Tuesday 31 July 2018

परत

गेल्या वर्षभरात इथं काहीच लिहिलं गेलेलं नाही. कारणं अनेक आहेत. सगळी नमूद करणं अशक्य. बहुधा तशी गरजही नाही. खासकरून माध्यमव्यवहाराविषयीच्या असमाधानातून या ब्लॉगची सुरुवात झाली. त्यात साहित्याविषयीचा रसही आपोआप मिसळून गेला होता. सुरुवातीपासूनच. हे सगळं पहिल्या नोंदीपासून इथं असं आहे. त्यात मग काही समकालीन घडामोडींचा मागोवा घेतला गेला. यातही बरेचदा वैयक्तिक रस/कल यांचाच संदर्भ होता. या घडामोडी कशा निवडल्या गेल्या, त्यांचा कितपत मागोवा ठेवला गेला, हा वेगळा विषय. साहित्याबाबत काही मंडळींविषयी दस्तावेजीकरण या सगळ्या काळात झालं. ते या पानावर कोपऱ्यात कायम दिसेल असं नोंदवलं आहे. हे साधारण २००९ पासून पुढच्या दोन-चार वर्षांमधलं काम आहे. त्या कामाविषयीचा सदर लेखकाचा दृष्टिकोनही बदलत गेला. पण काम झालं.

माध्यमव्यवहाराविषयी इथं जे काही लिहिलं गेलं ते काहींना बरं वाटलं, काहींना पटलं नाही. काहींनी चांगली मतं दिली, कुणी निबंध लिहून परिषदेत सादर करायला सांगितलं, कुणी इथल्या एखाद्-दुसऱ्या नोंदीला छापील माध्यमात पुन्हा प्रकाशित करण्याची विचारणा केली, कुणी शिव्याही घातल्या. तरी, एकूण मिळून माध्यमव्यवहाराचा थोडासा अदमास बांधण्याच्या दृष्टीनं काही नोंदी बऱ्या असाव्यात. यात थोडी पुनरुक्तीही झालेली जाणवतेय. ती काहीशी अपरिहार्य असेल, तरी धोकादायक पातळी ओलांडणारी नको, असंही वाटतं.

ब्लॉग लिहून वेळ का घालवायचा, हे इथं लिहिण्यापेक्षा फेसबुकवर टाकायचं ना, ब्लॉगचं फेसबुक खातं उघडून तिथं हे टाकलं तर जास्त लोकांपर्यंत पोचेल- अशा काही सूचना या सगळ्या काळात बहुतेकदा चांगल्या हेतूनं केल्या गेल्या. त्यावर पुरेसं स्पष्टीकरण असं देता येणार नाही. पण तरी काही नोंदवणं आवश्यक वाटतं.

ब्लॉगचे वाचक तुलनेनं कमी राहातात हे खरं. पण काही काळासाठी सुरू असलेल्या रेघेच्या फेसबुक खात्यालाही तसा प्रचंड प्रतिसाद होता, अशातला भाग नाही. रेघेवरच्या नोंदींची लिंक तेवढी तिथं टाकली जात होती, पण तरीही मित्रयादीतल्या अनेक जणांना ते माहिती व्हायचं नाही, असं त्यांच्या प्रतिक्रियेवरून कळतं. तरीही, काही जणांना तिथून या नोंदींची माहिती मिळतही असणारच. ते त्यांना अधिक सोयीचंही ठरलं असणारच. पण आता ते फेसबुक खातं नाही. इच्छुक वाचक स्वतंत्रपणे या ब्लॉगला अधूनमधून भेट देत असावेत, असं दिसतं. तर तसं आपापल्या इच्छेनुसार कुणी इथं यावं, वाटलं तर वाचावं- ही वाटही बरी आहे. कुणाला सोयीचं वाटलं, तर त्यांच्या इच्छेनुसार इथल्या नोंदी  मेलवर मिळाव्यात, अशी नोंदणीची तजवीजही समासात करून ठेवलेली आहे.

फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचं स्वरूप ब्लॉगपेक्षा वेगळं आहे. देवाणघेवाण/शेअरिंग हा शब्द सोपा वाटला, तरी त्याच्या पातळ्या बहुधा अगणित असतील. शिवाय आपलं अख्खं प्रोफाइल किंवा प्रोफाइल नावाची एक काल्पनिक गोष्ट रचणं, त्यात काही ढोबळ रंग भरणं किंवा त्या रंगांनुसार अभिव्यक्ती करणं, वैयक्तिक अनुभवाची एखादीच बाजू रंगवून सांगणं, एखाद्या विषयात आधी काही म्हटलं गेलंय याची जाणीवही न ठेवता ठामपणे मतं मांडणं, किंवा मतांची वा अभिव्यक्तीची स्पर्धा साधणं, लक्ष वेधून घेण्यासाठी विविध क्लृप्त्या साधणं, अवाजवी स्तुती- हे वेगळं काम असावं. फेसबुकसारख्या ठिकाणी फक्त हेच होतं असं अर्थातच नाही. (किंवा ब्लॉगांच्या अवकाशात असं होतच नाही, असंही नाही). तिथंही अनेक रंग असतातच. पण शेवटी अनेक प्रकारच्या गोष्टींची आणि माणसांची गर्दी अशा समाजमाध्यमांवर आपल्याला जाणवते. (कोणाला जाणवत नसेल, तर त्यांनी याकडं दुर्लक्ष करावं.) ब्लॉगची चौकट त्या तुलनेत थोडीफार स्वतंत्रपणे हाताळता येते. तत्काळ प्रतिसादाची अनाठायी सक्ती राहात नाही. वाचक असू नयेत, असा याचा अर्थ नव्हे. पण वाचक आपापल्या इच्छेनुसार इथंही येऊ शकतात. इच्छा नसेल तर न येण्याचं स्वातंत्र्य त्यांनाही राहातं.

किंवा त्याहून महत्त्वाचं म्हणजे- तांत्रिक पातळीवरती ब्लॉगवरची काही साधनं लेखनाला अधिक सोयीची आहेत. फॉन्ट, फोटोंची मांडणी, आपल्या इच्छेनुसार पार्श्वभूमीचा रंग ठरवणं, नोंदी सलगपणे साठवून ठेवणं, शब्दसंख्येची थोडी अधिक मोकळीक, लेखनाव्यतिरिक्त इतर गोष्टींची गर्दी (किमान या चौकटीपुरती) बाजूला ठेवण्याची शक्यता, अशा काही गोष्टी इथं साधता येतात. वाचकाचं लक्ष विचलित करणाऱ्या अगणित गोष्टी एकाच चौकटीत कोंबण्यापासून ब्लॉग थोडासा वेगळा राहू शकतो. समाजमाध्यमांवर एकाच वेळी अनेक गोष्टींची गर्दी असते. साहजिकपणे त्यातून वाचकही- किंवा प्रेक्षकही जास्त मिळतात. पण शेवटी गोष्टी वेगानं बदलत असल्याचं आपल्याला माहीत आहेच. त्यामुळं कशातच काही स्पष्टपणे बोलता येत नाही, अशी गतही अनेकांच्या अनुभवात असेल. पण आपापल्या माध्यमनिवडीचा आदर करायला तरी काय हरकत आहे? अनेकदा तसा आदर राखला जात नाही, असं वाटतं. बाजारपेठेनं क्रयवस्तूंचे असंख्य वाटावेत असे पर्याय समोर ठेवले, तशी निवडीची विचित्र सक्तीही केली का? अशी ही अदृश्य सक्ती आपल्या अनेकांच्या अनुभवात असेलच. तरीही आपण काहीतरी थोडीफार स्वतंत्र खटपट करू पाहातो. त्यात अपुरेपणाही जाणवत राहातो. त्या अपुरेपणाच्या जाणीवेतूनच रेघेची सुरुवात झालेली आहे. ती रेघ आपण अधेमधे थांबत चालवत राहिलोय. आता परत थोडी चालवेल तेवढी चालवू.