Wednesday 3 October 2018

पाणी अश्लील?

‘पाणी कसं अस्तं’ ही दिनकर मनवर यांची कविता मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली होती. पण त्यात आदिवासी स्त्रीविषयी अश्लील ओळ असल्याचा आरोप काही संघटनांनी व आता राजकीय पक्षांनीही केला, ही कविता अभ्यासक्रमातून काढून टाकण्याच्या आक्रमक मागण्या झाल्या. आता ती कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेय. इथवर हे सगळं थांबलेलं नाही. कवीच्या नावानं वैयक्तिक शिवीगाळ चालू आहे, त्याच्या विरोधात आणि मुंबई विद्यापीठाविरोधातही ‘अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमा’खाली (अॅट्रॉसिटी कायदा) तक्रार दाखल करायची मागणी काही संघटनांनी केली आहे. कठोर किंवा अगदी कटू टीका समजून घेता आली असती. कविता कशी आहे, बरी आहे का वाईट आहे, तिच्या आशयातून कोणकोणते अर्थ निघू शकतात, त्यात काही आक्षेप वाटतो का किंवा वरपांगी वाटतंय त्याहून वेगळा काही अर्थ त्यात आहे का, हे सगळंच बोलता येऊ शकतं. या सगळ्यावर लिहिता येऊ शकतं. पण कविता लिहिलेल्या व्यक्तीवर इतक्या आक्रमकतेनं तुटून पडणं खेदजनक आहे. कवितेचे काही सुटे 'स्क्रिनशॉट' समाजमाध्यमांवरून फिरत आहेत. आपण रेघेवरची मागची नोंदही एका कवितेच्या संदर्भात केली होती. ती कविता सर्वोच्च न्यायालयालाही अश्लील वाटली होती! आणि आता पुन्हा हा कवितेवरून गदारोळ. तर या गदारोळापेक्षा ही पूर्ण कविता वाचणंच अधिक योग्य होईल, असं वाटलं, त्यामुळं ही कविता खाली नोंदवली आहे. 

पाणी कसं अस्तं

पाणी हा शब्द
मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीये
मी ऐकू शकत नाही पाण्याचा आवाज
की चालून जाऊ शकत नाही पाण्याच्या पायरीवरून

पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार
किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या
रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर
पाणी कसं अस्तं स्वच्छ पातळ की निर्मळ?

काळं असावं पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून?
(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)

जे तुंबवून ठेवलेलं अस्तं तळ्यात ते पाणी अस्तं?
पोहऱ्यानं पाणी उपसून घेतलं तर विहिरीतलं पाणी विटतं?
पाणी धारदार वाहतं झुळझुळतं मंजुळ गाणं गातं ते पाणी अस्तं?
गढूळ, सडकं, दूषित, शेवाळलेलं, गटारीतलं, मोरीलं
या पाण्यावरचे निर्बंध अजूनही उठिले गेले नाहीत काय?
पाणी ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं?
नि दंगली घडवतं ते पाणी नस्तं?

पाणी पावसातून गळतं जमिनीवर
बर्फ वितळल्यावर पसरतं पठारांवर
नदीला पूर आल्यावर वेढून घेतं गावं
धरण फुटल्यावर पांगापांग करतं माण्सांची
ते पण पाणी पाणीच अस्तं?

पाणी स्पृश्य अस्तं की अस्पृश्य?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रह्म?
पाणी ब्राह्मण अस्तं की क्षत्रिय की वैश्य
पाणी शूद्र अस्तं की अतिशूद्र
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात?

आणि पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं
की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं काय बाटतं?
पाणी नदीतलं, नाल्यातलं, ओढ्यातलं, विहिरीतलं
पाणी तळ्यातलं, धरणातलं, सरोवरातलं, समुद्रातलं
पाणी ढगातलं, माठातलं, पेल्यातलं, डोळ्यातलं
हे पाणी कुणाच्या मालकीचं अस्तं?

पाणी नारळात येतं
छातीच्या बरगड्यात साचतं
फुफ्फुसातून पू होऊन स्रवतं
पोटात पाण्याचा गोळा होऊन राहतं
ईश्वराचा कोणता देवदूत हे पाणी न चुकता सोडत अस्तो?

पाणी पारा अस्तं की कापूर?
जे चिमटीत पकडता येत नाही
नि घरंगळून जात राहतं सारखं
किंवा कापरासारखं जळून जातं झर्कssन

पाणी हा शब्द फक्त एकदाच मला उच्चारू द्या
निव्वळ पाण्यासारखाच

(दिनकर मनवर, 'दृश्य नसलेल्या दृश्यात', पॉप्युलर प्रकाशन- पान १४ व १५)

'पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार/ किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या/ रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर' या ओळी आदिवासी समूहांच्याविषयी काय सांगतायंत? 'आणि पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं/ की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं काय बाटतं?' या ओळीही याच कवितेत आहेत, तरीही त्यावर जातीयवादाचा आरोप करायचा? या ठिकाणी इतर जाती-जमातीमधल्या स्त्रीच्या अवयवांचा उल्लेख करून पाहा, मग कसं वाटतं, अशीही विचारणा समाजमाध्यमांवर होताना दिसते. पण खरं तर निरनिराळ्या संदर्भात विविध स्तरांमधील स्त्री-पुरुषांच्या अवयवांचे उल्लेख कथा-कादंबऱ्या-कवितांमध्ये सापडतातच. त्याचा संदर्भ न तपासता एक ओळ वेगळी काढणं धोकादायक वाटतं. शिवाय, लगेच कविता लिहिणाऱ्यावर हेत्वारोपही करणं गैर वाटतं. आधीच्या ओळींमध्ये आलेला 'छाटलेल्या अंगठ्या'चा उल्लेख आदिवासी समुदायाविषयी काहीतरी मत नोंदवू पाहातोय, त्याला धरूनच पुढची स्तनांची ओळही आदिवासी समुदायाविषयी काहीतरी म्हणू पाहतेय. त्यावर चर्चा करता येईल, कोणाला त्यात त्रुटी वाटल्या तर तेही मांडावं, पण यात अश्लीलता दिसत नाही.

*
पॉप्युलर प्रकाशन
*
टीप: 'पाणी निळेभोर । काळे । सावळे' या तुळसी परब यांच्या कवितेत पाण्याची उपमा कदाचित अधिक व्यामिश्रतेनं वाचायला मिळते. तीही या निमित्तानं समांतरपणे वाचता येईल.