आंद्रे शिफ्रीन (फोटो : इथून) copyright : geraint@geraintlewis.com |
आंद्रे शिफ्रीन हे अमेरिकेतल्या पुस्तक प्रकाशन व्यवसायामधलं एक ज्येष्ठ नाव. पण त्यांचा व्यवसाय म्हणजे 'इंडिपेन्डंट पब्लिशिंग' म्हणून जो ओळखला जातो तो. म्हणजे पुस्तकनिवडीच्या निर्णयप्रक्रियेत बाजाराच्या नियमांना घुसू न देणं इथपासून ते पुस्तकाचं मूल्य बाजाराच्या नियमांनुसार न जोखणं, अशा काही गोष्टी या वृत्तीच्या प्रकाशन व्यवसायात येतात. शिफ्रीन यांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेली आहे आणि सध्या ते 'द न्यू प्रेस' या प्रकाशन संस्थेचे संचालक आहेत.
फ्रेंच मुळं असलेल्या अमेरिकी शिफ्रीन यांच्या 'द बिझनेस ऑफ बुक्स' आणि 'वर्ड्स अँड मनी' या दोन
पुस्तकांची एकत्रित भारतीय आवृत्ती म्हणजे 'द बिझनेस ऑफ वर्ड्स' हे पुस्तक.
आपण आज या पुस्तकातल्या (आणि मुळातून स्वतंत्र पुस्तकच असलेल्या) पहिल्या भागाविषयीच फक्त नोंद करतो आहोत. दुसऱ्या भागाविषयी पुन्हा केव्हातरी.
शिफ्रीन जवळपास तीस वर्षं 'पँथिअन' या प्रकाशन संस्थेमधे संपादक नि संचालक म्हणून काम करत होते. पण तिथून त्यांना बाहेर पडावं लागलं. ते स्वतःहून तिथून बाहेर पडले. का?
शिफ्रीन 'पँथिअन'मधून बाहेर का पडले? या प्रश्नाभोवती अनेक प्रश्न तयार होतात आणि त्या भोवती एक मोठी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा आढावा शिफ्रीननी 'द बिझनेस ऑफ बुक्स'मधे घेतलाय. हे मुख्यत्त्वे अमेरिका आणि युरोपातल्या प्रकाशन व्यवसायातलं चित्र आहे. मराठीत एका पुस्तकाची सर्वसाधारणपणे एक हजार प्रतींची आवृत्ती निघते, शिवाय एकूण व्यक्ती नि व्यवहार पाहता आपल्या विहिरीबाहेरच्या कुठल्याही चित्राबद्दल बोलणं आणि त्यातून काही समान धागे शोधणं, हे फारच भाबडेपणाचं होऊ शकतं. पण तरी कोणाला असेल इंटरेस्ट तर, म्हणून ही नोंद.
या पुस्तकात शिफ्रीन अनेक अमेरिकी प्रकाशकीय किस्से, आणि संबंधित नावं यांच्या संदर्भांनी बोलतात. कधी आत्मचरित्रात्मक तपशीलही देतात. त्यांचे वडीलही फ्रान्समध्ये प्रकाशन व्यवसायाशी संबंधित होते, इत्यादी. ज्याँ पॉल सार्त्रसारख्या प्रसिद्ध लेखकाचीही पुस्तकं प्रकाशित करणं फायदेशीर नाही, असं म्हणत अमेरिकी प्रकाशक कसे कालांतराने त्याच्या काही पुस्तकांच्या आवृत्त्या काढण्यापासून दुरावत गेले, इत्यादी. हे तपशील रोचक असले तरी आपल्या नोंदीत आपण त्यात फार जाणार नाहीयोत. आपण फक्त शिफ्रीन यांना अनुभवातून काय सापडत गेलं नि त्यांनी काय निरीक्षणं नोंदवली त्यावर लक्ष देऊ. ही निरीक्षणं केवळ प्रकाशन व्यवसायापुरती मर्यादित नाहीत, तर पुस्तक प्रकाशनासोबत वृत्तपत्रं आदी सगळ्याचा मिळून जो माध्यम व्यवहार तयार होतो त्यासंबंधीचीही आहेत.
म्हणजे एखादी बडी माध्यम कंपनी, जी दूरचित्रवाणी वाहिन्या, वृत्तपत्रं अशा विविध ठिकाणी हात मारून आहे, ती पुस्तक प्रकाशन हा व्यवसायही इतर मनोरंजनात्मक माध्यम व्यवसायांसारखाच गणत जाते आणि या व्यवसायाकडूनही तशाच आर्थिक परताव्याची अपेक्षा करते. त्यातून निर्णयप्रक्रियेवर परिणाम होत जातो आणि पुस्तकांचीही केवळ एक खपवण्याजोगी नि खपू शकेल अशी 'वस्तू' होऊन जाते. आपण हे म्हणतोय त्याचा अर्थ असा नव्हे की पुस्तकं खपू नयेत किंवा खपवू नयेत, कारण एकदा पैशातली किंमत छापली की ती वस्तू असते नि ती विकली जाणं अपेक्षितच आहे. पण काय खपेल याचा आधीच अंदाज बांधून पुस्तक प्रकाशित करायचं की नाही याचा निर्णय घेणं हे तितकंसं बरं नाही. कारण एखादं पुस्तक पहिल्या महिन्याभरातच तुफान खपेल, तर एखाद्या पुस्तकाची महिन्याभरात एखादीच प्रत खपेल, पण शंभर वर्षांनी त्याचं महत्त्व सिद्ध होईल किंवा त्या पुस्तकाच्या खपाचा वेग जरा हळू असेल. त्यामुळे पुस्तकनिर्मिती करतानाचा निर्णय केवळ आपल्या आयुष्याच्या तुरळक वर्षांमधल्या फुटकळ फायद्यांवर करणं चुकीचं आहे.

आणि शिफ्रीन यांच्या वरच्या म्हणण्याला (ज्यात आपण थोडं आपलंही म्हणणं घुसडलंय) पुरावेही आहेत. उदाहरणार्थ, 'पँथिअन'ने १९५०च्या दशकाच्या अखेरीस एक 'अवघड' रशियन कादंबरी (इंग्रजी अनुवाद) अमेरिकेत प्रकाशित करायचं ठरवलं नि तिची जेमतेम चार हजार प्रतींची पहिली आवृत्ती छापली. ही कादंबरी म्हणजे बोरीस पास्तरनाकची 'डॉक्टर झिवागो'. नंतर पास्तरनाकला नोबेल पारितोषिक मिळालं नि कादंबरीच्या 'हार्ड-कव्हर' रूपात दहाएक लाख प्रती खपल्या, नंतर पुन्हा 'पेपरबॅक' रूपातल्या पन्नास लाख प्रती खपल्या. असं कुठल्या पुस्तकाचं कधी काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे केवळ आर्थिक फायद्याच्या निकषांवर पुस्तकाची एकूण किंमत करणं बरोबर नाही. आणि संपादकीय पातळीवर ती तशी ठरवणं अजिबातच बरोबर नाही. पण संपादकीय हातातून बऱ्याच गोष्टी निसटत आल्या आहेत.
वृत्तपत्रांची सूत्रं संपादकीय हातातून पूर्णपणे निसटत गेल्याचं आपण जसं पाहतो, तसंच पुस्तक प्रकाशनाच्या बाबतीतही होत जातं. एखाद्या पुस्तक प्रकाशन संस्थेच्या प्रमुखपदी ठोकळेबाज व्यावसायिकाला आणून बसवणंही तसं नवीन नाही, असं शिफ्रीन म्हणतात. यासाठी त्यांनी १९१५ सालचं अमेरिकेतल्या 'हार्पर्स'चं उदाहरण दिलंय. तेव्हा 'हार्पर्स'ची सूत्रं हातात घेतलेल्या सी. टी. ब्रेनडर्डिनना कंपनीच्या मालकांनी सांगितलेलं की, 'ह्या संस्थेत असा एकही माणूस नाही ज्याची जागा आठवड्याला दहा डॉलर पगारावरचा कारकून घेऊ शकणार नाही'. यात कारकून पदाचा अपमान आहेच, शिवाय कोणत्याही कामाला कौशल्याऐवजी पैशामध्ये तोलण्याची वृत्तीही स्पष्ट दिसतेय.
शिफ्रीन यांच्याबाबतीतही असंच झालं. 'पँथिअन'ची मालक कंपनी 'रँडम हाउस'ने संचालकपदी अल्बर्तो व्हितालेंना आणलं नि शिफ्रीन यांची संस्थेतून बाहेर पडण्याची सुरुवात झाली. व्हितालेंना शिफ्रीन पहिल्यांदा भेटले तेव्हा ते शिफ्रीनना म्हणाले, 'अह्, पँथिअन, व्हेअर ऑल दोज मार्व्हलस बुक्स कम फ्रॉम.' हे वाक्य कसं घ्यावं ते शिफ्रीनना कळेना. आधी त्यांना वाटलं की हे कौतुकाचं वाक्य आहे, पण व्हितालेंच्या पुढच्या कामगिरीने त्यांना कळलं की तो आरोप होता!

संस्थेमध्ये काम करणारे लोक आणि संस्थेकडून प्रकाशित होणारी पुस्तकं, दोन्हींच्या संख्येत दोन तृतीयांशाने कपात करण्याची गरज आहे आणि सर्वाधिक विक्री होत असलेल्या पुस्तकांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असं सांगत व्हितालेंनी आपलं धोरण राबवायला सुरुवात केली. मग नोबेल पारितोषिक मिळालेल्या लेखकांच्या (म्हणजे किमान ज्यांच्या लोकप्रियतेची तरी खात्री आहे अशा) नावांवरही रेघा मारून 'हा कोण, तो कोण' असं करत व्हितालेंनी लेखकांची यादी कमी करत आणली. यात फिक्शन आणि नॉन-फिक्शन सगळंच आलं.
शिफ्रीन यांनी या पुस्तकात 'पँथिअन'च्या (त्यांच्या मते) ढासळत जाण्याची किस्से वजा कथा सांगितलेय, ती प्रतिकात्मक वाटावी अशा रितीने आपल्याकडेही घडतेय. वरच्या दोन परिच्छेदांसारखी आपल्याकडची नावं न घेता सांगायची उदाहरणं अशी :
१. एका वृत्तपत्राची वडिलांकडून मुलाकडे आलेली मालकी. मुलगा चाळिशीतला. सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रांत ज्यांनी योगदान दिलंय असं आपण मानतो अशांपैकी - म्हणजे लेखक, गायक, फोटोग्राफर, चित्रकार, कार्यकर्ते, इत्यादींपैकी - कोणी मेलं तर त्यांच्यावरती विशेष लेख आदी गोष्टींसाठी अख्खं पान द्यायची गरज नाही. आणि मेलेल्या माणसाची बातमी पहिल्या पानावर कशाला घ्यायची? आणि द्यायचीच असली तर एक कॉलमात द्या. - अशा सूचना या वृत्तपत्राला जवळून ओळखणाऱ्यांना माहिती आहेत.
२. एका प्रकाशनसंस्थेची वडिलांकडून मुलाकडे आलेली मालकी. मुलगा पस्तिशीतला. वडील मुलाला म्हणतात, 'भाऊ पाध्ये वाच'. मुलगा म्हणतो, 'हां हां, ते परवा तुम्ही म्हणत होतात तेच ना'. वडील म्हणतात, 'हां, साहित्यात त्याने खरी मुंबई आणली'. मुलगा म्हणतो, 'हो हो, तुम्ही परवा 'चक्र' नावाचं पुस्तक दिलंत ते त्यांचंच, तेच ना.' हा प्रत्यक्षातलाच किस्सा आहे आणि त्यात लेखकांच्या नावांमध्येही मी बदल केलेले नाहीत. (चक्र : जयवंत दळवी).
शिफ्रीन यांच्या निरीक्षणांमध्ये आणि वरच्या दोन उदाहरणांमध्ये काही सारखेपणा जाणवत असेल, तर ह्या पुस्तकाबद्दल आपण केलेल्या नोंदीला अर्थ आहे. यातला मुख्य मुद्दा आहे तो शिफ्रीन यांच्याच शब्दांत देतो :
पूर्वीपासून, (आर्थिक) फायद्याच्या सर्वसाधारण अपेक्षांपासून विचार-कल्पना (आयडिया) दूर ठेवल्या जात. नवीन दृष्टिकोन देणारी, वेगळी मांडणी करणारी पुस्तकं वरकरणी तरी पैश्याच्या बाबतीत तोट्यात जाणार, हे गृहीत धरलं जात असे. 'विचार-कल्पनांसाठी मुक्त बाजार' या संकल्पनेतून प्रत्येक विचार-कल्पनेचं बाजार-मूल्य अपेक्षित नाही, तर सर्व प्रकारच्या विचार-कल्पनांना लोकांसमोर येण्याची, व्यक्त होण्याची आणि केवळ चुटक्यांमधून नाही, तर पूर्णपणे मांडणी करण्याची संधी मिळणं त्यातून अपेक्षित आहे.
पण आता बाजाराचा नियम शिफ्रीन यांना अपेक्षित आहे तसा नाही. माहिती कमी-जास्त असू शकते, पण आपण पुस्तक प्रकाशन व्यवसायात आहोत आणि समजा आपल्याला ('चक्र'सारखं) एखादं पुस्तक माहीत नाही, तर त्याची किमान माहिती करून घेणं, हे व्यवसायाचा भाग म्हणून तरी करायला हवं ना. पण विचार-कल्पनांच्या बाबतीतल्या व्यवसायात आता ही गरज उरलेली नसावी. त्यामुळे पुस्तकाच्या निर्मितीसंबंधीचे निर्णय शिफ्रीन यांच्या अपेक्षेला उलटं करून होणार हे साहजिक आहे. आणि त्यामुळे आर्थिक फायदा कमी होत नाही ना, मग ठिकाय की!
आणि समजा पुस्तकं नि वृत्तपत्रं अशा माध्यम व्यवहारातल्या (विचार-कल्पनांशी - आयडियांशी संबंधित असलेल्या) गोष्टीही इतर वस्तूंसारख्याच आहेत, असं गृहीत धरलं, तरी त्याबाबतीत आपण व्यवस्थित ग्राहकासारखं वागतो का? इतर वस्तूंसारखा या वस्तूंमधला कमकुवतपणा बाजारात लगेच सिद्ध होतो का? उदाहरणार्थ, आपण मिसळ खातोय आणि ती खारट झालेय किंवा रस्सा आपल्याला हवा तेवढा झणझणीत नाहीये, तर आपण लगेच मिसळीच्या निर्मात्याकडे तक्रार करू की, भाऊ मीठ जादा झालंय, किंवा रश्श्यात तिखट घाल. पण पुस्तकाच्या बाबतीत किंवा माध्यमविषयक वस्तूंच्या बाबतीत आपण एवढे चवदार वागतो का?

उत्तर नसलेला प्रश्न विचारल्याबद्दल माफ करा. आणि मिसळ ही पुस्तकापेक्षा खरोखरच जास्त महत्त्वाची, प्राथमिक आणि बहुतेकदा श्रेष्ठ असलेली गोष्ट आहे, हे अर्थातच मान्य. शिवाय मिसळीबद्दलचा कमकुवतपणा जसा आपल्याला आपोआप जिभेला, पोटाला जाणवेल तसा माध्यमविषयक गोष्टींचा कमकुवतपणा सहजपणे जाणवणार नाही. पण तरी मिसळीएवढं नाही पण थोडं तरी माध्यमांविषयी चवदारपण दाखवलं तर कदाचित...
प्रकाशक : नवयान। किंमत : २९५ रुपये |
No comments:
Post a Comment