Monday, 8 March 2021

झोपडपट्टी, दादा आणि ताई

पुण्यातील कोथरूडमधल्या एका गुंडाला साताऱ्यात ताब्यात घेण्यात आलं आणि आता येरवडा तुरुंगात स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं. अशा बातम्या आजच वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या आहेत. शिवाय आज ८ मार्च हा महिला दिन असल्याचंही कळतं. 

या बातम्यांमध्ये एक वाक्य असं आहे: '...झोपडपट्टी दादा प्रतिबंंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली (लोकसत्ता, ८ मार्च). किंवा काही ठिकाणी नुसता '...एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव मंजूर केला होता', असं उल्लेख दिसला (लोकमत, ८ मार्च).

या कायद्याचं पूर्ण नाव इंग्रजीत असं आहे: 'The Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords, Bootleggers, Drug Offenders and Dangerous Persons Act, 1981'. मराठीत ते बहुधा असं होईल: 'महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, अंमलीपदार्थविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या धोकादायक /विघातक कृत्यांना प्रतिबंध करणारा अधिनियम, १९८१'. बातमीत एवढं लांबलचक वापरणं शक्य नाही, हे बरोबरच. म्हणूनच काही बातम्यांनी नुसतं 'एमपीडीए' एवढंच लिहिलेलं आहे. काहींनी ते कंसात लिहून आधी कायद्याचा संक्षिप्त निर्देश केला आहे. आत्ताच्या आणि पूर्वीहीच्याही अशा काही बातम्यांमध्येही संक्षिप्त निर्देश 'झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा' असा आल्याचं दिसतं.

पण हा निर्देश करताना 'झोपडपट्टी दादा' असा शब्दप्रयोग करणं टाळता येईल, असं वाटतं. तसंही 'एमपीडीए' या लघुरूपात फक्त 'महाराष्ट्र धोकादायक कृत्यं प्रतिबंधक कायदा' एवढाच निर्देश होतो, कायदा करणाऱ्यांनी 'स्लमलॉर्ड' शब्द वापरला, त्यामुळे त्यातला पूर्वग्रह मराठीत येणार, मग 'झोपडपट्टी' हा शब्द वापरावा लागणार, पण 'स्लमलॉर्ड'चं मराठी भाषांतर 'झोपडपट्टीतील गुंड' असंही करता येईल. कारण, अनौपचारिकरित्या बोलताना जरी 'दादागिरी' हा शब्द वापरला जात असला, तरी कायदा मात्र 'गुंड' असलेल्या ताईंनाही लागू होणारच. त्यामुळे औपचारिकरित्या 'दादा' शब्दाऐवजी 'गुंड' शब्द वापरणं रास्त राहील (गुंड हा शब्दही पुल्लिंगी असला, तरी 'दादा'च्या तुलनेत जरा अधिक सार्वत्रिक वापरता येईल असा असेल बहुधा. म्हणजे गुंडगिरीचा उल्लेख मुलींच्या संदर्भातही करता येईल). 

कायदा व न्याय विभागाच्या संकेतस्थळावर या कायद्याची प्रत सापडते. त्या दस्तावेजामध्ये 'दादा/गुंड' हा मुद्दा संबंधितांच्या लक्षात आल्याचं दिसतं:


'दादा' शब्द बदलून 'गुंड' असा करायला हवा- अशा शेरा संबंधित अधिकारी व्यक्तीने नोंदवलेला आहे. पण खुद्द या दस्तावेजात पुढे तो बदल करून घेतलेला नाही. कायद्यातील सर्व शब्दांची व्याख्या या दस्तावेजात दिलेली आहे, त्यात असं म्हटलंय: 

"झोपडपट्टीदादा" याचा अर्थ जी व्यक्ती, बेकायदेशीरपणे कोणत्याही जमिनीचा (मग ती जमीन शासनाच्या मालकीची असो किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या वा अन्य एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असो) ताबा घेते किंवा अशा जमिनीत प्रवेश करते किंवा बेकायदेशीरपणे त्या जमिनीच्या संबंधात भाडेदारीचा अथवा संमती व परवानगीचा करार वा अन्य कोणताही करार करते, किंवा जी व्यक्ती विकण्याच्या वा भाड्याने देण्याच्या उद्देशाने त्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम करते, किंवा अशा जमिनी कोणत्याही व्यक्तीला, भाड्याने अथवा संमती व परवानगी तत्त्वावर बांधकामासाठी किंवा त्यावरील अनधिकृत बांधकामाचा वापर वा भोगवटा करण्यासाठी देते, किंवा जी व्यक्ती, अशा जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेण्याकरिता किंवा ज्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम करण्याकरिता दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला जाणीवपूर्वक पैशाची मदत देते, किंवा जी व्यक्ती, अशा जमिनीवर राहणाऱ्या रहिवाशांकडून भाडे, भरपाई म्हणून किंवा इतर रकमा धाकदपटशाने वसूल करते वा वसूल करण्याचा प्रयत्न करते, किंवा जी व्यक्ती, कोणत्याही कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता तेथील भोगवटादारांना बळजबरीने हुसकावून लावते वा तसा प्रयत्न करते, किंवा जी व्यक्ती, वर नमूद केलेल्यापैकी कोणतीही गोष्ट करण्यास अन्य कोणत्याही मार्गाने अपप्रेरणा देते, ती व्यक्ती असा आहे.

या परिच्छेदातले सर्व अर्थ 'स्लमलॉर्ड' या इंग्रजी शब्दामधून निपजलेले दिसतात. कायदा लिहिणारे त्या भाषेला प्राधान्य देत असावेत. पण असे शब्द अशा विशिष्ट संदर्भांमध्ये टाळता येऊ शकतात. 'झोपडपट्टी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी काही समस्याच नसतात, किंवा तिथे काही वेगळ्या गंभीर समस्या नसतात, अशा  भाबड्या कल्पनेने हे नोंदवलेलं नाही. पण विविध संदर्भांमुळे माणूस एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहत असतो- तशी निवड तो करतो त्यात अनेक अपरिहार्यता असतात. कोणी तीन मजली किंवा तीस मजली इमारतीत फ्लॅट घेतला तरीही, किंवा कोणी बंगले बांधले तरीही किंवा कोणी झोपडं भाड्याने घेतलं तरीही अपरिहार्यता असतातच- कोणाला त्यात सुख वाटतं, कोणाला दुःख वाटतं. पण 'झोपडपट्टी'चा उल्लेख 'वरच्या' वर्गांमध्ये तुच्छतेनेही होत असतो. कोणीतरी अस्वच्छ वागलं, शिव्या दिल्या, रूढार्थाने घाण वागलं, तर 'झोपडपट्टीतून आलाय का?' इत्यादी शब्दप्रयोग होताना दिसतं. तर, या अवकाशातल्या समस्या सोडवण्यासाठी एखादा कायदा असेल तर त्यात त्या अवकाशावर विपरित शिक्का मारणं टाळायला हवं. 'वस्तीतील गुंडगिरी' इत्यादी शब्दही उपलब्ध आहेत, ते वापरणं शक्य असतं. तरी कायदा करणाऱ्यांना ते शक्य झालं नसेल, तर बातमी देणाऱ्यांनी तरी तो शिक्का टाळायचा प्रयत्न करायला हरकत नाही. बातमी गुंडगिरीबद्दलची असताना तितकीच ठेवावी, अन्यथा 'झोपडपट्टीत हे असलंच चालतं', असा भाव बाकीच्या 'सुसंस्कृत' वाचकांच्या मनात अजाणतेपणी वाढवायचा कशाला! तसंही या विशिष्ट बातमीतली झोपडपट्टी जिथे आहे तो 'कोथरूड' हा भाग म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतला अतिसुसंस्कृत भाग म्हणून ओळखला जातो. अशा वेळी स्वतःचा तथाकथित सुसंस्कृतपणा/सभ्यपणा/अतिसुरक्षितपणा तपासण्यासाठी या बातम्यांचा उपयोग करायला हवा. नाहीतर ते 'त्यांचं' असंच असतं, 'आपण आपले' सुरक्षित नि सुसंस्कृत आहोत, असे भास टिकून राहतील, असं वाटतं.

No comments:

Post a Comment