Wednesday, 1 May 2013

अक्षरांचा श्रम केला । र. कृ. जोशी

मी आत्ता हे लिहितोय त्यात माझ्यानंतर ('माझ्या'त माझं असेल तेवढं डोकं, हात हे सगळं आलं) काही महत्त्वाच्या गोष्टींचा हातभार आहे. हे 'कम्प्युटर' नावाचं यंत्र आणि वीज या दोन तशा महत्त्वाच्या गोष्टी. आणि आणखी एक महत्त्वाची आणि खरंतर माझ्यानंतर सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भाषा. आपण बोलतो ती भाषा आणि लिहितो ती लिपी, त्यामुळे आत्ताच्या संदर्भात ही लिपी. आणि आणखी खोलात जायचं तर आत्ताच्या संदर्भात आपण वापरतोय ती देवनागरी लिपी ज्या 'मंगल' नावाच्या फॉन्टमध्ये टाइप होतेय, तो फॉन्ट तयार करणारे र. कृ. जोशी. त्यामुळे मी आत्ता हे लिहितोय त्यात र. कृ. जोशी यांचाही हातभार आहे.

मंगला हे र.कृं.च्या पत्नीचं नाव आणि त्यांच्या नावावरून ज्याला नाव दिलं गेलं तो हा फॉन्ट त्यांनी 'मायक्रोसॉफ्ट'वाल्यांना बनवून दिला. ही माहिती आपल्याला माहिती नसली आणि जे लोक या फॉन्टचा वापर करतात त्यातल्या अनेकांना र.कृं.चं या मागचं कर्तृत्व माहीत नसलं तरी आपण त्या कर्तृत्वावर खूप गोष्टी करतोय, आणि त्यामुळेच आजच्या महाराष्ट्र दिनाच्या नावाखाली होणाऱ्या फुशारकी उत्सवात होणाऱ्या उरबडव्या गोष्टींपेक्षा आपण र.कृं.ची आठवण जागवूया. र.कृं.ची आठवण का? याचं एकच उत्तर कदाचित फॉन्टच्या निर्मितीतलं त्यांचं काम आपण सांगितलं तर मिळून जाईल. वास्तविक र.कृं.चं काम मराठीसोबतच सगळ्या भारतीय भाषांना लाभदायक ठरलेलं आहे. शिवाय, र.कृ. त्यापलीकडेही बरंच काही होते. त्यांचं हे सगळं काम नोंदवण्याएवढी माहिती आपण अजून 'रेघे'वर जमवू शकलेलो नाही, त्यामुळे आत्ता जे आहे त्या बळावर ही नोंद होतेय.

र.कृ. : अ

र.कृं.ची प्राथमिक ओळख त्यांच्याच शब्दात देण्यासाठी आपण तसा शोध घेतला तर हे सापडतं -

'पुन्हा एकदा कविता' असा एक कवितासंग्रह ना. धों. महानोर आणि चंद्रकान्त पाटील यांनी संपादित केलेला आणि पुण्याच्या 'नीलकंठ प्रकाशना'नं प्रकाशित केलेला. १९६०च्या आसपास लिहित्या झालेल्या निवडक कवींच्या निवडक कविता या संग्रहात आहेत. यात र.कृं.च्या अक्षरांच्या कविताही आहेतच. संग्रहामध्ये प्रत्येक कवीच्या कवितांपूर्वी त्याची ओळख शक्यतो त्याच्याच शब्दात करून दिलेय. यात र.कृं.नी स्वतःची ओळख पाहा कशी करून दिलेय :
माझं नाव रघुनाथ कृष्ण जोशी. मी र.कृ./आर.के. जन्म सांगली येथे १९३६ साली. माझा डोळा डॉक्टर अचा. शालेय शिक्षण सातारा, कोल्हापूर, सांगली इ. ठिकाणी. नाक कान घसा डॉक्टर बचा. कला शिक्षण १९५२ ते १९५६ मुंबई येथील जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट येथे. दात डॉक्टर क. १९६० पर्यंत बेनसन्स लिमिटेडमध्ये कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून. हृदय डॉक्टर द. तदनंतर आजपर्यन्त उल्का अॅडव्हरटायझिंगमध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून. रक्त दाबाचे. सुलेखनविद्या (Calligraphy) या विषयाच्या अभ्यासमाध्यमातून १९६५ साली पहिल्या अक्षरकविता. हातकळांचे. नंतर मुद्राक्षर (Typographic) दृश्य (Visual) ध्वनि (Sound) आकार (Formal) आणि पत्रक (Poster) कविता सत्यकथेतून वेळोवेळी प्रसिद्ध. पायगल्ल्यांचे. मराठीत मूर्तकाव्याचे (Concrete poetry) हे पहिले प्रयत्न. मेंदू ऑफिसचा. पोथ्या, कलाइतिहासविषयक चर्चा, रोमन व देवनागरी सुलेखनातील प्रयोग, मुद्राक्षरतंत्रविषयक संशोधन हे विषय आवडीचे. अर्धा पगार बायकोचा. लेखन वाचन बेताचे म्हणजे कमीच. अर्धा दिल्लीचा. कलाशिक्षण संस्थातून कलाविषयक सप्रयोग व्याख्याने. फोन शेजाऱ्यांचा. परिसंवादात 'पेपर' वाचण्याच्या निमित्ताने दोनदा घडलेला परदेशी प्रवास/अनुभव जमेस. टीव्ही फ्रीज मेकॅनिकचा. १९७० साली विविधभाषा लिप्यांमधील अक्षर-आकार-ध्वनींवर आधारित १६ अक्षरघटना (Happening) मुंबई येथे जागोजागी. गाडी नातलगांची. जाहिरातक्षेत्रात अनेक मान व बक्षिसे विशेषतः बोधचिन्हे (Symbol designs) व भारतीय भाषांतील जाहिराती (नेरोलॅक वगैरे) याविषयी विशेष आस्था अभ्यास प्रयोग व योगदान. कविता अक्षरांची. अक्षर सौंदर्याचे सिद्धान्त व त्यांचा व्यावहारिक आवाका याविषयक चळवळ प्रसाराचे अनेक स्तरीय प्रयत्न पण थिटे अपुरे ही खंत सदैव. माझं असं एकच धन. कवि चित्रकार उपयोजन संकल्पनकार (Graphic designer) सुलेखनकार (Calligrapher) मुद्राक्षर कलाकार (Typographer) अक्षरघटनाकार विविध भाषालिपी/ कलाइतिहास अभ्यासक व अक्षरसंशोधक या नात्याने थोडे बहुत काम गेली बारा वर्षे चालूच. मी जगणारा प्रत्येक क्षण. काव्यसंग्रह व्याख्याने अक्षरविषयक टिपणे अजून अप्रकाशित. 
(१६-१०-७८)

माझ्या कवितेविषयी 
ही पहिली ओळ - सुलेखनविद्येतील (Calligraphy) अक्षरसौंदर्याची
ही दुसरी           - मुद्राक्षरविद्येतील (Typography) मुद्राक्षरतत्त्वाची
ही तिसरी         - संगीतविद्येतील नादतत्त्वाची
ही चौथी           - चित्रकलेतील आकारत्वाची
ही पाचवी         - स्थापत्यशास्त्रातील रचनातत्त्वाची
ही सहावी         - शिल्पकलेतील माध्यमतत्त्वाची
ही सातवी         - लेखनव्यवहारातील रिक्त-युक्त स्थानतत्त्वांची
माझ्या कवितेविषयी ही आठवी ओळ अक्षरांची.
यात सुरुवातीला स्वतःची ओळख करून देताना र.कृं.नी त्या सर्व मजकुरात जी गंमत केलेय ती लक्षात यायला जरा काळजीपूर्वक वाचावं लागतं. म्हणजे आपल्या सार्वजनिक ओळखीबरोबरच ते आपल्या शारीरिक ओळखीत अ, ब, क... अशी अक्षरं घालून हे सगळं आपला कसा भाग बनलंय ते सुचवतायंत का? आणि त्यासोबत आपले काही अवयव, उदाहरणार्थ - पाय, हे गल्ल्यांचे आहेत असं म्हणून आपल्या आसपासच्या काही गोष्टींशीही नातं जोडतायंत काय? पाहा, तुम्हाला काय अर्थ निघतो तो. पण आपल्या एका सार्वजनिक व व्यावसायिक ओळखीसाठीच्या सरळ साच्यातल्या मजकुराबरोबरच ते तिरप्या साच्यातल्या अक्षरांमधून काहीतरी अधिक खोलातलं स्वतःसंबंधीचं सांगू पाहातायंत. ते लक्षात आलं तर मग हा लहानसा मजकूर वाचतानाही मजा येईल. असे हे र. कृ. जोशी.

असे म्हणजे कसे?

तर असे :

र. कृ. जोशी (२२ फेब्रुवारी १९३६ - ५ फेब्रुवारी २००८) (फोटो : इथून /ssahn.com)
***

र.कृं.नी केलेल्या देवनागरी फॉन्टसंबंधीच्या कामाव्यतिरिक्त ते जाहिरात क्षेत्रात डिझायनर म्हणूनही काम करत होते. तिथेही त्यांनी भारतीय भाषांमधून जाहिरात मोहिमांसाठी मोठी खटपट केली. त्यात यशस्वीही झाले. एका मुलाखतीत ते याबद्दल सांगतात : 'मी कला महाविद्यालयातून बाहेर पडलो, तेव्हा पुन्हा एकदा मला इंग्रजीचं प्रभुत्त्व सामोरं आलं. लोक इंग्रजीतच विचार करत, ए टू झेड इंग्रजीतच असायचं, लोक इंग्रजीत लिहीत, सगळंच इंग्रजीत. आणि माझ्यासारख्या लहान शहरातून आलेल्याला हा साचा तोडणं अवघड जात होतं. मग मी म्हटलं, शेतकरी, गृहिणी अशांसाठीच्या जाहिराती हिंदीतच असाव्यात, कारण त्यांना इंग्रजी येत नाही. त्यानंतर १९६२मध्ये मी केलेली पहिली जाहिरात मोहीम भारतीय भाषांमध्ये होती. यात अनेक प्रश्न होते, की आता मजकूर कोण लिहिणार? कॅलिग्राफी कोण करणार? पण हे सगळंच मला करावं लागे. मी सगळं हाती करायचो.. आणि जाहिरात क्षेत्रातल्या वरिष्ठांची कोणतीही मदत नसताना हे सगळं एकहाती करणं हाही एक आनंदाचाच भाग होता.' र.कृं.नी खूप केलं. सगळं कदाचित आपल्या आवाक्यात येईल असंही नसेल. पण आपल्या सगळ्यांच्या घरात त्यांचं एक काम अपरिहार्यपणे पोचलेलं होतं ते भारतीय टपाल खात्यामार्फत. पोस्टाचा हा लोगो, आधीचा, र.कृं.नी तयार केलेला :

र. कृ. जोशी : भारतीय टपाल खात्याचा लोगो (इथून)

आपण हा फोटो जिथून घेतलाय त्या 'डी-सोर्स' या वेबसाइटवर या लोगोचं वर्णन असं केलंय : भारतीय टपाल खात्याचा हा लोगो पहिल्यांदा भारतीय टपाल दिवशी, ९ ऑक्टोबर १९९३ रोजी प्रकाशित करण्यात आला. यामधून वेगवान कार्यशैली व ऊर्जा दिसून येते. शिवाय या लोगोच्या रचनेत साधलेल्या न-प्रमाणबद्ध (असिमेट्रिकल) समतोलामुळे सौंदर्याची सुंदर जाणीव व कौशल्यही दिसतंय. ही रचना एखाद्या इन्व्हलपसारखी केलेय, त्याच्या टोकदार रेषांमुळे टपाल खात्याचा भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा वेग दिसतो. लाल रंग खात्याचा प्रसार खोलवर पसरल्याची जाणीव दाखवण्यासाठी उपयोगी ठरतो. शिवाय वेगाच्या संकल्पनेला लाल रंगामुळे उठाव मिळालाय.
***

आपण र.कृं.नी देवनागरी फॉन्टसाठी मोठं काम केल्याचं नोंदवलं, त्यांनी जाहिरात क्षेत्रात काम केलं याचा ओझरता उल्लेख टपाल खात्याच्या लोगोच्या दाखल्याने केला. या शिवाय र.कृं.नी कविताही केल्या. पण ह्या अश्या कविता म्हणजे आपण नेहमी ऐकतो-वाचतो त्यापेक्षा वेगळं काव्य असलेल्या. नोंदीच्या सुरुवातीला र.कृं.नी स्वतःची ओळख ज्या मजकुरातून जशी करून दिलेय त्यात हे काव्य दिसलेलं आहे. शिवाय त्याचं आणखी एक उदाहरण नोंदवूया.
र.कृं.च्या 'अश्या' कविता 'रावा' नावाच्या एका लिट्ल मॅगझिनमध्ये साठच्या दशकात प्रसिद्ध झालेल्या. त्या पाहायलाही मिळाल्या होत्या, पण त्या आपल्या संग्रहात नसल्यामुळे त्यांना इथे नोंदवता येत नाहीये. पण वरती ज्या पुस्तकाची आपण मदत घेतली त्या 'पुन्हा एकदा कविता'मधून एक-दोन कविता नोंदवू. 

ही पाहा एक अशी आहे :

र. कृ. जोशींची एक कविता

यात तळात 'र. कृ. जोशी   एकशे पस्तीस' अशी जी अक्षरं दिसतायंत, ती कवितेचा भाग नाहीत, पण तरी ती तशीच राहू दिल्येत. 'व्यवहार' नावाची ही एक कविता. त्यात आपलं आपलं आपण काही जाणवून घेऊन तेवढंच बोलण्यासारखं. उभं-आडवं देण्या-घेण्याचं जे काही 'व्यवहार' नावाच्या गोष्टीचं स्वरूप असतं ते तुमचं तुम्ही पाहून घ्या.
***

तर... असे र.कृ.!

आपल्याला भविष्यात काय व्हायचंय, हा तसा शाळेतला आणि लहानपणी मोठ्या लोकांकडून विचारला जाणारा नेहमीचा प्रश्न. यावर उत्तरंही साधारण डॉक्टरपासून पायलटपर्यंत किंवा पोलीस, इंजिनीयर अशी काही ना काही मिळतील. पण र.कृं.ना शाळेत असा प्रश्न विचारला जायचा त्यावरचं त्यांचं उत्तर असं होतं : 'मला काहीच व्हायचं नाहीये, कोणीच नाही, मला फक्त पुढे जायचंय.' हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं. म्हणजे वरच्या उत्तरांपैकी काहीही ते झाले असते तरी ते 'काहीच झाले नसते' आणि ते जे काही झाले तरी ते 'काहीच नाही' असंच काहीतरी झालं. आणि म्हणूनच ते जे करू शकले ते करू शकले. तर, असे र.कृ. २००८ साली गेले तोपर्यंत आपल्यासोबत आपल्या भाषांनाही काहीसं पुढे घेऊन गेले. भारतात 'डिझाइन' नावाच्या गोष्टीबद्दल जाणीव ठेवून गेले. आणि पुरून उरले.


र.कृ.जोशींची एक कृती (इथून)
 ***

मी असं म्हणेन की तुम्ही त्याचा आनंद घ्या. एन्जॉय इट. तुमचं जे आहे त्याचा आनंद घ्या, तुमच्याकडे जे आहे, तुमच्या संस्कृतीचा जे भाग आहे, त्याचा आनंद घ्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. 'ते' आनंद घेण्याचं सगळ्यांत महत्त्वाचं. 

- र. कृ. जोशी

तर, सगळ्यांत महत्त्वाचं हे, आनंद घेण्याचं काम.

मला काहीही व्हायचं नाहीये, काहीही बनायचं नाहीये. मला फक्त आनंद घ्यायचाय, असंही कदाचित र.कृ. म्हणाले असते. किंवा आपण त्यांच्या एकूण इथे येऊन जाण्यातून हा एक निष्कर्ष काढू शकतो. तर, असे हे र.कृ.!

सही!
***

'रेघे'वर जशी माहिती मिळेल तशी निमित्तं शोधून आपण काही गोष्टी नोंदवत राहातो. र.कृं.बद्दल सध्या एवढंच. थोडं आणखी माहीत करून घेण्यासाठी त्यांच्याबद्दलचे 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये पूर्वी प्रसिद्ध झालेले दोन लेख इथे वाचता येतील : एकदोन । शिवाय, तीन (इंग्रजी)

2 comments:

  1. प्रत्येक शब्दापुढे अवतरण चिंह्न दिसत असल्याने, वाचताना त्रास होतो. पण आपण हा ब्लॉग समोर मांडल्याबद्दल आपणास धन्यवाद.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete