Wednesday, 27 March 2024

पांडू नरोटे यांचं काय झालं?

घटना: २२ ऑगस्ट २०१३ रोजी पांडू नरोटे व महेश तिरकी या (दोघेही राहणार- गाव मुरेवाडा, तालुका एटापल्ली, जिल्हा गडचिरोली) यांना आणि हेम मिश्रा (राहणार- उत्तराखंड; घटनेवेळी दिल्लीत विद्यार्थी) यांना संध्याकाळी सव्वासहा वाजता अहेरी बस-स्टॅण्डजवळून गडचिरोली पोलिसांनी अटक केली. (आपल्याला पोलिसांनी चंद्रपुरातील बल्लारशा रेल्वे-स्थानकावरून ताब्यात घेतल्याचं हेम यांचं म्हणणं होतं).

यानंतरच्या चौकशीतून व तपासातून पुढे दिल्ली विद्यापीठातील शिक्षक जी. एन. साईबाबा, उत्तराखंडमधील प्रशांत राही आणि छत्तीसगढमधील एका गावचे रहिवासी विजय तिरकी यांचीही नावं समोर आली. सप्टेंबर २०१३मध्ये प्रशांत व विजय यांना गोंदियातील देवरी इथून अटक झाली (आपल्याला छत्तीसगढमधून अटक झाल्याचं प्रशांत यांचं म्हणणं होतं); तर, मे २०१४मध्ये साईबाबा यांना दिल्लीतील त्यांच्या घरी अटक झाली. बंदी घातलेल्या संघटनेचे (म्हणजे ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष- माओवादी’चे) सदस्य असणं, दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग घेणं, भारत सरकारविरोधात युद्धाची योजना आखणाऱ्या व्यापक कटाचा भाग असणं, इत्यादींचा निर्देश करणारी ‘बेकायदेशीर कृत्यं (प्रतिबंधक) अधिनियम’ [अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटीज् (प्रिव्हेन्शन) अ‍ॅक्ट, अर्थात यूएपीए] या कठोर कायद्यातील कलमं त्यांच्या विरोधात लावण्यात आली.

आरोप: माओवादी पक्षाच्या नेत्या (आता दिवंगत) नर्मदाक्का यांच्या भेटीसाठी हेम गडचिरोलीत आला, आणि त्याला जंगलापर्यंत घेऊन येण्यासाठी नर्मदाक्कांनी पांडू व महेश यांना अहेरीला पाठवलं. साईबाबा यांच्याकडून काही गोपनीय संदेश व सामग्री नर्मदाक्कांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी हेमवर होती. या आरोपींकडून पेन-ड्राइव्हपासून ते वृत्तपत्रापर्यंत विविध प्रकारच्या वस्तू जप्त करण्यात आल्या, त्यांच्याकडे माओवादी पक्षाशी संबंधित व दहशतवादी कटातील सहभागाकडे निर्देश करणारं साहित्य सापडलं- असे आरोप लावण्यात आले.

निकाल: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५ मार्च २०२४ रोजी वरील सहाही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सार्वजनिक अवकाशात उपलब्ध असणारं विशिष्ट (माओवादी) विचासरणीचं साहित्य सोबत असणं, किंवा त्या विचारसरणीविषयी सहानुभूती बाळगणं, हा कायदेशीर अपराध नाही. त्याचप्रमाणे सदर आरोपींपैकी कोणी प्रत्यक्ष दहशतवादी कृत्यांत वा हिंसाचारात सहभागी असल्याचा काहीही पुरावा मिळत नाही, त्यांच्याकडील सामग्री अशा हिंसक कृत्यातील सहभागाचा निर्देश करणारी नव्हती, इत्यादी निरीक्षणं न्यायालयाने या संदर्भात नोंदवली. निर्दोष मुक्तता झाल्यावर महेश तिरकी, विजय तिरकी, हे आदिवासी तरुण आणि जी. एन. साईबाबा व प्रशांत राही हे पुढील दोनेक दिवसांमध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले, तर हेम मिश्रा यांची कोल्हापूर कारागृहातून सुटका झाली. (याआधी २०१५-१६च्या दरम्यान वरील आरोपी जामिनावर वर्षभरासाठी सुटले होते. पण २०१७ साली गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने यातील विजय सोडून इतर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर विजय यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली; त्यानंतर सर्व जण सलग तुरुंगात होते). पण कागदोपत्री निर्दोष मुक्त होऊनही पांडू नरोटे मात्र तुरुंगातून बाहेर येऊ शकले नाहीत, कारण कैदेत असताना ऑगस्ट २०२२मध्येच त्यांचा मृत्यू झाला होता. नरोटे यांना स्वतःच्या पत्नीला व अकरावीत शिकणाऱ्या मुलीला, आई-वडिलांना, भावाबहिणींना भेटण्यासाठी गावी परत जाता आलं नाही. त्यांची सातेक एकरांची शेती, त्यांचं घर, घराचा परिसर, तिथली झाडं-झुडपं इथे आता कधीच त्यांचा वावर नसेल.

वकिलांचं म्हणणं: अटक झाल्यानंतरच चौकशीदरम्यान पांडू नरोटे व महेश तिरकी यांना बेदम मारहाण झाली होती, नरोटे यांच्या पार्श्वभागातून रक्त येण्याइतपत ही मारहाण होती, असं त्यांचे वकील आकाश सोरदे ‘रेघे’शी बोलताना म्हणाले. प्रत्यक्ष बेकायदेशीर कृत्यातील सहभाग सिद्ध करणं अवघड होत गेल्यावर सरकारी पक्षाचा युक्तिवाद आरोपींची माओवादी पक्षाला सहानुभूती आहे यावर भर देणारा राहिला, म्हणजेच प्रत्यक्ष कृत्यापेक्षा नैतिक बाजूंच्या दिशेने जाणारा युक्तिवाद ते करत होते, असं सोरदे म्हणतात. 

सोरदे नागपूर केंद्रीय कारागृहात पांडू यांच्या ‘मुलाकात’साठी वेळोवेळी जात असत. २०२२च्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या भेटीत त्यांना पांडू खोकताना दिसले. ‘डॉक्टरांना दाखवलं का,’ असं त्यांनी पांडू यांना विचारलं. तर, दोन-तीनदा त्याबद्दल आपण पोलिसांशी बोललो, पण आपल्याला तुरुंगातल्या दवाखान्यातही नेलं- जात नसल्याचं पांडू यांच्याकडून त्यांना कळलं. पांडू यांना नक्की काय झालंय, याची पुरेशी तपासणी न करता त्यांना सर्वसाधारण औषधं देऊन उपचार लांबवले जात असल्याचा दावा त्यांच्या सहआरोपींनी केला. नंतर, अचानक पांडू यांना गव्हर्न्मेन्ट मेडिकल कॉलेज, नागपूर या रुग्णालयात हलवण्यात आल्याचं सोरदे यांना कळलं. ते तिथे पांडूला भेटायला गेले, तर पांडू यांना स्वाइन फ्लू झाला असून त्यांच्या दोन्ही किडन्यांना संसर्ग झाल्याचं सोरदे यांना सांगण्यात आलं. पांडू यांना श्वास घेता येत नसल्यामुळे त्यांच्या नाकातून नळी घातलेली होती. रुग्णालयात पलंगावर असतानाही त्यांच्या हातकड्या काढलेल्या नव्हत्या, असं सोरदे 'रेघे'शी बोलताना म्हणाले. पांडू यांना आयसीयूत हलवण्यात यावं, यासाठी आपण अर्ज केला, पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असंही सोरदे नमूद करतात. पांडू यांच्या डोळ्यांतून व लघवीतून रक्त पडायला लागलं होतं, असं त्यांच्या सहआरोपींनी म्हटलं आहे. आपण तुरुंगात गेलो असताना पलंगापाशी लावलेली युरिन बॅग रक्ताने भरलेली होती, तरीही त्यांना पुरेसे उपचार मिळाले नाहीत, असंही सोरदे म्हणाले. ‘हम बाहर कब निकलेंगे, हम को बाहर निकालो, हम आप को हमारे गांव में बुलाएंगे,’ असं पांडू अनेकदा म्हणाल्याची आठवण सोरदे सांगतात. त्यानंतर २५ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी पांडू नरोटे यांचं नागपूर मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात निधन झालं. तेव्हा ते साधारण ३५ वर्षांचे होते.

प्रसारमाध्यमं, पोलीस व माओवादी: माओवाद्यांच्या / नक्षलवाद्यांच्या दबावामुळे भीतीपोटी पांडू व महेश यांनी हेम मिश्राला अहेरीहून मुरेवाडाच्या जंगलापर्यंत आणून सोडायची कामगिरी स्वीकारली. त्यांचा माओवादी पक्षाशी थेट असा काहीही संबंध नव्हता, पण माओवादी प्रभावक्षेत्रात राहणाऱ्या माणसांना स्वतःवरचं संभाव्य संकट टाळण्यासाठी काही कामं करावी लागतात, तसंच एक वाटाड्याचं काम करणं या दोघांना भाग पडलं. त्यात ते अडकले- असा दावा काही वृत्तपत्रीय वार्तांकनातून पोलिसी सूत्रांच्या आधाराने झाला होता. शिवाय, पांडू व महेश यांच्या पित्यांनी सप्टेंबर २०१३मध्ये एका पत्रकारपरिषदेतही या दिशेने जाणारी विधानं केली होती. "२०११ मध्ये नक्षलवाद्यांनी त्यांचे काम न केल्याने पांडू नरोटेला मारहाण केली होती. त्यावेळी त्याने या जाचाला कंटाळून विष प्राशन केले होते. आम्हा कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यास प्रथम गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर एटापल्लीला हलवले. प्रकृती गंभीर असल्याने तेथे पोटातून विष काढल्यानंतर अहेरीला हलवले. अहेरी येथून गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आठ ते दहा दिवस उपचार केल्यानंतर पांडू दुरुस्त झाला, अशी माहिती पांडूच्या वडिलांनी (पत्रकारपरिषदेत) दिली", अशी बातमी आली होती (लोकसत्ता, ३ सप्टेंबर २०१३). या पार्श्वभूमीवर, पांडू व महेश यांनी माफीचे साक्षीदार व्हावं असा पोलिसांचा प्रयत्न होता, त्यासाठी पोलिसांनी ‘सौम्य’ धोरण स्वीकारलं होतं, असा दावाही काही वेगळ्या वृत्तपत्रीय लेखातून झाला. पोलीस कोठडी ते तुरुंगात जाणं, या दरम्यान हे घडत होतं, पण तुरुंगात गेल्यावर इतर आरोपींनी आणि नक्षलवाद्यांविषयी सहानुभूती राखणाऱ्या वकिलांनी त्या दोघांचं मन वळवलं, आणि ते माफीचे साक्षीदार झाले नाहीत, असा दावा सदर लेखात केला होता (लोकसत्ता, ८ सप्टेंबर २०२२). 

यात काही प्रश्न अनुत्तरित राहतात. नक्षलवाद्यांच्या प्रभावाखालील क्षेत्रात त्यांचे काही आदेश टाळणं शक्य नसतं. जेवण देण्यापासून त्या-त्या वेळी इतर काही सहकार्य करणं स्थानिकांना भाग पडतं, हे खरं. पण अनेकदा एकाच कुटुंबातलं कोणी सरकारी कर्मचारी असतं, तर दुसरं कोणी नक्षलवादी दलामध्ये गेलेलं असतं. अशा अनेक राखाडी छटांनी भरलेल्या प्रदेशात दोन्ही बाजूंशी संपर्क येणं, बोलणं होणं, हे किती स्वाभाविक असेल, याची कल्पना केली तरी पुरे. तर, या पार्श्वभूमीवर पांडू व महेश यांनी फक्त कथितरित्या वाटाड्यापुरतं काम स्वीकारलं असेल, आणि कोणत्याही कारणाने त्यांनी माफीचे साक्षीदार व्हायला नकार दिला असेल, तर एवढ्यावरून पोलिसांनी त्यांच्याबाबतचं ‘सौम्य’ धोरण सोडून दिलं का? या दोघांचा माओवादी पक्षाच्या निव्वळ वैचारिक घडामोडींशी किंवा प्रत्यक्ष सशस्त्र घडामोडींशी थेट असा संबंधही आलेला नव्हता, हे सर्वच बाजूंनी नोंदवलं गेलं आहे. मग इतर आरोपींविरोधात हे तरुण कोणती नवीन माहिती देऊ शकणार होते? माओवादी दबाव आणून या दोघांचा एका तुलनेने किरकोळ कामासाठी वापर करून घेत असतील, तर मग पोलिसांनी त्याहून वेगळं काय केलं- आपल्या बाजूने न आलेल्या एका निष्पाप माणसाला कथित किरकोळ आरोपावरून यूएपीएसारख्या कायद्याच्या तोंडी दिलं, आणि शेवटी तो कैदेतच मरण पावला.

कुटुंबियांचं म्हणणं: नरोटे कुटुंबातील पाच भावंडांमध्ये पांडू सर्वांत थोरले. त्यांच्याव्यतिरिक्त तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. यातील एक भाऊ मुरेवाडाला ग्रामसेवक आहेत, तर एक कोतवाल आहेत आणि एक भाऊ- अजित यांनी एम.ए. बी.एड. केलं असून सध्या ते नोकरीचा शोध व स्पर्धापरीक्षांची तयारी यात गुंतले आहेत. ‘आमचा भाऊ प्रामाणिक होता, त्याचा कोणाशी वाद नव्हता, तो त्याच्या वाट्याची सात-आठ एकर भातशेती करायचा, त्याला फसवलं गेलं,’ असं अजित 'रेघे'शी बोलताना म्हणाले. साधारण बावीस-तेवीस उंबऱ्याचं मुरेवाडा हे गाव आहे. तिथे मोबाइलला रेंज मिळत नाही, त्यामुळे पांडू तुरुंगात असताना त्यांना सहजपणे कधी घरच्यांशी व्हिडिओ-कॉलद्वारे बोलता यायचं नाही. क्वचित कधी त्यांची मुलगी व पत्नी आलापल्लीला मामाकडे आले, आणि तेव्हा तुरुंगातून कॉल करता येण्याचा दिवस असेल, तरच पांडू यांचं पत्नीशी व मुलीशी बोलणं व्हायचं. बाकी, स्वतः अजित आणि दुसरे भाऊ बाजू नागपूर केंद्रीय तुरुंगात जाऊन ‘मुलाकात’च्या वेळी पांडू यांना भेटत. घरच्यांविषयी चौकशी करण्याइतपतच बोलून या भेटी संपत होत्या. ‘पांडूला अटक झाल्याचं मला पेपरात वाचूनच कळलं होतं,’ असं अजित म्हणाले. 

पांडूचा मृत्यू होण्याच्या पंधराएक दिवस आधीच तुरुंगात त्याची भेट घेतली होती, तेव्हा तो तब्येत बरी नसल्याचं म्हणाला असला तरी, हे त्याच्या जीवावर बेतेल असं जाणवलं नव्हतं, असं अजित  म्हणतात. नंतर एकदा अजित तुरुंगात भावाच्या भेटीसाठी गेले, तेव्हा पांडू यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याचं त्यांना कळलं. त्याआधी पोलिसांकडून नरोटे कुटुंबियांना (किंवा वकिलांच्या म्हणण्यानुसार त्यांनासुद्धा) पांडू यांच्या प्रकृतीविषयी आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात येत असल्याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. अजित नागपुरातील रुग्णालयात पांडू यांना बघायला गेले, तेव्हा त्यांच्या गावातल्या घरी या संदर्भातील पत्र पोचल्याचं त्यांच्याकडून कळलं. हे सगळं होईतोवर बराच उशीर झाला होता. काहीच दिवसांनी पांडू यांचं निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना बोलावून घेण्यात आलं. अजित व त्यांचे वडील नागपुरातील रुग्णालयात आले आणि अ‍ॅम्ब्युलन्सने पांडू यांचं शव घेऊन ते थेट गावी रवाना झाले. त्यामुळे पांडू यांचं काही सामान नागपूर केंद्रीय कारागृहातच राहिल्याचं त्यांच्या वकिलांनी 'रेघे'ला सांगितलं.

उरलेल्या खुणा: अटकेवेळी पांडू यांच्यासोबतच्या पिशवीत पुढील वस्तू सापडल्याचं पोलिसांनी नमूद केलं होतं (न्यायालयीन निकालपत्रांमध्ये हे नोंदवलं आहे): पांडू पोरा नरोटे हे नाव असणारं स्टेट बँक ऑफ इंडियाचं पासबुक, त्यांच्या मुलीचा जन्मदाखला, २० ऑगस्ट २०१३ रोजीचा ‘लोकमत’ पेपर, रेशन कार्डाची झेरॉक्स, स्वतःचं रहिवास प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र, स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला व जन्मदाखला, सॅमसंगचा एक साधा सेल फोन, स्वतःच्या निवडणूक ओळखपत्राची झेरॉक्स, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, २८ मे २०१३ या तारखेचं बल्लारशा रेल्वेस्थानकासाठीचं एक प्लॅटफॉर्म तिकीट, लॅमिनेट केलेलं स्वतःचं रंगीत पॅन कार्ड, १४८० रुपयांची रोख रक्कम असलेलं एक पैशाचं पाकीट आणि एक छत्री. 

या सामानात पांडू यांच्या अंगावरच्या काही कपड्यांची आणि तुरुंगात त्यांना पाठवण्यात आलेल्या काही मनी-ऑर्डरींची वगैरे भर पडली असेल. पांडू निर्दोष मुक्त झाले तरी त्यांच्या या खुणा तुरुंगातच राहिल्या आहेत. या खुणांसोबतच आणखी एक प्रश्नही त्यांच्या मरणानंतर मागे उरला: स्वतःच्या ओळखीचे इतके अधिकृत कागद घेऊन कोणी माओवादी कारस्थानात जाणतेपणाने सहभागी होईल का?

आगामी लोकसभा निवडणुकांच्या धुंदीत असणाऱ्या राजकीय नेत्यांना, प्रसारमाध्यमांना आणि अनेक तज्ज्ञांना व अभ्यासकांना या प्रश्नातच फारसा रस उरल्याचं दिसत नाही. मुख्यप्रवाही राजकीय अवकाश आणि माओवादी राजकारण या दोन्हींमधल्या अंतर्विरोधांविषयी, त्यांच्या मूल्यात्मक आधारांविषयी शाब्दिक वादविवाद घालत बसता येईल. पण पांडू नरोटे यांच्यासारख्या व्यक्तीच्या जाण्यातून आपण काय गमावतो, त्याचा परिसर काय गमावतो, यावर साधा संवाद होण्याची शक्यता मात्र धूसर झालेली आहे. त्या संवादासाठी आपल्याला 'रेंज मिळत नाही.'

पांडू नरोटे
[छायाचित्र सौजन्य: नरोटे परिवार]

आधीच्या काही नोंदी: