Wednesday, 12 February 2014

अवघा रंग एक झाला, ये गोरे गोरे गाल

शाहरूख खानचा 'बाझीगर' नावाचा चित्रपट आलेला, मागे एकदम १९९३ साली. त्यात एक गाणं होतं, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, असं. यातले काळे डोळे नि गोरे गाल अपेक्षित होते ते काजोलचे.

हा चित्रपट ज्या वर्षी आला त्याच्या एक वर्ष आधीच भारतात परदेशी दूरचित्रवाणी वाहिन्याही दिसण्याची सोय नागरिकांना करून देण्यात आली. आणि मग त्या दशकामधे केबल टेलिव्हिजन भारतात फोफावला. असं सगळं फोफावताना जाहिरातीही फोफावत गेल्या. आणि मोठ्या पडद्यावरचे स्टार छोट्या पडद्यावर जाहिरातींमधून नि आता विविध कार्यक्रमांमधूनही दिसायला झाले.

'बाझीगर' येऊन गेल्याला आता वीस वर्षं उलटली. या काळात शाहरूख खान नि काजोल दोघांचं वयही जाहिरातींच्या संख्येसारखं वाढलंच साहजिकपणे. तर जिचे गोरे गोरे गाल अपेक्षित होते ती काजोल आता एक जाहिरात करते. ओले टोटल इफेक्स्ट्स क्रिमची.

या जाहिरातीत काजोलला किंवा जाहिरातीतल्या चेहऱ्याला एक महत्त्वाचा प्रश्न पडलाय- तरूण दिसण्याचा पर्याय स्वीकारावा की उजळ दिसण्याचा?

काजोल - तारुण्याच्या शोधात (छायाचित्र : ओले टोटल इफेक्ट्सच्या जाहिरातीतून कापलेला तुकडा)

आपण उगाच मराठीत प्रश्न लिहिला बहुतेक, कारण जाहिरातीतला प्रश्न इंग्रजीत आहे - लूकिंग यंगर ऑर लूकिंग फेअरर? म्हणजे एखादं क्रिम यंग बनवतं तर दुसरं फेअर, यातलं कुठलं स्वीकारू?

काजोल - उजळपणाच्या शोधात (छायाचित्र : डिट्टो)

पेहेले इन मे से एक चुनना पडता था, पर अब नही, थँक्स टू ओले'ज् न्यू टोटल इफेक्ट्स अँटी एजींग प्लस फेअरनेस क्रिम. फाइट साइन्स ऑफ एजींग अँड लूक फेअरर. यंगर लूकिंग अँड फेअरर लूकिंग स्किन. - असं जाहिरातीतला मागचा आवाज आपल्याला सांगतो.

आणि त्यानंतर जाता जाता काजोल म्हणते : चॉइस क्लिअर है!

जाहिरातीत प्रश्न असला तरी प्रश्नचिन्ह टाकलेलं नाहीये. खरं तर काजोलच्या चेहऱ्याकडे बघून यातला कुठलाच प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे, असंही आपल्याला वाटलं नव्हतं, पण तिला तसा प्रश्न पडलाय असं जाहिरातीत दाखवलंय. आणि तारुण्य नि उजळपणा या दोन्ही पर्यायांना एकाच ट्यूबमधे घालून देणारं हे 'ओले'चं क्रिम समोर असताना चॉइस क्लिअर है, असं सुंदर काजोल प्रेक्षकांना सांगते.

शाहरूख खान, 'इमामी क्रिम'सोबत
चॉइस म्हणजे आपण आहोत तसेच, म्हणजे काळे तर काळे, राहण्याचा मात्र नाहीये बरं का. किंवा तसा एका अर्थी चॉइस आहे, पण तो स्वीकारलात तर तुम्हाला हेटाळणी सहन करावी लागेल. हे पुन्हा शाहरूख खानच आपल्याला इमामी फेअर अँड हेन्ड्सम क्रिमच्या एका जाहिरातीत सांगतो. याच क्रिमच्या दुसऱ्या जाहिरातीत मग तो त्याच्या 'बादशाह' होण्यापर्यंतच्या प्रवासात त्याला या क्रिमने कशी साथ दिली हेही सांगतो. शिवाय मर्दों को चाहिये ज़्यादा, असं सांगत खास पुरुषांच्या त्वचेकरता बनलेलं हे क्रिम प्रेक्षकांपुढे सादर करतो. म्हणजे उगीच तुम्ही तुमच्या घरातल्या बायकांचं उजळपणाचं क्रिम वापरू नका, तुम्हाला हे वेगळं, खास तुमच्या चॉइससाठीचं क्रिम तयार केलेलं आहे असं पुरुष प्रेक्षकांना तो सांगतो.

मुळात आपला असा समज होता की, काजोल ही तशी आहे त्या रंगाची, थोडी गडद अशीच सुंदर दिसते. पण आपला तो काय समज नि आपली ती काय समज! तरी 'पॉप्युलर कल्चर' असं ज्याला अभ्यासक मंडळी म्हणतात त्यासंबंधीची ही नोंद आहे एवढं तरी आपल्याला निश्चित समजलंय. त्यामुळे अजून एक असाच पॉप्युलर विषय असतो ना राजकारण हा, त्या विषयातल्या एका व्यक्तीला आपण इथं सोबत आणलंय. आता हल्लीच्या राजकारणात पॉप्युलर न राहिलेली एक मृत व्यक्ती म्हणजे राममनोहर लोहिया. श्रीपाद केळकर यांनी अनुवादित नि संपादित केलेल्या 'ललित लेणी' (प्रेस्टिज प्रकाशन) या लोहियांच्या पुस्तकात 'रंग आणि सौंदर्य' अशा शीर्षकाचा एक लेख आहे, त्यात लोहिया म्हणतात :
''श्यामल वर्णाची नेहमीच उपेक्षा झाली आहे असे नव्हे. किमान हिंदुस्थानात तरी तसे झालेले नाही. संस्कृत साहित्यात कृष्णवर्णीय श्यामा सुंदर मानली आहे...

''भारतीय पुराणातील सर्वश्रेष्ठ स्त्री द्रौपदी सावळीच आहे. त्या द्रौपदीला कृष्णा असेही म्हणण्यात येते. तत्कालीन पुरुषी अहंकाराला तिचे पाच पती आणि शिवाय तिची एक किंवा दोन प्लेटॉनिक प्रेमप्रकरणे मान्य झाली नसावीत म्हणून तिची उपेक्षा झाली. शुचितेच्या प्रतिमा मानल्या गेलेल्या आणि शिवाय गौरवर्णाच्या अशा सीता-सावित्रीच भारतीय स्त्री-जातीच्या प्रतिनिधी मानल्या जातात. ही मान्यता अविचारीपणाची आहे. आणि त्यामुळे भारताच्या अन्य प्रातिनिधिक स्त्रियांच्यावर अन्याय झालेला आहे. भारतीय पौराणिक साहित्यातील, सावळी कृष्णा आणि घनश्याम कृष्णा ह्या दोघीही सर्वोत्कृष्ट सौंदर्य आणि सुगंध लाभलेली अशी अनुपम पुष्पे होत.

विशाल विश्वामधली पुराणात अथवा इतिहासात आपल्या सर्व समकालीन पुरुषांपेक्षा हजरजबाबी आणि ज्ञानी अशी द्रौपदी हीच बहुधा एकमेव स्त्री आहे. कृष्णाशी तिची तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण ही समयसूचक आणि बुद्धीमान स्त्री कृष्णाची मित्र, सहकारी आणि नायिका देखील होती-- कृष्ण आणि कृष्णा ही महाभारताची समान योग्यतेची नायक - नायिका होत. त्या दोघांच्या मैत्रीत संघर्षाची छाया देखील दिसत नाही. अशी ही कृष्णा म्हणजे द्रौपदी, सावळी होती.''
हे फक्त एक म्हणणं म्हणून आपण अतिशयच नम्रपणे इथे नोंदवूया, कारण इतिहासाबद्दल काही बोलताना फार आत्मविश्वासानं बोलण्यासारखी परिस्थिती नसते. किमान आपली तरी तशी स्थिती नाही. पण तरी-

तरी - वरच्या जाहिरातींमधून ज्या गोऱ्या गोऱ्या गालांची आस व्यक्त झाली त्या तुलनेत १९६७ साली वारलेल्या लोहियांचं म्हणणं वेगळं होतं. आता 'आम आदमी पार्टी'मधे असलेले योगेंद्र यादव यावर जास्त बोलू शकतील. लोहियांच्या जन्मशताब्दीनिमित्त २०१०मधे 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'ने एक विशेषांक काढला होता, असं अंधुक आठवलं नि त्यानुसार शोधल्यावर यादवांचा त्या अंकातला लेख सापडला. काही ना काही कमी-अधिक असतंच, पण तरी त्यातल्यात्यात-

आपण हे पॉप्युलर क्षेत्रातल्या गोष्टींचेच बिंदू जोडतोय म्हणून संख्येच्या दृष्टीनं खूप लोकांपर्यंत पोचणाऱ्या वर्तमानपत्रांपर्यंत यायलाच हवं. वर्तमानपत्रं (नि इतर नियतकालिकही) मुख्यत्त्वे जाहिरातींवर चालतात, आता ती अधिकाधिक जाहिरातींसारखीही चालायला लागल्येत. तर, आपण वर्तमानपत्रात येणाऱ्या जाहिरातींचा आपल्या नोंदीतल्या मुद्द्याशी संबंध आहे का पाहूया. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर उजव्या कोपऱ्यात साधारणपणे जाहिरात असतेच. काही दिवसांपूर्वीच एका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर शेजारी शेजारीच दोन अशा जाहिराती दिसल्या-


किती एकमेकांना पूरक आहेत ना जाहिराती. मराठी-इंग्रजी डिक्शनरीची जाहिरात रेघेवरच्या ह्या आधीच्या नोंदीला (जगात पुढे जाण्यासाठी इंग्रजीची गरज आहे.?!) जोडून पाहता येईल. आणि दुसरी जाहिरात आजच्या गोऱ्या गालांच्या नि रंगाच्या संदर्भात वाचता येईल. जाहिरातीचा स्क्रिन-शॉट थोडा अंधुक झालाय तांत्रिक अडचणीमुळे, त्यासाठी माफ करता आलं तर पाहा.

एवढी नोंद केल्यावर कोणी म्हणेल, ही नोंद आज का केली? याचं उत्तर परवा येणाऱ्या चौदा फेब्रुवारी रूपी 'व्हॅलेन्टाइन डे'च्या निमित्तात आहे. तेव्हा वरच्या दोन्ही जाहिरातींचा प्रत्यक्ष उपयोग आजूबाजूला दिसतो म्हणून ते निमित्त. मग कोणी म्हणेल परवाची नोंद आज बारा तारखेला का केली? तर त्याचं उत्तर बारा वाजलेत असं आहे.
***


अमेरिकेत स्त्रियांनाही सिगरेटींचे ग्राहक बनवण्याच्या हेतूनं १९२०च्या दशकात एका कंपनीनं एक जाहिरात मोहीम राबवली. त्या जाहिरातीत सिगरेट पिणाऱ्या स्त्रीचं चित्रं नि सोबत 'टॉर्चेस ऑफ फ्रिडम' अशी ओळ होती. ही जाहिरात मोहीम राबवलेला एडवर्ड बर्नेस नि त्याचं 'प्रॉपगॅन्डा' हे पुस्तक याबद्दल यापूर्वी रेघेवर नोंद झाली आहे. पुस्तक १९२८ साली प्रसिद्ध झालं होतं. आणि तेव्हा त्यात म्हटलेलं की, ''लाखो प्रतींचा खप असलेल्या वर्तमानपत्रांची व नियतकालिकांची वाढ आणि जाहिरातीचं आधुनिक तंत्र यामुळे उद्योजक आणि समाज यांच्यात व्यक्तिगत संबंध निर्माण होऊ घातलाय''. हे संबंध उद्योजकांनी आपल्या सोयीसाठी कसे वापरायचे याचं मार्गदर्शन बर्नेसनं केलं. त्या मार्गदर्शनाचं प्रत्यक्ष रूप लोकांशी व्यक्तिगत संवाद साधू पाहणाऱ्या वरच्या हिरो-हिरोयनींच्या चेहऱ्यात दिसेल कदाचित.
***


अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।।
मी तूं पण गेलें वायां । पाहतां पंढरीच्या राया ।।
नाहीं भेदाचें ते काम । पळोनी गेले क्रोध काम ।।
देहीं अनुनी तूं विदेही । सदा समाधिस्थ पाही ।।
पाहते पाहणें गेलें दुरी । म्हणे चोख्याची महारी ।।
- सोयराबाई

(स. भा. कदम संपादित 'श्री संत चोखामेळा : चरित्र व अभंग' या पुस्तकातून. शब्दालय प्रकाशन)

No comments:

Post a Comment