रघू दंडवते |
दंडवत्यांच्या आठवणीत 'रेघे'वरची ही नोंद. ही नोंद जरा मोठी आहे आणि तिचा मुख्य उद्देश आहे तो रघू दंडवत्यांबद्दल काही प्राथमिक माहिती एकत्र करून ठेवण्याचा.
'वसेचि ना' ही कादंबरी नि 'वाढवेळ' आणि 'डुबुक' हे दोन कवितासंग्रह एवढी तीनच दंडवत्यांची प्रकाशित पुस्तकं. (तिन्ही 'प्रास प्रकाशना'नं प्रकाशित केलेली). कदाचित काही जुन्या लोकांना त्यांची 'मावशी' कथा आठवत असेल किंवा 'अभिरुची' मासिकात त्यांनी 'जंगोरा' नावानं लिहिलेलं हिंदी चित्रपटांविषयीचं सदर किंवा असंच काही जुनं लिखाण, पण ते पुस्तकात आलं नाही कधीच.
***
एक
वसेचि ना. मुखपृष्ठ- वसंत सरवटे |
वसेचि ना- रघू दंडवते
पहिली खेप- कार्तिकी १९०५
किंमत- ४२ रुपये.
- अशी कादंबरीवरची नोंद आहे. (अंदाजे जानेवारी १९८४ ला पहिली आवृत्ती निघाली असणार.)
ह्या कादंबरीसाठी लिहिलेला ब्लर्ब इंटरेस्टिंग आहे, म्हणून तो जसाच्यातसा देत आहे.
काट्याच्या अणीवर वसलीं तीन गांवं।
दोन ओसाड। एक
वसेचि ना ।।
असं ज्ञानेश्वराच्या नांवावर एक कूट आहे.
मुंबईत येऊन शिकत शिकत, नापास होत होत, नोकरी शोधत
शोधत, त्यांतच ह्या मुंबईच्या अंगावर गळवासारख्या उपटलेल्या
दुस-याच एका मुंबईची भयाण ओळख करून घेत घेत सरतेशेवटी
दरवर्षी आपोआपच वाढत जाणाऱ्या नि गरजांना पुरून उरणाऱ्या
पगाराची नोकरी मिळाल्यावरसुद्धां विश्वनाथ पढेगांवकर कांहीकेल्या
स्थिरावेचना. त्याचं गांव वसेच ना. बाकीची ओसाड गांवं तर
त्याच्या अंवतीभंवती रग्गड होतींच.
भालचंद्र नेमाड्यांच्या पांडुरंग सांगवीकरला नि
चांगदेव पाटीलला, भाऊ पाध्यांच्या अनिरुद्ध धोपेश्वरकरला
नि मधू साबण्यांच्या बापू भालेरावला
रघू दंडवते
यांनी विश्वनाथ पढेगांवकर हा सख्खा भाऊच
मिळवून दिलाय आठव्या दशकांत
नि तुमच्या आमच्यासमोर धरलाय एक भगभगीत आरसा.
***
दोन
छायाचित्र- रमेश नायर, इंडियन एक्सप्रेस. मुखपृष्ठ- अरुण कोलटकर |
या कवितासंग्रहाचं हे मुखपृष्ठ, अरुण कोलटकरांनी केलेलं.
या मुखपृष्ठाच्या तयारीसंबंधी एक उल्लेख अशोक शहाणे यांच्या एका लेखात आहे. हा लेख शहाण्यांनी 'अनाघ्रात' ह्या अर्धवार्षिकाच्या पहिल्या अंकात (२००५) लिहिला होता. मूळ लेख ''चिरीमिरी'ची हकीगत'. त्यात दंडवत्यांच्या 'वाढवेळ'संबंधी उल्लेख आलाय, तो असा-
नावावरनं एक गंमत झाली होती. 'चिरीमिरी'ची नाही, रघूच्या 'वाढवेळ'ची. हे नाव रघूनं पक्कं करून ठेवलं होतं. अन् रघूच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ करायचं अरुणवर होतं. अरुणनं मुद्दाम मागून घेऊन सगळ्याच कविता एकत्र वाचून घेतल्या होत्या. तश्या सुट्यासुट्या कविता आधीपास्नं ठाऊक होत्याच. पण हे वाचणं म्हंजे पुस्तक म्हणून. त्या वाचून झाल्या अन् अरुणचं डोकं चालायला लागलं. मुंबईतल्या लोकलमध्ये रघू खिडकीशी बसलेला असा बाहेरनं फोटो काढायचा. किंवा आजूबाजूला तोबा गर्दी अन् रघू बसून आहे असा आतनं. किंवा चर्चगेट फलाटावर गाडी पकडायला माणसं जातायंत असा. अनायासे रघू तेव्हा नगरहून मुंबईत आलेला होता. त्याला स्वतःची छबी कव्हरवर अजिबात नको होती. मग चर्चगेटचा इंडिकेटर अन् घड्याळ एकाच फोटोत येईल अशा बेतानं अन् इंडिकेटरवर दाखवलेली गाडीची वेळ होऊन गेलीय - ते बाजूच्या घड्याळावरनं कळणार - अन् तरी गाडी अजून सुटलेली नाहीच. म्हंजे लेट झालीय. हे 'वाढवेळ' नावाशी सुसंगत होईल, असं अरुणनं सुचवलं. ह्यावर रघूचं बोलणं मोठं मासलेवाईक होतं. तो म्हणाला, पुस्तकाच्या नावाचा न् आतल्या कवितांचा काहीच संबंध नाही, तेव्हा कव्हरचा न् नावाचा तरी कशाला असायला हवा? नकोच. जसं आईवडिलांनी काय वाटलं म्हणून माझं नाव रघू ठेवलं अन् मी असा निघालो. तेव्हा संबंध नकोच.
अरुण जरा भांबावून गेल्यागत झाला. पण लगेच सावरला पण. त्यानं आपल्या बाडातनं वर्तमानपत्रातनं कापून ठेवलेला एक फोटो काढला. चारसहा महिन्यांपूर्वीचा होता. इंडियन एक्सप्रेसमधला. फोटो एक काँपोझिशन म्हणून विलक्षणच होता. रात्रीच्या बोरीबंदर स्टेशनाचा. माणसं अस्ताव्यस्त झोपलीयंत अन् एक कुत्रं फोटोत मधोमध असल्यासारखं. अनं ते चालत असणार, कारण त्याच्या एक पाय आउट-ऑफ-फोकस झाल्यामुळं ते तीन पायांचं कुत्रंच वाटत होतं. हा फोटो एकदम रघूसकट सगळ्यांनी पास करून टाकला. अरुणला तो पसंत होताच. म्हणूनच तर त्यानं इतके महिने तो वर्तमानपत्राचा कपटा जपून ठेवला होता.
मग एक्सप्रेसकडनं मूळ फोटो मिळवणं, तो कव्हर म्हणून छापण्याची परवानगी मिळवणं वगैरे सोपस्कार सुरू झाले.
***
तीन
मुखपृष्ठ- वृंदावन दंडवते |
'डुबुक'चाही ब्लर्ब अर्थात इंटरेस्टिंग आहेच, तो असा-
भेगाळल्या टाचा
डोक्यावर ओझे
कोणीतरी पायी
चालते आहे
आधाराला धोंडा पांडुरंग
एकूणाएक कष्टांची बेरीज किती?
रघू मागनं ठेवून गेलेल्या कागदांत ह्या अश्या काही सुट्या ओळी सापडल्या.
मागंपुढं काय त्याच्या डोक्यात होतं काय माहित.
अन् ह्या चाळीसेक कविता.
नाहीतरी
'मला मारून टाकायचं आता नक्की झालंय'-नंच
त्याची कविता लिहायची सुरवात झाली होती
'वाढवेळ'नंतर हे 'डुबुक'.
खेळ खलास.
'मला मारून टाकायचं आता नक्की झालंय' ही दंडवत्यांची एक कविता. ती 'वाढवेळ'मधे आहे.
***
चार
'लोकसत्ते'तली बातमी
***
पाच
रघू दंडवते गेल्यानंतर त्यांची बहीण रेवा कुलकर्णी यांनी लिहिलेली कविता 'लोकसत्ते'च्या 'नगर वृत्तान्त' पुरवणीत दुसऱ्या पानावर उजव्या कोपऱ्यात प्रकाशित झाली होती. पूर्वी दुसऱ्या एका ब्लॉगवर ही कविता प्रसिद्ध करण्यासाठी रेवा कुलकर्णी यांची परवानगी घेतली होती, तो ब्लॉग आता बंद आहे, त्यामुळे त्या परवानगीच्या जोरावरच ती कविता इथे देतो आहे -
येणारा कधीतरी जाणारच असतो
हे गुळगुळीत वाक्य बोचकारतच रहातं
अहो, बागेतला बुलबुल क्षणात या फांदीवर
तर क्षणात दुसऱ्या फांदीवर पाहिला आहे
पण, बाबा रे तुझे क्षणात निसटून जाणे
कसे पचवायचे रे सर्वानी!
सारे म्हणाले - तो निर्मोही होता, भाबडा होता
निष्कपट होता, कुणाला दुखावणे त्याला जमलेच नाही
धार्मिक कर्मकांड न करणारा खरा संत होता तो वगैरे
पटते रे, पण तुझे जाणे वळत नाही अजूनही!
पायाला हात लावून नमस्कार केलेला आवडायचा नाही तुला
दुसरीकडेच पहाणार तू त्या वेळेला
अन् आता बघ, जो येतो तो तुला लवून नमस्कार करतोय
म्हणून शेवटी डोळेच देऊन टाकलेस का!
इतका कसा रे तू भिडस्त - इतका संकोची
बसल्या जागेवर कधी पाण्याचा पेला मागितला नाहीस
‘असू दे - राहू दे - मी घेतो ना’
इतकी दूर ठेवलीस बहीण
पण तसंही म्हणता येणार नाही
जेव्हा जेव्हा कधी गडबडायला व्हायचं
तेव्हा हाक देण्याआधी मूकपणे धावून आलास तू
कुठकुठली माहिती द्यायचास आम्हाला
तुझ्या डोक्यात सतत चाललेली ती लेखनाची चक्रे
निमूट बसलेला असताना गतिमान असायची ती
पाटकोऱ्या कागदांवर लिहिलेल्या त्या कच्च्या कविता
तुझा तो मोठ्ठय़ा आवाजातला खोकला
धाडकन येणारी शिंक अजून कानात घुमतेय
सगळ्या नातवंडांना तुझा लळा
ती बघ आता कशी हिरमुसून
तुझ्या वस्तू हाताळताहेत!
तुझं लिखाण साधं सरळ तुझ्यासारखंच
म्हणायचास तू - अर्थ ज्याने त्याने मनाप्रमाणे लावावा
कुडी थकायला लागली तशी राहून गेलेली इच्छा
नगरचा ‘बागरोजा’ पहाण्याची -
धापा टाकत उठत बसत तीपण तू पूर्ण केलीस
म्हणून तुला बरं वाटलेलं पाहून चिंतातुर आम्ही पण सुखावलो
गाडा हळूहळू थकायला लागला, कुरकुरू लागला
श्वासासाठी धडपड सुरू झाली, पण निमूटपणे स्वीकारलीस तू
आम्हाला बरं वाटावं म्हणून शेवटपर्यंत
ना उपचार सोडलेस की निरवानिरवीची भाषा बोलला नाहीस
पण शेवटचे काही तास तुझी तगमग पहावत नव्हती रे!
याचेच तुला भान झाले म्हणून लवकर गाशा गुंडाळलास का
एका परीने तुझ्या वेदनेतून तुला मुक्त होता आले
- पण आता तुझ्या अनुपस्थितीने
मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे रे
तरीही त्यातून सावरण्याची तूच शक्ती देणार आहेस
जा - शांतपणे जा -
आम्ही तुला नुसते आठवत राहू -
अलविदा!
***
सहा
- दंडवते गेल्यानंतर चंद्रकान्त पाटील यांचा 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेला लेख नंतर त्यांच्या परवानगीने 'रेघे'वर प्रसिद्ध केला होता- रघू दंडवते : निखळ मराठी गद्यशैलीचा लेखक
***
सात
दंडवते गेल्यानंतर 'सत्याग्रही विचारधारा'च्या २००९च्याच दिवाळी अंकात त्यांची 'मकबरा' ही कविता प्रसिद्ध झाली होती; ती अशी -
***
आठ
दंडवत्यांची आणखी एक कविता. ही कविताही पूर्वी एका ब्लॉगवर (अशोक शहाण्यांची परवानगी घेऊन) प्रसिद्ध केली होती, पण आता तो ब्लॉग नाही, त्यामुळं त्याच परवानगीच्या जोरावर ती कविता इथं-
झूटी कबर
ही चारी बाजूंची जाळी
अन् मधली सुंदर कबर
ही आहे नुस्ती झूटी कबर
अहो खरा मुडदा तर खालीच आहे
खाली जायला आहेत अंधाऱ्या पायऱ्या
ही खालची कबर खरीखुरी जुनीपानी अंधारी
तिथपर्यंत फारसं कुणी जात नाही
तिच्याबद्दल काहीच कुणाला माहीत पण नाही
कुणाची केव्हाची ऐतिहासिक मोठ्या माणसाची
फकिराची का आणखी कुणाची
खरं म्हणजे काहीच माहीत नाही
एखादी खरीखोटी आख्यायिका पण नाही
पण खरंतर हे जाणून घ्यायला पण कुणाला नको आहे
इतिहासाचे अभ्यासक संशोधक धंदेवाईक लोक वगैरे
गावातली माणसं - त्यांना पण तशी काही जरूर नाही
विचारलंच कुणाला तर म्हणतात ते काही इतकं महत्त्वाचं नाही
खरी गोष्ट अशी आहे की हे सगळे घाबरतायत
दूर रहातायत नकोच समजून घ्यायला म्हणतायत
त्याचं खरं कारण वेगळंच आहे. मी सांगतो तुम्हाला
हे घाबरतायत - मला माहीत आहे
कबर उघडून बघायला कुणाची हरकत नाही
पण उघडून बघायला कोणाला नकोय
घाबरतात सगळे - उघडून बघितलीच जर कबर
अन् समजा आतमध्ये स्वत:चाच मुडदा निघाला तर
म्हणून घाबरतात सगळे
त्यापेक्षा वरची झूटी कबर चांगली
शोभीवंत आहे सुंदर जाळी बाजूला आहे
बघायला चांगली दाखवायला चांगली
झूटी कबर
(वाढवेळ, पान क्रमांक ४८-४९)
***
नऊ
'वसेचि ना' आता बाजारात विकत मिळत नाही, पण 'वाढवेळ' (७२ रुपये) आणि 'डुबुक' (१८० रुपये) दोन्ही मिळतात.
ही एक निमंत्रणपत्रिका पाहण्यासारखी-
प्रकाशक- अशोक शहाणे
प्रास प्रकाशन
वृंदावन- २ बी/५, रहेजा टाउनशिप,
मालाड पूर्व, मुंबई- ४०००९७.
दूरध्वनी- (०२२) २८७७७५९०.
***
दहा
याशिवाय रघू दंडवत्यांबद्दल इतर ठिकाणी सापडलेलं-
मोकळीक ह्या ब्लॉगवर सुनील तांबे यांनी लिहिलेलं स्फुट - रघू दंडवते
'लोकसत्ते'चे नगरचे प्रतिनिधी भूषण देशमुख यांनी 'नगर वृत्तान्त' ह्या पुरवणीत लिहिलेलं लहानसं टीपण - आठवणीतले रघू दंडवते
***
mast jamalie post.
ReplyDeleteएका ब्लॉग मध्ये अजून छोटा ब्लॉग असल्यासारखं वाटतंय...'वाढवेळ' च्या शीर्षकाची गोष्ट आणि रेवती कुलकर्णी यांचा लेख जास्त आवडलं.
ReplyDeleteI had not read a word by the late Raghu Dandavate. My luck turned today. Thanks. Are his books available in the market?
ReplyDeleteTwo of Danadavate's books are available- 'Wadhvel' & 'Dubuk'. You can get these books at People's Book House (Mumbai) or International Book Depot (Pune)
Deleteअन् समजा आतमध्ये स्वत:चाच मुडदा निघाला तर...indeed...
ReplyDeleteतशा कविता वाचायला आवडत नाहीत. पण 'वाढवेळ' वाचलं. अजून पूर्ण नाही. पण काही कविता वाचल्या. परत परत वाचल्या. काही कळल्या नाहीत. काही खूप आवडल्या. पण जेवढा वाचल्या त्या माझ्याशी संबंधित होत्या. माझ्याशी 'सामान्य माणसाशी' संबंधित. खरतरं तो संबंध मुखपृष्ठावरून-च जुळत जातो. रस्ते, धूळ, रात्र, लोकल, वाऱ्याची झुळूक...सामान्यांशी संबंधित, नेहमीच्या गोष्टींवरच्या कविता.
ReplyDeleteएकदा जरूर वाचण्यासारख्या.