पॉप्युलर प्रकाशन |
या नोंदीची साधारण तीन निमित्तं आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरू केलं ती तारीख होती ३ एप्रिल १९२६. बाबासाहेबांच्या जयंतीची तारीख आहे १४ एप्रिल. आणि बाबासाहेबांचं आत्तापर्यंतचं बहुधा सर्वांत लोकप्रिय चरित्र लिहिणाऱ्या धनंजय कीर यांचं जन्मशताब्दी वर्ष २३ एप्रिलला संपतंय. ही निमित्तं साधत कीरांनी लिहिलेल्या चरित्राच्या मदतीने आपण आंबेडकरांच्या पत्रकारितेसंबंधी लहानशी नोंद करून ठेवणार आहोत. धनंजय कीर यांच्यासंबंधी एक कच्च्या स्वरूपातली वेबसाइट (http://dhananjaykeer.com) बहुधा धनंजय कीर स्मारक समितीने तयार केली होती. गेल्या काही दिवसांपर्यंत ती होती, पण आज पाहायला गेल्यावर या वेबसाइटच्या पत्त्याचा कालावधी संपल्याची सूचना येतेय. त्यामुळे कीरांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ही अशी होतेय. मराठी संस्कृतीशी हे सुसंगत आहे.
आंबेडकरांनी 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत' अशी दोन पाक्षिकं वेगवेगळ्या टप्प्यांवर काढली. माध्यमांच्या या व्यवहाराशी आंबेडकरांचा संबंध कसा आला आणि त्यांच्या एकूण माध्यम हाताळणीकडे पाहून आपल्याला काही हातास लागावं इतपतच या नोंदीचा हेतू आहे.
पान क्रमांक ४८वर आंबेडकरांच्या पहिल्या 'मूकनायक' या पाक्षिकासंबंधी कीर काही माहिती देतात :
आंबेडकरांनी 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत' अशी दोन पाक्षिकं वेगवेगळ्या टप्प्यांवर काढली. माध्यमांच्या या व्यवहाराशी आंबेडकरांचा संबंध कसा आला आणि त्यांच्या एकूण माध्यम हाताळणीकडे पाहून आपल्याला काही हातास लागावं इतपतच या नोंदीचा हेतू आहे.
०
पान क्रमांक ४८वर आंबेडकरांच्या पहिल्या 'मूकनायक' या पाक्षिकासंबंधी कीर काही माहिती देतात :
शाहू महाराजांनी आंबेडकरांना आर्थिक साहाय्य देऊन एक पाक्षिक काढावयास लावले. ते 'मूकनायक' नावाचे पाक्षिक ३१ जानेवारी १९२० या दिवशी त्यांनी सुरू केले. त्या दिवसापासून आंबेडकरांनी त्या मूक समाजाचे नायकत्व स्वीकारले. पांडुरंग नंदराम भटकर यांना आंबेडकरांनी संपादक नेमले होते. ते महार समाजापैकी असून पुण्यातील डी. सी. मिशनमधून त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले होते. त्यांची पत्नी ब्राह्मण समाजापैकी होती. त्यापायी त्यांना बराच छळ सोसावा लागला होता. त्या पाक्षिकावर आंबेडकरांचे संपादक म्हणून नाव नसले, तरी ते आंबेडकरांनी सुरू केलेल्या चळवळीचे मुखपत्र होते, हे अनेकांना माहीत होते. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने तो काळ किती प्रतिकूल आणि कठोर होता ह्याची कल्पना 'केसरी'सारख्या वर्तमानपत्राने 'मूकनायका'बद्दल दोन शब्द लिहिणे तर सोडाच, पण पैसे घेऊन त्याची जाहिरात छापण्याचे नाकारले, ह्यावरून येईल. त्या वेळी टिळक हयात होते.
'बंडाचे निशाण उभारले' या प्रकरणात महाडमधील चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या अधिकारासंबंधी आंबेडकरांनी केलेल्या क्रांतिकारी कृत्याचा इतिहास सांगून कीर पान क्रमांक ८९वर नोंदवतात :
आंबेडकरांवर टिकाकारांचे हल्ले होऊ लागले. वर्तमानपत्रातून आपले मत प्रतिपादन करण्याची नि विरोधकांच्या मतांचे नि टीकेचे खंडन करण्याची आवश्यकता आंबेडकरांना आता तीव्रपणे भासू लागली. म्हणून त्यांनी ३ एप्रिल १९२७ रोजी 'बहिष्कृत भारत' नावाचे पाक्षिक धडाक्याने सुरू केले. ध्येयनिष्ठेने वर्तमानपत्र चालविणाऱ्यांनी वर्तमानपत्रावर निर्वाहाकरिता विसंबून राहू नये, असे आपणास वाटत असल्यामुळे आपण वकिलीचा स्वतंत्र धंदा सुरू केला, असे पहिल्या अग्रलेखात त्यांनी आत्मपरिचयात्मक निवेदन केले होते. समाजसेवकाचा आर्थिकदृष्ट्या कणा ताठ असला, तर तो अधिक सुलभरित्या कार्य करू शकतो, असे यापूर्वीच त्यांचे मत झालेले होते. अस्पृश्य समाजाच्या हिताच्या दृष्टीने देशातल्या घडामोडींकडे लक्ष देऊन त्यांचे गाऱ्हाणे, त्यांची मते नि त्यांच्या प्रतिक्रिया यांची सरकारदरबारी नोंद व्हावी आणि भावी राजकीय सुधारणांच्या वेळी अस्पृश्यांना अधिकार मिळावे या हेतूने हे पाक्षिक त्यांनी सुरू केले होते. त्यांचे पहिले वृत्तपत्र 'मूकनायक' हे बंद पडले होते. ते ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप हे गृहस्थ चालवीत असत. १९२० साली बाबासाहेब लंडनला गेले त्या वेळी त्यांनी ते भटकर ह्यांच्या स्वाधीन केले होते. भटकरांनंतर घोलपांकडे सर्व व्यवस्था सोपविण्यता आली. परंतु अव्यवस्थेमुळे नि वर्गणीदारांच्या कमतरतेमुळे पत्र १९२३ पूर्वीच बुडाले. यास्तव 'बहिष्कृत भारत' नावाची एक प्रकाशनसंस्था स्थापून अस्पृश्यांचे मानवी हक्क प्राप्त करण्यासाठी जागृती केली पाहिजे नि झगडले पाहिजे असे बाबासाहेबांनी ठरविले. त्यासाठी वीस सहस्त्र रुपये निधी गोळा करण्यासाठी रामचंद्र कृष्णाजी कदम, भवानी पेठ, पुणे, यांना १९२४च्या डिसेंबरमध्ये नियुक्त केले होते. दोन वर्षांनी काही निधी जमताच 'बहिष्कृत भारत' पाक्षिक सुरू झाले. मध्यंतरी घोलप हे विधिमंडळाचे नियुक्त सभासद होते. त्यांनी पुन्हा 'मूकनायक' पाक्षिक सुरू केले. परंतु ते पुन्हा बंद पडले.
पुढे पान क्रमांक १३६वर कीर म्हणतात :
'बहिष्कृत भारत' पाक्षिक सुरू ठेवण्यासाठी त्यांनी अस्पृश्य जनतेकडे निधीची मागणी केली होती. आपल्या निवेदनात ते म्हणाले की, 'सरकारने देऊ केलेली, दरमहा अडीच हजारपर्यंत वाढू शकणारी नोकरी, समाजकार्य करण्यास मोकळी असावी म्हणून आपण नाकारली. रूढ धर्माचारांतील नि लोकाचारांतील दोषांचे आविष्कार करण्याचे करण्याचे भयंकर कार्य हाती घेतल्यामुळे देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेला शिव्याशापांचा भडिमार आपण एकसारखा सोशीत आहोत. फार दिवसांच्या मित्रांचा दीर्घ रोष पत्करला. त्यामुळे धंद्यात मिळणाऱ्या त्यांच्या साहाय्यास आपण मुकलो आहो. 'बहिष्कृत भारत'चे रकाने भरून जागृतीचे काम केले व ते करताना आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐषआरामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या.' परंतु वेळेवर साहाय्य मिळाले नाही. काही महिने 'बहिष्कृत भारत' बंद पडले.
बहिष्कृत भारत : पहिला अंक (फोटो : इथून)
मध्यंतरी २९ जून १९२८पासून त्यांच्या नेतृत्वाखाली समता संघाचे 'समता' पाक्षिक निघू लागले. 'बहिष्कृत भारता'चा दुसऱ्या वर्षीचा पहिला अंक १६ नोव्हेंबर १९२८ या दिवशी निघाला. 'समता' एका शुक्रवारी तर 'बहिष्कृत भारत' दुसऱ्या शुक्रवारी निघे. असे काही महिने चालून पुन्हा १९२९ साली दोन्ही पाक्षिके बंद पडली.
No comments:
Post a Comment