Thursday 4 April 2013

एक वेडा संपादक नि त्याचा अंक : चंद्रकांत खोतांचा 'अबकडइ'

अबकडइ. लोकवाङ्मय गृह. आवृत्ती : २०१२
संपादक : सतीश काळसेकर, अरुण शेवते
मुखपृष्ठ : सतीश भावसार
चंद्रकांत खोत या नावाची साधारण ओळख द्यायची तर १९६०च्या दशकात सुरू झालेल्या अनियतकालिकांच्या चळवळीतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मंडळींमधले एक. त्यांनी कविता केल्या, कादंबऱ्या लिहिल्या (आधी अश्लील आणि नंतर अध्यात्मिक!) आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे 'अबकडइ' नावाचा अंक काढला. हा अंक १९७०च्या आसपासच्या अनियतकालिकांच्या घडामोडीतला होता. १९७३पर्यंत तो अनियतकालिक स्वरूपात निघत होता आणि त्या घडामोडी थंडावल्यानंतर त्यांनी याच नावाचा दिवाळी अंक सुरू केला आणि तो त्यांनी १९७३ ते १९९६ अशी चोवीस वर्षं काढला. त्यातली १९७६-७७-७८ अशी तीन वर्षं सोडता दर दिवाळीला 'अबकडइ' निघाला. असे हे 'अबकडइ' दिवाळी अंक स्वरूपातले एकवीस अंक.

आपण 'रेघे'वर आज करतोय ती नोंद खोतांच्या 'अबकडइ'च्या अंकांमधून निवडून काढलेल्या लेखांच्या 'निवडक अबकडइ' या खंडाविषयी. सहाशेचार पानांचा हा खंड आहे.

इतर दिवाळी अंकांपेक्षा 'अबकडइ'मधे असं काय वेगळं होतं, ज्यामुळे आपण एवढं त्याबद्दल विशेष बोलावं? पहिला वेगळेपणा - अनियतकालिकांच्या घडामोडींमधून हा अंक घडलेला असल्यामुळे आधीच्या घडामोडींमधली आपलं म्हणणं मांडण्यातली मोकळीक या अंकामधे उतरलेली. दुसरा वेगळेपणा - या अंकाचा संपादक वेडा होता. आणि आपण आपल्या मनाने त्याला वेडं म्हणायला नकोय, तो स्वतःच स्वतःला वेडं म्हणवून घेतोय.
***


वेडा संपादक

चंद्रकांत खोत नावाच्या संपादकाचा हा वेडेपणा समजून घ्यायला आपल्याला त्याची 'आणि डायरी एका वेड्या संपादकाची' हा लेख वाचायला लागेल. १९८७ चा 'अबकडइ' 'दैनंदिन, रोजनिशी, वासरी-डायरी' विशेषांक म्हणून काढायचा असं निश्चित केल्यानंतर हा संपादक अभिनेत्री तनुजापासून ते समाजवादी नेते मधू दंडवते यांच्यापर्यंत कोणाकोणाच्या डायऱ्यांचा पाठलाग करायला लागतो. आणि या पाठलागाची स्वतःची डायरी लिहून ठेवतो नि तीही मग 'अबकडइ'च्या अंकाचा भाग होते.

५ जानेवारी १९८७ला करून ठेवलेल्या नोंदीत हा संपादक म्हणतो :
....
(एका) लेखात नाडकर्णी यांनी या कलावंतांच्या छोट्या छोट्या मुलाखती घेतलेल्या दिसल्या. त्यातील तनुजाच्या मुलाखतीनं माझं खास लक्ष वेधून घेतलं. 'या नाटकात काम करायचं म्हणजे तुम्हाला दौऱ्यावर वगैरे जावं लागणार' या प्रश्नाला उत्तर देताना तनुजा म्हणते - 'तेच तर माझ्या संमतीचं आणखी एक कारण आहे. मला प्रवासाची खूप आवड आहे. आम्ही सगळे मिळून प्रवास करणार आहोत. सुमारे महिनाभर आमचं एक कुटुंब असणार! शिवाय माझ्या देशातल्या वेगवेगळ्या लोकांना मी या नाटकामुळे भेटणार. एक माणूस म्हणून त्यांच्यात आणि माझ्यात सुसंवाद साधला जाईल. अशी संधी मला कधीच मिळाली नसती. माझ्या या वेगळ्या अनुभवावर मी एक डायरीच लिहिणार आहे.'
इथे 'डायरी'चा उल्लेख वाचून माझे संपादकीय डोळे लकाकले. उत्तम. तनुजापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. डायरी मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्थात तिनं बहुधा डायरी इंग्रजीतून लिहिलेली असणार. मराठी अनुवाद करता येईल का! आपल्या ग. रा. कामतांना मध्यस्थी करायला सांगायला हवे. पाहू या.


(ह्या मूळ नोंदीत सुरुवातीला दोन परिच्छेद आहेत, इथे ते गाळलेत, त्याऐवजी '....' : रेघ )

दिवाळी येईपर्यंत जे जे भेटतील त्यांना बहुधा ह्या माणसाने आपल्या वेडात सामील करून घ्यायचा प्रयत्न केला असणार :
६ फेब्रुवारी १९८७
कामानिमित्त फोर्टमध्ये संध्याकाळी श्री. बेसिल डेव्हिड या माझ्या परिचित वकिलांना भेटायला गेलो. बराच वेगळ वाट पाहावी लागली. ते कुठं तरी कामानिमित्त बाहेर गेले होते.
भेट झाली. त्यांनी माझं अभिनंदन केलं, 'अबकडइ'ला मुंबई मराठी पत्रकार संघाचं पारितोषिक मिळाल्याबद्दल. माझ्या डोक्यात ८७च्या 'अबकडइ'चं स्वरूप भिरभिरत होतंच. मी श्री. डेव्हिड यांना सरळसरळ आमंत्रणच दिलं. डायरीसंबंधी. एका वकिलाची डायरी. येत्या सहा महिन्यांत एखाद्या महत्त्वाच्या केससंबंधी अथवा तशाच विषयावर डायरी लिहायची. त्यातून सबंध घटना वा व्यक्तिमत्त्व उभे राहिले पाहिजे. त्यांना ही अंकाची कल्पना फार आवडली. त्यांनी लिहिण्याचं कबूल केलं.

ही सगळी डायरीच इथे देत बसावं वाटतंय, पण तसं नको. आपल्याला एवढंच नोंदवायला हवंय की, हा संपादक कसा पिसाटून त्या अंकाच्या मागे लागला असेल. आणि त्याने स्वतःच्या किमान कल्पनेला तरी बंधनं घातली नसणार, त्याशिवाय तो मजकुराच्या एवढ्या उड्या मारू शकला नसता. म्हणजे आपल्या ओळखीतल्या वकिलाला किंवा डॉक्टरला सांगणं हा एक भाग. तिथून थेट सत्यजित रायच्या काकांची डायरीही मिळवायची उमेद हा संपादक बाळगून असतो :
२७ मार्च १९८७
सकाळी अलंकार-कमल टॉकीजच्या परिसरात असलेल्या जुनी पुस्तके-मासिके विकणाऱ्याकडून पन्नास पैशाला 'किशोर' मासिकाचा जानेवारीचा अंक विकत घेतला. संध्याकाळी आमच्या घराच्या बाहेर अंगणात बोगन वेलीखाली बसून सहज चाळत बसलो. त्यात 'जेव्हा मी छोटा होतो' या शीर्षकाखाली सत्यजित राय यांच्या बालपणातल्या आठवणीवजा लेखाचा अनुवाद आढळला. उत्सुकतेने वाचला. त्यात एके ठिकाणी त्यांच्या काकांच्या आठवणी आहेत. त्यात खालील मजकुराने माझे लक्ष वेधून घेतलं. 'काम, विश्रांती, खाणे, फिरणे, गप्पा मारणे या सर्व गोष्टी करीत असताना मधून मधून छोटेकाकांचं डायरी लिहिणं चालू असे. त्यांच्यासारखं डायरी लेखन इतर कुणी केलेलं मी पाहिलं नाही. त्यांच्या डायरीत वर्तमानपत्रातील महत्त्वाचे मथळे असत; प्रत्येक तासाला काय घडले याची नोंद असे. काय वाचलं, काय खाल्लं, कोण भेटायला आले, आपण कुणाकडे गेलो, कुठे गेलो, काय पाहिलं - साऱ्या साऱ्या गोष्टींचं विवरण असे. रेल्वेने ते कधी परगावी गेले तर रेल्वेचं इंजिन कोणत्या 'टाईप'चं - कोणत्या 'प्रकारा'चं होतं, हेदेखील ते डायरीत लिहून ठेवीत... छोटेकाका डायरी लिहीत तीही चार रंगांची वेगवेगळी शाई वापरून. लाल, निळी, हिरवी, काळी - एकाच वाक्यात चार रंगांचा वापर झाला आहे, अशी अनेक उदाहरणं छोटेकाकांच्या डायरीत मी पाहिली आहेत. हे चार रंग वापरण्याचे कारण काय ते बरेच दिवस मला समजलं नव्हतं. नंतर समजलं की निसर्गाचं वर्णन हिरव्या शाईनं लिहायचं, विशेष काही असेल तर लाल शाईत लिहायचं, असा त्यांचा नियम होता. उदाहरणार्थ, 'आज खूप पाऊस पडला. माणिकच्या घरी जाता आलं नाही.' यातील पहिलं वाक्य हिरव्या शाईत होतं, दुसऱ्या वाक्यातील 'माणिकच्या घरी' हे शब्द लाल शाईत होते आणि उरलेले काळ्या शाईत...'
सत्यजित राय यांच्या काकांची ही डायरी बंगालीत प्रसिद्ध झाली आहे की काय यासंबंधी चौकशी करायला हवी. अशोक शहाणे नाही तर कलकत्त्याचे श्री. बा. जोशी यांच्याकडे.

पण कधी तरी हा संपादक थकून जाणंही साहजिकच आहे. एवढ्या खटाटोपामागचं कारण स्वतःच स्वतःला अधूनमधून समजेनासं होऊ शकतं :
२६ मे १९८७
नेहमीप्रमाणे निराशेचा झटका. काहीही करावंसं वाटलं नाही. 'अबकडइ' बंद करून टाकावं. आपल्याला हवं ते मटेरिअल गोळा करताना फार त्रास होतो. एक प्रकारची हमालीच झाली. यात क्रिएशन आहे, नाही असं नाही. पण एकंदरीत हमालीच. दुसऱ्यांच्या हजामती करीत फिरणं.
दुर्गाबाईंना भेटायला जायला हवं होतं. बरेच दिवस भेट नाही. त्यांच्याकडून आर्टिकलही मिळवायला हवं.

बास आता हे. दुर्गाबाईंपाशी येऊन आपण वेड्या संपादकाच्या डायरीबद्दल बोलणं थांबवूया. दुर्गाबाईंचा 'अबकडइ'च्या बहुतेक अंकांमधे वावर होता, हे तर आहेच आणि 'निवडक अबकडइ' या खंडाची सुरुवातही त्यांच्याच 'स्यु दुंग पॉ याची कविता' या लेखाने होते. हा लेख लहानसा आहे आणि मला आवडलेला नाही.
***

वेडा मजकूर

'निवडक अबकडइ'मधे एकूण सत्तावीस लेख आहेत. त्यातले काही लेख वगळता, बाकीच्या बहुतेक लेखांबद्दल स्वतंत्रपणे लिहावं असं वाटतंय. त्यातल्या माधव मोहोळकरांच्या 'अश्कों में जो पाया है, वो गीतो में दिया है' या साहिरवरच्या लेखाबद्दल आपण आधीही 'रेघे'वर बोललो आहोत. या लेखाबद्दल खोतांनी सांगितलेली एक गोष्टही इंटरेस्टिंग आहे : 
जुन्या बाजारातून मी बरीच कात्रणं जी साहिरवर होती ती गोळा करून माधव मोहोळकरांना दिली होती. तेव्हा ग्रँटरोड पुलाखाली सिनेमातल्या गाण्यांच्या चोपड्या मिळत. मी साहिरच्या बऱ्याच गाण्याच्या चोपड्या जमा केल्या होत्या. एकदा मी आणि मोहोळकर साहिरला भेटायला गेलो. साहिरला त्या दुर्मीळ चोपड्या मी दिल्या. नवल म्हणजे साहिर थक्क झाला. खुशीत तो उद्गारला - असलाम आलेकुम! कारण त्यावेळी माझ्या डोक्यावर फरची कॅप होती. विशेष म्हणजे त्यातली काही गाणी खुद्द साहिरकडे नव्हती.

साहिरच्या कवितेबद्दल मोहोळकरांना मनापासून प्रेम वाटलेलं जसं त्यांच्या लेखातून दिसतं, तसा दुसरा एक लेख या खंडात आहे तो श्रीकांत सिनकरांचा : 'आनंदे नाचत पंढरीसी जाऊ'. हे लेख निव्वळ मनापासून दाद देण्यासाठीच लिहिलेले आहेत. आणि ही दाद द्यायला काहीही बंधनं नाहीत याचं एक मोठं श्रेय 'अबकडइ'ला द्यायला हवं. नाहीतर पोलीस चातुर्य कथांसाठी प्रसिद्ध असलेले, (एका अर्थी 'पल्प फिक्शन' म्हणता येईल त्या पद्धतीचे लेखक) सिनकर एकदम एखाद्या संगीतकारावर प्रेमापोटी लेख लिहितील काय? पण एकदा लिहायचा म्हटला की सिनकरांसारखी माणसं मनापासून लिहिणार हेही आलंच. त्यांच्या लेखाचा शेवट असा आहे :
पाच जानेवारी! सकाळी पाचला फिरत असतानाच समजलं, आजचा दिवस भयंकर आहे. दोन्ही पाय शाबूत असूनदेखील जणू काही दोन्ही काखेत कुबड्या धरून मी पार्कला फेऱ्या मारीत होतो. असह्य हे होत होतं की नियमितपणे भेटणारी सारी मंडळी चौकशी करत होती ती केवळ माझ्याजवळच. मला किंवा अण्णासाहेबांना दररोज सकाळी एकटं पाहण्याची शिवाजीपार्कला सवय नव्हती.
पाच जानेवारी! सा रे ग म प ध नि सा. माझ्या दृष्टीने हे सूर त्या दिवश रात्री कायमचे लुप्त झाले. आता हे सूर आणि या सुरांपेक्षाही मला नितांत आवडणारं ते लयबद्ध हास्य मी पुन्हा कधीही ऐकणार नाही.
माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात अण्णासाहेबांसारखा एक थोर महापुरुष का यावा, या कोड्याचं उत्तर मला कोणी देईल का?

सी. रामचंद्र महापुरुष होते की नाही, हे आपल्याला माहीत नाही, कारण आपल्याला त्यांच्या संगीताबद्दलच फारशी माहिती नाही. पण तरीही वाचक म्हणून ह्या लेखातला प्रामाणिकपणा एवढा आपल्याला जाणवत राहतो की आपण त्या लेखाच्या प्रेमात पडतोच. या लेखामागचीही खोतांनी सांगितलेली गोष्ट इंटरेस्टिंग आहे :
श्रीकांत सिनकरची ओळख गुन्हेगारी लेखक म्हणून होती. मी ती पुसून टाकली. अॅडव्हान्स मानधनाशिवाय तो लिहीत नसायचा. सी. रामचंद्र हे माझे आवडते संगीतकार होते. त्यांचं निधन झालं तेव्हा मी श्रीकांतला गाठलं. म्हणालो, सी. रामचंद्रांवर तू मला लेख लिहून दे. सी. रामचंद्र श्रीकांतचाही आवडता होता. तो म्हणाला, मी त्याच्यावर लिहायला लागलो तर माझा हात थरथरेल. मी सांगतो, तुम्हीच लिहून घ्या. म्हणालो, ठीक आहे. माझ्या अंकाची छपाई 'अक्षर प्रतिरूप प्रेस', वडाळ्याला होत असे. त्या वेळी साहित्यिकांचे दोन अड्डे होते. एक मौजेचा प्रेस, दुसरा वडाळ्याचा अक्षर प्रतिरूप प्रेस. सी. रामचंद्रांवरचा लेख याच प्रेसमध्ये बसून लिहिला. दुसऱ्या मजल्यावर मालक अरुण नाईक यांच्या केबिनमध्ये रात्री मी आणि श्रीकांत बसत होतो. श्रीकांत लेख सांगताना ढसाढसा रडत होता. अर्ध्या तासाने तो पंधरा मिनिटं विश्रांती घ्यायचा. त्यावेळी म्हणायचा, मी वॉर्मअप घेऊन येतो. एक-एक पान झालं की मी खाली छपाईसाठी पाठवत असे. श्रीकांत थोडा बोबडा बोलत होता. मोठ्या चिकाटीने सी. रामचंद्रांवरचा लेख पूर्ण झाला. हाच तो उत्कृष्ट लेख 'आनंदे नाचत पंढरीसी जाऊ'. अप्रतिम लेख झाला होता. ते दिवस काही औरच होते. एक नशा होती. एक वेडेपण होतं. एक धमाल होती.
आता आपण परत संपादकाच्याच तोंडून वेडेपणाबद्दल ऐकतोय, त्यामुळे तो वेडेपणा आहे हे उघड मान्य करायलाच हवं. ह्या वेडेपणापायी 'अबकडइ'त खूप गोष्टी अशा सापडतात की ज्या वाचल्यावर 'अरे‍! हे असंसुद्धा लिहायचे!' असं वाटतं. म्हणजे त्या फक्त 'अबकडइ'साठी म्हणूनच होऊन गेल्या की काय? उदाहरणार्थ, अंबरीश मिश्रंची 'एका पक्ष्याची गोष्ट' ही कथा, राजा ढाल्यांच्या 'ढाले राजाच्या झेन गोष्टी'. या मंडळींनी पुन्हा अशा प्रकारचं काही लिहिलं नाही. किंवा ते प्रसिद्ध तरी झालेलं दिसलं नाही. मिश्रंनी लिहिलेली ही सुंदर कथा किमान या खंडात आली हे तरी चांगलं झालं. (मी पुन्हा पुन्हा पक्ष्याचीच गोष्ट का सांगतोय? सांगण्यासारख्या तशा खरं तर पुष्कळ गोष्टी आहेत. निस्तेज संध्याकाळी स्मशानात शांतपणे चुडा फोडणाऱ्या नर्तिकेची गोष्ट. किंवा ख्रिस्ताचे अश्रू आपल्या रुमालानं टिपून घेणाऱ्या वेरोनिकाची गोष्ट. किंवा ऑर्फियसची. किंवा शिसवी आयाळ असलेल्या रोमन सैनिकाची. किंवा कवटींच्या माळा गळ्यात अडकवून काळोखवनात हस्तमैथुन करणाऱ्या आदिपुरुषाची गोष्ट. गोष्टी खूप खूप खूप खूपशा आहेत. पण मला एकच ती आठवते. भावते, पक्ष्याची गोष्ट. चंद्रदिव्यासारखी सदोदित मिणमिणत राहते. आत कुठे तरी सुरंगी जखमीसारखी.)

'ढाले राजाच्या झेन गोष्टीं'बद्दल काय सांगणार? त्यांची पहिली गोष्टच सांगूया.
आजतागायत गावात सुकुमारा नावाची मुलगी राहत होती. चंद्राला म्हणते मावळू नकोस नि सूर्याला म्हणते उगवू नकोस : असं तिचं रूप होतं. आसपासच्या धा-वीस खेड्यांत तिच्या रूपाची बोलवा होती. लोकं भाकऱ्या बांधून तिला बघायला यायची. नेहमी लोकांची जत्रा तिच्या भोवती फिरत असायची. तिनं कधी केस विंचरले नाहीत की फुलं माळली नाहीत की ओठ रंगवले नाहीत की आरसासुद्धा कधी ढुंकून पाहिला नाही. लोकांचे चेहरे हाच माझा आरसा, असं ती म्हणायची. आणि लोक जेव्हा तिच्या सौंदर्याची स्तुती करायचे तेव्हा ती ते उडवून लावायची.
म्हणायची :
: साफ खोट्टं! तुम्ही सुंदर आहात म्हणून मी तशीच दिसते.
: छट्! तूच सुंदर.
: मी तर कधीच स्वतःचं रूप पाहिलेलं नाही. तुम्ही हे पाहू शकता : अनुभवू शकता : त्यातला आनंद लुटू शकता : मी मात्र तुमच्या या आनंदात सहभागी होऊ शकत नाही. तर मी सुंदर आहे हे पाहण्यासाठी मला मजपासून अलग होता येईलसं काही तरी सांगा.
पण त्याचं उत्तर कुणाजवळच नव्हतं.
दिवसेंदिवस साबणाच्या जाहिरातीतल्या चेहऱ्यागत तिचा चेहरा उजळत राहिला. लोकांशी गोड गुलगुलीत बोलण्याचा तिला कंटाळा आला. लोकांच्या अधाशी नजरांची किळस आली. एक दिवस ती समुद्राला उद्देशून म्हणाली
: मी सुंदर आहे हे पाहण्यास माझे डोळे निरुपयोगी आहेत. तर कुणी मला आपले डोळे देईल काय?
तर कुणी काहीच बोललं नाही.
असं हरदिवस होत गेलं नि एकदा गर्दीतनं कुणी तरी एका आंधळ्या तरुणाला समोर धरून आणलं.
: काय झालं?
: बाई तुमच्या सौंदर्याची नुसती तारीफ ऐकली नि यानं डोळेच फोडून घेतले. म्हणाला : हजारो डोळ्यांनी जिचं सौंदर्य बाटवलं असेल तेच कृत्य करायला हे डोळे धजतील म्हणून मी असं केलं. नि असं केल्यानंतर म्हणाला -
: आता मला तिच्याकडं घेऊन चला नि हे डोळे वाटल्यास तिला द्या. हे ऐकून ती हसली. म्हणाली,
: मी सुंदर आहे हे आजवर ऐकून होते. आता ते दिसलं आणि माझ्यासारखेच इतरही सुंदर असतीलसं वाटलंवतं ते खोटंच. फक्त हा तरुण अत्यंत सुंदर आहे. याच्याशीच माझं लग्न लावा.
त्या ओबडधोबड तरुणाला शिव्या घालत लोक घरोघर गेले.

श्री. दा. पानवलकरांची 'पिंपळ सळसळला' ही कथा, विलास सारंगांची 'खडकांमधली दुपार' ही कथा अशा गोष्टी या खंडात आहेत. हे असं खूप काही या खंडात आहे. म्हणजे मूळ 'अबकडइ'च्या अंकामधे केवढं असेल!

जयंत पवारांनी घेतलेली 'पासवाला : कृष्णा गोविंद मोहिते' ही मुलाखत पण सुंदर. वरळीच्या स्मशानात एंट्री पास देणाऱ्या मोहित्यांची पवारांनी घेतलेली मुलाखत मुळातूनच वाचण्यासारखी आहे. त्याबद्दल वेगळं काहीच इथे बोलायला नको. नामदेव ढसाळांचा 'दलित पँथरची गणगौळण' हा 'पँथर'च्या घडामोडींचं एक (आणि एकतर्फी) व्हर्जन सांगणारा लेखही अन्यथा कुठेच प्रसिद्ध झालेला नाही आणि तोही रोचक व मुळातून वाचण्यासारखा. स्वतंत्र लेखांशिवाय या खंडात अनुवाद आहेत. डेव्हिड लोच्या आत्मकथनाचा संक्षिप्त अनुवाद, व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या 'ख्रिस्तीन' या लेखाचा अनुवाद - असं किती नि काय सांगायचं..

जर्मन प्रियकरासोबत जर्मनीला निघून चाललेल्या फोरासरोडवरच्या वेश्येची कहाणी सांगणारी एका डॉक्टरची डायरी म्हणजे 'फोरासरोडवरलं रक्तकमळ' हा डॉ. नारायण तेरेदेसाईंचा लेख पण. शांता नावाच्या या बाईंच्या प्रियकराचं नाव 'शीतल'. किमान त्यांनी डॉक्टरांना सांगितलेलं नाव तरी हे आहे. डॉक्टर आपले सारखे प्रामाणिकपणे चकितच होत राहिलेत.
३० जुलै १९८७
शांता डोक्यात गुलाब घालून येते. सहज विचारतो, ''शांता काश्मीरला जातेस काय?''
खरोखरच शांता शीतलबरोबर काश्मीरला जाणार असते. जर्मनीला जाण्याचे ठरलेले असते. कायदेकानून अडवीत असणार. आज ना उद्या ती जर्मनीला जाईलही. दवाखान्याची उधारी देते. पाच रुपये बाकी ठेवते. हीही एक पद्धत आहे. पैसे द्यावयास नाहीत असे नाही. कदाचित डॉक्टरांच्या 'लिस्टात' आपले नाव राहावे अशी पेशंटची इच्छा असावी. शांता एकटी काश्मीरला जाणार असते. शांताला शक्य आहे. तसे 'रिस्कीच' आहे. कोठचा कोण माणूस त्याच्याबरोबर लांबवर जावयाचे. धोका हा आहेच.
अमेरिकेतून नवरदेव भारतात येतात. भारतातील कुलवंत शीलवान वधू घेऊन अमेरिकेत जातात. कित्येकांची तेथे खराब हालत होते. आपणही येथे राहून कायदेशीर त्यांना काही करू शकत नाही. वधूच्या नातेवाइकांना नुसते रडण्याशिवाय गत्यंतर नसते. 'मुलगी दिली तेथे मेली', हेच उद्गार ऐकावयास मिळतात.
शांताची केसच निराळी आहे. नागपाड्यात वेश्याव्यवसायात आई-वडिलांनी लोटली तेव्हाच मेलेली असते. परत संजीवनी घेऊन जिवंत व्हावयाचा हा प्रयत्न असतो तिचा एकटीचाच. भारतीय उच्च परंपरा आहेच. द्रौपदी, सीता ह्यांच्या मदतीला कोणी आले नाही. शांताच्या कोण येणार? असलेला किंवा नसलेला प्रत्यक्ष भगवानच.
आता आपण फक्त एका लेखाचा उल्लेख करून नोंदीचा हा भाग संपवू.

भाऊ पाध्यांचा 'बाबू : बाकी उरलेला समाजवादी!' असा एक लेख या खंडात आहे. भाऊंनी राजकीय घडामोडींसंबंधीही लेख लिहिले आणि बहुधा 'पिचकारी' हा त्यांचा लेखसंग्रह अशाच लेखांचा आहे. पण तो कधी कुठे दिसूही शकलेला नाही. तरीही इथे जो लेख आहे तो वाचून त्यांनी एकूण आपल्या पारदर्शक पाहण्यातून काय चित्रं रंगवली असतील त्याचा अंदाज येऊ शकतो. समाजवादी चळवळीची अवस्था राममनोहर लोहियांनंतर काय झाली असेल आणि मुळात कुठल्याही चळवळ नावाच्या गोष्टीत कार्यकर्ता नावाच्या गोष्टीचं काय होऊ शकतं, त्यातही बहुतेक कार्यकर्त्यांचं नाही तरी प्रामाणिक राहिलेल्या व्यक्तीचं काय होऊ शकतं, त्याचा दाखला या लेखात आहे :
बाबूला एकदा मी सवाल केला, ''बाबू, तू जे जीवन जगलास, त्याचा तुला पश्चात्ताप होतो का कधी?''
तो तत्काळ म्हणाला, ''नाही - गावडे समाजात जन्माला येऊन मी मिलमध्ये जॉबर झालो असतो म्हणजे अस्मान ठेंगणे झाले असते. पण, त्यापेक्षा मी खूप कमावलंय!''
बाबूने जे उत्तर दिलं ते असाच प्रश्न वार्ताहरांनी प्रेमासाठी राज्यत्याग करणाऱ्या इंग्लंडच्या आठव्या एडवर्ड राजाला विचारला असता, त्याने जे उत्तर दिलं होतं, त्या स्टाईलचं!
बाबूने काय साधले - ही स्वतःला पोळून घेण्याची किमया साधून! कदाचित एखाद्याला त्याचं वागणं भलतंच रोमँटिकही वाटेल! त्यापेक्षा या देशामध्ये स्वतःपुरते पाहणे, मला अधिक रोमँटिक वाटते. आपल्याला पाय पसरण्यासाठी अंथरुण नाही. याची कल्पना असताना स्वास्थ्याच्या, गोधडीसाठी चिंध्या जमवण्याशिवाय आम्ही कल्पनादरिद्री माणसे काय करतो आहोत : एकूणच या देशातल्या लोकांच्या लेख सारीच मूल्यं उफराटी झाली आहेत. बाबूसारख्या माणसाच्या जीवनाचा विचार केला म्हणजे, हे नीटपणे लक्षात येते.
***

वेडा अंक

१९७३च्या पहिल्या दिवाळी अंकातले निवेदन

वास्तविक हा अंक म्हणजे 'अबकडइ' या लघुपत्रिकेचे एकूण सहा अंक आहेत. या लघूला गुरुत्व कसे आले? हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. त्याचे उत्तरही माझ्याजवळ आहे. माझ्या एक लक्षात आलं आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर अशा प्रकारचा मार्ग तुडवायलाच हवा. आता 'अबकडइ' दर वर्षी दिवाळीत येईल. पुढील अंकांत आमच्या मनासारखा मजकूर देण्याचा खास प्रयत्न होईल.
आमच्या वाचकांस ही दिवाळी, इतकंच नव्हे तर पुढील वर्षातील होळी, गटारी अमावास्या देखील सुखात जावोत.
रेशनिंगच्या तांदूळकी जय!
----------
 'निवडक अबकडइ'मधल्या मुलाखतीतून :
अबकडइ हा एकखांबी तंबू होता. अंकाला खूप मागणी असायची. पाच हजार अंक हातोहात खपत. तरीही आर्थिक चणचण शेवटपर्यंत पाठ सोडत नव्हती. २१ दिवाळी अंकांनंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे भांडवल नव्हतं. अंक बाजारात आला की मी लोकांची बिलं भागवत असे. एजंट लोक ऐन दिवाळीत माझ्या घरी ठाम बसलेले असायचे. पैशासाठी तगादा लावायचे. या अंकाच्या कारकिर्दीत मी एकही दिवाळी नीट पाहिली नाही. अनुभवली नाही. ऐन दिवाळीत टेन्शनमधे असायचो. नंतर नंतर या सगळ्याचा मला वीट आला होता. अंकाला फायदा जाहिरातीतून होत असे. विक्रीतून नव्हे. या जाहिरातींसाठी खूप आटापिटा करावा लागे. अंकाची विक्री उत्तम होती. पण त्यातील पैशाने मी बिलं भागवत असे. शेवटी माझ्या हाती शून्य उरे. या सगळ्यात दम निघायचा. शेवटी १९९६ साली मी 'अबकडइ' बंद करून टाकला. त्यानंतर मोठी गंमत झाली. नंतर मला फोन यायला लागले जाहिरात कंपन्यांकडून. आपके अबकडइ के लिए फुल पेज अॅड रखा है, लेके जाव. कारण अंकाचं नाव झालं होतं. या मंडळींना मी अंक बंद केलाय हे ठाऊक नव्हतं. नंतर मात्र जाहिराती सुरू झाल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी सगळं बंद केलं होतं.
***

वेडा लेखक

अनियतकालिकांच्या घडामोडींमधे सहभागी व्यक्तींमधे 'स्टंटबाजी' नावाची एक गोष्ट दिसते का? असा एक प्रश्न आहे. उदाहरणार्थ, 'फक्त' या अनियतकालिकाच्या अंकाच्या कव्हरवर संपादकांनी स्वतःची करून दिलेली ओळख. त्यात खोतांच्या ओळखीत 'मृत्यूकडे विलक्षण ओढ. मरण बहुधा आत्महत्येत', 'अखिल कवितेत खळबळ उडवून देणारा पहिला कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर' असे उल्लेख आहेत. यातून फायद्यापेक्षा तोटेच होतात आणि ते मूळ कामाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याच्या रूपात होतात. आणि असं लिहिणारे लोक पंच्याहत्तरी गाठून आहेत.

याशिवाय, खोतांच्या आयुष्यात आलेल्या 'सौंदर्याच्या आइटमबॉम्ब'चाही असा अनेकदा उल्लेख होत आलेला आहे. स्वतः तेही मुलाखतींमधून तो उल्लेख करतच राहतात. इतरांचे दोन अधिक दोन म्हणजे चार होतात, पण माझे साडेचार झाले, असं त्यांनी म्हटलेलं आहे. या बॉम्बचा स्फोट खोतांना एवढं उडवून गेला की ते थेट हिमालयात गेले आणि तिथून आल्यावर मुंबईला चिंचपोकळीला दत्ताच्या देवळात बसू लागले. त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्या 'अश्लील' होत्या म्हणतात. आणि नंतर ते एकदम अध्यात्माकडे वळले आणि रामकृष्ण परमहंस, साईबाबा अशा मंडळींवर कादंबऱ्या लिहू लागले. या कादंबऱ्या आता उपलब्ध आहेत.

खाजगी गोष्टींबद्दल बोलण्याबद्दल काही आपलं म्हणणं नाही, पण मराठीतल्या आधीच तोकड्या आणि खुज्या असलेल्या वाचनाच्या नि लेखनाच्या जगात मूळ कामाकडे दुर्लक्ष करण्याइतका खाजगी गोष्टींचा गदारोळ होतो का? हाही एक प्रश्न आहे. पण यालाही काही पर्याय नाही.  कदाचित या सगळ्यासकटच मजा असेल.

नव्याने घडलेल्या घडामोडींनुसार खोतांच्या 'उभयान्वयी अव्यय', 'बिनधास्त' आणि 'विषयांतर' या 'अश्लील' कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या 'डिंपल प्रकाशना'तर्फे बहुधा ११ एप्रिलला अधिकृतरित्या प्रकाशित होणार आहेत.
किमान आता या कादंबऱ्या वाचनासाठी सहजी उपलब्ध तरी होतील. आधी तसं नसल्यामुळे त्या वाचताही आलेल्या नाहीत, त्यामुळे त्याबद्दल बोलणार काय?

पण 'अबकडइ'चं खोतांनी केलेलं काम इतकं महत्त्वाचं आहे की त्याची दखल घेणं हे तरी आपलं काम बनतंच. शिवाय कादंबऱ्यांवरही वाचल्यावर बोलण्यासारखं असेल तर पाहू.

याशिवाय खोत आत्मचरित्रही लिहिणारेत म्हणतात. एकवीस खंडांमधे. त्याचं त्यांनी सांगितलेलं नाव आहे : 'करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो'
***

टीप : या लेखात वेडेपणा असं जिथे म्हटलंय तिथे ते शहाणपणा असं आहे.
***चंद्रकांत खोत (फोटो : प्रहार । इथून)

6 comments:

 1. पुन्हा एकदा खूप संदर्भ असलेला आणि खूप माहिती देणारा एक लेख (कि लेखांचं संकलन) वाचायला मिळाला. धन्यवाद.
  लेखांची निवड किंवा त्यातली भाषा, काहीही असो, नेमकं कारण माहित नाही, हा लेख वाचताना मजा आली. याला 'पोस्ट' म्हणवत नाहीये.

  ReplyDelete
 2. सी. रामचंद्र महापुरुष होते.....ते दिवस काही औरच होते. एक नशा होती. एक वेडेपण होतं. एक धमाल होती...D G Godse too has written about the process of producing now extinct Chhand in the company Pu Shi Rege etc... ते दिवस काही औरच होते. एक नशा होती. एक वेडेपण होतं. एक धमाल होती...similarly Ashok Shahane on the process of producing Nana kakatkar's Rahasyaranjan with s rege durga bhagwat, bhau padhye, etc...ते दिवस काही औरच होते. एक नशा होती. एक वेडेपण होतं. एक धमाल होती...I miss such priocesses...not the products they produced....thanks for posting this but why do you have to give it away like this: "या लेखात वेडेपणा असं जिथे म्हटलंय तिथे ते शहाणपणा असं आहे."?....It's madness...like the doctor says at the end of 'The Bridge on the River Kwai': "Madness! Madness ... madness!"...three cheers to that!

  ReplyDelete
 3. Aniruddha,

  Thanks for the comment.

  you ask - why I have to write this at the end : "या लेखात वेडेपणा असं जिथे म्हटलंय तिथे ते शहाणपणा असं आहे."

  On the immediately earlier post on Mane where I have used such quirk, a reader asked me whether I am defending Mane or what.

  There have been similar incidences where what I wanted to say has been perceived as exactly opposite.

  So it is probably out of fear that I have said "या लेखात वेडेपणा असं जिथे म्हटलंय तिथे ते शहाणपणा असं आहे." Or probably I meant to say, Marathi people have lost that madness... Or probably I am mad, mad, mad...

  Jack Kerouak says in On The Road : ..''the only people for me are the mad ones, the ones who are mad to live, mad to talk, mad to be saved, desirous of everything at the same time, the ones who never yawn or say a commonplace thing, but burn, burn, burn like fabulous yellow roman candles exploding like spiders across the stars''

  Regh exists because of madness...

  Thanks again..

  ReplyDelete
 4. thanks...now. some sanity is restored!

  ReplyDelete
 5. I m glad that 8 months back I gott opportunity meet this editor in Mumbai, where he can be found sitting whole day at roadside temple......

  ReplyDelete
 6. Awesome man, one who has also attained great height on a spiritual level. Ekdum mast manus aahet Khot sir.

  ReplyDelete