स्पर्धा-परीक्षांच्या संदर्भात ऑगस्ट २०१२मध्ये लिहिलेला एक वार्तालेख खाली दिला आहे. स्पर्धा-परीक्षांसाठी पुण्यात आलेली विविध ठिकाणची मुलंमुली, स्पर्धा-परीक्षांचे क्लास घेणाऱ्या काही संस्थांमधील शिक्षक, संस्थाचालक, विद्यापीठातले काही प्राध्यापक, अधिकारी झालेली काही मंडळी, यांच्याशी बोलून या घडामोडींचं, त्यासंबंधी व्यक्त होणाऱ्या मतमतांतरांचं काहीएक चित्र उभं करायचा हा प्रयत्न होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या, पण पदनियुक्ती लांबलेल्या एका चोवीस वर्षीय तरुणाने काही दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केली. या सर्व करुण अवकाशात काहीच बदल झालेला दिसत नाही, त्यामुळे हा नऊ वर्षांपूर्वीचा वार्तालेख इथे (थोड्या संपादित स्वरूपात) नोंदवला आहे.
०
महादेव. वय वर्षं सव्वीस. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय. महादेव रोज सकाळी दहाच्या सुमारास सांगवीहून पुणे विद्यापीठाच्या (आता- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) जयकर ग्रंथालयात अभ्यासाला येतो. संध्याकाळपर्यंत तो तिथेच असतो, आणि संध्याकाळी पुन्हा बस पकडून एकूण अर्ध्याएक तासाचा प्रवास करून सांगवीला चुलत भावाच्या फ्लॅटमध्ये पोचलेला असतो. सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण भावाच्या घरी होतं. बाकी उरलेला दिवस तो विद्यापीठाच्या आवारात असतो. गेल्या दहा जूनला त्याने महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची (एम.पी.एस.सी.) पूर्वपरीक्षा पहिल्यांदा दिलीय. यापूर्वी त्याने पोलिस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) आणि विक्रीकर निरीक्षक (एस.टी.आय.) या पदांसाठी प्रत्येकी एक-एक प्रयत्न केला होता.
मूळचा भीमाशंकरचा असलेल्या महादेवचा स्पर्धा परीक्षांच्या जगाशी संबंध आल्याला पाच वर्षं झाली. २००७ मध्ये त्याने पत्रकारितेतल्या एम.एच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यादरम्यानच त्याला स्पर्धा परीक्षांसंबंधी माहिती मिळाली. एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी. (केंद्रीय लोकसेवा आयोग) या सर्व गोष्टींचा अंदाज येत गेला. यासंबंधी मार्गदर्शन करणारी मासिकं वाचनात आली, कुठे ना कुठे व्याख्यानंही ऐकली तेव्हा त्याला स्पर्धा परीक्षांचा नाद लागला, आणि तो अजूनही कायम आहे. हा नाद कशासाठी, असं महादेवला विचारलं तेव्हा तो म्हणाला, लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे (एम.पी.एस.सीच्या माध्यमातून मिळालेल्या पहिल्या वर्गातील पदांमुळे) बदलतो. शिवाय आपल्या हातून काही विधायक कामं घडू शकतात.
खरं तर स्पर्धा परीक्षा का करतोयस असा थेट प्रश्न विचारला तर महादेवची पहिली प्रतिक्रिया गोंधळलेलीच असते. मग थोडं सावरल्यावर तो लोकांचा दृष्टिकोन बदलतो, वगैरे उल्लेख करतो. पण त्याच्या बोलण्यातील अडखळण्यावरून ही कारणं तितकीशी पुरेशी नाहीयेत असं जाणवतं. कारण महादेवने पत्रकारितेतल्या एम.ए.नंतर पुण्यातच एम.बी.ए. केलं आणि एल.आय.सी.त त्याला २०१०च्या मध्यात नोकरीही मिळाली होती. ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची नोकरी होती, तरीही त्यामुळे थोडी तरी आर्थिक स्थिरता त्याला आली होतीच. पण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासाला पूर्ण वेळ मिळावा म्हणून त्याने ही नोकरी सोडून दिली.
महादेवच्या या प्रवासात खूप खाचखळगे आहेत. पत्रकारितेच्या कोर्सनंतर त्याने एका राज्यस्तरीय वर्तमानपत्राच्या पुणे आवृत्तीत शिकाऊ बातमीदार म्हणून साधारण वर्षभर काम केलं. तिथे त्याला महिन्याला पंधराशे रुपये मिळायचे. एवढ्या पैशात अर्थातच किमान गरजाही भागू शकत नाहीत. शिवाय पुढे इतर कुठल्या वर्तमानपत्रात नोकरी मिळाली तरी पगाराचा आकडा सुरुवातीला तरी तोकडाच असणार हे त्याच्या लक्षात आलं, म्हणून त्याने एम.बी.ए. करायचं ठरवलं. पत्रकारितेच्या कोर्सवेळी महादेव सांगवीला भावाकडेच राहायचा, नंतर एम.बी.ए.च्या वेळी तो हडपसरला एका शासकीय वसतिगृहात राहायला गेला. आणि आता एल.आय.सी.तली नोकरी सोडून तो परत सांगवीला राहायला गेलाय.
महादेवच्या घरी शेती आहे, पण कुटुंबातील तिघा-चौघांच्या वाट्याला आहे केवळ दहा-बारा एकर जमीन. कुटुंबातील सर्व जण शेतीवर उदरनिर्वाह करू शकतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे महादेवला वेळीच स्थिर होऊन आर्थिक कमाई करणं भाग आहे. सध्या तो भावाकडेच राहत असल्यामुळे जेवणा-खाण्याचा खर्च नाही. अशा परिस्थितीत आणखी सात-आठ महिने नोकरी न करता फक्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याची मुभा त्यानेच स्वतःला दिलेली आहे. या सात-आठ महिन्यांत त्या बाबतीत काही प्रगती झाली नाही तर त्याला कुठे तरी नोकरी करणं भाग आहे. मुळात दोन कोर्स केलेले असताना, शिवाय एक बऱ्यापैकी नोकरी मिळालेली असताना हे सर्व सोडून त्याला प्रशासनात जायची इच्छा का झाली असेल? त्यावर खाजगी क्षेत्रापेक्षा सरकारी नोकरी असणं मला महत्त्वाचं वाटतं असं महादेव सांगतो. सरकारी नोकरी, त्यातही प्रशासकीय सेवेमध्ये काही प्रमाणात सत्तेशी जवळीक होणं, त्यामुळे लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं, अशा गोष्टी महादेवला स्पर्धा परीक्षांच्या शर्यतीत धावायला प्रवृत्त करतायत असं दिसतं.
महादेवसारखी हजारो मुलं आज पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांच्या शर्यतीत धावतायत. वर्षाकाठी ही संख्या वाढतच जाताना दिसते आहे. पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी वीस-पंचवीस टक्के विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात येत असतात, असा अंदाज स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेच्या कारभारातील एकाने दिला. त्यामुळे गेल्या पंधराएक वर्षांत स्पर्धा परीक्षांसाठीच्या क्लासची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. स्पर्धा परीक्षांच्या या सर्व व्यवहारात मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांच्या बाजूने आणि मुलांच्या बाजूनेही आर्थिक गणितं मोठी आहेत. यू.पी.एस.सी.ची पूर्वपरीक्षा ते मुलाखतीपर्यंतची संपूर्ण तयारी करायची तर कोर्सच्या फीपोटी करावा लागणारा खर्च साधारण लाखभर रुपयांच्या घरात जातो, तर एम.पी.एस.सी.साठी हाच खर्च साधारण साठ हजार रुपयांच्या आसपास जातो. यात आवश्यक पुस्तकांची, राहण्या-खाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची भर वेगळी.
हा खर्च नक्कीच कमी नाहीये आणि स्पर्धा परीक्षांसाठी येणारी सगळीच मुलं आर्थिक सुबत्ता असलेली नाहीयेत. किंबहुना राज्याच्या ग्रामीण भागांतून, अभावग्रस्त परिस्थितीतून संघर्ष करत अनेक मुलंमुली इथपर्यंत पोचली आहेत. या स्पर्धेत उतरण्यामागची नेमकी प्रेरणा काय?
देश घडवण्याचा मार्ग म्हणून प्रशासकीय सेवांकडे पाहणारीही मंडळी आहेत. देश घडवण्याचं तर दूरच, पण किमान गरजा भागवणारी नोकरी मिळवणं तरी स्पर्धा परीक्षांच्या शर्यतीत उतरलेल्यांना शक्य होतंय का? आपल्याकडच्या शिक्षणव्यवस्थेचा नकारात्मक परिणाम म्हणून तर स्पर्धा परीक्षांचा हा उद्योग वाढीला लागलेला नाही ना? असे काही प्रश्न या विषयाशी संबंधित असलेल्यांशी चर्चा करताना, त्यात गुंतलेल्या मुलांशी बोलताना उभे राहिले. केंद्रीय आणि राज्य प्रशासकीय सेवेतील अधिकारीपदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या तरुण-तरुणींचे फोटो आणि त्यासंबंधीच्या बातम्या गेल्या काही वर्षांत मराठी वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध होताना दिसतात. यशाचा जल्लोष साहजिकच आहे; पण या जल्लोषात कित्येक अपयशांकडे डोळेझाक केली जातेय.
तीन वर्षांपूर्वी जालन्याहून पुण्याला आलेल्या सुरेश शिंदेचं उदाहरणही स्पर्धा परीक्षांच्या शर्यतीची दयनीय बाजू दाखवणारं आहे. सुरेश आता जालन्याला परत गेलाय. त्याच्यावर मानसोपचार सुरू आहेत. सुरेश पुण्यात आला तोच मुळी राज्यशास्त्रात एम.ए. करायच्या माफक उद्देशाने. त्याच दरम्यान त्याला स्पर्धा परीक्षांसंबंधी माहिती मिळाली आणि त्याने त्यासाठी तयारी सुरू केली. एका संस्थेत त्याने यू.पी.एस.सी.साठीचा क्लासही लावला. द हिंदू हे वर्तमानपत्र नियमितपणे वाचणं, जयकर ग्रंथालयात अभ्यास करणं असा तो स्पर्धा परीक्षांच्या साच्यात बसला खरा, पण त्याबरोबर त्याच्या डोक्यावर ताण यायलाही सुरुवात झाली. या काळात त्याने यू.पी.एस.सी.ची पूर्वपरीक्षा एकदा दिली, त्यात त्याला अपयश आलं. यात भर म्हणून आपल्यापेक्षा इतरांचा अभ्यास जास्त झालाय, अशी सततची भीती त्याला भंडावून सोडायला लागली. समवयीनांसोबतच्या तुलनेचा हा दबाव एवढा वाढला, की एम.ए.च्या दुसऱ्या वर्षात अनेकदा तो नुसता सुन्न बसून राहायचा. त्याचे जवळचे मित्र सांगतात, की मधेच कधी तरी तो बोलायचा आणि तेही आता अमुक एका पदाची जाहिरात निघालीय, त्याचा फॉर्म भरू का? मी आता काय करू? एवढीच वाक्यं. शेवटी सुरेशच्या प्राध्यापकांनी त्याला व त्याच्या घरच्यांना समजावलं आणि तो परत जालन्याला गेला. एम.ए.ची पदवी त्याच्या हातात आहे हे खरं, पण त्यापलीकडे आता भविष्यात काय होईल याबद्दल सध्या तरी काहीच स्पष्टता नाही. सुरेशच्या बाबतीत आणखी उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याला आय.ए.एस.च व्हायचं होतं. इतर कुठल्याही पदावर समाधान मानण्याची त्याची तयारी नव्हती. या सर्व अवाढव्य आकांक्षेचा बोजाच त्याला भारी पडला असावा, असं त्याला जवळून पाहिलेले त्याचे एक शिक्षक सांगतात.
आकांक्षा असणं किंवा स्वतःकडून काही अपेक्षा करणं, त्यासाठी जिवापाड प्रयत्न करणं यात काहीच गैर नाही. पण आपल्या अपेक्षा इतरांकडे बघून ठरवण्यापेक्षा आपल्या ताकदीवरच ठरवाव्यात आणि त्यातही अपयशाची शक्यता लक्षात घ्यायला हवी, हे सुरेशला काही प्रमाणात त्याच्या मित्रांनीही सुचवलं होतं; पण त्याला ते तेव्हा लक्षात आलं नाही. सुरेशचा अंदाज चुकला हे तर स्पष्ट आहे; पण एवढाच निष्कर्ष काढून आपण आपली सुटका करून घेऊ शकत नाही. मुळात हा अंदाज चुकण्याची कारणं आपल्या शिक्षणव्यवस्थेतच आहेत काय, हे जरा तपासायला लागेल. शिक्षण व्यवसायाभिमुख नसणं, त्यासाठी आवश्यक कौशल्यांचं ज्ञान नसणं यामुळे काही मर्यादितच पर्याय मुलांपुढे आहेत का? त्यातही काही विशिष्ट मार्गाला जाऊन मिळवलेलं यश म्हणजे सर्वस्व मिळवल्याचा भास उत्पन्न व्हावा अशी व्यवस्था आपल्याकडे लावली गेलीय का हेही तपासायला हवं.
स्पर्धा परीक्षांसारख्या क्षेत्रात एका दिवसात आयुष्य बदलण्याची शक्यता असते. आज कोणीच नसलेला माणूस एखाद्या परीक्षेच्या निकालाने अशा पदावर जाऊ शकतो की जिथे शंभर लोक त्याला सलाम करायला लागतात. त्यामुळे अशा बदलांबद्दलचं आकर्षण मोठ्या प्रमाणावर असतंच. पण हे बदल कधी होतील? जर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळालं तर! त्यामुळे सकारात्मक बदलांची जेवढी उदाहरणं आहेत त्यापेक्षा कित्येक पट जास्त उदाहरणं नकारात्मक बदलांचीच आहेत हे सुरेशच्या प्रकरणावरून दिसून येतं. याकडे लक्ष देण्याची व्यवस्था नसणं हे एका अर्थी या नकारात्मक बदलांमध्ये वाढ होण्यास अधिकाधिक कारणीभूत ठरत जाणार आहे.
सुरेशला बसला तसा मानसिक धक्का समीर सोनावणेला अजून बसलेला नाही, पण तो कदाचित त्या मार्गावर असू शकतो. सध्या पुण्याच्या उपनगरी भागात राहणाऱ्या समीरचे वडील सरकारी नोकरीत होते. भाड्याच्या घरात राहणाऱ्या सोनवणे कुटुंबात समीरपेक्षा धाकट्या तीन बहिणी आहेत. दोन वर्षांपूर्वी समीरच्या वडिलांना मोठा अपघात झाला, त्यात त्यांना वर्षभर घरातच काढावं लागलं. अशा अवस्थेत कुटुंब असलेल्या समीरला यू.पी.एस.सी.मध्ये आपल्याला यश मिळेल याची खात्री होती, ती गेल्या मे महिन्यात जवळपास संपुष्टात आली. आता त्याने पूर्वपरीक्षा चौथ्यांदा आणि शेवटची दिलीय.
सध्या समीरच्या हातात फक्त बी.कॉम.ची पदवी आहे आणि यू.पी.एस.सी.साठी दिलेल्या चार पूर्वपरीक्षांचा अनुभव. त्याला त्याचे मित्र सांगत आले, की एम.पी.एस.सी.लाही प्रयत्न करत राहा, पण समीरला आय.ए.एस.चं व्हायचं होतं. त्यासाठी त्याने पहिल्या पूर्वपरीक्षेच्या प्रयत्नानंतर दुसऱ्यासाठी जोरदार अभ्यास केला. त्यात अपयश. नंतर त्याने थेट दिल्लीत क्लास लावला आणि तिसरा प्रयत्न केला; त्यातही अपयश. आणि आता त्याने चौथा प्रयत्न केला. त्यातही अपयश येण्याचीच शक्यता दिसल्यानंतर आता समीरने एम.पी.एस.सी.साठीही प्रयत्न करायचं ठरवलंय. ती परीक्षा त्याने गेल्या १० जूनला पहिल्यांदा दिली. दिल्लीच्या क्लासची फी भरण्यासाठी समीरच्या वडिलांना जमीन गहाण ठेवावी लागलीय. दिल्लीत क्लास लावण्यामागे तिथे क्लास केला की स्पर्धा जिंकण्याची शक्यता वाढते ही समजूत होती, शिवाय घरच्या कटकटींपासून दूर जाण्याचा प्रयत्न जास्त होता. आता यू.पी.एस.सी.साठी अटेम्प्ट्सची मर्यादा संपलीय, त्यामुळे तो एम.पी.एस.सी.कडे वळलाय एवढंच.
समीरबद्दल बोलताना गेली सहा वर्षं त्याला ओळखणारी त्याची मैत्रीण म्हणाली, देश घडवणं म्हणजे नक्की काय याचा पुरता अंदाज नसताना कोणी केवळ भ्रामक समजुतीतून या स्पर्धेत उतरत असेल तर त्याने देश तर सोडाच, साधं एखादं घरही घडण्याऐवजी बिघडून जाण्याचीच शक्यता जास्त आहे. आम्ही समीरला खूप समजावत आलोय कायमच, पण तो अजूनही ऐकण्याच्या मूडमध्ये नाही. स्पर्धापरीक्षांच्या धुंदीतून तो बाहेर यायला तयारच नाहीये असं वाटतं. शेवटी अपयश स्वीकारत जाताना त्यातही कुठं थांबायचं ते कळलं पाहिजे, अशी जोड वकिलीच्या व्यवसायात असलेल्या समीरच्याच एका मित्राने दिली.
स्पर्धा परीक्षांच्या धुंदीच्या आहारी गेलेला समीर काही एकटाच नाहीये, अशा तरुण-तरुणींच्या झुंडीच्या झुंडी आहेत. ही धुंदी सांभाळणारी एक शैक्षणिक उपसंस्कृतीच खरं म्हणजे पुण्यात तयार झालेली आहे. पुण्याच्या शैक्षणिक बाजारपेठेत अनेक शैक्षणिक उपसंस्कृती आहेत. उरलेल्या महाराष्ट्रातून शहरात आलेल्यांमधल्या इंजिनियरिंग, मेडिकल या तुलनेने पारंपरिक क्षेत्रांचं राहू द्या, पण चार्टर्ड अकाउन्टट, एम.बी.ए., पत्रकारिता व इतर माध्यमं, स्पर्धा परीक्षा अशा वेगवेगळ्या गोष्टींशी संबंधित या उपसंस्कृती त्या त्या ठिकाणी फोफावलेल्या अगदी सहज दिसून येतील. कुठे ठरलेल्या अमृततुल्यांजवळ किंवा ठरलेल्या हॉटेलांमध्ये, ठरलेल्या क्लासध्ये, लायब्रऱ्यामध्ये, पुणे विद्यापीठात (आता- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) अशी या संस्कृतीची केंद्रं आहेत. स्पर्धा परीक्षांच्या उपसंस्कृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ठराविक साच्यांमध्ये स्वतःला बसवायचा प्रयत्न करणं. ज्यांनी यू.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. हे आपल्या अख्ख्या आयुष्याचंच ध्येय मानलंय अशांना हे साचे भुलवतात. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या बहुतेक संस्थांच्या कॅचलाइनमध्ये, ज्ञान (इंग्रजीतील नॉलेज या अर्थाने) हा शब्द वापरलेला असतो, शिवाय स्पर्धा परीक्षांपलीकडे जाऊन माणूस घडण्याची प्रक्रिया आपल्या अभ्यासक्रमांमधून होते, असाही सूर या संस्थांच्या जाहिरातींमधून- संस्थाचालकांच्या व्याख्यानांमधून उमटत असतो. पण वास्तवात हा सर्व खटाटोप माहितीचे साचे तयार करण्याचा आहे. या साच्याचा एक नमुना म्हणजे द हिंदू नावाचं इंग्रजी वर्तमानपत्र रोजच्या रोज न चुकता वाचलंच पाहिजे, या नियमाचा झालेला अनावश्यक गाजावाजा. असे आणखी नमुने स्टडीच्या वेळापत्रकात पाहायला मिळतात.
अभ्यासासाठी स्टडी लावणं हा एक म्हटलं तर आवश्यक पण अतिरेक केला तर व्यसनाच्या पातळीला जाऊ शकतो असा मुद्दा. स्पर्धा परीक्षांच्या शर्यतीसाठी पुण्यात आलेली बहुसंख्य मुलं महाराष्ट्राच्या ग्रामीण वा निमशहरी भागांतून आलेली, त्यामुळे कुठे भाड्याच्या खोलीत कॉट बेसिसवर किंवा कुठल्या तरी हॉस्टेलमध्ये राहणारी. अशा परिस्थितीत शांततेत अभ्यास करायचा कसा? शिवाय, बहुतेक ठिकाणी अडचणीतल्या खोल्यांमध्ये कॉटची मालकी ढेकणांची असते. खोलीतल्या वातावरणात अभ्यास होऊ शकत नाही. अभ्यासाला शांत वातावरण हवं म्हणून स्टडी लावणं भाग आहे. (स्पर्धा परीक्षेतील एका स्पर्धक मुलीने सांगितल्यानुसार तिचा स्टडी लावण्याचा एक उद्देशच ढेकणांपासून दूर जाणं हा होता!)
स्पर्धा परीक्षांची धुंदी कायम ठेवण्यात या स्टडी संस्कृतीचा हातभार मोठा आहे. या संस्कृतीचं प्रातिनिधिक चित्र असं-
- लवकर उठून, सकाळी सातला स्टडीत दाखल व्हायचं. मुळात आपल्या खोलीतून लवकरात लवकर बाहेर पडून जिथे सुखरूप असल्याची भावना मिळते त्या गर्दीत जाऊन सामील व्हायचं.
- सुरुवातीला पेपर चाळायचे नि मग सहकारी (आणि रुळलेल्या ग्रुपमधल्या) स्पर्धकांबरोबर विषयांची चर्चारूपी चाळणी करायची.
- चर्चांचं एक सत्र झाल्यानंतर साधारण नऊ-साडेनऊच्या दरम्यान सर्व (ग्रुपनुसार) स्पर्धक चहा-नाश्त्याला एकत्र बाहेर जातात.
- नंतर मग स्टडीत परत येऊन दोन तास अभ्यासाचा प्रयत्न होतो.
- पुन्हा साधारण साडेअकरा-बारापर्यंत सर्व (ग्रुपनुसार) स्पर्धक जेवणासाठी एकत्र बाहेर.
- जेवून परत आल्यावर अभ्यासाची आणि डुलकी लागण्याची सुरुवात एकत्र. याच दरम्यान अभ्यास.
- चार वाजत आले की पुन्हा सर्व स्पर्धक (ग्रुपनुसार) चहासाठी एकत्र बाहेर.
- चहावरून आल्यावर ताजंतवानं झाल्यानंतर पुन्हा अभ्यास.
- मग रात्रीच्या जेवणापर्यंत विचलित न होता अभ्यासाचा प्रयत्न.
- रात्री जेवणं वगैरे आटपून स्टडीचा शेवट. घड्याळाचे काटे अकरा-साडेअकरावर पोचलेले.
या सर्व वेळापत्रकात विविध विषयांवरच्या चर्चा हा अर्थातच महत्त्वाचा मुद्दा. स्पर्धक मंडळी प्रशासकीय सेवेचा भाग होणार असल्यामुळे राजकीय, सामाजिक, आंतरराष्ट्रीय अशा घडामोडींची दखल घेणं अपेक्षित असतं. मग आपण त्यासाठी प्राथमिक नि प्रामाणिक प्रयत्न करतोय की नाही यापेक्षा त्यातल्या चर्चा महत्त्वाच्या ठरतात. अशा घडामोडींशिवाय चर्चांचे विषय ठरतात ते या क्षेत्रातले आदर्श. कोणी आपल्याबरोबरच असलेला नि पहिल्याच अटेम्प्टला यशस्वी झालेला/झालेली किंवा सतत प्रसिद्धी झोतात राहिलेला एखादा पोलीस अधिकारी किंवा कोणी पूर्वी अधिकारी असताना धडाकेबाज काम केलेली व्यक्ती या सर्व गोष्टी आपल्या स्वप्नांना खतपाणी घालण्याचा भाग म्हणून चर्चेचे विषय होतात. (एका अतिप्रसिद्ध तरुण पोलिस अधिकाऱ्याच्या प्रेरणादायी भाषणांच्या क्लिप्स अनेकांच्या मोबाइलमध्ये असतात, हा त्याचाच भाग.)
वर्षभर चालणाऱ्या या वेळापत्रकात गावी जाण्याची वेळ टाळता येईल तितकी टाळत राहणाऱ्यांचं प्रमाण कमी नाही. हे वेळापत्रक म्हणजे एक व्यसन आहे. वेळापत्रक पाळणारे सर्वच त्यात गुरफटून गेले असतील असं नाही, पण गुरफटून जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काही काळ आणि आवश्यक तेवढाच स्टडीचा उपयोग करून एम.पी.एस.सी.त यश मिळवलेल्या महेश जाधवच्या म्हणण्यानुसार, त्याला त्याच्या आजूबाजूला नव्वद टक्के मंडळी या वेळापत्रकाच्या व्यसनात अडकलेलीच दिसत होती. कोण किती काळ यात अडकतो, त्याचा हवा तेवढाच उपयोग कसा करून घेतो आणि त्यातून कधी बाहेर पडतो यावरच बहुतेक गोष्टी अवलंबून असल्याचं तो सांगतो. मूळ उस्मानाबादमधल्या चिलवडी इथला असलेल्या महेशने अजून वयाची पंचविशीही गाठलेली नाही, पण इतक्यातच तो क्लास-वन अधिकारी झालेला आहे. ठराविक साच्याच्या आहारी न जाता आपल्याला हवा तेवढाच त्याचा वापर करणंच निर्णायक ठरू शकतं. आणि साचा म्हणजे केवळ स्टडीच्या बाबतीत नव्हे, पण एकूणच स्वतःकडून करायच्या अपेक्षांचेही साचे दुर्लक्षित करणंच बरं असतं. आपण कितपत अभ्यास करू शकतो, आपल्या आर्थिक, कौटुंबिक गरजा काय आहेत हे डोक्यात कायम असायला हवं, असं महेश सांगतो.
अशा साच्यांमध्ये गुरफटून गेल्याचं एक खास उदाहरण म्हणजे अठ्ठावीस वर्षांचा गोपाळ. शिरूरला चांगल्यापैकी शेती असलेला गोपाळ बी.ए.ला एका विषयात नापास झाला. मग उरलं रिकामं वर्ष. त्यात काय करायचं, तर एक भाऊ पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास, क्लास करत होता, तेच गोपाळनं जवळ केलं. नंतर तो पुण्यात आला. या गोष्टीलाही आता सातेक वर्षं झालीत.
पुण्यात आल्यानंतर त्याने पहिल्यांदा कॉन्स्टेबल पदासाठी पोलिस भरतीची परीक्षा दिली. दोन वर्षं हा अपयशी प्रयत्न झाल्यानंतर त्याने पी.एस.आय.साठी तीन अपयशी प्रयत्न केले. पी.एस.आय.बरोबरच एस.टी.आयसाठी प्रयत्न करणं शक्य असूनही त्याने ते केले नाहीत. कारण, आपल्याला पोलिसातच जायचंय, हे त्याने मनातून पक्कं केलं होतं. गावाकडे त्याचा भाऊ नि आई शेती करतात, गोपाळला पुण्याला खर्चासाठी पैसे पाठवतात. मध्यंतरी त्याचं लग्नसुद्धा झालं. बायकोचं लग्नावेळचं वय अठरा वर्षं. शिक्षण- बी.एस्सी.ची पहिल्या वर्षाची परीक्षा दिलेली. गोपाळने लग्नानंतर बायकोलासुद्धा एम.पी.एस.सी.च्या परीक्षेच्या अभ्यासाला जुंपलं. तिची अवस्था अशी, की तिचा स्पर्धा परीक्षा या गोष्टीशी नावापुरतासुद्धा संबंध नाही. पण आता हे नवरा-बायको मिळून हडपसरला खोली घेऊन अभ्यास करतात. राहण्या-खाण्याचा खर्च अजून तरी भागतोय तो गोपाळच्या गावाकडून आई नि भाऊ जे पैसे पाठवतील त्यावरच. हे कधीपर्यंत चालू राहणार, तर जोपर्यंत गोपाळची एम.पी.एस.सी.साठी प्रयत्न करण्याची वयोमर्यादा संपत नाही तोपर्यंतच कदाचित!
पुढे काय, याचा विचार गोपाळने केलेला नाही.
काय करायचंय याची काहीच स्पष्टता नसल्यामुळे आहे तेच जितका काळ सुरू ठेवता येईल तितका काळ सुरू ठेवणं ही अनेकांची गरज झालेली दिसते. याचंही एक कारण शिक्षणव्यवस्थेचा कमकुवतपणा हे आहे. राज्यशास्त्र, मराठी, इतिहास या विषयांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपुढे पुढे काय करायचं याचे रूढ पर्याय तुलनेने कमी आहेत. शिवाय आपल्या विषयाचा व्यावहारिक उपयोग जाणून त्याचा लाभ घेण्याची कौशल्यंही शिकवली जात नाहीत. इंग्रजी गरजेएवढी येत नाही, मराठी येत असली तरी त्याच्याशी निगडित संधी पुरेशा सापडत नाहीत अशी परिस्थिती दिसते. भाषेच्या सामाजिक-सांस्कृतिक बाजूबरोबरच तिच्या अस्तित्वाला आर्थिक कंगोरेही असतात; पण त्या बाजूनेही काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. शिवाय नेट-सेटच्या परीक्षा पास होऊन प्राध्यापकाची नोकरी शोधत असलेल्या कित्येक विद्यार्थ्यांकडे संबंधित संस्थाचालकांकडून लाखो रुपयांच्या डोनेशनची मागणी केली जाते. अशा वेळी तोही पर्याय बंद होतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा कलही जास्त आहे, असं सामाजिक शास्त्रांशी संबंधित प्राध्यापकांशी बोलताना लक्षात आलं. मुळात काही रूढ मार्गांपलीकडचे मार्ग चोखाळायचे असतील आणि त्यात टिकून स्वतःला सांभाळायचं असेल तर त्यासाठी आवश्यक माहिती, कौशल्यं मिळण्याची सोय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात फारशी नाहीच.
सामाजिक शास्त्रांच्या विद्यार्थ्यासमोर असलेले नोकरीचे मर्यादित पर्याय हा एक भाग झालाच. शिवाय, सामाजिक शास्त्रांबरोबरच इतरही विषयांमध्ये प्राध्यापकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकडे होणारी डोनेशनची मागणी किती गंभीर पातळीवर आलीय त्याचं एक उदाहरण तुळजापूरच्या जयराम शिंदेचं. जयरामने केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. केलं. त्यानंतर तो पहिल्या प्रयत्नात नेटही पास झाला आणि प्राध्यापकाच्या नोकरीसाठी शोधाशोध करू लागला. मराठवाड्यात त्याने जिथे जिथे नोकरीसाठी प्रयत्न केला तिथे तिथे त्याच्याकडे पंधरा-वीस लाख रुपये डोनेशनची मागणी करण्यात आली. आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्याला तेवढं डोनेशन देणं शक्यच नव्हतं. शेवटी या साऱ्या प्रकाराला कंटाळून आता तो पुन्हा पुण्यात आलाय नि आता पाषाण परिसरामध्ये एका खोलीत भाड्याने राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय.
जयरामच्या बाबतीत जी अपरिहार्यता दिसते ती अनेक अंशांनी स्पर्धा परीक्षांच्या या शर्यतीला कारणीभूत आहे. आपल्याला येत असलेल्या भाषेच्या साहाय्याने पुढे जाण्याच्या मर्यादित संधी असणं, पुढे जाण्याचे एकूणच कमी मार्ग उपलब्ध असणं या अपरिहार्यतांबरोबरच आणखी कोणती बाजू आहे या सर्व व्यवहाराला?
एकदा पुण्यात आलं की गावचं वास्तव भयाण वाटायला लागतं. तिथे संधींची कमीतरता तर असतेच, शिवाय दुरवस्थेतून बाहेर येण्याचा मार्ग शोधायचा तर इथेच तग धरून राहणं आवश्यक भासतं, असं निरीक्षण काहींनी नोंदवलं. अशा वेळी हाताशी काही तरी करायला हवं म्हणून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत राहण्याचा मार्ग अनेक जण पत्करतात. वय वाढत गेलं की मानसिक ताणही वाढत जातो आणि कोंडीत पकडलं गेल्यासारखी स्थिती होते. आणि अशा कोंडीत सापडलेल्यांच्या वर्तुळातच मग समाधान वाटू लागतं. हॉस्टेलचं वातावरण एका मर्यादेनंतर धुंदीत राहायला मदतीचं ठरल्यासारखं वाटायला लागतं. मित्र जवळचे असतातच, आणि त्यांची चांगल्या अर्थी मदत पण होते. पण एकदा कोंडीत सापडलेलेच एकत्र आले की मग ते फक्त समदुःखी असल्याने एक वेगळंच जग तयार होतं. त्यात वेगवेगळ्या शेरेबाजीमुळे समाधान मिळतं हे खरं असलं, तरी आपल्या वैयक्तिक आयुष्यात, कौटुंबिक परिस्थितीत मात्र काहीच सकारात्मक बदल होत नाही, उलट, ते अधिकाधिक गर्तेत अडकल्यासारखं होत जातं. या टप्प्यावर गोंधळलेल्यांना संयमित मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न काही शिक्षक मंडळी आपापल्या पातळीवर करत असतातच, पण सगळेच विद्यार्थी हे संयमितपणे समजून घेऊ शकतात असं नाही. अवाजवी मोहाला भुललेले कित्येक जण आयुष्यातला बराच काळ स्वतःविषयीच्या गैरसमजापायी वाया घालवताना दिसतात.
औरंगाबादचा हेमंत हे असंच मोहाच्या आहारी जाण्याचं अगदीच विचित्र उदाहरण. हेमंतने इंग्रीजीत एम.ए. केल्यानंतर बी.एड. केलं. शिक्षकाची नोकरी काही मिळू शकली नाही. घरची परिस्थिती अगदीच बिकट होती, त्यामुळे त्याला स्थिरस्थावर होण्यासाठी तातडीने नोकरीची गरज होती. शेवटी जालन्यालाच त्याला बस कंडक्टरची नोकरी मिळाली. एका अर्थी तो स्थिर झाला. त्याच दरम्यान त्याला पुण्यातल्या मित्राकडून स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली आणि आयुष्य बदलण्याची आशा निर्माण झाली. आपली आशा वास्तवात येण्यासाठी प्रयत्न करणं चुकीचं नव्हे; पण हेमंत सरळ नोकरी सोडून पुण्यात दाखल झाला. त्यानंतर त्याने एम.पी.एस.सी.चा क्लास केला, पाच वेळा पूर्वपरीक्षा दिली; पण त्याला यश काही मिळू शकलं नाही. गेली सुमारे सहा-सात वर्षं तो प्रशासकीय सेवेसाठीच्या परीक्षांच्या खटाटोपात होता. हे सततचं अपयश स्वीकारता स्वीकारता तो मानसिकदृष्ट्या ढासळत गेला आणि गेल्या सहा महिन्यांत त्याच्या विद्यापीठातल्या मित्राला तो दिसलेलाच नाही. तो कुठे गेला असेल याचाही अंदाज मित्राला नाही.
आपल्या प्रवासाची सूत्रं आपल्या हातात ठेवण्याऐवजी कुठल्या तरी साच्यात बसून आपलं गाडं भरकटवत नेणं भयानक आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता करता वय तीस वर्षांपुढे गेलं तरी हातात इतर नोकरीसाठी उपयोगी पडेल असं कोणतंच कौशल्य नाही, अशा अवस्थेत अडकलेले तरुण काय करत असतील? काही ना काही नोकरीधंदा तर ते करतातच. कोणी बँकांच्या परीक्षा देतात, कोणी पत्रकारितेत जातात, कोणी (जमतील तसे पैसे भरून) प्राध्यापकीत जातात, कोणी कॉल सेंटरला प्रयत्न करून पाहतात. काही जण आणखी काही वर्षं काढता येतील, या उद्देशाने पीएच.डी.ला नोंदणी करून ठेवतात. यातले काहीजण स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांमध्येच शिकवतानाही दिसतात.
जी कारणं स्पर्धा परीक्षांच्या शर्यतीत तरुणांना उतरण्याला प्रवृत्त करतात त्यातली बहुतेक तरुणींनाही लागू पडतातच. इतर अनेक क्षेत्रांसारखीच स्पर्धा परीक्षांच्या शर्यतीतही मुलींची संख्या साहजिकच कमी आहे. याचं एक मुख्य कारण असं दिसतं, की एका वयोमर्यादेनंतर लग्नाचा दबाव प्रचंड वाढल्याने त्या आपोआप या शर्यतीतून बाहेर पडतात.
शिल्पाने यू.पी.एस.सी.ची पूर्वपरीक्षा गेल्या वर्षी पहिल्यांदा दिली आणि त्यात तिला यश मिळालंही, पण पुढच्या मुख्य परीक्षेत मात्र ती अपयशी ठरली. आता या वर्षी तिने पूर्वपरीक्षा दुसऱ्यांदा दिलीय नि एम.ए.चं दुसरं वर्षही तिचं आताच संपलंय. शिल्पा म्हणते, एखादी मुलगी समजा प्रामाणिकपणे या स्पर्धेत उतरली असली, तरी एका ठराविक मर्यादेनंतर मुलगी असण्यामुळे येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव तिला आपोआप होत जाते. माझंच उदाहरण द्यायचं, तर यू.पी.एस.सी.च्या पहिल्या प्रयत्नावेळी मला तसं काही जाणवलं नाही, पण त्यातल्या अपयशानंतर आता मी दुसरा प्रयत्न केलाय तर हळूहळू नात्यातली ज्येष्ठ मंडळी सल्ले द्यायला पुढे सरसावलीयत. एम.पी.एस.सी.साठीही प्रयत्न करायला हवा, वय वाढतंय, असे मुद्दे जाणवून दिले जातायत.
शिल्पाने तिची मैत्रीण अमृताचंही उदाहरण दिलं. अमृता मूळची राजस्थानची. आर्थिक कटकटी तशा नाहीत, पण सामाजिक बंधनं फारच. अमृताचं लग्न तुलनेने लवकर झालं, पण नवरा तसा समजुतदार निघाल्याने ती स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकली. घरी डोक्यावर पदर घेऊन वावरणारी अमृता क्लासला जीन्स-टॉपमध्ये यायची, असं निरीक्षण शिल्पाने नोंदवलं. अमृता अभ्यास प्रामाणिकपणे करायची, त्यामुळे ती पी.एस.आय.च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवू शकली नि शारीरिक चाचणीसाठी तिची निवड झाली; पण नेमकी याच वेळी ती गरोदर राहिली. यानंतर तिचे स्पर्धा परीक्षांसंबंधीचे पुढचे मार्गच खुंटले.
मुलांच्या तुलनेत मुलींना स्वतःला सिद्ध करायची गरजही जास्त पडत असावी; पण त्यासाठी मुलींच्या हातात कालावधी मात्र मुलांच्या तुलनेने खूपच कमी असतो. स्वतःला सिद्ध करण्याबरोबरच कौटुंबिक चौकटीतून बाहेर येऊन मोकळी हवा मिळविण्याचा प्रयत्नही मुलींना स्पर्धा परीक्षांच्या शर्यतीत उतरवतो. गावांहून किंवा निमशहरी भागांतून स्पर्धा परीक्षांच्याच तयारीसाठी पुण्यात आलेल्या मुलींमध्ये मोकळीक मिळवणं हे एक महत्त्वाचं कारण असल्याचंही निरीक्षण नोंदवता येईल. पद मिळेल किंवा नाही, पण अभ्यासाची तीन-चार वर्षं मोकळीक तरी मिळवता येते, अशी भावनाही ऐकायला मिळाली.
वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर प्रसिद्ध होणाऱ्या प्रशासकीय सेवेच्या परीक्षांसंबंधीच्या यशोगाथा एकीकडे नि अपयशाच्या कथा दुसरीकडे. यातल्या दुसऱ्या गोष्टीचं वजन अर्थातच जास्त भरतं. अपयशी होण्यातही तशी काही चूक नाहीच, आणि त्यातूनही माणूस काही ना काही शिकत असतो, पुढे जात असतो, हे तर झालंच. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत मात्र अपयशाला आणखी काही बाजू आहेत. या शर्यतीत हातातून निसटणारा वेळ एवढा मोठा असतो आणि तो एवढ्या चटकन निघून जातो, की चूक समजून घेऊन पुन्हा उभं राहायची ताकद पण कमी होते नि पर्यायही कमी उरलेले असतात. मग आहे तीच परिस्थिती बरी वाटते. सकाळी बाहेर चहा-नाश्ता, मेसमध्ये जेवण, संध्याकाळी चहा, मग जेवण, अशी ती विचित्र धुंदीच असते. पण हळूहळू आपल्या आजूबाजूचे यातून बाहेर पडत गेल्यावर येणारा एकटेपणा झेपणं अशक्य होऊन बसतं.
मुळात आपली शिक्षणाची प्रक्रिया अशी आहे, की जगण्याची फार कमी कौशल्यं त्यातून हाती लागतात. अशा अवस्थेत एक तर चाकोरीतल्या मार्गांवरून पटकन चालत जात स्वतःला सांभाळणं हा एक पर्याय असतो. पण शेवटी प्रत्येक मार्गावरून किती लोक जाऊ शकतात याला मर्यादा पडतातच. कला, वाणिज्य, विज्ञान अशा कुठल्याही शाखेमधून पदवी घेतलेल्यांची संख्या आणि पुढे काय करायचं याच्या पर्यायांची संख्या यांचं प्रमाण अतिशय व्यस्त आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या शर्यतींना गर्दी होणं एका अर्थी साहजिक आहे. मिळाली एखादी सरकारी नोकरी तर मिळाली, या साध्या अपेक्षेनेही यात मुलं येतच राहणार. पण आय.ए.एस., आय.पी.एस किंवा तत्सम सत्तेच्या जवळ जाणारं पद हेच आयुष्यातलं एकमेव सर्वोच्च ठिकाण आहे, असा भ्रम या शर्यतीत उतरल्यावर होऊ लागला तर मात्र त्यातून मोठ्या भोवऱ्यात फसण्याची शक्यताच अधिक वाढत जाते. एकीकडे स्वत:ची आवड, कल, क्षमता लक्षात न घेता स्वत:वर लादून घेतलेली आकांक्षा स्पर्धा परीक्षांचं मोहाचं झाड उभं करते. आपल्या जीवनमानात तडकाफडकी काही अचाट सकारात्मक बदल होतील, अशी भाबडी आशाही अनेकांना वाटू लागते; पण यात कित्येकांची आयुष्यं विस्कटून जातात. या मोहाची नशा एकदा चढली की बाकीच्या गोष्टींचं आकलनच कमी होऊन जात असावं कदाचित.
आपल्याकडच्या शिक्षणव्यवस्थेची दुर्दशा जुनीच आहे. स्वतःची ताकद शक्य तितक्या लवकर ओळखण्याची व्यक्तीची गरज ही व्यवस्था पूर्ण करू शकत नाही. आपल्या ताकदीनुसार काय करता येईल याचा अंदाज, त्यासाठी आवश्यक कौशल्यं ही व्यवस्था देऊ शकत नाही. गोंधळलेल्यांना सावरण्याची यंत्रणा या व्यवस्थेत नाही. अशा या व्यवस्थेच्या ढासळलेल्या बाजूंमधूनच स्पर्धा परीक्षांसारख्या भुलवणाऱ्या शर्यतींना उमेदवार मिळत राहतात. कोणाला या शर्यतीतून यश मिळतंही; पण या शर्यतीसाठी आपण बनलेलो नाहीच, हे न समजलेल्यांना भानावर कसं आणायचं, हा प्रश्न यातून उभा राहताना दिसतो. (शर्यतीसाठी आपण बनलेलो नाही, यात काही कमतरता नाही. शर्यत या गोष्टीची मर्यादा समजून घेणं, अशा अर्थी). या प्रश्नाला अर्थातच स्पर्धा परीक्षांपलीकडच्याही बाजू आहेत. मुळातच तग धरून राहाण्यासाठीचे आवश्यक तितके पर्याय उपलब्ध नसणं, विशिष्ट पर्यायांना गैरवाजवी वलय मिळणं, इतर पर्याय तुच्छ लेखले जाणं, सामाजिक-सांस्कृतिक दृष्टिकोनांच्या उतरंडी, उत्पन्नातली मोठी तफावत, असा हा एक बहुआयामी प्रश्न यातून समोर येतो. या प्रश्नाचा विचार करणं गरजेचं वाटतं.
०००
(पूर्वप्रसिद्धी: अनुभव मासिक, ऑगस्ट २०१२. लेखात उल्लेख केलेल्या काही व्यक्तींची मूळ नावं बदललेली आहेत.)