Wednesday, 29 May 2013

'मिस्टर ग्लाड'चं काय करायचं? : भाग तीन । वाट लागलेली माध्यमं

एक

गेल्या शनिवारी (२५ मे) छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी (म्हणजे : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया - माओवादी) काँग्रेसच्या नेत्यांच्या निवडणूक प्रचारासाठी निघालेल्या 'परिवर्तन यात्रे'वर हल्ला केला. या हल्ल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, 'सलवा जुडुम'चे प्रणेते व आदिवासी नेते महेंद्र कर्मा यांच्यासह २९ जण मृत्युमुखी पडले. या घटनेचा या पलीकडचा तपशील आता माध्यमं काही दिवस देत राहतील. पण हा तपशील म्हणजे नक्की काय आहे, हे जरा तपासूया.

या घटनेबद्दलच्या प्राथमिक माहितीबद्दल आपण बोलणार नसून मराठीतल्या तीन वृत्तपत्रांमधल्या अग्रलेखांबद्दल बोलणार आहोत. कारण, प्राथमिक माहिती मुख्यत्त्वे वृत्तसंस्थांच्या माध्यमातून घेतलेली असल्याने ती बऱ्याच प्रमाणात सारखी आहे. 'विशेष फिचर' स्वरूपात जे काही ठिकाणी आलं असेल ते वेगळं आणि ढिसाळ. एकूणच या घटनेसंबंधी बातम्यांच्या स्वरूपात मराठी वृत्तपत्रांधून जे काही आलं त्यातला तथ्यांमधला गोंधळ शोधायचा, तर स्वतंत्र यादी करावी लागेल, आणि ते एकट्याचं काम नाही, कारण एकट्याला अशी किती तथ्यं हाती लागणार. पण अग्रलेखांच्या बाबतीत ही तपासणी आपण करू शकतो. कारण, अग्रलेख हे संबंधित वृत्तपत्राचं प्रातिनिधिक म्हणणं आहे असं मानलं जातं किंवा पूर्वी मानलं जायचं, म्हणून त्याबद्दल बोललं की एकूण या विषयाबद्दल मराठी वृत्तपत्रांमधून वाचकांपर्यंत काय पोचवलं जातंय त्याबद्दल एक लहानशी प्रातिनिधिक नोंद होईल. ही तीनच वृत्तपत्रं आपण तपासणीच्या सोईसाठी घेतली असली तरी 'रेघे'साठी सगळाच छापील नि इलेक्ट्रॉनिक माध्यम व्यवहार आपलेपणाच्या कक्षेत येतो. त्यामुळे त्या अर्थीही ही नोंद प्रातिनिधिक आहे.

'लोकसत्ते'च्या या घटनेवरच्या अग्रलेखाचं शीर्षक आहे : 'वाट चुकली, पण कोणाची?' यातल्या दोन मुद्द्यांमधल्या तथ्याविषयी बोलू. पहिला मुद्दा, (भाजपचे छत्तीसगढमधील मुख्यमंत्री) ''रमण सिंग यांच्या विकास यात्रेत कडेकोट बंदोबस्त असतो. त्यांच्या ताफ्याआधी सुरक्षारक्षकांची वाहने असतात. ही सुरक्षा राज्य सरकारी यंत्रणेतून दिली जाते. शनिवारी काँग्रेसच्या यात्रेत मात्र ती दिली गेली नव्हती, हे उघड दिसते'' - असं अग्रलेखात म्हटलंय. यात राहून गेलेली गोष्ट अशी की, या हल्ल्यात मारले गेलेले कर्मा यांना गेल्या वर्षीच 'झेड-प्लस' दर्जाची सुरक्षाव्यवस्था दिली गेली होती.

दुसरा मुद्दा, (माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम) यांनी ''नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी ग्रीन हंट नावाने विशेष मोहीम हाती घेतली आणि नक्षलवाद्यांची कोंडी झाली'' - असं एक वाक्य ह्या अग्रलेखात आहे. या वाक्यात मूळ कोंडीला फाटा देण्यात आलाय. म्हणजे 'नक्षलवादी' असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्यांच्या दलांमध्ये चौदा-पंधरा वर्षांची कोवळी आदिवासी मुलंही आहेत, याचं भान नक्षलवादाविरोधात कठोर कारवाईबद्दल बोलताना ठेवायला हवं. ते भान 'ग्रीन हंट' सुरू करणाऱ्या चिदंबरम यांना किंवा अशा मुलांना आपल्या लढाईसाठी वापरणाऱ्या आणि मुख्यत्त्वे तथाकथित उच्च जातीय वर्गातल्या नक्षलवादी नेतृत्त्वाला (माओवादी पक्षाच्या पॉलिटब्युरोतल्या नेत्यांना) नाही, हे साहजिक आहे. कारण ह्या दोघांचं कमी-अधिक लक्ष्य सत्ता हे आहे. सत्ताधाऱ्यांना असलं भान सोईचं नसतंच. पण 'ग्रीन हंट'सारख्या मोहिमेची भलामण करण्यापूर्वी माध्यमांनी हे भान ठेवायला नको का?

आता 'सकाळ'कडे वळू. 'सकाळ'च्या अग्रलेखाचं शीर्षक आहे : 'नक्षलवादी सूडचक्र'. या अग्रलेखातलं दुसरं वाक्यच पाहा : ''यापूर्वीचे हल्ले हे केवळ पोलिस वा सुरक्षा यंत्रणांवर होत होते. आता थेट राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत नक्षलवाद्यांची मजल गेली आहे.''

या वाक्याला आपण आपल्या माहितीने उत्तर देण्याऐवजी लगेच 'महाराष्ट्र टाइम्स'मधल्या अग्रलेखातल्याच (परिवर्तनाचा धडा!) मजकुराचा दाखला देऊ : ''आंध्र प्रदेशचे गृहमंत्री माधव रेड्डींचा बळी माओवाद्यांनी घेतला होता. चंद्राबाबूंवरील हल्ला अनेकांच्या स्मरणात असेल. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मालू बोगामी यांना माओवाद्यांनीच संपविले होते. भामरागडचे काँग्रेस तालुकाअध्यक्ष बहादूरशहा आलम यांची खुलेआम हत्या माओभक्तांनीच केली.''

'महाराष्ट्र टाइम्स'ने किमान ज्या हल्ल्यांचा उल्लेख तरी केलाय, ते 'सकाळ'च्या गावीही नाहीयेत का? नसावेत. पण 'महाराष्ट्र टाइम्स'च्या अग्रलेखात सुरुवातीला काय लिहिलंय पाहा : ''आदिवासी जनतेत माओवादाविरोधात लढण्याची उमेद ज्यांनी निर्माण केली, त्या 'सलवा जुडूम'च्या प्रणेत्याचा बळी माओवाद्यांनी मिळविला आहे''. सलवा जुडुमने आदिवासी जनतेत उमेद निर्माण केली की सरकारी सुरक्षा दलांचं काम आदिवासींच्या डोक्यावर मारून, नि हातात शस्त्रं देऊन यादवी युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली? सर्वोच्च न्यायालयाने जुलै २०११मध्ये 'सलवा जुडुम' बेकायदेशीर ठरवून त्यावर बंदी आणली. कारण, कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर नागरिकांच्या हातात बंदुका देणं बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाचं म्हणणं पडलं. ह्या 'सलवा जुडुम'मध्येही 'विशेष पोलीस अधिकारी' म्हणून पंधरा-सोळा वर्षांची मुलं (दीड हजार रुपयाच्या मासिक पगारावर) असतंच. भारत देशाच्या कायद्याने जे अजून 'सज्ञान नागरिक'ही नाहीत अशी ही मुलं. त्यांना लढवणं म्हणजे आदिवासींमध्ये 'उमेद'?

तीन वृत्तपत्रांमधल्या अग्रलेखांमधल्या केवळ काही वाक्यांची आपण तपासणी केली. आणि आपण ज्या क्रमाकांनी ती केलेय (लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स) त्या क्रमाकाने त्यांचं म्हणणं कमीतकमी तथ्याला धरून होत गेलंय. बातम्यांमध्ये ज्या पद्धतीने वाक्यं लिहिली गेली त्याबद्दल तर बोलण्यातच अर्थ नाही असं वाटून आपण त्या दिवशीच्या पेपरात ज्याला मुख्य लेखाचा दर्जा असतो त्या अग्रलेखांबद्दलच बोललो.

'महाराष्ट्र टाइम्स'ने आजही या विषयावर अग्रलेख लिहिलाय : 'कठोर कारवाईच हवी!'. यातलं शेवटचं वाक्य पाहा : ''नैतिकता आणि कायदा यांचे दडपण कमी होते तेव्हा क्रौर्याची हिंमत वाढते. क्रौर्यालादेखील भीती वाटावी अशी कणखर कारवाई जोवर होत नाही, तोवर ही रक्ताची होळी थांबणार नाही'''. काय वाट्टेल ते लिहितात हे लोक आणि वाचकांच्या माथी मारतात. पण हे सगळंच मूळ रचनेला जुळून आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' गोंडी भाषेमध्ये निघत नाही आणि त्यामुळे 'क्रौर्यालाही भीती वाटावी अशा कणखरपणा'मुळे जे मरतील ते 'महाराष्ट्र टाइम्स'चे वाचक (म्हणजे ग्राहक) नसणार. मग मरूदेत ना! 
***

दोन

नक्षलवादाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या नियोजन आयोगाने एक तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीने २००८च्या एप्रिलमध्ये आपला अहवाल सादर केला. ह्या अहवालाची 'पीडीएफ' प्रत नियोजन आयोगाने वेबसाइटवर उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय नक्षलवादाच्याच मुद्द्यावर केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी २०११ साली एक व्याख्यान दिलं होतं : 'फ्रॉम तिरुपती टू पशुपती'. हे दोन्ही सरकारी दस्तावेज आहेत आणि तरीही त्यात काही समंजस मांडणी केलेली आहे. यातल्या अनेक मुद्द्यांमधल्या महत्त्वाच्या भागाचा सारांश असा की, विकासाच्या प्रक्रियेकडे चिकित्सकपणे पाहिलं पाहिजे आणि ही प्रक्रिया सर्वसमावेशक असायला हवी. शिवाय या दस्तावेजांमध्ये आदिवासी आणि पर्यावरण, जमिनीचा वापर, अशा काही मुद्द्यांवर खोलात बोललं गेलंय.


आपण ह्या दोन दस्तावेजांचा उल्लेख केला, कारण त्यामध्ये उल्लेख केलेल्या मुद्द्यांबद्दल नियमित चर्चा करणं हे माध्यमांचं काम असावं म्हणून. एका घटनेच्या निमित्ताने तीन मराठी वृत्तपत्रं किती परस्पर विरोधी आणि माहितीच्या अपुरेपणामुळे आलेल्या आत्मविश्वासाने बोलू शकतात ते आपण नोंदीच्या पहिल्या भागात नोंदवलं. ही बडबड आता चारेक दिवसांत थांबेल. पण ही बडबड जरा शांतपणे सुरू राहणाऱ्या चर्चेसारखी होत राहिली तर जास्त बरं असेल का? (या संदर्भात रमेश यांनी आत्ताच्या जानेवारीमध्येही एक भाषण दिलं, त्यात ते म्हणालेले की, ह्या मुद्द्यावर उपाय शोधण्याची सुरुवात आदिवासींना माणसं म्हणून वागवण्यापासून करायला हवी. ह्या प्रश्नाला केवळ सैनिकी मार्गांनी उत्तर मिळणार नसून राजकीय मार्ग वापरावे लागतील, इत्यादी.)

गेल्या आठवड्यातल्या घटनेमागचा जो मूळ प्रश्न आहे त्यावरचं उत्तर आपल्याला सापडलंय असं तर अर्थातच नाही. आणि 'रेघे'च्या अनेक मर्यादाही आहेत. पण त्या मर्यादांमध्ये 'रेघे'वर
या विषयासंबंधी आपण तीन नोंदी करायचा प्रयत्न केला. यातल्या 'मिस्टर ग्लाड'चं काय करायचं?' या सुरुवातीच्या नोंदीत 'सत्तेचा गैरवापर कसा रोखायचा?' हा एक प्रश्न जॉर्ज ऑर्वेल, अनिल बर्वे आणि तुळसी परब यांना सोबत घेऊन आपण लिहिला. मग 'मिस्टर ग्लाडचं काय करायचं? : भाग दोन' या नोंदीत प्राध्यापक निर्मलांग्शू मुखर्जी यांचा लेख इंग्रजीतून मराठीत अनुवादित करून नोंदवला. या नोंदींमधून नक्षलवादाच्या मूळ प्रश्नाच्या दोन - परस्परविरोधी नव्हे, तर पूरक असलेल्या - बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आता तिसरी बाजू आजच्या नोंदीत येईल, असं पाहिलंय. ही बाजू अर्थातच माध्यमांबद्दलची आहे. कारण माध्यमं हीसुद्धा सत्तेचाच भाग आहेत. 'अधिकाधिक लोकांपर्यंत म्हणणं पोचवण्याची क्षमता' या निकषावर सत्ताधारी असलेली मुख्य प्रवाहातली माध्यमं परवाच्या घटनेनंतर आपल्याला काय सांगू लागली ते तपासून, माध्यमांच्या व्यवस्थेतल्या 'मिस्टर ग्लाडचं काय करायचं' हा फक्त प्रश्नच उपस्थित करू शकलोय, कारण त्याचं उत्तर आपल्याकडे नाही.

ज्या वयाच्या मुलांसाठी करियरच्या पुरवण्या ही वृत्तपत्रं काढतात, त्याच वयातली मुलं बंदुका घेऊन मरणाच्या दारात कसल्या खेळामध्ये वापरली जातायंत? हाही एक प्रश्न आहे. करियरच्या पुरवण्या काढल्या जातात, कारण ती त्या उत्पादनाच्या ग्राहकांची मागणी असावी. पण ग्राहक नसलेली मुलं कधी नक्षलवादी म्हणून, कधी 'विशेष पोलीस अधिकारी' म्हणून किंवा कधी नुसतेच 'नागरिक' नसलेले आदिवासी म्हणून मरत राहणं बरोबर नाही, एवढं तरी किमान मान्य करता येईल का?

फोटो : indiatogether.org

Monday, 27 May 2013

नेमाडे : व्यक्ती आणि प्रकृती - भाऊ पाध्ये

भालचंद्र नेमाडे यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी झाला. म्हणजे आज त्यांच्या वयाची पंच्याहत्तर वर्षं पूर्ण होतायंत. त्यानिमित्ताने 'रेघे'वर १९८८ सालचा एक लेख प्रसिद्ध होतोय. त्या वर्षी जुलैमध्ये 'ललित'च्या अंकात आलेला हा भाऊ पाध्ये यांचा लेख पंचवीस वर्षांनी पुन्हा प्रसिद्ध करून काय होईल? एकतर नेमाड्यांची पंच्याहत्तरी साजरी करता येईल आणि 'वाङ्मयीन इतिहास' असं ज्याला म्हणतात त्यालाही हातभार. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हा लेख वाचताना वाचकांना मजा येईल यात्री खात्री. भाऊ आता नाहीत. माणूस गेल्यानंतर अनेक संदर्भ बदलतात. माणसाचं वय बदलतं तसेही संदर्भ बदलतात. पण तरीही या लेखाची मजा वाचकांना घेता येईल? प्रयत्न करायला काय जातंय.
***

भालचंद्र नेमाडे
''हॅलो, इन्स्पेक्टर धुरंधर भाटवडेकर हिअर...'' असे शब्द 'रंगबिरंगी' या हृषिकेश मुखर्जीच्या चित्रपटात धडधडत कानांवर येतात... तशीच मी जेव्हा डॉ. भालचंद्र नेमाडे हे शब्द ऐकतो तेव्हा कानाच्या पडद्याची स्थिती होते. आणि 'रंगबिरंगी'मध्ये इन्स्पेक्टर धुरंधर भाटवडेकर हे नाव ऐकताच आपल्याला त्याचे दर्शन होण्यासाठी टेरिफिक उत्सुकता वाटते, तशी भालचंद्र नेमाडे हे नाव माझे मित्र अशोक शहाणे यांनी १९६०-६१ सालामध्ये 'रहस्यरंजन' मासिकाच्या कचेरीमध्ये उच्चारल्याबरोबर मलाही उत्सुकता वाटली होती. त्या वेळेस ते नुसते नेमाडे होते. त्यांच्या नावाचा गौरव हेमाडपंतांच्या स्टाइलवर नेमाडपंत असाही केला जात असे. कधी कधी नेमाड्या असाही. भालचंद्र अशी त्यांच्या नावाच्या भाळावर चंद्रकोर होती; तिचा फारसा कोणीही विचार करत नसत.

नेमाडे आम्हाला भेटले १९६० साली. हे एक मराठी साहित्यातील व्यवच्छेदक साल आहे. १९६० साली मराठी साहित्यातील लघुकथा-संस्कृतीची, सौंदर्यवादी समीक्षेची आणि सात छेद नसलेल्या काव्याची वाटचाल संपली आणि कोसला-संस्कृती, बांधिलकीवादी समीक्षा व नवकविता - मग ती दिलीप चित्रे, अरुण कोलटकरची किंवा नारायण सुर्वे आणि दया पवारांची - कुणाचीही म्हणा- यांची वाटचाल सुरू झाली होती. असे हे १९६० साल, ज्या वर्षी आम्हा बऱ्याचशा बोरूबहाद्दरांचा वाङ्मयीन जन्म झाला. आम्ही मराठी साहित्यात धडपडणारी मुले (साने गुरुजींचाही आम्हाला वारसा लाभल्याने) मराठी साहित्यामध्ये 'अमुक करावे - तमुक करावे' या इर्षेने पेटलेली उत्साही मंडळी - रमेश समर्थ, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, सुधीर कोलटकर, मनोहर ओक, अशोक शहाणे. डिकन्सच्या शब्दांत 'ते दिवस चांगले होते' - कारण अशी भरभक्कम मंडळी मराठी साहित्याचे बरेवाईट करण्यासाठी जिद्दीने उभी राहिली... 'ते दिवस वाईट होते' - कारण खिशात दमडा कुणाच्याच नसे, चहा प्यायचा, सिगारेटी फुंकायच्या, आंटीकडे जायचं, म्हणजे पैशाशिवाय कसं भागेल? या वाङ्मयप्रसूतीइतक्या मोलाच्या गोष्टी नव्हत्या; पण खिशात पैसा नसला की बोलावंच लागतं - ते दिवस वाईट होते...

असो. या १९६० साली मराठीमध्ये 'रहस्यरंजन' नामक एक मराठी मासिक धूमकेतूसारखे उगवले होते. जणू आम्हाला उधळण्यासाठी एक अंगण पाहिजे होते ते मिळाले. 'रहस्यरंजन'ची आयुर्मर्यादा सर्वगुणी मासिकांइतकीच. म्हणजे वर्ष-सहा महिने होती. हल्ली एखादा बिल्डर मोकळ्या मैदानावर कब्जा करतो त्याप्रमाणे नंतर ते मासिक आमच्या हातून गेले. या 'रहस्यरंजना'ची सूत्रे अशोक शहाणे हा आमचा मित्र सांभाळत असे. जुने जाऊ द्या मरणालागुनी, हा संपादकाचा खाक्या. मान्यवर, प्रतिष्ठासंपन्न वगैरे बनलेला लेखक - म्हणजे नकोच. एखादा माणूस ताजे ताजे लिहू लागला की त्याला चक्क गाठून तो साहित्यसेवेच्या वेठीला लावत होता. नटवर्य माधव वाटवे, संगीतकार जीतेंद्र अभिषेकी किंवा राजकारणातला मधू दंडवते वगैरे. त्यांच्याप्रमाणे नेमाडे या प्राण्यालाही अशोकने असाच धरला होता. चक्क कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा, सांगवीसारख्या अनोख्या गावातला कारा विद्यार्थी. ''अरेss, नेमाडे काय ग्रेट आहे...! - अशोककरवी नेमाडेची साक्षात परिचय होण्यापूर्वी अटळ अशी ओळख. त्याला पाहण्यासाठी 'ग्रेट साहित्यिक दिसे कसा आननी' अशा प्रचंड अपेक्षेने तुडुंब न्हालो असता एक दिवस 'रहस्यरंजन'च्या कचेरीवर नेमाडे साक्षात हजर झाला. लांब लांब ढेंगा, डोळ्यांवर कठीण भिंगे, त्यातून तुमच्यावर फिक्स होणारी रिती नजर, तोंडात विडीचे इवलेसे थोटूक व एवढी लाख. भिवया ताणलेल्या. वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार अशा रीतीने हातवारे करीत, खर्ज लावून, अडखळत पण ठाम बोलणे-हसणे. कुठेही राखून वागणे नाही. पण एकूण त्याच्यामध्ये साने गुरुजींच्या गावाची शर्मिली छटा दिसायची. लिहिणारा बिनधास्त पहिलाच लेख वगैरे श्रीकेक्षींवर (श्री. के. क्षीरसागर). त्यांची त्यामुळे नक्कीच झोप उडाली असावी, आणि मराठी जो जो वाचतो त्याला त्याचे पाळण्यातले पाय दिसले. पहिल्याच लेखात 'कोसला'शैलीही आहे. उदाहरणार्थ, वगैरे वगैरे, ह्या लकबीबाबत म्हणत नाही. एकूणच शैली, वाक्यांमधली लय, शब्दयोजना वगैरे.

तर एकदा चिंतू खानोलकर माझ्याबरोबर लोकलमधून प्रवास करत होते. नेमाडेचा विषय निघाला, चिंतू हॉरर पिक्चरमधले कॅरेक्टर पाहिल्याप्रमाणे त्याचे भयभीत वर्णन करू लागला. ''काय दिसतो रे हा नेमाडे! कसा लांब लांब टांगा टाकत चालतो - आणि चष्म्यामधून रोखून पाहतो...''

आय एन्जॉइड चिंतू दॅट डे!

मराठी नामांकित दर्जेदार नियतकालिकांच्या भाग्याने 'रहस्यरंजन' बंद झाले. उरलं आमचं नशीब. अशोक पुण्याला गेला. माझी बॉम्बे डाइंगमधली नोकरी सुटली. रघू एकच नोकरीला होता. कुणीच काही करत नव्हते. 'अमुक करू या- तमुक करू या-' ही भाषाच बंद झाली होती.

तसे आम्ही 'रहस्यरंजन'च्या रिकाम्या मशिदीत फिरकत असूही. इथेच नेमाडेला मानणारी दोन मुले- राजा ढाले व वसंत गुर्जर- आम्हाला भेटली. ते काहीतरी लिहीत असावेत. नेमाडेला त्यांनी आपलं काहीतरी लिखाण दाखवलं असावं... नेमाडेने त्यांच्या पाठीवर थाप मारली होती. नेमाडेच्या वागण्यात कसलाच आखूडपणा दिसत नव्हता. नेमाडे त्यांच्याशी चांगला होता. पर्यायाने आम्हीही त्यांच्याशी चांगले झालो.

नेमाडे चर्चगेट स्टेशनजवळच्या युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये राहात होता. मी अनेकवेळा त्याला भेटायला जात असे. विशेषतः सकाळी, जेव्हा तो अर्धी रात्र वाचन वगैरे करून सकाळी उठायचा- आणि त्याला चहा हवा असायचा. म्हणजे त्याच्याबरोबर माझीही सोय होत असेच. 'सन्मान' का 'सत्कार'मध्ये आम्ही उतरत असू.

''भाऊ, चहा?...'' नेमाडेची पृच्छा.

''हूं... आणि मसाला डोसा.''

''मसाला डोसा?'' नेमाडे खिसा चाचपत...

मग स्वतःसाठी जाम-टोस्ट वगैरे. मला मसाला डोसा ऑर्डर करून म्हणत असे, ''तुला रघ्या सिंधी म्हणतो तो उगीच नाही!''

तो इतका माझा दोस्त. पण मी कधी साहित्यचर्चा वगैरे केल्याच नाहीत- कारण मला साहित्यात काही समजतच नव्हतं. तो काय शिकतो, कुठच्या वर्गात आहे हे मला ठाऊक नव्हतं. वर्गमित्र सांगत, तो तुकाराम वाचतो- आणि त्यातील अधोरेखित धुंडाळत वगैरे असतो. एक दिवस मी हॉस्टेलच्या दारावर गेलो. दार बंद. चौकशी करता समजलं की तो आपल्या घरी म्हणजे गावी गेला. त्याने परीक्षा वगैरे दिली का? मला एकदम आयुष्यात खड्डा पडल्यासारखं वाटलं. आता हा प्राणी केव्हा भेटणार?

'वैतागवाडी' पुण्याला 'साधना'वाले छापत होते. एक दिवस पुण्याला जाऊन काम पाहून यावं म्हणून मी निघालो. टिळक रोडवरून अश्लीलमार्तंड मराठ्यांचे घर शोधत शोधत अशोकला गाठले. त्याचा मुक्काम रा. ज. देशमुखांच्या वाड्यावर होता. तो आला नि माझे कपडे उचलले नि आम्ही देशमुखांच्या वाड्यावर पोहोचलो. तोपर्यंत नेमाडे मला भेटणार आहे याची कल्पनाही नव्हती. वाड्याच्या वळचणीला एका खोलीत नेमाडे कादंबरी लिहीत बसला होता. त्याला कोणी त्रास देऊ नये म्हणून त्याला बंदिवासातच ठेवले होते. आम्ही बोलायचो ते जेवणावरच.

नेमाडे आणि कादंबरी लिहितोय? अद्भुतच! एकूण त्याची प्रकृती समीक्षकाची म्हणून...! सध्या समीक्षकांनी काही बऱ्यापैकी क्रिएटिव्ह लिहिलेलं नाही. असो. नेमाडे त्याच्या सुप्रसिद्ध टोच्या थिअरीप्रमाणे लिहीत असताना दिसला. नीट कापलेल्या कागदांची एक थप्पी... लिहिलेल्या कागदांची दुसरी थप्पी. आणि नेमाडे कागदांसमोर अक्षरशः जेठा मारून बसलेला. एखादे प्रकरण लिहून काढायचा आणि अशोकच्या हातात ते देत म्हणाला, ''उदाहरणार्थ - मी वेताळच्या टेकडीचं प्रकरण कादंबरीत घालतो!'' अशोक, ''बरं!'' आणि वाचून काढून मग उत्साहात येऊन, ''अरे हे तर पाहिजेच!'' दरम्यान माझी नि अशोकची बोलणी. तिकडे छापखान्यामध्ये देशमुख एक एक प्रकरण नेऊन टाकताहेत आणि प्रुफे घेऊन येताहेत. मी दोन-तीन दिवसच मुक्कामाला होतो. काम इतके झपाट्याने चालले होते की मी निघता निघता कादंबरी छापून, बांधून तयार. देशमुख माझ्या हातात 'कोसला'ची प्रत देत म्हणाले, ''असं काहीतरी लिहा.'' म्हणजे ते छापणार होते! सुदैवाने, देशमुखांनी छापावे असे काही लिखाण माझ्या हातून झाले नाही. आणि नेमाडेला 'कोसला'चा जो अनुभव आला त्यावरून झाले नाही ते बरेच असे म्हणावे लागते.

'कोसला'बद्दल सांगायला हवे काय?

'कोसला'वर घवघवीत समीक्षणे आली! 'सत्यकथे'मध्ये दिलीप चित्रेचे समीक्षण तितकेसे न्याय देणारे नव्हते. राजा ढाले दिलीपवर फारच गरम झाला होता. एका रंगीबेरंगी कागदावर त्यांनी दिलीपला तापून पत्र लिहिले व ते दिलीपच्या हातात ठेवले.

''तू काय लिहिलेस दिलीपला?'' मी विचारले.

तर राजा म्हणाला, ''चांगले झाडले आहे मी दिप्याला. 'कोसला'विरुद्ध लिहितो म्हणजे काय?''

राजाइतके 'कोसला'वर आजही प्रेम करणारी मंडळी आहेतच. परवा वसईच्या एका काव्यसंमेलनाच्या निमित्ताने जमलेल्या कवींमध्ये 'कोसला' किंवा नेमाडेला न मानणारा एक ब्लॅकशिप निपजलाच. मग काय? दुसऱ्या मंडळींनी त्याची अशी हालत करून टाकली... मध्यरात्री दोन तास, झोपी गेलेल्यांना जागे करीत त्यांनी त्या कवीला फैलावर घेतले होते.

नेमाडेने इतके श्रेष्ठ पुस्तक लिहूनही त्याचे काही झाले नाही. त्यामागील कारणे काही असोत. पण नंतर लेखनाच्या आघाडीवर नेमाडेकृत शांतता एकूण सर्वांनाच जाचक झाली होती. नेमाडेची कादंबरी हे नाव घेण्याजोगे पुस्तक ठरले. त्याचा एक वेगळा आनंदही मला वाटत होता. आपल्या 'रहस्यरंजन' काळातल्या किंवा त्याहीपूर्वीच्या मित्रांपैकी एकाने काहीतरी काढून दाखवले. अशोकने 'क्ष' किरणात जी एक कबुली दिली होती की आम्ही मित्रांनी विशेष काही केले नाही. एक दिलीपच्या कविता आणि भाऊच्या दोनतीन कादंबऱ्या, वगैरे; तो नाकर्तेपणाचा काळ जणुकाही संपुष्टात आणला होता. मला माझे हे मित्र नेहमीच मराठी वाङ्मयातले 'अॅक्मे ऑफ धी लिटररी (मराठी) वर्ल्ड' वाटत होते. नेमाडे, दिलीप, अशोक यांच्याविषयी काय सांगावे? 'पामऑलिव्ह का जवाब नही!' याच स्टाइलवर इन लोगों का जवाब नही असेच मी म्हटले असते. पण, अद्याप असे म्हणण्याइतकी समर्थनीय व भरीव कामगिरी कोणाकडून झाली होती? हां, आता नेमाडेने 'कोसला' लिहिली म्हणजे 'कोसला' का जवाब नहीं असे म्हटले असते तर कोणी माझे तोंड धरले असते?

नेमाडे त्यानंतर एक दिवस काळाचौकी इथे त्याच्या काकाकडे आला तेव्हा भेटला... तो इंग्लंडला जाण्यापूर्वी. कालक्रमानुसार नेमाडेचे लग्न, इंग्लंडला जाणे, त्याच्या परीक्षा हे नीटसे माझ्या ध्यानात नाही. लेखकांच्या जेवणा-खाण्याचे जरी महत्त्व आपल्याला वाटले नाही तरी शोशन्नाने (माझी पत्नी) केलेले मासे आणि नेमाडे यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. म्हणून की काय, इंग्लंडला गेल्यावर त्याने शोशन्नाला खास हिब्रू लेखकांची पुस्तके भेट पाठविली होती. त्याबरोबरच नेमाडेचे एक सुंदर पत्रही आले होते. ते मला 'कोसला'इतकेच ग्रेट वाटले. मी ते सर्वांना वाचायला देत असे. इंग्लंडला खूप विद्वान जातात- प्रवासवर्णने वगैरेंचा टेंभा मिरवतात. पण वर्णन म्हटले म्हणजे असे हवे. त्यात म्हटले होते, ''इथली माणसे महिन्या-महिन्यात अंघोळ न केल्यासारखी दिसतात.'' हे मला आवडतं. गोऱ्यांचं फालतू कौतुक नाही.

नेमाडे इंग्लंड सोडून लवकरच परत आला. अहमदनगर कॉलेजमध्ये लागला किंवा कोठे तरी. त्यामुळे काही फरक पडत नव्हता. पण बरेच दिवस गाठभेट नव्हती. काय करत होता याची कल्पना नव्हती. पण 'कोसला'नंतर काही नाही असे बरेच दिवस गेले होते. असो. तो वर्ग चांगला घेतो का? त्याला पोरं ऐकतात का? टाय घालतो का?... असे माझ्यापुढे प्रश्न. कॉलेजचे वर्ग चालवणं म्हणजे चेष्टा नव्हे. अशा सिंपल माणसाचं हे काम नाही वगैरे.

पुढे नगरहून औरंगाबाद. (यामध्ये इंग्लंड कुठे आहे हे मला नक्की आठवत नाही!) औरंगाबादला त्याला बरे लोक भेटले. चंद्रकांत पाटील, रवींद्र किंबहुने, जहागिरदार, प्रकाश देशपांडे, बाबा भांड, उत्तम क्षीरसागर वगैरे वगैरे. इथे 'वाचा' म्हणून अनियतकालिक सुरू झाले. त्यातून नेमाडेचा पहिला बाँबगोळा बाहेर पडला- 'लेखकराव'. श्रीकेक्षींपासून लिहिण्यातला तोच तो परखडपणा, तीच धार. मराठी मासिकांनी महाराष्ट्रात लघुकथा-संस्कृती पसरवली आहे हे त्याचे म्हणणे त्याने इवल्याशा 'वाचा'मध्ये लिहिलं होतं, पण ते सर्व लहानथोरांना झोंबलं. त्याच्या शब्दांत, ''महाराष्ट्रभर जी मासिकांनी आणि दैनिकांच्या रविवार पुरवण्यांनी लघुकथा-संस्कृती जिकडे तिकडे पसरवली होती; त्याची जागा 'कोसला'संस्कृतीने भरून काढणं आवश्यक होतं.'' 'कोसला'संस्कृती तशी बांधिलकी असलेलीच संस्कृती होती. साहित्याची देशी जात ती जोपासत होती. महात्मा गांधी किंवा डॉ. लोहिया यांच्या विचारसरणीलातच जी सहृदयता होती ती त्यात होती. आणि मराठी साहित्यात गेली काही वर्षे लेखक म्हणजे एक ब्राह्मणासारखी उच्च जात म्हणून तत्कालीन लेखकांनी आपली पायरी वर उचलण्याचा खटाटोप केला होता. थोडक्यात, लेखकाच्या अमरत्वाची भूमिकाच नेमाडेच्या लेखी नामंजूर होती. एका कागदाच्या तावाला दहा हजार रुपये! मग कोण लिहील साहित्य? हा त्याचा सवालच लेखकाची भूमिका स्पष्ट करतो. इतर कुठल्याही माणसात व लेखकात फरक नाही. म्हणूनच त्याच्या कादंबरीत हिंदी सिनेमावाले प्रतिष्ठेने बसतात.

'वाचा' प्रकाशनाचे पुढे काही झाले नसले तरी औरंगाबादच्या मंडळींचे साहित्यप्रेम पुढे चालूच राहिले. नेमाडे प्रत्येकाला नीटपणे साहित्यसेवेला जुंपत होता. त्यामुळे औरंगाबादला कोणीही जावे. त्याच्या दिमतीस भलत्याच संख्येने दोस्त मंडळी गोळा होत होती. आणि व्यवसायामुळे ही मंडळी पुणे, कोल्हापूर, नागपूर वगैरे दूरदूर ठिकाणी जाऊन पोहोचली तरी साहित्यप्रेमाची ओढ त्यांना खेचतच राह्यली.

'कोसला'नंतर अनेक वर्षांनी 'बिढार', मग 'जरीला', 'झूल'. मराठीतील भाषेच्या छटांच्या अंगाने कादंबरी लिहिणारा नेमाडे एकच. त्यामुळे तो गोव्याला स्थलांतरीत होताच गोव्यातील मराठी भाषेवरून आता नक्की कादंबरी आपल्या हातात पडणार असे जो तो म्हणून लागला होता. अखेर नेमाडे प्रत्येक कादंबरी लिहीत होता आणि ही कादंबरी काही 'कोसला'सारखी नाही असे म्हणत म्हणत वाचक त्याचा स्वीकारही करत होते. मराठी कादंबरीच्या ढाच्यामध्ये नाही तरी व्यासपीठावर प्रादेशिक भाषा बोलणारी आणि भाषावैशिष्ट्य हेच कॅरेक्टर असलेली माणसे आता जागा अडवू लागली होती. त्याचप्रमाणे एकूण शिक्षणक्षेत्रातला बकालपणा निर्मम वृत्तीने समोर कॅमेरा धरल्याप्रमाणे टिपून त्यात अत्यंत मॅटर ऑफ फॅक्ट पद्धतीने नेमाडेने ठेवला होता. आता ह्या बकालपणाचे काय करावे याचा विचार या देशातले विचारवंत करतीलच असे नाही. कारण आपल्या देशामध्ये साहित्याची मर्यादा करमणुकीपुरतीच असे मानणारे विचारवंत व राज्यकर्ते आहे.

माणसामधील आणि साहित्यामधील अंतर वर्ज्य करीत करीत मराठी समीक्षेने जुनाट खाजगीपणा टाकण्याची वेळ आली होती. नेमाडेने समीक्षेमधला खाजगीपणा संपवला हे त्याचे कर्तृत्वच. अमुक कलाकृती श्रेष्ठ का तर ती समीक्षकाला पसंत पडली म्हणून; हे काही कलाकृतीचा दर्जा दाखवीत नाही.

नेमाडे मुंबईला आला की सर्वसाधारणतः त्याची वर्दी माझ्यापर्यंत पोहोचायची. आता तो तुकाराम वगैरे वाचून सज्ज आणि समृद्ध झाला होता. कधी तरी तो अशा अत्यंत संशोधनात्मक लिखाणासाठी तरी येत असे किंवा भाषण वगैरे प्रसंगांसाठी. एका भाषणामध्ये तर त्याने माझे उपरणे आणि साने गुरुजींचा पदर यांची गाठ मारून टाकली. वर असंही म्हटलं की, भाऊ कदाचित हे मंजूर करणार नाही वगैरे. एकदा कुमठा शेठनी त्याला पुस्तकांवर सह्या देण्यासाठी बसवलं. बिड्या ओढत ओढत, यत्किंचितही तोंडाला विश्रांती न देता तो पुस्तकांवर सह्या देत सुटला. शोशन्नाची त्यामुळे खूपच करमणूक झाली.

एकीकडे 'बिढार', 'जरीला', 'झूल' अशा कादंबऱ्या तो आता गिअरमध्ये टाकलेल्या गाडीच्या वेगाने लिहीत असतानाच स्वतःची अशी समीक्षा निर्माण करीत होता. त्या वेळच्या मराठी समीक्षेमधला भोंगळपणा म्हणून किती दाखवावा? 'वासूनाक्या'वर टीका करताना ही काही कामूच्या 'प्लेग'च्या तोडीची कादंबरी नाही असेही एखादा समीक्षक बेछूटपणे म्हणत असे. समीक्षेची ही रीत बदलायला हवीच होती. नेमाडे हा कुठल्याही विषयासंबंधी स्वच्छ विचार करणारा माणूस. म्हणजे आणीबाणी इंदिरा गांधीने लागू केली तरी तीबद्दलही त्याची भूमिका स्पष्ट होती. समीक्षेचा विचार करता जे काही समीक्षणासाठी सादर केलेले असेल ते, म्हणजे कलाकृतीचा आशय, आणि तो हाताळण्याची लेखकाची शैली, म्हणजे लेखकाच्या अनुभवाने उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व यांचा मेळ कुठे बसतो की नाही याचा समीक्षकाने विचार करायला हवा असे माझे मत होते. अलीकडील दूरदर्शनवरील मुलाखतीवरून नेमाडेला ही समीक्षेची मर्यादा किंवा कलाकृतीची व्याख्या मंजूर आहे असे वाटते.

एकूणच समीक्षणाचा प्रांत हा तारामंडळाचाच प्रदेश असावा. समीक्षा ही सोपी असावी. अर्थात ती वर्तमानपत्री आपण करीत आलो तर आतापर्यंत आपल्या पदरी निराशाच येते. नेमाडेही पूर्वसूरीप्रमाणे समीक्षेत क्लिष्ट बनला आहे, ही माझी तक्रार आहे. 'आशय' वगैरे रासायनिक शब्द 'कॉइन' केल्यामुळे ती अस्वस्थही करते. हा समीक्षेचा तारामंडळात परिभ्रमण करताना येणारा प्रॉब्लेम आहे की काय हे मला ठाऊक नाही. नेमाडे एरवीही सुबोध बोलणारा व लिहिणारा प्राणी आहे.

आपली प्रोफेसरकी तो इतकी व्यवस्थित सांभाळतो की एकदा स्व. नरहर कुरुंदकरच त्याचे माझ्याकडे कौतुक करीत होते. वर्गावर जाताना त्याची पूर्ण तयारी असते, इतकी की कुणालाही तक्रार करायला जागा उरत नाही, वगैरे. या कर्तव्यदक्षतेमध्येच दुसऱ्याविषयी वाटणारे प्रेम आणि त्याचबरोबर त्याला न सांभाळण्याचा भाग एकदमच येतो. माझे त्याने खूप कौतुक केले. पण 'वासूनाका सांगोपांग'च्या निमित्ताने मी संपादकांच्या वतीने त्याला प्रस्तावना लिहिण्यास सांगितले. त्यावेळी त्याने मला फटकारलेच, ''तुझे कौतुक तरी किती करायचे?''. नेमाडे असा माणसाला न सांभाळणारा, म्हणजेच फटकळ वगैरे आहे. पण तरीसुद्धा तो आपल्या पायावर भक्कम उभा आहे, ही गोष्टही उद्बोधकच आहे. एरव्ही लेखनाच्या क्षेत्रामध्ये लोक ज्याला त्याला सांभाळून काय मिळवतात हे मला कधी समजले नाही. नेमाडेने आपल्याला वेळप्रसंगी हासडले तरी तो मला आपलाच वाटतो.

परवा औरंगाबादला त्याचा निरोप आणि माझी षष्ठी करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा किंबहुनेंकडे थांबलो होतो. किंबहुनेचा मुलगा म्हणे म्हणत होता - ''मला नेमाडेवहिनींचा स्वभाव आवडतो. त्यांच्या जे मनात असेल तेच त्या बोलतील!''

एकूण नेमाडे जसा आहे तशीच त्याची बायको- हेही विलक्षणच!

Saturday, 25 May 2013

आशिष खेतान यांची बेचकी, म्हणजे 'गुलेल'

'पत्रकारिता' ह्या शब्दाचा थोडा प्रॉब्लेम असा की, त्यात 'पत्र' असण्यासोबत काही 'करणं' अपेक्षित असावं. म्हणजे नुसती पुरवलेली माहिती इकडून तिकडे करणं नव्हे, तर काही किमान प्रश्न विचारावेत, काही किमान शहानिशा करावी, थोडी स्वतःचीही तपासणी करावी, आपल्या परिसराबाबतीची माहिती घेत राहावं, इत्यादी गोष्टी. पण 'माध्यमं' (मीडिया) असं म्हटलं की हे सगळं 'पत्रकारिता' ह्या शब्दाचं लफडं अपेक्षित नसावं. कधी मनोरंजन इकडून तिकडे करा, कधी दुसरं काहीतरी इकडून तिकडे करा, इतपत पातळीवरून व्यवहार चाललेले असल्यासारखं चित्र आहे. आणि फार काही टेन्शन घ्यायला नको. अगदीच कोणी फार प्रश्न विचारायला लागलं, तर टाकून द्या की पुरवणीच्या 'मास्ट-हेड'खालीच 'अॅडव्हर्टोरियल, एन्टरटेन्मेंट, प्रमोशनल फिचर' अशी ओळ. मग कामच झालं. जबाबदारी नावाची गोष्टच नको. वाचकांनी त्या पुरवणीतला कुठला मजकूर पैशामुळे छापला गेलाय आणि कुठला 'पत्रकारिते'च्या निकषांमुळे छापला गेलाय हे त्यांचं त्यांनी ठरवावं. हे फक्त वृत्तपत्रांनाच लागू आहे असं नाही, तर साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं सगळ्यांना लागू आहे. बहुतेक जण कुठल्याच स्पष्टीकरणाची कुठलीच ओळ देत नसले आणि दावे कसलेही करत असले तरी अगदीच अपवाद वगळता ही ओळ म्हणजे माध्यमांचा नियम होऊ घातलाय, अशी परिस्थिती आहे. हे 'अपवाद' असं आपण म्हणतोय तेव्हाही ते संस्थात्मक पातळीवर नसून वैयक्तिक पातळीवर काही पत्रकारांचे अपवाद, असं आहे. आणि ते असणारच. बाकी यात क्षेत्राचीही मर्यादा नकोच, म्हणून चित्रपटप्रसिद्धीपासून व्हाया वैचारिकता देशाविरोधातील गुन्ह्यांपर्यंत किंवा जागतिक घडामोडींपर्यंत सगळंच अशा 'ओळी'खालून येऊ शकतं. कधी पैशाच्या संदर्भात, कधी अडाणीपणाच्या संदर्भात, कधी हितसंबंधांच्या संदर्भात जो मजकूर माध्यमांमधून आपल्यापर्यंत येतोय तो तपासण्याची जबाबदारी मग वाचकांवरच पडणार हे उघड आहे. आपण 'रेघे'वर ही जबाबदारी पार पाडण्याचा मर्यादित प्रयत्न अफझल गुरूसंबंधीच्या नोंदीत आणि अलीकडच्या नक्षलवादासंबंधीच्या एका लेखाच्या नोंदीत केला. हे अर्थात फारच मर्यादित होतं. पण तरी आपले मुद्दे एवढेच की, पत्रकारिता आणि माध्यमं यात फरक आहे आणि आता तपासणीची जबाबदारी वाचकांवर पडते.

आशिष खेतान
हे वाचकावरच्या जबाबदारीचं बोलणं होण्याचं निमित्त ठरलेय ती आशिष खेतान यांची बेचकी. म्हणजे त्यांनी सरत्या आठवड्यात सुरू केलेली वेबसाइट 'गुलेल' (मराठीत अर्थ : बेचकी). आशिष खेतान 'तेहेलका' साप्ताहिक सोडून आता ह्या कामाला लागलेले आहेत. 'तेहेलका'त त्यांनी गुजरातमधल्या दंगलींपासून काळ्या पैशासंबंधीच्या काही प्रकरणांपासून ते अलीकडच्या महाराष्ट्रातल्या सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यापर्यंत अनेक ठिकाणचे काही काळेबेरे व्यवहार उघडे पाडल्याचं काहींना माहीत असेल. ह्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं की नाही हाही महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण खेतान यांनी त्यांच्या परीने काही प्रयत्न केल्याचं वाचक म्हणून आपल्याला कळू शकतं. (त्यांचे इतर काही प्रयत्न इथे पाहता येतील).

आता खेतान यांनी 'गुलेल' ह्या वेबसाइटच्या माध्यमातून काम सुरू केलंय. सुरुवातीलाच त्यांनी मुंबईतील लोकल रेल्वे गाड्यांमधील ११ जुलै २००६ रोजी झालेले बॉम्बस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट व २००६ ला मालेगावला झालेले स्फोट या तीन प्रकरणांमधील काही आरोपींना फसवेपणाने या प्रकरणात गोवण्यात आलंय किंवा कसं, यासंबंधीचे खुलासे करणारा रिपोर्ट 'गुलेल'वर प्रसिद्ध केलाय. (एकदोन).

आपल्या ह्या नोंदीचा उद्देश खेतान यांच्या 'बेचकी'ची ओळख करून देणं हा होता. त्याच्या पार्श्वभूमीसाठी आपण जो परिच्छेद सुरुवातीला लिहिला, त्याच अर्थाचं काही 'गुलेल'च्या ओळखीतही लिहिलेलं आहे, ते असं : आम्ही एक असं वृत्तीय पर्यावरण विकसित करू, ज्यात आमचे वाचक केवळ बातम्यांचे ग्राहक नसतील तर ते आमचा संपादकीय कार्यक्रमही घडवतील.

त्यामुळे वाचकांवर जबाबदारी पडणारच. आणि त्यामुळेच खेतान जे म्हणतायंत तेही तपासून घ्यावं लागेल. कारण जर सगळा बाजार आहे हे मान्यच करायचं असेल, तर मग वस्तू तपासून घ्यायला नको काय? विकत घेतलेले कपडे फाटके निघाले तर, किंवा प्लॅस्टिकची बादली घरी आणल्यानंतर तिला खालून लहानसं भोक असल्याचं कळलं तर, किंवा मिसळीच्या रश्श्यात अजिबात मीठ पडलं नसेल तर काय करता? तितपतच करायचंय. कारण, 'अॅडव्हर्टोरियल, एन्टर्टेन्मेंट, प्रमोशनल फिचर' ही ओळ कुठे लपलेली असेल ते सांगता येत नाही. बाकी, 'बेचकी' नाव फार सुंदर ठेवलंय खेतान यांनी. कोण किती ताकदीने मारू शकेल, किती वजनाचा खडा मारू शकेल, नेम कसा बसेल, नेमबाजीत कोण कितपत इंटरेस्ट घेईल, ह्या गोष्टींची उत्तरं वेगवेगळी असतील, पण 'बेचकी' आहे एवढं खरं.

Thursday, 23 May 2013

माधुरी दीक्षित, घागरा, माध्यमं व किर्केगार्द

ए साहेबान, कदरदान, मेहरबान । ए दिल थाम के बैठीये । क्यों की अब आपके सामने तशरीफ ला रही हैं । आगरा की अझीम फनकारा । मल्लिका-ए-हुस्न, नूर-ए-नज़र । मोहतरमा, मोहिनी..

हे शब्द तुमच्या कानावर अलीकडच्या काही दिवसांमध्ये पडलेत काय? असतील तर बरंय, नसतील तर पाडून घेता येतील -

'ये जवानी है दिवानी' असा जो पिक्चर येऊ घातलाय, त्यातलं हे गाणं. यातली सुरुवात आपण नोंदीच्या सुरुवातीला दिली, त्यानंतरची मधली दोन कडवी गाळून चौथं कडवं आपल्या कामाचं आहे. ह्या कडव्यातल्या दोन ओळी अशा :
टीव्ही पे ब्रेकिंग न्यूज, हाये रे मेरा घागरा
बगदाद से लेके दिल्ली व्हाया आगरा
हे अगदीच खास आहे आणि इंटरनेटवर काही ठिकाणी याची नोंद घेतलीही गेलेय. बाकी गाणं, त्यातले शब्द ह्या बाजूने काही बोलण्यासारखं नाही, पण माध्यमांबद्दलच्या ह्या विधानाची मात्र मजाच आहे. म्हणजे हे गाणं ऐकल्या ऐकल्या पुढचा चॅनल बदलाल तेव्हा बातम्या, मग अजून पुढे गेलात तर परत कदाचित हेच गाणं, मग परत चॅनल बदललात तर कदाचित परत बातम्या, मग परत गाणं आणि परत बातम्या आणि त्यात ह्या गाण्याबद्दल काही बडबड आणि मग पुढच्या चॅनलवर परत बातम्या किंवा मग हे गाणं. किंवा बातम्याही आणि गाणंही. किंवा बातम्यांमागून गाणं. किंवा गाण्यामागून बातम्या. आणि सादरीकरण म्हणजे काय विचारता? मोहिनीच एकदम!

यात एक भर घालण्यासारखं आहे.

सोरेन किर्केगार्द
(५ मे १९१३ - ११ नोव्हेंबर १८५५)
अस्तित्ववादाचा बाप मानला जाणारा जो सोरेन किर्केगार्द, ज्याच्या जन्माला आत्ताच्या पाच मे रोजी दोनशे वर्षं पूर्ण झाली, आणि ज्याच्याबद्दल येत्या वर्षभरात 'रेघे'वर जरा तपशिलात आणि झेपेल तशी एखादी तरी नोंद करण्याची उमेद आपण राखून आहोत, त्या किर्केगार्दने माध्यमांबद्दल काय लिहिलंय ते माधुरीच्या सुंदर निमित्ताने आठवूया.

किर्केगार्द म्हणतो :

बडबड करायला काहीतरी मिळावं, एवढीच गर्दीची मागणी असते. आणि यात असाही अर्थ आहे की एकमेकांबद्दल बडबड करायला काहीतरी हवं असतं, आपल्या निरर्थक आयुष्यांबद्दल, आपल्या आयुष्यातल्या शक्यतो फुटकळ गोष्टींबद्दल बडबड करायला हवी असते. गर्दीला इतर कशाचाही कंटाळा येतो. त्यांना फक्त एकाच गोष्टीची हाव असते - बडबड करून स्वतःमध्ये प्रदूषण घडवणं, आणि ही हाव पूर्ण करण्यात ते पत्रकारांच्या मदतीने सामील होतात.

पत्रकार हे पाळीव प्राणी बाळगणारे असतात, जे लोकांना बडबडीसाठी खाद्य पुरवतात. पुरातन काळी वन्य प्राण्यांना माणसं खायला घातली जात. आता पत्रकारांनी चवीष्टपणे तयार केलेल्या माणसांना लोक खातात.
(प्रोव्होकेशन्स : निवडक किर्केगार्द - संपादक चार्ल्स ई. मूर- या पुस्तकामधून)

किर्केगार्दचं म्हणणं कोणाला जरा जहाल वाटू शकतं, आणि आपण ते जसंच्या तसं मान्य करायलाच हवंय असंही नाही. कारण त्याने एकदम शिक्काच मारून टाकलाय, आणि त्याला एकूण 'गर्दी' ह्या संदर्भात काही म्हणायचंय. शिवाय तो बऱ्याचदा देवाच्या अंगाने माणसं तपासतोय म्हटल्यावर हे असं म्हटलं जाणारच. किर्केगार्द डेन्मार्कला होऊन गेला, त्यानंतर आता अनेक वर्षं पण होऊन गेल्येत, त्यामुळेही त्याचे संदर्भ जरा तपासून घ्यायला हवेत. ज्यांनी किर्केगार्दचं अधिक काही वाचलं असेल ते यावर अधिक काही बोलू शकतील, पण त्याची कित्येक म्हणणी आजच्या काळालाही लागू आहेत हे तरी साधारण कोणीही मान्य करेलच. म्हणजे वरचा परिच्छेद वाचल्यावर व्यक्ती आणि गर्दीचा संबंध, व्यक्ती-व्यक्तीचा संबंध नि आता व्यक्तीभोवती फिरणाऱ्या माध्यमांमुळे झालेली व्यक्तीची अवस्था, असे काही; व आपण 'रेघे'वर आत्तापर्यंत नोंदवलेलेही काही मुद्दे कोणाच्या डोक्यात डोकावू शकतील.

किंवा कोणी असंही म्हणेल की, मला काय देणं-घेणं आहे हा कोण किर्केगार्द का कोण काय म्हणाला त्याच्याशी? त्यामुळे समजा त्याच्या खोलात कोणाला जायचं नसेल तरी जाता जाता त्याच्या म्हणण्याकडे थोडंसं लक्ष दिलं तरी चालेल, म्हणजे आपल्या आजूबाजूला चाललेल्या माध्यमांच्या बडबडीचा तपास करायला जरा बरं जाईल आणि आपण पण माध्यमांच्या माध्यमातून बडबडतो ते काय आहे हेही तपासता येईल.

बाकी, आत्ताच्या पंधरा मे रोजी सेहेचाळीस वर्षांच्या झालेल्या माधुरी दीक्षित यांच्यापुढे काही बडबड करावी अशी ताकद माझ्यात तरी नाही, म्हणून ह्या नोंदीपुरती बडबड आता थांबवू.
माधुरी दीक्षित

Saturday, 18 May 2013

थोरो आणि मुंग्यांचं महाभारत

हेन्री डेव्हिड थोरो
मागच्या नोंदीत आपण 'लॅफम्स क्वार्टर्ली'ची ओळख नोंदवून ठेवली. या त्रैमासिकाने 'निसर्ग' ह्या विषयाला वाहिलेला जो अंक काढला होता, त्यात हेन्री डेव्हिड थोरो (१२ जुलै १८१७ - ६ मे १८६२) याच्या 'वॉल्डन'मधला एक मजकूर छापला होता. मागच्या नोंदीतल्या म्हणण्याला जोड म्हणून आणि थोरो गेला त्याच्यानंतरच्या एकशेएकावन्नाव्या वर्षी त्याची आठवण काढावी म्हणून 'लॅफम्स क्वार्टर्ली'मधे आलेल्या त्या मजकुराचं रूपांतर थोरोच्या परवानगी करून नोंदवतो आहे. काही चुकलं असेल तर थोरो आपल्याला माफ करेल अशी आशा.

१८४५ साली वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी थोरो अमेरिकेतल्या कॉन्कर्ड इथल्या आपल्या घरापासून व कुटुंबापासून दूर वॉल्डन तळ्याकाठी स्वतःच्या हातांनी बांधलेल्या एका खोलीच्या घरात राहायला गेला. अन्न जमवण्यापासून सर्व कामं करून त्याने त्या जागेत दोनेक वर्षं काढली. या काळातल्या आपल्या अनुभवांवर त्याने लिहिलेलं 'वॉल्डन' हे पुस्तक. त्यातला हा मजकूर आहे.
***

मुंग्यांचं महाभारत
 

- हेन्री डेव्हिड थोरो


एके दिवशी बाहेर पडून मी घराशेजारीच रचून ठेवलेल्या लाकडांजवळ गेलो. जाळ म्हणून वापरण्यासाठी जमवून ठेवलेली ती लाकडं म्हणजे तशी झाडांची खोडंच होती. तिथे मला दोन मोठ्या मुंग्या दिसल्या. एक लाल रंगाची होती, तर दुसरी जरा मोठी - जवळपास अर्धा इंच लांबीची, काळ्या रंगाची मुंगी होती. त्या दोघीही एकमेकींशी लढत होत्या. एकदा दुसऱ्या मुंगीच्या वरचढ ठरता आलं की पहिली मुंगी दुसरीला सोडत नव्हती. अडखळत, धडपडत त्यांची लढाई सुरू होती. त्या लाकडांच्या थप्पीमधल्या कपच्यांवर त्या अविरतपणे घरंगळत होत्या, पडत होत्या. अजून जवळ जाऊन पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की त्या कपच्यांवर आणखीही मुंग्या होत्या. तिथे ह्या लढवय्या मुंग्या पाहून मला जरा आश्चर्य वाटलं. आणि ती साधीसुधी लढाई नव्हीत, तर मुंग्यांमधलं वांशिक युद्ध होतं. लाल मुंगी कायम काळीविरोधात चेतावल्यासारखी पुढे यायची आणि अनेकदा दोन लाल एका काळीविरोधात लढत असायच्या. लाकडाच्या त्या साठ्यातल्या टेकड्यांमध्ये आणि दऱ्यांमध्ये या झुंडीच्या झुंडी उभ्या होत्या. आणि जमिनीवर सगळीकडे लाल आणि काळ्या, दोन्ही बाजूंच्या मेलेल्या आणि मरत असलेल्या मुंग्या पसरलेल्या होत्या. मी प्रत्यक्ष पाहिलेली ती एकमेव लढाई होती आणि लढाई सुरू असताना मी जिथे प्रत्यक्ष वावरत होतो अशी ती एकमेव युद्धभूमी होती. कत्तलकारी युद्ध सुरू होतं. एका बाजूला लाल रिपब्लिकन होते आणि दुसरीकडे काळे साम्राज्यवादी होते. दोन्ही बाजूंनी प्राणघातक लढा सुरू होता, तरी मला कोणताही आवाज ऐकू येत नव्हता.

विशेष म्हणजे मानवी सैनिक कधीच एवढ्या निर्धाराने लढलेले नसावेत. त्या लाकडी कपच्यांमधल्या दरीत पडलेल्या सूर्यकिरणांमध्ये मला दुसरी एक मुंग्यांची जोडी एकमेकांविरोधात जुंपलेली दिसत होती. आता दुपारची वेळ होती आणि त्यांनी बहुधा सूर्य मावळेपर्यंत किंवा जीव मावळेपर्यंत लढत राहण्याचा निश्चय केलेला होता. एक लहानखुरी लाल योद्धा मुंगी एखाद्या अबलख घोड्याप्रमाणे तिच्या विरोधकांच्या आघाडीवर तुटून पडली होती. आणि युद्धभूमीवर अडखळत चाल करण्याच्या तिच्या या प्रयत्नांमध्ये एकही क्षण तिने पायाच्या टोकाजवळच्या एका विरोधकाला छळणं सोडलं नव्हतं नि एकाला आधीच यमसदनाला धाडलं होतं. नंतर मी आणखी जवळ जाऊन पाहिल्यावर दिसलं की, एका बलवान काळीने त्या लाल योद्धा मुंगीला आजूबाजूंनी धोपटत तिच्या समूहाच्या इतर सदस्यांपासून तोडलं होतं. बुलडॉग जातीच्या कुत्र्यांपेक्षाही सातत्य राखत त्या मुंग्यांमधला लढा सुरू होता. मागे सरण्याचं कोणतंही चिन्ह कोणीही दाखवत नव्हतं. त्यांची युद्धभूमीवरची घोषणा एकच होती : जिंकू किंवा मरू. या लाकडी कपच्यांमधल्या दरीजवळच्या एका टेकडीवर एक लाल मुंगी जबरदस्त उत्साहाने खदखदत आली. तिचा उत्साह असा होता की, एकतर तिने आत्ताच एखाद्या शत्रूचा खातमा केली असेल किंवा तिने अजून युद्धातच भाग घेतला नसेल. बहुधा यातली दुसरीच शक्यता खरी होती, कारण तिच्या शरीराचे सगळे अवयव शाबूत होते. तिला बहुधा तिच्या आईने एकतर 'ढालीसह परत ये किंवा ढालीवरून परत ये' असं सांगून युद्धभूमीवर धाडलं असावं. किंवा ती ग्रीक पुराणकथेतील अकिलीसच्या पात्रासारखी असेल, स्फोट होईपर्यंत दाबून ठेवलेल्या क्रोधासह आता ती सूड उगवायला किंवा पॅट्रोक्लसची सुटका करायला युद्धभूमीवर आलेय. टेकडीवर उभी राहून ती लांबून ह्या असमान ताकदींच्या युद्धाकडे पाहतेय - काळ्या मुंग्या लाल मुंग्यांच्या जवळपास दुपट्ट संख्येने युद्धभूमीवर मौजूद होत्या. ती लाल मुंगी वेगाने युद्धभूमीजवळ आली आणि योद्ध्यांपासून अर्ध्या इंचावर आल्यानंतर संधीचा शोध घेऊन तिने एका काळ्या योद्ध्यावर झडप घातली. पुढच्या अंगाच्या उजव्या पायाच्या टोकाने तिने आपलं युद्धकार्य सुरू केलं नि मग आपल्या इतर योद्धा सहकाऱ्यांना निवडीसाठी त्या शत्रूला सोडून दिलं. आता तिथे तीन मुंग्या (दोन लाल आणि एक काळी) जीवाच्या बचावासाठी एकत्र आल्या होत्या, जणू काही सगळ्या भिंती नि कडीकुलपं तोडणारं काही नवीन आकर्षण त्यांच्यात निर्माण झालं होतं.

युद्धाच्या या टप्प्यावर त्यांनी कुठल्यातरी संगीत चमूला आपापली राष्ट्रगीतं वाजवायला सांगून कमकुवत झालेल्या योद्ध्यांना उत्साहित करण्याचं आणि मरत आलेल्या योद्ध्यांना चेतावण्याचं काम सुरू केलंय, असं कळलं असतं तरीही आता मला काहीच आश्चर्य वाटलं असतं. मीही एकदम रोमांचित झालो होतो, जणू काही ती माणसंच आहेत.  तुम्ही याबद्दल जितका विचार कराल तितका त्यांच्यातला फरक कमी असल्याचं जाणवतं. अर्थात, कॉन्कर्डच्याच नव्हे तर अमेरिकेच्याही इतिहासात नोंदवल्या गेलेल्या कुठल्याही लढ्यातील सहभागी लोकांची संख्या, त्यातील देशभक्ती व शौर्य यांची कणभरही तुलना माझ्यासमोर चाललेल्या या युद्धाशी होऊ शकली नसती. सहभागी योद्ध्यांची संख्या आणि जीवितहानीबद्दल बोलायचं तर हे युद्ध म्हणजे ऑस्टर्लित्झ किंवा ड्रेस्डनवरच्या युद्धांप्रमाणे (नेपोलियनने इतर युरोपीय प्रदेश काबीज करताना केलेली युद्धं) होतं. कॉन्कर्डमधलं युद्ध!(१) देशभक्तांच्या बाजूचे दोन जण हुतात्मा झाले, ल्युथर ब्लान्कार्ड जखमी झाला! इथे तर प्रत्येक मुंगी बट्रीकप्रमाणे होती - 'मारा गोळ्या! देवाच्या कृपेसाठी झाडा गोळ्या!' - आणि इथल्या शेकडो मुंग्या डेव्हीस आणि होस्मरचं नशीब घेऊन आल्या होत्या. यातलं कोणीही भाडोत्री नव्हतं. आपल्या पूर्वजांप्रमाणेच त्या मूल्यांसाठी झगडत होत्या, असा विश्वास मला वाटू लागला. चहावरचा तीन पेनींचा कर चुकवण्यासाठी कोणी लढत नव्हतं. या लढाईचा निकाल ज्यांच्यावर परिणाम करणार आहे त्यांच्यासाठी इतका महत्त्वाचा आणि स्मरणात राहणारा ठरणार होता, जितका बंकर हिलच्या लढाईचा(२) निकाल आपल्या स्मरणात राहिलाय.

मी ज्या तीन मुंग्यांचं विशेषकरून वर्णन केलं त्या ज्या लाकडाच्या कपच्यावर होत्या तो काप मी उचलला आणि माझ्या घरात घेऊन गेलो. माझ्या खिडकीच्या कठड्यावरच्या काचेच्या भांड्याखाली तो काप ठेवला. पहिल्या लाल मुंगीला भिंगातून पाहताना मला असं दिसलं की, ती आपल्या पुढच्या पायांनी शत्रूशी झुंजत होती, आणि तिच्या उरलेल्या पायांना जीवघेणी इजा झाली होती, तिची छाती फाटून गेली होती, तिथला तिच्या शरीराचा भाग काळ्या मुंगीच्या तोंडात होता. काळ्या मुंगीच्या छातीचा भाग फोडण्यासाठी फारच टणक असावा, लाल मुंगीच्या ताकदीबाहेरचा कदाचित. जखी योद्धा मुंगीच्या डोळ्यांमधील गडद बुबुळांमध्ये फक्त युद्धातच दिसते ती उन्मादाची भावना दिसत होती. त्या भांड्याखाली जवळपास अर्धा-एक तास त्या लढत होत्या. मी नंतर परत पाहिलं तेव्हा काळ्या योद्धा मुंगीने आपल्या शत्रूंची डोकी धडावेगळी केलेली होती आणि तरीही अंधुक जीव बाकी असलेली ती डोकी काळ्या मुंगीच्या दोन्ही बाजूंनी विजयाच्या भीषण ट्रॉफीप्रमाणे लटकत होती. अजूनही त्यांची पकड कायम होती. काळी मुंगीही त्या दोघांपासून पूर्ण सुटका करून घेण्यासाठी झगडत होती. तिचा एकच पाय उरला होता आणि इतर अनेक जखमी असतील ज्या मला दिसू शकत नव्हत्या. अजून अर्धा-एक तासाने तिला त्यात यश मिळालं. मी भांडं उचललं नि ती मुंगी त्या उद्ध्वस्थ अवस्थेत खिडकीतून बाहेर निघून गेली. ती शेवटी त्या लढाईतून वाचली की तिला एखाद्या इस्पितळात जाऊन पडावं लागलं याची मला कल्पना नाही, पण तिची क्रियाशीलता नंतर फारशी उरली नसावी असा माझा अंदाज आहे. त्या युद्धात कोण जिंकलं हेही मला कधीच कळू शकलं नाही. युद्धाचं कारणही मला कधीच कळू शकलं नाही. पण ते युद्ध, तिथलं क्रौर्य, जीवितहानी हे सगळं पाहिल्यानंतर जणू काही माझ्या दारासमोर मानवी युद्धच मी अनुभवलं असावं असं वाटून मी दिवसभर दडपलेल्या भावना वागवत होतो.

Friday, 17 May 2013

'लॅफम्स क्वार्टरली', आधी होऊन गेलेले लोक आणि सदानंद रेगे


''आपल्या जन्मापूर्वी काय काय घडलं, याची माहिती करून न घेणं म्हणजे कायम बाल्यावस्थेत राहाणं होय'', हे सिसेरो या रोमन विचारवंताचं वाक्य सांगून 'लॅफम्स क्वार्टर्ली'ची ओळख त्यांच्या वेबसाइटवरती वाचकांना करून दिली जाते. अमेरिकेतल्या 'हार्पर्स मॅगझिन'चे संपादक म्हणून पंचवीसेक वर्षं काम केल्यानंतर लुईस लॅफम यांनी २००६मध्ये 'लॅफम्स क्वार्टर्ली' हे त्रैमासिक सुरू केलं. या त्रैमासिकाचा एक अंक म्हणजे एक खंड असतो, असं म्हणता येईल. काय एवढं विशेष आहे त्यात?

laphamsquarterly.org

'लॅफम्स क्वार्टर्ली'चं वैशिष्ट्य हे की, एखादा विषय घेऊन (उदाहरणार्थ : पैसा, संवादाची माध्यमं, राजकारण, धर्म, भविष्य, जादूचे प्रयोग - अशा अनेकांपैकी कुठलाही) त्यावर आजतागायतच्या इतिहासात जे जे नोंदवलं गेलंय त्यातलं काही सारांश रूपाने त्या विषयासंबंधीच्या अंकात छापलेलं असतं. आणि हे नोंदवणं म्हणजे पत्रं, रोजनिश्या, कादंबऱ्या, नाटकं, कविता, ऐतिहासिक विश्लेषणपर ग्रंथ, तत्त्वज्ञानाचे ग्रंथ, भाषणं यांच्यात सापडणाऱ्या शब्दांसोबतच चित्रांमधलं आणि फोटोंमधलंही असतं. खरं तर हे अंक हातात घेऊन वाचण्या-पाहण्याचे आहेत, हे आपल्याला लक्षात आलं, तरी त्याची वर्गणी भरून ते 'रेघे'वरच्या नोंदीसाठी इथे मागवणं आपल्याला जमलं नाही. पण अमेरिकेत राहणारे काही वाचक असतील तर त्यांना हे अंक तिथे पाहायला मिळतील. अर्थात, वेबसाइटवर या अंकांमधला बऱ्यापैकी मजकूर आणि लहान स्वरूपात का होईना पण चित्रंही आपल्याला वाचता-पाहता येतातच.

संबंधित मजकुराचं (त्रैमासिकाच्या त्या अंकापुरतं दिलेलं) शीर्षक, त्यापुढे प्रसिद्धीचं वर्ष, आणि त्यापुढे कुठल्या ठिकाणाशी जोडलेला तो मजकूर आहे त्या ठिकाणाचं नाव - अशा स्वरूपात अंकाची अनुक्रमणिका दिसते. म्हणजे काळ आणि भौगोलिक माहिती असं त्या मजकुराचं गणित बसवलेलं आहे. अंकामध्ये दिसणारा हा भूगोल जास्तकरून पश्चिमेकडचा आहे, ही म्हटली तर मर्यादा आहे. ही मर्यादा विचारांची आहे, पण एकूण 'अंक' म्हणून सोईसाठी लॅफम व मंडळींनी मजकुराची लांबी जास्तीत जास्त सात पानांपर्यंतच ठेवायची अशीही एक मर्यादा निश्चित केलेली आहे. म्हणजे क्वचित एखाद्या परिच्छेदाचाच मजकूर असतो, तर कधी साधारण सात पानांचा. हे त्यांनी वेबसाइटवरती लिहिलेलं आहे, पण छापील अंक आपण पाहूच शकलेलो नसल्यामुळे त्याबाबतीत आणखी तपशील सांगणं अवघड आहे. पण काही तपशील आपण इथे उदाहरण म्हणून नोंदवू शकतो.

'लॅफम्स क्वार्टर्ली'चं एक मुखपृष्ठ
उदाहरणार्थ, 'मीन्स ऑफ कम्युनिकेशन' या विषयावर 'लॅफम्स क्वार्टर्ली'चा २०१२मधला एक खंड निघाला. त्यात अगदी ख्रिस्तपूर्व २१३ मधला वेचाही आहे. किंवा १८४६ साली पॅरिसमध्ये येऊन गेलेल्या मोरक्कन प्रतिनिधीने लिहिलेलं छापखान्याचं वर्णन आहे. किंवा अट्टल गुन्हेगार म्हणून तुरुंगात शिक्षा भोगत असणाऱ्याने लिहिलेल्या पुस्तकातून निवडलेला १९६५मधला 'नो सेक्स इन द प्रिझन लायब्ररी' हा लेख आहे. किंवा अमेरिकी सैन्यात आणि सरकारमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्याच्या १९६१ सालच्या भाषणामधला भाग असलेला 'ब्रेकिंग द बॅड न्यूज' या शीर्षकाखालचा मजकूर आहे. आणि असं बरंच काही.

आताच्या चोवीस तासांच्या 'ब्रेकिंग न्यूज', 'एक्स्क्लुझीव्ह' अशा शब्दांच्या जगण्यात 'लॅफम्स क्वार्टर्ली' का आवश्यक आहे? तर, सगळंच आज - आत्ता, पहिल्यांदाच घडतंय असं वाटू नये म्हणून. इतिहासाकडे पाहिलं की जरा वर्तमानाचंही भान येतं म्हणून. खरं तर हे त्रैमासिक पत्रकारितेच्या, सॉरी, माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे विद्यार्थी नसलेल्यांसाठी, पाठ्यपुस्तकासारखं अभ्यासक्रमातच घालून ठेवायला हवं. म्हणजे कदाचित शब्दांची थोडीतरी किंमत राखली जाईल. आणि आपली किंमत काय आहे तेही अक्षरशः कळून येईल.

'आपली किंमत', असं म्हटलं ते जरा खालच्या पातळीवरचं वाटतंय ना! पण ते खरंच आहे. एकूण एवढ्या लाखो वर्षांमधल्या लाखो निर्जीव-सजीवांमधला एक असलेल्या माणसाच्या व्यवहारांना साधारण काय किंमत असेल ते समजून घ्यायचं असेल तर ज्ञानाच्या प्रवाहाचा अंदाज घ्यायला लागेल. आणि हा प्रवाह आपल्या आयुष्याच्या कित्येक पूर्वीपासून येतो नि पुढे कित्येक वर्षं चालू राहणार असेल, त्यात आपण मधेच कधीतरी येऊन जातो, पण या प्रवाहात आपल्या आधी होऊन गेलेले लोक कोण होते त्याचा पत्ता असेल तर आपली 'किंमत' नकारात्मक अर्थाने नव्हे तर कदाचित खरोखरचीच कळून येईल.

***

granthalaya.org
ज्ञानाच्या प्रवाहात आपल्या आधी होऊन गेलेल्या लोकांचा विषय आलायंच, तर नोंदीच्या सुरुवातीला ज्याचं वाक्य होतं त्या सिसेरो ह्या माणसाचा आपण शोध घेऊया. 'विकिपीडिया' आपल्याला त्याच्याबद्दल काही प्राथमिक माहिती पुरवेल. ती उपयोगी आहेच. किमान पूर्ण नाव कळलं. मग केंब्रिज विद्यापीठाने त्याच्या लिखाणासंबंधी काढलेले काही ग्रंथ आहेत, ही माहिती आपल्याला मिळेल. आता त्या पुढे जाऊन आपण स्वतःच्या जवळ येऊया. म्हणजे आपण आत्ता ज्या भाषेत बोलतोय त्या मराठीत या सिसेरोचं काही असेल का? तर, होय. मार्कस टलियस सिसेरोबद्दल मराठीत एक पुस्तक लिहिलं गेलंय. त्याच्या एका निबंधाचा अनुवाद आणि त्याची चरित्रात्मक ओळख, अशा स्वरूपातलं हे पुस्तक सुमारे एकशेवीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं. आणि मग आपल्याला त्या पुस्तकाची पीडीएफ प्रत सापडू शकते. 'देवांचे स्वभाव व सामर्थ्य याविषयीं सिसेरो याचा निबंध आणि त्याचें चरित्र' या नावाचं 'हें पुस्तक श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज गायकवाड सेनाखासखेल समशेर बहादुर यांच्या उदार आश्रयानें बळवंतराव अनंत देव यांनी इंग्रजीं ग्रंथांच्या आधारानें रचिलें'. १८९४ साली 'तें पुणें येथें 'आर्यविजय' छापखान्यांत छापिलें'. आणि पुस्तकाची किंमत होती दोन रूपये.

बघा आता, हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं की नाही थोडं? सयाजीरावांचं नाव वाचून किंवा बळवंतरावांचं नाव वाचून किंवा हे अशा विषयावर मराठीत पुस्तक आहे हे कळून. वाटलं असेल तरी ठीक आणि तुम्हाला आधीच ह्या पुस्तकाची माहिती असेल तरीही ठीक. तर ह्या बळवंतरावांनी आपल्या आधी इथे येऊन हे पुस्तक इंग्रजी ग्रंथांच्या मदतीने रचून ठेवलेलं आहे. किमान त्यांनी तसा प्रयत्न तरी केला. वर असंही म्हणाले की, ''ह्या माझ्या प्रयत्नापासून मराठी वाचकांला कांहीं उपयोग होईल किंवा नाहीं याविषयीं मला कांहींच सांगतां येत नाहीं. विशेषेंकरून माझ्या रिकाम्या काळाचा मीं एका प्रकारे विनियोग केला आहे, तेव्हां माझ्या प्रयत्नाला लोकांनीं चांगलें म्हणावे अशी मुळींच मी अपेक्षा करीत नाहीं. आपल्या देशांतील बहुतकरून इंग्लिश भाषाभिज्ञ विद्वान लोकांनी मुद्दाम आपल्या देशभाषेची हेलना मांडली आहे. तेव्हां अशा काळांत त्या भाषेंत ग्रंथ लिहून यश संपादन करणें हें निदान मला तरी शक्य नाहीं''. हे भारी आहे. मला हवंय ते मी करून टाकलंय, लोकांकडून काहीही अपेक्षा नाही. आणि त्यात पुन्हा भाषेविषयीचं विधान करून टाकलेलं आहेच.

भाषेविषयीचं बळवंतरावांचं हे विधान ख्रिस्तपूर्वी ४३मध्ये मरण पावलेल्या सिसेरोशी जुळणारंच आहे. सिसेरोचं  म्हणणं (बळवंतरावांच्या शब्दांत) असं की, ''आपल्यांतील पुष्कळ रोमन लोक ग्रीक भाषेंतील ग्रंथांत मोठे तरबेज आहेत. परंतु त्यांस आपण संपादित केलेलें ज्ञान आपल्या भाषेंत आपल्या देशांतील लोकांस सांगतां येत नाही; कारण कीं ग्रीक भाषेपासून जें ज्ञान संपादित करून घेतलें तें ल्याटिन भाषेंत सांगतां येणें अशक्य आहे असें त्यांस वाटत आहे. ह्यासंबंधानें मला असें वाटतें कीं, मीं ल्याटिन भाषेंत जे ग्रंथ लिहिले आहेत, त्यांची ग्रीक भाषेंतील ग्रंथांशीं तुलना करून पाहिली तर शब्दचातुर्याच्या दृष्टीने देखील माझ्या ग्रंथाच्या भाषेंत मला कांहीं उणीव दिसत नाहीं.''

भाषेविषयीची ही दोन्ही विधानं फारच स्पष्ट आहेत. वेगवेगळ्या संदर्भांमधली आहेत, पण तरी जुळणारी आहेत. आपल्याकडेही अजून ती जुळतील. पण कोणी कुठल्या हेतूने कुठली भाषा वापरावी याचं स्वातंत्र्य ज्याला त्याला आहे, त्यामुळे भाषेविषयीच्या अशा विधानांचे संदर्भ आपण जसेच्या तसे न घेता तपासायला हवेतच. तपासणी करण्याची शक्यता हीच या प्रवाहातली गंमत असते. आणि ती गंमत 'लॅफम्स क्वार्टर्ली'मधला मजकूर वाचतानाही येते. पण त्यासाठी वाचकांनी त्यात डुंबायला हवं. कारण संदर्भ बदललेत हे समजून घेण्यासाठी प्रश्न विचारावे लागतील. असे प्रश्न विचारत, उत्तरं शोधत ते वाचलं तर त्या प्रवाहाला अर्थ आहे. मग आपल्याला बळवंतरावांच्या पुस्तकातले दोष दिसतीलच, काय कमी-जास्त आहे तेही आपण शोधू, पण तरी त्यात काय मजा आहे, त्या काळची, ती जोखता येईल. आणि होऊन गेलेल्या लोकांबद्दल आत्ता बोलताना 'नेम ड्रॉपिंग' आणि 'अॅक्नॉलेजमेन्ट' यांच्यातला फरकही कळत जाईल. त्यातूनच आधीच्या लोकांच्या चुकाही काढता येतील. आणि 'आधीचे लोक' असं म्हणताना फक्त आपल्या ओळखीतले, पाहण्यातले एक-दोन पिढ्यांमागचे नाहीत, तर अगदी सुरुवातीपासूनचे लोक लक्षात घ्यायला हवेत. तसं नाही केलं तर वैयक्तिक पातळीवरची फुटकळ शेरेबाजी उरेल. ही मराठीत प्रचंड प्रमाणात आहे.

ज्ञानाच्या प्रवाहाबद्दल सिसेरो जे म्हणाला, ते बळवंतरावांनी त्यांच्या शब्दांत असं लिहिलंय : ''मानवी प्राण्यांच्या अंगीं असा दोष आहे कीं कोणत्याही वस्तूचें यथार्थ ज्ञान करून घेण्यास ते हयगय करितात. जर एका मतांतील सर्व सिद्धांतांचे समग्र ज्ञान होणें परम कठीण आहे, तर सर्व मतांच्या सिद्धांतांचें समग्र ज्ञान होणें किती बरे कठीण आहे? तथापि ज्याला सत्य शोधून काढण्याकरितां निष्पक्षपातानें सर्व मतांच्या तत्वज्ञान्यांबरोबर वाद करावयाचा आहे, त्यानें सर्व मतांविषयी चांगलें ज्ञान करून घेतलें पाहिजे.''

हे म्हटलं तर शाळेत शिकवण्यासारखं आहे, पण शिकवून समजण्यासारखं नाही असंही आहे. आपलं आपल्यालाच समजलं तर समजलं. ह्यात एक अजून आपल्याला भर टाकायचेय : हा प्रवाह आहे, म्हणजे त्यात उतरंड नाहीये. उतरंडीशिवायचा हा प्रवाह आहे हे लक्षात घेतलं तर वरती जो आपण 'किंमती'चा उल्लेख केलाय तोही स्पष्ट होईल. प्रत्येकाची जी असेल ती किंमत कमी किंवा जास्त आहे असं मोजता येणार नाही. ती फक्त आहे एवढंच खरं. कारण सुरुवातीपासून इथे होऊन गेलेल्या सगळ्या लोकांचं सगळं कोणीच एका आयुष्यात शेवटपर्यंत समजून घेऊ शकत नाही, ही डेंजर गोष्ट मान्य करून पुढे  जाऊ.

***

ज्ञानाचा प्रवाह नि नंतर त्यात भाषेच्या मुद्द्याची भर पडून आता आपण नोंदीच्या तिसऱया टप्प्यात आलोय. आता आपल्याला आधी इथे होऊन गेलेल्या आणि चहात शेव बुडवून खाणाऱ्या सदानंद रेगे यांना सोबतीला घ्यायचंय. रेग्यांच्या एका कवितासंग्रहाचं नावच 'वेड्या कविता'! त्यामुळे वेडेपणा तर त्यांनी केलाच. पण तो बहुधा आपल्या लोकांना झेपणारा नसणार. विलास सारंगांनी असं लिहिलंय त्याबद्दल : ''मराठी कवितेच्या कोंदट, कोत्या, 'इनब्रीडिग'ने कोळपलेल्या वातावरणात सदानंद रेग्यांची कविता हा एक मोकळा वारा होता. हा वारा आता वाहायचा थांबला आहे''. मराठी कवितेच्या वातावरणाबद्दल सारंगांनी जे म्हटलंय ते पर्यायाने सगळ्याच मराठी वातावरणाला लावता येईल. पण त्यानेही तसा काहीच फरक पडत नाही. कारण रेगे आपल्या आधी इथे होऊन गेले हे तर खरंच आणि त्यांनी लिहिलेल्या कवितेतून मोकळा वारा वाहतो हेही खरंच. हा मोकळा वारा म्हणजे वरती लिहिलेल्या ज्ञानाच्या नि भाषेच्या प्रवाहाचाच भाईबंध आहे काय? असावा.

कारण सदानंद रेग्यांनी बनारसवरती पंधरा कविता केल्या होत्या, त्यातल्या नवव्या कवितेतल्या काही ओळी अशा आहेत :
कुणाचं ते आठवत नाही
पण मी इथं आलोय
तर्पण करायला. (कदाचित माझंच)

इथं आलो
नि जगाच्या आरंभापास्नं
किती रेगे
इथे येऊन गेले
हे इत्थंभूत कळलं.

मुळंबिळं काही
शोधायची असतील
तर इथं येण्यावाचून
गत्यंतरच नाही.
आपण ज्या प्रवाहाविषयी बोलतोय, त्याच्याशी जुळणारं हे म्हणणं आहे असं वाटलं म्हणून रेग्यांच्या कवितेचा संदर्भही इथे नोंदवला. रेग्यांनी हा संदर्भ घेऊन ही कविता लिहिली नसेलही कदाचित, तरी आपण त्या संदर्भाची भर तिच्यात घालू शकतो, हीच तर ह्या प्रवाहातली गंमत आहे. तसंही आपल्या आधी होऊन गेलेल्या लोकांवर रेग्यांनी केलेल्या कवितांचा वेगळा संग्रह होईल एवढी तशा कवितांची संख्या आहे. त्यामुळे रेग्यांच्या कवितेची आठवण येणं साहजिकच आहे. रेग्यांच्या कवितेतला मोकळा वारा या नोंदीत आलाय की नाही माहीत नाही, पण आपण प्रयत्न तरी केला आणि रिकाम्या काळाचा विनियोग केला!

Tuesday, 14 May 2013

'मिस्टर ग्लाड'चं काय करायचं? : भाग दोन । निर्मलांग्शू मुखर्जी यांचा लेख

'मिस्टर ग्लाड'चं काय करायचं? - या शीर्षकाखाली एक नोंद आपण मागे 'रेघे'वर केली. नक्षलवादाशी संबंधित सध्याच्या घडामोडींच्या निमित्ताने केलेल्या या नोंदीत 'सत्तेला गैरवापर होण्यापासून कसं रोखायचं' या उत्तर नसलेल्या प्रश्नाबद्दल जॉर्ज ऑर्वेल, अनिल बर्वे, तुळसी परब यांच्या सोबतीनं आपण बोललो. एकूण गदारोळातला तो एक बिंदू होता, असंही आपण म्हटलं. आता ह्या बिंदूचा मुद्दा करूया.

मध्यंतरी 'कबीर कला मंचा'च्या चार तरुण सदस्यांनी मुंबईत आत्मसमर्पण केलं. हे एक समकालीन निमित्तही या नोंदीला आहे. या सगळ्याची नागरिकांपर्यंत येणारी माहिती साच्यांमधून येते आणि त्यामुळे मूळ गुंतागुंतीला फाटा दिला जातो. यात एकतर सरकारी बाजू मांडणारी पुस्तकं असतात. अशा पुस्तकांमधून जी माहिती आपल्यापर्यंत येते ती साधारणपणे सरकारीच असते. दुसऱ्या बाजूला काही पुस्तकं संबंधित पत्रकारांनी नक्षलवाद्यांच्या इलाक्यात जाऊन लिहिलेली सापडतील. ती पूर्णपणे दुसरा साचा मांडणारी आणि लहान आदिवासी मुलांनी घेतलेल्या बंदुकांचे फोटो, त्या मुलांबरोबर स्वतःचे फोटो, अशा प्रसिद्धीत गुंतलेली. ह्या पार्श्वभूमीवर दोन्ही साच्यांमध्ये पसरलेलं काही सापडावं यासाठी आपण प्राध्यापक निर्मलांग्शू मुखर्जी यांचा एक लेख 'रेघे'वर अनुवादित करून नोंदवतोय. वरच्या परिच्छेदात आपण जे बिंदूकडून मुद्द्याकडे यायचं म्हटलं, त्या मुद्द्यासंबंधी काही संदर्भ स्पष्ट करणारा हा लेख आहे.

निर्मलांग्शू मुखर्जी हे मूळचे दिल्ली विद्यापीठातले तत्त्वज्ञानाचे नि भाषाशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक आहेत. देशी-परदेशी विद्यापीठांमधून त्यांनी हे विषय शिकवले आहेत. या विषयांमधली त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. याशिवाय समकालीन राजकीय घडामोडींमधल्या काही घटनांच्या खोलात जाऊन ते गेली काही वर्षं लिखाण करतायंत. संसदेवरील हल्ल्याप्रकरणात फासावर चढवण्यात आलेल्या अफझल गुरूसंबंधीही त्यांनी खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहून व स्वतंत्रपणे काही शोध घेऊन लिखाण केलं. ते देशातल्या लोकप्रिय मताविरुद्ध जाणारं होतं. त्याशिवाय नक्षलवादाशी संबंधित सध्याच्या गदारोळातही त्यांनी काही मांडणी केलेली आहे. या मांडणीतही ते वरच्या साच्यांना टाळताना दिसतात. मग त्यासाठी त्यांचे जवळचे ज्येष्ठ सहकारी असलेल्या नोम चोम्स्कींचं त्यांना न पटलेलं मत खोडून काढण्यासाठीही ते खुलेपणाने काही गोष्टी मांडतात. त्यांच्या या विषयावरच्या लिखाणाचं 'द माओइस्ट्स इन इंडिया : ट्रायबल्स अंडर सीज' हे पुस्तक (इंग्लंडमध्ये) नुकतंच प्रसिद्ध झालं. या पुस्तकाची भारतीय आवृत्ती जुलै-ऑगस्टमध्ये येईल, असं मुखर्जींनी आपल्याला सांगितलं. त्यांचा आत्ता 'रेघे'वर येतोय तो लेख मे २०१०मधला आहे. 'झेड-नेट'वर हा लेख मुळात प्रसिद्ध झाला होता. 'झेड-नेट'शी आपलं कायमचं ढोबळ सहकार्य जमून आलेलं असल्यामुळे हा लेख थेट अनुवादित करण्याची परवानगी आपल्याला होतीच. पण काही कारणांमुळे मुखर्जी यांचीही परवानगी घेणं आवश्यक वाटलं. यावर त्यांनी परवानगीसोबत या लेखाचं 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली'मध्ये प्रसिद्ध झालेलं व नंतर काही पुस्तकांमध्येही समाविष्ट केलं गेलेलं छापील रूप आपल्याकडे पाठवलं आणि त्याचा अनुवाद केला तर जास्त बरं, असं सुचवलं. 'झेड-नेट'वरच्या लेखाचं जरा अधिक सुबक रूप असलेला हा लेख आपण मुखर्जींच्या परवानगीने इथे देतो आहोत. २०१०मधले काही संदर्भ या लेखात असले, तरी त्यापलीकडे सत्ता-हिंसा-माणसं या आपल्या मूळ मुद्द्याशी संबंधित काही गोष्टीही वाचकांना त्यात सापडतील असं वाटतं. सध्या असलेलं सरकार आणि नक्षलवादी या दोघांपेक्षाही मरणाऱ्या माणसांशी आपल्याला जास्त देणं-घेणं आहे आणि मुखर्जींनाही तोच मुद्दा महत्त्वाचा वाटताना दिसतोय. या लेखात त्यांनी अरुंधती रॉय, गौतम नवलाखा यांच्या दोन मोठ्या लेखांचे आणि इतर काही संदर्भ दिलेत; या लेखांच्या-संदर्भांच्या लिंक अधूनमधून देण्याऐवजी हा लेख संपल्यानंतर शेवटी यादी स्वरूपात दिलेल्या आहेत. ते लेख वाचलेले नसतील, तरीही हा लेख स्वतंत्रपणे समजून घेता येईलच. नंतर ते लेख व इतर संदर्भ सवडीने वाचता येतील. वाचकांनाही यातून सध्याच्या गोंगाटात काही शांत मुद्दा सापडला तर बरं. त्यामुळे एकूण या मोठ्या विषयावरच्या मोठ्या प्रवासातला एक टप्पा म्हणूनच 'रेघे'चे वाचक ह्या लेखाकडे पाहोत.

आपली प्रस्तावना जरा मोठी झालेय, पण ती तशी आवश्यक वाटली. प्राध्यापक मुखर्जी यांचा लेखही जरा मोठा आहे, पण तो तसा आवश्यक वाटला.
***

लोकांविरोधात शस्त्रं : दंडकारण्यात माओवाद्यांनी काय यश मिळवलंय?

- निर्मलांग्शू मुखर्जी

इंग्लंडमधली आवृत्ती. प्रकाशक : प्लुटो प्रेस
महाराष्ट्र, छत्तीसगढच्या दक्षिणेकडचा भाग व ओरिसाच्या पश्चिम भागात पसरलेल्या दंडकारण्यात 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट)'ने घडवलेल्या सशस्त्र बंडाला सामोरं जाण्याचं कारण दाखवत भारत सरकारने या भागामध्ये एक लाख निमलष्करी जवान दाखल करवलेत. 'ऑपरेशन ग्रीन हंट' या गुप्त नावाखाली ही मोहीम राबवली जातेय.

माओवाद्यांच्या लढाऊ दलांमधील आघाडीला असणारे लोक हे जवळपास सर्वच आदिवासी तरुण-तरुणी आहेत, याचा पुरेसा पुरावा आता उपलब्ध आहे. शिवाय स्पष्ट असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्षिली जाणारा आणखी एक मुद्दा असा की, माओवादी नेतृत्त्वाला उखडून टाकण्यासाठीच्या कुठल्या सशस्त्र मोहिमेचं थेट लक्ष्य सशस्त्र किंवा निःशस्त्र आदिवासीच असतील. सरकारी फौजा आणि माओवादी नेतृत्त्व यांच्यामध्ये आदिवासींचे अनेकाने मानवी थर लिंपलेले आहेत. दुर्दैवी आणि खुनशी सल्वा-जुडुम मोहिमेमधून यापूर्वीही हे दिसून आलंय की, आदिवासींवरच्या कोणत्याही हल्ल्याने केवळ आदिवासींवरच्या संकटांमध्येच वाढ होते असं नाही, तर माओवाद्यांना मिळणारा पाठिंबाही त्यामुळे वाढतो व पर्यायाने त्यांच्या दलांमध्येही वाढ होते.

ही गनिमी दलं आणि बंडखोर - शिवाय त्यांना पाठिंबा देणारे लाखो निःशस्त्र आदिवासी - यांच्याकडे बळी चढवले जाणारे आणि त्यापासून संरक्षणाची गरज असणारे लोक म्हणून पाहायला हवं. असं पाहणं का आवश्यक आहे, हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मुख्यत्त्वे आंध्रप्रदेश व बिहारमधून आलेले (वरच्या जातींमधील) माओवादी बस्तरमध्ये त्यांचा तळ कसा वसवू शकले या मागचं वास्तव समजून घ्यावं लागेल.

उपलब्ध दस्तावेज

ह्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आता चार महत्त्वाचे दस्तावेज सार्वजनिक व्यासपीठांवर उपलब्ध आहेत. यातील दोन दस्तावेज म्हणजे दिल्लीतील दोन बुद्धिमंतांनी ('पब्लिक इंटलेक्चुअल') माओवादी इलाक्यात जाऊन लिहिलेले लेख आहेत (अरुंधती रॉय २०१०; गौतम नवलाखा २०१०), तर इतर दोन दस्तावेज म्हणजे माओवादी पक्षाचे सरचिटणीस (गणपती २०१०) आणि माओवादी प्रवक्ते (आझाद २०१०) यांच्या मुलाखती. यातील शेवटचे दोन दस्तावेज हे मूलतः माओवादी दस्तावेज म्हणता येतील. पहिले दोन दस्तावेज हे संबंधित लेखकांना माओवाद्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये आमंत्रित केल्यानंतर लिहिले गेलेले आहेत असं दिसतं.

या प्रदीर्घ लेखांमध्ये माओवाद्यांच्या डावपेचांच्या प्राथमिक उद्दीष्टांवर एकही प्रश्नार्थक टिप्पणी नाही. (नोंदवण्यासारखी गोष्ट अशी की, अरुंधती रॉय यांच्या २००९मधील एका लेखात काही संयमी टिकात्मक विधानं होती, पण २०१०मधल्या त्यांच्या - आपण दस्तावेज म्हणून गृहीत धरलेल्या - लेखात मात्र अशा टिकेचा संपूर्ण अभाव आहे.) शिवाय या दोन्ही लेखांमध्ये संबंधित लेखकांची राजकीय टिप्पणी मात्र मोकळेपणाने पसरलेली आहे, यातील काही विधानं माओवादी लक्ष्य व कृती यांना थेट पाठिंबा देणारी आहेत. आपला अभ्यास हा भारत सरकारच्या प्रोपगँडापासून दूर असलेला आणि या माओवादी बाजू मांडणाऱ्या दस्तावेजांना पाया मानून केलेला आहे.

माओवादी प्रवक्ते आझाद (२०१०) यांनी असं स्पष्ट केलंय की, 'माओवादी क्रांतिकारकांचं पहिलं प्राधान्य लोकांचं कल्याण हे आहे.' माध्यमांशी जवळीक राखून असलेले किशनजी (कोटेश्वर राव) 'लोकांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या' कोणाशीही बोलण्याची तयारी दर्शवतात (टाइम्स ऑफ इंडिया, १८ मार्च) आणि बस्तरच्या जंगलातील आदिवासींच्या सर्वसमावेशक भल्यासाठी माओवाद्यांनी स्वतःला झोकून दिलंय असं सुचवतात. सरकारने २००५ साली या भागात पहिल्यांदा मोठा हल्ला करण्याच्या सुमारे पंचवीस वर्षं आधी माओवादी या जंगलात आले आणि पुढे त्यांनी इथे सुरक्षित तळ उभा केला. या पाव शतकामध्ये माओवाद्यांनी 'आदिवासींसाठी' नक्की काय केलं?

माओवादी नियंत्रण

एखाद्या लोकसमूहाचं कल्याण करण्याची एखाद्या संघटनेची क्षमता साहजिकपणेच त्या (समूहाच्या) क्षेत्रामध्ये संबंधित संघटनेचा प्रभाव किती आहे यावर अवलंबून आहे. वरील लेखकांच्या लेखांनुसार, माओवाद्यांनी दंडकारण्यात १९८०मध्ये लहान गटा-गटांनी प्रवेश केला - दोन तुकड्या (नवलाखा २०१०), सात तुकड्या (रॉय २०१०). (या अवाढव्य देशात त्यांनी दंडकारण्याचीच निवड का केली, या मुद्द्यावर आपण नंतर चर्चा करणार आहोत.) मुख्यत्त्वे आदिवासी असलेल्या स्थानिकांची मर्जी संपादन केल्यानंतर माओवाद्यांनी त्यांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूक बनवण्यासाठी संघटीत करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, जमीन, वनोत्पादनं, इत्यादींवरचे अधिकार. यात हितसंबंध गुंतलेल्या आदिवासी म्होरक्यांनी स्थानिक पोलीस व वन अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरुवातीला दुर्बळ प्रतिकाराचा प्रयत्न केला. १९९१ व १९९७ मध्ये मोठ्या प्रमाणावर असे प्रयत्न झाले, पण ते सहज मोडून काढता आले, कारण मोठ्या प्रमाणावर आदिवासींना चळवळीतून फायदा मिळाला होता : ''सर्वांत त्रासदायक जमिनदारांना मारून टाकल्याने'' काम फत्ते झालं. सरकारच्या प्रतिनिधींचे अवशेष या भागातून पळवून लावल्यानंतर साधारण २००५पर्यंत सर्व सुरळीतपणे सुरू होतं असं दिसतं.

या काळात माओवादी लोकसहभागातून आणि अधिकाधिक परिसरात विस्तार करण्यातून आपल्या संघटनेला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळवू शकले. शेतमजुरांची संघटना असलेल्या 'दंडकारण्य किसान मजदूर संघा'चे (दंकिमसं) सध्या जवळपास एक लाख सदस्य आहेत. महिलांची संघटना असलेल्या 'क्रांतिकारी आदिवासी महिला समिती'चे (क्रांआमस) जवळपास नव्वद हजार सदस्य आहेत. याबरोबरच सांस्कृतिक संघटना असलेल्या 'चेतना नाट्य मंचा'चे दहा हजारांहून अधिक सदस्य आहेत.

२००१ सालापासून पुढे दंडकारण्य परिसर थेट 'जनता सरकारां'च्या प्रशासनाखाली आहे. एकत्रित लोकसंख्या पाचशे ते पाच हजारांपर्यंत असलेल्या तीन ते पाच गावांच्या समुहातून प्रत्येक जनता सरकार निवडलं जातं. अशी चौदा ते पंधरा जनता सरकारं मिळून एक क्षेत्रीय जनता सरकार तयार होतं, आणि तीन ते पाच क्षेत्रीय जनता सरकारं मिळून एक विभाग तयार होतो. दंडकारण्यात दहा विभाग आहेत. अरुंधती रॉय (२०१०) यांना असा विश्वास वाटतो की माओवादी पक्षाचं शासन ''आता साठ हजार चौरस किलोमीटरच्या जंगलावर, हजारो गावांमध्ये व लाखो लोकांमध्ये पसरलेलं आहे''. भेटीवर आलेल्या विचारवंतांनी देण्यात आलेले हे माओवाद्यांचे आकडे आहेत, हे आपल्याला इथे स्पष्ट करावं लागेल. वास्तवातले आकडे यापेक्षा कितीतरी कमी असण्याची शक्यता आहे. तरीही मोठ्या भूभागावर आदिवासींचा प्रभावी पाठिंबा माओवाद्यांना आहे हे नाकारता येणार नाही. तर, या स्त्रोतांचं माओवाद्यांनी काय केलं?

वेतन आणि शेती

वेतनाचा मुद्दा लक्षात घेऊ. मोसमानुसार या भागातील बहुसंख्य आदिवासींचं उत्पन्न तेंदूपानं, बांबू अशा वनउत्पादनांवर अवलंबून असतं.  पन्नास तेंदूपानांच्या - नवलाखा (२०१०) यांच्या लेखानुसार सत्तर तेंदूपानांच्या - एका बंडलाला सध्या एक रुपया मिळतो. त्यामुळे दिवसाला साधारण तीस रुपये कमावण्यासाठी एका आदिवासी व्यक्तीला जवळपास दोन हजार तेंदूपानं गोळा करून बांधावी लागतात! अर्थात १९८१ साली दर बंडलामागे केवळ तीन पैसे मिळायचे, त्या तुलनेत ही खूपच मोठी सुधारणा आहे (रॉय २०१०). तसंच वीस बांबूंच्या बंडलासाठीचं वेतन १९८१ सालच्या १० पैशांवरून आता सात रुपयांपर्यंत वाढलेलं आहे.  या दराने दिवसाला पस्तीस रुपये कमावण्यासाठी एका आदिवासी व्यक्तीला शंभर बांबूंचं बंडल करावं लागतं. या आकड्यांना कोबाड गांधी (२००८) यांनीही दुजोरा दिलेला आहे; काही वर्षांपूर्वी दहा रुपयांच्या दैनंदिन वेतनामध्ये तिप्पट ते चौपट वाढ जाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मी आधी दररोजच्या वेतनाचे जे आकडे गृहीत धरले ते गांधींच्या अंदाजाशी जुळावेत म्हणून. अन्यथा, दिवसाला सुमारे दोन हजार तेंदूपानं किंवा शंभर बांबू जमवणं सर्वसाधारणपणे शारिरीकदृष्ट्या शक्य आहे, असं व्यक्तिशः मला वाटत नाही.

वेतनांची तुलना एकाच निकषानुसार मोजणं अवघड आहे, कारण कामाचं स्वरूप, जागा, जात, लिंग, इत्यादींनुसार त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असतात. आदिवासी मंडळी आर्थिक शिडीच्या तळामध्ये आहेत हे सर्वज्ञात आहे. सरकार व खाजगी व्यावसायिकांनी पूर्वापार केलेल्या आदिवासींच्या क्रूर पिळवणुकीकडे पाहिलं तर वरती झालेली वेतनवाढ ही 'आदिवासींसाठी प्रचंड मोठं यश' ठरली (रॉय २०१०); दारिद्र्यात जगणाऱ्या आदिवासींना यापेक्षा चांगलं काही माहीतच नव्हतं. या लेखांमध्ये - कोणत्याही आकडेवारीशिवाय - असंही सांगितलंय की, माओवाद्यांनी खाजगी कंत्राटदारांशी चर्चेने घडवून आणलेली ही वेतनवाढ छत्तीसगढ सरकारने घोषित केलेल्या वाढीपेक्षा जास्त आहे. शिवाय गावप्रमुखाच्या शेतात काम सुरू करतानाचा पहिला दिवस फुकट काम करण्यासारख्या अनिष्ट पारंपरिक रूढी थांबवण्यातही माओवाद्यांनी यश मिळवलं. यावरून आदिवासींनी माओवाद्यांबद्दल कृतज्ञता का वाटते हे स्पष्ट व्हावं.

पण खाजगी कंत्राटदारांची हाव पुरवण्यासाठी कुठल्यातरी सरकारने घोषित केलेल्या क्रूर वेतनव्यवस्थेचा अडथळा पार करणं म्हणजे 'पर्यायी विकासाचं प्रारूप' (अल्टरनेटीव्ह डेव्हलपमेन्ट मॉडेल) होत नाही; आणि काही जण कथितरित्या ज्या पर्यायी प्रारूपाबद्दल भाषण देतात ते प्रारूप 'माओवादी गेली तीस वर्षं लाखो भारतीयांसाठी राबवत आहेत' (नवलाखा २०१०), असाही याचा अर्थ होत नाही. इथेही एकाच निकषानुसार तुलना अवघड असली, तरी हे अगदी स्पष्ट आहे की ही वेतनं देशातील इतर भागांतील वेतनांपेक्षा खूप जास्त कमी आहेत; बस्तरमधले आदिवासी 'पुढच्या मोसमापर्यंत जिवंत राहता येईल इतकंच कमावू शकतात' (रॉय २०१०). देशभरात शेतकी कामासाठी साधारणपणे किमान वेतन दिवसाला साठ रुपयांपासून ते ऐंशी रुपयांपर्यंत आहे. केरळसारख्या 'जास्त वेतन' असलेल्या राज्यात ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणारं वेतन दीडशे रुपयांपर्यंतही जातं (उत्सा पटनाईक यांनी वैयक्तिक संवादात दिलेली माहिती). केरळ हे कदाचित माओवाद्यांनी स्पर्धा करावं असं एक प्रारूप आहे, हेही इथे नोंदवायला हवं.

या गुंतागुंतीच्या चित्राची दुसरी बाजू अशी की, माझ्या मते जे अतिशय कमी वेतन आहे, त्यातही माओवादी तेंदूपानांच्या दर पिशवीमागे कंत्राटदाराकडून एकशेवीस रुपये गोळा करतात (प्रत्येक पिशवीमध्ये एक हजार बंडलं असतात). प्रत्येक कंत्राटदाराला दर मोसमाजत पाच हजार पिशव्या जमा करण्याची परवानगी असते. याचा अर्थ असा की, पाच हजार पिशव्या जमा करणाऱ्या एका बड्या कंत्राटदारामागे माओवादी पक्ष सुमारे सहा लाख रुपये कमावतो. रॉय (२०१०) लिहितात त्यानुसार, किमान अंदाजानुसार असा कंत्राटदार दर मोसमाला सुमारे पंचावन्न लाख रुपये कमावतो. दंडकारण्य परिसरात किती कंत्राटदार कार्यरत आहे याची माहिती या लेखांमधून मिळत नाही. सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं की, तेंदूपानांचा व्यवसाय करोडो रुपयांपर्यंत होतो. बांबू, चिंच, मध व इतर वनोत्पादनांची कथाही अशीच आहे; यांतून पक्षाला 'रॉयल्टी' मिळते आणि कंत्राटदारांना प्रचंड नफा मिळतो.

शेतीविषयी बोलायचं तर, आदिवासी पिढ्या न् पिढ्या जी जमीन पीक घेण्यासाठी 'बेकायदेशीर'पणे वापरत होते त्यातील सुमारे तीन लाख एकर जमीन आपलीशी करण्यासाठी माओवाद्यांनी त्यांना प्रोत्साहित केलं. हे काम तुलनेने सोपं होतं. नवलाखा (२०१०) लिहितात त्यानुसार, 'इथे वर्गाधिष्ठित समाजव्यवस्था होती, पण आदिवासी परंपरेमुळे इतर ठिकाणांसारखी म्होरक्यांकडून होणारी पिळवणूक इथे दिसून येत नसे'. याशिवाय माओवाद्यांनी आदिवासींना संघटित करून जलसंधारणासाठी लहान तलाव व विहिरी बांधण्यासाठी उद्युक्त केलं आणि भटक्या पद्धतीने राहणाऱ्या आदिवासींना पीक घेण्याचं सुबक तंत्रही शिकवलं. बहुपीक शेती व फिरत्या मशागतीची माहिती देण्याचाही प्रयत्न केला गेला. नवलाखा (२०१०) यांनी जनता सरकारच्या नोंदीतील धान्य व भाजीपाला पीकाचा काही तपशील त्यांच्या लेखात दिला आहे. ट्रॅक्टर किंवा म्हशींचा वापर नांगरणीसाठी करण्यात येत असल्याचा काही उल्लेख या लेखात आहे. इतर ठिकाणी होतं त्यापेक्षा वेगळं काहीही यात नाही.

(माओवाद्यांच्या) या प्रयत्नांचा आवाका व आदिवासींच्या जीवनशैलीची गुणवत्ता वाढवण्यामध्ये या प्रयत्नांचा वाटा यासंबंधीचं पुरेसं स्पष्ट चित्र उभं करणं अवघड आहे. साधारणपणे, रॉय (२०१०) लिहितात : ''केवळ दोन टक्के जमीन सिंचनाखाली आहे. अभुजमाडमध्ये नांगरणी हा शब्दही दहा वर्षांपूर्वीपर्यंत ऐकिवात नव्हता. दुसरीकडे गडचिरोलीत संकरीत बियाणं व रासायनिक खतांनी वावर सुरू केलाय (गडचिरोली शेजारच्या महाराष्ट्र राज्यात येतं). कॉम्रेड विनोद सांगत होते, 'बियाणं, रासायनिक खतं व सक्षम शेतीविषयक माहिती असलेल्या लोकांची आम्हाला गरज आहे.''' कॉम्रेड विनोद या अतिशय प्राथमिक गोष्टींबद्दल आत्ता का विचारत आहेत? मग गेली सुमारे तीन दशकं माओवादी काय करत होते?

आरोग्य व शिक्षण

आरोग्य क्षेत्राकडे पाहिल्यावर अन्नधान्याच्या परिस्थितीचं अधिक स्पष्ट चित्र आपल्याला मिळू शकतं. या मोठ्या परिसरामध्ये माओवाद्यांनी सुरू केलेल्या एकाही आरोग्य केंद्राचा उल्लेख नाही. आपल्याला सांगितलं जातं ते एवढंच की, या लोकांना पाणी उकळून प्यायची सूचना करण्यात आली; आणि वरकरणी त्यामुळे बालमृत्यूंचं प्रमाण पन्नास टक्क्यांनी कमी आलं (गांधी २००८). नवलाखा (२०१०) लिहितात की, गेल्या काही काळापासून जनता सरकारांनी 'अनवाणी डॉक्टरां'ची योजना सुरू केली आहे. यात रंगांवरून भेद स्पष्ट करता येईल अशी औषधं देण्यासाठी काही आदिवासींनी प्रशिक्षित केलं जातं आणि हिवताप, पटकी व हत्तीरोग अशा या परिसरातील सर्वांत घातक आजारांवर उपाय केला जातो. इथेही या प्रयत्नांचा आवाका किती आहे याचा तपशील आपल्याला कळू शकत नाही.

रॉय (२०१०) त्यांना भेटलेल्या एका डॉक्टरचा उल्लेख करतात - कित्येक वर्षांनी त्या परिसरात एखादा डॉक्टर येत होता. त्याने तपासलेल्या बहुतेक लोकांमध्ये - यात माओवादी दलाचे सदस्यही आले - हिमोग्लोबिनचं प्रमाण पाच ते सात इतकं होतं, असं हा डॉक्टर सांगतो. (भारतीय स्त्रीच्या रक्तातील हिमोग्लोबीनचं सरासरी प्रमाण अकरा आहे). दोन वर्षांहून अधिक काळ रक्तक्षय राहिल्यामुळे मोठ्या क्षयरोगाचं मोठं प्रमाण आढळून आलं. तरुण मुलं प्रथिनं-ऊर्जा-पौष्टिकता यांपासून वंचित असून या अभावामुळे होणारे दुसऱ्या फळीतील आजार त्यांना झालेले आहेत. याशिवाय हिवताप, ऑस्टिओपोरायसिस (हाडं ठिसूळ होणं, इत्यादी), जंत, कान व दातांमध्ये संसर्ग आहेत.  स्त्रियांना पाळीच्या वेळी समस्या येण्याचं प्रमाणही मोठं आहे; पौंगडावस्थेत प्रवेश करताना कुपोषण सहन करावं लागल्यामुळे स्त्रियांचं मासिक पाळीचं चक्र थांबू शकतं किंवा पाळीची सुरुवातच न होण्याची शक्यताही असते. ''इथे हा साथीचा रोग आहे, बायफ्रामध्यो होती तशीच इथली परिस्थिती आहे'', असं डॉक्टर सांगतो. ''गडचिरोलीतले एक-दोन दवाखाने सोडले तर या जंगलात एकही दवाखाना नाही. डॉक्टर नाहीत. औषधं नाहीत.''

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, या दुःखद परिस्थितीमागचं मुख्य कारण मुख्यत्त्वे स्त्रिया व मुलांमधलं अतिरेकी कुपोषण हे आहे. शेतीच्या 'पर्यायी प्रारूपा'ने आणि माओवादी 'विकासाने' दंडकारण्यातील लोकांची काय अवस्था केलेय हे यातून स्पष्ट व्हावं. आपण बोलत असलेल्या लेखांमध्ये 'दुष्काळ', 'सब-सहारन आफ्रिकेसारखी परिस्थिती' असे शब्द वारंवार वापरलेले आहेत (नवलाखा २०१०; आझाद २०१०). अर्थात हे शब्द विवादास्पदपणे सरकारकडे बोट दाखवत वापरलेले आहेत. भारत सरकारने आपल्या नागरिकांची काय अवस्था केलेय हे जीवनशैलीच्या कुठल्याही मापनावरून स्पष्ट होईल, याला आदिवासी अपवाद नाहीत. पण आपण बोलत असलेलं क्षेत्र मुख्यत्त्वे माओवाद्यांशी संबंधित आहे - ''दोन दशकांहून अधिकच्या या इतिहासात पक्षाने पर्यायी व्यवस्था उभी केली, आणि अक्षरशः कोणत्याही विरोधाशिवाय'' (नवलाखा २०१०).

आरोग्य केंद्रांच्या संपूर्ण अनुपस्थितीसारखंच या लेखांमध्ये आदिवासी मुलांसाठी एखाद्या नव्या व नियमित शाळेचाही पुरावा नोंदवलेला नाही. ज्या काही तुरळक शाळा आढळतात, त्याही सरकारी. आतापर्यंत यातल्या अनेक शाळा एकतर सुरक्षा दलांनी काबीज केल्या आहेत किंवा त्यांना तसं करण्यापासून रोखण्यासाठी माओवाद्यांनी उडवून दिल्या आहेत. काही काळापूर्वी जनता सरकारांनी फिरत्या शाळांचा उपक्रम सुरू केला, शिवाय या भागात काही संध्याशाळाही सुरू असल्याचा उल्लेख आहे. फिरत्या शाळा या ''छावणीच्या स्वरूपात असतात. तिथे मुलं पंधरा ते तीस असे काही दिवस येतात. त्या भागातील परिस्थिती किती तणावाची आहे यावर या दिवसांची संख्या ठरते. प्रत्येक विषयाचा तास नव्वद मिनिटांचा असतो आणि दिवसाला चार विषय शिकवले जातात. साधारण पंचवीस ते तीस विद्यार्थी असतात आणि तीन शिक्षक असतात. यात आता काही नवीन शैक्षणिक साधनं, बॅटऱ्यांपासून ते सीड्यांपर्यंत, वापरून इतिहास आणि विज्ञान शिकवलं जातंय''.

इथेही आपल्याला या प्रयत्नांचा आवाका किती आहे याची माहिती नाही. अर्थात या प्राचीन व अतिशय अपुऱ्या प्रयत्नांव्यतिरिक्त माओवाद्यांनी जवळपास दोन दशकांच्या तणावरहित काळात त्यांच्या नियंत्रणाखालच्या दहा विभागांमध्ये हजारो नियमित शाळा का सुरू केल्या नाहीत याचं कोणतंही स्पष्टीकरण आपण संदर्भ देत असलेल्या लेखांमधून दिलं जात नाही.

पर्यायी प्रारूप

आदिवासी कल्याणाबद्दल बोलायचं, तर माओवाद्यांना वेतन, शेती, आरोग्य व शिक्षणाच्या आघाडीवर आणखी काही करणं शक्य होतं का? मोठ्या प्रमाणावर गावं त्यांच्या नियंत्रणाखाली असताना ते बस्तर परिसरातील ग्रामसभा आणि पंचायतींवर हुकूमत गाजवू शकले असते.

आदिवासींच्या नियंत्रणाखालच्या या पंचायतींमध्ये ते लोकशाही मार्गाने बांधलेल्या शेकडो सहकारी संस्था उभारू शकले असते आणि त्या माध्यमातून आदिवासी उदरनिर्वाहाचं नियोजन करू शकले असते. उदाहरणार्थ, तेंदूपानांसारख्या वनोत्पादनांना वाहिलेल्या सहकारी संस्था दर वर्षी निघणाऱ्या सरकारी निविदांसाठी लोकाश्रयाच्या बळावर स्पर्धेत उतरू शकल्या असत्या. अशा मार्गाने लोभी कंत्राटदारांची व्यवस्था उखडून टाकता आली असती आणि केरळ-पद्धतीची वेतनं देऊन उरलेला नफा पूर्णपणे आदिवासींच्या ताब्यात राहिला असता. इतर वनोत्पादनं व शेतजमिनीबाबतही असेच प्रयत्न करता आले असते.

यात पंचायतींना मिळणाऱ्या सरकारी निधीची भर पडली असतील आणि स्थानिक बँकांकडून ग्रामीण कर्ज मिळवण्याची क्षमता आली असती. या उपलब्ध निधीतून आदिवासींसाठी काय करता आलं असतं याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो : शाळा, महाविद्यालयं, तंत्रप्रशिक्षण संस्था, आरोग्य केंद्रं, ट्रॅक्टर, म्हशी, ट्यूब-वेल, सिंचन कालवे, पिण्याच्या पाण्याचा सुरक्षित स्त्रोत. या काळात  राष्ट्रीय रोजगार हमी योजना, वनाधिकार कायदा, माहिती अधिकाराचा कायदा, शिक्षणाधिकार कायदा, अशा विविध सरकारी योजनांचा पुरेपूर वापर या लोक संघटना करून घेऊ शकल्या असत्या. दंडकारण्यामध्ये माओवाद्यांना या लोकशाही लक्ष्यांकडे जाण्यासाठी अभूतपूर्व संधी मिळाली. माओवाद्यांनी याचा विचारही केल्याचा पुरावा नाही. असं का झालं नाही?

युद्धावस्थेला प्राधान्य

या काळात माओवाद्यांनी दुसरं काय काय केलं याकडे लक्ष दिल्यावर वरच्या प्रश्नाचं त्रासदायक उत्तर सापडू लागतं. माओवादी पक्षाचे सरचिटणीस गणपती यांनी (गणपती २०१०) निमंत्रितांना सांगितल्यानुसार, मूळ कल्पना ही आहे की, ''कायदेयंत्रणा व आर्थिकयंत्रणेच्या दलदलीत रुतून जाण्यापासून आणि लोकांना सत्ता काबीज करण्यासाठी तयार करायचं आहे याचा विसर पडण्यापासून सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे''. या पार्श्वभूमीवर विचारण्याजोगा गंभीर प्रश्न असा की तीन दशकांपूर्वी माओवादी दंडकारण्यात आले तेव्हा त्यांच्या मनात खरंच आदिवासी कल्याणाचा मुद्दा होता का? उपलब्ध दस्तावेज खालील कथा सांगतात.

आंध्रमधील सशस्त्र लढ्याला मोठ्या प्रमाणात माघार घ्यावी लागल्यानंतर माओवाद्यांनी १९८०च्या दशकात या जंगलात प्रवेश करण्याचं ठरवलं. ''स्थायी सैन्य उभारणं, त्यासाठी तळ आवश्यक आहे आणि दंडकारण्य तो तळ असणार होता. या क्षेत्राचा अदमास घेण्यासाठी सुरुवातीला तुकड्या पाठवण्यात आल्या आणि नंतर गनिमी क्षेत्र उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली'' (रॉय २०१०). दंडकारण्यात अनेक फायदे मिळते झाले. या जंगलामध्ये राज्यांच्या सीमा छेदल्या जात होत्या आणि जंगलातला वावरच राज्यांतर्गत होईल एवढ्या मोठ्या प्रदेशावर दाट जंगल पसरलेलं होतं. काही भागांमध्ये सरकारचं अतिशय प्राथमिक अस्तित्त्व होतं, आणि उरलेल्या भागांमध्ये अजिबातच सरकारी अस्तित्त्व नव्हतं. शिवाय, आधी नोंदवल्याप्रमाणे आदिवासी समाजात वर्गाधिष्ठित रचना तुलनेने कमी प्रमाणात होती. ऐतिहासिक काळापासून बाहेरच्या मंडळींनी त्यांच्यावर लादलेल्या तुटलेपणामुळे आणि पिळवणुकीमुळे आदिवासी परंपरांमध्ये स्वसंरक्षणासाठी आवश्यक बंडखोरी निर्माण झालेली होती. दंडकारण्य ही अक्षरशः एक 'कोरी पाटी' होती आणि त्यावर माओवाद्यांनी आधी चारू मुजूमदारांची आणि नंतर कन्हई चॅटर्जींची 'दृष्टी' कोरण्याचं ठरवलं.

पहिलं काम होतं ते पुरेशी गनिमी क्षेत्रं निर्माण करणं आणि दुसरं काम होतं, अशा क्षेत्रांमध्ये गनिमी तळ सुरक्षित राहतील असं पाहणं. नवलाखा (२०१०) यातील भेद स्पष्ट करताना लिहितात : ''गनिमी क्षेत्र हे अस्थिर प्रदेशासारखं असतं'', पण गनिमी तळ ''सहजपणे घुसता न येणारे आणि सहज न सापडणारे'' असतात. आत्ताची योजना ''गनिमी युद्ध तीव्र करणं आणि वाढवणं'' ही आहे (गणपती २०१०). शेवटी, ''आपल्याला गनिमी युद्ध हे फिरत्या युद्धात रूपांतरित करायचंय आणि गनिमी सैन्य नियमित सैन्यामध्ये विकसित करायचंय'' (गणपती २०१०). हे लक्ष्य आहे. आदिवासी हे या सैन्य योजनेसाठी आवश्यक दारूगोळा आहेत.

हे लक्ष्य साधण्यासाठी 'पीपल्स वॉर ग्रुप'मधील एक तृतीयांश गनिमी दलं आदिवासी लोकांचा किमान पाठिंबा मिळाल्यानंतर पूर्वीच्या आंध्र प्रदेशातील तेलंगणातून १९८८ साली दंडकारण्यात पाठवण्यात आली. सुरुवातीपासूनच आंध्रातल्या तुकड्यांनी गावपातळीवरती सेनाबांधणी सुरु केलं. या सेना वीस ते तीस तरुण मंडळींच्या असतात आणि त्यांच्याकडे धनुष्यबाण, ठासणीच्या बंदुका, गावठी बनावटीच्या पिस्तूल इथपासून ते खरोखरच्या रायफली व रॉकेट लाँचर यांपैकी काहीही असू शकतं (माओवाद्यांच्या केंद्रीय सैन्यदलाकडून वापर झालेला दहा टक्के माल दर वर्षी अशा सेनांमध्ये वाटला जातो). त्यांचं प्राथमिक काम असतं ते गावांच्या समूहाचं 'रक्षण'. वरकरणी, या सेनांमधले सर्वोत्तम लढवय्ये अधिक व्यावसायिकपणे चालणाऱ्या गनिमी तुकड्यांमध्ये समाविष्ट केले जातात. या तुकड्यांच्या सदस्यांना गणवेश असतो व ते इन्सास रायफल, एके मालिकेतील रायफली, स्वयंचलित रायफली, पिस्तुला, रिव्हॉल्वर, हँडग्रेनेड अशी व इतर 'गंभीर' शस्त्रास्त्रं हाताळतात. काहींकडे हलक्या मशीन-गन, मोर्टार व रॉकेट लाँचर असतात. डिसेंबर २००१मध्ये 'पीपल्स लिबरेशन गरिला आर्मी' (पीएलजीए) अधिकृतरित्या निर्माण झाली. आतापर्यंत 'पीएलजीए'चा प्रवास ''प्लाटूनपासून कंपनीपर्यंत झालेला आहे आणि आता ते बटालियन निर्मितीकडे वळतायंत'' (नवलाखा २०१०). या लेखकांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सेनांचे सुमारे पन्नास हजार सदस्य आहेत तर 'पीएलजीए'चे दहा हजार ददस्य आहेत.

गनिमी क्षेत्रांचा विस्तार झाला आणि बहुतेक प्रदेश त्याखाली आल्यानंतर गनिमी तळ विकसित करण्याचं काम २००१मध्ये वेगाने सुरू झालं. प्रत्येक विभागात दोन ते तीन केंद्र गनिमी तळासाठी निवडण्यात आली आणि अशा मार्गाने दहा ते बारा भागांवर नंतर लक्ष केंद्रित करण्यात आलं. अभुजमाड हा केंद्रीय गनिमी तळ बनला. हे तळ सहजपणे ''न घुसता येण्याजोगे व न सापडण्याजोगे'' बनवण्यासाठी भूसुरुंग व आइडीएस प्रत्येक रस्त्यावर, नाक्यावर, चिन्ह म्हणून वापरता येईल अशा झाडांजवळ किंवा खडकांच्या रचनेजवळ पेरून एक गुंतागुंतीची संरक्षण रचना तयार करण्यात आली. यासाठी माहितगार लोक, टेहळणीची ठिकाणं, तांत्रिक तज्ज्ञ, बिनतारी संपर्कासाठी तांत्रिक साधनं, लॅपटॉप कम्प्युटर, सौरऊर्जेवर चालणाऱ्या बॅटऱ्या व 'आयइडीएस'चा स्फोट घडवण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक साधनं, शेकडो मोटरसायकली, छुपे कारखाने आणि शस्त्रांची निर्मिती- दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्यासाठी आवश्यक वर्कशॉप, इत्यादी अनेक गोष्टी गरजेच्या आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. या रचनेत सेनांसाठी व 'पीएलजीए'साठी आवश्यक मानवी शक्तीचा पुरवठा म्हणून फक्त आदिवासींचा समावेश आहे.

निधीचं वाटप

या सर्व सैन्य रचनेसाठी आवश्यक पैसा कुठून येतो याचं समाधानकारक स्पष्टीकरण आपण अभ्यासासाठी घेतलेल्या दस्तावेजांमध्ये मिळत नाही. काही शस्त्रं आणि दारूगोळा पोलीस स्टेशनांमधून आणि शस्त्रागारांमधून जप्त केला जातो / चोरला जातो, काही मृत सैनिकांच्या हातातून मिळतो. केवळ अशा मार्गाने मिळालेली शस्त्रं बटालियन उभी करण्यासाठी पुरेशी ठरतील का, हे स्पष्ट होत नाही. नवलाखा (२०१०) ढोबळपणे पैशाचा स्त्रोत सांगतात : पक्षाचं सदस्य शुल्क, लोकांकडून मिळणाऱ्या देणग्या, शत्रूची संपत्ती व उत्पन्नसाधनांवरची जप्ती व गनिमी क्षेत्रातील आणि तळ प्रदेशातून जमवला जाणारा कर.

यातील बहुतेक सदस्य दुष्काळपीडित आदिवासी आहेत हे गृहीत धरता पक्षाचं सदस्यत्व शुल्क फारसं असू शकणार नाही. आपल्या लेखात नवलाखा (२०१०) पुढे अशीही माहिती देतात की, तेंदूपानांसारख्या वनोत्पादनावर 'रॉयल्टी' स्वरूपात मिळणाऱ्या पैशापेक्षा ''बँक लुटून मिळणारं किंवा संपत्ती जप्त करून मिळणारं उत्पन्न खूप कमी असतं''. म्हणजे वनोत्पादनावरची रॉयल्टी आणि कंत्राटदार व कंपन्यांवरचे कर यातून बहुतेकसा निधी जमा होतो. असा निधी कसा जमवला जातो आणि सैन्यकाम आणि 'लोक-कामा'मध्ये त्याचं विभाजन कसं केलं जातं याचा अंदाज कोणीही बांधू शकेल.

वरकरणी विस्कळीत असलेल्या या माहितीतून विषयावर काही प्रकाश पडताना दिसतो. नवलाखा (२०१०) एका क्षेत्रीय जनता सरकारच्या २००९ सालच्या अर्थसंकल्पाचा तपशील त्यांच्या लेखात देतात (दंडकारण्यामध्ये पन्नास क्षेत्रीय जनता सरकारं आहेत, हे इथे पुन्हा नोंदवायला हवं). यामध्ये उत्पन्नाच्या बाजूला अकरा लाख रुपये दाखवले आहेत. यात विशेष हे की कंत्राटदारांकडून कर रूपात मिळणारी रक्कम म्हणून तीन लाख साठ हजार रुपये दाखवलेले असले, तरी 'रॉयल्टी'चा - खऱ्या पैशाचा- थेट उल्लेखही नाही. (नवलाखांनी (२०१०) सर्वांकडून घेतले जाणारे कर आणि रॉयल्टी यांमध्ये फरक केला आहे.) साधारण अर्ध उत्पन्न जनता सरकारने केलेल्या वाटपातून येतं, पण त्याचा अर्थ काय हे अस्पष्ट आहे. याचा अर्थ असा आहे का की, इतर उत्पन्न - रॉयल्टीसह - विभागीय सरकारकडून क्षेत्रीय सरकारांमध्ये वाटलं जातं? की, बहुतेकसा पैसा पक्षाकडे सैन्यकामासाठी राहतो?

यातल्या दुसऱ्या अंदाजाला पूरक असा अप्रत्यक्ष पुरावा आपल्याला या अर्थसंकल्पाच्या खर्चाच्या बाजूकडे पाहिल्यावर मिळतो. एखाद्या जनता सरकारचं उत्पन्न हे त्या भागातील विकासकामांसाठी खर्च केलं जावं ही साहजिक अपेक्षा आहे. पण पन्नास टक्क्यांहून अधिक खर्च 'संरक्षणा'साठी खर्च होतो, बारा टक्के शेतीवर, नऊ टक्के आरोग्यावर आणि ०.९ टक्के शिक्षणावर. यातल्या 'संरक्षणा'चा अर्थ आहे सेनांना आणि 'पीएलजीएल'ला फक्त सामग्री पुरवणे (गणवेशाच्या तीन जोड्या, तेल, साबण, टूथपेस्ट, कपडे धुण्याचा साबण, कंगवा, गनपावडर, धनुष्यबाण आणि अन्न). जनता सरकारच्या अर्थसंकल्पात शस्त्रास्त्रं व संबंधित सैन्य गरजांचा खर्च नाही; त्यामुळे यासाठी लागणारा अवाढव्य पैसा थेट पक्षाकडून नियंत्रित केला जातो. मग 'रॉयल्टी'सह उरलेला पैसा तिकडे जातो का? याचं उत्तर होकारार्थी येण्याचीच शक्यता आहे, कारण साधा विकासाचा पैसाही सैन्य तयारीकडे वळवला जाताना दिसतो.

कर, रॉयल्ट्या, आणि 'लोकांकडून मिळालेल्या देणग्या' यांतून उभा राहिलेला पैसा मुळात जातो कुठे हे आता आपल्याला काहीसं स्पष्ट होईल. लोभी व श्रीमंत कंत्राटदारांच्या व्यवस्थेकडून होत असलेली आदिवासींची फसवणूक इतका काळ तशीच का सुरू ठेवण्यात आली हेही यातून स्पष्ट होतं, कारण हेच (कंत्राटदार) मुळात सरकारविरोधातल्या सत्ता काबीज करण्यासाठीच्या युद्धाला निधी पुरवतात.

पंचायती, सहकारी संस्था, इत्यादींवर आधारित पर्यायी आणि प्रामाणिक विकास आराखड्यांचा विचारही माओवाद्यांनी का केला नसेल, हेही या दृष्टिकोनातून स्पष्ट होतं. कारण अशा आराखड्यांमधून खाजगी कंत्राटदारांना दंडकारण्यातून उचकटून टाकता आलं असतं आणि त्यामुळे पक्षाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला असता. शिवाय अशा आराखड्यांमुळे आदिवासींची अवस्था केवळ उपजीविकेच्या पातळीवरून तुलनेने बऱ्या जीवनशैलीला आत्मसात करण्यापर्यंत आली असती. आपल्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून अशा जीवनशैलीचा अनुभव घेतल्यानंतर आदिवासी माओवाद्यांना धरून राहतील का? अधिक महत्त्वाचं म्हणजे ते त्यांच्यातल्या तरुण मंडळींना सेना किंवा 'पीएलजीए'मध्ये सामील करून तरुण वयातच हिंसक मृत्यूच्या तोंडी देतील का?

थोडक्यात, आदिवासींना केवळ उपजीविकेच्या पातळीवर जाऊन उत्कर्ष साधण्याची मुभा नाही, कारण त्यामुळे सत्ता काबीज करण्याच्या आराखड्यांमध्ये अडथळा येईल.

इथे असाही युक्तिवाद केला जाईल की, दंडकारण्यातील माओवाद्यांच्या कामाच्या परिणामांचं मूल्यमापन त्यांनी आदिवासींच्या सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी दिलेल्या योगदानावरून करू नये, कारण ज्या युद्धसदृश परिस्थितीत त्यांना कार्यरत राहावं लागलं त्यामध्ये आरोग्य, शिक्षण व शेतीविषयक सुधारणा, आदींवर लक्ष केंद्रीत करण्याला पुरेसा अवधी नव्हता. पण आदिवासी कल्याण हे प्राधान्यक्रमात सर्वांत वरच्या स्थानावर असतं (आझाद आणि किशनजी यांच्या दाव्यानुसार), तर वेतन, शिक्षण, आरोग्य, इत्यादींसाठीची लढाई आरंभापासूनच सुरू करता आली असती, जसं देशातल्या इतर अनेक चळवळींनी केलं. पण गनिमी क्षेत्रं निर्माण करण्याला प्राधान्य होत असेल, तर मात्र बाकीचं सगळं पुढे ढकललं जातं; उलट कल्याणकारी कामं हातातच घेतली जाऊ शकत नाहीत, कारण तुम्हाला गनिमी सैन्यासाठीच पैसा लागतो, आणि तो खाजगी व्यावसायिक, खंडणीदार, इत्यादींकडून मिळतो. शाळा, आरोग्य-केंद्रं उभी करण्यासाठी, वेतनवाढीसंबंधी अधिक चांगलं यश मिळवण्यासाठी पंचवीस वर्षांचा कालावधी खूपच होता, पण सुरुवातीपासून सशस्त्र लढ्याला प्राधान्य नसतं तरच..

युद्धासाठी मुलं

सरकार ''शाळेतल्या मुलांचा वापर विशेष पोलीस अधिकारी आणि पोलिसांचे खबरे'' म्हणून करतं, अशी तक्रार माओवादी करतात (आझाद २०१०). सरकारची एकूण वृत्ती आणि क्रौर्य पाहता हे खरं असण्याची शक्यता आहे, हे आपण मागे नोंदवलंय. पण मुलांच्या संदर्भात माओवाद्यांची वर्तणूक कशी दिसते?

रॉय (२०१०) यांनी लिहिलंय की, इतर अनेकांप्रमाणे सतरा वर्षांची कमला 'पीएलजीए'ची कट्टर सदस्य बनलेय; तिच्या कंबरेला रिव्हॉल्व्हर आहे आणि खांद्याला रायफल अडकवलेय. ती सैन्यात कितव्या वर्षी आली असेल याचा आपण फक्त अंदाजच बांधू शकतो. हे एक सुटं उदाहरण नाहीये. रॉय यांच्या लेखावरून व सोबतच्या फोटोग्राफांवरून ठळकपणे असं दिसतं की, सेना आणि 'पीएलजीए'मध्ये सगळेच नाही, पण बहुसंख्य सदस्य हे साधारण विशीच्या पुढे-मागे आहेत, आणि त्यातील बहुतेक जण कित्येक वर्षं सैन्यदलांचा भाग आहेत. जंगलात शेकडो सशस्त्र बंडखोरांच्या सान्निध्यात झोपण्याची तयारी करत असताना रॉय यांच्यातला मातृत्त्वभाव जागा होतो : ''माझ्या भोवती ही अनोखी, सुंदर मुलं त्यांच्या विलक्षण अस्त्रांसोबत आहेत''.

माओवादी आराखड्यानुसार युद्धासाठी मुलांची भरती करणं हा एक नियमच असल्यासारखं दिसतं. कॉम्रेड माधव, जे आता 'पीएलजीए'च्या प्लाटूनचे कमांडर बनले आहेत, आंध्र प्रदेशातील वरंगळ इथे नवव्या वर्षी माओवाद्यांना सामील झाले होते (रॉय २०१०). सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक नियोजित केलेल्या आहेत. आधी उल्लेख केलेल्या फिरत्या शाळा आदिवासी मुलांना शिक्षण देण्यासाठी नाहीत. सर्वसाधारण आदिवासी मुलाने जावं अशी शाळाच अस्तित्त्वात नसताना, या विशेष शाळा, ज्यांना 'यंग कम्युनिस्ट मोबाइल स्कूल' म्हटलं जातं (किंवा प्राथमिक साम्यवादी प्रशिक्षण शाळा म्हटलं जातं), बारा-पंधरा वयोगटातल्या पंचवीस-तीस मुलांच्या गटाला एकत्र करतात. या मुलांना मार्क्सवाद, लेनिनवाद व माओवादामधील प्राथमिक संकल्पना, हिंदी व इंग्रजी, गणित, सामाजिक शास्त्रं, विविध प्रकारशी शस्त्रं, कम्प्युटर, इत्यादींनी बनलेल्या अभ्यासक्रमाचं खोलवर प्रशिक्षण सहा महिने दिलं जातं (नवलाखा २०१०). तिथून बाहेर आल्यानंतर ''ती 'पीएलजीए'च्या तुकड्यांसोबत फिरतात, डोळ्यांमध्ये तारे घेऊन आणि रॉक-बॅन्डच्या चमूप्रमाणे'' (रॉय २०१०).

नवलाखाही (२०१०) लिहितात की, इतर कुठल्याही नियमित सैन्यांप्रमाणेच (माओवादी) भरतीप्रक्रिया बैठकींमधून आणि माहितीपत्रकं वाटून सुरू करतात. एक पत्रक 'बस्तरमधील बेरोजगार मुलांना व मुलींना' उद्देशून होतं, त्यात म्हटलं होतं की, 'तुम्हाला पगार मिळणार नाही, पण अन्न, कपडे मिळतील, तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण केल्या जातील आणि तुमच्या कुटुंबाला जनता सरकार मदत करेल'.

जायला शाळा नाहीत, हाताशी दुसरी कुठली संधी नाही, कुटुंबात सब-सहारन आफ्रिकी देशांप्रमाणे परिस्थिती - अशा अवस्थेत कोणतं सक्षम आदिवासी मूल अन्न, वस्त्रं, समवयीनांची सोबत आणि खांद्यावर रायफल अकडवून जंगलात फिरण्याची संधी यांच्या मोहात पडणार नाही? साहजिकपणेच जेव्हा सरकार हल्ला करतं आणि आदिवासींच्या आर्थिक जीवनात आणखी अडथळे येतात, तेव्हा सेनांमध्ये आणि 'पीएलजीए'मध्ये होणाऱ्या भरतीत वाढ होते. सरकारी दडपणूक जितकी वाढेल तितकी भुकेल्या मुलांचं 'जनतेचं सैन्य' मोठं होणार.

माओवादी दस्तावेजांमधूनच हे प्राथमिक चित्र पुरेसं स्पष्ट होतं. आदिवासींच्या बाबतीत सरकारकडून झालेल्या ऐतिहासिक दुर्लक्षाचा आणि पिळवणुकीचा फायदा घेत माओवादी नेतृत्त्वाने दिखाऊ कल्याणकारी योजनांची आश्वासनं देत दुर्दैवी आदिवासींचा पाठिंबा मिळवला, पण मुख्य लक्ष ठेवलं ते गुप्तपणे गनिमी तळ उभारण्याकडे. या प्रक्रियेमध्ये त्यांनी अन्न व कपड्यांचं आश्वासन देत मोठ्या प्रमाणावर आदिवासी मुलांना आपल्याकडे आकर्षित केलं. कठोर सेना आणि गनिमी दलं याच मुलांनी बनलेली आहे.
***


संदर्भ :
आझाद (२०१०) : 'सीपीआय (माओइस्ट)-च्या प्रवक्त्याची मुलाखत', द हिंदू, १४ एप्रिल.
गणपती (२०१०) : 'सीपीआय (माओइस्ट)-च्या सरचिटणीसाची मुलाखत', जॅन मिर्दाल व गौतम नवलाखा यांनी घेतलेली, १४ फेब्रुवारी, सनहती-डॉट-कॉम.
गांधी, कोबाड (२००८) : 'सुवोजित बाग्ची यांनी घेतलेली मुलाखत', बीबीसी दक्षिण आशिया, २३ सप्टेंबर.
नवलाखा, गौतम (२०१०) : 'डेज् अँड नाइट्स इन द हार्टलँड ऑफ रिबेलियन', सनहती-डॉट-कॉम. (लहान रूपात 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'मध्येही प्रकाशित, मे).
रॉय, अरुंधती (२००९) : 'मिस्टर चिदंबरम्स वॉर', आउटलूक साप्ताहिक, ९ नोव्हेंबर.
- (२०१०) : 'वॉकिंग विथ द कॉम्रेड्स', आउटलूक साप्ताहिक, २१ मार्च.

Saturday, 11 May 2013

मी का लिहितो? : सआदत हसन मंटो

सआदत हसन मंटो (११ मे १९१२ - १८ जानेवारी १९५५) याचं जन्मशताब्दी वर्ष आज संपतंय. या गेल्या वर्षाच्या निमित्ताने मंटोची आठवण आपण यापूर्वीही 'रेघे'वर जागवलेली आहे. आज हे वर्ष संपत असल्याचं निमित्त साधत मंटोचं स्वतःच्या लिहिण्याविषयीचं, आयुष्याच्या शेवटाकडे लिहिलेलं एक टिपण मराठीत रूपांतरित करून ठेवूया.

सआदत हसन मंटो
मी का लिहितो? हा एक असा प्रश्न आहे, जसे मी का खातो.. मी का पितो.. (हे प्रश्न). पण यात एक भेद असा की खाण्या-पिण्यावर मला पैसा खर्च करावा लागतो, तर मी लिहितो तेव्हा मला नकद रकमेच्या स्वरूपात काही खर्च करावा लागत नाही.

पण आणखी खोलात गेलं तर असं लक्षात येतं की हे चुकीचं आहे. कारण मी रुपयांच्या जोरावरच लिहितो.

मला जर खायला-प्यायला मिळालं नाही तर माझं शरीर लेखणी हातात धरायच्या अवस्थेत राहणार नाही हे स्पष्ट आहे. कदाचित विपन्नास्थेत डोकं सुरू राहीलही, पण हात सुरू राहणंही आवश्यक आहे. हात नाही तर तोंड तरी सुरू राहावं लागेलच. माणूस खाल्ल्या-प्यायल्याशिवाय काहीही करू शकत नाही ही केवढी मोठी ट्रॅजडी आहे.

लोक कलेला एवढ्या उंचीवर चढवून ठेवतात की तिचे झेंडे पार आभाळात फडकावून टाकतात. पण कुठलीही श्रेष्ठ आणि महान गोष्ट साध्या रोटीची गुलाम आहे हे खरं नाहीये का?

मी लिहितो कारण मला सांगायचं असतं. मी लिहितो कारण मी काही कमावू शकेन, जेणेकरून मी काही सांगण्याच्या अवस्थेत राहीन..

रोटी आणि कला यांच्यातील संबंध वरकरणी विचित्र दिसतो. पण खुदाला असंच हवं असेल तर आपण काय करणार. तो स्वतःला कोणत्या गोष्टीबद्दल अपेक्षा नसल्याचं म्हणवून घेतो, पण तो निरपेक्ष अजिबातच नाहीये. त्याला श्रद्धा लागते. आणि श्रद्धा ही तर खूप नरम आणि नाजूक रोटी आहे, म्हणजे असंही म्हणता येईल की या खमंग रोटीने तो आपलं पोट भरतो.

माझ्या शेजारी राहणारी कोणी बाई रोज नवऱ्याकडून मार खात असेल नि परत त्याचे बूट साफ करत असेल तर माझ्या मनात तिच्याबद्दल अजिबात सहानुभूती निर्माण होत नाही. पण माझ्या शेजारी राहणारी कोणी बाई आपल्या नवऱ्याशी भांडून किंवा आत्महत्येची धमकी देऊन सिनेमा पाहायला जाते नि तिचा नवरा दोन तास चिंतेत असलेला मला दिसतो, तेव्हा मला दोघांबद्दलही एक गूढ नि करूण सहानुभूती वाटायला लागते.

एखाद्या मुलाचं मुलीवर प्रेम बसलं तर मी त्याला सर्दीपडशाएवढीसुद्धा किंमत देणार नाही. पण एखादा मुलगा जर असं घोषित करत असेल की, त्याच्यावर शेकडो मुली मरतायंत पण तरीही खरं पाहता तो बंगालमधल्या भुकेने ग्रस्त असलेल्या रहिवाश्याप्रमाणे प्रेमाचा भुकेला आहे, तर माझं लक्ष त्याच्याकडे जाईलच जाईल. या वरकरणी यशस्वी प्रेमवीराच्या रंगेल गप्पांमध्ये जी ट्रॅजडी भरलेली असेल ती मी माझ्या हृदयाच्या कानांनी ऐकेन नि दुसऱ्यांना सांगेन.

धान्य दळणारी जी बाई रोज दिवसभर काम करते नि रात्री निवांत झोपी जाते ती माझ्या कथांमधली हिरॉइन होऊ शकणार नाही. वेश्यावस्तीतल्या खाटेवरची बाई माझी हिरॉइन असू शकते. ती रात्री जागते आणि सकाळी झोपेत अचानक म्हातारपण दरवाजे ठोठावत असल्याचं भयानक स्वप्न पडल्यामुळे दचकून जागी होते. वर्षानुवर्षांची झोप साकळून राहिलेल्या तिच्या भुवया माझ्या कथांचे विषय बनू शकतात. तिचे आजार, चिडचिड, शिव्यांच्या लाखोल्या, हे सगळं मला भावतं नि मी त्यानुसार लिहितो. आणि घरगुती स्त्रियांच्या तब्येती, आवडीनिवडी यांच्याकडे दुर्लक्ष करतो.

सआदत हसन मंटो लिहितो कारण तो खुदा इतका मोठा कथाकार किंवा शायर नाहीये, त्याची विनवणी करण्यासाठी तो लिहितो.

मला माहितेय की मी एक बडी असामी आहे आणि ऊर्दू साहित्यात माझं मोठं नाव आहे. एवढी तरी आनंदाची गोष्ट नसती तर आयुष्य अजूनच अवघड बनलं असतं. तरी आपण ज्याला आपला मुल्क म्हणतो त्या पाकिस्तानात मी माझं योग्य ते स्थान शोधू शकलेलो नाही, हेही माझ्यासाठी एक दुःखद वास्तव आहे. त्यामुळेच मी मनातून अस्वस्थ असतो. कधी पागलखान्यात तर कधी इस्पितळात राहायची वेळ येते.

मी दारूपासून सुटका का करून घेत नाही, असं मला विचारलं जातं. माझं तीन-चतुर्थांश आयुष्य तर अनिर्बंध वागण्यात गेलं, त्यामुळे आता कधी पागलखाना तर कधी इस्पितळात राहायची वेळ येते.

मला असं वाटतं की, पथ्य पाळून जगलेलं आयुष्य ही एक प्रकारची कैद आहे. आणि कुपथ्य पाळून जगलेलं आयुष्यही कैदच आहे. कुठल्या ना कुठल्या मार्गाने ह्या पायमोज्याच्या एका धाग्याचं टोक पकडून ओरखडत जायचंय बस्स.