Tuesday, 1 December 2015

तीन मावश्यांच्या मृत्यूची कहाणी

इंदूर - नगर
पहाटेच केव्हा तरी जाग आली, म्हणजे अंधारातच एक दिवा फिरताना दिसतो. त्याच्याही आधीची गोष्ट.
- हा रघू दंडवत्यांच्या 'मावशी' या कथेचा 'उपोद्घात' आहे. मग कथा सुरू होते इंदुरातल्या मावशीच्या आठवणी सांगत, नंतर मावशीसोबत कथा नगरला येते. तिथंही अशीच वाक्यं येतात-
मावशी पहाटेच केव्हा उठायची, त्याचा कुणाला पत्ताच लागायचा नाही. पहाटेच केव्हातरी जाग आली म्हणजे अंधारात एक दिवा फिरताना दिसायचा. तोंडानं काहीतरी म्हणत मावशी अंघोळ उरकून घ्यायची आणि पहाटेच पूजेला बसायच्या आधी मला अभ्यासाला उठवायची.
अंधारात पूजेसाठीचा दिवा घेऊन जाणारी मावशी अंधारात एवढी मिसळलेली असावी की दिसूच नये. या कथेच्या 'उपसंहारा'त मावशी वारल्याचं पत्र येतं आणि नंतर मग कथा संपतेच. ही कथा 'अथर्व' या अनियतकालिकाच्या एकमेव अंकात आली होती. १९६१ साली. बहुधा ती कुठल्या पुस्तकात आलेली नाही. आपण इथं नोंदवली ती वाक्यं म्हणजे अंधारात फिरणारा दिवाच फक्त. अख्खी मावशी अंधारात.
.

मॅक्सिको

पेंग्वीन, १९६९. मुखपृष्ठ मांडणी: जर्मनो फॅसेटी
मूळ चित्र: दिएगो रिव्हेरा
आपण असेच रस्त्यानं जात असतो. रस्त्याकडेला कोणीतरी जुनी पुस्तकं विकत बसलेलं असतं. आपण सहज थांबतो. एक छोटंसं मळलेलं पुस्तक असतं. त्याच्यावर नाव असतं, 'अ डेथ इन द सांचेझ फॅमिली'. नावात मृत्यू बघून पुस्तक पाहावंसं वाटतं. लेखकाचं नाव- ऑस्कर लेवीस. कव्हरवरचं चित्रही खिन्न वाटवणारं असतं. त्यातही बहुधा कोणीतरी मरून पडल्यावर लोक जमलेत. आपल्या माहितीतलं नसतं पुस्तक, म्हणून आपण उचलतो. दीडेशेहून थोड्या कमीच पानांचं. मग अजून पुढून-मागून कव्हर पाहिल्यावर, आस-पास पाहिल्यावर आपल्याला कळतं की 'सोशालॉजी/अँथ्रपॉलॉजी/लिटरेचर' असा पुस्तकाच्या विषयाचा विभाग मागं छोट्या शब्दांत नोंदवलाय. आणि मॅक्सिकोतल्या एका गरीब कुटुंबाचा अभ्यास करून लेखकानं हे पुस्तक लिहिलंय. लेखक अमेरिकेतल्या कुठल्या विद्यापीठात मानवशास्त्राचा प्राध्यापक राहिलेला असतो हे त्यात लिहिलंय. बाकी, अमेरिकेच्या 'नॅशनल इंडियन इन्स्टिट्यूट'शी आणि 'फोर्ड फौंडेशन'शी लेखकाचा संबंध राहिल्याचं तिथंच माहितीत लिहिलंय. मग आपण नेटवर सर्च मारतो 'oscar lewis'. आणि मग त्यानं मॅक्सिकोतल्या गरीब वस्त्यांमध्ये जाऊन केलेला अभ्यास, त्यातून काढलेली अशीच सांचेझ कुटुंबासंबंधीची बाकीची पुस्तकं, वगैरैची जरा जास्त माहिती मिळते. मग आणखी शोधल्यावर 'कल्चर ऑफ पॉवर्टी' ही त्यानं मांडलेली संकल्पना दिसते. जगभरातल्या गरीबांमध्ये काही सांस्कृतिक साम्य असतं. दारिद्र्यनिर्मूलनाचे कार्यक्रम राबवूनही गरीबी संपत नाही, कारण काही विशिष्ट मूल्यदृष्टी दारिद्रयाच्या संस्कृतीत असते नि ती(तीही/तीच?) या सगळ्यांत अडथळा ठरते, असा या मांडणीतला सूर असल्याचं 'विकिपीडिया' सांगतो. मग त्यावर कोणीकोणी टीका केलेले लेखही सापडायला लागतात. आणि मग हा माहितीचा प्रवाह थांबतच नाही. 'गरीब हे गरीब असतात त्यामागं त्यांच्या परिस्थितीतल्या मूल्यांचा(ही/च) हातभार असतो', असा आशय या संकल्पनेत आहे, त्यामुळं अमेरिकेच्या भांडवली आक्रमणमाला पूरक अशी या माणसाची मांडणी आहे, असं कोणी म्हणतं. लेवीस यांचा संबंध ज्या संस्थांशी आलाय, त्यावरून पुन्हा मग शंकेला आणखी जागा मिळते. शिवाय म्हणणं तितकं ठोसही वाटत नाही. ही मांडणी कालबाह्य झाल्याचं कुठंतरी म्हटलेलं असतं. कुठंतरी म्हटलेलं असतं, आता या सगळ्याला परत महत्त्व आलंय. असं साधारण तासभरात नेटवर फिरून आपल्याला कळलं की आपण एवढा परिच्छेद लिहू शकतो. पण याला काहीच अर्थ नाही. मानवशास्त्र किंवा समाजशास्त्र यासंबंधी मुद्दाम कशामुळं आपण ते पुस्तक घेतलेलं नसतं. आपल्याला त्यातली काही माहितीच नसते तर कशाला उगाच. आपला तर कदाचित 'सांचेझ' हा उच्चारही चुकीचा असेल. पण तरीही आपण ते पुस्तक वाचण्याला अर्थ राहातो कायतरी. पुस्तकात काही स्पष्ट शास्त्रीय मांडणी नाहीये. एक प्रस्तावना आहे आणि कुटुंबातल्या तीन व्यक्तींची तीन भागांमध्ये तीन-तीन प्रथमपुरुषी कथनं आहेत. शिवाय आर्थिक माहितीचं पाच पानी परिशिष्ट आहे. विश्लेषणापेक्षा वर्णन  आहे. मावशीच्या मृत्यूची माहिती आपल्याला कशी मिळाली, मग आपण तिथं कसे पोचलो, इथपासून शेवटचे विधी उरकण्यापर्यंत कुटुंबातील काही सदस्य आपापली कथनं करतात, म्हणजे लेखकानं ती ऐकून लिहिलीत, असं स्वरूप आहे. मावशीचा मृत्यू कॅन्सरनं उपचाराविना झालेला असतो. आपण ते पुस्तक साहित्य म्हणून वाचलं तर त्यातल्या मजकुरातून माहितीच्या प्रवाहापेक्षाही (किंवा त्याच्यासोबत, असं म्हणू) जिवंत कायतरी आपल्यापर्यंत पोचू शकतं. आणि एवढं वीस रुपयाला स्वस्तात सहज रस्त्यात पुस्तक मिळालेलं असतं तर ते वाचायला हरकत नाही ना. शिवाय साहित्य म्हणजे सगळ्या सहित असत असेत तर त्यात कालबाह्य नि कालसुसंगत, चांगलं नि वाईट, बोगस नि अस्सल, शास्त्र नि अशास्त्र, जिवंत नि मृत, सगळ्याला जागा असायला-ठेवायला काय हरकत आहे. शेवटी मॅक्सिको शहरातल्या एका झोपडपट्टीत १९६२च्या नोव्हेंबरात सांचेझ कुटुंबात एक मावशी वारली होती, हे जास्त खरं आहे. माहिती मरत नसली तरी माणसं मरतात, आणि कायमचीच मरतात. त्यामुळं माहितीपेक्षा माणसं खरी आणि बरीसुद्धा.

या पुस्तकात वारलेल्या मावशीचं नाव आहे ग्वादलूप:
ग्वादलूप जगली तशीच वारली. औषधं नाहीत, न संपणारी वेदना ठणकत, पोटात भूक, हॉस्पिटलमध्ये जायला बसच्या तिकिटासाठी पैसे कसे जमवायचे, घरभाडं कसं द्यायचं याचा विचार करत सतत, आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जगणं आणण्यासाठी अनेक करूण कामांमध्ये गुंतलेली. काहीच मूल्यवान वस्तू मागं ठेवलेल्या नाहीत. काही धार्मिक वस्तू आणि भाड्याची बारकी जागा एवढंच (मावशीचं मृत्यूनंतर उरलेलं सामान).
तर मॅक्सिकोतल्या या मावशीचा मृत्यू असा झाला.

रत्नागिरी

आनंद मानवी नावाचे रत्नागिरीचे एक लेखक एप्रिल २०१५ मध्ये वारले. त्यांचा 'लाल भिंतीतले कोनाडे' हा कथासंग्रह नागपूरच्या 'सुखगंधा प्रकाशना'नं प्रकाशित केला होता. पहिली आवृत्ती जुलै १९८७ मधली आहे. हा कथासंग्रह आता बाजारात उपलब्ध नाही. या कथासंग्रहात 'झोपाळ्यावरची मावशी' नावाची एक सुंदर गोष्ट आहे. या कथेतली मावशी पूर्ण वेडी आहे. म्हणजे खरोखरच वेडी. शाळेबिळेत जायचा प्रश्नही न येण्याएवढी वेडी. बाकी जग शहाणं-सुज्ञ असतं बहुधा, तशी ही मावशी नाही. ही देवाची पूजा करणारीही मावशी नाही. ही झिरंबवली गावातल्या एका घरात ओटीकडच्या पडवीत झोपाळ्यावर बसून राहणारी वेडी मावशी आहे. पाच फुटापेक्षाही कमी उंची असलेली. तिच्या वेडेपणाचा उत्सवच आहे या गोष्टीत. या कथेच्या शेवटी साधारण छप्पन वर्षांची ही मावशी वारलेली असते. तिच्या मृत्यूचं कारण हा काही फार माहिती घेण्याजोगा विषयच नसतो. पण बहुधा हार्टअटॅकनं गेली असावी, म्हणतात लोक, असं कथेत म्हटलंय. आपण हा कथेचा शेवट आपल्या नोंदीच्या शेवटी नोंदवू:
मावशी वेडी होती, त्यामुळं तिचं आयुष्य हसत गेलं. ती क्वचित रडलीही. पण बहुतांश आयुष्य हसण्यात गेलं, कारण ती ठार वेडी होती. आजीच्या चपला नव्हत्या, तशाच मावशीच्याही चपला नव्हत्या. तिचं सगळं हसरं आयुष्य झिरंबवलीतल्या घरात, पडवीत नि अंगणातच गेलं. त्या पलीकडं नाहीच फारसं. जास्तीत जास्त मागच्या समुद्रापर्यंत कधी गेली असेल. सातासमुद्रापार जायची ओढ तिला नव्हती. त्यामुळं समुद्रासारख्याच तिच्याकडंही चपला नव्हत्या. तीही समुद्रासारखी तिथल्यातिथंच आयुष्यभर पडून होती. हसण्याच्या भरत्या-ओहोट्या सुरू असायच्या. आणि ती गेली तेव्हा समुद्र रिकामा झाला.
०००

सावलीचा मृत्यू (फोटो: रेघ)

1 comment:

  1. आणि तानीमावशी राह्यलीच की!

    ReplyDelete