Wednesday 27 May 2020

दृश्यांची स्थलांतरं : २७ मे २०२०

बिहारमधल्या मुझफ्फरनगर रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एक आई मरून पडलेय, एखाद् वर्ष वय असलेलं- जेमतेम चालू लागलेलं मूल आईचं मळकं पांघरूण ओढून तिला उठवू पाहतंय. मधेच ते पांघरुण स्वतःच्या डोक्यावर घेतं, खाली टाकतं, बाजूला जातं, परत येतं.
साधारण चौदा सेकंदांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून पसरत असतो.  स्वतःच्या घरी जाण्यासाठी वाट पाहत, ऊन, उपासमार इत्यादींनी थकून त्या स्त्रीचा प्राण गेल्याचं आपल्याला दृश्यासोबतच्या ओळींवरून कळतं.

कोरोना विषाणू जगभर पसरू लागला, त्याचा प्राणघातक धोका दिसल्यावर जगभरच्या सरकारांनी काही पावलं उचलली. लॉकडाउन अंमलात आले. आपल्या पंतप्रधानांनी लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी काहीच तास आधी वीसेक छापील माध्यमांच्या मालक-संपादक पातळीवरल्या प्रतिनिधींसोबत एक आभासी बैठक घेतल्याचं आपण वाचलेलं असतं. या काळात सकारात्मक व प्रेरणादायी बातम्या याव्यात असा सल्ला पंतप्रधानांनी दिल्याचं त्यात वाचायला मिळतं. शिवाय, छापील माध्यमं कशी कानाकोपऱ्यात जातात, कोरोनाविरोधातल्या लढ्यात त्यांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, अफवा थोपवण्यात आणि अचूक माहिती पोचवण्यात छापील माध्यमं कशी महत्त्वाची कामगिरी करतात, इत्यादीही पंतप्रधान बोलल्याचं आपल्याला कळतं. यात सहभागी झालेल्या दोनेक मालक-व्यक्तींची वर्तमानपत्रं पुरोगामी वर्तुळांच्या आस्थेची असतात, त्यामुळे त्यांची प्रतिमा प्रस्थापितविरोधी अशी झालेली असते. पण त्यांच्या वार्तांकनात ही 'सकारात्मकता' आढळल्याचं काही ठिकाणी नोंदवून येतं, आपल्यालाही ते ही वर्तमानपत्रं वाचताना दिसत राहतं. काटेकोरपणे एकच टोक नसतं, पण साधारण कल असतो.

तरीही, इतर कुठून ना कुठून 'नकारात्मक' बातम्या येत राहतात, दृश्यं येत राहतात. कधी स्थलांतरित मजुरांनी हजारो किलोमीटरचा प्रवास पायी केल्याची. कधी एक शाळकरी मुलगी तिच्या वडिलांना सायकलवर मागे बसवून हजारो किलोमीटर सायकल चालवत गेल्याची. कधी मजुरांच्या चालत जाणाऱ्या जत्थ्यातलं एक मूल बॅगेवर झोपलंय आणि ती बॅग त्याची आई ओढत नेतेय याची. अशी अनेकांची दृश्यं. आपल्याही आसपास कोणीतरी रस्त्यावर कुत्र्यासाठी टाकलेलं अन्न दुसरी रस्त्यावरची व्यक्ती खाताना दिसते.

हिंदी चित्रपटांमधला कोणी अभिनेता स्वतः पुढाकार घेऊन अनेक मजुरांना आपापल्या घरी पाठवण्यासाठी बसची व्यवस्था करतो, खाण्यापिण्याची व्यवस्था करतो, याचेही व्हिडिओ, छायाचित्रं आणि बातम्या आपल्यासमोर येत राहतात.

अशा टोकाच्या नकारात्मकतेच्या आणि सकारात्मकतेच्या दरीत आपण आपल्यावर कोसळणारी दृश्यं झेलत असतो. एकमेकांकडे ही दृश्यं पाठवत राहतो. अगदी दूरदूरची दृश्यंही आपल्यापर्यंत येऊन पोचतात. कधी आपल्याला हादरवतात, कधी व्यक्तीच्या मनोबळाची कमाल वाटेल असं काहीतरी दाखवतात. 

दरम्यान, या व्यतिरिक्त सकारात्मक अथवा नकारात्मक यांच्या दरम्यानचे आपले दैनंदिन व्यवहार सुरूच असतात. त्यांचीही दृश्यं आपण नोंदवत असतो. या सगळ्या गदारोळात त्या दृश्यांचं स्थलांतरही होत असतं. त्याला आपण कधी ‘मीम’ म्हणतो, कधी ‘इमोजी’ म्हणतो, कधी ‘डीपी’ म्हणतो, कधी आणखी काही म्हणत राहतो. 

या सगळ्यांत कोणी देवावर विसंबून असतात, कोणी विज्ञानावर विसंबून असतात, कोणी देशभक्तीवर विसंबून असतात, कोणी ‘प्रस्थापितविरोधी’ असण्याच्या आपल्या प्रतिमेवर विसंबून असतात, लहान मुलं त्यांच्या आईवडिलांवर विसंबून असतात. या सगळ्यांतून पुन्हा दृश्यं निर्माण होत राहतात. तीही आपण रिचवत राहतो, पोचवत राहतो. विलक्षण काहीतरी घडलं, तरीही आपापल्या पूर्वग्रहांमधून माणूस आधार शोधत राहतो. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय जगताच येत नाही, हे कबूल. सगळे पूर्वग्रह चुकीचेच असतात असं नाही, हेसुद्धा कबूल. फक्त आपण डोळ्यांनी बघण्याऐवजी त्याच फोकल लेन्थचा तोच कॅमेरा वर्षानुवर्षं वापरत राहिलो, तर त्याच चौकटीत बंदिस्त होतो. आणि आता आपापल्या हातातल्या स्मार्ट चौकटीत बंदिस्त होतो. 

व्हिएतनामच्या युद्धात, आणि आणखीही अनेकानेक वेळी दृश्यांनी फार थोर कार्य केल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं असतं. व्हिएतनाम युद्धातली छायाचित्रं अमेरिकी जनतेपर्यंत पोचली, त्यांच्या मनात कालवाकालव झाली, युद्धविरोधी आंदोलनं होऊ लागली, इत्यादी आपण वाचलेलं असतं. पण कितपत दृश्यं असतील तर हे होईल. याची काही ठरलेली प्रमाणं नसणारच. पण एक असं असावं:

सार्वजनिक अवकाशातलं किंवा अगदी कौटुंबिक अवकाशातलं कितीही काही भयाण आपण पाहिलं, अनुभवलं, तरीही व्यक्ती म्हणून आपलं आपण जगतच असतो, त्यात कधी आनंद-दुःख, सकारात्मक-नकारात्मक इत्यादी विविध भावभावना आपण अनुभवतो, त्या आपल्यापुरत्या ठेवतो किंवा आपल्या अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींना, जिवलगांना वगैरे सांगतो, त्यांच्याशी शेअर करतो. हे असंच सगळं मिसळलेलं जगणं असतं. कोणी कितीही भासवलं, तरी ही अवकाशांची सरमिसळ होते. कधी आपलं व्यक्तिगत कमी-अधिक राहतं, तरी बाहेर उत्सव असतो. कधी बाहेर भयानक काहीतरी असतं, तरी व्यक्तिगत थोडाफार उत्सव असू शकतो. हे असं असतं. याची व्यक्तिगत दृश्यात्मक नोंद होणंही ज्याच्या-त्याच्या स्वभावानुसार स्वाभाविक असावं. पण आधी यातल्या व्यक्तिगत घडामोडींची दृश्यात्मक नोंद प्रत्येक वेळी जगासमोर नेली जायचीच असं नाही, तसं नेण्यासाठीचे मार्ग मर्यादित होते. आपण कोणी सेलिब्रिटी असलो तर मात्र आपलं व्यक्तिगत जीवनही पापाराझींच्या कॅमेऱ्यांच्या रडारवर असतं. आपल्यालाही मग आपलं व्यक्तिगत जीवन सतत शेअर करण्याचे लाभ मिळत राहतात. अनेकदा तर त्यांचं व्यक्तिगत जीवन उर्वरितांच्या सार्वजनिक जीवनापेक्षा जास्त जागा व्यापतं. आता आपल्या सर्वांना कमी-अधिक व्याप्तीचं सेलिब्रिटी होण्याची संधी असल्यामुळे आपण सार्वजनिक अवकाशात आपला व्यक्तिगत अवकाश अधिकाधिक घुसवत राहतो. व्यक्तिगत दृश्यं सार्वजनिक दृश्यांमध्ये घुसत राहतात. वेगळ्या बाजूने नोंदवायचं तर, वरच्या व्हिडिओतल्या मुलाची व्यक्तिगत परिस्थिती सार्वजनिक शोकांतिकेशी जोडलेली होती, पण कोणाचा व्यक्तिगत सर्वसाधारण डीपी किंवा घरगुती काही कृती त्याच वेगाने सार्वजनिक अवकाशाशी जोडण्याची गरज नसते/नसावी. पण तसं जोडलं जातं, तेच सेलिब्रिटीपण.

त्यामुळे, रेल्वेस्टेशनवर मेलेल्या आईचं पांघरूण ओढणारं मूल दिसतंय ते दृश्यं शेअर केल्यानंतर काही मिनिटांमध्येच आपण आपला डीपी बदलला, तर ते आधीचं दृश्य आपोआपच खाली जातं. हे अर्थातच काहीसं ढोबळ प्रतीकात्मक झालं. पण वास्तव इतकं ढोबळ झाल्यासारखं वाटत नाही का? अशा ढोबळ प्रतीकात्मक वास्तवात मग काही दृश्यांची स्थलांतरं मन तात्पुरतं हेलावतात, पण ताबडतोब दुसरी दृश्यं आपला ताबा घेतातच घेतात. हा ताबा कसा घ्यायचा याची जाण असल्यामुळेच पंतप्रधानांनी लॉकडाउनआधीच काही छापील माध्यमांशी बोलून तजवीज केली, साधारणतः पंतप्रधानांच्या विचारधारेविरोधात वाटणाऱ्या वर्तमानपत्रांपर्यंतही त्यांनी ही तजवीज पोचेल असं पाहिलं. ही छापील माध्यमं असली, तरी दृश्यं त्यांतही असतातच. स्वतःसुद्धा वेळोवेळी टीव्हीवर आल्यानंतर दृश्यात्मकता असतील असे कार्यक्रम लोकांना दिले- थाळ्या वाजवणं, रात्री घरातले दिवे बंद करून मेणबत्त्या, मोबाइलचे टॉर्च पेटवणं. तर आता हे साधारणतः ‘प्रस्थापित’ म्हटल्या जाणाऱ्या व्यवस्थेकडून होणारे, दृश्यांद्वारे ताबा घेण्याचे प्रयोग आहेत. यावर उतारा काय? आपण वरचा मेलेल्या आईच्या पांघरुणाशी खेळणाऱ्या मुलाचा व्हिडिओ शेअर करतो, तेव्हा आपल्याला तो अंशतः उतारा वाटतो. हे चुकीचंही नसावं. पण मग त्यानंतर लगेच आपण कोणता व्हिडिओ, कोणतं छायाचित्र शेअर करावं, कोणती दृश्यात्मक हालचाल करावी, हे एक चांगल्यापैकी निर्णायक जबाबदारीचं काम असणार. पण यासाठीची निर्णयशक्ती आपण वापरतो? माहीत नाही. दृश्यांचं स्थलांतर कसं असावं याबाबत आपण स्वतः निर्णय घेतो? तसं नसेल तर ताबा घेणाऱ्यांचं फावणं स्वाभाविक नाही का?

शेवटी, एक उदाहरण डोळ्यांसमोर येतंय: आपल्याला माहितीच असेल: चोवीस तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्यांची स्पर्धा फक्त दुसऱ्या वृत्तवाहिन्यांशी नसते, मालिका दाखवणाऱ्या, चित्रपट दाखवणाऱ्या, खेळ दाखवणाऱ्या, गाणी दाखवणाऱ्या, अगदी कार्टून दाखवणाऱ्या वाहिन्यांसोबतही असते. कारण रिमोट हातात घेतलेला प्रेक्षक टीव्ही बघत असतो. एका क्षणात तो बातम्यांवरून मालिकांकडे किंवा चित्रपटांकडे किंवा खेळांकडे जाऊ शकतो. त्यामुळेच मग बातम्यांमध्येही चित्रपटांची नाट्यमयता येते, संगीत येतं, कार्टूनपणाही येतो. हे क्षणक्षणाचं बसल्याजागी रिमोटद्वारे शक्य झालेलं दृश्यांचं स्थलांतर. तसंच, आपल्या सर्वांच्या हातातल्या चौकटीमध्ये दिसणाऱ्या दृश्यांच्या स्थलांतराबाबत होतं. आपल्याला वाटतं आपण आपली वाहिनी चालवतोय- कोणाला ती सतत सामाजिक भानाचं उत्पादन करणारी वाहिनी वाटते, कोणाला प्रस्थापितविरोधी अभिव्यक्तीची वाहिनी वाटते. पण ते निर्णायक जबाबदारीचं भान ठेवलं नाही, तर या स्पर्धेत आपणही आपल्या स्पर्धकांसारखेच नाट्यमय होत जातो. फक्त नाट्यमयतेचा तपशील बदलतो. यात वाहिनीचं असणं किंवा नसणं, त्यातली सकारात्मकता किंवा नकारात्मकता असं बोलायचा प्रयत्न नाही. ती वाहिनी वापरताना, आपलं प्रोफाइल, आपली भिंत, इत्यादी वापरताना, काय होतं, त्याबद्दल बोलायचा प्रयत्न आहे. आणि रिमोटच्याही वापराबद्दल बोलायचा अंधुकसा प्रयत्न आहे.

आज, ते वरचं एक दृश्य पाहून हे शब्द डोक्यात आले. शब्दही फक्त दृश्यासारखेच ठरण्याची शक्यता राहतेच. पण कदाचित दृश्यंही बघून सोडून देण्याऐवजी वाचली जात असतील किंवा वाचली जातील, असा एक पूर्वग्रह मनात असावा. म्हणून शब्द लिहून ठेवले जात असावेत. समाप्त.