Friday, 19 April 2013

माध्यमांचा गोंगाट, गुंगी आणि एडवर्ड बर्नेस

'प्रॉपगॅन्डा' नावाच्या गोष्टीचा बाप जो एडवर्ड बर्नेस त्याचा एकदा स्पष्ट उल्लेख 'रेघे'वर नोम चोम्स्कींच्या लेखात येऊन गेलाय. 

आय.जी. पब्लिशिंग, २००४ आवृत्ती
माध्यमांचा गोंगाट वापरून लोकांना गुंगीत ठेवणं शक्य असतं. ते कसं, याचा एक अग्रगण्य दाखला म्हणून एडवर्ड बर्नेसच्या 'प्रॉपगॅन्डा' असं नाव असलेल्या पुस्तकाचा धांडोळा घेणं उपयोगी पडू शकेल. अमेरिकेच्या संदर्भात १९२८ साली लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्यापूर्वी साधारण चौदा वर्षं मागे गेलं, तर पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिकेला युद्धात उतरण्यास भाग पाडण्यासाठी तिथल्या नागरिकांना युद्धखोरीला फशी पाडण्यासाठी मुख्य सूत्रं हलवणाऱ्यांपैकी एक माणूस बर्नेस होता. साधारण पावणेदोनशे पानांच्या या पुस्तकातल्या काही मुद्द्यांची यादी आपण 'रेघे'वर करणार आहोत. वास्तविक मूळ पुस्तकात काही उदाहरणं देऊन मुद्दे अधिक स्पष्ट करण्यात आलेत, त्यामुळे त्यांना जोर मिळतो. इथे आपण ते स्पष्टीकरण जसंच्या तसं देत बसायचं ठरवलं तर संपूर्ण पुस्तकच अनुवादित करावं लागेल, त्यामुळे मुद्दा पटवून देण्यासाठीची स्पष्टीकरणं या यादीत टाळल्येत. अर्थात मुद्दे वाचल्यावर त्याचे प्रत्यक्षातले पुरावे आपल्याला रोजच्या रोज आजूबाजूला दिसतीलच, त्यामुळे ही यादी वाचली की आपोआप वाचक माध्यमांबद्दल, आपल्याला पुरवण्यात येणाऱ्या एकूणच माहितीबद्दल आणि वरती नोंदवलेल्या समकालीन संदर्भांबद्दल साशंक होतील आणि त्याबद्दल फेसबुकावर मत व्यक्त करण्यापूर्वी बरोब्बर साडेतीन सेकंद थांबतील याची ग्यारंन्टी. किंवा वॉरंन्टी. (मी देत नाही).

१) लोकशाही समाजामध्ये लोकांच्या एकत्रित सवयी आणि मतांचा जाणीवपूर्वक व कौशल्याने केलेला वापर हा एक महत्त्वाचा घटक आहे. समाजाच्या या अदृश्य रचनेचा वापर जे करू शकतात ते देशाची सत्ता ज्याच्याकडे असते त्या अदृश्य शासन नावाच्या गोष्टीचा भाग बनतात. (पान ९)

२) तत्त्वतः प्रत्येक नागरीक सार्वजनिक प्रश्नांबद्दल आणि खाजगी वर्तणुकीबद्दल स्वतःचे निर्णय घेत असतो. पण प्रत्यक्षात प्रत्येक प्रश्नामधल्या गुंतागुंतीच्या आर्थिक, राजकीय व नैतिक तपशिलांचा शोध घ्यायचं सगळ्यांनी ठरवलं तर कशावरच निष्कर्षाला येणं अशक्य होऊन बसेल. त्यामुळे विविध विषयांमधल्या तपशिलांमधे जाण्याचं काम आपण स्वतःहून अदृश्य रूपातल्या शासनावर सोडलेलं असतं आणि स्वतःकडे फक्त प्रत्यक्षातल्या निवडीचा भाग राखलेला असतो. नेत्यांडून आणि माध्यमांकडून ते आपल्यापर्यंत पोचतं; त्यांच्याकडून आपण सार्वजनिक प्रश्नांसंबंधीची विभागणी स्वीकारतो आणि कोणा नैतिक गुरूकडून, मग तो मंत्री असेल किंवा स्तंभलेखक असेल, आपण सामाजिक वावराचे सर्वमान्य निकष स्वीकारतो. (पान १०-११)

३) एकूण जीवन गुंतागुंतीचं झालेलं असताना आणि अदृश्य शासनाची गरज वाढत असताना, विकसित होत असलेल्या तांत्रिक साधनांच्या माध्यमातून मतांचा प्रसार करता येईल. छपाईयंत्र व वर्तमानपत्र, रेल्वेयंत्रणा, टेलिफोन, टेलिग्राफ, रेडियो आणि विमानं यांच्यामदतीने विविध कल्पना वेगाने किंवा काही क्षणांत सर्व अमेरिकाभर पोहचू शकतात. (पान १२)

४) एमिल लुडविगने नेपोलियनबद्दल लिहिलंय : 'कायम लोकमताचा अदमास घेत असलेला, कोणत्याही सूत्रात बसू न शकणारा लोकांचा आवाज सतत ऐकणारा, नेपोलियन त्या काळात म्हणत असे की, तुम्हाला माहितेय का, मला सगळ्यात जास्त कशाचं आश्चर्य वाटतं? कोणतीही गोष्ट सुसंघटित करता न येण्यामागे असलेल्या सत्तेच्या/बळाच्या षंढपणाचं.' (पान १८)

५) समूहमन नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेची रचना स्पष्ट करणं आणि एखादी विशिष्ट कल्पना किंवा वस्तू लोकांनी स्वीकारावी यासाठी विशिष्ट तज्ज्ञाला हे मन कसं वापरता येतं याची माहिती देणं या पुस्तकातून योजलं आहे. (पान १८)

६) आज अल्पसंख्याक (सत्ताधारी) बहुसंख्यांवर प्रभाव कसा टाकावा याची ताकदीची साधनं बाळगून आहेत. आपली ताकद विशिष्ट दिशेने वळवण्यासाठी लोकांच्या मनाला वळवणं शक्य आहे. सध्याच्या सामाजिक रचनेमध्ये हा प्रकार अपरिहार्य आहे. राजकारण, अर्थकारण, उत्पादन क्षेत्र, शेती, सेवा, शिक्षण किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात सध्या जे काही सामाजिक महत्त्वाचं केलं जातं ते 'प्रॉपगॅन्डा'च्या मदतीनेच करावं लागतं. अदृश्य शासनाचा कार्यकारी हात म्हणजे 'प्रॉपगॅन्डा' / प्रचारतंत्र. (पान १९)

७) जगातल्या बहुतेक गोष्टींप्रमाणेच 'प्रॉपगॅन्डा' या शब्दालाही विशिष्ट तांत्रिक अर्थ आहेत, 'ना चांगलं ना वाईट, तर प्रथेनुसार जे असेल ते' अशा स्वरूपाचा हा अर्थ असतो. (पान २०-२१)

आधुनिक 'प्रॉपगॅन्डा' म्हणजे एखाद्या उद्योगाशी, कल्पनेशी किंवा गटाशी असलेल्या लोकांच्या संबंधांवर प्रभाव पाडण्यासाठी घटना घडवणं नि त्यांना आकार देण्यासाठी याचा एक नियमित आणि टिकाऊ प्रयत्न करणं.

लाखो लोकांच्या मनात काही चित्र तयार करण्यासाठी परिस्थितीची मांडणी करणं हे अतिशय सरसकटपणे केलं जातं. चर्च उभं करण्याचा उद्योग असो, की विद्यापीठ उभारणं असो, की चित्रपटाची जाहिरात असो, की अगदी राष्ट्राध्यक्षाची निवड असो, कुठलंही महत्त्वाचं काम आता अशा मांडणीशिवाय केलं जात नाही. लोकांवरचा हा प्रभाव तयार करण्यासाठी कधी व्यावसायिक प्रचारतंत्रतज्ज्ञांची (प्रॉपगॅन्डिस्ट) मदत घेतली जाते किंवा एखाद्या नवख्या व्यक्तीकडून हे काम होतं. महत्त्वाची गोष्ट ही की, ही वैश्विक आणि सतत चालू असलेली प्रक्रिया आहे आणि सैनिकांच्या शरीरांचं संगठन सैन्यात ज्याप्रमाणे केलं जातं त्याप्रमाणे या प्रक्रियेतून समूहमनाचं संगठन केलं जातं. (पान २५)

८) बुद्धिमान अल्पसंख्यांनी 'प्रॉपगॅन्डा'चा नियमितपणे आणि व्यवस्थित वापर करणं गरजेचं आहे हे अगदीच स्पष्ट आहे. स्वार्थी आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरूपांतले हेतू ज्यांच्यात एकत्रितपणे नांदतात त्या अल्पसंख्यांना सक्रिय प्रोत्साहन देण्यामध्येच अमेरिकेचा विकास आणि प्रगती आहे. मूठभर बुद्धिमान लोकांच्या सक्रिय ऊर्जेमुळेच नवीन कल्पनांबद्दल बहुसंख्य लोक जागृत होतात आणि कृतिशील होतात. एखाद्या विशिष्ट विषयासंबंधी त्यांना काय वाटतं हे लहान गटांमधले लोक आपल्याला सांगू शकतात आणि सांगतात. पण सर्वसाधारणपणे प्रत्येक 'प्रॉपगॅन्डा'चे समर्थक आणि विरोधक असतात आणि ते दोघेही बहुसंख्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी तितकेच आतूर असतात. (पान ३१)

९) अदृश्य शासन काही जणांच्या हातात केंद्रित असतं कारण लोकांची मतं व सवयी यांचं नियंत्रण करणारी सामाजिक यंत्रणा वापरणं हे खर्चिक काम आहे. पन्नासेक लाख लोकांपर्यंत पोचणाऱ्या जाहिराती करणं महागडं आहे. लोकांचे विचार आणि कृती यांच्यावर नियंत्रण असलेल्या नेत्यांपर्यंत पोचणं आणि त्यांचं मन वळवणं हेही तसंच महागडं आहे. (पान ३७)

१०) सरकार... मग ते राजेशाही असो, घटनात्मक असो, लोकशाही असो की साम्यवादी असो... ते आपल्या प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी लोकमताच्या संतुष्टतेवर अवलंबून असतं. खरं तर लोकांच्या संतुष्टतेवरच सरकार हे सरकार असतं. (पान ३८)

११) म्हणूनच आधुनिक संपर्कयंत्रणांच्या मदतीने आणि सामाजिक गटांसोबत काम करणारा 'जनसंपर्क सल्लागार' (पब्लिक रिलेशन्स/ पीआर) एक प्रकारे वकिलासारखाच असतो. वकील ज्याप्रमाणे आपल्या गिऱ्हाईकाच्या व्यापारासंबंधी कायदेशीर सल्ला देतो, त्याप्रमाणे 'पीआर'वाला आपल्या गिऱ्हाईकाच्या लोकसंपर्कावरती लक्ष केंद्रित करतो. 

आपल्या गिऱ्हाईकाच्या उत्पादनासंबंधी लोकांना माहिती देण्यासाठी 'पीआर'वाल्याकडे विविध साधनं असतात : उदाहरणार्थ, संभाषणं, पत्रं, व्यासपीठं, चित्रपट, रेडियो, व्याख्यानं, नियतकालिकं, दैनंदिन वर्तमानपत्रं. 'पीआर' सांभाळणारा माणूस हा जाहिरातवाला नसतो, तर तो जिथे जाहिरात यायला हवी तिथे जाहिरातीला प्रोत्साहन देतो. (पान ३९)

१२) समूह मानसशास्त्र हे अजूनही अचूक विज्ञान नाहीये आणि मानवी प्रेरणेचं गूढही अजून उलगडलेलं नाही. पण तरीही या शास्त्राचं ग्रांथिक ज्ञान आणि प्रात्यक्षिक हे पुरेसं यशस्वी झालेलं आहे. त्यामुळे पेट्रोलचा वापर करून चालक गाडीचा वेग ज्या प्रमाणे नियंत्रित करू शकतो, त्याप्रमाणे विशिष्ट यंत्रणा राबवून काही वेळा बऱ्यापैकी अचूकपणे लोकमतात बदल घडवता येतात असं आपल्याला मानता येईल. 'प्रॉपगॅन्डा' हे प्रयोगशाळेतलं शास्त्र नाही, पण समूह मानसशास्त्राचा अभ्यास होण्यापूर्वीच्या काळाएवढं ते ढोबळही उरलेलं नाही. समूहमनाच्या थेट निरीक्षणांवरून निश्चित करण्यात आलेल्या माहिती आधारे आपण ही यंत्रणा उभी करत असल्यामुळे त्या अर्थी ते एक शास्त्र आहे. (पान ४७-४८)

१३) जाणीवपूर्वक सहकार्यासह किंवा त्याशिवाय तुम्ही जर नेत्यांवर प्रभाव टाकू शकलात तर साहजिकपणेच तुम्ही ते नेते ज्यांच्यावर ताबा ठेवून असतात त्यांच्यावर प्रभाव पाडता. समूह मानसशास्त्राच्या प्रभावाखाली येण्यासाठी लोकांनी प्रत्यक्षात एखाद्या सार्वजनिक सभेत किंवा रस्त्यावरच्या दंगलीत एकत्र यायला हवं असं नाही. कारण माणूस हा स्वभावतःच संगतिप्रिय असल्यामुळे तो एखाद्या कळपाचा सदस्य असल्याप्रमाणेच वागतो, पडदे लावून तो खोलीत एकटा बसला तरीसुद्धा तो तसाच वागतो. समूहप्रभावाने उमटवलेले ठसे त्याचं मन वागवत असतं.

(उदाहरणार्थ,)  एक माणूस त्याच्या ऑफिसात बसून कुठले शेअर विकत घ्यावेत याचा विचार करतोय. तो स्वतःच्याच निर्णयक्षमतेनुसार या खरेदीचं नियोजन करेल अशी अर्थातच त्याची कल्पना असते. पण वास्तवात तो बाहेरच्या प्रभावांच्या  त्याच्या मनावर उमटलेल्या प्रतिमांनुसार निर्णय घेत असतो. कालच्या बातम्यांमध्ये ठळकपणे उल्लेख दिसला म्हणून तो एखाद्या रेल्वे कंपनीचे शेअर घेईल, किंवा त्या कंपनीच्या ट्रेनमधून केलेल्या प्रवासादरम्यान केलेलं उत्तम जेवण त्याच्या आठवणीत असेल किंवा त्या कंपनीचं कामगारविषयक उदार धोरण त्याच्या ऐकिवात असेल किंवा जे.पी. मॉर्गनने त्या कंपनीचे शेअर घेतलेत असं त्याच्या कानावरून घेलं असेल, म्हणून तोही त्या कंपनीचे शेअर विकत घेईल. (पान ४९)

१४) जेव्हा समोर नेता नसेल तेव्हा कळपाला स्वतःच स्वतःचा विचार करावा लागेल. अशा वेळी तो गुळगुळीत साच्यांच्या (क्लिशे) मदतीने विचार करतो...

अशा साच्यांचा वापर करून किंवा नवीन साचे निर्माण करून प्रॉपगॅन्डिस्ट एखाद्या समूह भावनेला वळण देऊ शकतो. जुन्या साच्यापासून समुहाला दूर करू पाहणं जवळपास अशक्य असतं, पण नवीन साचा मात्र त्याठिकाणी बसू शकतो. (पान ५१)

१५) आपल्या कृतीमागच्या खऱ्या कारणांबद्दलची जाणीव माणसाला क्वचितच असते. बाजारात उपलब्ध असलेल्या सगळ्या उत्पादनांच्या तांत्रिक बाजूंचा काळजीपूर्वी अभ्यास करूनच आपण ही सर्वांत चांगली मोटर कार घेतोय असा विश्वास एखादा माणूस बाळगून असेलही. पण तो स्वतःला मूर्ख बनवत असतो. त्याने ती गाडी विकत घेतलेय कारण त्याला त्याच्या ज्या मित्राच्या आर्थिक स्तराबद्दल आदर वाटतो, त्याने गेल्याच आठवड्यात तसली गाडी घेतली होती, किंवा त्या माणसाच्या शेजाऱ्यांना वाटायचं की त्याला तशी गाडी परवडू शकत नाही, किंवा त्या गाडीचा रंग त्याच्या कॉलेजमधल्या सहकाऱ्यांच्या गाड्यांशी जुळणारा आहे. (पान ५१)

१६) उद्योग आणि समाज यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांमधे आणखी जवळकीचे झालेले आहेत. सध्या उद्योगविश्व समाजाला भागिदारीमध्ये घेतं. याला अनेक कारणं आहेत, काही आर्थिक कारणं आहेत, आणि शिवाय उद्योगविश्वाबद्दल वाढलेली सामाजिक जाणही याला कारणीभूत आहे. उद्योगविश्वाला आता कळून चुकलंय की, त्यांचा समाजासोबतचा संबंध फक्त एखाद्या उत्पादनाची निर्मिती आणि विक्री एवढ्यापुरताच मर्यादित नाहीये तर स्वतःलाच विकणं आता त्यांना भाग आहे. (पान ६२)

... ग्राहक निर्माण करणं हीसुद्धा नवीन समस्या आहे. आता केवळ स्वतःचा व्यवसाय समजून पुरेसं नाही तर वैश्विक समाजाची रचना, व्यक्तिमत्त्व, पूर्वग्रह व क्षमता यांचा अंदाज असावा लागतो. (पान ६३)

लाखो प्रतींचा खप असलेल्या वर्तमानपत्रांची व नियतकालिकांची वाढ आणि जाहिरातीचं आधुनिक तंत्र यामुळे उद्योजक आणि समाज यांच्यात व्यक्तिगत संबंध निर्माण होऊ घातलाय. (पान ६४)

(त्यामुळे) समाजाशी असलेल्या आपल्या सर्वांगीण संबंधांचा अंदाज असलेली तेल कंपनी आता केवळ चांगलं तेल विकणार नाही, तर चांगलं कामगार धोरणही त्यासोबत विकेल. एखादी बँक केवळ आपलं व्यवस्थापन चोख आहे याची जाहिरात करणार नाही, तर आपले अधिकारी सार्वजनिक आणि खाजगी जीवनातही कसे सौजन्यशील आहेत याची जाहिरात करतील. (पान ६५)

समाज म्हणजे काही अनाकार असलेला गोळा नसतो, ज्याला आपल्या इच्छेने नि मर्जीने आकार देता येईल. उद्योग आणि समाज दोघांनाही स्वतःची व्यक्तिमत्त्व असतात, ती मैत्रीपूर्ण पद्धतीने एकत्र आणणं महत्त्वाचं असतं. (पान ६६)

'प्रॉपगॅन्डा' मूलभूत कारणांमध्ये जात असल्यामुळे ज्या पद्धतीने त्याची ओळख करून दिली जाईल त्यावर त्याचा प्रभाव अवलंबून असतो. उदाहरणार्थ, आरोग्याला हानिकारक सौंदर्यप्रसाधनांविरुद्धची मोहीम चालवण्याची सुरुवात वॉश-क्लॉथ आणि साबणाच्या परतीसाठीची मोहीम असल्यासारखी करता येईल. ही मोहीम आरोग्य अधिकारी देशभर पोचवू शकतात. सौंदर्यप्रसाधनांऐवजी वॉश-क्लॉथ आणि साबणाचं गुणगान ते करतील.

सामाजिकदृष्ट्या लाभदायक अशा एखाद्या गोष्टीविषयी लोकांचं मत बनवण्यासाठीचं मूळ कारण कदाचित प्रॉपगॅन्डिस्टांच्या एखाद्या इच्छेमध्ये असू शकतं. पण त्यातून एखादं सामाजिक कामच होऊन जातं.  (पान ७३-७४)

१७) आपल्या आधुनिक लोकशाहीतला सर्वांत मोठी राजकीय समस्या कोणती असेल, तर नेत्यांना नेतृत्त्व करण्यासाठी प्रोत्साहन कसं द्यायचं ही. लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे, हा समज निर्वाचित व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध आपल्या मतदारांचा नोकर करू इच्छितो. काही अमेरिकी टीकाकार ज्या निष्क्रियेतबद्दल तक्रार करतात तिच्यामागे हेही एक कारण आहे.

लोकांचा आवाज कोणत्याही प्रकारे दैवी किंवा अगदी शहाणपणाचाही असतो, यावर आता कोणताही गंभीर समाजशास्त्रज्ञ विश्वास ठेवत नाही. लोकांचा आावाज त्यांचं मन दाखवतो, आणि हे मन कशापासून घडतं, तर लोकमताचा वापर करता येणाऱ्या आणि लोक ज्यावर विश्वास ठेवतात अशा नेत्यांपासून. नेत्यांनी पुरवलेले वारशाने चालत आलेले पूर्वग्रह, चिन्हं, गुळगुळीत साचे आणि मौखिक सूत्रं यांनी हे मन बनलेलं असतं. सुदैवाने प्रामाणिक आणि प्रतिभावान राजकारणी प्रॉपगॅन्डाच्या मदतीने लोकांची इच्छा घडवू व बदलू शकतो. (पान ९२)

क्वचित एखाद्या राजकीय नेत्याला नेतृत्त्वाचं प्रत्येक वैशिष्ट्यं हाताळता येत असतंही. उद्योगविश्वात जसे काही नेते एकाच वेळी चांगले अर्थतज्ज्ञ असतात, कारखाना संचालक असतात, अभियंता असतात, विक्री व्यवस्थापक असतात, जनसंपर्क सल्लागारही असतात, तसंच.

धोरणांची काळजीपूर्वी आखणी करण्याच्या तत्त्वावर मोठा उद्योग चालवला जातो, एखादी कल्पना अमेरिकेतल्या मोठ्या ग्राहक जनतेला विकण्यासाठी असं धोरण आवश्यक असतं. राजकीय नियोजकांनीही तसंच करायला हवं. काही प्राथमिक नियोजनानुसार सगळी मोहीम आखली जायला हवी. व्यासपीठं, प्रतिज्ञा, आर्थिक नियोजन, उपक्रम, व्यक्ती या सगळ्याचा काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा आणि मोठे उद्योग ज्याप्रमाणे आपल्याला हवंय ते मिळवायला या गोष्टींचा उपयोग करतात तसा करता यायला हवा. (पान ९६-९७)

(जमलेल्या निधीतला) पैसा कसा खर्च होईल याचंही उद्योगविश्वात असतं तसंच नियोजन करायला हवं. प्रचारमोहिमेतल्या प्रत्येक टप्प्याच्या महत्त्वानुसार त्यावरचा खर्च निश्चित व्हायला हवा. वर्तमानपत्रांमधल्या, नियतकालिकांमधल्या जाहिराती, पत्रकं, रस्त्यावरचे फलक, भाषणं-बैठकांमध्ये चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचा वापर, अशा प्रॉपगॅन्डाच्या सर्व घटकांवर खर्च निश्चित करायला हवा. (पान ९९)

मोहिमेच्या एकूण आराखड्यात लोकांना आवाहन करण्यासाठी वापरायच्या भावनांचाही भाग असायला हवा. संदर्भाशिवायच्या भावना चटकन हळवेपणाकडे झुकू शकतात आणि महागड्या पडू शकतात, आणि त्यामागचे प्रयत्न फुकट जातात, कारण जाणीवपूर्वक घडवलेल्या पूर्ण नियोजनाचा त्या भाग नसतात. मोठ्या उद्योगांना हे कळून चुकलंय की, प्राथमिक भावनांचा त्यांनी पुरेपूर वापर करून घ्यायला हवा. पण राजकारण्यांनी मात्र फक्त शब्दांनी उचकवायच्या भावनांचाच वापर केलेला दिसतो.

राजकीय प्रचारमोहिमेत लोकांच्या भावनांना आवाहन करणं हे बरोबरच आहे, किंबहुना ते अपरिहार्य आहे, पण हा भावनिक ऐवज असा हवा -
अ) मोहिमेचा प्राथमिक आराखडा व त्यातील बारीकसारीक तपशिलाशी जुळणारा.
ब) समाज ज्या अनेक गटांचा बनलाय त्या सर्वांशी जोडला जाईल असा.
क) कल्पना ज्या माध्यमातून प्रसारित होणार आहेत त्याच्याशी जुळवून घेणारा. (पान १००)

उदाहरणार्थ, लहान मुलांविषयीचं एखादं धोरण प्रचारमोहिमेचा भाग असेल तर एखाद्या बालकाला कडेवर घेऊन त्याच्या गालावर ओठ टेकवणं हे भावनिक प्रचाराचं साधन ठरू शकेल, पण प्रत्येक वेळी ते योग्य नसणारच. म्हणजे हॉकी स्टिकच्या निर्मात्याने हिवाळ्याच्या झाडांच्या पार्श्वभूमीवरच्या चर्चचा फोटो घेऊन जाहिरात केली तर त्याचा उपयोग नसतो. चर्च आपल्या धार्मिक भावनांना हात घालतं हे खरं असलं तरी हॉकी स्टिक विकण्यासाठी त्याचा उपयोग नाही. (पान १०१)

उद्योगविश्वाने आत्मसात केलेल्या युक्ती अजूनही राजकारण्यांनी आत्मसात केलेल्या दिसत नाहीत, त्याचं कारण कदाचित त्यांना असलेला माध्यमांचा सहज संपर्क हे असू शकेल. आणि त्यावरच त्यांची सत्ता अवलंबून असते.

पत्रकार बातम्यांसाठी त्यांच्यावर अवलंबून असतो. माहिती देण्याची किंवा राखून ठेवण्याची आपली ताकद वापरून राजकारणी राजकीय बातम्यांमध्ये 'सेन्सरशिप' लावू शकतो. आणि पत्रकार काही राजकारण्यांवर वर्षानुवर्षं बातम्यांसाठी अवलंबून असल्यामुळे आपल्या स्त्रोतांशी संबंध राखून काम करणं त्यांना भाग आहे. (पान १०५)

नेता प्रॉपगॅन्डा निर्माण करतो की प्रॉपगॅन्डा नेत्याला निर्माण करतो, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. एखादा चांगला माध्यम एजन्ट कुणीही नसलेल्या माणसाला थोर व्यक्ती बनवू शकतो.

वर्तमानपत्रं लोकांचं मत बनवतात की लोकांच्या मतांवरून वर्तमानपत्र बनतं, असाही एक प्रश्न पूर्वापार विचारला जातो. ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तेच आधीच्या प्रश्नाचंही आहे. नेता आणि कल्पना यांना रुजण्यासाठी सुपीक जमीन असावी लागते. अर्थात, नेत्यानेही तिथे चांगलं बी पेरायला हवं. वेगळ्या प्रकारे सांगायचं तर, दोन्ही बाजूंनी प्रभाव पडायचा असेल तर परस्परांची गरज असायला हवी. लोकांना जे ऐकायचंय, मग ते जाणीवपूर्वक असो किंवा गाफिल राहून वाटत असो, तसं काही राजकारण्याकडे सांगण्यासारखं नसेल तर 'प्रॉपगॅन्डा'चा काहीच उपयोग नाही. (पान १०९)

या पुढची पन्नासेक पानं स्त्रियांसाठीचे उपक्रम, शिक्षण, सामाजिक कार्य यांच्या संदर्भात 'प्रॉपगॅन्डा'ची संकल्पना स्पष्ट करण्यात खर्च झालेली आहेत. 'रेघे'वरच्या आजच्या नोंदीसाठी त्याचे तपशील आवश्यक न वाटल्याने त्या पानांचा गोषवारा टाळूया. फक्त पुस्तकाचं शेवटचं वाक्य देऊ ठेवू :
'प्रॉपगॅन्डा' कधीच मरणार नाही. प्रॉपगॅन्डा हे गोष्टी फलदायी करण्यासाठीचं आधुनिक साधन आहे याची जाणीव बुद्धिमान लोकांनी ठेवायला हवी. या साधनाच्या माध्यमातूनच गोंधळात काही सुव्यवस्था राखता येईल.
***
या सगळ्या मजकुरात सत्ताकांक्षी राजकीय नेत्यांसोबत ज्या 'अदृश्य शासना'बद्दल बोललं गेलंय ते म्हणजे आर्थिक सत्ता राखून असलेली मंडळी होत, हे चाणाक्ष वाचकांनी एव्हाना हेरलं असेलच. त्यामुळे या दोन सत्तांच्या संबंधांवरूनच आपण समूहनिर्णय घेणार असू तर त्यावर उपाय काय? कदाचित माध्यमं थोड्याफार प्रमाणात यावर उपाय देऊ शकतात. पण माध्यमांच्या मागेही असलेल्या 'अदृश्य शासना'मुळे तेही होण्याची शक्यता दिसत नाही. अर्थात, समूहच यावर काहीतरी नवीन शक्यता शोधून काढत असेल, तर तेच ठीक म्हणा.

आत्तापर्यंत झालेल्या आणि येऊ घातलेल्या निवडणुका, आत्तापर्यंत झालेली आणि येऊ घातलेली विविध भाषणं, आत्तापर्यंत लिहिले गेलेले आणि येऊ घातलेले वर्तमानपत्रांमधील राजकीय विश्लेषणपर लेख आणि आत्तापर्यंत झालेल्या आणि येऊ घातलेल्या क्रांत्या यांना ही नोंद अर्पण करू आणि थांबू. जय हिंद जय महाराष्ट्र.
***


खुर्ची आणि पेपर (फोटो : रेघ)


ही पाहा बिनसत्तेची खुर्ची
या बसा
वाचा पेपर
पाहा टीव्ही
खोला फेसबुक
नि बोला
लाइफ झिंगालाला


1 comment:

  1. बोजेवारांचं'पावणेदोन पायांचा माणूस' आठवलं...सगळं कळलं नाही

    ReplyDelete