'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'च्या ५ डिसेंबर २०१५ रोजीच्या अंकात 'रायटिंग द प्रेझेन्ट' हा लता मणी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात एका ठिकाणी मणी यांनी म्हटलेलं की:
आपण जिची तीव्र इच्छा धरलेय ती गोष्ट आधीच अस्तित्त्वात आहे, किंवा अस्तित्त्वात नसेल तरी काही काळानं ती अस्तित्त्वात येईल, अशी बतावणी करणं ही सत्तेची लबाडी असते. भविष्याची एक विशिष्ट संकल्पना वर्चस्व गाजवते; आणि तिच्या आगमनासाठीची रंगभूमी एवढंच वर्तमानाचं स्थान उरतं. या दृष्टीत भूतकाळ अवशेषांनी भरलेला असतो, वर्तमान बिनमहत्त्वाचं असतं आणि भविष्य ही एकच गोष्ट महत्त्वाची असते. पण, आपल्याला कितीही नको असलं तरी आपण वर्तमानात जगत असतो. वर्तमानातच भूतकाळ जगला जातो, त्याची पुनरावृत्तीही होते, त्याची कल्पना आणि पुनर्कल्पना केली जाते, त्यावर टीका केली जाते आणि त्याला स्वीकारलंही जातं. आणि या वर्तमानावरच भविष्याला लादलं जातं. त्यामुळं वर्तमानाकडं लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं.
'थिअरी' या गोष्टीविषयी काही बोलावं, त्याच्या कक्षा रुंदावाव्यात, असा हेतू मणी यांनी लेखात नोंदवलाय. त्या स्वतः विद्यापीठीय क्षेत्रातल्या आहेत. इंग्रजीतला 'theory' हा शब्द 'theoria' या शब्दातून आलाय नि त्याचा अर्थ 'निरीक्षणाची कृती' असा आहे, असंही त्यांनी लेखात म्हटलंय. या निरीक्षणाचं वर्तमानाचं भान जागं ठेवण्यासाठी कला इत्यादी गोष्टींचा काही हातभार लागू शकतो का, असा एक धागा त्यांच्या लेखात दिसतो. इतरही काही धागे आहेत आणि त्यावर काही मतभेदही होऊ शकतील. आपल्याला त्यातल्या एकाच धाग्याला जोडून नोंद करायची आहे.
मणी यांनी या त्यांच्या शोधाचा भाग म्हणून दोन 'चलत्-चित्र-कविता' निकोलास ग्रान्डी यांच्यासोबत तयार केलेल्या आहेत. या प्रयोगांची माहिती त्यांनी वरच्या लेखात दिलेय. ग्रान्डी कॅमेऱ्यासोबत काही करू पाहणारे, तर मणी शब्दांसोबत काही करू पाहणाऱ्या. शब्दांची आणि प्रतिमांची एवढी गर्दी उडालेल्या आजच्या जगात या दोघांमधलं नातं तपासावं, त्यात काही प्रयोग करावेत, अशी त्यांची इच्छा त्यांनी नोंदवलेय. आणि त्यातून 'नॉक्टर्न-१' व 'नॉक्टर्न-२' या चलत्-चित्र-कविता तयार झाल्या. ('नॉक्टर्न'ला थेट मराठी प्रतिशब्द/पर्यायी शब्द माहीत असल्यास कळवा. थोडंसं 'रात्रसंगीत' असं काही त्यात येऊ शकेल कदाचित). यातली पहिली कविता खाली पाहता येईल.
या सुमारे पाच मिनिटांच्या चलत्-चित्र-कवितेत रात्रीच्या वेळी शहराच्या परिसरातील काही झाडं-झुडपं अंधुक-स्पष्ट दिसतात, काही किड्यांचे, पक्ष्यांचे किंवा काही माणसांच्या कुजबुजीचे आवाज ऐकू येतात, काही संगीताचे आवाज कानावर पडतात. आणि 'every tree a forest' हे शब्द एकसलग नाही, तर कधी एक शब्द, कधी दोन, कधी एकत्र ओळ असे दिसतात. आपल्या आसपास अस्तित्त्वाची अनेक चिन्हं जागी असतात. सुंदरपणाची किंवा रूढी म्हणून खपवली जाणारी, किंवा आता 'नव-उदारमतवादी' जगात मागास वा बिनमहत्त्वाची ठरणारी, अशी अनेक चिन्हं आसपास वावरत असतात. त्यांना समजून घेणं म्हणजे सूक्ष्म पातळीवरच्या सांस्कृतिक बदलांना समजून घेणं ठरेल, असं साधारण मणी यांचं मत दिसतं. हे सगळं आता आपण जरा बाजूला ठेवू. आणि मणी यांच्या ओळीबद्दल बोलू.
'प्रत्येक झाड (असतं) एक वन', असं मणी यांच्या ओळीचं भाषांतर करता येईल. आणि ती इंग्रजीत वाचतानाच आपल्याला मनोहर ओकांच्या 'झाड' कवितेची सुरुवात आठवू शकेल:
झाड
हे झाड नसतं
एक जंगल
(मनोहर ओकच्या ऐंशी कविता, लोकवाङ्मय गृह)
ओकांच्या कवितेतली मधली ओळ बाजूला काढली तर 'झाड (असतं) एक जंगल' असं होऊ शकेल, पण ते सांगताना झाडाला एक 'नसतेपण' त्यांनी जोडलंय. मणी यांनी तसं न करता झाडाचं वन असणं अधोरेखित करू पाहिलंय. पण तरी या दोन अर्थांमधे काहीतरी समांतर सापडल्यासारखं वाटतंच. आणि मग सदानंद रेग्यांच्या कवितेत-
झाडे आहेत उभी
दबा धरून कैदी श्वासासारखी...
(गंधर्व, पॉप्युलर प्रकाशन)
पण याचा आणि वर्तमानाचा काय संबंध? मणी यांच्या लेखाशी काय संबंध? या प्रश्नांच्या उत्तराचा अंदाज बांधण्यासाठी एखादं उदाहरण घेता येईल. मणी यांनी त्यांच्या लेखात एक रस्ता रुंदीकरणाचं उदाहरण दिलंय, ते जसंच्या तसं न घेता आपण तसंच थोडं जवळपास जाणारं नोंदवू-
म्हणजे समजा की, एखाद्या चौकात रस्त्याच्या कडेला फुटपाथवर मोठंच्या मोठं खोड दिसतंय. आपण त्या चौकातून गाडीनं-गाडीतून तर अनेकदा गेलोय, क्वचित चालतही गेलोय, बहुधा तिथं मोठं झाड असल्याचं आपल्याला कळलं असेल किंवा नसेल, आणि अचानक एखाद्या दिवशी सावली खूप कमी दिसली, तर मग कदाचित आपल्याला लक्षात येईल की, फांद्यांची काही काटछाट झालेय. किंवा कदाचित कधीतरी अख्खं झाडही रस्ता रुंदीकरणासाठी हटवावं लागू शकेल. त्यासाठी मग कायद्याचा अडसर. आता समजा की, ते चिंचेचं झाड आहे. दोनशे वर्षं जुनं. म्हणजे हा चौक चौक होण्याआधीपासूनच ते तिथं असणार, तर तरीसुद्धा आपल्याला ते लक्षात आलं नव्हतं, असं होऊ शकतं की नाही? किंवा आपण रोज एखाद्या विद्यापीठात जाताय, तिथं मुख्य इमारतीचं बांधकाम सुरू असलेलं आपल्याला दिसतं, पण समोरच कठड्याजवळ असंच शेकडो वर्षं वय असलेलं एक चिंचेचं झाड खलास होत असलेलं कदाचित दुर्लक्षित होऊ शकतं. चिंचेचं झाड तरी खूप मोठं. पण इतर असे अनेक तपशील वर्तमानात वावरत असतात, पण ते वर्तमानात जाणवतात असं नाही, आपण जाणवून घेतोच असं नाही. मणींना यात अनेक गोष्टी अपेक्षित आहेतसं दिसतं- 'विकास' म्हणजे काय, याचं उत्तर अनेकदा असं भविष्याला वर्तमानावर लादून काढलेलं असतं. देशानं 'महासत्ता' होणं, किंवा अमुक एक आत्मघातकी दहशतवादी कृत्य केल्यावर स्वर्गात जाण्याची शाश्वती, किंवा आपण अमुकएक जीवनशैली स्वीकारणं, यासंबंधीचे अनेक निर्णय असे होत असण्याची शक्यता आहे. किंवा अनेकदा एखाद्या जुन्या संकेतावरची टीका बदलत बदलत टिंगलीसारखी होत जाते आणि भविष्याला वर्तमानावर लादते. भविष्याचा अंदाज घेणं, हे वेगळं; असा अंदाज अजिबात न घेता काही करणं अवघड आहे, पण भविष्याविषयी काही ठोस साचा ठरवून
त्यासंबंधीच्या वर्तमानातल्या कामकाजाचं समर्थन करणं, हे थोडं गोंधळाचं
ठरतं, असं या लेखातून वाटतं. आणि याच्या दुसऱ्या टोकाला म्हणून पूर्ण भूतकाळाकडं तोंड वळवण्याचाही भाग होतो. त्याचाही एक साचा ठरवून तो वर्तमानावर लादला जातो. तर या पूर्ण भासवल्या जाणाऱ्या काळांचं प्रवाहीपण वर्तमानात थोडंसं जाणवू शकतं.
हे थोडं अस्पष्ट वाटतं. पण ते एकदम सूत्रासारखं ठोस होणंही अवघड आहे. काळांची विभागणी अगदी काटेकोर कप्प्यांमधे करता येणार नाही. (ही विभागणी मणी यांना कशी अपेक्षित आहे, असा प्रश्न आपण त्यांना ई-मेलद्वारे पाठवून ठेवलेला आहे). पण वर्तमानकाळाच्या निरीक्षणाचा मुद्दा बऱ्यापैकी स्पष्ट वाटतो. विशेषकरून रेघेवर वर्तमानपत्रांबद्दल आपण बोलतो तर ते खरंच किती वर्तमानाला धरून असतं, हे तपासण्यासारखं आहे. मणी यांनी वरच्या लेखात एका ठिकाणी म्हटलंय की, गूढ, अनपेक्षितता, स्पष्टता व गुंतागुंत या सगळ्यांना एकाच वेळी सामावून घेऊ शकणाऱ्या शब्द या अपारदर्शक माध्यमात त्यांना रस वाटतो. आणि सध्याच्या युगात जागतिक स्वरूपाचा, घर्षणविरहित संवाद व्हावा यासाठी भाषेला शब्दशः/कोशबद्ध करण्याचा प्रयत्न होतोय, असंही त्यांना वाटतं. त्यामुळे मग या प्रक्रियेत, शब्दाचे त्यांना वाटणारे गुण गळून जातात, असं त्यांना वाटतं. ते गुण अधिकाधिक शोधावेत म्हणून त्यांनी ग्रान्डी यांच्यासोबत हा चलत्-चित्र-कवितांचा घाट घातलेला असावा.
मराठीत उत्तम कोळगावकर यांची एक कविता आहे:
माती उकरून मुळापर्यंत जाल तर
हाती काहीच येणार नाही
मुळापर्यंत पोचण्याचा रस्ता
फुलातून जातो.
तसं पाहायला गेलं तर माती उकरल्यावरही हाताला काहीतरी लागेलच, मुळं लागतीलच, पण मुळांचा अर्थ त्यात सापडणार नाही, तो कदाचित फुलाकडं बघून सापडेल, असं. मणी यांच्या म्हणण्याचं थिअरीत काय करता येतं, हा आपल्या मर्यादेतला विषय नाहीये. शिवाय वरच्या चलत्-चित्र-कवितांबद्दलही आपल्याला खूप समाधान वाटलं नाही. पण इंटरेस्टिंग वाटलं. आणि हा लेख वाचल्या वाचल्या काही मराठी कवितांच्या भूतकाळात वाचलेल्या ओळी वर्तमानात डोक्यात आल्या, त्या वर्तमानातच परत चाळल्या, आणि ही नोंद करता येईल कधीतरी पुढं, असं वाटलं. लेख डिसेंबरातला आणि नोंद एप्रिलात. ओळी आलेल्या मराठी कविता तर आणखीच जुन्या. दरम्यान, लेख वाचल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये खरोखरच दोन चिंचेची झाडं दिसली, त्यामुळं मग ही नोंद झाली. होतेय ही नोंद. तुम्ही वाचताय. तुम्हाला बाकीची कामंही असतील, त्यात या नोंदीसाठी वेळ काढावा का वाटतोय?
मौज प्रकाशन, २००१. (मुखपृष्ठ: सुभाष अवचट) |
प्रिय रेघ,
ReplyDeleteही नोंद २-३ वेळा वाचली पण तुम्हाला व लता मणी यांना नेमक काय म्हणायचं आहे हे निटस उमगल नाही (कदाचीत भाषेच्या वापराबद्दलच अज्ञान ).
उदा. तुम्ही म्हणता की "…. आणि सध्याच्या युगात जागतिक स्वरूपाचा, घर्षणविरहित संवाद व्हावा यासाठी भाषेला शब्दशः/कोशबद्ध करण्याचा प्रयत्न होतोय, असंही त्यांना वाटतं. त्यामुळे मग या प्रक्रियेत, शब्दाचे त्यांना वाटणारे गुण गळून जातात, असं त्यांना वाटतं.…. " म्हणजे हे गुण गळून गेल्यावर शब्दांना एक प्रकारचा कोरडेपणा किंवा उथळपणा येतो असे वाटते का?
उदा. "प्रेम, मैत्री, सहानुभूती " यांसारख्या वारंवार व सहजतेने वापरल्या जाणार्या शब्दांचे मूळ अर्थ काय? ते वापरताना त्या मागे कोणत्या भावना अभिप्रेत असतात
किंबहुना असाव्यात- याचा शोध घेण्याचा प्रयत्न मणी करत आहेत का? आणि मग "प्रेम" या शब्दाचा अर्थ शोधण्याचा मार्ग प्रेमाच्या अनुभूतीतून जातो का?
असो! ही नोंद इंटरेस्टिंग वाटली. आणि त्याच वेळी तुम्हीच एकेकाळी नोंदवलेली मनोहर ओक यांची "माणसानं बोल्लेलं आठवावं पण..." ही कविता आठवली. पुढे दिलेल्या काही ओळींचा अर्थ पुन्हा (व नीट) समजला अस वाटल…
…
बोलणं आणि वागणं यांचा
अर्थाअर्थी संबंध नसतो
वाटणं आणि बोलणं आणि वागणं यांचाही
निष्कर्ष काढण्यात आपण
मागे राहतो
आणि आयुष्य फोफाटत पुढे
निष्कर्षही आपमतलबी असतात
मनसुब्याच्या कोषात रेशीम लपेटून
….
(अशुद्धलेखना बद्दल क्षमस्व )
धन्यवाद!!!!
स्वप्निल, मणींच्या म्हणण्यासंबंधी तुम्ही पहिल्या 'उदा.'मध्ये प्रश्न आणि दुसऱ्या 'उदा.'मध्ये संभाव्य उत्तर असं नोंदवलेलं आहेच, त्यावर वेगळं काही सुचत नाही. आणि या नोंदीमुळं आणखी ओळींचा अर्थ सापडल्यासारखं वाटलं, हेही या नोंदीला धरूनच वाटलं. प्रतिक्रियेबद्दल आभार. (आणि 'शुद्ध-अशुद्ध'चं इथं कुठं काय!)
Deleteलता मणी यांना वरील नोंदीसंदर्भात आणि ओक यांच्या कवितेच्या ओळींमधील साम्यासंदर्भात रेघेनं मेल पाठवलेली, त्याला त्यांनी पाठवलेल्या प्रतिसादातील काही भाग इथं प्रतिक्रिया म्हणून नोंदवावा वाटतो. (चलत्-चित्र-कवितेत येणाऱ्या ओळी हस्तलिखित स्वरूपात असतील तर अर्थशोधाचं आणखी काही अंग तपासता येईल का, असं एक आपल्या मनात आलेलं तेही त्यांना विचारलेलं, त्यासंबंधीचा उल्लेखही या प्रतिसादात आहे. हे हस्तलिखित स्वरूपाचं तंत्रज्ञानाच्या विरोधात वगैरे नाही, पण अर्थाच्या वेगवेगळ्या पातळ्या शोधण्यापुरतं, सर्जनशील शोधाच्या अंगानं हा वापर अधिक वेगळा होऊ शकेल का, असं आपल्या मनात होतं/आहे).
ReplyDeleteयासंबंधी मणी म्हणतात:
"The parallels with the Marathi poem are striking. Your first question about the relationship between past, present and future is a complex one. No single answer can suffice. Here is one of many possible responses.
In a contemplative sense there is only the present. Our perception of it may be shaped by our memories of the past and our hopes for the future; but if we are to fully attend to the present, if we are to discover its surprises, we strive to set aside both past and future and let the present reveal itself. In another sense the past or rather a variety of recollections and versions of the past continue to exist and exert their varying influences in and on the present. In that sense the past was/is real. In many ways in our time the future is analogous to the past in that it is thought of as the final terminus of the past with the present being a mere way station. Thus past, present and future coexist in each moment. A partial answer. But the idea of process, potential and multiplicity of past, present, future is crucial to any consideration of the past, especially in our time when history is being used to exact revenge and past/present/future are being represented in singular terms.
To hand write the text of Nocturnes would have produced a different effect though we won't know quite what that difference might have been...since we did not try."