Monday 31 December 2012

'न्यूयॉर्कर' : आतून

- अमृता त्रिपाठी

'ओपन' साप्ताहिकातून-

'इन्साइड द न्यूयॉर्कर' हा लेख 'ओपन'मधे आठ डिसेंबरच्या अंकात छापून आला. अमृता त्रिपाठी यांनी 'रेघे'वर हा लेख अनुवादित करून प्रसिद्ध करण्याची परवानगी दिलीच आणि 'ओपन'वाल्यांचीही परवानगी घेऊन दिली. त्रिपाठी 'सीएनएन-आयबीएन' वाहिनीच्या विशेष प्रतिनिधी आहेत. त्यांचे आभार.


(२०१२ हे वर्ष आता संपतंय. अनेक गोष्टींचे बारा वाजलेले आहेत. 'फॅक्ट चेकिंग' अशा नावाची काही गोष्टच नसलेली निरपवाद सर्व छापील माध्यमं जिथे आहेत त्या मराठीत 'फॅक्ट चेकिंग'ला अतोनात महत्त्व देणाऱ्या 'न्यूयॉर्कर'बद्दल अशी नोंद करणं म्हणजे स्वतःचं हसं करून घेणंच आहे, पण ठीक आहे.)
***

ते कार्यालय म्हणजे बुडबुड्यासारखं वाटतं. तिथली शांतता 'टाइम्स स्क्वेअर'च्या इतर गदारोळाशी फारच विसंगत आहे. इथेच काँदे नास्त बिल्डिंगमधे 'द न्यूयॉर्कर'चं कार्यालय आहे.

मी ज्या मजल्यावर आहे, तिथे स्मशानशांतता म्हणता येईल अशी शांतता नसलेला एकच भाग आहे, तो म्हणजे या साप्ताहिकाचा ख्यातनाम तथ्य तपासणी विभाग (फॅक्ट चेकर्स डिपार्टमेन्ट); इथे लोक फोनवर बोलतायंत. साप्ताहिकाचे संपादकीय संचालक हेन्री फायन्डर मला म्हणाले की, ''न्यूयॉर्कर' ही एक 'जिवंत' गोष्ट आहे.' साप्ताहिकाची शैली आणि लेखकांशी होणाऱ्या वादचर्चेविषयी मी विचारलं तेव्हा ते म्हणाले, 'लिहिण्यातल्या अस्पष्टतेच्या मुद्द्यावर विरोध होतो, पण आम्हाला माहितेय की बाकीचे करतात तसं न करणं म्हणजेच खरं लेखक असणं आहे. आणि 'न्यूयॉर्कर' हे फक्त माहिती देणारं साप्ताहिक नसून लेखनाशी संबंधित साप्ताहिक आहे याचाच आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही फक्त माहितीदानाचं काम करत नाही, तर आम्ही विषयांचा मागोवा घेतो.' साप्ताहिकाचे संस्थापक व पहिले संपादक हेरॉल्ड रॉस यांच्या म्हणण्यानुसार अस्पष्टता म्हणजे तथ्य सिद्ध व्हायच्या आधीच ते गृहीत धरल्यासारखं आहे.

न्यूयॉर्कर : पहिला अंक : २१ फेब्रुवारी १९२५
'न्यूयॉर्कर १९२५पासून अस्तित्त्वात आहे आणि या घडीला साप्ताहिकाचे अकरा लाख वर्गणीदार आहेत', फायन्डर सांगतात. आदराने पाहिलं जाणारं व विवेकबुद्धी जागृत असलेलं साप्ताहिक म्हणून न्यूयॉर्कर ओळखलं जातं, अलीकडच्या काळात ते भारदस्तही झालंय. फायन्डर १९९४पासून न्यूयॉर्करसोबत आहेत. १९९७मधे त्यांनी संपादकीय संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. साप्ताहिकाचं संपादकपद टिना ब्राऊन यांच्याकडून डेव्हिड रॅम्निक यांच्याकडे आलं त्याच्या आधी एक वर्षापूर्वीची ही गोष्ट. रेम्निकना विचारलं की, तुमच्या लेखनावर संपादन कोण करतं, तर ते फायन्डर यांच्याकडे निर्देश करतात.

रेम्निक आणि मी या वर्षाच्या सुरुवातीला जयपूरला जाणाऱ्या एका लहानशा विमानात पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी आमचं किंगफिशर एअरलाइन्सच्या समस्येपासून लेखनातल्या करियरच्या संधीपर्यंत आणि रशियातल्या साम्यवादाच्या पाडावापर्यंत विविध विषयांवर बोलणं झालं होतं.

आत्ताच्या वेळी जास्त सूत्रबद्ध बोलणं झालं, पण विषयांचं वैविध्य होतंच. पत्रकारितेबद्दलच्या उदास भविष्यवर्तनाबद्दल तुमचं मत काय आहे, असं विचारून मी सुरुवात केली. ''आपण सगळेच त्याच्याशी संबंधित आहोत, त्याने ग्रस्तही आहोत. चांगल्या-वाईट किंवा अधल्यामधल्या कुठल्याही कारणाने आपण आपल्या कामात अधूनमधून खूष असतो. याचाच भाग म्हणजे आपण अशा गोष्टीत गुंतलेलो असतो, अशा गोष्टी वाचत असतो ज्या कदाचित जगातल्या सर्वोच्च ज्ञानदायी गोष्टी नसाव्यात,'' असं ते सांगत होते. ''पण आमचं साप्ताहिक या गृहिताला वाहिलेलं आहे की सुदैवाने अजूनही खूप लोक असे आहेत ज्यांना खोलवरचं वार्तांकन हवं आहे. किंवा कथात्म साहित्याबद्दल बोलायचं तर खोल भावनिक गुंतवणूक हवी आहे- कारण हे मनुष्याला हवं असतं. केवळ साउन्डबाइट, गुळगुळीतपणा, शब्दकंजुषी, ट्विट, अशा इतर गोष्टींपेक्षा खूप जास्त आम्ही शोधतो.''

''ती आमची गरज आहे'', रेम्निक अजून खोलात जात सांगतात. ''आपल्या माणूस असण्याला ते मदतीचं आहे म्हणून आणि स्वतःला समजून घेण्यासाठी, वरच्या पातळीवर काम करण्यासाठी ते गरजेचं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर ह्या बाबतीत मी आदर्शवादी आहे.'' हे सांगताना ते हेही मान्य करतात की व्यवसायही महत्त्वाचा आहेच आणि साप्ताहिक चालवण्यातली दैनंदिन कामं ही आदर्शवादी असण्यापासून फारच दूर असतात.

रेम्निक स्वतःच सांगतात त्यानुसार त्यांचं मुख्य काम आहे ते संपादकाचं. ''माझा नव्याण्णव टक्के वेळ इथे जातो, साप्ताहिकाचं संपादन करण्यात. मी करतो त्यातली ती सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती चांगल्याप्रकारे करावी असं मला सतत वाटत असतं.'' ''पण मला लिहिण्याचीही खुमखुमी आहेच. मग मी कधीकधी बीचवर जायच्या ऐवजी ही गरज भागवून घेतो. हे असं बोलणं म्हणजे ते तो नवीन शब्द नाही का 'हम्बल-ब्रॅग' (एकप्रकारे विनय दाखवल्यासारखं करून स्वतःची भलामण करणं), तसं ते होतं, पण मला तेच म्हणायचंय. मला त्यात मजा वाटते.''

डेव्हिड रेम्निक
रेम्निक ५३ वर्षांचे आहेत आणि पत्नी व तीन मुलं यांच्यासोबतच्या कौटुंबिक जीवनाबरोबरच उर्वरित दैनंदिन गोष्टीमधली मौजही ते अनुभवतात. ते सब-वेने (ट्रेनचा एक मार्ग) प्रवास करतात हे आता सर्वपरिचित झालंय. त्याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देणं मात्र त्यांना थोडं कंटाळवाणं झालं असावं. ''लोकांना आश्चर्य का वाटतं ते मला कळत नाही. काही लोक कारने जातात, ते मला हास्यास्पद वाटतं. सब-वे वेगात आणि सहज प्रवास घडवतो. मी एका साप्ताहिकाचा संपादक आहे, 'जनरल इलेक्ट्रिक'चा मालक नाहीये. मी याच मार्गाने जास्त सुखी आहे.''

१९८०च्या दशकाच्या पूर्वार्धात त्यांनी महाविद्यालयातून बाहेर आल्यानंतर रग जिरवण्यासाठी खूप खटपटी केल्या. १९८२मध्ये त्यांनी भारतवारीही केलेली आहे. ''पदवी मिळवल्यानंतर काही काळ मी जपानमधे इंग्रजी शिकवण्यात घालवला, त्यानंतर भारतात काळी काळ निम्नस्तरीय जगणं अनुभवलं आणि मला ते आवडलं.'' कलकत्ता (आताचं कोलकाता), वाराणसी आणि दिल्लीबरोबरच अधूनमधून इतर लहानसहान ठिकाणी ते राहिले. त्यांची पुढची भारतवारी २०१२मधे झाली आणि यावेळी ते दुसऱ्या टोकावर उभे असल्यामुळे कोणे एके काळी दर दिवशी दोन डॉलर देऊन राहिलेल्या हॉटेलमधले दिवस त्यांना आठवले.

रेम्निक गेली दोन दशक गाजत असलेले अमेरिकी पत्रकार आहेत. १९९२मधे ते 'न्यूयॉर्कर'मधे 'स्टाफ रायटर' म्हणून रुजू झाले. या साप्ताहिकात येण्यापूर्वी ते 'द वॉशिंग्टन पोस्ट'सोबत काम करत होते आणि काही काळ मॉस्कोला होते. ''मी रशियाच्या प्रेमातच पडलो होतो, मी रशियन शिकलो आणि तिथे चार वर्षं राहिलो'', असं ते सांगतात. त्याचा अर्थातच फायदा झाला. 'लेनिन्स टॉम्ब : द लास्ट डेज् ऑफ द सोव्हिएत एम्पायर' या त्यांच्या पुस्तकाला १९९४चं अ-कथात्म साहित्याचं पुलित्झर पारितोषिक मिळालं. त्यांनी लिहिलेलं अमेरिकी अध्यक्षांचं 'द ब्रिज : द लाईफ अँड राईज ऑफ बराक ओबामा' हे चरित्र २०१०मधे प्रकाशित झालं. आणि तरीही ते स्वतःला बहुप्रसव लेखक समजत नाहीत.

सेन्सॉरशिपबद्दलचं बोलणं असो की रशियातील त्यांच्या अनुभवाबद्दलचं असो, सलमान रश्दींबद्दल असो की महमूद अहमदिनेजादांबद्दल असो (संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान इराणी अध्यक्ष अहमदिनेजाद यांनी संबोधित केलेल्या संपादकांच्या बौठकीनंतर रेम्निक यांनी त्यांची संभावना 'दुष्ट प्रभावी' व 'रश्दींबद्दल उबग असलेले' अशी केली होती), अशा कुठल्याच विषयावर बोलताना रेम्निक कणभरही कंटाळलेले दिसत नाहीत, पण त्यांना बहुधा आत्तापर्यंत लाखभर विचारला गेलेला प्रश्न पुन्हा विचारला की मात्र ते कंटाळत असावेत, तो प्रश्न म्हणजे - 'तुम्ही हे सगळं एकत्र बांधता कसं?' ''मी गेली चौदा वर्षं या साप्ताहिकाचा संपादक आहे, मी एक पुस्तक लिहिलंय. आणि तसं पुस्तक मी पुन्हा लिहीन अशी मला खात्री नाही. कारण कसंय की, तुम्हाला माहितीच असेल की एकतर हे सगळं खूपच लांबलचक होतं.''

''म्हणून मी साप्ताहिकासाठी लिहितो. कदाचित मी कधीतरी आणखी एखादं पुस्तक लिहीन, ते काय असेल माहीत नाही, कदाचित सहाशे पानांचं असेल'', असं रेम्निक म्हणतात तेव्हा मी हसते, पण ते आणखी तपशिलात जाऊन सांगतात, ''म्हणजे मी काही करायचा प्रयत्न करत नाही. मी इथे काम करतो, घरी जातो, थोडं लिहितो. मी कुत्रे पाळत नाही, मी गावी जात नाही, मला छायाचित्रणाचा वगैरे छंद नाही, मी साधंच ठेवलंय सगळं.''
-----

'न्यूयॉर्कर'च्या तथ्य तपासनीसांपैकी एक रुथ मार्गालिट मला त्यांच्या कार्यालयातला खाजगीतला एक विनोद सांगत होती, ''ते एवढं सगळं कसं काय करू शकतात याबद्दल आम्ही सारखंच बोलत असतो. कोणतरी मला म्हणालं की ते शिंकतात तेही दहा हजार शब्दांत.''

रेम्निक त्यांचे विषय कसे शोधतात? नुकताच प्रसिद्ध झालेला ब्रुस स्प्रिंगस्टीन यांच्यावरचा सतरा हजार शब्दांचा लेख म्हणजे अशीच गंमत होती, असं ते म्हणतात. ''हे साप्ताहिक काही फक्त अफगाणिस्तानातलं युद्ध, घरांची समस्या अशा गोष्टींबद्दलचंच नाही ना असू शकत... या आठवड्यात आम्ही डेट्रॉईटमधल्या एका सुपारी घेणाऱ्या गुंडाबद्दल लेख करतोय... आयुष्य हे दुर्घटना आणि गुंतागुंतींनी भरलेलं असतं, पण त्यात काही 'स्वीट डिश'ही असते, तर तसंच मी माझ्यासाठी ती 'स्वीट डिश' बनवली.''

'स्वीट डिश' बाजूला ठेवली तरी रेम्निक वर्षाकाठी पाच ते चार लहान लेख आणि दोन मोठे लेख लिहितात. त्यांच्या अभ्यासाचे विषय म्हणजे राजकारण आणि रशिया यांच्यासंबंधी हे लिखाण असतं. ''साधारणपणे मी लिहितो, म्हणजे मी लिहितो, पण ती दुर्मीळ गोष्ट आहे... वर्षाला दोन लांबलचक लेख. ते राजकारणाबद्दल असतात, ते सर्वसाधारणपणे तीन ठिकाणांबद्दल असतात - अमेरिका, मध्यपूर्वेत कुठेतरी किंवा रशिया. कारण या ठिकाणांशी मी परिचित आहे,'' रेम्निक सांगतात. ''भारतासारख्या माझ्यासाठी फारशा ओळखीच्या नसलेल्या ठिकाणी जाऊन मी काही जाणून घेईपर्यंत परतीची वेळ झालेली असते. म्हणजे तुम्ही काहीतरी शोधायला खोलात जायला लागता तोपर्यंत घरी परत यायला लागतं. या उलट कॅथरीन बू किंवा स्टीव्ह कॉल किंवा अनेक तरुण भारतीय लेखक मंडळी आहेत - त्यांना कुठे-कसं-कधी जायचं ते पक्कं माहीत असतं. त्यांच्याकडून मला शिकावंसं वाटतं.''

कोणत्या तरुण भारतीय लेखकांनी रेम्निकचं लक्ष वेधून घेतलंय? समंथ सुब्रमण्यम, बशरत पीर आणि अमन सेठी. ''ती (जयपूर लिटररी फेस्टिवलला मारलेली) फेरी खूपच उपयोगी ठरली. भारतात मुरलेले आणि स्वतःचा विषय पूर्णपणे माहीत असलेले असे 'न्यूयॉर्कर'साठी काही लेखक शोधता आले. त्यांच्यासाठी अवघड एवढंच आहे की आमच्यासाठी कसं लिहायचं हे त्यांना शिकायला लागेल,'' ते सांगतात.

म्हणजे हे सोपं होईलसं वाटत नाही. ''हे तसं सुरुवातीला अवघड जातं. मी इथे वर्तमानपत्रातून आलो, तिथे लिखाणाची लांबी खूपच कमी असते. आणि मग लेखकांना वाटतं की, 'अरे वा, मी मोठं लिहू शकतो.' पण तुम्ही एखाद्या विशिष्ट मुद्द्याभोवती लिहिता तेव्हा तुम्हाला एक आराखडा असावा लागतो. ती आता फक्त मातीची झोपडी राहिलेली नसते तर गगनचुंबी इमारत बनलेली असते आणि ती आराखड्याशिवाय बांधलेली असेल, तर ती कोसळते,'' असे रेम्निक सांगतात. ''एखाद्या लेखासंदर्भात कोसळण्याचा अर्थ असतो तो म्हणजे लोक वाचायचं थांबतात, कारण त्यांना लेख नक्की कंटाळवाणा का झालाय नि कुठे गोंधळवणारा झालाय हे काही सांगता येत नाही.''

आणि तरी, या साप्ताहिकाची काही एक विशिष्टच शैली आहे असं रेम्निकना वाटत नाही. ''कुठल्याही गोष्टीसाठी एकच मार्ग असतो असं मला वाटत नाही. एखादी कथा 'न्यूयॉर्कर' शैलीतली असते किंवा एखादा लेख 'न्यूयॉर्कर' धाटणीचा असतो, असं मला वाटत नाही. नायतर तुम्हाला म्हणावं लागेल की नोबोकॉव्ह नायपॉलसारखाच आहे जो की एलिस मन्रोसारखा आहे. असं नसतं ते,'' रेम्निक म्हणतात. ''पण मला वाटतं की, स्पष्टता, नेटकेपणा, तथ्यांमधला काटेकोरपणा, कथनाचा आराखडा या गोष्टी करणं हीसुद्धा काही साधी गोष्ट नाही, त्यांच्यावर प्रभुत्त्व मिळवणं तर पुढचीच गोष्ट.''

रेम्निक यांच्यासोबत काम करणं हा काय अनुभव आहे? याबद्दल मी फायन्डरना विचारलं. ''न्यूयॉर्करमधे काही लेखकांसाठी आम्ही एक शब्दयोजना ठेवलेय - 'सेल्फ-क्लिनिंग ओव्हन'. डेव्हिड रेम्निक हे असेच 'सेल्फ-क्लिनिंग ओव्हन' आहेत. स्वतःच्या आराखड्यातल्या दोषांसंबंधी ते एकदम सजग असतात. पुनर्लेखन करताना, त्यावर संस्करण करताना ते त्या दोषांकडे वळतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक सफाईदार अनुभव असतो,'' असं फायन्डर सांगतात. रेम्निक हे स्वतःचे उत्तम टीकाकार आहेत, अशी भरही ते घालतात.

गेलं साधारण वर्षभर 'न्यूयॉर्कर'मधे तथ्य तपासनीस म्हणून काम करत असलेली मार्गालिट म्हणते की, रेम्निक खूप जोर देऊन आपलं म्हणणं मांडतात, आणि आश्चर्यकारकपणे इतर कुठल्याही लेखकाप्रमाणेच एक असल्यासारखं त्यांचं काम होऊन जातं. ''इथे मी ज्या लेखकांसोबत काम केलं त्यांच्यातील एकमेव सर्वोत्कृष्ट असं नाही पण सर्वोत्कृष्टांपैकी एक असे ते लेखक आहेत असं मला वाटतं. आणि मी संपादन किंवा लोकांना सांभाळून घेण्यासंबंधी नाही म्हणत, तर फक्त लिखाण आणि वार्तांकनाचा विचार केला तरी ते खूपच खोलवर जातात. फावल्या वेळात ते फक्त हेच करत असावेत असं वाटतं,'' असं मार्गालिट सांगते. रेम्निक यांची मुख्य भूमिका संपादकाची आहे, याचा संदर्भ देऊन ती म्हणते की, ''त्यांच्याकडे ते नैसर्गिकपणेच येत असावं. वार्तांकनाच्या बाबतीत बोलायचं तर तथ्य तपासनीसांनी भरण्यासाठी त्यांनी काही मोकळ्या जागा ठेवून दिल्यात असं कधीच वाटत नाही. ते सगळंच करतात. ते सगळं वाचायचं आणि ते पक्कं आहे ना हे पाहायचं एवढंच काम आम्हाला उरतं. खरंच.''

साप्ताहिकाचे संपादक असूनही खूप लिखाण करणारे रेम्निक सांगतात की, ''इतर लेखकांच्या स्पर्धेत मी नसेन याची मी सतत काळजी घेतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी गफलती होऊ शकतात. कधीकधी लोकांना वाटत असेल की काही अधिकची समजून उपयोगी पडत असेल, पण मी लेखकासोबत स्पर्धा करतोय असा समज मी कधीच होऊ देत नाही.''

स्पर्धेचा हा मुद्दा कुतूहल वाढवणारा आहे आणि कोणताही लेखक याबद्दल विचार करेलच. ''काही लोकांना ते थोडेसे धाकदपटशा दाखवणारे वाटतात कारण इतर लेखकांप्रमाणे ते त्रासलेले नि तापलेले नसतात. ते टाइप करतात तेव्हा कीबोर्डकडे बघून हसत असतात अशी अफवाही आहे'', फायन्डर हसत सांगतात. ''रेम्निग हे लेखकाचे संपादक आहे असं तुम्ही म्हणून शकता. आणि ते नक्कीच उपयोगी पडतं. कारण त्यांना त्या व्यवहाराच्या सगळ्या बाजू माहीत असतात. लेखनाच्या, वार्तांकनाच्या आणि मुलाखती घेण्याच्या प्रक्रियेचा त्यांना स्वानुभव असल्यामुळे ते कुठली गोष्ट वगळावी याबाबत खूप जास्त सजग असतात.''

१९९८मधे टिना ब्राऊन यांच्याकडून रेम्निक यांच्याकडे संपादकपदाची सूत्रं आली त्याबद्दल मी विचारलं तेव्हा फायन्डर यांनी मला 'न्यूयॉर्कर'च्या इतिहासाचीच थोडक्यात सफर घडवली. ''एकूण बदल तसे सुरळीत झाले. याचं एक कारण हे आहे की रेम्निकना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कायमच होती. हे साप्ताहिक कायमच एक कात टाकणारं आणि नवनवीन रूपं घेणाऱ्या जीवाप्रमाणे होतं याची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच ते अजून जिवंत आहे, आणि त्याचा प्रभाव टिकून आहे,'' असं फायन्डर म्हणतात. साप्ताहिकाच्या सध्याच्या
न्यूयॉर्कर : २४ सप्टेंबर २००१
बदलाच्या प्रक्रियेचं श्रेयही ते रेम्निकनाच देतात. ''रेम्निक यांची संवेदनशीलता आणि नैतिक दृष्टीची जाणीव, शिवाय गांभीर्य आणि इच्छेची उमेद यातूनच ते स्वतः आणि साप्ताहिकाचा वेगळेपणा कठीण काळाच्या पार्श्वभूमीवरही ठसला,'' '९/११'चा संदर्भ देत फायन्डर सांगतात. याच काळात साप्ताहिकाच्या वर्गणीदारांच्या संख्येने दहा लाखांचा आकडा ओलांडला. यावेळी ते नाव न घेता दुसऱ्या एका 'वंडरफुल सिटी मॅगझिन'बद्दलही बोलले, '९/११'ला भिडण्याऐवजी या मॅगझिनने गृहसजावटीसंबंधी अंक काढला आणि काळासोबत असण्याचा आपला दावा हरवून बसलं.

''याच वेळी 'न्यूयॉर्कर'ने पुढे जाऊन गाजलेलं आर्ट स्पिजेलमन आणि फ्रान्कोइस मूली यांनी तयार केलेलं काळ्यावर काळं मुखपृष्ठ प्रसिद्ध केलं. कित्येक दशकांत पहिल्यांदाच या साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर कार्टून नव्हतं. हा डेव्हिड रेम्निक यांनी घेतलेला निर्णय होता. ते बरोबर आहेत का याविषयी मला सुरुवातीला खात्री नव्हती, पण त्यांचा निर्णय योग्य ठरला. त्या अंकात खूप मोठा लेख होता आणि तो आमच्यातल्या सर्वांत वेगवान आणि सहज लेखकाने लिहिलेला, त्याचं नाव डेव्हिड रेम्निक,'' हे बोलून थोडं थांबून फायन्डर सांगतात, ''...पण अर्थातच यात आजूबाजूच्या सगळ्या लेखकांचाही सहभाग होताच.''

'न्यूयॉर्कर'मधेच ऑक्टोबरमधे प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार (सिटिझन्स जैन - केन औलेटा) त्यांच्या पूर्ण प्रतिपक्ष असलेलं प्रकाशन म्हणजे 'टाइम्स ऑफ इंडिया'. या लेखात 'टाइम्स ऑफ इंडिया' या 'फेनॉमेनन'चा, भारतीय वृत्तपत्रसृष्टीतल्या त्याच्या वर्चस्वाचा, त्यांच्या पत्रकारितेच्या मार्गाचा, 'पुरोगामी विचारधारे'चा वेध घेण्याचा प्रयत्न केन यांनी केलाय.

तथ्याला धरून असण्यासंबंधी आणि वक्तव्याचा विपर्यास न करण्यासंबंधी बोलत असताना रेम्निकनी या लेखाचा उल्लेख केला. ''तुम्ही मायक्रोफोनच्या पलीकडच्या बाजूला असता तेव्हा ते काही अंदाजच बांधता येत नाही असं होऊन जातं. भारतात मी जेव्हा जयपूर लिटररी फेस्टिवलमधे आलो होतो, तेव्हा मी काही मुलाखती दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जे छापून यायचं त्यातलं काही अचूक असायचं, आणि त्याच दरम्यान मी ओबामांबद्दल दिलेल्या एका व्याख्यानाची जी बातमी 'टाइम्स ऑफ इंडिया'त आली त्यात मी 'एक्स' म्हटलं असेल तर त्यांनी 'वाय' लिहिलं. ते थोडथोडकं इकडेतिकडे नव्हतं, ते थोडंसं चुकलेलं नव्हतं, मी बोललो त्याच्या दुसऱ्या धृवावरती बसल्यासारखं त्यांनी लिहिलं होतं. आणि मला हे कळू शकलं नाही कारण मी जरा भाबड्या समजुतीत होतो... जैन बंधूंविषयी आणि त्यांचं वर्तमानपत्र कसं चालतं त्याविषयी आम्ही नुकताच जो लेख प्रसिद्ध केला तोपर्यंत. हे फारच धक्कादायक होतं.''

'टाइम्स ऑफ इंडिया'चे व्यवस्थापकीय संपादक विनीत जैन यांनी केन औलेटांशी बोलताना केलेल्या एका विधानाचा संदर्भ देऊन रेम्निक म्हणतात, ''ते म्हणाले की, 'आम्ही बातम्यांच्या व्यवसायात नाहीयोत, आम्ही जाहिरातींच्या व्यवसायात आहोत.' आणि संपादकांनाही ते माहीत असेल याची ते खात्री करून घेतात, गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने विक्रीला आहेत... हे मला नवीन होतं, कारण मी भाबडा होतो. आता कदाचित मी कमी भाबडा झालो असेन.''

'टाइम्स ऑफ इंडिया'संबंधी हा लेख करायचं कसं ठरलं याबद्दल मी विचारलं. मला वाटलं की आपल्या वक्तव्याचा एवढा विपर्यास केल्याच्या अनुभवावरून (रेम्निकना) ते सुचलं असेल.

''ते तसं माझ्यामुळेच झालं. केन औलेटा आणि मी नेहमी माध्यमांसंबंधीची आपली समज कशी वाढवावी याबद्दल बोलत असतो... ते तसं साहजिकच आहे... खूप कमी ठिकाणं अशी आहेत, जिथे वर्तमानपत्रांचा व्यवसाय वाढतोय आणि भारताएवढा तर कुठेच तो वाढत नाहीये'' रेम्निक सांगतात.

'न्यूयॉर्कर' वक्तव्यांचे दाखले देताना गांभीर्य दाखवतंच दाखवतं. दंतकथा बनलेल्या इथल्या तथ्य तपासणी विभागात याचे आणखी दाखले मिळतात. याची सुरुवात झाली ती एका चुकांनी लडबडलेल्या लेखामुळे, असं या विभागाचे प्रमुख पीटर कॅन्बी सांगतात. या लेखासंबंधी आणखी तपशिलात जायला ते अनुत्सुक होते. दीर्घ लेखांपासून ते कार्टूनपर्यंत आणि कवितेपर्यंत सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. कार्टूनसंबंधी बोलायचं तर त्यात अनेक तपशील असतात, उदाहरणार्थ, कोटाच्या कुठल्या बाजूची बटणं लावलेली आहेत. किंवा कवितेच्या बाबतीत ऐतिहासिक संदर्भ असू शकतात. जिथे जिथे तथ्य असेल तिथे तिथे ते तपासलं जाऊच शकतं.

'न्यूयॉर्कर'मधे कॅन्बींसह सोळा तथ्य तपासनीस आहेत. कॅन्बी यांनी अर्धवेळ तपासनीस म्हणून काम सुरू केलं. त्यांनी दुसऱ्या एकाबरोबर कामाची विभागणी करून घेतली होती, कारण ते दोघेही स्वतःच्या लेखनावरही लक्ष केंद्रित करू इच्छित होते. कॅन्बी यांनी माया इंडियनांसंबंधी लिहिलेलं 'द हार्ट ऑफ द स्काय : ट्रॅव्हल्स अमंग द माया' १९९२ साली प्रकाशित झालं. १९९४पासून त्यांनी 'न्यूयॉर्कर'सोबत पुन्हा काम सुरू केलं. लेखक असण्याचा आपल्याला कामात नक्कीच उपयोग होतो, असं त्यांना वाटतं. ''इथले बहुतेक लोक, काही प्रमाणात तरी, लेखक होऊ इच्छितात. काही यशस्वी झालेत. काही 'न्यूयॉर्कर'मधे किंवा इतरत्र संपादक झाले. माझ्यासोबत हा खूप हुशार लोकांचा चमू आहे.''

सामान्यज्ञान असलेले आणि भाषेवर प्रभुत्त्व असलेले लोक ते शोधत असतात. ''इथे खूप भाषा आहेत. एका अर्थी आम्ही आमच्या प्रतिष्ठेचे बंदी झालोय. आमच्याकडे सर्वसाधारणपणे सात-आठ भाषा बोलणारे लोक आहेत, फ्रेंच आणि स्पॅनिशपासून जर्मन, मँडरीन, आणि आता तर ऊर्दू बोलणाराही एक आमच्यात आहे. हा काही काटेकोर निकष नाहीये, परदेशांतून आलेल्या लेखांसाठी आम्ही अनुवादकाकडे काम सोपवू शकतो, पण आपल्या जाणिवेचा भाग म्हणून हे वैविध्य उपयोगी पडतं'', कॅन्बी सांगतात.

''या विभागात येणारे लोक साधारणपणे वाङ्मयाचं किंवा इतिहासाचं वगैरे शिक्षण घेतलेले असतात, पण आम्हाला अर्थशास्त्र आणि विज्ञानाची माहिती असलेलेही लोक हवे असतात'', कॅन्बी सांगतात. तपासनीस वेगाने शिकण्याची क्षमता असलेले असावे लागतात, या मुद्द्यावर ते जोर देतात. ''साप्ताहिकाचा बहुतेकसा भाग खूप कमी कालावधीत बांधला जातो. त्यामुळे आमचं वेळापत्रकही भीती वाटावी अशा प्रमाणात बदलत असतं. खूप मोठे आणि गुंतागुंतीचे लेख एक आठवडा उशिराने आले, अंदाजे दहा हजार किंवा बारा हजार शब्दांचे, तर मला त्यासाठी दोन किंवा तीन तपासनीस द्यावे लागतात.''

या लेखांच्या फक्त तपशिलांकडेच लक्ष देण्याचं काम तथ्य तपासनीस करत नाहीत, तर त्यातील मांडणी कशी केलेय याचीही तपासणी करतात. ''हे म्हणजे उलट्या बाजूने वार्तांकन केल्यासारखंच असतं असं मला आता वाटतं. आम्ही एक लेख सुटा करतो, त्याचे घटक वेगळे करतो आणि ते पुन्हा बसवतो, असं ते असतं,'' कॅन्बी सांगतात.

यासाठी घट्ट कातडीचाच माणूस लागतो. ''तथ्य तपासणी ही एक मुळातूनच ताप देणारी प्रक्रिया आहे. खूप लोक तुमच्यावर चिडतात, ते सांभाळावं लागतं. म्हणजे साप्ताहिकाच्या आतल्या लोकांबद्दल नाही म्हणत, अर्थात तेही काही वेळा असतात, पण बाहेरच्या लोकांच्याबाबतीत, आम्ही त्यांना फोन करतो नि त्यांना ज्या गोष्टींबद्दल ऐकायचं नसतं त्याबद्दल त्यांना विचारणा करतो आणि ते खरंखुरं उत्तर देतील याची शाश्वती नसते. हे संवादसुद्धा खूप गुंतागुंतीचे होतात, शोधलेखांमधे तर फारच. हे सगळंच आम्हाला कौशल्याने करावं लागतं,'' कॅन्बी सांगतात.

तथ्य तपासनीसांची विभागीय बैठक शुक्रवारी होते, यावेळी येऊ घातलेल्या लेखांची यादी कॅन्बी देतात. तपासनीस आपल्याला हवा तो लेख कामासाठी निवडतात आणि काही लेख त्या त्या व्यक्तीच्या अभ्यासानुसार तिला दिला जातो. मार्गालिट मूळची इस्राएलची असल्यामुळे ती मध्यपूर्वेसंबंधीच्या लेखांवर काम करते. तिने त्यासंबंधी मला आणखी माहिती दिली - ''माझ्याकडे लेख येतो. मग मी लाल शाईचं पेन घेऊन बसते. मग ज्या गोष्टींमधलं तथ्य मला तपासायला लागेल त्या खाली मी रेषा मारते. प्रत्येकाची काम करण्याची वेगळी पद्धत असेल, मी वेगवेगळ्या स्त्रोतांचे संदर्भ देण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा उपयोग करते, त्यामुळे जेव्हा मी संबंधित व्यक्तीला फोन करते तेव्हा मला लक्षात येतं की लाल किंवा निळा रंग म्हणजे ही बाई किंवा दुसरं कोणीतरी... आणि नंतर आम्ही लेखकाने आमच्याकडे काय पाठवलंय त्याकडे वळतो- त्यांची टीपणं, त्यांच्या संपर्कयाद्या, बातम्यांची कात्रणं, विविध स्त्रोतांकडून त्यांनी घेतलेली माहिती. काही गोष्टी आम्हाला सापडू शकल्या नाहीत, तर आम्ही त्यांना विचारतो, ही आकडेवारी कुठून आली? त्यांनी आमच्याकडे स्पष्ट टिप्पणी पाठवलेली असते. आम्ही टीपणं वाचतो, जेणेकरून ते काय म्हणतायंत ते समजून घ्यावं आणि त्यांनी म्हणणं स्पष्टपणे मांडलंय की नाही ते समजावं. मग आम्ही त्यांच्याशी बोलतो, लेखात उल्लेख केलेल्या प्रत्येकाशी फोनवर बोलतो.''

ई-मेलपेक्षा फोनवर बोलण्याला आपण का प्राधान्य देतो, हे सांगताना मार्गालिट म्हणते, ''आम्ही एखादं वक्तव्य कसं वापरलंय ते पुन्हा कळवत नाही, जेणेकरून 'तो शब्द काढून टाका' किंवा 'हे वापरा' असं काही होऊ नये... आम्ही त्यांना संदर्भ सांगतो, काय बोलताना तुम्ही 'ऑन रेकॉर्ड' होतात ते कळावं इतपत माहिती देतो. यामुळे लेखकाशी त्या व्यक्तीचा वाद होण्याचा संभव राहात नाही. ई-मेलपेक्षा आम्ही फोनवर गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्ही शब्दान् शब्द वक्तव्य काही वाचून दाखवत नाही, त्यामुळे ई-मेलची साखळी तयार करणं आम्हाला परवडत नाही.'' 

वार्ताहरांकडून सुटून गेलेला एखादा प्रश्नही कधीकधी तथ्य तपासनीस विचारतात, कधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांना फोन करतात (त्यांचा उल्लेख लेखात करण्यात येणार नसला तरी), आपण बरोबर मार्गाने चाललोय याची खातरजमा करण्यासाठी हे केलं जातं. दीर्घलेखावर काम करण्यासाठी तथ्य तपासनिसाला दोन किंवा फारतर तीन आठवडे दिले जातात. कधीकधी एका लेखावर दोन किंवा तीन तपासनीस काम करतात, 'डेडलाईन' खूप जवळ आली असेल तर हे करावं लागतं.

तपासनीस लहान असले तरी बदल करतात आणि स्वच्छ मजकूर त्या लेखावर काम करणाऱ्या संपादकाकडे दिला जातो. तो शैलीचे बदल करतो, काही गोष्टी वर-खाली करतो. ''त्यानंतर ते प्रत-संपादकाकडे (कॉपी एडिटर) जातं, ते सगळा मजकूर परत वाचतात. जेव्हा सगळे 'ओके' म्हणतात, मला करण्यासारखं काही उरलेलं नाही असं म्हणतात, तेव्हा मग ते पानावर मांडणीसाठी जातं. त्यानंतर आमची अंतिम बैठक होते. सगळे जण त्या मांडणी झालेल्या पानांसह या बैठकीला येतात. यावेळी शेवटची मतं मांडली जातात,'' मार्गालिट सांगते. दीर्घलेखांसाठी ही अंतिम बैठक असते. ''इथे संपादक, तथ्य तपासनीस, आणि त्या लेखावर काम केलेले सगळे एकत्र बसतात आणि रकान्यांवरून नजर फिरवतात. हे साधारण शेवटाकडे होतं, तोपर्यंत सगळे बदल करून झालेले असतात. कदाचित, कुठे स्वल्पविराम राहिलेला असेल, असं काहीतरी लहानसं असू शकेल किंवा क्वचित काही मोठंही असेल, कोणीतरी अचानक म्हणतं, हा परिच्छेद या भागात बरोबर वाटत नाहीये...''

तथ्य तपासणीची प्रक्रिया खूप प्रभावी असते, पण तरी ती शंभर टक्के बरोबर असू शकत नाही असं कॅन्बी सांगतात. ''आम्ही चुका करत नाही असं नाही, आम्ही चुकतो. ज्या घडामोडी सुरू असतात त्या पाहाता चुका न होणं हे अशक्य आहे. पण तथ्य तपासणीमुळे गद्य अधिक सुबक होतं आणि मांडणीही घट्ट होते. मला वाटतं, 'न्यूयॉर्कर'च्या वार्तांकनावर याचा दोन बाजूंनी परिणाम होतो, एकतर हस्तलिखितातील दोष निघण्याच्या बाजूने आणि दुसरं म्हणजे लेखक जागरूक राहातात कारण त्यांना माहीत असतं की हे तथ्य तपासणीच्या प्रक्रियेतून जाणार आहे, त्यामुळे त्यांना जास्त चांगलं वार्तांकन करावं लागतं, अधिक कष्ट घ्यावे लागतात.''

हे सगळं छापील साप्ताहिकासाठी होतं; इंटरनेटवर जाणाऱ्या गोष्टी एवढ्या पायऱ्या पार करून जात नाही, आणि तिथेच या वर्षी जोनाह लेहररसंबंधीचा किस्सा घडला. 'न्यूयॉर्कर'चा लेखक म्हणून त्याने केलेली ही चूक नव्हती, त्याने त्याच्या ब्लॉगसाठी त्याच्याच आधीच्या एका दुसऱ्या प्रकाशनासाठी लिहिलेल्या लेखातला भाग पुन्हा वापरला, हेही ठीक होतं. पण नंतर प्रकाशात आलं की, त्याने त्याच्या 'इमॅजिन : हाऊ क्रिएटिव्हीटी वर्क्स' या पुस्तकात बॉब डिलनच्या नावावर काही काल्पनिक विधानं खपवलेली आहेत. यातलाच काही भाग 'न्यूयॉर्कर'च्या वेबसाइटवरच्या त्याच्या ब्लॉगमधे त्याने प्रसिद्ध केला होता.

यानंतर त्यांनी लेहररने त्यांच्यासाठी लिहिलेल्या सगळ्याच गोष्टी दोनदा तपासल्या आणि त्यात काही चुका सापडल्या नाहीत, असं फायन्डर सांगतात. ''खूप विश्वासाचं वातावरण असताना असं काही घडलं की सगळंच चिंताजनक होणं साहजिकच आहे. विशेषकरून सध्याच्या इंटरनेटच्या युगात प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मतंच नाहीत तर स्वतःची वेगळी तथ्यंही आहेत.''

रेम्निकनी मला ई-मेलवर सांगितलं की, ''न्यूयॉर्कर'चे लेखक, संपादक आणि तथ्य तपासनीस हे सगळेच मानवी पातळीवर जेवढं शक्य आहे तेवढं अचूक राहण्याचा प्रयत्न करतात. आम्ही चुका न करण्याचा पराकोटीचा प्रयत्न करतो, तरी त्या होतात. पण बनावट मजकूर तयार करणं ही काही चूक नसते, तो वाचकाचा विश्वासघात असतो. जोनाहबद्दल माझ्या मनात अनेक गुंतागुंतीच्या भावना येतात, अगदी वैयक्तिक सहानुभूतीही वाटते. त्याला मी काहीच करू शकत नाही. पण मला हे साप्ताहिक, तिथली एकात्मता टिकवून ठेवलीच पाहिजे. त्यामुळे ती गोष्ट तिथेच संपली.'
***

काही विशेषनामांचे उच्चार चुकलेले असू शकतात. दुरुस्ती सूचवा.

Wednesday 26 December 2012

एका बलात्कारित व्यक्तीचं मनोगत

'काफिला' या ब्लॉगवरती प्रसिद्ध झालेली ही नोंद, 'काफिला'वाल्यांच्या परवानगीने 'रेघे'वर भाषांतरित करून नोंदवतो आहे. ही नोंद लिहिणाऱ्या निनावी व्यक्तीने स्वतः शारीरिक अत्याचाराला तोंड दिलेलं आहे.
***

बलात्कार होतात त्याचं कारण बहुतेक लोकांना ते काय आहे हेच माहीत नसतं.

अत्याचारित व्यक्तीला ते माहीत असतं असं म्हणणं म्हणजे खूप जास्त गोष्टी गृहीत धरल्यासारखं होईल. याचा एक तत्काळ परिणाम खोल आणि न दिसणाऱ्या जखमेच्या स्वरूपातला असतो. खूप वर्षांच्या समुपदेशनानंतरही त्याने वेदना होतात, भीती वाटते. वैयक्तिक पातळीवरची आणि अस्तित्त्वाच्या पातळीवरची जगातली सगळी ताकद तिथे अपुरी पडते. बहुतेकदा अशा गुन्ह्यांना प्रसिद्धी मिळत नाही. स्त्रियांचं सक्षमीकरण करण्याऐवजी न्यायव्यवस्था इतक्या कमी प्रकरणांमधे न्याय देते की ही व्यवस्था स्वतःच एक मोठी अपराधी ठरते.

अत्याचारितांप्रमाणेच जे दोषी असतात, त्यांनाही त्याबद्दल फारशी माहिती नसते. अटकेशिवाय, अगोचरपणे, निर्लज्जपणे ते मोकाट राहातात आणि यातून त्यांच्या विकृतीला खतपाणी मिळतं. बलात्कार हा लैंगिक कृतीपेक्षा अधिकार गाजवण्याशी संबंधित आहे याची जाणीव त्यांना होईल किंवा होणार नाही.

नेतेमंडळींना यासंबंधी काय करावं हे माहीत नसतं. जगातली सर्वाधिक सजग सरकारंही अशा प्रकरणांमधे खूपच कमी निकाल लावू शकतात.

माध्यमं इतर घडामोडींबद्दल जशी उत्साहात असतात तशीच या घटनेबद्दलही असतात. सगळी वार्तांकनं, कार्यकर्तेगिरी यातून खूपच फुटकळ गोष्टी साधल्या जातात. आणि लगेचच इतर अनेक दुष्ट प्रवृत्तींबद्दल बातम्या सुरू होतात.

बळीचे बकरे शोधून आंदोलक पापक्षालनाचा प्रयत्न करत असतात; कधी ते यशस्वी होतात, बहुतेकदा होत नाहीत. आधीच दळीद्री असलेल्या कायदा व सुव्यवस्थेला ते कामाला लावतात आणि ते उपद्रवी ठरल्यामुळे त्यांच्याविरोधात अश्रुधूराचा वापर केला जातो.

अत्याचारित व्यक्तीला माहीत असतं की ती कधीच पूर्ण बरी होऊ शकणार नाही (तिला शारिरीक जखमांनी किंवा स्वतःच्या हातांनी मरण आलं नाही तरच हा मुद्दा येतो). बलात्काराचा तिच्यावर, तिच्या संबंधांवर, तिच्या स्वतःच्या मुलांवर किती वेगवेगळ्या मार्गांनी परिणाम होतो हे समजायला अनेक वर्षं जावी लागतात. न्यायालयीन निकालामुळे उत्तेजनार्थ बक्षिस मिळाल्यासारखं वाटतं फक्त. अर्थात, जेवढ्या प्रकरणांची नोंद होते त्यापेक्षा अर्ध्याहून कमी प्रकरणांमधे निकाल लागतो असं गेल्या काही वर्षांच्या गुन्हे आकडेवारीनुसार समजतं.

खूपच चिडलेले लोक फाशीची शिक्षा हा एक उपाय म्हणून पुढे करतात, पण त्याने अशा गोष्टी थोपवता येणार नाहीत : उदाहरणार्थ, चार वर्षांच्या बालकावरचा बलात्कार जर कुटुंबातील व्यक्तीकडूनच झाला असेल तर अशा प्रकरणात अत्याचारित (बालक) पूर्णपणे दुर्बलच असतं. लैंगिक भावनेच्या दमनामुळे आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह अशा विकृतीमुळे स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याची पुरुषाची सवय (फाशीच्या शिक्षेने) संपणार नाही. तुरुंगात टाकूनही त्याला त्याच्या गुन्ह्याची जाणीवच होणार नसेल तर काय? आणि त्याच्यानंतरच्या स्त्री-पुरुषांच्या अनेक पिढ्यांनाही ही जाणीव होणार नसेल तर काय? आणि न्याय असा काही होणारच असेल तर इतर कुठल्याही पर्यायाएवढाच फाशीचा पर्याय उपयोगी असेल. एकही राक्षस संपणार नसेल तरी कदाचित त्यामुळे काही लोकांना आनंद होऊ शकेल.

बायका बलात्कारी मुलांचा, वडिलांचा आणि कधीकधी नवऱ्यांचाही बचाव करत राहतील. कुटुंबातीलच अपराधी पुरुषाविरोधात उभं ठाकल्याने सगळ्यांसाठी सगळ्याच गोष्टी बदलून जातील हे त्यांना माहीत असतं आणि जे त्यांना शिकवलेलं असतं त्याच्या हे बरोब्बर उलटं असतं. दुर्लक्ष करणं किंवा नाकारत राहणं हेच बहुतेक दीर्घकाळासाठी सगळ्यांनाच सोईचं असतं. अशा रितीने अन्यायाचं वर्तुळ पूर्ण होतं.

जगात असे पुरुष आहेत ज्यांना स्वतःच्या बायकोबरोबर किंवा मुलींबरोबर कसं वागावं यापेक्षा आपल्या गाडीसोबत किंवा गुरांसोबत कसं वागावं हे जास्त कळतं.

त्यामुळे बलात्कार थांबणार नाहीत हे तसं सुसंगतच आहे.

Monday 24 December 2012

र. धों. कर्व्यांच्या म्हणण्यासंबंधीची नोंद

एका मुलीवर बलात्कार झाला तिला न्याय मिळावा अशा घोषणा देत समाज आंदोलन करतो आणि तेवीस वर्षांच्या त्या तरुणीची ओळख लपवायला लागते कारण तिला परत समाज स्वीकारेल याची शाश्वती नसते. असा समाज.

हा सगळा गदारोळ एकीकडे सुरू राहील थोडा वेळ. पण दरम्यान, तुम्हाला थोडा वेळ असेल तर 'समाजस्वास्थ'कार र. धों. कर्व्यांचं म्हणणं वाचून पाहूया का? आपली नोंद या सगळ्या गदारोळाचा एकूण आवाका दाखवणारी नाही, तर त्यातला एखादा कण फक्त या नोंदीत सापडू शकेल. उर्वरित मुद्दा खूप मोठा आहे, पण आपण आपल्या आवाक्यात आहे तेवढं इथे नोंदवून ठेवतो आहोत.


र. धों. कर्व्यांच्या एकूण खूप मोठ्या कामातले - लिखाणातले दोन परिच्छेद खाली देतो-

कामविषयक स्वातंत्र्याच्या मर्यादा
प्रत्येकाला कामशांतीचा हक्क आहे हे एकदा कबूल केले, की प्रत्येकाला आपल्या शक्तीप्रमाणे ती करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे, हे ओघानेच आले. मात्र कामशांती ही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असल्यामुळे त्याकरता त्या व्यक्तीची संमती असली पाहिजे, कारण इतरांना त्रास होता नये हा नीतीचा नियम समाजात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मान्य केलाच पाहिजे. मात्र दोन व्यक्तींची संमती असेल, तर मग दुसऱ्या कोणालाही मधे पडण्याचा हक्क नाही; कारण मग तो त्या दोन व्यक्तींचा खाजगी प्रश्न झाला, आणि तो वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मर्यादेत येतो. दुसऱ्याला त्रास होऊ नये इतकी काळजी घेतली म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर निष्कारण निर्बंध घालता नये, हे मूलभूत तत्त्व समंजस लोकांना मान्य होईल, असे मी धरून चालतो.
आता यात कोणी असा प्रश्न काढील, की विवाहित स्त्रीपुरुषांवर परस्परांव्यतिरिक्त कोणाशीही संबंध न ठेवण्याचा निर्बंध असतो. या निर्बंधाचा अर्थ काय, याचा विचार केल्यास असे दिसते, की विवाहाने त्यांचा परस्परांवर किंवा निदान परस्परांच्या शरीराच्या काही विशिष्ट भागांवर, मालकी हक्क उत्पन्न होतो, पुष्कळ समाजांत हा मालकी हक्क फक्त स्त्रियांवरच उत्पन्न होतो, आणि पुरुषांना हा निर्बंध लागू असतो तेथेदेखील सत्ता पुरुषांच्या हाती असल्यामुळे ते तो धाब्यावर बसवतात. म्हणजे वस्तुतः यात नैतिक तत्त्व नसून ही केवळ अरेरावी आहे. कित्येक समाजांत तर पुरुषांना राजरोज अनेक बायका करण्याची परवानगीच असते; पण ती जेथे नसते तेथेदेखील पुरुषांचे एकपत्नीत्व केवळ नावालाच असते, हे सर्वांना माहीत आहे. एका माणसाचा दुसऱ्यावर मालकी हक्क असणे हा गुलामगिरीचा अवशेष आहे, रानटीपणाचा अवशेष आहे आणि समंजस लोकांनी तो कबूल करता नये. समान हक्कांसाठी भांडणाऱ्या काही स्त्रिया हा निर्बंध स्त्रियांप्रमाणे पुरुषांनाही कडकपणे लागू करावा, अशी मागणी करतात. पण हा अडाणीपणा आहे, समंजसपणा नव्हे. पण कामविषयक बाबतीत स्वातंत्र्य असावे असे म्हणण्याची पुरुषांचीदेखील छाती होत नाही; तेव्हा आजपर्यंत गुलामगिरीत वाढलेल्या बायकांना तो धीर कसा व्हावा? पारंपरिक स्त्रियांच्या या बावळटपणाला समंजस लोकांनी उत्तेजन देता नये. पण पुरुषांची या बाबतीत वृत्ती अशी असते, की त्यांना स्वतःला स्वातंत्र्य असावे असे वाटते, दुसऱ्याची बायको शक्य तर आपणांस मिळावी यात त्यांना वावगे दिसत नाही; पण आपली बायको मात्र प्रतिव्रता राहिली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. असे पुरुष या अडाणी स्त्रियांना नेहमी पाठिंबा देतात, कारण एकपत्नीव्रताचा निर्बंध आपल्यावर खरोखर लादणे अशक्य आहे, आणि कायद्याने तो लादला तरी आपल्याला आपली सोय लावता येईल, अशी त्यांची खात्री असते. अशी खात्री असण्याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांचा व्यभिचार जसा कित्येक प्रसंगी समजण्याचा संभव असतो, तसा पुरुषांचे बाबतीत नसतो. शिवाय स्त्रिया अजून पुरुषांप्रमाणेच स्वतःच्या पायांवर उभ्या राहू लागल्या नाहीत, हे दुसरे एक कारण आहे. हल्लीचे सामाजिक निर्बंध समंजसपणावर आधारलेले नसून केवळ अरेरावीने अमलात आणलेले आहेत.

कर्व्यांच्या ज्या लिखाणातून हे दोन परिच्छेद दिले आहेत, ते लिखाण जुलै १९४२मध्ये प्रसिद्ध झालं होतं. र. धों. कर्वे नग्नतेबद्दल खुलेपणाने बोलले, स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या नैसर्गिक सहज आकर्षणाबद्दल खुलेपणाने बोलले, स्त्री-पुरुष देहांबद्दल स्पष्टपणे बोलले, संततीनियमनाबद्दल बोलले.
र. धों. कर्वे तेव्हाही लोकप्रिय नव्हते, आणि आता तर फार काही बोलूया नको.
***

रघुनाथ धोंडो कर्वे (१८८२-१९५३)
कर्व्यांच्या एकूण कामाशी संबंधित आठ खंड अनंत देशमुख यांनी खूप कष्टाने तयार केले आणि ते पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशितही केले आहेत. यात काही कर्व्यांच्या स्वतःच्या लिखाणाचे खंड आहेत, तर एक त्यांच्याविषयी देशमुखांनी लिहिलेलं चरित्रात्मक पुस्तक, 'समाजस्वास्थ्या'तल्या इतर लेखकांच्या निवडक लेखांचं पुस्तक, इत्यादी भाग आहेत. हे 'फ्लिपकार्ट'वर पाहाता येईल.

आपण वरती जे दोन परिच्छेद नोंदवले, ते या प्रकल्पातल्या ''समाजस्वास्थ्य'मधील निवडक लेख' या खंडात आहेत. (पान क्रमांक : ३४८-३४९) या खंडाची झलक 'बुकगंगा'वर पाहाता येईल.

सध्या सुरू असलेल्या घटनांच्या सगळ्या बाजू काही आपण नोंदवू शकत नाही, पण र. धों. कर्व्यांचं म्हणणं आत्ता सुरू असलेल्या घडामोडींच्या काही बाजूंसंबंधी आठवणारं असू शकतं, म्हणून 'रेघे'वर ही नोंद.
***

Friday 21 December 2012

-

कागद होते, पेन होतं आणि शब्द होते. आणि एक झिरो होता. हिरो नव्हे. झिरो झिरो. झिरो हे त्याचं टोपणनाव. मूळ नाव शून्य. तर शून्याला लिहायचंय.
शून्य का लिहितो?
शून्याला त्याला हवे ते शब्द वापरता येत नाहीत, तरी?
शून्याला जे लिहायचंय ते कोणाला वाचायचं नाहीये, तरी?
शून्याला जी भाषा येते ती ढोंगी लोकांच्या ताब्यात आहे, तरी?
शून्याच्या भाषेला उडवणाऱ्या ढोग्यांना तो थांबवू शकत नाही, तरी?
तरी तरी तरी तरी शून्य का लिहितो.
शून्याला बहुतेक माहितेय की तो शून्य आहे. म्हणजे झिरो. हिरो नव्हे, झिरो झिरो.
म्हणून मग, तो पेनाने कागदावर लिहितो, त्याच्या डोक्यात येणारे शब्द.


फोटो : रेघ


***
काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावीं उत्तरें
टिनपट वा चोमडी
- बा. सी. मर्ढेकर
***

वाचेच्या चापल्ये     बहु जालो कुशळ।
नाही बीजमूळ     हाता आले।।

म्हणोनि पंढरिराया     दुःखी होते मन।
अंतरीचे कोण     जाणे माझे।।

पूज्य जालो अंगा     आला अभिमान।
पुढील कारण     खोळंबले।।

तुका म्हणे खूण     न कळे चि निरूती
सापडलो हाती     अहंकाराचे।।
- तुकाराम
***

Wednesday 19 December 2012

१२/१२/१२ : अबुझमाडच्या जंगलात

'तेहेलका'च्या वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या मजकुराचं मराठी भाषांतर. मूळ मजकूर- The Truth Behind the 12/12/12 Abujmarh Encounter
***


मुंगेली मडावी (फोटो : तेहेलका)
महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर, अबुझमाड जंगलातल्या वाला या गावात मुंगेली मडावी रडायचं थांबत नाहीत. त्यांचा १८ वर्षांचा मुलगा चैनू याचं नक्षलवाद्यांनी १२ डिसेंबरला अपहरण केलं. लगेच काही दिवसांनी पोलीस चकमकीत त्यांचा मुलगा मारला गेला. मुलाच्या मृत्यूबद्दल नक्षलवाद्यांना दोषी धरायचं की पोलिसांना हे अजूनही मडावींच्या ध्यानात येऊ शकलेलं नाही.

नक्षलवादी शस्त्रप्रशिक्षणासाठी मुलांना जबरदस्तीने उचलून नेऊ लागले, त्यानंतर बस्तरच्या उत्तर भागात परालकोट पंचक्रोशीत नक्षलवादी आणि पोलीस दोघांविरोधतही तीव्र रोष निर्माण झाल्याचं दिसतं. या संदर्भात पोलिसांनी १२ डिसेंबर २०१२ रोजी कारवाई केली.

१२/१२/१२ असं गुप्त नाव देण्यात आलेल्या या कारवाईत १२ डिसेंबरला अबुझमाडच्या जंगलात अडीचशे पोलिसांनी प्रवेश केला आणि वाला नि सित्राम या दोन खेड्यांच्या दरम्यानच्या कुठल्यातरी ठिकाणी उभारलेला नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला. आपण आठ नक्षलवाद्यांना मारलं असून नऊ जणांना अटक केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. चैनू मडावीचं शव आणि 'आयईडी' (इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोजीव्ह डिव्हाईस) माध्यमांना पुरावा म्हणून दाखवण्यात आलं. ही कारवाई अत्यंत यशस्वी झाल्याचं पोलीस सांगत असले, तरी 'तेहेलका'च्या तपासणीत असं दिसून आलं की, नक्षलवादी नि पोलिसांच्या उंदरा-मांजराच्या खेळात गावकरी भक्ष्यस्थानी अडकले आहेत.

कांकेरचे पोलीस अधीक्षक राहुल भगत म्हणाले की, जंगलात शस्त्रांचं प्रशिक्षण शिबीर सुरू होतं असं ताब्यात घेण्यात आलेल्या सामग्रीवरून स्पष्ट होतं. पकडण्यात आलेल्यांच्या अंगावर नेहमीच्या कपड्यांवर नक्षलवादी गणवेष घातलेला होता. पण त्यापैकी बहुतेक जण १५ वर्षांखालचे असल्यामुळे त्यांना बालसुधार गृहात पाठवण्यात आलं.

अटक झालेल्या नऊ जणांपैकी सहा जण सित्राम गावातील आहेत. त्यांपैकी चार जण - शांती नुरेटी, मुकेश्री यादव, राजी कवसी व सचिन मडावी - हे १३-१४ वर्षांपेक्षा जास्त वयाचे नाहीत, असं गावकरी सांगतात. रामसू नायक नि अमन सिंग ठाकूर हे उर्वरित दोघे २० वर्षांचे आहेत.

बुधवारी (१२ डिसेंबरला) नक्षलवाद्यांनी प्रत्येक घरातून एक व्यक्ती - मुख्यत्त्वे मुलं- शस्त्रप्रशिक्षणासाठी पकडून नेली आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जोरदार गोळीबाराचा आवाज ऐकू आला, असं गावकरी सांगतात. नक्षलवाद्यांनी जबरदस्तीने नेलेल्या सर्व मुलांना पोलिसांनी अटक केल्याचं नंतर गावकऱ्यांच्या लक्षात आलं.

पोलीस आल्याआल्या नक्षलवादी पळून गेले, असं नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या एका १६ वर्षांच्या मुलाने सांगितलं. मागे राहिलेल्यांना पोलिसांनी घेराव घातला आणि चैनूला हातातली बंदूक खाली ठेवायला सांगितलं, चैनूने तसं करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. पोलिसांनी पहिल्यांदा गोळ्या झाडल्याचं या मुलाने सांगितलं.

मुलांना प्रशिक्षणाला पाठवण्यास जे लोक नकार देतील त्यांना नक्षलवाद्यांनी धमक्या दिल्या आणि दंडही ठोठावला, असं गावकरी सांगतात. प्रशिक्षण तळावरून अटक करण्यात आलेल्या सचिन मडावी या आठवीत शिकणाऱ्या मुलाची आई सुनिता मडावी सांगतात की, काही वर्षांपूर्वी सचिनच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तोच कुटुंबातला एकमेव कमावता व्यक्ती होता. कथित चकमकीनंतर पोलिसांनी त्याला अटक करून जेव्हा ओळख पटवण्यासाठी गावात आणलं तेव्हा आपल्याला त्याच्या समोरही येऊ दिलं नाही, असा आरोप सुनिता करतात. पण, दोन दिवसांनी त्या पंखजूर पोलीस स्थानकात गेल्या तेव्हा त्यांना आपला मुलगा नक्षलवादी गणवेषात दिसला.

सचिनची आजी मौनीबाई सांगतात की, 'नक्षलवादी नेहमीच जबरदस्तीने मुलांना घेऊन जातात. सचिनचंही तसंच झालं. आम्ही शेतात झोपलेलो, तेव्हा अचानक नक्षलवादी आले नि जबरदस्तीने सचिनला घेऊन गेले'.

राजी कवासीचे वडील जुदूही या माहितीला दुजोरा देतात. ते सांगतात की, 'राजी तिच्या काकांबरोबर नारायणपूरमधे राहायची आणि मला भेटायला आठवड्याभरापूर्वीच गावी आली होती. ती पूर्वी कधीच नक्षलवाद्यांबरोबर नव्हती, पण ती पकडली गेली.'

शांती नुरेटीचे वडील संकू नुरेटी म्हणाले, 'सध्या कापणीचा मोसम असल्यामुळे आमचं सगळं कुटुंबच शेतात झोपलं होतं. तेव्हाच नक्षलवादी शांतीला घेऊन गेले.'

हीच कथा गावातल्या इतरांच्या तोडूनही ऐकायला मिळाली.

मसुराम उसेंडी (फोटो : तेहेलका)
सित्राम गावापासून नऊ किलोमीटरवर असलेले वाला गाव परालकोट पंचायतीमधे येतं. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी समको हिचे वडील मसुराम उसेंडी यांचा आपल्या मुलीची व्यथा कोणी कधी मांडेल यावर विश्वासच बसत नाही. समको गेली दोन वर्षं अंगणवाडीमधे आचारी म्हणून काम करत होती. बुधवारी दुपारी ती घरी जेवण तयार करत असताना नक्षलवादी जबरदस्तीने तिला जबरदस्तीने घेऊन गेले. वाला गावातून समकोबरोबर आणखी पाच जणांना नक्षलवाद्यांनी पळवून नेलं.

चैनूची आई मुंगेली सांगते, 'चैनू भीतीपोटी नक्षलवाद्यांसोबत जायचा आणि त्याला त्यांच्या बंदुका उचलायला सांगितलं जायचं.' वालापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंखजूर पोलीस स्थानकात आपल्या मुलाचं शव ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या मुंगेली यांना अंत्यविधीसाठी पोलिसांकडून बाराशे रुपये देण्यात आले. पण परिसरातील दुर्गमतेमुळे त्या मुलाचं शव गावी परत आणू शकल्या नाहीत नि त्यांनी पंखजूरमधेच त्याला दफन केलं.

चैतुराम नुरेटी (फोटो : तेहेलका)
नक्षलवाद्यांकडून प्रशिक्षण मिळालेला पण पोलिसांच्या कारवाईपासून पळण्यात सफल झालेला सोळा वर्षांचा चैतुराम नुरेटी सांगतो, 'प्रशिक्षणासाठी आणखी तरुणांना आणायला मला जवळच्या कोंगे गावात पाठवलं होतं. पोलिसांची कारवाई झाली तेव्हा मी तळावर नव्हतो. कारवाई झाली त्या दिवशी सकाळी मुलांना शारीरिक कवायती शिकवल्या जात  होत्या.'

रुकानी आणि समारी मेतामी या अनुक्रमे आठ आणि दहा वर्षं वय असलेल्या मुलींशीही 'तेहेलका'ने संवाद साधला. त्या दोघीही प्रशिक्षण तळावर होत्या, पण प्रशिक्षण कशाचं होतं हे सांगणं त्यांना जमलं नाही. पण पोलीस आल्यावर नक्षलवादी पळून गेले आणि नंतर पोलिसांनी गोळीबार सुरू केला, असं मात्र त्यांनी सांगितलं.

पोलीस अधीक्षक राहुल भगत म्हणतात, 'नक्षलवादी लहान मुलांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देत होते. या कारवाईदरम्यान मानवाधिकारांचा भंग होणार नाही याची आम्ही अतिशय काळजी घेतली. (मृतांपैकी) दोन्ही मुली रमबती सोरी आणि मसलो परालकोट या स्थानिक दलमच्या सदस्य होत्या.' तळावरच्या कपाटातलं सामानही त्यांनी जाळल्याचा दावा पोलिसांनी केला, पण 'तेहेलका'ला घटनास्थळी कोणतंही कपाट सापडलं नाही.
रुकानी व समारी मेतामी (फोटो : तेहेलका)

या मोठ्या यशाबद्दल पोलीस स्वतःची पाठ थोपटत असताना, नक्षलवादी मात्र गप्प आहेत. गावकरी आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल संभ्रमित आहेत. आपण मुलांना भेटण्यासाठी तुरुंगात गेलो असताना पोलिसांनी आपल्याकडून कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

या भागातल्या गावांमधल्या मुलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय बनला असून पुढच्या शुक्रवारी त्यासंबंधी बैठक बोलावण्यात आली आहे. जंगलातील आतल्या भागांमधील लोकांनाही बैठकीसाठी बोलावणं पाठवण्यात आलंय. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा अवस्थेत गावकरी अडकले असून, एकीकडे त्यांना नक्षलवाद्यांच्या प्रशिक्षण शिबीरांना जबरदस्तीने स्वतःच्या मुलांना पाठवावं लागतंय तर दुसरीकडे त्यांनाच पोलिसांकडून अटक होतेय नि तेच जहाल नक्षलवादी असल्याचं चित्र उभं केलं जातंय.

Sunday 16 December 2012

कुमार केतकरांना गहिवरून का आलं?

ही नोंद कुठल्याही वैयक्तिक आकसातून केलेली नाही. ज्यांना केतकरांची वैयक्तिक टिंगल इथे सापडेल असं वाटत असेल त्यांच्यासाठी ही नोंद नाही. मराठी पत्रकारितेशी संबंधित कोणत्याही चर्चेत टाळता न येणारं एक नाव आणि ज्यांना त्यांच्या या क्षेत्रातील अनुभवामुळे प्रतिनिधी मानता येईल अशी व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याबद्दल ही नोंद करत आहोत.

यातला मुख्य संदर्भ आहे तो शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या निधनानंतरच्या केतकरांच्या लेखांतून आणि टीव्हीवरच्या चर्चेतून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया. (यात बाळ ठाकऱ्यांबद्दलही आपण जे बोलू ते फक्त केतकरांच्या संदर्भातले विरोधाभास दाखवण्यापुरतंच असेल. अन्यथा टीका करायची तर बाळ ठाकरेच का, अमुक का नाहीत, तमुक का नाहीत, शरद पवार का नाहीत - असलं काहीतरी सुरू होतं.)

आणि अजून मुख्य संदर्भ म्हणजे कुमार केतकर ही व्यक्ती असं न पाहाता मराठी पत्रकारितेचं सध्याचं प्रातिनिधिक व्यक्तिमत्त्व म्हणून या नोंदीतल्या केतकरांच्या उल्लेखांकडे पाहावं.

केतकरांबद्दल (किंवा खरंतर कोणाहीबद्दल) वाट्टेल त्या खालच्या थराला येऊन बोलणारी व्यासपीठ इंटरनेटवर कमी नाहीत. तसं तर नकोच. पण काही गोष्टी नोंदवणं भाग आहे. यापूर्वीच्या 'रेघे'वरच्या नोंदीत जो तीन इंग्रजी छापील नियतकालिकांमधे आलेल्या माध्यमांसंबंधीच्या लेखांचा उल्लेख केला, तसं मराठीत कुठल्याही छापील व्यासपीठावर करणं अवघड असल्यामुळे आपण 'रेघे'वर ही नोंद करत आहोत.
***

एक

आता 'आयबीएन लोकमत' या वाहिनीवर निखील वागळे यांनी कुमार केतकरांशी मारलेल्या गप्पांकडे वळूया. बाळ ठाकरे यांच्या निधनानंतरची ही गोष्ट. १९ नोव्हेंबर २०१२ रोजी यू-ट्यूबवर हे व्हिडियो पोस्ट झाल्याची तारीख.

''कुमार केतकर इथे आल्याशिवाय आजचा कार्यक्रम संपणार नाही असा माझा आग्रह होता.'' असं म्हणून वागळे केतकरांना ठाकरे यांच्या निधनावरची प्रतिक्रिया विचारतात त्यावर केतकर म्हणतात, ''पहिली प्रतिक्रिया, म्हणजे मला आत्ता सांगतानासुद्धा गहिवरून आलंय, इतकी तीव्र होती.''

इथून सुरू झालेली ही दोन संपादकांमधली चर्चा 'यू ट्यूब'वर चार भागांमधे पाहाता येते.

 

 

 पहिल्या भागात अनेक उल्लेख आलेत. केतकर 'मार्मिक'च्या सुरुवातीच्या काळात त्याचे वाचक कसे होते, तेव्हा 'मार्मिक'मधे कसं 'वाचा आणि थंड बसा' आणि नंतर 'वाचा आणि उठा' अशा घोषणा यायला लागल्या, त्यातून शिवसेनेचा जन्म, शिवसेनेच्या सहासष्ट सालच्या पहिल्या मेळाव्याला ते कसे उपस्थित होते - असं सगळं आलंय.

इथपर्यंत सगळं ठीक होतं.

यापुढे प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या प्रभावातून आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या डाव्या विचारांमधून शिवसेनेचा जन्म कसा झाला हेही केतकरांच्या बोलण्यात आलंय.

दुसऱ्या भागात, मराठी समाजाला ठाकऱ्यांचं काय योगदान आहे, असा प्रश्न वागळे विचारतात त्यावर बोलताना केतकर म्हणतात की, '..ज्या मराठी माणसाच्या नावाने संयुक्त महाराष्ट्र होतोय, त्याच्या भवितव्याचा काय विचार आहे, काय योजना आहे, काय नियोजन आहे, अशा प्रकारची कोणतीही भूमिका संयुक्त महाराष्ट्र समितीने घेतली नाही. की संयुक्त महाराष्ट्रात उद्योग मराठी माणसांकडे.. आम्ही मराठी माणसांना उद्योगाचं ट्रेनिंग देऊ. पण ते भांडवलशाहीच्या विरोधात असल्यामुळे उद्योगाचं ट्रेनिंग देऊ असं म्हणूच शकत नव्हते. त्यामुळे भांडवलशाही एका अर्थी नॉन-मराठी वर्गाकडे आणि कामगार वर्ग मराठी माणसाकडे होता पण त्याला मराठी म्हणून आयडेन्टिटी दिल्यामुळे त्याच्या वर्गजाणिवेला छेद गेला. आणि मराठी कामगार आणि नॉन-मराठी कामगार असं द्वंद्व सुरू झालं. नॉन-मराठी कामगार खूप कमी होता. त्या द्वंद्वातून मराठी अस्मिता अतिशय उग्रपणे, प्रखरपणे, कधीकधी अतिशय वाईटपणे पुढे आली त्याच्यामुळे मराठी अस्मितेचा चांगला परिणाम झाला. हा आत्मविश्वास द्यायला बाळासाहेबांनी मदत केली आणि दुसरीकडे राडा करणारा, भांडखोर, उग्रपणे दंगली करणारा, अशा मराठी माणसाच्या दोन विरोधी प्रतिमा तयार झाल्या.'

तिसऱ्या भागात, ठाकरे आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि भारतीय जनता पक्षाची आणि हिंदुत्त्वाची कशी टिंगल करायचे आणि नंतर त्यांनी टॅक्टिकल भाग म्हणून भाजपशी युती कशी केली - हे सांगून केतकर म्हणतात की, 'पण यात त्यांच्या उत्स्फूर्ततेचा भाग होता, त्या अर्थी त्यांनी हिंदुत्त्ववाद स्वीकारला होता असं मला दिसलेलं नाही.. नायतर ते बाबरी मशिदीच्या जागी हॉस्पिटल बांधा म्हणाले नसते.'

'बाळासाहेबांच्या भाषणांमधे जात आणि धर्म सर्वसाधारणपणे यायचेच नाहीत. मतांपुरते बोलायचे ते सोड. त्यांच्या मनात तो मुद्दा नव्हताच. कोणत्याही भाषणांमधे बघ. ते हिंदुत्त्व वगैरे मधूनमधून बोलायचे ते सोड, असंही केतकर म्हणतात. आणि शेवटच्या भागात तर बाळासाहेब हळूहळू वैराग्याकडे झुकत होते, त्यांच्या कपड्यांमधे झालेला फरक बघ, आधी सफारी, नंतर कुडता आणि शेवटी तर भगवे कपडे', असंही केतकर बोलता बोलता बोलून गेलेत.

''निखील हे बघ, माझे त्यांच्याशी काय मतभेद होते तुला पूर्ण माहितेय. तुझेही मतभेद, तू तर मार खाल्लेला आहेस. तू पण समाजवादी परंपरेत वाढलेला आहेस, त्यामुळे तुझाही, म्हणजे त्या अर्थी वैश्विक डावा म्हणता येईल असा विचार आहे. म्हणजे कोणत्याही संकुचित विचारांमधे न बसणारा. पण मराठी म्हणून वाटत असतं ना आपली भाषा आपली संस्कृती आपला महाराष्ट्र या भावनेचा आधार बाळासाहेब ठाकरेच होते'', असं केतकर या भागात म्हणतात.

उत्स्फूर्ततेतून आलेली सामाजिक बांधिलकी हेच ठाकरे यांचं तत्त्वज्ञान असल्याचं केतकरांनी वारंवार या गप्पांमधे सांगितलंय. आणि या उत्स्फूर्ततेचे नकारात्मक परिणाम म्हणून कृष्णा देसाई खून, ९३च्या दंगली या गोष्टी झाल्या आणि तशा त्या जगभर झाल्यात, असंही सांगितलंय. पण नंतर ठाकऱ्यांनी उत्स्फूर्ततेतली नकारात्मकता कमी केली, असंही केतकरांच्या बोलण्यात आलंय.

हे सगळं आपण ऐकलं. त्यातलं थोडंच निवडून काढल्यासारखं नको, म्हणून मूळ व्हिडियो आणि शिवाय त्यातला आपल्याला बोलायचाय तो भाग तपशिलात वेगळा लिहून दिला.
***

दोन

केतकरांनी ठाकऱ्यांच्या निधनानंतर 'तेहेलका'त लिहिलेल्या लेखाचं शीर्षक आहे - 'हाऊ टायगर गॉट हिज सॅफ्रॉन स्ट्रिप्स'. (वाघाला भगवे पट्टे कसे मिळाले)

यात केतकर म्हणतात-
''जर्मनीत नाझींचा उदय झाला तो आर्थिक अडचणीच्या काळातच. शिवसेनाही आर्थिक समस्या भडकली असतानाच स्थापन झाली. त्यावेळी काँग्रेसमधे मोरारजी देसाई, स. का. पाटील, अतुल्य घोष आणि अशी मंडळी (जी पुढे 'सिंडीकेट' म्हणून ओळखली गेली) उजव्या विचारांची उद्घोषणा करत होती. नेहरूंच्या मृत्यूनंतर स्वतंत्र पार्टी, जनसंघ आणि रामराज्य परिषद अशा उजव्या विचारांच्या पक्षांना राजकीय पाठिंबा मिळू लागला. काँग्रेसमधेही डावे आणि उजवे अशी सरळ विभागणी होत होती. यातूनच शीतयुद्धासारखं राजकारण सुरू झालं- काँग्रेसमधले डावे आणि कम्युनिस्ट पक्ष हे शक्यतो सोव्हिएत युनियनच्या बाजूने असत तर उजवे अमेरिकेकडे झुकलेले होते. याच वादातून १९६९मध्ये काँग्रेस फुटली. शिवसेनेने उजवी बाजू पकडली, पण क्वचित डाव्या घोषणा मात्र दिल्या!

हिटलरची स्तुती करण्याव्यतिरिक्त, बाळासाहेब महात्मा गांधी आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाविरोधातही बोलले होते. स्वातंत्र्यादरम्यान जन्माला आलेल्या पिढीला गांधी-नेहरूंच्या वारशाची खूपच अल्प जाणीव होती. श्रमिक वर्गाचे केंद्र असलेल्या मुंबईतून महाराष्ट्राच्या चळवळीचं नेतृत्त्व केलेली संयुक्त महाराष्ट्र समिती कोणतीही दीर्घकालीन योजना किंवा कामगारांसाठी एखादा डाव्या विचारांचा कार्यक्रम उभा करण्यात अपयशी ठरली होती, आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तिने स्वतःला बरखास्तच केले. स्वांतत्र्य चळवळीचा वारसा कमकुवत झाला असताना आणि काँग्रेस दुर्बलावस्थेत असूनही उजव्या शक्तींचं प्राबल्य दिसत असताना, तयार झालेल्या पोकळीत शिवसेना उदयाला आली; नव्याने तयार झालेल्या बेरोजगारांच्या आणि श्रमिक वर्गाच्या रस्त्यांवरील निदर्शनांतून. अस्थिर झालेल्या तरुणाईला हिंसेसाठी प्रोत्साहित करणं हा राजकाराणाचा भाग म्हणून स्वीकारला गेला होता. शिवसेनेचे अनेक नेते, आमदार, अगदी खासदारही त्या काळी रस्त्यावरच्या लढाईत होते.

या पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट नेते आणि आमदार कृष्णा देसाई यांचा खून झाला. महाराष्ट्रातली ही पहिली राजकीय हत्या होती. देसाईंना मारणाऱ्या टोळीत तरुण शिवसैनिक होते आणि त्यांना खुद्द शिवसेनाप्रमुखांनी प्रोत्साहन दिलं होतं. त्यांनी आरोपींना पाठीशीही घातलं आणि त्यांचं संरक्षणही केलं. इतर डाव्या कामगार नेत्यांना ही एक सूचना होती.''
***

तीन

'फोर्ब्स'मधेही केतकरांनी ठाकऱ्यांवर लेख लिहिलेला. या लेखाचं शीर्षक आहे, 'बाळ ठाकरेज् फ्रॅक्चर्ड लीगसी'. (बाळ ठाकरे यांचा खंडित वारसा)

यात केतकर म्हणतात -
''हे खरंतर विचित्र आहे की जो माणूस स्वतःच्या मराठीपणाबद्दल अभिमान बाळगतो, मराठी अस्मितेसाठी लढतो, मराठी संस्कृतीचा पुरस्कार करतो आणि मराठी इतिहासाला जवळ करतो, त्याने शिवाजी महाराजांचे काही सोपे संदर्भ देण्यापलीकडे कधीच ऐतिहासिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यात रस दाखवला नाही. त्यांच्यासाठी फक्त राजकारण महत्त्वाचं होतं, तेही विषयानुरूप नव्हे तर गर्दीला उसकवणारं तंत्र म्हणून. मुंबईतल्या परिघाबाहेर ढकलल्या गेलेल्या सामान्य लोकांना या मराठी अस्मितेच्या मुद्द्याने स्पर्श केला. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरातही क्वचितच एखादी मोठी कंपनी मराठी माणसाच्या हातात होती, क्वचितच एखादा जागतिक आकांक्षा असणारा मोठा मराठी उद्योजक होता आणि शेअर बाजारातही आणखीच कमी संख्येने मराठी माणसं होती.

दुसऱ्या बाजूला, अमिताव घोष किंवा विक्रम सेठ यांच्या पातळीला पोहोचू शकतील असे कोणी मराठी लेखक नव्हते, अमर्त्य सेनांप्रमाणे नोबेल विजेते नव्हते, सत्यजीत राय यांच्या दर्जाचे मराठी चित्रपट दिग्दर्शक नव्हते. शिवसेना-भाजप युती सत्तेवर असताना बाळासाहेब सहजी काही चांगल्या संस्था उभारू शकले असते, ज्यातून या सगळ्याला प्रोत्साहन मिळू शकलं असतं. मराठीला वैश्विक भाषा बनवण्यासाठी ते प्रयत्न करू शकले असते. पण असला कसलाही प्रयत्न झाला नाही. कोणतीही दृष्टी नव्हती, कोणताही कार्यक्रम नव्हता, कोणतीही योजना नव्हती. त्यासाठी खरोखरच काही बौद्धिक काम करावं लागलं असतं. यातलं काही ना बाळासाहेबांना महत्त्वाचं वाटलं, ना त्यांच्या मुलाला, ना त्यांच्या पुतण्याला. त्यांच्या नावाने एखादी कला अकादमी सुरू करावी असंही त्यांच्यापैकी एकाला वाटलं नाही. (कदाचित त्यांना आता तसं वाटेल, बाळासाहेबांच्या प्रतिमेचा वापर करायचा असेल तर.)''

या लेखात शेवटच्या आधीचा परिच्छेद आहे-
''बाळासाहेबांनी मराठी लोकांमधे अभिमान जागृत केला हे आहेच, पण त्यांनी दुसऱ्यांबद्दल पूर्वग्रहही निर्माण केले. देदिप्यमान मराठी इतिहासाच्या बळावर त्यांनी लोकांमधे अभिमान जागा केला, पण इतिहास संकुचित पातळीवर आणून ठेवला. फक्त उच्चभ्रूंनाच स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालता यायचं. वर्गभेद तयार झाला.. मराठी माध्यमांच्या शाळांमधे सुविधा अपुऱ्या असतात, शिक्षण दुय्यम दर्जाचं असतं, शिक्षक फारसे उच्चशिक्षित नसतात. शिवसेनेच्या नेतृत्त्वाने त्यांच्या मुलांना उच्चभ्रू इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधे घातलं, आणि इंग्रजी नि हिंदीच्या प्रभावाबद्दल आक्रमकपणे बोलत राहिले''
***

चार

वरती जो मजकूर आणि केतकरांची जी विधानं दिल्येत ती मुद्दामहून जास्त तपशिलात दिल्येत, कारण सुटी वाक्यं उचलून टीका केलेय असं वाटू नये. शिवाय मूळ व्हिडियोंच्या, लेखांच्या लिंकही आहेत.

पहिला भाग आहे तो केतकरांच्या मराठी अभिव्यक्तीचा आहे आणि दुसरा नि तिसरा भाग हा केतकरांच्या इंग्रजी अभिव्यक्तीचा आहे. मराठी व इंग्रजी केतकरांमधला हा विरोधाभास यापूर्वीही 'रेघे'च्या एका खूप जुन्या नोंदीत नोंदवला होता. ही नोंद खाली प्रतिक्रियेच्या रूपात पूर्ण वाचायला मिळेल. यात वेगळं काही बोलायलाच नको एवढा विरोधाभास दिसतो.

वागळ्यांबरोरच्या गप्पांमधे ठाकऱ्यांच्या 'उत्स्फूर्त सामाजिक बांधिलकीवर' पूर्ण जोर आहे, आपल्या भावनिक आधाराचा उल्लेख आहे. 'तेहेलका' व 'फोर्ब्स'मधल्या लेखांमधे ठाकऱ्यांच्या हुकूमशाही वृत्तीचा आणि भावना उचकवणाऱ्या पण प्रत्यक्षात काहीच बदल न घडवणाऱ्या राजकारणाभोवती मांडणी केलेय.

ठाकऱ्यांनी जातीचं राजकारण केलं नाही, असे केतकर म्हणतात तेव्हा कोणाला मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळचं 'घरात नाही पीठ तर कशाला पाहिजे विद्यापीठ' हे विधान आठवू शकेल. किंवा रिडल्सच्या आंदोनावेळी दलित जनतेच्या मोर्चानंतर हुतात्मा चौकात शिवसेनेच्या नेत्यांनी गोमूत्र शिंपडून 'शुद्धीकरण' केलेलं आठवू शकेल.

केतकर उत्स्फूर्ततेच्या काहीशा नकारात्मक भागाचा उल्लेख करतात तेव्हा कोणाला, मेलेली माणसं आठवू शकतील. किंवा वरळीच्या दलित पँथरच्या मोर्चावेळी डोक्यात दगड पडून मेलेला माणूस. 'तुमचा दाऊद तर आमचा गवळी' असल्या घोषणा आठवू शकतील. असं किती काय काय आठवू शकेल.

कामगार आणि मराठी यांच्या संदर्भात किंवा एकूण मराठी भाषा, मराठी संस्कृती यासंदर्भात केतकरांना बाळ ठाकरे जवळचे वाटतात. कामगार-मराठी संदर्भात नारायण सुर्वे नाहीत. किंवा जागतिक पातळीवर मराठीच्या संदर्भात अरुण कोलटकर नाहीत, किंवा असं हे कितीही सांगता येईल. मुळात असं जागतिक पातळीवर भाषा वगैरे बोलणं म्हणजेच उथळ आहे. पण साधा मुद्दा आहे, बंगाली भाषा म्हटली की, त्यातलं काहीही न वाचलेल्याच्याही समोर कोण येईल, तर रवींद्रनाथ टागोर. इंग्रजी म्हटलं की, साम्राज्यवाद पसरवणारी ईस्ट इंडिया कंपनी आठवेल की शेक्सपियर. दर्जा, मूळ आशय या बाजूने नाही म्हणत, पण भाषा-संस्कृती म्हटली की त्या भाषेचं काम केलेला माणूस कोणालाही पहिला आठवेल. पण यांना हे काय आठवतंय!
हे फार वाढवत नेणं महत्त्वाचं असलं तरी हा आपल्या नोंदीचा उद्देश नाही.

साडेचार
आपल्या नोंदींचा उद्देश आहे, तो केतकर मराठीत एवढं वेगळं आणि इंग्रजीत एवढं वेगळं का बोलतात?
आणि हा विरोधाभास तपासला का जात नाही? केतकर जे मराठी चॅनलवर बोलले ते सर्वसामान्य म्हणवल्या जाणाऱ्या मराठी माणसांनी ऐकलं. शिवाजी पार्कवर जमलेल्या लाखो लोकांपैकी बहुतेक लोकांना मराठी येतं, ते 'फोर्ब्स' किंवा 'तेहेलका' वाचत नाहीत. यावर आता कोणी असंही म्हणेल- केतकर तसलेच आहेत. पण मग आपण कसले आहोत?

'रेघे'वरची या पूर्वीची नोंद होती, त्यात इंग्रजी माध्यमांमधले बदल, त्यात नक्की काय चाललंय, सध्याची परिस्थिती काय आहे, माध्यमांची जी अवस्था आहे ती तशी का आहे, याबद्दल काहीतरी बोललं जातंय आणि तेही इंग्रजी भाषेतच, याबद्दल लिहिलं होतं. 'न्यूयॉर्कर' अमेरिकेतलं आहे, ते जरा बाजूला ठेवू. पण 'कॅरव्हॅन' किंवा 'तेहेलका'मधे किमान ह्या गोष्टींची दुसरी बाजू मांडली गेली. ढोंगीपणाबद्दल लिहिलं गेलं. शिवाय काही वेबसाईटींवरही अशी बाजू, तपासणी, चर्चा हे होतं. एक किमान पातळी सांभाळून हे होऊ शकतं. मराठीत असा विचार करणारे लोक आहेत, पण तरी मराठीत असं का होत नाही?

एकदम खालच्या थराला येऊन शिव्या घालणं किंवा मग गॉसिपच्या पातळीवर पेपरांच्या आतल्या बातम्या पत्रकारांच्या रोचक चर्चांपुरत्या देत राहाणं - या पलीकडे मराठीत थेट सवाल का विचारले जात नाहीत? सोशल नेटवर्किंगचा एवढा गवगवा होतोय, ब्लॉग आदी गोष्टी आहेत, पण एक चोख प्रश्न विचारायचं छापील किंवा ऑनलाईन व्यासपीठ मराठीत का नाही?

याची काय उत्तरं असतील. 
एक, आर्थिकदृष्ट्या मराठी ही वर्षानुवर्षं खंगलेली भाषा आहे.
दोन, आदरबिदर, मैत्रीबित्री, हितसंबंधबितसंबंध, असंच आहे ओ हे, सगळीकडे असंच असतं - अशी काही कारणं असतील.
उत्तरं माहीत नाहीत, पण ह्यामुळे किंमत कमी होते एकूणच सगळ्या बोलण्याची.
निखळ पातळीवर विरोध होईल इतपत माध्यमं सक्षम हवीत, ती नाहीत - असं आहे? की
निखळ पातळी म्हणजे काय, निखळ पातळीवर विरोध म्हणजे काय, हे आपल्याला माहीत नाही?
***

पाच

राडा - भाऊ पाध्ये
किंमत- १५० रुपये

क्लिक
ब्लर्बवरून-
१९७५ साली अलिबागमधून प्रकाशित झालेली ही कादंबरी वाचकांपुढे येण्यापूर्वीच शिवसेनेने तिची गळचेपी केली. हा सगळा प्रकार भाऊ पाध्यांनी एका लेखात नोंदवून ठेवला आहे - ''असं समजलं की प्रकाशकाला शिवसेनेच्या मंडळींकडून दम बसला होता आणि त्यामुळे त्याने 'राडा'च्या प्रती बाजारात विकायला काढल्या नाहीत. हीपण एक सेन्सॉरशिपच आहे. अर्थात माझ्यासाठी कोण आवाज उठवणार म्हणा.''

***करविली तैसी केली कटकट।
वाकडे की नीट देव जाणे।।
- तुकाराम
***

Wednesday 12 December 2012

बाहेर आलेली पेस्ट आता परत ट्यूबमधे कशी घालणार?

'न्यूयॉर्कर'मधून
'न्यूयॉर्कर'ने ऑक्टोबर महिन्यात 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या जैन बंधूंवर लेख प्रसिद्ध केला, त्यात 'आऊटलूक'चे आताचे संपादक कृष्ण प्रसाद यांचं एक विधान दिलंय- 'टूथपेस्ट आता बाहेर आलेली आहे, ती परत आत घालता येणार नाही.'

त्यांच्या या विधानाची पार्श्वभूमी समजण्यासाठी 'न्यूयॉर्कर'मधला पूर्ण लेख वाचावा लागेल.

समीर जैन फार बोलत नाही उघडपणे, पण विनीत जैनांनी त्यात एक विधान केलंय ते असं - 'आम्ही बातम्यांच्या व्यवसायात नाही, तर जाहिरातींच्या व्यवसायात आहोत.'

जैनांनी हे उघडपणे मान्य केलं.

याबद्दल आपण काही वेगळं बोलावं असं नाही. कृष्णप्रसाद यांनी त्यात असंही म्हटलंय की, 'प्रत्येक स्पर्धक सुरुवातीला त्रागा करतो, चिडतो आणि नंतर तेच स्वीकारतो. भाषा कुठलीही असो, भारतीय (माध्यमांच्या) बाजारातल्या प्रत्येकाकडे खूपच कमी पर्याय उरलेत.'

कॅरव्हॅन : कव्हर
'न्यूयॉर्कर'नंतर डिसेंबरमधे 'कॅरव्हॅन'नंही 'मिडिया इश्यू' काढला. त्यातही 'टाईम्स नाऊ'च्या अर्णव गोस्वामींवरच्या कव्हर-स्टोरीबरोबरच, समीर जैन यांच्याबद्दल लेख आहेच. यात गोस्वामींसोबत काम केलेल्या एका संपादकीय सहकाऱ्याने म्हटलंय, 'त्यांना बातम्यांपेक्षा टीव्हीची समज जास्त आहे. दूरचित्रवाणी माध्यमात काय चांगलं ठरेल याची ती समज आहे.' यात असंही एकाचं म्हणणं दिलंय की , 'आता इंग्रजी बातम्यांच्या वाहिन्या पाहा. हळूहळू सगळ्याच 'टाइम्स नाऊ'सारख्या दिसायला लागल्यात.'

जैनांना टाळून पुढे जाता येणार नाही, कारण त्यांच्यामागोमागच इतरांना जावं लागतंय अशी परिस्थिती आहे - हे बहुतेकांनी काढलेलं सार आहे.

'तेहेलका'मधून
झी-जिंदाल प्रकरणाच्या निमित्ताने 'तेहेलका'नेही माध्यमांच्या ह्या घडामोडींसंबंधी कव्हर-स्टोरी केली. जिंदाल यांच्या कोळशाच्या खाणींसंबंधीच्या कथित गैरव्यवहारावर बातम्या प्रसिद्ध न करण्यासाठी झी टीव्हीच्या संपादकांनी जिंदालबरोबर जाहिरातींच्या नावाखाली आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. जिंदालनी छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या व्यवहार उघडकीस आणला. या व्यवहाराच्या दोन्ही बाजू काळ्याच असल्यामुळे सगळंच अवघड.

यात 'तेहेलका'च्या व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी म्हणतात, 'या प्रकरणावरून बेडकाची एक जुनी रूपककथा आठवते. आपण ज्या पाण्यात पोहतोय, ते संथपणे गरम होतंय याचं भान ठेवलं नाही तर एक वेळ अशी येते जेव्हा आपण पूर्णच भाजून गेलेलो असतो.'

'तेहेलकात'ल्या लेखामधे 'एनडीटीव्ही इंडिया'चे व्यवस्थापकीय संपादक रवीश कुमार यांचं विधान दिलंय- 'या प्रकरणाकडे आपण कसं पाहातो तो मुद्दा नाहीये, तर या प्रकरणानंतर लोक आता आपल्याकडे कसं पाहातायंत हा खरा मुद्दा आहे. पत्रकारितेवर हा आणखी एक काळिमा फासला गेलाय. आधीपासूनच सुरू असलेल्या कुप्रसिद्धीमध्ये याने भरच पडणार आहे. आपण आपल्या 'कन्टेट'मुळे तशीही विश्वासार्हता गमावतो आहोतच. अशा प्रकरणांनी तर आपण पूर्णच उद्ध्वस्त होऊ.'

ही नोंद आपण करतोय ते रवीश कुमारांनी जे उद्ध्वस्तपणाचं म्हटलंय, त्याचा एक उल्लेख राहावा म्हणून. किमान त्याची नोंद करून ठेवावी म्हणून. काही तात्कालिक संदर्भ असतात, त्यापलीकडे जाऊन जी खोलातली म्हणता येतील अशी विधानं आहेत ती आपण इथे नोंदवली. नोंदीत उल्लेख केलेले लेख मुळातून ज्यांनी वाचले असतील त्यांना आणि जे आता वाचतील त्यांना एक प्रश्न : पेस्ट पुन्हा ट्यूबमधे कशी घालायची ते कोणाला माहितेय का?

Monday 10 December 2012

दिलीप चित्रे : तीन वर्षं

दिलीप चित्रे
दिलीप पुरुषोत्तम चित्रे गेले त्याला आजच्या १० डिसेंबरला तीन वर्षं होतायंत. त्यांची आठवण ठेवायला हवी. काय करता येईल, तर सरळ त्यांच्याच तीन कविता देऊ -


एक माणूस
माणूस (फोटो : रेघ)

एक माणूस
रडण्याऐवजी चालत जातो पायाखाली येतील ते रस्ते
त्याच्या प्रत्येक पावलाएवढा अश्रू सांडतो एकेक रस्त्यावर.
एक माणूस...
दुःख झालं तर बडबडतो भलतंसलतंच
शब्दाने शब्द वाढवतो
एक माणूस
त्याच्या गळ्यातला विचार येत नाही कधीच जिभेवर..
एक माणूस
हसण्याऐवजी फक्त जोरात श्वास घेतो
भोवताली सर्वत्र हास्यध्वनी पसरतो
हादरतात इमारती, रस्ते गडाबडा लोळतात,
थरथरायला लागतं आकाश...
पण त्याच्या पोटातला धरणीकंप
तोंडावाटे पडत नाही कधीच बाहेर...
एक माणूस
वर्षानुवर्ष व्यवहार करतो झोपेतल्या झोपेत
क्वचित जागा होतो
आणि उन्हं घट्ट होतात त्याच्या चेहऱ्यावर.

पान २८६
***

विहीर

कोणी म्हणतात ही विहीर
आणि तसंही असेल.
मी आत डोकावलेलो नाही.
मी पाण्याचा आवाज
ऐकलेला नाही.
कसा असतो पाण्याचा आवाज?
पाण्यासारखाच का?
कदाचित् ही सुकलेली विहीर आहे.
आणि असेलही.
सुकलेल्या विहिरीतही आवाज घुमतो
आत वाकून हाक घालणाऱ्यांचा.
खडक (फोटो : रेघ)
पण मी आत वाकून
हाक घातलेलीच नाही.
कशी असते आत वाकून घातलेली हाक?
हाकेसारखीच का?
पाणी नाही. प्रतिध्वनी नाही.
रहाटाची कुरकुरसुद्धा नाही.
आणि तरीही मी कबूल करतो
की हीही विहीर असू शकेल
ही विहीर असेना का
मी हिच्याकडे पाठ करून बसलोय्.
खूप पूर्वीचं एक अंधुक आठवतं
की माझ्याच तहानेत खोलवर खणून
मी शोधून काढली होती
एक खरीखुरी विहीर.
हाकसुद्धा न घालता
मी स्वतःचा आवाज ऐकलाय् खडकांखाली.

पान ३२७
***

जन्मोजन्मी आम्ही

जन्मोजन्म आम्ही रचला अभंग
ओळी (फोटो : रेघ)
जगाचा वादंग सामावून

ना मोजल्या मात्रा चालताना यात्रा
असे आमरण व्याकरण

उठाठेव करा शब्दार्थाची तुम्ही
आम्ही ओळीतच पांगलेलो

मृदंगाशिवाय आम्ही दंगलेलो
विसरून सारी ताललय


पान ४१३
***

एकूण कविता-२ - मधून (पॉप्युलर प्रकाशन, आवृत्ती १९९५)
विजया चित्रे यांच्या परवानगीने या कविता इथे आहेत.
***

'रेडिफ'वर २००७मधे प्रसिध्द झालेली चित्र्यांची एक मुलाखत - पॉर्ट्रेट ऑफ अॅन आर्टिस्ट.

***