला अंतिम वार मी सहन करू शकत नव्हतो. तक्रार आठ मिनिटांत नोंदवून झाली. पण या एकाच तक्रारीने आठ वर्षांच्या आमच्या एलिमेंट्स खसकन तुटल्या. सैलीकडे परत जायचं नाही? ही कल्पनाच मला सहन होत नव्हती. त्यापेक्षा कोणतीही सक्तमजुरी भोगायला मी तयार होतो. सैली सावकाश बोलली होती. पण तिच्या प्रत्येक शब्दामागचा ठाम निर्धार मलाच समजला होता.
सैलीचा निर्धार कायम राहिला आणि सैली सिनकर याचं प्रकरण कायमचं तुटलं. सिनकरांच्या चुकीमुळे तुटलं याचा आपल्याला राग येऊ शकतो. आणि येतोच. पण आपली चूक एवढ्या ढळढळीतपणे सांगणाऱ्या माणसाला आता करणार तरी काय? हा माणूस तसा त्याच्या हयातीतच यशस्वी झाला होता. हिंदीतही पोलीसकथा लिहिल्यामुळे, मराठीतही कथा-कादंबऱ्यांचा नियमित पुरवठा केल्यामुळे पैसाही मिळत होता. पण तेवढं पुरेसं नव्हतंच अर्थात :
१९६४ साली सैली अठरा वर्षांची होती आणि मी चोवीस वर्षांचा होतो तेव्हा आमची पहिली भेट झाली. आणि १९७१ साली ती पंचवीस वर्षांची असताना आणि मी एकतीस वर्षांचा असताना आमची ताटातूट झाली. आयुष्यातील ठरावीक आठ वर्षांचा हा इतिहास! लोक म्हणायचे, ''हे तुमचं फ्रस्ट्रेशन लाइफ सुरू आहे.'' खरोखरच गाढव होते हे लोक. सैलीचे माझे संबंध सुटले आणि माझं फ्रस्ट्रेशन लाइफ सुरू झालं. १९७१ साली जितकं नाव नव्हतं त्याच्या दसपट मिळवलं. पण निराश होतोय. पाहिला नाही एवढा पैसा पाहिला आणि तेवढाच उधळून लावला. हे फ्रस्ट्रेशन लाइफ. आज तर मी कुठल्या कुठे आहे. अजूनही असं वाटतं की तिची साथ मिळाली असती तर आणखीन कुठच्या कुठे गेलो असतो. पंख कापलेल्या पक्ष्यासारखी अवस्था झाली एवढं मात्र खरं!
असा आहे हा चाळीसेक पानांचा लेख. लेखाच्या शीर्षकात १३ सप्टेंबर ही तारीख का आहे? तर ही सैलीची जन्मतारीख होती म्हणून. आणि ह्या दिवशी सिनकर आणि सैली न चुकता 'नॉव्हेल्टी' किंवा 'नाझ'ला पिक्चर पाह्यला जायचे म्हणून. १९७१नंतरचा कोणताच १३ सप्टेंबर सिनकरांसाठी आधीच्या आठ वर्षांसारखा नव्हता. आठ वर्षं... :
१९६४ ते १९७१ हा आठ वर्षांचा सैलीचा माझा सहवास! बरोबर आठ वर्षांनी आमची ताटातूट झाली. मी आठ वर्षं मन जबरदस्त घट्ट केलं, कोणी करू शकणार नाही एवढं केलं. १९७९! मला पाहायचं होतं, या आठ वर्षांत सैली कशी झाली आहे? कशी दिसते आहे? कशी बोलते आहे? कशी वागते आहे? कारण आता मी तिला जो भेटणार होतो तेव्हा ती असणार तेहतीस वर्षांची आणि मी आहे एकोणचाळीस वर्षांचा!
अठरा वर्षांची सैली पण मी पाहिली आणि तेहतीस वर्षांची पण पाहिली.
सैली मला म्हणाली होती - जेव्हा 'तुम ना जाने' गाण्याच्या बाबतीत मी तिला विचारलं होतं तेव्हा - ती म्हणाली होती, ''मैं समझी तुम पुना में खो गया!''
आज गेली आठ वर्षं सैली हेच गाणं गुणगुणत असेल का? 'तुम न जाने किस जहाँ में खो गये!' आणि समजा, गुणगुणत असेल तर ती काय समजत असेल? मी कुठे कुठे 'खो गया' म्हणून?
... १९७२नंतर रश्मी दिवाणचा (सिनकरांचा मित्र) पत्ता नाही. तो जिवंत आहे. मला का भेटत नाही, मला माहीत नाही...
आज मी जिवंत आहे. सैली जिवंत आहे. रश्मी जिवंत आहे. पण माझ्या हृदयात फक्त माझेच ठोके पडताहेत आणि मी ते एकटाच ऐकतोय!
... मधे काय घडेल सांगता येत नाही. पण बरोबर आणखीन आठ वर्षांनी सैलीकडे जाण्याचा गंभीर विचार मी आत्तापासूनच करतोय. ती तारीख असेल...
१३ सप्टेंबर १९८७!
... तेव्हा मी असेन सत्तेचाळीस वर्षांचा आणि सैली एकोणचाळीस वर्षांची!
सिनकर आता नाहीत. सैलीबद्दल आपल्याला काही माहिती असू शकत नाहीत. पण सैलीबद्दल सिनकरांनी लिहिलेलं आपल्याला वाचायला मिळू शकतं. यात आत्तापर्यंत आपण अनेकदा बोललोय तो वेडेपणा आहे. तो मुद्दामहून आणलेला नाही, त्या वेडेपणात झिंग आहे तीसुद्धा मुद्दामहून आणलेली नाही. ते सगळंच प्रामाणिकपणातून आलेलं असावं. हे प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा फार होतंय असं वाटतंय ना? पण ते आहेच ह्या पुस्तकात. म्हणजे या पुस्तकातल्या शेवटच्या 'सुंदर सावली सापडली' या लेखात सिनकर एकदा असंही म्हणतात पाहा (हे अधोबिधोलोक पाहिलेले सिनकर आहेत) : 'चाकू, सुरे, तलवारी, अॅसिड किंवा रिव्हॉल्वर घेऊन जरी कुणी अंगावर आला, तरीही माझ्या शक्तीच्या कुवतीप्रमाणे (खरं म्हणजे कोणीही फुंक मारून मला खाली पाडावं) मी प्रतिकार करीन किंवा करण्याचा प्रयत्न करीन. पण मी इथे प्रामाणिकपणे सांगतो की मी इंजेक्शनला महाभयानक घाबरतो. खूप वेळा जेव्हा मी या गोष्टीचा विचार करतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं, एक सुई टोचल्यामुळे माणूस मरत नाही. परंतु कोणीतरी आपल्याला सुई टोचतं आहे आणि आपण काडीचाही प्रतिकार करू शकत नाही हेच माझं इंजेक्शन या संदर्भातलं मत असावं.' असंय हे सिनकरांचं. म्हणजे हा 'सुंदर सावली'चा लेख आहे तो त्यांच्या लग्नाची कथा सांगणारा. त्यात त्यांनी आपल्या होऊ घातलेल्या पत्नीला काय वाचायला द्यावं, तर 'सैली : १३ सप्टेंबर' हे पुस्तक, (म्हणजे त्याची पहिली आवृत्ती). त्याबद्दल ते लिहितात : 'मी स्वतः लिहिलेलं एक पुस्तक - ज्या पुस्तकात मी माझ्या आयुष्यातील काही ठळक घटना मांडल्या आहेत, ते पुस्तक - मी तिला वाचायला दिलं. पुस्तकाचं नाव 'सैली : तेरा सप्टेंबर'. एका रात्रीत तिने पुस्तक वाचून संपवलं. मला पूर्ण खात्री होती, आता मी हिच्या मनातून जास्तीत जास्त उतरणार. पण घडलं वेगळंच. आमची जेव्हा भेट झाली तेव्हा ती म्हणाली, ''तू खूप प्रामाणिक आहेस. आता मात्र मी नक्कीच तुझ्याबरोबर लग्न करणार!' असंय हे सिनकरांचं. प्रामाणिकपणाचा पुन्हा 'शो' उभा करता आला असता आणि तो उर्वरित जगात केला जातोच. पण शोबाजी न करता नुसतं असणं हे ह्या पुस्तकात आहे. आता हेही कमी म्हणून की काय, अजून एक याच लेखातलं उदाहरण देतो (हे प्रामाणिकपणाबद्दल शेवटचं) : 'सबंध जगाचा भार माझ्यावर असला तरी तो एकवेळ चालेल, पण माझा भार वाळूच्या कणावरही नसावा, हा माझा प्रामाणिक दृष्टिकोन आहे.'

बाकी सिनकरांचं इतर काही तुम्ही वाचाल किंवा नाही, ते प्रत्येकाच्या आवडीचं असेल किंवा नाही, हे सगळंच वेगळं. पण 'सैली'चा 'हँग-ओव्हर' काही काळ तरी राहील याची ग्यारंटी.

कादंबरी. पहिली आवृत्ती : ऑगस्ट १९८१

5 comments:

  1. Great writeup, as usual.

    An arithmetic error :-) :

    "या पुस्तकाची पहिली आवृत्ती फेब्रुवारी १९८१मध्ये पुण्याच्या 'रविराज प्रकाशना'तर्फे आली होती. त्यानंतर आता ऐंशी वर्षांनी दुसरी आवृत्ती (एका लेखाची भर टाकून) 'लोकवाङ्यमय गृहा'ने काढलेय. "

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Mukta Sunit for pointing-out the error. I have corrected it now. Thanks. Another error is that I have not mentioned Bal Thakur's sketches which accompany Sinkar's words in this new edition. I will correct it now.

      Delete
  2. सुंदर झालंय अवधूत.

    ReplyDelete
  3. Thanks for Bal Thakur's picture....His Sailee reaches my heart even better than Sinkar's....

    ReplyDelete
  4. पुस्तक ग्रेट आहे ते. भावणारं. खरं.

    ReplyDelete