Sunday 5 September 2021

जयंत पवारांचा 'इसम'

गेल्या आठवड्यात लेखक, पत्रकार व नाटककार जयंत पवार यांचं निधन झालं. त्यांच्या कथा चांगल्याच आठवणीत राहणाऱ्या होत्या/आहेत. शिवाय, त्यांच्या पत्रकारितेचाही एक संदर्भ अगदीच ठळकपणे लक्षात राहिलेला असल्यामुळे त्यासाठीसुद्धा ही नोंद.

'टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन' या जयंत पवारांच्या कथेत ('फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहात समाविष्ट, लोकवाङ्मय गृह, २०१०) सिद्धिविनायक टेंगशे यांना इतर अनेक लोकांसोबत ट्रेनमधून जात असताना एका मुलीवर बलात्कार होताना पाहावा लागतो. किंवा ते पाहत राहतात. बलात्कार करणाऱ्याच्या हातात धारदार सुरा असतो. त्यामुळे टेंगशे आणि इतर कोणी काही करत नाहीत. याने टेंगश्यांना ताप भरतो. मग दुसऱ्या दिवशी या घटनेवर घरी चर्चा होतात, तेव्हा टेंगश्यांची ट्रेनमधल्या मुलीच्याच वयाची मुलगी तिच्या वडिलांना विचारते, 'पप्पा तुम्ही तिथे असता तर गप्प बसला असता का, सांगा ना! यावर टेंगशे काही बोलले नाहीत. कारण, पप्पा गप्प बसले नसते, हे उत्तर नवमीच्या मनाशी तयार असणार, याची त्यांना कल्पना होती.' कथेत हे बोलणं आधीच्या पानावर येतं, आणि टेंगश्यांना 'ही परवाची गोष्ट' (...) 'उलट्या क्रमाने (...) जशीच्या तशी स्वप्नात' दिसते. या घटनेमध्ये ते मोटरमनच्या केबिनमध्ये जातात, त्याला सांगतात की 'डब्यात एक माथेफिरू एका सतरा-अठरा वर्षांच्या पोरीला सतावतो आहे, झोंबतो आहे. (...) तेव्हा तुम्ही तातडीने चला.' यावर मोटरमन म्हणतो, 'एका मुलीपेक्षा अकरा हजार तीनशे सत्तावन्न प्रवाशांची जबाबदारी आहे माझ्यावर, ती महत्त्वाची आहे. रूळ सरळच असतात याची गॅरेंटी नाही. सांधे तर बदलतच असतात. तुमच्याबरोबर आलो आणि इथे ट्रेन कशावर तरी आपटली म्हणजे? सबब येता येणार नाही.'

टेंगश्यांच्या बाबतीत 'परवा घडलेल्या गोष्टी'सारखी गोष्ट एका इसमाच्या बाबतीत आधीही घडल्यासारखं वाचक म्हणून आठवत राहिलं. गौरकिशोर घोष यांच्या 'लोकटा' या भयंकर घुसळण असणाऱ्या बंगाली कादंबरीचं मराठी भाषांतर अशोक शहाणे यांंनी केलं होतं (प्रास प्रकाशन, महाशिवरात्र, शके १९०१. इसवीसन १९८० असेल). पंच्याण्णव पानांच्या या कादंबरीतला 'इसम' अनेक छटांच्या हिंसेला सामोरं जात असतो. एक दिवस आत्याच्या दिराच्या मुलीनं त्याला सिनेमाची तिकिटं काढायला पाठवलेलं असतं. तर तिकडे त्याला काही गुंड पकडतात 'साला, एकटाएकटा मजा लुटतोयस!' असं म्हणून हाणतात. त्यावर काही  करणं त्याला शक्य होत नाही. पण- 'एव्हाना कुठं ह्या अमानुष अत्याचाराच्या अर्थाचा त्याला उलगडा झाला. अशा अवस्थेत सापडल्यावर, म्हंजे जन्माची चावीच दुसऱ्याच्या हाती लागून समूळ नाहीशी व्हायचा प्रसंग पडल्यावर, इतिहासात कोणत्या-ना-कोणत्या तऱ्हेनं आपली छाप ठेवून गेलेल्या सगळ्या अवतारी पुरुषांनी, पराक्रमी सम्राटांनी, दिग्विजयी योद्ध्यांनी, किंवा लोकांच्या हिताचा वारसा घेतलेल्या विचारवंतांनी काय केलं असतं, काही कल्पना नाही. धरून चालायला हवं की त्यांच्या अनमोल आयुष्यांत ही  समस्या नेमक्या इतक्या प्रकट स्वरूपांत नाही दिसून आली.'

नंतरही या  इसमावर अशीच वेळ येते. तो एका मुलीसोबत खोलीत अडकलाय. बाहेर मुलीच्या मागावर एक 'सांड' आहे. किंबहुना, मुलीला सांडाच्या स्वाधीन करायचं काम इसमाने जीवाच्या भीतीपोटी स्वीकारलंय. खोलीत मुलीचं आणि इसमाचं बोलणं होतं, तेव्हा ती मुलगी इतर काही बोलून त्याला म्हणते, 'तुच्छ जीवच तुझ्या लेखी मोठा ठरला अन् माझं शील मात्र काहीच किंमत नाही असं? शी!' यावर इसम मनातल्या मनात म्हणतो, तुझ्या लेखी तुझं शीलच तेवढं मोठं न् माझा जीव मात्र काहीच किंमत नाही असा? जीव काय तुच्छ मानायची गोष्ट आहे? मुलगी: शील गेलं तर बायकांचं आणखी उरतंच काय? इसम: (मनातल्या मनात) शरीर राहतं, आयुष्य राहतं. जीव गेला तर माणसांचं काय राहतं? पुरुषत्व गेलं तर पुरुषाचं काय राहतं?

इसमाचं मनातल्या मनात जे होतं, तसंच काहीसं टेंगश्यांचं स्वप्नातल्या स्वप्नात होतं. हे पेच दोघांसमोर पुरुष म्हणूनच आलेले आहेत असं नाही, व्यक्ती म्हणूनही त्यांना काहीतरी टोकाची निवड करायची वेळ आलेली आहे. पवारांची कथा नंतर वेगळं वळण घेते आणि व्यक्ती-व्यक्तींच्या समूहालासुद्धा निवड करायची वेळ कशी येते इथपर्यंत जाते. किंबहुना, व्यक्तीनेच स्वतःहून निवड करायची की समूहाने ठरवल्यावरच व्यक्तीला निवड करता येते, असे आणखीही काही बिकट प्रश्न या कथेच्या ओघात वाचकाच्या मनात उमटू शकतात. प्रसंग अगदी अटीतटीचा, हिंसक आहे. टेंगशे आणि इसम यांच्यातलं हे एक साधर्म्य वाचक म्हणून पवार यांना ई-मेलद्वारे कळवलं, तोवर (म्हणजे २०१६ साली) 'इसम' ही कादंबरी त्यांच्या वाचनात आलेली नव्हती. दोन्हींचे संदर्भ तसेही वेगळेच आहेत, फक्त त्यातले पेच काही साधर्म्य दाखवणारे आहेत. शिवाय, पवारांनी तेव्हा कळवल्यानुसार, 'टेंगशेचं कथानक सुचायला मुंबईतली ती लोकल डब्यातली मतीमंद मुलीवरच्या बलात्काराची घटना निमित्त ठरली तरी त्यामागची मूळ प्रेरणा गुजरात दंगलीची होती. या दंगलीचं समर्थन करणारा मध्यमवर्ग कसा बदलत गेला, उजवीकडे झुकत गेला यासंबंधी काही विचार डोक्यात सुरु होते. तिथेही गोध्रा जळित कांडाशी ट्रेनचा संबंध होता.' हे कदाचित आता नोंदवायला हरकत नाही. इतरही काही वैयक्तिक आठवणींच्या संदर्भामुळे त्यांच्या कथेत ट्रेन आल्याचं त्यांनी नोंदवलं होतं, पण ते बहुधा नोंदवणं रास्त होणार नाही. 

पवारांची कथा आणि घोष यांची शहाण्यांनी भाषांतरित केलेली कादंबरी हे दोन्ही मुळातून वाचण्यासारखं आहे. ('इसम' या कादंबरीचं पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेलं दीर्घ परीक्षण 'दाद' या पुस्तकात आहे, आणि गौरकिशोर घोष यांच्या आठवणी जागवणारा त्यांनी लिहिलेला लेख 'मैत्र' या पुस्तकात आहे). पवार आणि घोष यांच्यातलं आणखी एक साधर्म्य म्हणजे दोघेही पत्रकार होते.

पवारांनी यांनी वरळीच्या स्मशानभूमीत मयताचा एंट्री पास लिहिणाऱ्या माणसाची एक दीर्घ मुलाखत घेतली होती. चंद्रकांत खोत यांच्या संपादनाखाली निघणाऱ्या 'अबकडइ' या दिवाळी अंकात १९९२ साली ती प्रकाशित झाली. म्हटलं तर पत्रकार म्हणून पवारांनी कृष्णा गोविंद मोहिते या 'पासवाला' इसमाशी साधलेला हा संवाद आहे. पण तो फक्त तेवढ्यापुरता उरत नाही. त्यात बरेच सामूहिक धागेदोरेही उलगडतात. हा एकंदर मजकूर साधा नि सखोल आहे. १९९२ सालची ही मुलाखत २०१२ साली 'निवडक अबकडइ' (संपादन- सतीश काळसेकर, अरुण शेवते, लोकवाङ्मय गृह) असा खंड प्रकाशित झाला त्यातही आली. आणि आता याही गोष्टीला दहा वर्षं उलटत येतील, तरीही ती मुलाखत प्रस्तुत ठरणारीच राहते. पत्रकारी कुतूहलातून निपजलेलं लेखनही कसं सखोल जाऊ शकतं नि टिकाऊही राहू शकतं, याचा हा सुंदर नमुना आहे.

या संदर्भातही पवारांना ई-मेलद्वारे कळवलं. याबद्दल त्यांनी ईमेलवर नोंदवल्यानुसार, 'मी देखील माझ्या वर्तमानपत्रात काही वर्षांपूर्वी कोपरा नावाचं सदर सुरू करावं आणि त्यात एकूण जगण्यात कुठेतरी कोपऱ्यात असलेल्या माणसांविषयी लिहावं असा एक प्रस्ताव ठेवला होता, जो अर्थातच नामंजूर झाला. कारण रस्त्यावरची, हातावर पोट असलेली माणसं किंवा एकूणच आपल्या खिजगणतीत नसणारी पण वेगळं जीवनभान असलेली माणसं मुबलक असली तरी ती वर्तमानपत्राचा टार्गेट रीडर नाहीत. असो. विजय तेंडुलकरांना अशा गोष्टींत फार रस असे. मला रस्त्यावरच्या भिकाऱ्यांशी बोलावं असं फार वाटतं. बघुया. सध्या तब्येतीचं मागे लागल्यापासून फार दगदग करता येत नाही आणि कुठल्याही वातावरणात सहज शिरावं अशी मुभाही सध्या नाही. नाहीतर एक सरकारी हॉस्पिटलात पोस्टमार्टेम करणारा मी हेरून ठेवला आहे. त्याच्या बरोबर शवागारात जाण्याची इच्छा आहे. पण सध्या शक्य होत नाही. सध्या तब्येत पुन्हा बिघडली आहे.'

या दरम्यान, अमन सेठी यांनी लिहिलेलं 'अ फ्री मॅन' हे इंग्रजी पुस्तक वाचनात आलं. दिल्लीतल्या सदर बाझार परिसरातल्या बारा टूटी चौकात रोजंदारीवर काम करणाऱ्या मोहम्मद अश्रफ या पुस्तकात मध्यवर्ती आहे. मूळचा बिहारमधल्या पाटण्याचा मोहम्मद आणि त्याच्या भोवतीच्या अशा मंडळींशी बराच काळ बोलून-बोलून अमनने हे पुस्तक लिहिलं आहे. खरं म्हणजे १९९२ साली पवारांनी पासवाला कृष्णा गोविंद मोहिते यांची जी मुलाखत घेतली, त्याच्याशी थेट जुळणारं हे पुस्तक आहे. या दोन्हीत नैतिक पवित्रे नाहीत, किंवा आपण खूप संवेदनशील असल्यामुळे हे करतोय, असाही झोक नाही. आपल्या आसपासच्या अवकाशाविषयीचं प्राथमिक पत्रकारी कुतूहल त्यात आहे. पवारांनी मोहिते यांच्या मुलाखतीचा मजकूर लिहिण्यापूर्वी या कुतूहलाचा उल्लेखही केलेला आहे. तर, अमनच्या पुस्तकाचं मराठी भाषांतर २०१४ साली आलं, त्याचं शीर्षक 'एक आझाद इसम' असं आहे. हा आणखी एक इसम.

गौरकिशोर घोष यांच्या कादंबरीतला 'इसम', टेंगशे नावाचा इसम आणि मोहम्मद अश्रफ हा इसम- वेगवेगळेच आहेत. यातल्या पहिल्या दोघांसमोरच्या पेचांमध्ये साधर्म्य आहे, आणि तिसऱ्यासमोरचा पेच आणखी वेगळाच आहे. या हिंसेच्या संदर्भातलं व्यक्तीचं नि समूहाचं काय सुरू असतं, हे पवारांच्या इतरही काही कथांमधून सापडू शकतं, आणि कृष्णा पासवाला यांच्या मुलाखतीतही ते सापडतं.

म्हणूनच पवारांच्या या आठवणीसोबत एकच प्रतिमा वारंवार मनात आली. ही प्रतिमा म्हणजे 'इसम' कादंबरीवरचं बाळ ठाकूर यांनी काढलेलं घनघोर चित्र (सर्व श्रेय बाळ ठाकूर आणि प्रास प्रकाशन यांच्याकडे. पुस्तकाचं व लेखकाचं नाव पुसून हे चित्र वेगळं केलं आहे. मूळ मुखपृष्ठासाठी इथे क्लिक करून तळातली यादी पाहा)

जयंंत पवारांविषयीच्या नोंदीचा शेवट या चित्रावर होणं रास्त वाटतं.

No comments:

Post a Comment