Sunday, 18 August 2013

भाषा : जीवन आणि जेवण

एक

पुण्यात शाहू कॉलेजात एफ.वाय.बी.ए.ला शिकणारा एक मुलगा. काळ्या रंगाचा आणि साधारण पाच फूट दोनतीन इंच उंचीचा. दुपारी दोन ते सहा या वेळेत तो एका ठिकाणी कम्प्युटर दुरुस्तीशी (हार्डवेअर, सॉफ्टवेअर) संबंधित काम करतो थोडं थोडं. मदतनीसासारखी ही नोकरी तो अर्धवेळ स्वरूपात करतो. ह्या मुलाची सध्याची समस्या : इंग्रजी येत नाही.

तीन हजार तीनशे रुपये देऊन तीन महिन्यांचा इंग्रजी बोलण्यासंबंधीचा कोर्स या मुलाने केला. पैसे-वेळ वाया. हे तोच आपल्याला सांगतोय.

हार्डवेअर दुरुस्तीचा तीन वर्षांचा डिप्लोमाही या मुलाने केलेला आहे. सध्या प्रॅक्टिकल शिकणं सुरू आहे. यासाठी वापरावी लागणारी पुस्तकं इंग्रजीत आहेत, ती समजण्यासाठी / समजण्यापुरतीच इंग्रजी भाषा शिकायच्येय, असं तो सांगतोय. ट्रबल-शूटिंगसारख्या गोष्टींसाठी आवश्यक गोष्टी् समजून घेण्यासाठी त्याला इंग्रजी शिकावीशी वाटतेय. हे शिकण्यासाठी तो कधी कधी 'गुगल-ट्रान्स्लेट'ची मदत घेतो आणि वाक्यंच्या वाक्यं भाषांतरित करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यातूनही काही साध्य होत नाही.

हा मुलगा मराठी जितक्या सहजतेने बोलतो तितक्या सहजतेने तो इंग्रजी शिकण्याची इच्छाही बोलून दाखवू शकत नाही. त्याला इंग्रजी शिकायच्येय ती फक्त समोरचा काय बोलतोय ते समजावं इतपतच. परदेशी उच्चार कळत नाहीत, असंही त्याला वाटतं. तेही कळून घ्यायला हवेत, असं तो म्हणतो. आणि शेवटी म्हणतो की, रोजच्या जीवनात बोलतो ते नको, इंटरव्ह्यूमधे बोलता यायला पायजे. व्हॉट आय डू, यू डू - असलं नको. कठीण शब्द यायला पायजेत, असं तो सांगतो.

मुद्दे अनेकच आहेत. सगळे आपल्या कक्षेतलेही नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नोंदीचा हेतू चांगल्या अर्थी फक्त पत्रकारी आहे. म्हणजेच नोंद करणं. तर हा मुलगा आपल्याला भेटला याची नोंद केल्यावर त्याच्याच बोलण्यात काय आलं तेही नोंदवलं. याच मुलाने त्याच्या परिसरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या समाजाची भाषा म्हणून मारवाडी शिकायचाही प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. इंग्रजीचा प्रयत्न सुरू आहे. ('गुगल-ट्रान्स्लेटचा तसा वाक्य शिकायला उपयोग नाहीये रे'. होय काय, मग ठिकाय. पुस्तकच पाहतो कायतरी अप्पा बळवंत चौकात. कळलं तर सांगा.)

काही मुद्दे साधे आहेत. त्याला इंग्रजी जमली की हार्डवेअरसोबत सॉफ्टवेअरच्या काही गोष्टी कळणं सोपं जाईल, त्यातून तो स्वतःहून काही कामं करू शकेल. त्या कामातून त्याला स्वतःचे पैसे मिळवता येतील आणि त्यातून जेवण नीट होईल. जेवणासोबत इतर अनेक कामं, गरजा, मौज याही गोष्टी करता येतील. त्यामुळे जेवणासाठी आवश्यक भाषा हा एक भाग. दुसरा मुद्दा त्याने एकदम सपशेल मांडलाय नोकरीसाठीच्या मुलाखतींसंबंधीचा. रोजच्या जीवनाला सोडूनच या मुलाखती होतात हे या जेमतेम अठरा वर्षांचा होत आलेल्या मुलानेही ओळखलंय. ओळखलंय ते बरंच म्हणायचं. त्या मुलाखतीसाठी आवश्यक भाषा त्याला सापडणं गरजेचं आहे.

आपण ज्या मुलाची भाषेविषयीची आकांक्षा इथे मांडली त्याची आर्थिक परिस्थिती तुम्ही आधीच जोखली असेल. आणखी खोलात जायचं तर त्याची जातही जोखा. त्याला जी मराठी येते त्यातही तो सुरक्षित नाहीये, पण ते तो त्याच्या उपजत ताकदीने सांभाळून नेईल. इंग्रजीचं काय करायचं हा मात्र प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडेल तेव्हाच आपण 'रेघे'वर नोंदवू शकू. सध्या एवढंच.
***

दोन

पद्मगंधा प्रकाशन
वरच्या भागातला मुलगा हे आपल्या नोंदीला पुरेसं कारण आहे. पण नोंदीला आणखी एक निमित्त म्हणजे कालच झालेलं एका पुस्तकाचं प्रकाशन. हे पुस्तक म्हणजे तीन वर्षांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला गणेश देवी यांच्या नेतृत्वाखालचा भाषांच्या दस्तावेजीकरणासंबंधीचा प्रकल्प. तुम्ही यासंबंधीच्या बातम्या वाचल्या असालच बहुधा. या प्रकल्पामध्ये भारतातील भाषांचं प्रचंड आवाक्याचं सर्वेक्षण केलं गेलंय. त्या त्या भाषेचा इतिहास, व्याकरण, भौगोलिक स्थान वगैरे गोष्टींचा आढावा, दस्तावेजीकरण हे या प्रकल्पातून झालेलं काम. हे काम पन्नास खंडांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रकाशित होणार आहे. यातला महाराष्ट्रातल्या भाषांविषयीचा खंड 'पद्मगंधा प्रकाशना'तर्फे काल प्रकाशित झाला. हा खंड पाहायला मिळालेला नसल्यामुळे त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. पण या खंडाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी काही ना काही लिहून आलंय. 'लोकप्रभा' साप्ताहिकाचा ताजा (२३ ऑगस्टचा) अंक या प्रकल्पावर केंद्रित केलाय. त्यात बऱ्यापैकी माहिती आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात लिपी असलेल्या आणि नसलेल्या अशा मिळून ५६ भाषा बोलल्या जातात. त्यातल्या मराठी आणि गोंडीला स्वतःची लिपी आहे. या अंकात देवी यांची मुलाखतही आहे. आपण नोंदीत जो बिंदू पकडू पाहतोय त्याला जोडून 'लोकप्रभे'तल्या या विशेष विभागातली एक चौकट पाहू. या चौकटीतला मजकूर असा आहे पाहा :
भाषा हाच संस्कृतीचा अस्सल आधार

खरं तर सगळ्याच प्रमुख भारतीय भाषा बोलणारे समाज आज चक्रव्यूहात सापडले आहेत. मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिलं, तर ती इंग्रजीला सरावत नाहीत. साहजिकच ती चांगल्या नोकऱ्या, चांगल्या संधींपासून लांब जातात. त्याचा आर्थिक फटका बसतो. इंग्रजीतूनच शिक्षण दिलं, तर ती हळूहळू मातृभाषेपासून दुरावत जातात; पण जगण्याच्या लढाईत ती वरचढ ठरण्याची शक्यता असते. सामान्य माणसाचं देणं-घेणं रोजच्या जगण्याच्या संघर्षांशी असतं. त्यामुळे मातृभाषेपेक्षा तो रोजीरोटी मिळवून देणाऱ्या भाषेला प्राधान्य देणार हे उघडच आहे. विसेक वर्षांपूर्वी वरच्या स्तरात असलेला हा ट्रेंड मध्यमवर्गात झिरपला आणि हळूहळू तो निम्न मध्यमवर्गातही झिरपतो आहे. कुणाला पटो न पटो; पण भाषिक बहुविविधता असलेल्या आपल्या देशात वरच्या पातळीवर इंग्रजी आणि तळाच्या पातळीवर हिंदी याच व्यवहारभाषा झाल्या आहेत. मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्यांना, मुख्य प्रवाहात राहू इच्छिणाऱ्यांना या भाषा येण्याशिवाय पर्याय नाही.

अशा परिस्थितीत स्थानिक भाषा म्हणजेच मातृभाषा कामचलाऊ ठरत जाण्याचा धोका असतो. मराठी भाषेच्या बाबतीत त्याची चुणूक दिसायला आज सुरुवात झाली आहे.

कॉल सेंटरच्या नोकरीतली गरज म्हणून अमेरिकन धाटणीचं इंग्रजी अस्खलित बोलू शकणाऱ्या मुलांना मराठीशी दोन हात करावे लागतात. इथे प्रश्न फक्त मराठी बोलण्याचा नसतो. मराठी ही निव्वळ भाषा नाही, ती या समाजाची संस्कृती आहे. भाषा म्हणून मराठी आज चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देत नसेल; पण ती एका समाजाची ओळख आहे, अस्मिता आहे. मराठी म्हणवून घेणाऱ्या माणसाची मुळं थेट ज्ञानेश्वर, मुकुंदराजापर्यंत असतात. संतांनी त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक मनाची मशागत केलेली असते. वारी न करताही त्या परंपरेशी तो मनानं जोडला गेलेला असतो. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, जेजुरीचा खंडोबा यांच्याबरोबरच शिवाजी महाराज हे त्याचं आराध्यदैवत असतं. गड-किल्ल्यांवरचा मोकळा वारा त्यानं कधी ना कधी तरी अभिमानानं छातीत भरून घेतलेला असतो. ओव्या-अभंगांनी, कीर्तनानं त्याच्या थकल्याभागल्या जिवाची हुरहुर कमी केलेली असते. लावणीबरोबरच शाहिरीत त्याचा जीव रमलेला असतो. पिठलं-भाकरी आणि मिरचीच्या ठेच्याचं नाव काढलं तरी त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. त्याला गनिमी कावा माहीत असतो आणि अमृताते पैजेवर जिंकण्याचा दावा करणाऱ्या त्याच्या भाषेला तितक्याच करकरीत शिव्यांचंही वावडं नसतं. ही यादी आणखी कितीतरी वाढत जाऊ शकते.

इंग्रजीतून शिकणारी, पोटापाण्यासाठी जगभर कुठेही जाण्याची शक्यता असलेली उद्याची पिढी मराठी भाषेशीच जोडली गेली नसेल, तर ती या परंपरांशी तरी कशी जोडली जाणार? वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबर तितक्याच वेगानं बदलणाऱ्या जगात व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आपली ओळख ठसवायची असेल, तर भाषा, संस्कृती हाच अस्सल आधार ठरतो.

लोकप्रभा : २३ ऑगस्ट २०१३
या चौकटीतला मुद्दा काय आहे? आर्थिकदृष्ट्या ही भाषा माणसं तगवायला उपयोगी पडत नसेलही, पण सांस्कृतिकदृष्ट्या ती किती मोलाची आहे! आणि 'लोकप्रभे'च्या कव्हर-स्टोरीचं शीर्षक हे आहे : बोलीभाषाच करतील भारताला सुपरपॉवर! 'सुपरपॉवर' ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत नसल्यामुळे त्याबद्दल काही बोलणं शक्य नाही. दहा रुपयांमध्ये 'लोकप्रभे'चा हा ७६ पानी अंक मिळतो, त्यामुळे तुम्ही तो सहज जाताजाता विकत घेऊन वाचू शकता किंवा वेबसाइटवर पाहता येईलच. त्यावर आपापलं काय वाटतं तेही ठरवता येईल. मूळ मुद्दा आहे तो या सगळ्यात आर्थिक आणि सांस्कृतिक असे वेगवेगळे भाग काढून भाषेबद्दल काही म्हणणं मांडल्यासारखं दिसतं. तसं ते इतकं सहज असेल का? नसावं. आणि त्यात एकाच ठिकाणी कितीतरी विरोधाभास दिसतोय. याच अंकातल्या मुलाखतीत देवी म्हणतात  : ''मोबाइल घ्या, कॉम्प्युटर घ्या, त्यांच्या तंत्रज्ञानात भाषा हा मुख्य आधार आहे. त्यामुळे माझ्या मते भाषा या वस्तूला यापुढच्या काळात महत्त्व येत जाणार आहे.'' देवी यांच्या या म्हणण्यामागे जे कारण आहे तेही त्यांनी पुढे एका प्रश्नाच्या उत्तरात थोडं स्पष्ट केलंय, ते असं : ''आता इंटरनेट, कॉम्प्युटरवर जास्त व्यवहार इंग्रजीत आहेत हे खरं आहे, पण कॉम्प्युटरच्या तंत्रज्ञानाच्या मुळाशी ग्रीक भाषा आहे. म्हणजे कॉम्प्युटर तंत्रज्ञान हे ग्रीक भाषेवर अवलंबून आहे. ० आणि १ ही दोन चिन्हं हा त्या भाषेचा मुख्य आधार आहे. ० चा अर्थ आहे, संपूर्ण अनुपस्थिती आणि १ या चिन्हाचा अर्थ आहे, उपस्थिती. या दोन चिन्हांच्या संबंधांवर कॉम्प्युटरचं काम चालतं. किंवा त्यांच्या मापात कॉम्प्युटरचं डोकं चालतं असं म्हणता येईल. म्हणजे पाचशे वेळा शून्य हे चिन्ह आणि दोनशे वेळा एक हे चिन्ह म्हणजे त्याचा अर्थ अमुकतमुक अशी नोंद कॉम्प्युटर घेतो.'' इथपर्यंत सांगून झाल्यावर शेवटाकडे देवी ज्या मुद्द्यावर येतात तोही आपल्याला नोंदवायला हवा, तो असा आहे : ''वास्तविक एवढ्या भाषा असणं ही आपली सांस्कृतिक संपत्ती आहे. उद्याच्या काळातल्या तंत्रज्ञानासाठी आपण जमेच्या बाजूला आहोत. बराच काळ आपण आपल्याकडे असलेले भटके विमुक्त, मागास हे सगळे समाज, त्यांच्या भाषा बोजा मानत आलो आहोत. कधी यांचा विकास होमार, हे कधी समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार, यांच्या या सगळ्या मुख्य प्रवाहात फारशा उपयोगी नसलेल्या भाषांचं काय करायचं, त्यातून यांची सुधारणा कशी होणार हा आपला दृष्टिकोन बराच काळ राहिला आहे. पण तो आपल्यावरचा बोजा नाही, तर ती आपली सांस्कृतिक श्रीमंती, ते आपलं सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाषेवर आधारित तंत्रज्ञान विकसित होण्याच्या काळात तर ते आपलं भांडवल आहे. हे आपलं सांस्कृतिक भांडवल आहे आणि त्याच्यामध्ये आर्थिक भांडवल बनण्याच्या क्षमता आहेत. ही बाब नीट लक्षात घेतली तरच आपल्या भाषा जिवंत राहतील आणि त्यांच्यामुळेच आपल्याला आर्थिक सुबत्ता येईल.''

या आर्थिक सुबत्तेलाच 'कव्हरस्टोरी'च्या शीर्षकामध्ये 'सुपरपॉवर' म्हटलंय का? माहीत नाही. देवी यांच्या मुलाखतीचं शीर्षक आहे - 'भाषाच होणार आपले आर्थिक भांडवल.' हीच मुलाखत आजच्या 'लोकसत्ते'च्या 'लोकरंग' पुरवणीतही वाचता येईल. शिवाय 'लोकरंग'मध्ये अरुण जाखडे आणि संदेश भंडारे यांचे लेखही आहेत याच विषयासंबंधी.

या प्रकल्पाच्या निमित्ताने कालच 'मिंट' या आर्थिक घडामोडींशी संबंधित वृत्तपत्राच्या 'लाउन्ज' या पुरवणीतही देवी यांची मुलाखत आलेय. 'प्रत्येक भाषा हा जगाकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो' अशा शीर्षकाच्या या मुलाखतीतही वरच्या मुलाखतीप्रमाणेच मतं सापडतील. जगाकडे बघण्याचे ५६ दृष्टिकोन एकट्या महाराष्ट्रातच आहे ही नक्कीच खूप सुंदर गोष्ट आहे आणि त्याबद्दल नोंद होणं हेही चांगलंच. त्याबद्दल आपण या प्रकल्पाचं अभिनंदन करूया. पण त्याबरोबर भाषेच्या आर्थिक आणि सांस्कृतिक अशा बाजू पाहताना काही गफलती होतायंत का, तेही पाहायला हवं असं वाटतं. कारण इतिहासातली अनेक उदाहरणं देता येतील ज्यात तत्कालीन समाजामध्ये कमी स्तरावर बोलली जाणारी भाषा नंतर सत्ताधाऱ्यांची भाषा बनली वगैरे. ती देवी यांच्या 'लाउन्ज'मधल्या मुलाखतीत आहेतही. पण आपल्याला नोंदीच्या पहिल्या भागात जो मुलगा भेटला त्या समकालीन माणसाला काय आणि कसं समजवायचं? माहीत नाही.
***

तीन

या सगळ्या गोष्टींमध्ये विरोधाभास आहे असं आपण वरती म्हटलं, त्यासंबंधी 'रेघे'कडेच बोट दाखवायचं, तर विद्याधर दाते यांच्या 'भाजप, भाषा आणि भाकडकथा' या मागच्या एका लेखाकडे वळता येईल. यात दाते एका ठिकाणी म्हणतात :
सत्ताधाऱ्यांना मराठी किंवा इतर स्थानिक भाषांना पाठिंबा देण्यामध्ये फारसा रस नाही. उलट ते नव-उदारमतवादी आणि साम्राज्यवादी शक्तींसाठी कार्यरत असल्याप्रमाणे वागत आहेत. त्यामुळेच पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी शिकवण्याचं धोरण राबवलं गेलं. वास्तविक, विविध आंतरराष्ट्रीय संघटना आणि 'युनेस्को'नेही हे स्पष्ट केलेलं आहे की, आपल्या मातृभाषेतूनच मूल चांगल्या प्रकारे शिकू शकतं.

अशा करूण परिस्थितीतून ही विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे. भारत असो, किंवा पाकिस्तान वा नामिबाया असो, इथल्या गरीबातल्या गरीब लोकांनाही वाटतं की, आपल्या मुलांना इंग्रजी भाषा शिकवायला हवी, इंग्रजी माध्यमातून त्यांचं शिक्षण व्हायला हवं. याचा परिणाम म्हणजे गरीब विद्यार्थी ना धड इंग्रजी शिकू शकतो ना त्याला स्थानिक भाषा धड शिकता येते.
यातली पहिल्या परिच्छेदातली पहिली दोन सरसकट वाक्यं नक्की काय सिद्ध करतात? की मुद्द्यामधली गुंतागुंत संपवून टाकतात? आपण नोंदीच्या सुरुवातीला ज्या मुलाबद्दल सांगितलं त्याला भाषेबद्दलचे हे युक्तिवाद पटतील? का पटावेत? मुळात दाते यांचा लेखही इंग्रजीत लिहिलेला आणि आपण 'रेघे'वर तो मराठीत नोंदवला यातच किती विरोधाभास आहे. आपल्याला काही मुद्द्यांसाठी ते तसं करणं योग्य वाटलं आणि 'रेघ'वर सगळ्या मुद्द्यांना लोकशाही जागा आहे, असं एक आपलं म्हणणं असल्यामुळेही तो प्रयत्न केला जातो. तरीही त्यातल्या सरसकटीकरणाकडे वाचकांनी दुर्लक्ष करायला नको. आणि दाते यांच्या लेखाबद्दल बोलायचं तर, 'उच्चभ्रू' असं म्हणून आपण ज्या धोरणाला हिणवतो आणि विरोधी म्हणणं मांडतो तेव्हा पुन्हा काही 'उच्चभ्रू'च म्हणणं मांडलं जातं का ते पाहिलं पाहिजे.

अजून एक इथे नोंदवायला पाहिजे. भालचंद्र नेमाडे यांनी 'देशीवाद' नावाचं काहीएक म्हणणं मांडलं, त्यासंबंधी त्याच नावाचं नेमाड्यांचं एक इंग्रजी पुस्तक शिमल्याच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज्' या संस्थेने २००९मध्ये प्रकाशित केलंय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नेमाडे म्हणतात :
-
मराठीमध्ये मी मांडलेली देशीवादाची भूमिका ज्यांनी गांभीर्यपूर्वक केलेल्या अनुवादांमुळे देशातील अधिक मोठ्या स्तरावरच्या अकादमिक वर्तुळांपर्यंत पोचली त्या सांस्कृतिक अभ्यासविषयांमधील ज्येष्ठ स्कॉलरांचे मी आभार मानू इच्छितो. यातील पहिले, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक मकरंद परांजपे यांनी त्यांच्या 'नेटिव्हिझम् : एसेज् इन क्रिटिसिझम्' (साहित्य अकादमी, नवी दिल्ली, १९९७) या पुस्तकामध्ये देशीवादाची संकल्पना सक्षमपणे उलगडली आहे. पहिल्यांदा १९८३मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'साहित्यातील देशीयता' या माझ्या निबंधाचा अनुवाद या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.
काही मुद्द्यांमधलं तथ्य लक्षात घेतलं तरी भाषिक व्यवस्थेबद्दलचा हा समकालीन विरोधाभास कसा उलगडायचा. आपल्या भूसांस्कृतिक वैशिष्ट्यांकडे, त्यातून आलेल्या भाषेकडे सजगपणे पाहावं - हा देशीवादाचा एक भाग आहे हे पाहता ही भूमिका भारतातल्या बुद्धिमंतांच्या वर्तुळात पसरण्यामागेसुद्धा इंग्रजीचा हात असावा, हे नक्की कसं समजावून घ्यायचं? किंवा का समजून घ्यावं?

या भागात आपण दाते आणि नेमाडे यांच्याबद्दल बोललो कारण दोघांच्याही कामांना महत्त्व आहे आणि दोघांचाही आयुष्यातला आर्थिक उत्पन्नाचा मुख्य मार्ग इंग्रजी भाषेशी संबंधित होता. दाते इंग्रजी पत्रकारितेत होते तर नेमाडे इंग्रजीचे शिक्षक होते. देवी यांचंही मुख्य आर्थिक उत्पन्न बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठात इंग्रजी शिकवण्यातून होत होतं. यात खरोखरच गैर काहीच नाही, पण आपल्याला सांस्कृतिक आधार देणारी मराठी आर्थिक आधार देताना उपयोगी पडत नाही असा याचा अर्थ घ्यायचा का? किंवा आपला सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की, सुरुवातीला भेटलेल्या मुलाला कसं समजवायचं?

आपल्या परंपरेत व्यक्तीचं मोठेपण मान्य करूनही प्रश्न विचारणं हा एक भाग असावा, किंवा नसल्यास तो आणावा. तसं न करता आपली कायतरी पिढी आहे असा समज करून घेऊन आक्रस्ताळी शेरेबाजी करावी असा एक भाग करता येईल, पण मग मुद्द्यापेक्षा व्यक्तिकेंद्रीत प्रसिद्धीबाजी मजबूत होईल. हा स्वतंत्र मुद्दा आहे, पण जाताजाता.. मराठी भाषेतल्या सांस्कृतिक अंगासंबंधीचं निरीक्षण म्हणून बोललो, बाकी वेगळं बोलण्यासारखं काय आहे काय. एका सामान्य पुस्तकाची आवृत्ती जिथे साधारणपणे निव्वळ एक हजार प्रतींची निघते तिथे प्रश्न विचारण्यापेक्षा व्यक्तिगत आरोप करण्याचा कोतेपणा जास्त साहजिक असेल कदाचित.
***

चार

आता आपण नोंदीच्या शेवटच्या भागाकडे आलोय. पहिल्या तीन भागांमधून जे काही म्हटलं ते फारच नकारात्मक वाटतंय ना? पण पहिल्या भागातला मुलगा आपल्याला कालच भेटावा आणि त्याने 'रेघे'वर नोंद करायला लावावी यामुळे ते तसं झालंय. आणि त्या पहिल्या भागात, मुलाच्या बाजूने जे म्हणणं आहे ते जसंच्या तसं आहे, आपण एका कणाचीही भर घातलेली नाही, हेही मुद्दाम नोंदवायला हवं. त्याचं जे म्हणणं आहे त्यात त्याच्या बाजूने अजिबातच भाबडेपणा नाहीये. स्पष्ट आणि प्रामाणिक गरज आहे आणि तेवढीच तो बोलतो. बाकी या सगळ्यात काही सकारात्मक मुद्देही कदाचित बोलता येतील पण ते आपण बोलू शकत नाही, त्यापेक्षा देवींचं ऐकूया :



मुंबईतल्या 'टेड' कार्यक्रमातला हा व्हिडियो आहे. प्रत्येक भाषा हा जगाकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन असतो, हाच मुद्दा देवी यांनी सहज आणि सुंदरपणे मांडलाय. पण इथे आणखी एक सांगण्यासारखं आहे, ते देवी यांच्या 'वानप्रस्थ' या पुस्तकातलं. या पुस्तकामध्ये पान २१ वर देवी म्हणतात :
पद्मगंधा प्रकाशन
... वनामध्ये एक वनस्पती दुसऱ्या वनस्पतीला वाढू देत नाही, असे कधीही होत नाही, निलगिरीच्या झाडाजवळ इतर झाडे येत नाहीत, असे म्हणतात; पण बऱ्याच वेळेला निलगिरीवर फार चांगले पक्षी मी बघितलेले आहेत. स्वतःची मुळे जपून इतरांचा तिरस्कार करू नये हे झाडापासून शिकण्यासारखे.
यातला वनस्पतीशास्त्राचा मुद्दा आपल्या माहितीतला नाही, पण त्याशिवायही वाक्यातल्या वाक्यात जरा घोळ झालाय. निलगिरीच्या झाडाजवळ इतर झाडे येत नाहीत, या आक्षेपाला उत्तर म्हणून त्या झाडाजवळ पक्षी येतात हे कसं काय सांगता येईल? ही जर 'प्रुफरिडींग'ची चूक असेल तर मात्र आधीच माफी मागूया.

बाकी, झाडाकडून आणखीही एक शिकण्यासारखं आहे. झाड दुसऱ्यासाठी काहीच करत नाही. पानं, मुळं, फांद्या, फळं सगळं फक्त स्वतःच्या जगातल्या टिकण्यासाठी सुरू असतं. हा स्वार्थीपणा म्हणजे झाडाचा फार महत्त्वाचा गुण. अर्थात त्याच वेळी ते सहिष्णूही असेल, त्यामुळे कोणी यातलं काहीही तोडलं, मोडलं नि स्वतःसाठी वापरलं तर ते काही आक्षेप घेत नाही. त्यामुळे माणसाने आता यातलं काय नि कसं शिकायचं ते जरा अवघडच आहे.

पत्रकारी हेतूची आपली नोंद इथेच संपतेय. मुद्दा भाषेविषयीचा तर त्यात भाषाशास्त्रज्ञांनी, भाषा शिक्षकांनी बोलणंच जास्त बरं असेल. आपण तर त्यातलं काहीच नाही. तरी आपण बोललो आणि लिपीच्या मदतीने लिहिलं. कारण पुन्हा भाषेनेच आपल्याला त्यासाठी पुढे ढकललं. म्हटलं तर भारी आणि म्हटलं तर बिचारी अशा अवस्थेतल्या या भाषेबद्दल बिचारे ना. गो. कालेलकर त्यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या पुस्तकात काय म्हणतात ते नोंदवून शेवट करून टाकू. पुस्तकाची पहिली आवृत्ती १९६२मधली आहे, त्यासंदर्भात हे पाहावं लागेल. तर कालेलकर म्हणतात :
शास्त्रीय संशोधनात अग्रेसर अशा ज्या समाजांतून विश्व पादाक्रांत करण्याचे हे प्रयत्न होत आहेत त्या समाजांची भाषा त्या दिशेने समृद्ध होत चालली आहे. ज्या समाजांजवळ ही झेप नाही त्यांना या आघाडीवर असलेल्या समाजांच्या भाषा आत्मसात केल्यावाचून गत्यंतरच नाही. कारण केवळ आपल्या संस्कृतीच्या साधनांवर अवलंबून राहून आजच्या क्रांतियुगात आपला निभाव लागणार नाही. एक नवी विश्वसंस्कृती आपणा सर्वांना एकत्र आणू पाहत आहे. तिचे योग्य ज्ञान होण्यासाठी तिला प्रभावी रितीने व्यक्त करणारी एखादी तरी भाषा आपल्याला शिकावीच लागेल, कारण जीवनाचे नवे अनुभव स्वतःमध्ये साठवून ते व्यक्त करण्याच्या दृष्टीने आणि ज्ञानमार्गावर मानवाची ज्या वेगाने प्रगती होत आहे तिच्या तुलनेने आज कोणतीही भारतीय भाषा समर्थ आहे असे वाटत नाही.

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. आपल्या नोंदी आवडल्या. अधिक थेटपणे देवींची बुवावाजी उघड केली पाहिजे असे वाटते.
    इतके अशास्त्रीय तारेतोड प्रतिपादन निव्वळ प्रस्थापित आहेत म्हणून आपल्याकडे खपवून घेतले जाते. कुणीच का बोलत नाही यावर?

    ReplyDelete