![]() |
| भाऊ पाध्ये (१९२६ - १९९६) [छायाचित्र : आरती साळुंके यांच्या संग्रहातून] |
लेखक भाऊ पाध्ये यांचं जन्मशताब्दी वर्ष परवाच्या २९ नोव्हेंबरपासून सुरू झालं. काही ठिकाणी ६ नोव्हेंबरला त्यांचा जन्मदिवस असल्याचं गृहित धरून लेख वा सोशल-मीडियावरच्या पोस्टी प्रसिद्ध झाल्याचं दिसतं. पण स्वतः भाऊंनीच एका मुलाखतीत त्यांची जन्मतारीख २९ नोव्हेंबर १९२६ अशी नोंदवलेली होती. शिवाय, भाऊंची मुलगी आरती साळुंके यांच्याकडेही याबाबत विचारणा करून पुन्हा खात्री केली. तर, भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या 'बगीचा' या कथेबद्दलची ही नोंद.
०
भाऊ पाध्ये यांच्या ‘बगीचा’ (समाविष्ट : 'भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा', संपादक - दिलीप पुरुषोत्तम चित्रे, लोकवाङ्मय गृह) या कथेच्या सुरुवातीला दादरच्या टिळक ब्रिजवरून रोज संध्याकाळी एक ‘चारचौघात खपून जाण्यासारखा’, ‘कुटुंबवत्सल’, ‘अगदी सामान्य इसम’ चालत जात असल्याचं वर्णन येतं. हे वर्णन साध्या वर्तमानकाळात आहे. पुढे भाऊ लिहितात, “संध्याकाळी कचेऱ्यांतून घरी परतणाऱ्यांची बेसुमार गर्दीही ब्रिजवर असते. त्या गर्दीत कुणाचं त्या इसमाकडे लक्षही जात नाही. पण चालता चालता मध्येच तो माणूस दणकून ओरडतो ‘केकू दमाणिया की माss की च्यूत!’ तेव्हा त्याच्या आजूबाजूची माणसं दचकतात.” एकमेकांना कोण ओरडलं ते विचारू लागतात, वगैरे. भास्कर राणे या कापड गिरणीतल्या कारकुनाच्या तोंडची ही शिवी वाचकांना कथेच्या सुरुवातीला ऐकू येते, आणि मग गर्दीला दचकवणाऱ्या त्या शिवीची पार्श्वभूमी उर्वरित कथेत आपल्या समोर उलगडत जाते.
सतत पोरं जन्माला घालून कंटाळलेली, चाळीतल्या अपुऱ्या जागेत न मावणारं कुटुंब सावरत बसलेली, आणि आर्थिक चणचणीवर स्वतःहून काहीच उपाय न करणाऱ्या, घरी असताना सतत आरामखुर्चीत बसून असलेल्या नवऱ्यामुळे आणखी चिडचिड होणारी बायको- अनूही यात आहे. घरात काहीही अडचण असली तरी आरामखुर्चीतून न उठणारा भास्कर राणे चाळीच्या कॉमन गॅलरीत त्याने लावलेल्या गुलाबाच्या झाडांची पानं चिमणी खातेय असं कळल्यावर मात्र चमकून उठतो, पानं निरखून बघतो. झाडांभोवती जाळी बांधण्यासाठी स्वतः हालचाल करायला लागतो- फळ्या, खिळे गोळा करतो, बाजारातून जाळी आणायला निघतो. भास्करने चाळीत केलेल्या या गुलाबांच्या छोटेखानी बगीच्याची काहीएक ख्यातीही त्याच्या ऑफिसात पसरलेली असते. त्यातूनच केकू दमाणिया हा पारशी माणूस त्याच्या आयुष्यात येतो. दमाणिया आणि त्याची बायको 'रोझ सोसायटी'चे सदस्य असतात आणि त्या सोसायटीच्या स्पर्धांमध्ये जिंकेल असं गुलाबाचं रोपटं शोधताना ते भास्कर राणेपर्यंत पोचतात, त्याला त्याच्या बगीचातली रोपटी विकत देण्याची विनंती करतात. यावर भास्कर लगेच काही बोलू शकत नाही. दमाणिया त्याला विचार करून निर्णय कळवायला सांगून स्वतःचं कार्ड देऊन जातो.
या दरम्यान भास्कर राणेला स्वप्न पडतं. त्यात एक सुंदर बाई दिसते आणि म्हणते, “उद्या जर तू मला भेटलास तर तुझ्या सगळ्या काळज्या दूर होतील!” आपल्याला पडलेली स्वप्नं खरी होतात, याची भास्करला आधीच्या काही अनुभवांमुळे खात्री वाटत असते. आता या नवीन स्वप्नातल्या बाईला भेटण्यासाठी तो तयार होतो. त्याच्या वागणुकीतला बदल घरच्यांना आश्चर्यकारक वाटतो. तो दाढी करतो, टापटीप तयार होतो आणि स्वप्नातली बाई भेटेल या आशेने बाहेर पडतो. प्रत्यक्षात त्याला बाई भेटत नाही. स्वप्न प्रत्यक्षात येत नाही. आपली परिस्थिती सुधारणार नाही, याबद्दल त्याची खात्री पटते. मग तो केकू दमाणियाला पाचशे रुपयांना त्याचा बगीचा विकतो. पण घरी येतो तर त्याच्या एका मुलीचा अपघात झाल्याचं कळतं, मग तिच्या उपचारांमध्येच पाचशे रुपये खर्च होतात. दुसऱ्या दिवशी भास्करच्या खोलीत आग लागते. त्यात त्याची बायको अनू, मोठी मुलगी सीमा आणि अगदी धाकटी- सहा महिन्यांची- मुलगी राजश्री होरपळून मरतात. बाकीची मुलं कमी-अधिक जखमी होऊन वाचतात. भास्करनेच डोकं सणकून ही आग लावलेली असते. मरण्यापूर्वी अनू मात्र आपल्याच हातून स्टोव्ह पेटवताना गफलत होऊन आग लागल्याची जबानी देते. भास्कर निर्दोष सुटतो. मुलं नातेवाईकांमध्ये वाटली जातात. भास्करची नोकरी जाते. पण बाकी त्याची वागणूक सर्वसामान्य चारचौघांसारखीच राहते. शेजारचे खायला आणून देतात, ते खाऊन तो बसून राहतो. रोज संध्याकाळी टिळक ब्रिजवरून जातो, आणि तेव्हा ती शिवी ऐकू येते.
मुंबईसारख्या महानगरातल्या निम्नस्तरीय कारकुनी कुटुंबाची विविध पातळ्यांवरची कुचंबणा या कथेत दिसते, हे उघड वर्णन झालं. भाऊ पाध्यांच्या कथनशैलीत बरेचदा दिसणारं धक्कातंत्र याही कथेत सुरुवातीलाच सार्वजनिक ठिकाणी लोकांना दचकवणाऱ्या शिवीच्या रूपात येऊन जातं. महानगरी जीवनाचं चित्रण आणि रोजमर्राची भाषा, ही भाऊंच्या लेखनातली वैशिष्ट्यं साधारणपणे नोंदवली जातात. ते बाहेरून होणारं वर्णन म्हणून रास्त आहे. पण त्याच्या आत काही आणखी खोलातले प्रश्नही आहेत का, ते पडताळायला हवं. भाऊ पाध्यांच्या साहित्यात चिंतनशीलतेचा अभाव होता, असं वाक्य मध्यंतरी वाचायला मिळालं. पण हे असं सरसकटीकरण बरं नाही. भाऊ स्वतः काय चिंतन करायचे किंवा त्यांची पात्रं उघडपणे काही चिंतनशील बोलतात का, यापेक्षा त्यांचं साहित्य वाचकाला चिंतनशील व्हायला भाग पाडतं का, काही चिकित्सक टीका करण्यासाठी किंवा काहीएक नवीन शोधण्यासाठी प्रवृत्त करतं का, असे प्रश्न विचारात घेणं अधिक बरं.
उदाहरणार्थ, 'बगीचा'मध्ये प्रत्यक्षात चाळीतल्या कॉमन गॅलरीमधली काही गुलाबाची रोपटी आहेत. त्या रोपट्यांचं सौंदर्य ठराविक सार्वजनिक स्तरावरही नावाजलं गेलंय. भास्कर राणेच्या ऑफिसात, आणि तिथून बाहेर निराळ्या आर्थिक स्तरातल्या कुटुंबापर्यंत या सौंदर्याची चर्चा पोचलेय. अशा सौंदर्याच्या स्पर्धेत- म्हणजे रोझ सोसायटीच्या स्पर्धेत- सहभागी होणारं दमाणियांचं जोडपं कथेत येतं, तसंच या रोज या रोपट्यांपासून काही फुटांवर जगणारं राण्यांचं जोडपं (आणि पूर्ण कुटुंब) कथेत येतं. त्यांचं-त्यांचं जगणं सुरू आहे. त्यातलं राणे कुटुंबाचं जगणं उद्ध्वस्त होतं. कथेचं शीर्षक 'बगीचा' असं आहे. सुंदर गुलाबांचा हा 'बगीचा' सौंदर्याविषयी काही अवघड प्रश्न उभे करतो.
सौंदर्याची निर्मिती कशी आणि का होते? सौंदर्यावरची मालकी कशी ठरते? सौंदर्य टिकवणं कोणाला शक्य होतं आणि कोणाला शक्य होत नाही? सर्वसामान्य, कोरड्या भासणाऱ्या, अभावाच्या जगण्यात सौंदर्याचं स्थान काय असतं? सौंदर्याचा आस्वाद कोणाला परवडू शकतो? कोणतीही अलंकारिकता नसलेल्या, अधूनमधून धक्कादायक वाटतील असे उद्गार असलेल्या भाषाशैलीतून इतक्या खोलापर्यंत जाणारे प्रश्न म्हणजे आशयसूत्रं हाताळण्याची भाऊंची हातोटी या कथेत विलक्षण रीतीने पाहायला मिळते.
भाऊ पाध्यांच्या साहित्यात बहुतेकदा निवेदक किंवा इतर पात्रं सर्वमान्य नैतिकतेची किंवा बौद्धिकतेचीही भूमिका घेणारी नसतात, त्या दृष्टिभूमीवरून ती जगाकडे पाहत नाहीत. त्यामुळे ती उघड-उघड काही चिंतनशील वक्तव्यं करण्याची शक्यताही कमीच असते (तशी चिंतनशीलता उघडपणे व्यक्त करणारी पात्रंही साहित्यात सहजपणे अर्थातच असू शकतात; भाऊंच्या साहित्यात ती बहुतांशाने नसतात, इतकाच इथला वस्तुस्थितीपुरता मुद्दा). पण त्यांच्या साहित्यातून निर्माण होणारे प्रश्न मात्र अशा नैतिकतेला आणि बौद्धिकतेला आव्हान देणारे, किंबहुना त्यांना अधिक खोलवर धक्के देणारे असतात, हे यातून जाणवतं.
भास्कर राणे बायको-मुलांना खोलीत कोंडून आग लावतो, त्यात आई नि लहान बहिणीसह मरण पावलेली थोरली मुलगी सीमा हिचा खुद्द कथेतला वावर मर्यादित आहे. पण हीच सीमा तिच्या आईला घरकामात थोडीफार मदत करत असते. भास्करचा बगीचातल्या गुलाबाची पानं चिमण्या खात असल्याचं लक्षात आणून देणारीही सीमाच असते. शिवाय, आपली स्वप्नं काही खरी ठरणार नाहीत हे जाणवल्यावर भास्कर अंधारात उभा असतो, तेव्हा त्याच्या बाजूला उभं राहून हीच सीमा म्हणते, “आबा, तुमी गुलाबाची झाडं विकू नका!. तुम्हाला त्यांची जोपासना नाय करता आली तर मी करीन! रोज पाणी घालीन! चहाची भुकटी पण आणीन कोठून तरी आणि घालीन!” यावर भास्कर चिडचिड करतो. झाडं विकली तर निदान मुलांना कपडे येतील, वगैरे चिडून बोलतो (पुढे ही रोपटी रोझ सोसायटीच्या स्पर्धेतही गेली असतील). मग सीमा हिरमुसते नि अंथरुणावर जाऊन पडते. दोन दिवसांनी ती तिच्या बापाने खोलीला लावलेल्या आगीत मरण पावते.
सौंदर्याविषयी इतकं करुण काही म्हणू पाहणारी ही कथा लेखकाने खूप सुंदर तऱ्हेने लिहिलेय, असं म्हणायचं तरी अवघड, अशी परिस्थिती. कथेच्या सुरुवातीला येणारी शिवी आणि शेवटाकडे येणारा सौंदर्याचा करुण शेवट, यांची सांगड भाऊंना घालता आली. भास्करइतपतही सौंदर्याची जोपासना करण्याचा वाव सीमाला का मिळत नाही, या अंगाने पाहिलं तर ही कथा आणखीच खतरनाक प्रश्न उभे करणारी वाटते. हे प्रश्न एकीकडे काही उघड सामाजिक पेचांशी जोडलेले आहेत, तसेच त्यापलीकडच्या काही अधिक दीर्घ पल्ल्याच्या गुंतागुंतीचा निर्देशही करणारे आहेत.
![]() |
| फोटो : रेघ, २००६ |
०
भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथे १२-१३ डिसेंबर २०२५ या दिवसांमध्ये 'भाऊ पाध्ये यांचं वाङ्मय : आकलन आणि पुनर्विचार' असं एक चर्चासत्र झालं. त्यात आयोजकांनी काही बोलायला सुचवलं, तेव्हा 'भाऊ पाध्ये यांच्या कथेतलं धक्कातंत्र' या शीर्षकाचा निबंध वाचला. त्या निबंधातल्या एका तुकड्यावर आधारित वरची नोंद आहे. भाऊंचं भाषाशैलीचं धक्कातंत्र त्यांच्या विषयाशी आणि आशयसूत्रांशी मिळून-मिसळून गेलं, तिथे त्यांचं लेखन सखोल नेणारं ठरलं, याचा दाखला द्यायचा प्रयत्न वरच्या नोंदीत आहे. काही वेळा, या भाषाशैलीची नि विषय-आशयाची सांगड बसत नाही, तिथे लेखन फिकं ठरण्याचा धोका असतो : हे भाऊंच्या काही कथांमध्ये सापडतं. उदाहरणार्थ, 'राजीनामा' ('दावेदार' या संग्रहात समाविष्ट, शब्दालय प्रकाशन, २०२०). एका ऑफिसात स्त्री कर्मचाऱ्यावर कसं विनाकारण बालंट आणलं जातं, याबद्दलची ही कथा. शेवटी, ही बाई तिच्यावर आरोप करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संध्याकाळी ऑफिस रिकामं असताना बाहेर आणते आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या टेबलावर असणारे भ्रष्टाचाराचे 'पुरावे' दाखवते. ‘कुणाच्या टेबलावर पडलेली चोरलेली स्टेशनरी’, ‘कुणाच्या टेबलावर नग्न देहाचं प्रदर्शन करणारी मासिकं’, ‘एका टेबलावर दोन दारूच्या बाटल्या’, ‘एका टेबलावर चक्क कंपनीच्या बिलात फेरबदल केलेली बिलं’, वगैरे. अनेक ऑफिसांमध्ये भ्रष्टाचार-घोटाळे होतात, पण त्याचे पुरावे इतक्या बटबटीतपणे माणसं टेबलांवर ठेवून जातात, हे साधारण सरधोपट चित्रपटांमध्ये शक्य आहे. भाऊंच्या कथेत ते घडल्यावर मग त्यांच्या भाषाशैलीतला ओघवतेपणा तेवढा उरतो, पण कथा पडते. मूळ निबंधात भाऊंच्या कथांचे दाखले देऊन त्यांच्या धक्कातंत्राबाबत बरी-वाईट निरीक्षणं नोंदवायचा प्रयत्न केला.
०
'बगीचा'ला धरून यापूर्वीही एक नोंद केली होती : एक शिवी आणि भाऊ पाध्यांचा 'बगीचा'.
०
सुमारे सोळा-सतरा वर्षांपूर्वी भाऊ पाध्यांबद्दल इंटरनेटवर फारशी काही माहिती नसल्याचं दिसलं तेव्हा त्यांच्याबद्दलचे लेख नि त्यांच्या काही मुलाखती मिळवून टाइप करून एका ब्लॉगवर चिकटवल्या, त्यांची छायाचित्रं मिळवून चिकटवली, पुस्तकांची मुखपृष्ठं मिळतील तितपत तिथे एकत्र केली; तो कात्रणवहीसारखा ब्लॉग इथे पाहता येईल - https://bhaupadhye.blogspot.com/. ही २००९च्या दरम्यानची गोष्ट आहे. त्या वेळी त्यांच्या बहुतांश पुस्तकांच्या आवृत्त्या सहज उपलब्ध नव्हत्या. आता तुलनेने काही पुस्तकांच्या आवृत्त्या मिळतात. या ब्लॉगवरचे फोटो भाऊ पाध्ये आरती साळुंके यांच्याकडून मिळाले आणि त्यांच्या परवानगीने ते तिथे प्रसिद्ध केले. त्यातला एक फोटो परवा 'हिंदुस्तान टाइम्स'मध्ये आलेल्या भाऊ पाध्यांवरच्या इंग्रजी लेखासोबत छापलेला दिसतो. 'बाई माणूस' या मराठी संकेतस्थळावर भाऊंवर एक लेख आलाय त्यात दिलीप चित्रे यांचं एक विधान दिलंय. 'नोबेल पुरस्कारासाठी एखाद्या भारतीय लेखकाचं नाव सुचवायचं झालं तर बिनदिक्कत मी भाऊंचं नाव सुचवीन. दुर्दैव हेच की मराठीतही भाऊंचं महात्म्य कोणी ओळखत नाही', हे चित्र्यांचं विधान त्यांच्या कुठल्याही प्रकाशित मजकुरात आलेलं नाही. चित्र्यांच्या खाजगी संग्रहातल्या भाऊंच्या एका पुस्तकाच्या प्रतीवर लिहिलेल्या मजकुरात हे विधान होतं. तो मजकूर २०१० साली विजया चित्रे यांच्याकडून मिळाला आणि त्यांच्या परवानगीने तो टाइप करून ब्लॉगवर प्रसिद्ध केला. तसंच लोकसत्तेच्याही वेबसाइटवर भाऊंच्या एका लेखाचं पुनर्प्रकाशन झालेलं दिसतंय, त्यासोबत याच ब्लॉगवरचा फोटो आहे, तिथे "(छायाचित्र : लोकसत्ता टीम)" असा श्रेयनिर्देश आहे. यात कुठेच भाऊंच्या किंवा चित्र्यांच्या कुटुंबियांचा, आणि ब्लॉगचा सौजन्य म्हणून उल्लेख नाही. हे अर्थात वेगवेगळ्या संदर्भांमध्ये होत आलेलंच आहे. इंटरनेटच्या युगात यावर काही हक्क गाजवणं बरोबरही नाही. उलट पसरतंय ते बरंच आहे, असं म्हणायला हवं. पण कुटुंबीय हयात आहेत त्यांचा तरी उल्लेख खरं म्हणजे करायला हवा. (बाकी, खुद्द मोठी प्रकाशनं अशी मोकळीक दाखवत नाहीत, असा अनुभव अनेकदा येतो. परवानगी मागितली तरी फोटो किंवा लेख वापरण्यासाठी प्रचंड मोठी फी मागतात). थोडक्यात, कात्रणवहीसारख्या या कामांचा बऱ्यापैकी उपयोग होत आला आहे.













