Thursday, 29 August 2013

तिसरी नोंद : र. धों. कर्वे व प्रसारमाध्यमं

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर आपण एक नोंद 'रेघे'वर केली. त्याला जोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकहितवादी यांच्या संदर्भात दुसरी नोंद केली. हे करण्यामागचं कारण संबंधित व्यक्तींची एकमेकांशी तुलना हे नसून आपल्या परिसरातली काही म्हणणी त्या निमित्ताने नोंदवावीत एवढंच. वास्तविक यात पाच नोंदी ठरवल्या होत्या, पण काही अडचणींमुळे तीनच नोंदी करता येणारेत. ही तिसरी. मुळात केवळ काही काळासाठीच्या बातम्यांपुरतंच एकूण म्हणणं मर्यादित ठरू नये आणि आधीच्या काळातले काही संदर्भही स्पष्ट व्हावेत म्हणून हे करायचं. यातली आजची नोंद रघुनाथ धोंडो कर्वे (१४ जानेवारी १८८२ - १४ ऑक्टोबर १९५३) यांच्याबद्दलची.

संततीनियमन, लैंगिक साक्षरता वगैरे गोष्टींसाठी आयुष्य घालवलेल्या र. धों. कर्वे यांच्याविषयीचे आठ खंड डॉ. अनंत देशमुख यांनी मेहनतीने तयार केले. 'पद्मगंधा प्रकाशना'ने हे खंड प्रकाशित केलेत. या खंडांमध्ये कर्व्यांचं देशमुखांनी लिहिलेलं चरित्र, कर्व्यांचे 'शारदेचे पत्र' सदरातले लेख, 'समाजस्वास्थ्य' या कर्व्यांच्या मासिकात इतरांनी लिहिलेले लेख, कर्व्यांचं स्वतःचं असंग्रहित लेखन - असे आणखी काही भाग पाडून र. धों. कर्वे यांचं एकूण काम संग्रहित करायचा प्रयत्न आहे. या खंडांची मदत आपल्याला झालेय.

दाभोलकरांच्या हत्येनंतर प्रसारमाध्यमांमध्ये 'पुरोगामी महाराष्ट्र' हे शब्द अनेकदा वापरले गेल्याचं तुमच्याही ऐकण्यात आलं असेल. पण शब्दांच्या निष्काळजीपणाचाच हा भाग असावा का? कारण, काही व्यक्तींनी विचार मांडले आणि ते समाजाने मांडू दिले इतपत पुरोगामीपणा सोडला तर एक समूह म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणता येईल का? आपल्याला तरी शंका वाटते. मुळात माध्यमांच्या बाजूने पाहिलं तरच ही शंका जास्त वाटते. कारण दाभोलकरांच्या अशा जाण्यानेच एकदम पुरोगामित्त्व आठवावं, अशी ही प्रसारमाध्यमांची परिस्थिती आहे. उदाहरणार्थ, एक अनुभव र. धों. कर्व्यांनाही आला होता आणि तो अजूनही आपल्याला माध्यमांकडे पाहिल्यावर वेगळ्या स्वरूपात येऊ शकतो. असा आहे पाहा कर्व्यांचा अनुभव (त्यांनी या अनुभवाचं शीर्षक दिलंय, 'सनातनी पत्रांचे सोवळे'):
(गुप्तरोगप्रतिबंधावरची एक व संततिनियमनावरची दुसरी अशा) माझ्या दोन इंग्रजी पुस्तिका फारशा खपल्या नाहीत. तेव्हा याच दोन विषयांवर स्वतंत्र मराठी पुस्तिका लिहिल्या. त्यांचा खप झाला. यामुळे टीकाही भरपूर झाली. केसरी, मासिक मनोरंजन वगैरे सोवळ्या पत्रांनी जाहिरातही घेतली नाही. संततिनियमनावरील पुस्तिकेकरिता ठोकळे 'मासिक मनोरंजन'ने करून दिले, परंतु पुस्तक छापण्याचे नाकारले. ते मुंबईवैभव छापखान्याने छापले. परंतु पुढे मासिक काढण्याची वेळ आली तेव्हा पहिल्या महिन्याच्या मजकुराने छापखान्याचे तेव्हाचे चालक कै. देवळे घाबरले. त्यांनी मला बोलावून सांगितले की, मला त्याता काही वाईट दिसते असे नाही; पण सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटी सार्वजनिक पैशांवर अवलंबून असल्यामुळे आम्हाला लोकमताचाही विचार करावा लागतो; तेव्हा आम्हाला हे छापता येणार नाही. पहिला अंक 'वैद्य ब्रदर्स'नी छापून दिला आणि नंतरचे अंक पॉप्युलर प्रिंटिंग प्रेसमध्ये छापले. 
(असंग्रहित र. धों. कर्वे, पान : पान ६३)
महाराष्ट्रातली प्रसारमाध्यमं ही अपवाद वगळता कशी होती किंवा अजून आहेत, असं म्हणता येईल? उत्तर अर्थातच आपापलं ठरवा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० रोजी 'मूकनायक' पाक्षिक सुरू केलं तेव्हा त्याची पैसे घेऊन जाहिरात छापायलाही 'केसरी'कडून नकार मिळाला होता. आंबेडकरांचं आणि र.धों.चं काम वेगवेगळं पण तरी कर्व्यांनाही 'केसरी'कडून हा अनुभव आलेला आहे. 'न. चिं. केळकरांचा अभिप्राय' अशा शीर्षकाखाली त्यांनी हा अनुभव सांगितलाय, तो असा :
प्रचारकार्यांत विरोधकांनी शक्य तितकी विघ्ने आणली. पण कित्येकांनी कळतनकळत मदतही केली. संततिनियमनावरील इंग्रजी पुस्तकाची जाहिरात श्री. रामानंद चातर्जी यांच्या 'मॉडर्न रिव्ह्यू'कडे पाठवता त्यांनी ती नाकारातून 'पुनः आमच्याकडे असे काही पाठवीत जाऊ नका', असे पत्र लिहिले. नंतर त्याच विषयावर मराठी पुस्तक लिहिल्यावर ते त्यांचेकडे अभिप्रायार्थ पाठवले आणि ते त्यांचे मराठी समीक्षक कै. आपटे यांचेकडे आले आणि त्यांनी अभिप्राय लिहिताना खूप विरुद्ध टीका केली. यामुळे पुस्तकाची फुकट जाहिरात झाली. पुण्याच्या केसरीनेही काहीसा असाच प्रकार केला. त्यांचेकडे जाहिरात पाठवली असता ती त्यांनी परत केली. तेव्हा मतभेद असला तरी जाहिरात घेण्यास का हरकत असावी असे पत्र श्री. न. चिं. केळकर यांस लिहून पुस्तकाची एक प्रतही पाठवली. यावर त्यांनी पुढील उत्तर लिहिले. एका नामांकित लेखकाचे त्या वेळचे विचार या दृष्टीने ते वाचनीय आहे.
स.न.वि.वि.
आपले पुस्तक वाचले. मर्यादित संतती असणे हे सर्वांना इष्ट असेच आहे. तथापि ग्राम्य शरीरधर्माप्रमाणे ग्राम्य विषयांची चर्चाहि खाजगी किंबहुना गुप्त रीतीनेच होणे योग्य होय. ग्राम्य याचा अर्थ त्याज्य किंवा निंद्य असा या ठिकाणी नाही, परंतु सार्वजनिक चर्चा करण्याचा हा विषय नव्हे. विशेषतः उपयांचे बाबतीत आपणही तसेच म्हणाल असे मला वाटते. अशा कामी खाजगी चर्चा, खाजगी उपदेश व खाजगी हस्तपत्रके काढणे हाच मार्ग श्रेयस्कर होय. याकरता आपले पुस्तकाची नुसती पोच देण्यापेक्षा मला अधिक काही करता येत नाही. याबद्दल वाईट वाटते. कळावे.
न. चिं. केळकर
तथापि आणखी थोडा पत्रव्यवहार होऊन शेवटी त्यांनी जाहिरात एकदा छापायला सांगितली आणि ऑफिसातून तीबद्दल बिल आले. यावर मी कळवले की जाहिरात महिन्यातून एकदा तरी यावी अशी इच्छा आहे आणि मी पाहिजे तर एका वर्षाचे देखील बिल आगाऊ देईन. त्यांचेकडून इतकेच उत्तर आले की 'पत्र पोचले, मजकूर समजला.' आणि जाहिरात पुन्हा छापली नाही. यानंतर बऱ्याच वर्षांनी याच 'ग्राम्य' विषयावर एका सार्वजनिक व्याख्यानाचे वेळी याच केळकरांनी अध्यक्षस्थान स्वीकारले होते हे पुष्कळांस माहीत असेल. यावरून तो विषय आता ग्राम्य राहिला नाही असे दिसते.
(असंग्रहित र. धों. कर्वे, पान : ५४-५५)
कर्व्यांचा जो अनुभव वरती दिला तो तेव्हाच्या प्रचंड खपाच्या 'केसरी' या वृत्तपत्राबद्दलचा. त्यावेळी संपादकीय सूत्रं सांभाळणारे न. चिं. केळकर यांच्या नावाने एक अख्खा रस्ता पुण्यातल्या दोन चौकांना जोडतो. काळ खूपच पुढे आलाय. प्रसारमाध्यमंही आहेत. बदल किती झालाय ते कसं तपासायचं? कारण शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचं निधन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दाभोलकर यांचा खून यांच्याबाबतीतलं प्रसारमाध्यमांचं वागणं कमी-अधिक प्रमाणात सारख्याच ऊर्जेने आणि सारख्याच ढोंगीपणाने होतं. आणि र. धों. कर्वे यांचं काय करायचं?

आपण या संदर्भात ज्या तीन नोंदी केल्या त्यात पहिली नोंद तात्कालिक घटनेबद्दल थोडं आपल्यापरीने काही अधिकची भर टाकणारी करायचा प्रयत्न केला. दुसरी नोंद तात्कालिक घटनेच्या वेळी मुबलक वापरात येणाऱ्या काही शब्दांचे अर्थ अधिक तपासण्याच्या दृष्टीने केली. तिसरी नोंद प्रसारमाध्यमांच्या वागण्यासंबंधी आणि 'पुरोगामी', 'विवेकवाद' अशा शब्दांचे अनेक वर्षांच्या घडामोडींनी तयार होणारे अर्थ आणखी स्पष्ट व्हावेत स्वतःपुरते म्हणून केली. थांबू.

जाता जाता- र. धों. कर्वे यांनी 'समाजस्वास्थ्य' नावाचं मासिक २७ वर्षं चालवलं. आपलं म्हणणं मांडणं, त्याचा प्रसार, हाच उद्देश. कर्वे गेले आणि या मासिकाचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला. त्या अंकाचा मजकूर त्यांनी एकत्र करून ठेवला होता, बाकीची तयारी झाली होती, म्हणून तो अंक येऊ शकला. पण कर्व्यांचं निधन आणि 'समाजस्वास्थ्य'चं निधन हे एकत्रच झालं.

पहिली आवृत्ती : १४ ऑक्टोबर २०१०

5 comments:

  1. अरे बाळा, तुझा अभ्यास (???) दिवसेंदिवस इतका कमालीचा वाढत चालला आहे की, तुझ्यापुढे नतमस्तकच व्हायला हवे तमाम महाराष्ट्राने! असे वाटू लागले आहे की, तू लवकरच जगातल्या सगळ्या व्यक्तींना निकालात काढशील. प्रसारमाध्यमांना तर तू म्हणतोस तशी अक्कल बहुधा कधीच नसावी. आणि तुझ्या प्रतिभासंपन्न प्रगाढ बुद्धीपुढे त्यांचा निभावही लागणार नाही. त्यामुळे त्यांना ढोंगी म्हणणे एवढेच पुरेसे नाही. अजून बरीच शेलकी विशेषणे तुला लावता येतील. सबंध जगात तूच तेवढी पुस्तकं वाचतोस आणि त्यांचा मतितार्थ तुलाच तेवढा कळतो, त्यामुळे इतरांना ते जमणार नाही. त्यांचा तो वकूबही नाही.
    तुला तुझ्या प्रगाढ अभ्यासातून वेळ मिळेल कि नाही याची कल्पना नाही, पण जर कधी मिळालाच तर आणि प्रसारमाध्यमातल्या लोकांची कधी चुकून कीव आली तर, प्रसारमाध्यमांच्या ढोंगीपणाचे पुरावे देता आले तर पाहा किंवा केसरी, केळकर, चतर्जी ज्या काळात काम करत होते, त्या काळातील समाज व्यवस्था कशी होती, समाज किती सुशिक्षित होता, बदलांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी कशी होती, त्यांच्यावर रूढी-परंपरा यांचा पगडा किती होता, असे प्रश्न कधी काळी तुझ्या मनात आले तर त्यांचा जरूर शोध घे. नाहीतरी तुझ्याएवढी पुस्तकं दुसरं कोणी वाचत नाहीच. जमलं तर पहा, आग्रह नाही, तशी प्राज्ञा आमच्यासारख्या मुर्ख पत्रकाराची असूही शकत नाही. नसेल जमत तर आहे तेच चालू ठेव. यातही मौज आहेच की!

    ReplyDelete
  2. Mahitipurn ani vachniy blog ahe. Hi nond hi avdali. Abhyaspurn ahech. Reghechya praytnache kautuk.

    ReplyDelete
  3. What else can be expected from KESARI which founder THE TILAK was not even in favor of giving education to Women and Dalits. For him educating Women & Dalits was 'loss of nationality' http://www.cwds.ac.in/OCPaper/EducatingWomen-Parimala.pdf

    Then it was mistake of R D Karve to approach such newspaper for his advertisement.

    ReplyDelete
  4. आपला लेख चांगला आहे. फक्त एक दुरुस्ती- केसरीचा उल्लेख दैनिक असा झाला आहे. केळकरांच्या काळात ते आठवड्यातून दोनदा (आणि बहुधा त्यानंतर ते तीनदा) प्रकाशित होत असे. जयंतराव टिळकांच्या संपादकीय कारकीर्दीत केसरी १९६० च्या दशकात दैनिक झाला.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आपल्या सूचनेनुसार दुरुस्तीची नोंद केली.

      Delete