Saturday 13 May 2017

गडचिरोली: सुरजागड प्रेस-नोट

लॉइड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला गडचिरोलीमधील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी गावातील काही जमीन प्रस्तावित स्पाँज आयर्न प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याचा व भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल पार पडला. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खाणींना व तत्सम प्रकल्पांना विरोध करणारी सभा सुरजागड व भामरागड भागातील लोकांनी घेतली. त्याची संक्षिप्त प्रेस-नोट व फोटो रेघेकडं आले, ते जसंच्या तसं खाली नोंदवलं आहे. आणखी तपशिलात माहिती असलेली प्रेस-नोट मिळाली तर ती भर इथं नंतर टाकूया. इतर काही ठिकाणी विरोध दर्शवण्यात आल्याच्या क्वचित काही बातम्याही आज प्रसिद्ध झालेल्या आहेत. अधिक संदर्भ जाणून घेण्यासाठी पूर्वीच्या निवडक पाच नोंदींची यादी शेवटी दिली आहे.
०००

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या स्पाँज आयर्न प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला 
सुरजागड व भामरागड क्षेत्रातील जनतेने केला प्रखर विरोध

 सुरजागड व इतर खदानी रद्द करण्याची केली मागणी

मुख्यमंत्री व प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या या जनविरोधी कृतीचा सुरजागड इलाक्यातील व भामरागड पट्टीतील जनतेने सामूहिक विरोध केला. सुरजागड येथे सुरजागड इलाक्यातील लोक एकत्र आलेले होते, भामरागड तालुक्यात धोडराज येथे विरोध सभा घेण्यात आली. यावेळी क्षेत्रातील नागरिक बहुसंखेने उपस्थित होते.

स्थानिक जनतेचा सर्वच प्रकारच्या खदानी व खदानी पूरक कामांना प्रखर विरोध आहे. आम्हाला खदान नकोच, आम्ही खदान कदापीही चालू देणार नाही असा इशारा या वेळी स्थानिक जनतेने दिला. हे प्रकल्प अहेरी उपविभाग किंवा एटापल्लीत झाला पाहिजे अश्या फसव्या मागण्या करणाऱ्या व्यक्ती व संघटनांचासुद्धा स्थानिक जनतेने निषेध केला. स्थानिक ग्रामसभांनी हे स्पष्ट केले की आम्हाला कोणत्याही परिस्थतीत खदान मंजूर नाही. तेव्हा प्रकल्प कुठे व्हावा या मुद्द्याचा प्रश्नच येत नाही.

स्थानिक लोकांच्या या मागणीकडे जर सरकारने सतत असेच दुर्लक्ष केले आणि लोकांचा विरोध असतानासुद्धा अगोदर खदान व आता प्रकल्प सुरू करण्याच्या जो प्रयत्न केला जात आहे, तो जर त्वरित थांबविण्यात आला नाही तर तीव्र आंदोलनाला सरकारला समोर जावे लागेल असा इशाराही आजच्या विरोध सभांमधे देण्यात आला.

सुरजागढ़ येथील सभा: सैनु गोटा (उभे) व लालसु नोगोटी (बसलेले) प्रामुख्याने उपस्थित
भामरागड तालुक्यातील धोडराज येथील विरोध सभेत उपस्थित लोक

रेघेवरच्या आधीच्या काही नोंदी:

Friday 14 April 2017

विलास सारंग व लेखकाचं क्षेत्र

विलास सारंग १४ एप्रिल २०१५ रोजी वारले, त्याला आज दोन वर्षं पूर्ण होतायंत. शिवाय आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे, १२ एप्रिलला शरद् पाटील यांचा स्मृतिदिन होता. या निमित्तानं ही नोंद. (सारंगांसंबंधीच्या एका पुस्तकप्रकल्पासाठी संबंधित संपादकाने विचारणा केली. त्यानंतर वर्षभरापूर्वी लिहिलेला हा लेख होता. पण लेखात विषयांतर खूप झाल्यानं त्या प्रकल्पात हा लेख जाणार नाही. मग नुसता पाडून ठेवण्यापेक्षा इथं त्यातला बराच भाग नोंदवूया. तरी काही भाग उरलेला आहे, तो असाच नोंदींमधे पसरला जाईल. खासकरून या नोंदीतल्या चुका समजण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हे टाकलेलं बरं, असंही वाटलं).

एक

'मॅनहोलमधला माणूस : मराठी वाङ्मय, समाज व जातिवास्तव' (मौज प्रकाशन, मार्च २००८)[१] असं पुस्तक विलास सारंगांनी लिहिलेलं आहे. जातीचं 'दडपण' मराठी साहित्याला खुरटवून राहिलंय, अशा स्वरूपाची मांडणी यात त्यांनी केलेली आहे. 'वाङ्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव' (मौज प्रकाशन, फेब्रुवारी २०११)[२] असंही त्यांचं पुस्तक या मांडणीला पूरक स्वरूपाचं आहे. त्यासंबंधी आपण काही न पटलेले मुद्दे नोंदवण्याचा प्रयत्न या नोंदीत करतो आहोत. आपण ही नोंद अर्थातच लेखकाच्या भूमिकेतून करतो आहोत. समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, अशा कुठल्याच विषयांच्या अभ्यासातून हे आलेलं नाही, ही लेखकाच्या क्षेत्राची पहिली मर्यादा.

मौज प्रकाशन, २००८
कधीतरी आपला जन्म होतो. कुठं, कधी, कसा, यावर आपलं स्वतःचं नियंत्रण नसतं. आणि आपण इथं येतो. ‘इथं’ म्हणजे कुठं? आपण एका स्थानी येऊन टपकतो. एका वास्तवात येऊन पडतो. या ‘स्थाना’वर आपला ताबा नसतो, असं ज्याँ पॉल सार्त्रच्या दाखल्यानं विलास सारंग सांगतात. हे स्थान म्हणजे एक प्रकारचं मानवी वास्तव[३]. यात पडण्यापूर्वी निवडीचं स्वातंत्र्य नसतं. आणि यात पडल्यानंतरही आपण काही स्वातंत्र्यं गमावलेली असतात. काही मर्यादा आपल्याला आपोआप पडलेल्या असतात. या मर्यादा आपल्या आसपासच्या आणि आपल्या आधीपासूनच असलेल्या विविध वास्तवांमध्येच मौजूद असतात. काही गोष्टी/वास्तवं जन्मानंतर बदलता येतात, काही गोष्टी/वास्तवं कितीही वाटलं तरी (आपल्या हयातीत) बदलत नाहीत. लेखकही अर्थात मुळात माणूस असतो, त्यामुळं तो या वास्तवांमधे असतोच. आणि सारंग म्हणतात, (भारतीय) लेखकाला ‘टाळता आलं असतं तर बरं असं वाटण्याजोगं (एक) वास्तव म्हणजे जातिवास्तव’. पुढं ते म्हणतात, “मराठी/भारतीय वाङ्मय खुरटं, दुबळं आहे असं बरेचदा म्हटलं जातं. त्या दुबळेपणाचं कारण वर निर्देशिलेल्या ‘गिव्हन’ परिस्थितीमुळे. जन्मजात पंगुत्वामुळे.” (मॅनहोल: २). आणि पुढं असं म्हणतात: “‘माणसा’चा शोध, जो एरव्हीही एक कूट, दुस्तर प्रकल्प आहे, तो मराठी/भारतीय वाङ्मयाच्या संदर्भात अधिकच दुर्धर बनतो. आपल्या लिहिण्याचं हे अनिवार्य परिमाण असेल तर मराठी/भारतीय वाङ्मय फार दुर्दैवी अवस्थेत आहे, असं म्हणावं लागेल. दुर्दैवी अशासाठी की अशा वाङ्मयाला खुरटलेल्या, रोगट परिस्थितीतून बाहेर येणं प्रायः अशक्य आहे” (मॅनहोल: १५).

तात्पर्य, ऑगस्ट-सप्टेंबर १९८५
असं वाटणारे सारंग एकटेच आहेत असं नाही. ‘तात्पर्य’ या नियतकालिकात १९८५मधे ‘भारतीय साहित्याच्या मर्यादा’[४] असा एक लेख छापून आला होता. लेखाची सुरुवातच अशी होती: ‘भारतीय साहित्याच्या संदर्भात हा प्रश्न सतत चर्चिला जातो की, विश्व साहित्याच्या तुलनेने हे साहित्य खूपच मागासलेले व गुणात्मकदृष्ट्या सामान्य पातळीवरचे आहे’. आणि मग, ‘(भारतीय) साहित्यात व्यक्त झालेल्या यातना अखिल मानजातीस स्पर्श का करू शकत नाहीत?’ असा सवाल टाकत या लेखात बाबुराव बागुलांचं पुढील अवतरण देण्यात आलंय: “या यातनांच्या (दुःखांच्या) मुळातील कारणेच फार क्षुल्लक, एक गट किंवा विशिष्ट जात किंवा विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित असतात. आणि त्यामुळेच ही यातना मर्यादित होते. भारतीय भाषेतील तथाकथित उत्कृष्ट शोकांतिका उदाहरणादाखल देता येतील. या शोकांतिका बालविवाह किंवा वैधव्यातून निर्माण झालेल्या आहेत. मुळात या दोन्ही समस्या भारतातल्या काही वर्णापर्यंत (ब्राह्मण व क्षत्रिय) मर्यादित होत्या. त्यामुळेच या विषयावरील नाटके, कादंबऱ्या, लघुकथा या जागतिक पातळीवर आस्वादित होऊ शकल्या नाहीत. ‘मूर्ख’, ‘गुलामी’, ‘अपराध वृत्ती’, ‘अज्ञान’, ‘अंधश्रद्धा’, ‘आर्थिक कोंडमारा’, ‘दारिद्र्य’, ‘मूल्यात्मक अंतर्द्वंद्व’ यातून माणूस दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथे झालेला नाही. त्यामुळे आस्वादाला मर्यादा पडतात. त्याचप्रमाणे सती जाणाऱ्या किंवा सती जाण्यास भाग पाडणाऱ्या स्त्रीची व्यथा कितीही उत्कटपणे मांडण्यात आली तरी ती सर्वस्पर्शी होऊ शकत नाही. कारण जाळण्याचे कारण हे सार्वत्रिक नसते. त्यामुळे मूळ कारणच पटत नसते. आणि त्यामुळेच शेवटी असले साहित्य हे विशिष्ट वर्गापर्यंतच आस्वादित होते.”

बागुलांचं म्हणणं नोंदवल्यानंतर आणखी काही मांडणी करत लेखाचे लेखक म्हणतात, “एखादी व्यवस्था ही वेगवेगळ्या चौकटीत विभागलेली असेल, माणसा-माणसात भिंती उभ्या केल्या गेल्या असतील व प्रत्येकाच्या वाट्याला त्या विशिष्ट व मर्यादित चौकटीतून निष्पन्न झालेले दुःखच मिळत असेल, तर मग त्या दुःखांचे स्वरूपही पूर्णपणे मर्यादित असते. त्या चौकटीबाहेर जगणाऱ्यांना ते दुःख जाणवू शकत नसते. आणि त्यामुळेच एक रसिक म्हणून आस्वादाला मर्यादा पडतात. संपूर्ण मानवी व्यक्तित्वाला छेद देणारी ही यातना नसते तर एका विशिष्ट मर्यादित विश्वात जगणाऱ्यांची ही यातना होऊन जाते. […] समाजाच्या सर्व थरांतून मुक्तपणे हिंडणे, स्वतःला वेगवेगळ्या ठिकाणी झोकून देणे यास भारतीय मन (लेखक) अजूनही तयार नाही... जेथे ही स्थिती असते तेथे समग्र माणुसकीचे दुःख कळणे तर अवघडच.”

मौज प्रकाशन, २०११
‘तात्पर्य’च्या या अंकात हा लेख अर्धाच छापलेला दिसला. आपण त्या लेखाच्या अजून खोलात जाणार नाहीयोत. पण सारंगांच्याच जवळ जाणाराच मुद्दा या लेखात नोंदवलेला होता, एवढं नोंदवू. ‘वाङ्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव’ या पुस्तकात सारंग अगदी असंच म्हणतात: “दीर्घ ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून पाहिलं तर हरिभाऊ आपट्यांचा काळ शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचा. या काळात कादंबरीलेखकाने विधवांच्या केशवपनाचा प्रश्न हाताळला. हा प्रश्न विश्वात्मक तर नाहीच, पण समाजव्यापीही म्हणता येणार नाही. एका छोट्या समूहातला तो प्रश्न होता. बहुसंख्य मराठी समाजाला तो लागू नव्हता. तेव्हा याला टोळी जीवनाचं एक उदाहरण म्हणता येईल. जसं धनगर, देवदासी, भटक्या जमाती वगैरे.[...] फरक एवढाच की उपरोल्लेखित सामाजिक प्रश्न शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असलेल्या धुरीणवर्गात उपस्थित झाला होता. त्यामुळे तो लगेच प्रकाशझोतात आला व जणू सर्व समाजाचाच मोठा प्रश्न म्हणून त्याकडे पाहिलं गेलं” (वाङ्मयीन संस्कृती: पान ५७).

‘तात्पर्य’मधल्या लेखात आणखी एक अधिकचा मुद्दाही आहे; त्यात म्हटलंय की, वरच्या मर्यादित चौकटीला ‘अपवाद दलित साहित्य. कारण या लेखकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. [...] दलितांचे अनुभव जरी विशिष्ट वर्ण व जातिव्यवस्थेमुळे निर्माण झाले असले तरी विश्व-मानवाला स्पर्श करणाऱ्या समस्या येथे आहेत. ‘भूक’, ‘अपमान’, ‘उपेक्षा’, ‘दारिद्र्य’, ‘अज्ञान’, ‘अंधश्रद्धा’ या जागतिक समस्या आहेत. याच्या तुलनेत ‘विधवा-विवाह’, ‘बाल-विवाह’, ‘शारीरिक पावित्र्य’, ‘योन ग्रंथी’, ‘आंतर जातीय विवाह’, ‘संयुक्त कुटुंबातल्या व्यथा’ या वर्गीय व वर्णीय समस्या आहेत. त्यामुळेच दलित साहित्याला अल्पकाळात जागतिक प्रसिद्धी मिळते[५]. त्यातील अनुभव व जाणीवा सर्वांनाच आस्वाद्य ठरतात’. तर असा हा लेख.

मॅजेस्टिक प्रकाशन, १९९५
त्यानंतर १९९५ सालात येऊ. या वर्षात प्रसिद्ध झालेलं श्री. ना. पेंडसे यांचं ‘एक मुक्त संवाद: उद्याच्या कादंबरीकारांशी’[६] हे पुस्तकही आपल्या या मुद्द्यासंबंधी दाखला म्हणून उपयोगी आहे. कारण वरच्या लेखात दलित साहित्याकडं जो निर्देश केलाय, तोच पेंडसेही करतात: “... दलित लेखक, हा आमचा झोपी गेलेला डोस्टोव्हस्की आहे. त्याला जाग आली, ‘कले’ची जाण आली की तो आग ओकू लागेल. प्रमाणाबाहेर प्रशंसा झाली, त्यामुळे त्यांची स्वतःची दिशाभूल झाली. चरित्रांनाच ते कादंबरी समजू लागले. […] कादंबरी चरित्राहून कितीतरी कठीण. त्याकरिता काय लागते, ते आतापर्यंत सांगितले. जोडीला आत्मविश्लेषण लागते. प्रत्येक कादंबरीकाराने स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे, ‘मी लिहिलेल्या कादंबरीत कमी कोठे पडलो आहे?’ असे निष्ठुर आत्मपरीक्षण कादंबरीकाराकडे असले पाहिजे. दलितांची दुःखं दलित कलावंतालाच दिसतील. कोणाही सवर्ण लेखकाला ती पाहण्याकरिता मानसिक पातळी गाठता येणार नाही. अशा वेदनेतून तिसऱ्या डोळ्याला किती भेसूर आकार दिसायला हवेत? त्या वेदनेला किती परिमाणे असतील? आज-उद्या असा तिसरा डोळा निश्चित निर्माण होईल. मग भारतीयच काय, जागतिक उंचीची कादंबरी मराठीत निर्माण होईल- उद्याची दलित कादंबरी. […] ती मला पाहायला, वाचायला मिळावी, एवढीच माझी इच्छा आहे. तिच्या स्वागताकरिता माझ्या कादंबऱ्यांचा पायघड्यांसारखा उपयोग झाला, तरी त्यांच्या जन्माचे सार्थक होईल” (मुक्तसंवाद: १४१).

पेंडश्यांच्या या अवतरणात ‘तिसऱ्या डोळ्या’चा उल्लेख आहे; या तिसऱ्या डोळ्यानं लेखकाला ‘जीवनाचे न पाहिलेले पण वास्तवरूप धारण केलेले आकार दिसू लागतात’ असं त्यांचं म्हणणं आहे (मुक्तसंवाद: ५४). हेही पुरेसं नाही, मुळात हा ‘तिसरा डोळा’ सगळ्यांना मिळत नसतो; ‘साहित्यकलेचे- खरे तर, कुठल्याही कलेचे- एक वैशिष्ट्य असे, की ही देन बहाल करताना परमेश्वर मनाला येईल, त्याला ती देतो’ (मुक्तसंवाद: १).  आणि मग अशी देन मिळालेल्यांना कादंबरी लिहिताना ‘काय लागते’, ते सांगण्याची जबाबदारी पेंडश्यांना भासलेली दिसतेय. स्वतःचा अनुभव सांगत, स्वतःची तपासणी करत, स्वतःवर थोडी टीका करत त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेय. त्या जबाबदारीचा शेवट वरच्या दलित लेखकांसंबंधीच्या उताऱ्यानं होतो. पेंडश्यांनी १९९४-९५मध्ये या पुस्तकातलं लेखन केलंय. त्यापूर्वी पन्नास वर्षं ते कादंबरीचं एक वाङ्मयप्रकार म्हणून चिंतन करत आलेले होते. आणि मग हे एवढं प्रदीर्घ चिंतन उगवत्या कादंबरीकारांना सांगावं असं त्यांना वाटलं. हे वाटण्याला एक कारण घडलं, असं ते म्हणतात: “आज खेडेगावांपर्यंत माध्यमिक शिक्षण गेले आहे. तालुक्याला महाविद्यालये निघाली आहेत. कुणबी, भंडारी, न्हावी, सुतार अशा हातावर पोट असलेल्या वर्गांतील मुलांवर आजच्या साहित्याचे संस्कार होत आहेत. आजचे साहित्यिक त्यांच्या ओळखीचे होत आहेत. महाविद्यालयात तर पाठ्यपुस्तकांत कादंबरी असते. आमच्या गावच्या शाळेत ब्राह्मण विद्यार्थ्यांना मागे टाकून कुणबी विद्यार्थी अनेक वेळा एस.एस.सी.ला पहिला आला आहे. बुद्धिमत्ता देताना देव जात पाहत नाही, हे सिद्ध झाले. उद्या ‘प्रतिभे’च्या बाबतीत हाच अनुभव येणार आहे. कुणबी, भंडारी, धोबी कादंबरीकार पुढे येणार आहेत. उद्याचा काळ त्यांचा आहे. त्यांना उपयोग व्हावा म्हणूनच ह्या प्रबंधाची कल्पना होती” (मुक्तसंवाद: प्रास्ताविक). १९९५ साली पेंडश्यांचं पुस्तक प्रकाशित झालं, त्याच्या तीस-चाळीस वर्षं आधी, अण्णा भाऊ साठ्यांची ‘फकिरा’ (१९५९), उद्धव शेळक्यांची ‘धग’ (१९६०), भालचंद्र नेमाड्यांची ‘कोसला’ (१९६३), हमीद दलवाईंची ‘इंधन’ (१९६४) अशा कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. अंदाजापुरत्या, वेगवेगळ्या समूहांमधल्या लेखकांच्या आणि चांगल्यापैकी प्रसिद्ध व बाजारातही तुलनेनं खपलेल्या कादंबऱ्यांची नोंद आपण केली. अशी अर्थातच अनेक उदाहरणं देता येतील; कथांच्या बाबतीत शंकरराव खरातांचा ‘सांगावा’ (१९६२),  बाबुराव बागूलांचा ‘जेव्हा मी जात चोरली होती’ (१९६३) अशा काही कथासंग्रहांची दखल आत्मचरित्राव्यतिरिक्तचं दलित गद्यलेखन म्हणून घ्यायला नको का? पण या लेखनाबद्दल न बोलता पुढं कधीतरी अशा (ब्राह्मणेतर जातींमधल्या) कादंबरीकारांचा उदय होणार असल्याचा अंदाज बांधून, त्यासाठी स्वतःच्या कादंबऱ्यांच्या पायघड्या रचण्याची स्वतःहूनच पेललेली जबाबदारी पेंडसे १९९५ साली पार पाडताना दिसतात. शिवाय प्रास्ताविकात ज्या जातींचा उल्लेख आहे त्या सोडून पुस्तकाच्या शेवटी एकदम दलित लेखकांवर उडी मारतात, आणि त्यांना उद्याचे शिलेदार ठरवतात. कुणबी, भंडारी, धोबी हेपण दलितच का? आणि दलित म्हणजे नक्की कोण? आणि मग रत्नागिरी जिल्ह्यामधल्याच चिपळुणातल्या दलवाईंना कशात बसवूया? हे सगळं असलं तरी पेंडश्यांच्या या पुस्तकातसुद्धा सारंगांच्याच मुद्द्याला समांतर काही मांडणी मधेमधे आलेली आहे

मराठी साहित्याला जागतिक काहीतरी मिळत नाहीये, अशी व्यथा किंवा अडचण मांडण्याचा प्रयत्न यातून दिसतो. याला नोबेल पुरस्कारविजेते तुर्कस्तानचे ओरहान पामुक यांचाही एक पूरक सूर मिळतो. ते म्हणतात: "पाश्चात्त्य कादंबरीकारांना स्वतःचं सामाजिक-वर्गीय स्थान, राजकीय भूमिका यांचा विचारही न करता कादंबरीनिर्मिती करता येते. त्यांच्या लेखनाशी त्यांचा संपूर्ण समाज नातं जोडून घेऊ शकतो आणि हे लेखक सहजपणे आपापल्या संपूर्ण समाजाचे लेखक ठरतात. [...] अपाश्चात्त्य आशियायी देशांमधल्या विखंडित समाजांतल्या लेखकांना आपल्या प्रत्येक लेखकीय कृतीतून कोणते सामाजिक-वर्गीय संदर्भ प्रकट होऊ शकतात, याचं दडपण बाळगत निर्मिती करावी लागते."[७]

दोन

आपण इथं लेखकाचे दोन ढोबळ भाग करूया. लेखक लिहितो, तो एक भाग; त्याला आत्तापुरतं आपण ‘लेखकाचं लेखन-क्षेत्र’ म्हणू. आणि लेखकाची कृती छापून किंवा दुसऱ्या कुठल्या इलेक्ट्रॉनिक मार्गानं एक क्रयवस्तू बनून बाजारात येते, व पुढं ‘मागणी’ करणाऱ्याला किंमत टाकल्यावर उपलब्ध होते, तो दुसरा भाग; त्याला आपण ‘लेखकाचं बाजार-क्षेत्र’ म्हणू.

सारंगांच्या आणि वर उल्लेख झालेल्या सगळ्याच व्यक्तींच्या मांडणीमधे या दोन क्षेत्रांना एकमेकांवर लादल्यासारखं वाटतं. ही क्षेत्रं एकमेकांपासून तुटलेली नसतातच, त्यांच्यात स्पष्ट तुकडा पाडता येणार नाहीच. पण तरी लेखक लिहिताना कितपत हातपाय हलवू शकतो हे बोलणं वेगळं ठेवायला हवं, आणि लेखन नंतर किती स्वीकारलं जातं याबद्दलचं बोलणं वेगळं ठेवायला हवं, असं वाटतं.

माणूस म्हणून जन्म घेतल्याघेतल्या इतर कुठल्याच गोष्टींशी संबंध न येता एकदम आपण कथा-कविता-कादंबरी-नाटक असं काही लिहीत नाही. हळूहळू दूध पीत, काही तरी छोटं मोठं खात, आपण भाषेची पावलं टाकत जातो. नंतर मग जास्त वेगवेगळं अन्न खातो. साबण-पाणी वापरून आंघोळ करतो. पेस्ट-पावडर-झाडाची काठी असं कायतरी वापरून दात घासतो. कोणीतरी आपल्याला कपडे घालतं. मग आपलेआपण कपडे घालतो. कपडे काढतो, परत घालतो. शाळेत जातो. वेळ काढतो. खेळायचं तर खेळतो. शिकवलं तर शिकतो. शिकायचं तर शिकतो. मग वाटलं तर कॉलेज. वाटलं तर विद्यापीठ. वाटलं तर अजून कुठं काय काय शिक्षण. शिवाय कुटुंब. ओळखीचे इतर लोक. विविध वस्तूंची दुकानं. झाडं-फुलं-पक्षी-प्राणी-पाणी-समुद्र-वाळवंट. इमारती-घरं-कौलं-काँक्रिट. अशी कितीक वस्तूंची नि व्यक्तींची गाठभेट होत असते. वाटलं तर वाचतो. टीव्ही बघतो. पिक्चर बघतो. इंटरनेट. मानापमान. हाणामाऱ्या. प्रेमसंभोग. जेवणखाण. शेती. गाड्या. हे सगळं करताना दरम्यानच्या काळात पैसे वापरायला शिकतो. असं आणखी कितीक काय काय. हे सगळं होत असताना आपल्याला वाटतं की, हे काय चाललंय काय? किंवा, हे मला नक्की काय वाटतंय? किंवा, सगळ्यांना नक्की काय वाटत असतं? सगळे असे का वागतात? आपण असे का वागतो? किंवा आणखी पुढं- झाडं नि माणूस उडत का नाहीत, किंवा पक्ष्यांना मुळं का नाहीत? अशा अनेक गोष्टींना समांतरपणे कुठंतरी माणूस काहीतरी लिहितो. अलीकडच्या काळात कोणी एसएमएस लिहील किंवा फॉरवर्ड करील, व्हॉट्स-अॅप, फेसबुक, ट्विटर हीसुद्धा लिहिलेला किंवा टाइप केलेला मजकूर प्रसिद्ध करायची काही माध्यमं. हे थोडं छोटं वाटत असेल, तर मग कथा-कादंबरी-कविता-नाटक असं काही जरा जास्त शब्दसंख्येचं लिहिता येतं. मग ते छापून आलं किंवा इलेक्ट्रॉनिक रूपात प्रसिद्ध झालं की त्याचं पुस्तक होतं नि त्याला साहित्यकृती असंही म्हणतात. यात दोन पातळ्यांवरचा बाजार आला. लिहिण्याआधीचा बाजार नि लिहिल्यानंतरचा बाजार. आधीच्या बाजारात आपण खातो, शिक्षण घेतो, भौतिक-भावनिक गरजांनुसार लोकांशी संबंध ठेवतो, निसर्गाशी संबंध ठेवतो, प्रवास करतो, वगैरे. यात साहित्यकृती निर्माण होण्याचा बिंदू नक्की कसा नि कुठून येतो, त्याची अचूक वैज्ञानिक माहिती मला नाही. पण सध्या या बिंदूला आपण ‘लेखकाचं लेखन-क्षेत्र’ असं म्हटलंय नि त्यावर आपण नंतर बोलणार आहोत. या बिंदूनंतर पुन्हा एक बाजार येतो. हा बाजार म्हणजे आपण लिहिलेलं कोणापर्यंत तरी कुठल्यातरी माध्यमातून पोचतं नि पुढं त्याचं काय होतं ते क्षेत्र.

या क्षेत्राचं एक उदाहरण पाहू. 'सर्जनशोध आणि लिहिता लेखक' या पुस्तकात सारंग म्हणतात: "डॉ. (रा.भा.) पाटणकर १९८५च्या सुमारास मुंबई विद्यापीठातून निवृत्त झाले. त्या आधी वीसेक वर्षांपूर्वी ते मुंबईला आले. मुंबईच्या इंग्रजी भाषिक साहित्यिक /सांस्कृतिक जगात या कालखंडात झालेल्या बदलाच्या संदर्भात ते एकदा म्हणाले: “माझ्या मुंबईच्या वास्तव्यात एकच मोठा बदल झालेला मला दिसतो. मी इथे आलो तेव्हा इथले लोक हेटाळणीच्या, कीव केल्याच्या सुरात म्हणायचे, ‘तुम्ही मराठीत लिहिता?’ (यू राइट इन मराठी?) आता लोक (खऱ्या-खोट्या) गौरवाच्या, आदराच्या सुरात म्हणतात, ‘यू राइट इन मराठी?’!”चित्र असं उफराटं होण्याचं, देशीपणाला बरे दिवस येण्याचं दुसरं एक, अगदी अलीकडचं उदाहरण: रिचर्ड गिअर हा अमेरिकन चित्रपट-तारा भारतात वारंवार येतो. आपली ओळख करून देण्यासाठी तो इथल्या एका व्यक्तीला म्हणाला: “मी अमेरिकेचा अमिताभ बच्चन आहे!” कदाचित पन्नासेक वर्षांनंतर एकविसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा इंग्लंड हा देश अत्यंत गरीब व सांस्कृतिक दृष्ट्या खालावलेला बनलेला असेल, तेव्हा एखादा ब्रिटिश देशीवादी मिशीवर ताव देऊन म्हणेल: “मी इंग्लंडचा भालचंद्र नेमाडे आहे!”[८].

मुंबईतल्या ‘इंग्रजी’ साहित्यिक-सांस्कृतिक जगाबद्दल पाटणकरांना हे जाणवलेलं आहे. तात्पुरतं आपण ते मान्य करू. आणि, एकविसाव्या शतकाच्या मध्यावर इंग्लंड देश गरीब झालेला असेल, हे सारंगांचं काल्पनिक म्हणणंही तात्पुरतं मान्य करू. तर या मान्यतांमधून हेही मान्य होत नाही काय की, साहित्य-संस्कृतीचं वर्चस्व आर्थिक-संस्कृतीवर कमी-अधिक अवलंबून असतं? बाजारपेठेच्या दृष्टीनं साहित्याचा टिकाऊपणा नि वर्चस्व हे मुद्दे 'निखळ' साहित्यमूल्य या गोष्टीवर ठरत नसावेत, असं वाटतं. सारंगांनाही तसंच वाटतं हे वरच्या अवतरणावरून दिसतंच. शिवाय इतरत्रही त्यांनी अशी मांडणी केलेली आहे.

‘सर्जनशोध’ याच पुस्तकात ‘कादंबरी व वास्तववाद: १’ या लेखात सारंगांनी व्ही.एस. नायपॉल या ब्रिटिश कादंबरीकाराचं एक विधान दिलंय: “कादंबरी या वाङ्मयप्रकाराचं मूल्यस्वरूप आहे सामाजिक परिस्थितीची छाननी (सोशल इंक्वायरी) व त्या कारणाने तो मूलतः भारतीय परंपरेत बसत नाही”. नायपॉल यांचं ठोकळेबाज टिंगलवजा विधान नवीन नाही, पण या विधानाच्या निमित्तानं सारंग काय म्हणाले ते महत्त्वाचं आहे. सारंग म्हणतात, “कादंबरी या वाङ्मयप्रकाराचं चिरंतन व सार्वत्रिक मूलस्वरूप आपल्याला सापडलं आहे, अशा थाटात नायपॉल महाशय बोलतात. अशी सत्त्ववादी (इसेन्सिलिस्ट) भूमिका कित्येक जण कित्येक क्षेत्रांत पटकन घेतात. हा खटाटोप मूलतः चुकीचा आहे. वाङ्मयात व सर्वसाधारण मानवी अभ्यासक्षेत्रात अशा सार्वकालिक व्याख्या गैरलागू ठरतात. मानवी परिस्थिती सतत बदलत असते व मानवी व्यवहाराच्या शक्यता नेहमीच खुल्या असतात. तेव्हा काही एका गोष्टीचं स्वरूप आपल्याला व्याख्याबद्ध करता आलं तरी ते नेहमीसाठी तसंच राहणार आहे, ही भ्रामक समजूत आहे” (सर्जनशोध: ४६).

तर, बदलत्या मानवी परिस्थितीची शक्यता एका ठिकाणी लक्षात घेणारे दुसऱ्या ठिकाणी २०१० साली एक धक्कादायक विधान करतात: “मराठी कादंबरीमध्ये ‘विशाल पट’ कधी दिसणार नाही, कारण जातिविखंडन तिच्या भाळी लिहिलेलं आहे. मग पर्याय काय? [...] युरोपियन कादंबरीचे अनुसरण करून तात्त्विक बैठक असलेली कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करणं हा सुटकेचा मार्ग मला दिसतो. तात्त्विक प्रश्न चिरंतन असतात; त्यात जातिविखंडित सामाजिक चित्रण विशेष महत्त्वाचं ठरत नाही. अर्थात् तात्त्विक डूब कादंबरीत आणणं, कष्टाचं काम आहे. पण तात्त्विक संघर्ष कादंबरीत आला तर कादंबरी सघन व विचाराला चालना देणारी ठरेल आणि तात्त्विक संघर्ष- जितका जटील स्वरूपाचा तितका प्रभावी- कादंबरीत गुंफला की कादंबरी दीर्घकाळ प्रसंगोचित (रेलेव्हंट) राहू शकेल”[९].

‘तात्त्विक’ कादंबरीत सामाजिक-ऐतिहासिक ‘स्थान’ टाळता येतं का? वरकरणी सामाजिक तपशील कमी लागत असेल, त्यामुळं थोडा फायदा मिळत असेल, हे समजून घेऊ एक वेळ. पण पुन्हा छापून आल्यावर (बाजार-क्षेत्रामधे) कादंबरी नावाचं सांस्कृतिक उत्पादन या ‘स्थाना’पासून पळून जाऊ शकतं का? शिवाय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखकाच्या दृष्टिकोनाला या ‘स्थाना’पासून पळ काढता येईल का?

तीन

डॉ. भी.रा. आंबेडकर यांच्या लेखनातून 'दोषाचं एकक' ही संकल्पना कशी पुढं येते हे अनिकेत जावऱ्यांनी नोंदवलेलं आहे. त्यासंबंधी एक नोंद आपण गेल्या वर्षी केली होती. व्यक्ती आणि समाज यांच्यातल्या संबंधांच्या बाबतीतला तो मुद्दा आहे. म्हणजे एखादी व्यक्ती समाजाशी जोडलेली असते, समाजाचा भागही असते, पण व्यक्तीची ओळख फक्त तिच्या सामाजिक स्थानाच्या संदर्भात करणं, पुरेसं ठरत नाही- असा साधारण या मुद्द्याचा संक्षिप्त धागा इथं नोंदवू.

सर्जनशील लेखक एखादी गोष्ट लिहितो (कथा/कादंबरी) तेव्हा तो त्यातल्या तपशिलाकडे पाहताना कोणतं एकक वापरतो? या प्रश्नाला धरून आता आपण पुढं जाऊ.

एखादी व्यक्ती एखाद्या जातीचा घटक असते हा सामाजिक संदर्भ महत्त्वाचा आहेच. भाषेचा वापर, जगण्यातले काही तपशील, परंपरेची धाटणी, इत्यादी गोष्टी या संदर्भावर ठरतही असतील. पण लेखक या तपशीलांना समजावून घेऊन त्या पात्राचं व्यक्तिमत्त्व समजावून घेऊ शकतो का? हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. सारंग असोत की इतर उल्लेख झालेल्या लेखकव्यक्ती, यांना कादंबरीतल्या/कथेतल्या पात्रांना रंगवण्यासंबंधीची चिंता सतावताना दिसतेय. म्हणजे लेखक जातीबाहेरून पाहू शकत असला, तरी पात्रं त्या त्या जातीचीच असणार, मग लेखकाला त्या जातीची माहिती नसल्यावर तो पात्रं रंगवणार कसं? त्या पात्राच्या भावना समजावून घेणार कशा? ही लेखकाच्या एका दुय्यम कामासंबंधीची शंका वाटते. हे काम दर्जाच्या दृष्टीनं दुय्यम नाही, पण असा तपशील जमवणं, तो आपल्या आत सामावून घेणं, हे तसं एक जनरल काम आहे लेखकाचं. शिवाय हे काम करताना अपरिहार्य मर्यादा असल्यासारखी जात आड यायचं कारण काय? असं असेल तर मग स्त्री लेखकव्यक्ती आणि पुरुष लेखकव्यक्ती यांनी आपापल्या लिंगांपलीकडची पात्रं कशी रंगवायची असतात? काही बाबतीत जातीचीही मर्यादा कमी पडेल इतका वेगळेपणा असा लिंगांमध्ये असतो, असं वाटतं. मग, तरी लेखकव्यक्ती स्त्री-पुरुष-तृतीय पंथीय अशी वेगवेगळी पात्रं रंगवू शकते की नाही? शिवाय माणूसच पात्र असतं असं कुठाय? इतर अनेक सजीव-निर्जीव प्राणी-वस्तूंची पात्रं कथा-कादंबरी-कवितेचे घटक असू शकतातच की, मग त्यांना एखादी लेखकव्यक्ती कशी समजून घेते? निरीक्षण, सहानुभूती, कल्पनाशक्ती, ही त्यासाठीची प्राथमिक साधनं असतील; शिवाय आणखी काय असेल? तर, हा पात्रं रंगवण्यासंबंधीचा मुद्दा ग्राह्य मानण्यासारखा असला, तरी तो जातीच्याच बाबतीत लागू होतो असं वाटत नाही. आणि हा मुद्दा लेखकत्वाशी अगदी प्राथमिक काम म्हणूनच जोडलेला आहे. ते काम करायचं असतं, एवढंच म्हणता येईल. ज्या-त्या लेखकव्यक्तीनं त्यासाठी आपापले मार्ग शोधणं, कष्ट घेणं, एवढाच उपाय असत असेल असं वाटतं.

पात्रांना रंगवण्याच्या पातळीवर जात (आणि कुठलीही अशी तपशिलांविषयीची मर्यादा) ओलांडणं हा लेखकाच्या जनरल कामाचा भाग आहे, असं आपण म्हटलं आहे. पण जात ही लेखकव्यक्तीच्या दृष्टिकोनात कुठं लपलेली असते, म्हणजे खुद्द लेखकव्यक्ती (मानत असली-नसली) तरी जातीशी कशी संबंधित असते, हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे असं वाटतं. इथं जाणीव-नेणीव असे शब्द वापरले जाऊ शकतात. सारंगांनी त्यांच्या ‘वाङ्मयीन संस्कृती...’ पुस्तकात अशा जाणीव-नेणीव तर्काचा वापर करून काही कथा-कादंबऱ्यांबद्दल विश्लेषण केलेलं आहे. त्यात शेवटाकडे सारंग म्हणतात, “...सामाजिक नेणिवेचा अधिक सातत्याने व अधिकतर खोलात जाऊन विचार होण्याची गरज आहे. नेणिवेवर जास्तीत जास्त प्रकाश पाडून, चिकित्सक दृष्टीने तिचा अभ्यास करून तिचं स्वरूप उघड केलं पाहिजे. बहुजनांनाच नव्हे तर अल्पजनांनाही दृष्टीवरची जळमटं काढून टाकण्याचा फायदा होईल. सर्व समाजाला सामाजिक-वैयक्तिक स्वातंत्र्याच्या वाटा खुल्या होतील” (वाङ्मयीन संस्कृती: ९५). आणि यापूर्वी एकदा सारंगांनी अधिक सुंदर पद्धतीनं लिहिलं होतं: “लेखक म्हणून माझा प्रयत्न असतो की अनकॉन्शस मनाचं तारायंत्र नेहमी सजग राहावं” (सर्जनशोध: ९२). जाणीव आणि नेणीव या गोष्टींकडे सारंगांना जसं पाहणं अपेक्षित आहे, ते वास्तविक मराठीमध्ये शरद् पाटील यांनी आधीच पाहिलेलं सापडतं. हे केवळ तुलनेसाठी तुलना म्हणून नोंदवलेलं नाही, पण पाटलांची या संदर्भातली मांडणी (अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, १९८८; जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व, पहिली आवृत्ती- सप्टेंबर १९९६; इत्यादी) सारंगांच्या या विषयासंबंधित दोन पुस्तकांच्या किमान पंधरा ते दहा वर्षं आधीची आहे, पण या आधीच्या कामाचा वापर वा उल्लेख सारंगांनी केलेला सापडत नाही. सिग्मंड फ्रॉईड, कार्ल युंग अशी नावं सारंगांच्या लेखनात येतात हे खरंच, पण जातिव्यवस्थेच्या संदर्भात आणि विशेषकरून साहित्याच्याही संदर्भात पाटलांनी याबद्दल बरंच तपशीलवार म्हणणं मांडलेलं आहे. शिवाय त्यांनी फ्रॉईड-युंग यांच्यानंतरचेही संदर्भ घेतलेले दिसतात. त्यातल्या स्पष्टास्पष्टतेबद्दल किंवा काही कमी-अधिक ऐतिहासिक गोष्टींबद्दल मतभेदही व्यक्त झालेले आहेत. तो सगळा विषय आपल्या लेखाच्या मर्यादेत येऊ शकत नाही. पण सारंग एका ठिकाणी लिहितात: “जातिवास्तवाची फारच कमी दखल मराठी समीक्षेत घेतलेली आढळते. एवढ्या ढळढळीत, सर्वस्पर्शी सामाजिक वास्तवाचं वाङ्मयीन सौंदर्यशास्त्रात काय स्थान आहे, याचा गेल्या अर्धशतकात विशेष काही खल करण्यात आला नाही, याचं अंमळ आश्चर्य वाटतं” (मॅनहोल: ८५). हा खल आपल्या अपेक्षेएवढा झालेला नाही, असं सारंग म्हणू शकतातच, पण जो काही झालाय, त्याची दखल त्यांनी घेतलेली नाही हे नोंदवायला हवं.

पाटलांची पुस्तकं झालीच, शिवाय दलित साहित्याच्या संदर्भातही काहींनी मांडणी केलेली दिसते. आपण सर्जनशील लेखकाच्या मर्यादेत राहत असल्यामुळे या विषयांमध्ये इथं जास्त घुसणं बरोबर वाटत नाही. आणि यातल्या ‘सौंदर्यशास्त्र’ या शब्दाबद्दलही बोलायण्याचा आपला कल नाही. बाकी इतिहासाबद्दलचे मतभेद, पुराणातली वांगी, ‘शास्त्र’ या शब्दासोबत येणारी आवश्यक स्पष्टता नसणं, वगैरे आक्षेप अभ्यासकांनी पाटलांच्या या पुस्तकासंदर्भात नोंदवलेले दिसतात. हे गृहीत धरलं तरी साहित्यिक अभिव्यक्तीच्या अंगानं या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा शरद् पाटलांचा प्रयत्न विचारात घेऊन त्याबद्दल पटलेलं/न पटलेलं नोंदवता येईल, असं वाटतं. "जाणीव व नेणीव ही विरोधांची एकजूट आहे आणि त्यांच्या फलदायी संघर्षाची उपज प्रतिभा आहे", असं पाटलांनी आधी जाणीव-नेणिवेसंबंधीचे मानसशास्त्रीय संदर्भ देऊन नंतर नोंदवलेलं आहे [१०]. एवढंच सध्या पाहून आपण लेखकाच्या बाजार-क्षेत्राकडं जाऊ.

चार

जसं की, ओरहान पामुक घ्या. त्यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक २००६ साली मिळालं. म्हणजे बाजार-क्षेत्राच्या एका पातळीवर ते सध्याच्या जागतिक समाजाचे लेखक ठरले. पुस्तकांची इंग्रजी भाषांतरं सहज होणं, ती सहज सर्व वाचकांना उपलब्ध होणं, मराठीसारख्या या इथल्या दूरच्या भाषेत त्यांच्या दोन कादंबऱ्यांची तरी भाषांतरं झालेली सदर लेखकाच्या माहितीत आहेत (‘स्नो’ आणि ‘माय नेम इज रेड’), शिवाय त्यांच्या व्याख्यानांच्या संग्रहाचंही भाषांतर मराठीत झालं, ते एका नियतकालिकात मालिकारूपात प्रसिद्ध झालं, तर आता हे तुर्कस्तानातले मुस्लीम संस्कृतीतले[११] लेखक जागतिक समाजाचे लेखक कसे ठरले? त्यांच्या लेखनाशी मराठी भाषेतल्या ज्या काय मोजक्या वाचकांनी नातं जोडून घेतलं त्यांनी कसं काय घेतलं? यात त्यांच्या लेखनकौशल्याला कमी न लेखता जागतिक संदर्भही पाहायला हवेतच ना. जगात इस्लामी धर्माला/परंपरेला ज्या अंतर्गत कट्टरतावादी शक्तींचा सामना करावा लागतो, त्या पार्श्वभूमीवर पामुक यांच्या लेखनाचं बाजार-क्षेत्र तपासायला नको का? त्यांच्या लेखनातून इस्लामी परंपरेची सूक्ष्म चिकित्सा होत असल्यामुळं त्यांच्या लेखनाबद्दलचं इतर जगाचं कुतूहल जागं व्हायला मदत झाली का? वगैरे प्रश्न तपासण्याजोगे आहेत. असे प्रश्न विचारल्यामुळं पामुकच्या लेखन-क्षेत्रावर अन्याय होण्याचं काहीच कारण नाही.

‘अपाश्चात्त्य [...] विखंडित समाजांतलं सामाजिक-वर्गीय संदर्भांचं दडपण बाळगत’ पामुक यांनी केलेली निर्मिती आपण इथं या दूरच्या मराठीच्या खंगलेल्या साहित्य-वाचन-संस्कृतीतही स्वीकारली, तरीही पाश्चात्त्य समाजांशी तुलना करताना पामुक यांना ही दडपणं पेलवणं एवढं का त्रासदायक वाटतंय? मुळात तुलना कशाला? शिवाय, ‘पाश्चात्त्य कादंबरीकारांना स्वतःचं सामाजिक-वर्गीय स्थान, राजकीय भूमिका यांचा विचारही न करता कादंबरीनिर्मिती करता येते’ हे त्यांचं विधान तर खूपच सरसकट आहे. राजकीय भूमिकेचा विचारही न करता कोणी कादंबरीनिर्मिती करत असतील, तर त्यावर काय बोलणार? त्यांनी हा विचार केला पाहिजे, एवढंच म्हणू शकतो आपण. जगातल्या सत्तेचा खेळ कसा चाललाय आणि त्यात पाश्चात्त्य देशांचं स्थान कुठं आहे, याचं दडपण कोणा पाश्चात्त्य सर्जनशील मनाला जाणवलं, तर त्याला राजकीय भूमिकेचा विचार करावा लागेलच. आणि असा राजकीय विचार केला नाही, तरी ती एक (अडाणीपणात अडकलेली) राजकीय भूमिकाच झाली, हे तर आता कितीकांनी नोंदवलेलं, ते आपण परत नोंदवूया.

वर्गीय समाजांपेक्षा जातिव्यवस्थेच्या बाबतीत हा बाजार-क्षेत्राचा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा बनणार हे तर आहेच. पण तसा तो बनला तर लेखकानं त्याला सामोरं जावं, असं वाटतं. सारंगांनी म्हटलंय की, ‘माणूसपणाचा शोध हा दुस्तर प्रकल्प या जातीय वास्तवामुळे आणखी दुर्धर बनतो’. मग बनत असेल तर त्यावर मार्ग काढण्यासाठीच लेखक लिहीत असतो ना? त्यात तक्रार कसली? सारंग, पामुक, पेंडसे, बागुल या सगळ्यांच्या विधानांमधून जे काही तक्रार, आरोप, आवेश असं जाणवतंय त्या सगळ्याचा एक मोठा संदर्भ ‘लेखक मुळात लिहितो कशासाठी?’ या प्रश्नाशी जोडलेला आहे, असं वाटतं.

पाच

नवरा मेल्यावर त्याच्याच चितेवर जिवंत पत्नीला जाळणं, ही कृती कितीही छोट्या आणि सत्ताधारी जातींमध्ये (त्या बाजार-क्षेत्रांमध्ये) घडणारी असली, तरी भीषण नाहीये का? मग ‘जळण्यास भाग पाडणाऱ्या स्त्रीची व्यथा कितीही उत्कटपणे मांडण्यात आली तरी ती सर्वस्पर्शी होऊ शकत नाही’ हे बागुलांचं विधान कशातून आलं? आणि पुढं जाऊन ‘शेवटी असले साहित्य हे विशिष्ट वर्गापर्यंतच आस्वादित होते’, असंही ते म्हणतात. (‘आस्वाद’!). बागुल म्हणतायंत ते उच्च-जातीय/ब्राह्मणी वा क्षत्रिय समूहांशी संबंधित आहे, त्यातला ‘विशिष्ट वर्ग’ हा सांस्कृतिक-सामाजिक सत्ताधारी वर्ग आहे, त्यामुळं असं विधान चालून जाईल कदाचित. (खरं तर सती प्रथेचं प्रस्थ अगदीच छोट्या समूहापुरतं मर्यादित नव्हतं, असं सदर लेखकाच्या अतिमर्यादित वाचनातून समजतं). सारंग तर आणखी पुढं जातात, हे सगळं ‘टोळी जीवनाचं एक उदाहरण’ मानून मग ‘धनगर, देवदासी, भटक्या जमाती वगैरें’ना त्यात जोडून ठेवतात. म्हणजे काय? ब्राह्मणांचा प्रश्न त्यांच्या सांस्कृतिक वर्चस्वामुळं सगळ्या समाजाचा असल्यासारखा भासू शकतो, हे म्हणणं वेगळं. ते खरंही आहे, आणि त्यावर बोलायलाही हवं. पण एखादा समूह लहान आहे म्हणून त्याची समस्या समाजव्यापी होऊ शकत नाही, हे विधान ढोबळ आहे, आणि एका पातळीवर प्रचंड असंवेदनशीलही आहे. पहिली गोष्ट, समस्या कुठली आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ब्राह्मण स्त्रीला जिवंत जाळणं आणि पुण्यातली एखादी ब्राह्मण स्त्री लक्ष्मी रोडवर टू-व्हिलर पार्क करायला जागा मिळाली नाही म्हणून भांडत असणं- या दोन्हीत पात्रांची जातीय पार्श्वभूमी (बाजार-क्षेत्राचं एकक) एकच असली, तरी समस्येचं एकक लेखकानं काय मानायचं? जात की व्यक्ती? व्यक्ती हे एकक पाहिलं तर आधी सतीचा प्रसंग भयंकर वाटेल आणि मग त्याचा शोध घेताना जातीचा संदर्भही येईलच, त्यासंबंधीचे गुंतेही येतीलच. टू-व्हिलर पार्किंगचा प्रसंग हास्यास्पद आणि साचेबद्ध आहे, त्यातला भाषेचा वापरही जातीय पार्श्वभूमीतून साचेबद्ध ठरेल आणि अनेकांसाठी ते सगळं विनोदीही ठरेल, त्या शहरात राहणाऱ्यांना असा प्रसंग दिसूही शकतो. पण बाईला जाळण्यातली वेदना हीसुद्धा एका ‘टोळी’पुरतीच असते? आणि धनगर, देवदासी, भटके वगैरेंच्या समस्या या टोळ्यांच्या आहेत त्यामुळं समाजव्यापी नाहीत? हे डेंजर मुद्दे आहेत. लेखकाच्या कामालाच सुरुंग लावणारे आहेत. आणि त्याहीपेक्षा वाचक नावाच्या घटकाला एकदमच हलक्यात घेणारे आहेत. मुळात साहित्यात उघड दिसणाऱ्या ‘समस्यां’पलीकडच्याही बऱ्याच गोष्टी येत असतात.

तर, लेखकाची दृष्टी त्याच्या जातीनं पूर्वग्रहदूषित असू नये, हा मुद्दा क्रमांक एक. पूर्वग्रह तर असतंच असतील, पण दूषितपणाच्याबाबतीत सारंगांनी म्हटल्याप्रमाणे नेणीवेचं 'तारायंत्र' सजग ठेवायचा प्रयत्न करता येईल बहुधा, शरद् पाटलांनी जाणीव-नेणीव या संदर्भात मांडलेले मुद्देही त्याआधी विचारात घेता येतील. एखादा शब्द आपण वापरतो तेव्हा हे तारायंत्र जागं असण्याचा मुद्दा उपयोगी ठरेल. आमची पिढी, आमचा काळ, आमच्या इथं, सध्या सगळ्यांना अमुकएक उपलब्ध असतं- अशा प्रकारचे शब्द वापरताना येणाऱ्या अर्थाच्या मर्यादा मग सारख्या जाणवत राहातील. आपल्या मर्यादित स्थानावरून दिसणाऱ्या गोष्टींचं सरसकटीकरण करणंही टाळावं लागेल. त्यासाठी सारंगांनी म्हटलेलं सजग तारायंत्र उपयोगी पडेल.

प्रभुत्वशाली वर्गाच्या समस्या सर्व समाजाच्या असल्यासारखं भासवलं जातं, हा मुद्दा क्रमांक दोन. हा बाजार-क्षेत्रात प्रभावी ठरणारा मुद्दा आहे, हे खरंच. एवढे दोनच मुद्दे वरच्या डेंजर प्रश्नांमधून आपण वेगळे काढू. यात ब्राह्मण जातीच्या सांस्कृतिक वर्चस्वाचा मुद्दा उघड आहे आणि तो विविध बाजूंनी तपासण्यासारखा आहे. शिवाय यात पुरुषसत्तेचाही भाग आहे. लेखकव्यक्ती सर्जनशील कृती करते तेव्हा तिची जगातल्या यच्चयावत पूर्वग्रहांबद्दलची भूमिका काय आहे, यावर ही मर्यादा अवलंबून असेल, असं वाटतं. सकारात्मक किंवा नकारात्मक असा कोणताही पूर्वग्रह तपासायचा असेल, तर त्यासाठी ‘सर्जनशील’ साहित्य तुलनेनं बरंच स्वातंत्र्य देऊ शकतं. भाषेचं सगळं उत्पादनतंत्र काही लेखकाच्या हातात नसतं. शब्द नि अर्थाच्या बाबतीत हे भाषेचं काहीसं पारतंत्र्य लेखकाला पत्करावं लागतंच. (अमुकतमुकनी स्वतःची भाषा घडवली, असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जाईल, त्यांनी मुळात असलेल्या भाषेतच स्वतःची भाषा घडवलेली असते. पूर्ण स्वतःचे स्वतंत्र उच्चार आणि लिपी असलेली वेगळीच भाषा शोधली, त्यात काही लिहिलं, तर मग वेगळं होईल!). पण तेवढं एक  मान्य केल्यानंतर सर्जनशील साहित्यकृती करताना लेखक बरंच स्वातंत्र्य घेऊ शकतो, भाषेच्या आणि एकूण सर्व जगण्याच्या व्यवहारांच्या तंत्राशी स्वतंत्रपणे खेळू शकतो. हे त्याचं साहित्यकृतीच्या अंतर्गत असलेलं स्वातंत्र्य वापरलं तर पूर्वग्रह तपासायचे मार्गही शोधता येतील, असं वाटतं. लिखित साहित्यात तर असं स्वातंत्र्य अजूनच मिळतं.

सहा

फ्रान्झ काफ्का या झेकोस्लोवाकियात राहून जर्मन भाषेमध्ये लिहिणाऱ्या ज्यू धर्मीय लेखकानं त्याच्या डायरीत १९१४ साली असं लिहिलं होतं: “माझ्यात आणि ज्यूंमध्ये काय साम्य आहे? माझं तर माझ्याशीही फारसं साम्य नाहीये. मी एका कोपऱ्यात गप्प उभं राहायला हवं नि श्वास घ्यायला मिळतंय यातच समाधान मानायला हवं”[१२].

हे आपल्या नोंदीच्या शेवटाकडं नोंदवणं आवश्यक वाटलं. यातला ज्यू धर्मीयपणा काफ्काला चुकलेला नाही. कदाचित पुढं पंचवीस वर्षांनी ज्यूंविरोधात युरोपात जो धुमाकूळ घातला जाणार होता, त्याची ही चाहूलही असेल. किंवा कदाचित ती काफ्काची वैयक्तिक वेदनाही असेल. किंवा दोन्हीचं मिश्रण असेल[१३]. काफ्काच्या लेखन-क्षेत्रापुरतं बोलायचं तर ती त्याची वैयक्तिक वेदनाच म्हणूया, पण त्याच्या पुढच्या नि मागच्या बाजार-क्षेत्रावरून ती आपसूक सगळ्या ज्यूंची ठरू शकते. इस्राइलवाल्यांना वाटलं तर तेही वाटल्यास याचा वापर करू शकतील. किंवा जर्मनी किंवा झेक प्रजासत्ताकही यावर दावा सांगू शकेल. किंवा आता आपण ही काफ्काची वाक्यं शंभर वर्षांनी इथं लिहितोय. जर्मन येत नसूनही मधल्यामध्ये इंग्रजीतून घेऊन आपण ते मराठीत भाषांतरित केलंय, या सगळ्या व्यवहारात कुठंतरी त्यातल्या भावनेनं म्हणा किंवा विचारानं म्हणा किंवा शब्द नि अर्थाच्या सहितपणानं म्हणा, काळाचं नि धर्माचं नि भूगोलाचं अंतर ओलांडलंय. सर्जनशील लेखकाला स्वतःवरच्या दडपणासकट इतपतच मर्यादा ओलांडता येत असावी.

काफ्काच्या वरच्या डायरी-नोंदीतलं पहिलं वाक्य म्हणजे एक वस्तुस्थितीच्या संदर्भातलं विधान वाटतं. आणि दुसऱ्या वाक्यातला घुमाव खास काफ्कीय आहे- आपल्याला आपल्याबद्दलच आपलेपणा न वाटणं.

तर परंपरा (त्यातून आलेल्या व्यवस्था) आणि आधुनिकता (व्यक्तीचं एकक) यांचे सकारात्मक-नकारात्मक परस्परसंबंध, जातिव्यवस्था किंवा खरंतर कुठलीही व्यवस्था, हे सगळं त्या-त्या लेखकव्यक्तीच्या अवकाशाचा भाग असतं. त्याची धाटणी नि गुंतागुंत वेगवेगळी राहणार. पण इतर अनेक गोष्टींप्रमाणेच या अवकाशाचा वापर करणं हेच लेखकाचं काम नसतं का? यात तणाव, दडपण, या गोष्टी येणारच. लेखकाच्या बाजार-क्षेत्रामध्ये ही दडपणं कशीही काम करत असतील, तशी असोत. पण लेखन-क्षेत्रामध्ये या दडपणांमधला जाणीव-नेणिवेचा खेळ समजून घेणं, त्याबद्दल जागरूक राहणं, मुळात त्या दडपणाशी संवाद करणं, असा प्रयत्न या नोंदीमध्ये आपण करू पाहिला. आपण वापरतोय त्या शब्दाचा अर्थ नक्की किती मर्यादित आहे याचा जाणीवपूर्वक विचार आणि लेखकत्वाचं एकक लेखन-क्षेत्रापुरतं तरी व्यक्तिगत ठेवणं, असे दोन मुद्दे आपल्याला टिपता आले. यातल्या दुसऱ्या मुद्द्यातलं व्यक्तिगत असणं लेखकाच्या सर्जनशील स्वातंत्र्याचा अवकाश वाढवायला मदतीचं होईल, पण त्याचसोबत सामूहिकतेशी धागा जोडलेला राहील याची काळजी शब्द नि अर्थासंबंधीचा पहिला मुद्दा घेईल, असं वाटतं.
*

संदर्भ-टिपा:
१. विलास सारंग, मॅनहोलमधला माणूस: मराठी वाङ्मय, समाज व जातिवास्तव, मौज प्रकाशन, पहिली आवृत्ती- मार्च २००८. इथून पुढं ‘मॅनहोल’ असा उल्लेख. पान क्रमांक या आवृत्तीतले.
२. विलास सारंग, वाङ्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव, मौज प्रकाशन, पहिली आवृत्ती- फेब्रुवारी २०११. इथून पुढं ‘वाङ्मयीन संस्कृती’ असा उल्लेख. पान क्रमांक या आवृत्तीतले.
३. सारंगांचं यासंबंधीचं मूळ वाक्य असं आहे: “... मानवी वास्तव- सार्त्र आपल्याला आठवण करून देतो त्याप्रमाणे- आपल्या स्थानाचा स्वीकार करायला बांधील असतं. त्या एका गोष्टीवर आपल्या मानवी वास्तवाचं काहीच नियंत्रण नसतं” (मॅनहोल: २). राहुल कोसम्बी यांनी सारंगांच्या या पुस्तकातील मांडणीवर अनेक आक्षेप घेतलेले आहेत; पाहा: राहुल कोसम्बी, ‘डॉ. विलास सारंग यांचे जाति-आकलन: वास्तव आणि विपर्यास’, मुक्त शब्द, नोव्हेंबर-डिसेंबर २०१२. यातला एक आक्षेप सारंगांनी सार्त्रच्या ज्या ओळी उद्धृत केल्या आहेत त्यांच्या अनुवादाबद्दलचाही आहे; कोसम्बी म्हणतात: “(सारंग).. सार्त्रच्या वचनाचा चुकीचा अनुवाद- ‘‘मानवी वास्तव’ आपल्या स्वप्नाचा स्वीकार करायला बांधील असतं. त्या एका गोष्टीवर मानवी वास्तवाचं काहीच नियंत्रण नसतं’- पुरवतात. यात मानवी अस्तित्वऐवजी मानवी वास्तव घातल्यामुळे वाचकाचाही भलताच गोंधळ उडाला आहे. शेवटी सारंग ठोस सामाजिक वास्तवाला नाकारत म्हातारे होताहेत.” सारंगांच्या मूळ वाक्यांमधल्या ‘स्थान’ या शब्दाऐवजी कोसम्बींनी उद्धृत केलेल्या ओळीत ‘स्वप्न’ असा शब्द आला आहे, हा कदाचित मुद्रितशोधनातला दोष असू शकतो. पण त्याशिवायही अनुवादासंबंधीचा हा आक्षेप योग्य नसल्याचं आढळतं. सारंगांनी मुळात हे वाक्य लिहिण्यापूर्वी, म्हणजे पुस्तकाच्या सुरुवातीलाच, ज्याँ-पॉल सार्त्र यांच्या ‘बीइंग अॅण्ड नथिंगनेस’ या ग्रंथातल्या ‘माझं स्थान’ या एका उप-विभागातील काही भागाचा सारांश-उतारा दिलेला आहे. त्यानुसार आपण सार्त्र यांचा मूळ ग्रंथ तपासला. आपल्याला उपलब्ध झालेल्या ग्रंथाच्या प्रतीमध्ये (हेझल ई. बार्न्स यांनी केलेला इंग्रजी अनुवाद, वॉशिंग्टन स्क्वेअर प्रेस, १९५६; पुनर्मुद्रण- १९८४) असं दिसतं की, सारंगांनी उद्धृत केलेल्या ओळी ‘माय प्लेस’ या उप-विभागातल्या आहेत. आणि त्यात ‘ह्युमन रिआलिटी’ असाच इंग्रजी शब्द वापरलेला आहे (पान ६२९-६३०), त्यामुळं त्याचा मराठी अनुवाद म्हणून ‘मानवी वास्तव’ हा सारंगांचा शब्दप्रयोग योग्यच आहे असं वाटतं. कोसम्बींचे इतर आक्षेप बरेचसे समाजशास्त्रीय विद्याशाखेच्या अंगानं आलेले आहेत: सारंगांनी जातिव्यवस्थेसंबंधी कोणत्याही भारतीय अभ्यासकांचा संदर्भ आवश्यक असूनही घेतलेला नाही आणि काही पाश्चात्त्य अभ्यासकांचे कालबाह्य संदर्भ दिलेले आहेत, शिवाय त्यांनी जातरचनेची स्वातंत्र्यानंतर बदललेली समीकरणं ध्यानात घेतलेली नाहीत (मध्यमवर्णीयांच्या हातात गावपातळीवरची अनेक क्षेत्रातली सत्तासूत्रं येणं), इत्यादी. सर्वसाधारण वाचक म्हणून जाणवलेला या आक्षेपांचा क्लायमॅक्स हा: “अल्पजन आणि बहुजन-वंचित गटांतील संस्कृतीबद्दलची सारंगांची निरीक्षणे पारंपरिक जातितर्काला म्हणजे जातीच्या जन्माधिष्ठित पावित्र्याला आणि तिच्यातील अंगभूत व्यापकतेच्या शक्यतेला आधीपासूनच गृहीत धरते आणि तिला अचिकित्सकपणे औरसता देते आणि त्याच वेळी वंचितांच्या संस्कृतीला कमी लेखते. या तर्काने सारंगांची जातीसंस्कृतीची जाण तद्दन ब्राह्मणीच आहे”. शिवाय सर्जनशील लेखन आणि जातीय दडपण या संदर्भात कोसम्बींनी लेखात एका ठिकाणी असं म्हटलंय: “... गरज आहे ती एका विशिष्ट जातिनिरपेक्ष पण तरीही चिकित्सक दृष्टिकोण अंगी बाळगून लेखन करण्याची. एक असा व्हँटेज पॉइंट जिथून तुम्ही समग्र जातिव्यवस्था, ती तुम्ही ज्या कालावकाशात पाहता, तिच्या क्रियाप्रक्रियांसह निरपेक्ष पण मूल्यभान बाळगून, चिकित्सकपणे समजून घेऊ शकाल”. हे दोन मुद्दे आपल्या नोंदीच्या संदर्भात महत्त्वाचे वाटले.
४. सूर्यनारायण रणसुभे/सिद्राम पाटील, ‘भारतीय साहित्याच्या मर्यादा’, तात्पर्य, ऑगस्ट-सप्टेंबर १९८५. पान १०-११. (बागुलांच्या अवतरणाचा मूळ स्त्रोत लेखकांनी दिलेला नाही) .
५.  दया पवार यांच्या गाजलेल्या ‘बलुतं’ या आत्मचरित्राचं जेरी पिंटो यांनी केलेलं इंग्रजी भाषांतर २०१५ साली प्रसिद्ध झालं. त्या निमित्तानं पिंटो यांची मुलाखत ‘फ्रंटलाइन’ पाक्षिकाच्या ८ जानेवारी २०१६च्या अंकात आली होती, त्यात (पारशी) मुलाखतकर्ती एका ठिकाणी विचारते: “हे पुस्तक मोजक्या (niche) वाचकांसाठीचं आहे, असं अनेकांना वाटेल, तर असं पुस्तक काढायला राजी होणारा प्रकाशक तुम्ही कसा शोधला?” एकूणच दलित साहित्यातील पहिलं आत्मचरित्र मानलं जाणाऱ्या पुस्तकाला २०१५-१६ सालीही ‘मोजका वाचक’ असल्यासारखं इंग्रजी मुलाखतीत का बोललं गेलं, हा प्रश्न तपासायला हवा. यातून लगेच पुस्तकाबद्दल सकारात्मक-नकारात्मक निष्कर्ष काढणं तर बरोबरच वाटत नाही. ‘बलुतं’ या लेखनकृतीचं मूल्यमापन तिचा वाचकवर्ग किती आहे, यावर फक्त अवलंबून नाही; तसंच कुठलंही साहित्य ‘जागतिक प्रसिद्धी’ मिळण्याजोगं आहे का, यावरूनच फक्त त्याचं साहित्यिक मूल्यमापन करणं बरोबर वाटत नाही.
६. श्री. ना. पेंडसे, एक मुक्त संवाद: उद्याच्या कादंबरीकारांशी, मॅजेस्टिक प्रकाशन, आवृत्ती- १२ मे १९९५. इथून पुढं ‘मुक्तसंवाद’ असा उल्लेख. पान क्रमांक या आवृत्तीतले.
७. ओरहान पामुक यांच्या ‘नाइव्ह अँड सेन्टिमेन्टल नॉव्हेलिस्ट’ या पुस्तकात समाविष्ट केलेल्या व्याख्यानमालेचं चिन्मय धारूरकर आणि जान्हवी बिदनूर यांनी केलेलं मराठी भाषांतर ‘नव-अनुष्टुभ’च्या अंकांमधे २०१४-१५च्या काळात येत होतं. या नियतकालिकाच्या जानेवारी-फेब्रुवारी २०१५च्या अंकातलं संपादकीय पामुकच्या या मांडणीसंदर्भातलं होतं. त्यामधे ही वाक्यं नोंदवलेली आहेत.
८. विलास सारंग, सर्जनशोध आणि लिहिता लेखक, मौज प्रकाशन, पहिली आवृत्ती- एप्रिल २००७: पान १. इथून पुढं ‘सर्जनशोध’ असा उल्लेख. पान क्रमांक या आवृत्तीतले.
९. विलास सारंग, ‘कादंबरीची संकल्पना’, परिवर्तनाचा वाटसरू, १६-३१ जानेवारी २०१०, पान २२.
१०. शरद् पाटील, जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व, मावळाई प्रकाशन, सप्टेंबर २०१४: पान २०८. शिवाय अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र या पुस्तकातील ‘कोसला: भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष’ आणि ‘हयवदन: ब्राह्मणी नेणिवेने परतवलेली प्रतिभाझेप’ हे लेख विशेषकरून आपल्या या लेखाच्या संदर्भात वाचण्याजोगे.
११. ‘देर स्पीगल’ या जर्मन साप्ताहिकाच्या इंग्रजी संकेतस्थळावरच्या एका मुलाखतीत पामुक यांना विचारलं जातं, “तुम्ही स्वतःला मुस्लीम मानता का?” यावर पामुक म्हणतात: “मी स्वतःला मुस्लीम संस्कृतीतून आलेला माणूस मानतो. कुठल्याही अर्थी मी स्वतःला नास्तिक तर म्हणणार नाही. त्यामुळं मुस्लीम धर्माशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख सांगणारा असा मी एक मुस्लीम आहे, असं मानतो. देवाशी वैयक्तिक संपर्क साधण्यावर माझा विश्वास नाही, आणि इथंच यात काहीशी संदिग्धता येते. मला माझ्या संस्कृतीशी ओळख सांगता येते, पण मला (या अशा) सहिष्णू, वैचारिक बेटावर राहण्यात आनंद वाटतो- जिथं मी दस्तयेवस्की आणि सार्त्रशी संवाद साधू शकतो, हे दोघेही माझ्यावर खूप मोठा प्रभाव पाडून राहिलेले (लेखक) आहेत.”
१२.  द डायरीज ऑफ फ्रान्झ काफ्का-८ जानेवारी १९१४ रोजीची नोंद, संपादक- मॅक्स ब्रॉड, इंडियालॉग पब्लिकेशन्स, ऑगस्ट २००३: पान २२९. जर्मनमधून इंग्रजीत भाषांतर कोणी केलं, ते या प्रतीत दिलेलं नाही.
१३. ज्यू धार्मिक परंपरेचा प्रभाव काफ्काच्या लिखाणावर कसा होता आणि प्रागमधील जर्मनभाषक ज्यू अल्पसंख्याकांची परिस्थिती काफ्काच्या तुटलेपणाच्या भावनेला कशी पूरक ठरली, त्याचा त्याच्या भाषेवर काही परिणाम झाला का, यासंबंधीच्या संक्षिप्त पण रोचक विश्लेषणासाठी पाहा: जॉर्ज स्टेनर, ‘के’, लँग्वेज अँड सायलेन्स, अॅथनियम, १९८६: पान ११८-१२६. (पीडीएफ प्रत).

Monday 3 April 2017

पोटासाठी पॉप्युलर : उद्धव शेळके

१. अभिरुची

स्पीकिंग टायगर, २०१७
उद्धव शेळके यांच्या 'धग' या कादंबरीचं 'कौतिक ऑन एम्बर्स' हे शांता गोखले यांनी केलेलं इंग्रजी भाषांतर 'स्पीकिंग टायगर' या दिल्लीतील प्रकाशनसंस्थेनं जानेवारी २०१७मध्ये प्रकाशित केलं. ('मॅकमिलन' या प्रकाशनसंस्थेनं शांता गोखले यांनीच केलेलं याच कादंबरीचं भाषांतर 'एम्बर्स' या नावानं २००० साली काढलं होतं: एक - २०००च्या आवृत्तीचा दुवा । दोन- या 'मॅकमिलन'वाल्या आवृत्तीचा संदर्भ असलेला एक इंग्रजी लेख).

'स्पीकिंग टायगर'नं ही आवृत्ती काढल्याचं साधारण जानेवारी महिन्याच्या अखेरीला आपल्या पाहण्यात आलं. त्याच वेळी त्यांच्या संकेतस्थळावर लेखकाविषयी म्हणजे उद्धव शेळके यांच्याविषयी चरित्रात्मक माहिती देणारी इंग्रजी टीपही वाचनात आली. ही टीप आपण वाचली तेव्हा खालीलप्रमाणे होती:
Uddhav J. Shelke (1931–1992) was born in Hinganghat in the Vidarbha district of Maharashtra. After his school education, he joined the Amravati daily, Hindustan, as associate editor. Then he moved to Tapovan, Dr Shivajirao Patwardhan’s colony for people affected with leprosy where he worked as proof-reader, compositor and finally manager of the printing press. He won himself a place in the Marathi literary canon with his first novel, Dhag. His prodigious output of long and short fiction thereafter pandered exclusively to popular taste. However, it allowed him to live as a professional writer.
[उद्धव ज. शेळके (१९३१-१९९२) यांचा जन्म महाराष्ट्रातल्या विदर्भ जिल्ह्यातील हिंगणघाट इथं झाला. शालेय शिक्षणानंतर ते अमरावतीतील दैनिक हिंदुस्थानमध्ये सहायक संपादक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते 'तपोवन' या संस्थेत काम करू लागले. कुष्ठरोग्यांसाठी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी सुरू केलेल्या या संस्थेत शेळक्यांंनी मुद्रितशोधक, जुळारी आणि अखेरीस छापखान्याचा व्यवस्थापक म्हणून काम केलं. 'धग' या पहिल्या कादंबरीद्वारे त्यांनी मराठी साहित्यप्रवाहात स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यानंतर त्यांनी प्रचंड प्रमाणात लिहिलेलं दीर्घ व लघु साहित्य पूर्णपणे लोकसुलभ रुचीला चुचकारणारं होतं. परंतु, अशा लेखनामुळं त्यांना व्यावसायिक लेखक म्हणून जगता आलं.]
'अमेझॉन'वर या इंग्रजी भाषांतराच्या 'किंडल' आवृत्तीची काही पानं वाचकांना चाळता येतात, त्यावरून ही ओळख पुस्तकातही असल्याचं कळलं. दरम्यान, शेळके यांची ही सहा वाक्यांतली ओळख काही बाबतीत खटकल्यामुळं आपण प्रकाशनाच्या संकेतस्थळावर 'संपर्क' विभागात एक पत्र टाकून ठेवलं. या पत्राचा आशय मराठीत असा:
"'स्पीकिंग टायगर'नं उद्धव शेळके यांच्या 'धग' या कादंबरीचं इंग्रजी भाषांतर पुनःप्रकाशित करणं, ही प्रशंसनीय गोष्ट आहे. आता ही कादंबरी अधिक काही वाचकांपर्यंत पोचेल, अशी आशा. पण आपल्या प्रकाशनाच्या संकेतस्थळावर दिलेली शेळके यांची ओळख दोन बाबतींत खटकली. शेळक्यांनी प्रचंड प्रमाणात लेखन केलं आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी खूप लिहावं लागलं, हे खरंच. पण सहा वाक्यांच्या ओळखीत (दोन वाक्यं खर्च करून) विशेष उल्लेख करण्याएवढी ही बाब महत्त्वाची आहे का? शिवाय, 'धग'च्या आधी त्यांनी 'शिळान अधिक आठ कथा' हा संग्रह काढला होता, आणि 'धग'नंतरही त्यांनी काही चांगली पुस्तकं लिहिली. पण हे सगळं लेखन 'केवळ लोकसुलभ रूचीला चुचकारणारं' होतं, असं वर्णन सुलभीकरणाचा प्रकार वाटतो. शेळक्यांच्या जगण्यातलं कारुण्य किंवा मराठी व इंग्रजी साहित्यसंस्कृतींमधली प्रचंड आर्थिक दरी, यातलं काहीच अशा वर्णनांमधून स्पष्ट होत नाही. शेळक्यांनी उदरनिर्वाहासाठी त्यांना शक्य असेल ते लिहिलं ही सर्वसामान्य वाचक म्हणून मला चांगलीच गोष्ट वाटते. शिवाय 'लोकसुलभ अभिरुचीला चुचकारण्या'ला तुच्छ लेखण्याचं कारण काय? खरं तर, खपाऊ रहस्यकथांपासून ते 'अभिरुचीसंपन्नां'ना रुचणाऱ्या 'धग'सारख्या कादंबरीपर्यंत अतिशय वैविध्यपूर्ण साहित्यलेखन शेळक्यांनी केलं, ही त्यांचं लेखकी प्रावीण्य दाखवणारी गोष्ट आहे. त्यामुळं शेळक्यांचं संकेतस्थळावरचं वर्णन दुःखद वाटलं. हे असलं तरी आता शेळक्यांची संवेदनशीलता मराठीसोबतच इतर काही वाचकांपर्यंत पोचेल, हे मला चांगलंच वाटतं."
वरच्या मुद्द्यासोबतच आणखीही एक मुद्दा आपण प्रकाशकांना कळवला होता. विदर्भ या प्रदेशाचा उल्लेख सदर इंग्रजी आवृत्तीत 'डिस्ट्रिक्ट'/'जिल्हा' असा केलेला आहे. ही एक तथ्यासंबंधीची चूक वाटली. तीही त्यांना कळवून ठेवली. या संदर्भात दहा-एक दिवसांच्या काळामधे आपण वेगवेगळ्या टप्प्यांमधे मेलद्वारे संपर्क साधला. त्यातल्या एका व्यक्तीचा तत्काळ प्रतिसाद आला. ही शेवटची मेल पाठवली त्याच दिवशी आपण प्रकाशनाची वेबसाइट तपासली, तेव्हा त्यातली आपल्याला आक्षेपार्ह वाटलेली दोन वाक्यं काढून टाकलेली होती आणि विदर्भाचा उल्लेख 'डिस्ट्रीक्ट'वरून 'रीजन' असा बदलला होता. उद्धव शेळके यांची लेखक म्हणून असलेली ही ओळख मूळ छापील इंग्रजी पुस्तकात मात्र तशीच राहील. योग्य वाटल्यास प्रकाशकांना कदाचित पुढच्या आवृत्तीत हा बदल करता येईल.

रेघेला प्रतिसाद दिलेल्या व्यक्तीसोबतचा हा संवाद अगदी थोडक्यात होता, त्यामुळं  रेघेवर यासंबंधी नोंद करताना तो प्रतिसाद त्यांच्या परवानगीविना नोंदवणं योग्य वाटलं नाही. या व्यक्तीला आपण तशी विचारणा केली, पण अगदी थोडक्यातल्या मेलवरच्या संवादावरून मूळ मुद्दा स्पष्ट होणार नाही, त्या मुद्द्यावर निराळी चर्चा गरजेची आहे, असं त्या व्यक्तीनं कळवलं. ते योग्यही होतं आणि त्यांच्या म्हणण्याचा आदर ठेवत आपण त्यांचा प्रतिसाद इथं नको नोंदवूया. पण त्यांच्या प्रतिसादातलं मूळ सूत्र आपल्या नोंदीला पुढं नेण्यासाठी गरजेचं असल्यानं तेवढी एक-दोन वाक्यं आपण इथं नोंदवून पुढं जाऊ. विदर्भाचा 'डिस्ट्रिक्ट' हा उल्लेख 'परिसर' अशा अर्थानं असल्याचं संबंधित व्यक्तीनं कळवलं. पण त्याहीपेक्षा 'पॉप्युलर' रूचीसंबंधीचा आक्षेप अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचं या व्यक्तीनं म्हटलं. त्यांचं म्हणणं असं होतं: "धग ही कोणत्याही- अगदी आंतरराष्ट्रीय- निकषांनुसारही उत्तम कादंबरी ठरेल आणि शेळके यांचं दुसरं लेखन या कादंबरीच्या पातळीला पोचू शकलं नाही, या मताशी बहुतांश लोक सहमत होतील. एका मराठी प्रकाशकांनी सांगितल्यानुसार, शेळक्यांना त्यांची पुस्तकं विकली जावीत याची चिंता लागलेली असायची, त्याचा परिणाम त्यांच्या कथनावर आणि शैलीवर झाला होता. अन्यथा, 'धग'मध्ये शेळक्यांनी गाठलेली कथनाची उंची टिकवण्याची क्षमता त्यांच्यात होती." 'पॅण्डरिंग' हा शब्द मात्र लोकसुलभ रूचीबद्दल हीनतादर्शक आहे, असं या व्यक्तीनं मान्य केलं. पण त्यामागचा हेतू अशी तुच्छता दर्शवण्याचा नव्हता, असंही या व्यक्तीनं सांगितलं. (पॅण्डर: एखाद्याची हीन अभिरुची, दोष, वासना, इ. जोपासणे, पोसणे. स्त्रोत: नवनीत ॲडव्हान्स्ड डिक्शनरी).

या संदर्भात आक्षेप किंवा मत कळवलं तेव्हाही आपल्याला प्रकाशकांच्या किंवा संबंधित व्यक्तींच्या हेतूंबद्दल शंका वाटलेली नव्हती. मुळातच 'धग'चं इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेतलं भाषांतर कोणी प्रकाशित केलं, तर वाचक म्हणून आपल्याला आनंदच वाटेल. त्या आनंदासकटच आपण आपल्याला खटकलेले दोन मुद्दे कळवले. त्यातल्या ज्या व्यक्तीनं प्रतिसाद दिला तिनंही या आनंदाची दखल घेऊनच आक्षेपांचीही दखल घेतली. त्यामुळं आपणही व्यक्ती किंवा संस्थांवर दोषारोप करण्यापेक्षा आपल्या आक्षेपांबद्दल थोडं तपशिलात नोंदवूया.

आपण या प्रकाशकांना कळवलेल्या मतामध्ये आणखी एक मुद्दा हवा होता. पण तो रेघेच्याही माहितीत नसल्यानं आपण त्यांना तसं काही आधी कळवू शकलो नाही. 'धग' ही उद्धव शेळक्यांची पहिली कादंबरी नाही. 'नांदतं घर' अशी त्यांची कादंबरी १९५६ साली प्रकाशित झाली होती (श्याम प्रकाशन, अमरावती). (विषय कादंबरीचा आहे म्हणून, नायतर 'आसरा' व 'शिळान' असे त्यांचे दोन कथासंग्रहही अमरावतीच्या श्याम प्रकाशनानं अनुक्रमे १९५७ आणि १९५८ या वर्षांमध्ये प्रकाशित केले होते). 'धग' ही कादंबरी १९६० साली मुंबईच्या पॉप्युुलर प्रकाशनानं काढली. तर ही तथ्यासंबंधीची माहिती आपल्यालाही नव्हती, हे कबूल करूया. पण आता या नोंदीच्या निमित्तानं केेलेल्या शोधात या काही गोष्टी सापडल्या.

२. पैशासाठी लेखन

पॉप्युलर प्रकाशन, २००७
मुखपृष्ठ: उत्तम क्षीरसागर
तर, आता आपण मुख्य मुद्द्याकडं येऊ. शेळक्यांनी पैशासाठी खूप लिहिलं, हे खुद्द शेळक्यांनाही मान्य होतं आणि त्यांनी उघडपणे ते वेळोवेळी मान्य केलं होतं. 'उद्धव शेळके यांच्या कादंबऱ्यांतील स्त्रीचित्रण' या विषयावर पीएच.डी. केलेले केशव फाले यांनी १४ जानेवारी १९९१ रोजी शेळक्यांची प्रत्यक्ष मुलाखत (पीडीएफ) घेतली होती, त्यात तीन प्रश्नांना उत्तर देताना शेळके जे बोलले ते आपण जरा सलग वाचू:

'तपोवन' या अमरावतीमधल्या संस्थेत 'सुभाष मुद्रणालया'चे व्यवस्थापक म्हणून शेळके काही काळ काम करत होते, हे काम सोडण्यासंबंधीच्या प्रश्नावर ते म्हणतात:
"साधारणतः १९५७ ते १९६६-६७पर्यंत मी तेथे होतो. या काळात माझ्या बऱ्याच कथा-कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यावेळी माझ्या मनात वाङ्मयीन मासिक काढण्याची इच्छा उत्पन्न झाली. मी तपोवनमध्ये नोकरीचा राजीनामा दिला. आणि एका मित्राला भागीदार घेऊन 'वैशिष्ट्य' नावाचं मासिक काढलं. तीन-चार अंक निघाले, पण नंतर प्रतिसाद नसल्यामुळे ते बंद पडलं. त्यामुळे कर्ज झालं. हे कर्ज फेडण्यास भागीदारानं नकार दिला. मी घरातील वस्तू, दागिने विकून कर्ज फेडलं. आणि मुंबईला गेलो."
मुंबईला कशासाठी? असं मुलाखतकार विचारतात. त्यावर शेळके म्हणतात:
"भाग्य आजमावण्यासाठी का म्हणाना! तिथे लेखन करून चार पैसे अधिकचे मिळवता येतील असं वाटलं होतं. पण मुंबईत काही होऊ शकलं नाही. त्यामुळं माझे एक मित्र पुरुषोत्तम धाक्रस हे मला 'सोबत'कार श्री. ग. वा. बेहरे यांच्याकडे पुण्याला घेऊन गेले. तिथं बेहरे यांनी १०० रुपये महिना देऊ केला. आणि 'लाईट' लिहिण्याचा सल्ला दिला. मला पैशाची सक्त गरज होती. तो सल्ला मी मान्य केला. आणि रम्यकथा प्रकाशनाचे श्री. वासुदेव मेहेंदळे यांच्याशी झालेल्या कराराप्रमाणे मी दरमहा तीन कादंबरिका लिहू लागलो. त्याचे मला दरमहा ९०० रुपये त्या वेळी मिळायचे."
'हे 'हलके'-फुलके लिखाण आपण केव्हा बंद केले?'- मुलाखतकार. त्यावर शेळके:
"हे लिखाण मी दीडेक वर्ष केलं असेल. मी पूर्णतः लेखनावर जगणारा लेखक. बिकट आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पुण्याला गेल्यावर मी हलकंफुलकं लेखन केलं. त्यातून मला भरपूर पैसा मिळाला. आर्थिक सोडवणुकीसाठी मनाविरुद्ध करावी लागणारी ती एक तडजोड होती. या लिखाणाचा मलाही कंटाळा आला होता आणि जवळचे मित्रही बाहेर पडण्यास सुचवीत होते. दरम्यान मला पैसाही मिळाला होता."
फाले यांच्या पीएच.डी. प्रबंधाचं पुस्तक स्वरूप प्रकाशनानं काढलेलं आहे (डिसेंबर २००८). पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये संदर्भ म्हणून दिलेली परिशिष्टं खुद्द पुस्तकात छापलेली मात्र नाहीत. त्यामुळं या संदर्भात आणखी शोध घ्यावा लागला, मग फाले यांचा प्रबंध 'शोधगंगा' या संकेतस्थळावर सापडला. त्यापेक्षाही परिशिष्टातली मुलाखत सापडली, हे आपल्या नोंदीसाठी चांगलं झालं. लहानशीच मुलाखत आहे, त्यातही चरित्रात्मक स्वरूपाचे प्रश्नच थोडक्यात आलेले आहेत. आपण शेळक्यांच्या चरित्रात्मक बाबीवरून नोंद सुरू केली असल्यानं ही मुलाखत त्यासाठी मर्यादित प्रमाणात उपयोगी वाटली.

३. शाब्दिक इज्जतीची होळी

उद्धवपर्व, २००२ (नभ प्रकाशन) आभार: संजय खडसे
शेळक्यांनी पैसे मिळवण्यासाठी, मनाविरुद्ध तडजोड म्हणून, कंटाळा येईल इतकं लेखन केलं, हे आता आपल्याला कळतं. यासाठी इतरही अनेक संदर्भ सापडतात. आधी उल्लेख आलेल्या मुलाखतीपेक्षा अधिक तपशिलातली शेळक्यांची मुलाखत संजय खडसे यांनी घेतली होती. 'नागपूर पत्रिका' या दैनिकात छापून आलेली ही मुलाखत (बहुधा या मुलाखतीतला काही भाग) नंतर 'उद्धवपर्व' या २००२ सालच्या एका विशेषांकात पुन्हा प्रकाशित झालेली दिसते. या अंकात दोन-तीन राजकीय नेत्यांचे शुभेच्छापर संदेश, शेळक्यांशी असलेल्या वैयक्तिक ओळखीसंबंधीचे काही लेख, त्यांच्या साहित्यावरचे काही लेख, दोन मुलाखती, त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची सूची, 'धग'वरच्या काही कविता, असा मजकूर काहीसा विस्कळीतपणे एकत्र केलेला आहे. यातल्या मुलाखती आणि सूची मात्र संदर्भासाठी उपयोगी वाटल्या.

शेळके यांनी 'तपोवन'मधील नोकरी सोडून सुरू केलेलं मासिक बंद पडल्याचा उल्लेख आधी आला आहेच. या संदर्भात, खडसे यांना दिलेल्या मुलाखतीत शेळके म्हणतात:
"अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, असे अनुभव माझ्यासारख्या काहीशा अविचारी माणसाला नेहमीच येतात. मी थोड्याशाने हुरळतोय, कोणी म्हटले मासिक काढाल, पैसे देतो. मासिकावर पोट भरू शकेन याचा काही एक विचार न करता तपोवनातील नोकरी सोडून दिली. मग मला देव दिसायला लागले. संसार काय असतो कळायला लागलं. मी वैतागलो. मुलाबाळांची आणि स्वतःची परवा न करता [...] तोवर मिळालेल्या शाब्दिक इज्जतीची होळी करून केवळ १५० रुपयांच्या भरवशावर मुंबईची वाट धरली. तिकडे माझे प्रकाशक  व चाहते होते म्हणून आशा होती. बायको मुलांना डोळ्यात पाणी आणून निरोप दिला. त्यांना सांगितलं, मुंबईहून पैसे घेऊन येतो. खरं तर मनोमन ठरवलं होतं, जगण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली तर जगायचं नाही तर तिकडंच पांढरं करायचं. घरी शोधाशोध सुरू होती. प्रकाशकांकडे पत्रं येत. ती मला मिळत. मी उत्तर देत नसे. आई रात्रंदिवस रडत असे. मुलं पप्पा पप्पा करीत. मला पत्रातून सारं कळे, परंतु मी स्वतःला निष्ठूर केलं होतं. असे प्रसंग आयुष्यात कितीदा तरी आलेत. माझ्या तडकाफडकी वागण्यामुळं हे सर्व ओढवलं. अर्थात त्यांचा मोबदला मला पुरेपूर मोजावा लागला. मात्र अनुभवही आला. अनुभव पुढील लिखाणाच्या कामी आला. सतत सात वर्षं तिकडची माणसं, समाज, बोली, त्यांचे स्वभाव, आयुष्यातील वळणं, उतार-चढाव, सारं डोळसपणे पाहता आलं. माझी दृष्टी व्यापक झाली [...] पूर्वी दहा माणसांसमोर माझे पाय लटलट कापायचे. आता दहा हजार माणसांना सामोरं जातो. मी अनुभवाचे एवढे टक्के टोणपे खाल्ले नसते तर मला हा सभाधीटपणा आला नसता. जगाशी दोन-दोन हात करायची उमेद झाली नसती. अनुभव संकुचित राहिले असते. माझं इंग्रजी वाढलं नसतं. मी सारं आयुष्य ग्रामीण ग्रामीण करत राहिलो असतो आणि ते संपल्यावर आग्रहावर जगू लागलो असतो. मात्र सांज भागवण्यासाठी दहा रुपये मागण्याची पाळी आली नाही. तेव्हा मी मुलांना टेरिकॉटचे कपडे दिले नसतील, बूट दिले नसतील, परंतु त्यांना ठिगळाची वस्त्रं घालून चपलांशिवाय अनवाणी हिंडावं लागलं नाही. केवळ लेखनातून मिळालेलं सामर्थ्य हे मी माझं स्वाभिमानपद समजतो".
'शाब्दिक इज्जतीची होळी' हे शेळक्यांचं म्हणणं भारी आहे. त्यावर आपण काही निराळं बोलायला हवंय असं वाटत नाही. आयुष्यात जे घडलं त्याची जबाबदारी शेळके स्वीकारतायंत, आणि लेखनाच्या आधारे आपण उदरनिर्वाह केला, हे त्यांना अभिमानाचं वाटतंय, हा मुद्दा मात्र यातून आपल्यासारख्या वाचकांना लक्षात येतो. शेळक्यांचं चरित्र आणखी शोधायचा प्रयत्न करू पाह्यला, तर मग साहित्य अकादमीनं 'मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर' या मालिकेत प्रकाशित केलेलं व आनंद पाटील यांनी लिहिलेलं शेळक्यांचं ९४ पानांचं चरित्र आपल्याला मिळतं.

४. मर्यादित चरित्रसाधनं

साहित्य अकादमी, २००२
या चरित्रातला शेळक्यांबद्दलचा वैयक्तिक भाग अतिशय लहान (१४ पानांचा) आहे, आणि त्यातला बराचसा ऐवज आधी उल्लेख झालेली मुलाखत, दुसरा एक विशेषांक, शेळक्यांच्या डायरीतल्या काही नोंदी, एका पीएच.डी. प्रबंधाचं काम, एका एम.फिल.साठीचं काम, अशा मर्यादित साधनांमधून घेतलेला आहे. शेळक्यांबद्दलची चरित्रसाधनं मर्यादित असल्याची जाणीव या चरित्राचे लेखक आनंद पाटील यांना असल्याचं दिसतं. पण ही मर्यादा मान्य करूनही खूप ताणलेले निष्कर्ष काढण्यात पाटील मागं राहिलेले नाहीत. शिवाय एखादी वस्तुस्थितीच विचित्र पद्धतीनं लिहून तिचं विकृतीकरण करणं, असा प्रकार काही ठिकाणी दिसला. उदाहरणार्थ हे वाक्य पाहा: ब्राह्मण मुलीशी लग्न केलेले विख्यात लघुकथा लेखक शंकर पाटील यांनी त्यांना (उद्धव शेळक्यांना) महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळात नोकरी मिळवून दिली, आणि नंतर शेळके यांना ब्राह्मण मुलीशी लग्न करणं साध्य झालं. (मूळ इंग्रजी वाक्य: [...] Shankar Patil, famous short story writer who had married a Brahmin girl, got him employed in the textbook bureau of Government of Maharashtra, and Shelke succeeded in marrying a Brahmin girl: पान ५). पुढं हे पाटील लिहितात: चाळिशीत विधुरावस्थेतल्या त्यांनी (शेळक्यांनी) जाणीवपूर्वक ब्राह्मण मुलीवर प्रेम केलं, असं नंतर त्यांनी त्यांच्या एका मुलाखतकाराला सांगितलं (इंग्रजी वाक्य: A widower in his forties he fell in love deliberately with a young Brahmin girl, as he told later to the interviewer: पान ७). शेळक्यांच्याच एका मुलाखतीतल्या उल्लेखावरून पाटलांनी हे लिहिलेलं आहे. ही मुलाखत म्हणजे आपल्या नोंदीत आधी उल्लेख आलेली, संजय खडसे यांनी घेतलेली. पण यात घोटाळा वाटतो. शेळके यांचं पहिलं लग्न घरच्या परिस्थितीमुळं, आई थकत होती म्हणून सून आणावी, अशा हेतूनं झालेलं होतं. ती पत्नी 'तोलामोलाची नव्हती', असं शेळक्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. पण दुर्दैवानं ती पत्नी वारली, त्यानंतर अनेक वर्षांनी शेळक्यांनी दुसरं लग्न केलं, हे आंतरजातीय लग्न होतं. खडसे यांना दिलेल्या मुलाखतीत शेळके म्हणतात: "पुण्यात असताना मी दुसरं लग्न केलं. हा आंतरजातीय प्रेमविवाह आहे. तोही जाणत्या वयात जाणूनबुजून केलेला. त्यामुळे त्याविषयी बोलण्यासारखं काही नाही." पहिलं लग्न परिस्थितीच्या रेट्यानं झालं, तर दुसरं लग्न जाणतेपणानं झालेलं होतं, असा शेळक्यांच्या बोलण्यातला अर्थ जाणवला. आनंद पाटलांनी या अर्थाचा अनर्थ करून त्याला आणखी निरनिराळे संदर्भ जोडून वाक्यं लिहिल्येत. शेळक्यांची साहित्यिक कारकीर्द आणि आंतरजातीय लग्न यांच्यात संबंध दिसत असल्याचं काहीतरी पाटील पुढं म्हणताना दिसतात. पण शंकर पाटलांबद्दलचा वैयक्तिक उल्लेख बिनसंदर्भानं देऊन काय साध्य होतं ते कळलं नाही. असे वैयक्तिक उल्लेख सखोल चरित्रात तपशीलवार मांडणीनं संदर्भासहित देणं, ही वेगळी गोष्ट आहे. पण इतक्या ओझरत्या पद्धतीनं आणि मर्यादित साधनांमधे असे उल्लेख चुकीचे वाटले. शिवाय, पाटलांनी ज्या पद्धतीनं हे सगळं लिहिलंय, ते शेळक्यांपेक्षा संबंधित स्त्रीसाठी मानहानीकारक आहे. संबंधित व्यक्ती जिवंत असताना  तिला याबद्दल विचारून लेखन करता आलं असतं. शेळक्यांच्या मुलाखतीवरच एकतर्फी भर ठेवून, त्यातही चुकीचे अर्थ काढून अशी वर्णनं करणं गैर वाटतं.

लेखकाची चरित्रसाधनं मर्यादित असतील, त्याच्या बाजूनं फार काही बोललं गेलं नसेल, तर त्याच्याबद्दल किती विचित्र उल्लेख होऊ शकतात, याचा हा वाईट दाखला आहे. नोंदीच्या सुरुवातीला आलेला उल्लेखही चरित्राशी संबंधित असला तरी त्यात मुख्यत्वे शेळक्यांच्या साहित्याबद्दल काही नकारात्मक मुद्दा नोंदवलेला आहे. पाटलांनी मात्र वैयक्तिक शेरा मारलाय. [ही नोंद केल्यानंतर काही महिन्यांनी साहित्य अकादमीलाही या चरित्रपुस्तिकेतली ही बाब कळवली. पोच मिळाली. पण पुढे काही झालं का, ते कळलं नाही]. तरीही या चरित्रपुस्तिकेत काही थोडीशी उपयोगी माहितीही सापडते. शेळक्यांच्या काही कादंबऱ्यांची व कथांची- म्हणजे त्यातल्या कथानकांची तोंडओळख यात करून दिलेली आहे. शिवाय, शेळक्यांच्या लेखनाची पाटलांना जाणवलेली वैशिष्ट्यंही काही वेळा उपयोगी ठरू शकतील. उदाहरणार्थ, शेळक्यांनी विविध पार्श्वभूमीवरच्या पात्रांच्या कथा लिहिल्या. विविध जाती-धर्मांसोबतच ग्रामीण व शहरी अशा अनेक पार्श्वभूमी त्यांच्या कथानकांमध्ये दिसतात. शेळक्यांनी मुलाखतीत ग्रामीण-शहरी या मुद्द्यावर व्यक्त केलेलं मत या म्हणण्याशी जुळणारं आहे.

५. लेखनकला नि लेखनकामाठी

पॉप्युलर प्रकाशन, १९९०
मुखपृष्ठ: बाळ ठाकूर
उद्धव शेळके यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांमध्ये तीन कादंबऱ्या चरित्रात्मक स्वरूपाच्या होत्या. 'साहेब' (प्र.के. अत्रे), 'मनःपूत' (पु.भा. भावे) आणि 'खंजिरीचे बोल' (तुकडोजी महाराज) या त्या कादंबऱ्या. उदाहरणादाखल यातली 'मनःपूत' कादंबरी पाहू. पॉप्युलर प्रकाशनानं १९९० साली ही कादंबरी प्रकाशित केली. त्याआधी उद्धव शेळक्यांना हार्ट-अटॅक येऊन गेलेला होता. शारीरिक आघाताचा साहजिकपणे मनावरही परिणाम झाला, असं त्यांनी या कादंबरीला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हटलं आहे ('मृत्यूला मी चुकवलं खरं, पण नंतर राहिलेल्या आयुष्याच्या सापळ्याशी दोन हात करणं मला जड जाऊ लागलं. जीवनावरची मानसिक पकड सुटली. नैराश्यानं वाचन-लेखनावरची वासना नाहीशी झाली. [...] शरीराशिवाय मन सुखी राहात नाही व याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होतो'). अशा वेळी त्यांना पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी मदत केली. जास्तीच्या उपचारांसाठी भटकळ शेळक्यांना अमरावतीहून मुंबईला घेऊन गेले. मग तिथं जरा शेळक्यांना मनाला आराम वाटला. तिकडेच पु.भा. भावे स्मृती समितीच्या वार्षिक बैठकीला ते एकदा गेले होते. मग त्यातून तिकडं त्यांनी भाव्यांवर कादंबरी लिहायाची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार मग ही 'मनःपूत' कादंबरी लिहिली गेली. भावे हे सुरुवातीच्या काळातले शेळक्यांचे लेखनातले आदर्श होते, असं प्रस्तावनेत त्यांनी लिहिलंय. तर आता या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कादंबरी एका पातळीवर सपक पद्धतीनं भाव्यांच्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाबद्दलचा आलेख नोंदवते. हिंदुत्वाचा दुराभिमान, स्त्रीशिक्षणाबद्दल अनादर, वांशिक श्रेष्ठत्व, इत्यादी विविध मतं भाव्यांनी हिरीरीनं मांडलेली होती. शिवाय, मराठीत नवकथाकार म्हणून ज्यांची नावं घेतली जात होती त्यातले हे एक! भाव्यांच्या भीषण मतांच्या तपशिलासाठी पाहा: पु.भा.भावे यांची अनिल अवचटांनी घेतलेली मुलाखत (रिपोर्टिंगचे दिवस, समकालीन प्रकाशन, पान १३६-१४७). शेळक्यांच्या कादंबरीत ही मतंही आलेली आहेत, पण या मतांमागचं मन (जसंकसं असेल तसं) कादंबरीत आलेलं नाही. भाव्यांनी 'प्रथमपुरुषी एकवचनी' या नावानं स्वतःचं आत्मचरित्रही लिहिलेलं आहे, ते रेघेच्या वाचनात आलेलं नाही. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सार्वजनिक पातळीवर जितपत बोललं जातं, तितपतच या कादंबरीत आहे. त्याच्या विविध बाजूही फारशा आलेल्या नाहीत. खाजगी आयुष्यातला काही तपशील या सगळ्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाला जोडत जातो, पण त्या खालचे थर या कादंबरीत नाहीत. शिवाय, मुख्य पात्र बाकीच्या पात्रांपेक्षा काही पायऱ्या वरती उचलून ठेवलेलं असल्यानंही आपोआप एक वरवरचेपणा आलेला आहे. एका अर्थी, मनानं जर्जर झालेल्या शेळक्यांसारख्या चांगल्या लेखकाची ही खचलेली कादंबरी आहे, असं वाटलं. पण ही प्रतिष्ठित पॉप्युलर प्रकाशनानं काढलेली होती. कव्हरवरचं चित्रही साधारण त्यांच्या प्रकाशनाला साजेसं. फॉन्ट वगैरे नीट. कादंबरीतलं लेखन-छपाई हे नेटकं आहे, पण शेळक्यांची लेखक म्हणून असलेली कौशल्यं इथं वाचक म्हणून आपल्याला जाणवली नाहीत.

भगवानदास हिरजी प्रकाशन, ऑगस्ट १९७९
मुखपृष्ठ: ल. म. कडू
त्या तुलनेत १९७९ साली प्रकाशित झालेली शेळक्यांची 'महापाप' ही कादंबरी फारच रोचक आहे. शेळक्यांनी जे लिखाण पैशासाठी केलं त्यात ही कादंबरीही कदाचित गणली जाईल. यासंबंधी एक आधार पाहा: 'धग' आणि 'महामार्ग' या शेळक्यांच्या कादंबऱ्या वाचलेल्या आणि आवडलेल्या एका व्यक्तीला आपण या कादंबरीचं मुखपृष्ठ दाखवलं, तर त्या व्यक्तीला ते बटबटीत वाटलं. हे चित्र पाहून 'अंधा कानून' या हिंदी पिक्चरमधला रजनीकांत आठवला, असं ही व्यक्ती म्हणाली. मग आपल्यालाही 'अंधा कानून'मधलं आठवलं आणि या व्यक्तीचं म्हणणं पटलं. 'अंधा कानून'मधे अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि रजनीकांत अशी मंडळी आहेत. काही सनसनाटी सूड वगैरे टाइपचं कथानक आहे, असं अंधुक आठवतंय. तर आता ही कादंबरीही सनसनाटी आहे का? होय, आहे. पण तरीही ती 'मनःपूत'पेक्षा चांगल्या बांधणीची आहे, असं आपलं वाचक म्हणून मत पडलं. या कादंबरीत साधारण साठाव्या पानावरच एक खून पडतो, त्याच्या चार-पाच पानं आधी एका स्त्रीच्या देहाचं वर्णन येतं. नंतरही असा मसाला त्यात आहे. पण 'अंधा कानून'इतकं हे सनसनाटी नाहीये. कूळकायद्याच्या पार्श्वभूमीवर एक देशमुख खानदान आणि कुळं यांच्यातल्या संघर्षावरून कादंबरी सुरू होते. पात्रंही काहीशी एकसाची आहेत. त्यामुळं म्हटलं तर वाचायला 'सुलभ' ठरेल अशी ही कादंबरी. तरीही लेखक म्हणून शेळक्यांची काही वैशिष्ट्यं यात जाणवतात. वातावरणनिर्मिती (एका गावातला चौक-तिथलं वातावरण, तिथून सुरू करत मग पात्रांची ओळख), सनसनाटीपणा असला तरी कथानकात आवश्यक सुसंगती ठेवण्याचं भान, ग्रामीण-शहरी तपशिलांमधे आवश्यक ती सफाई, अतिशय प्रवाहीपणे गोष्ट सांगण्याचं कौशल्य- हे सगळं शेळक्यांचं कसब या कादंबरीत आहे.

आधी उल्लेख आलेल्या विशेषांकात अशोक राणा यांनी घेतलेली शेळक्यांची मुलाखतही आहे. यात शेळक्यांना त्यांची स्वतःची कोणती कादंबरी सरस वाटते, असं मुलाखतकारानं विचारलंय. त्यावर शेळके म्हणतात:
"तसं पाहिलं तर कोणत्याही लेखकाला आपली कोणतीही कादंबरी सारखीच, व माझी प्रत्येक कादंबरी आपापल्या परीनं सरस आहेच, पण त्यातल्यात्यात प्रकृतीवैशिष्ट्य, विविधता व नाविन्य तसंच शैली या दृष्टीनं 'अगतिका', 'साहेब', 'लेडिज हॉस्टेल', 'डाळिंबाचे दाणे' या कादंबऱ्या माझे मास्टरपीस आहेत."
'धग'चा उल्लेख यात नसल्याबद्दल मुलाखतकार साहजिकपणे आश्चर्य व्यक्त करतात. तर शेळके म्हणतात:
"धग ही एकमेव कादंबरी श्रेष्ठ नाही. सर्व लोक म्हणतात श्री. शेळके यांची 'धग' ही सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. खरं तर असं म्हणणाऱ्यांनी माझ्या इतर कादंबऱ्या वाचलेल्याच नसतात. 'धग'पेक्षाही मी सरस लेखन इतर कादंबऱ्यात केलं आहे"
मुलाखत नक्की कोणत्या साली घेतली याचा उल्लेख या अंकात केलेला नाही. पण एकूण मिळून शेळक्यांना फक्त 'धग'चं कौतुक होणं पटत नसल्याचं यात दिसतं. पण आपण वाचक म्हणून आपलं मत तर नोंदवू शकतोच. त्यानुसार आता नोंदीचा शेवट करूया.

शेळक्यांनी वर म्हटलेल्या त्यांच्या इतर बऱ्याचशा कादंबऱ्या रेघेच्या वाचनात आलेल्या नाहीत. त्या बाजारात वा लायब्रऱ्यांमधेही सहजी उपलब्ध होत नाहीत. तरीही 'धग' सोडून 'बाईविना बुवा', 'महामार्ग' या कादंबऱ्या आणि 'शिळान अधिक आठ कथा' हा कथासंग्रह यांना धरून आपल्याला शेळक्यांची लेखकीय कौशल्यं नोंदवता येतील असं वाटतं (तीनही पुस्तकांचे प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन). ही पुस्तकंही रेघेकडे उपलब्ध होती, पण नोंद लिहिताना आपण इथं दुसरीच दोन पुस्तकं मिळवून वापरली. शेळक्यांनी कादंबऱ्या, कथा, लहान मुलांच्या गोष्टी, श्रुतिका, नाटकं, दोन चित्रपट, दोन दूरचित्रवाणी मालिका- असं खरोखरंच प्रचंड लिहिलेलं आहे. त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची संख्या ११९ किंवा कदाचित अधिक आहे. हे सगळं वाचणं आपल्यासाठी तरी अशक्यच आहे. यातली चाळीसेक पुस्तकं म्हणजे शेळक्यांनी पैशासाठी केलेली भाषांतरं होती. ही भाषांतरं बरीचशी शृंगारकथांची किंवा थरारकथांची होती.

'लेखनकला' आणि 'लेखनकामाठी' असे दोन शब्द मराठीत वापरात आहेत. सर्जनशील प्रेरणेनं केलं गेलेलं लेखन, एवढ्यापुरताच या नोंदीतल्या कलेचा संदर्भ आहे. कामाठी या शब्दाला जातीय संदर्भही असला तरी इथं तो कसबी शारीरिक श्रमांशी संबंधित वापरलेला आहे, एवढ्यापुरतं पाहावं. तर, शेळक्यांनी लेखनकला आणि लेखनकामाठी अशा दोन्ही अर्थांनी लेखन केलेलं दिसतं. आपण त्यांच्या सर्वच कादंबऱ्या वाचलेल्या नसल्या तरी एवढं लक्षात येतं की, त्यांच्या जगण्यात स्थैर्य होतं तेव्हा ते सर्जनशील प्रेरणेनं लिहू पाहात होते. म्हणजे तपोवनमधल्या नोकरीच्या काळात त्यांनी केलेलं लेखन केवळ खपण्याच्या हेतूपेक्षा नवीन काही शोधण्याच्या हेतूनं होतं, असं आनंद पाटील म्हणतात. 'डाळिंबाचे दाणे' या तमाशाजीवनावरच्या कादंबरीसाठी ते स्वतः अनेक ठिकाणी फिरले. कुष्ठरोग्यासंबंधी त्यांना जे अनुभव पाहाता आले, तेही त्यांच्या लेखनात उतरले. 'धग'मधला कौतिकचा नवरा शेवटी कुष्ठरोगी होऊन मिशनऱ्यांसोबत जातो. शिवाय 'अगतिका' कादंबरीतही या अनुभवाचे पडसाद उमटले, असं फाले यांच्या पुस्तकात म्हटलंय. इतर दोन मुलाखतींमधून आपण खुद्द शेळक्यांचं त्यांच्या लेखनाबद्दलचं म्हणणं ओझरतं तरी समजून घेतलं.

रामदास भटकळ यांनी १८ डिसेंबर २००२ साली शेळक्यांवर लिहिलेला एक छोटासा लेख आधी उल्लेख झालेल्या विशेषांकातही वाचायला मिळतो. त्यात शेवटी भटकळ म्हणतात:
"[...] आम्ही शेळक्यांच्या लिहिण्याच्या गतीने पुस्तक काढू शकलो नाही. आमची अडचण व्यावसायिक होती. तर शेळक्यांची व्यावहारिक. त्यांनी अमरावतीची नोकरी सोडली होती आणि फक्त लेखनावर ते उपजीविका करणार होते. दरमहा काही तरी छापलं जाऊन त्याचे पैसे मिळणं आवश्यक होतं. त्यांचा माझा स्नेहाचा धागा बळकट असल्यामुळे आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ शकलो. मधल्या काळात त्यांनी जबरदस्तीने जे लिहावं लागलं ते इतरत्र प्रसिद्धीस दिलं. पुढं पुन्हा आत्मविश्वासानं त्यांनी 'खंजिरीचे बोल' (तुकडोची महाराजांवरील कादंबरी), 'मनःपूत' (पु.भा. भावे यांच्या जीवनावरील कादंबरी) या चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या. तेव्हा ते पुन्हा पॉप्युलरकडे आले. त्यांची शेवटची कादंबरी 'महामार्ग'. त्यांच्यातील थोर कादंबरीकाराची खूण पटवत होती. इतक्यात ते गेले."
उद्धव शेळके यांची पत्नी प्रेरणा शेळके यांनी रेघेशी बोलताना (मार्च २०१७) रामदास भटकळ यांचं कौतुक केलं. भटकळांनी मानधनाच्या बाबतीत चोखपणा ठेवला, त्याचा फायदा आपल्याला झाल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय 'नॅशनल बुक ट्रस्ट'नं विविध भारतीय भाषांमधे 'धग'चं भाषांतर केलं, त्याचंही मानधन अडचणीच्या काळात उपयोगी पडलं. 'हे जे सगळं आहे (म्हणजे शेळक्यांनी अमरावतीत घेतलेली जमीन, त्यावर उभं केलेलं घर, मग बाकी काही मालमत्ता) ते 'धग'मुळंच आहे', असं त्या म्हणाल्या. म्हणजे त्या-त्या वेळी उदरनिर्वाहासाठी शेळक्यांनी 'पॉप्युलर' रूचीला भावणारं लिखाण केलं असलं तरी त्यांना दीर्घकाळ टिकणारा आर्थिक आधारही 'धग'नं दिला, असं यावरून दिसतं.

तर, असे हे उद्धव शेळके ३ एप्रिल १९९२ रोजी वारले. म्हणजे आज त्यांचा पंचविसावा स्मृतिदिन आहे. शेळक्यांची मुख्य स्मृती वाचकांना 'धग'मुळं राहील बहुधा. त्यांचं उर्वरित बहुतांश लिखाण तात्कालिक निकडीतून झालेलं असेलही. पण त्यातलं काही ना काही मोजकं निवडक लिखाण 'धग'च्या जवळपास येणारं तरी असेल, असं वाटतं. म्हणजे 'धग'शिवायही इतर काही कथा, काही मोजक्या कादंबऱ्या अजूनही शेळक्यांची आठवण ठेवण्यासाठी आधाराच्या असतील असं वाटतं. यांचं प्रमाण त्यांच्या एकूण लेखनाच्या तुलनेत अर्थातच कमी असणार. पण जे काही निवडक असेल, ते पुन्हा बाजारात आलं तर बरं होईल. 'धग' आणि बहुधा 'बाईविना बुवा' या कादंबऱ्यांचं स्थान 'लेखनकले'च्या अंगानं मान्य होत असेल, असं वाटतं. बाकी, जगण्यासाठी शेळक्यांनी 'लेखनकामाठी'ही केली, हे कमी महत्त्वाचं आहे, असं आपल्याला वाटत नाही. आपण त्यांचं जे काही साहित्य वाचू त्यावर मत बनवण्याचा अधिकार वाचक म्हणून आपल्याला आहेच, त्यात लेखकाच्या चरित्राची- किंवा लेखकाचं स्वतःच्या साहित्याबद्दलचं म्हणणं काय आहे याची- काही गरज आपल्याला नाही. पण लेखकाच्या चरित्राबद्दल बोलताना मात्र केवळ आपली मतं त्यावर लादणंही बरोबर वाटत नाही. तसं तर लेखनकलेतही काही वेळा कामाठी गरजेची ठरते नि लेखनकामाठीतही काही ना काही कला तर असतंच असेल.

उद्धव शेळके
(८ ऑक्टोबर १९३० - ३ एप्रिल १९९२)

Friday 17 March 2017

शकु नी. कनयाळकर यांचा 'थोडाबहुत काफ्का'

'शकु नी. कनयाळकर' या पूर्ण नावातलं पहिलं नाव 'शकु' आहे, त्यामुळं हे सगळं नाव एखाद्या स्त्रीचं आहे, असं आपल्याला मानायला लागेल. आणि मग या नावाच्या व्यक्तीनं एखादं पुस्तक लिहिलं असेल, तर तिला 'लेखिका' असं संबोधून नोंद करावी लागेल. तर या लेखिकेनं 'थोडाबहुत काफ्का' असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात हे पुस्तक अचानक एका दुकानात समोर आलं. चुकून दुकानाच्या आवराआवरीत दुकानवाल्यांकडून ते बाहेर दिसणाऱ्या गठ्ठात राहून गेलेलं. नायतर तसं हे पुस्तक आता सारखं कुठं दिसण्यातलं राहिलं नाहीये. या पुस्तकाच्या लेखिकेच्या नावापुरताच विचित्रपणा संपत नाही, पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुस्तकाचं किंवा लेखिकेचं नाव दिलेलं नाही, हा विचित्रपणाचा आणखी एक भाग. अख्ख्या आवरणाचं छायाचित्र असं आहे:

नवी क्षितिजे प्रकाशन, १९९३

पुस्तकाच्या कण्यावर बहुतेकदा दिलं जातं त्याप्रमाणे पुस्तकाचं नाव, लेखिकेचं नाव आणि प्रकाशकाचं नाव मात्र लिहिलंय. बाकी मुखपृष्ठावर फक्त काफ्काचा चेहरा आणि मागच्या बाजूला हे जर्मन भाषेत लिहिलेले शब्द असल्याचं आपल्याला ताडता येतं. ते जर्मन शब्द म्हणजे 'अ हंगर आर्टिस्ट' या काफ्काच्या गोष्टीचं जर्मन नाव असेल, हेही प्राथमिक दिसण्यातून कळू शकतं.

'शकु. नी कनयाळकर' हे नाव मात्र मराठी वाटूनही खरंखुरं वाटत नाही. म्हणून त्यासंबंधी शोधाशोध केली. तर, 'ग्रंथालय-डॉट-ऑर्ग' या संकेतस्थळावरच्या यादीत हे पुस्तक होतं. वाईच्या लोकमान्य टिळक ग्रंथालयात याची प्रत असल्याचं या संकेतस्थळावरच्या नोंदीत लिहिलंय. शिवाय, 'ऐसी अक्षरे' या संकेतस्थळावरच्या एका चर्चेमधे 'धनुष' या आयडीनं या लेखिकेचा नि पुस्तकाचाही उल्लेख केल्याचं दिसलं. काफ्काच्या 'द ट्रायल' कादंबरीचं मराठी भाषांतर म्हणून 'थोडाबहुत काफ्का' या पुस्तकाचा सदर चर्चेत उल्लेख झालेला दिसतो.

काफ्काच्या 'द ट्रायल' या कादंबरीचं मराठी भाषांतर 'थोडाबहुत काफ्का' या पुस्तकाचा एक भाग म्हणून येतं. आणि आहे ते भाषांतरही पूर्णच्यापूर्ण नाहीये. काही ठिकाणी काही वाक्यं गाळलेली आहेत. रेघेकडं उपलब्ध असलेल्या 'ट्रायल'च्या इंग्रजी आवृत्तीसोबत (पेंग्वीन बुक्स, मॉडर्न क्लासिक्स मालिका, २०००) आपण हे मराठी भाषांतर ताडून पाहिलं. मराठी भाषांतरासोबत त्यात काही भाग गाळण्यात आल्याचा उल्लेख नसला, तरी अधेमधे बराच भाग या भाषांतरात गाळलेला आहे. थोड्या अंदाजासाठी उदाहरणादाखल खाली रोमन लिपीत इंग्रजी परिच्छेद आणि त्यासोबत मराठी भाषांतरातला मजकूर असं तुलनेसाठी दिलं आहे. इंग्रजीतली गाळली गेलेली वाक्यं अधोरेखित केली आहेत.

'के.' या पात्राला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नाश्ता खायच्याऐवजी निराळ्याच लोकांना सामोरं जावं लागतं. त्याच्या खोलीत आलेले हे वॉर्डर त्याला अटक झाल्याचं सांगतात, अशी सुरुवात. दारावर ठकठक झाल्यावर एक माणूस आत येतो. तो 'के.'च्या ओळखीचा नसतो. यासंबंधी इंग्रजी आवृत्तीतला मजकूर असा:
"Instantly there was a knock at the door and a man he had never before seen in the house came in. He was slim but solidly built, he wore a close-fitting black suit which was provided, in the manner of travelling outfits, with various pleats, pockets, buckles, buttons and a belt, and which consequently seemed eminently practical, though one could not be quite sure what its purpose was. 'Who are you? asked K'". 
या मजकुराचं मराठीत येताना असं झालं आहे:
"तत्क्षणी दरवाजावर ठकठक झालं आणि एक माणूस आत आला. त्याला के.नं यापूर्वी कधी पाहिलेलं नव्हतं. त्यानं काळा सूट घातला होता. झटकन बिछान्यावरून उठून बसत के.नं विचारलं, "कोण तू?"" (पान ११३)

नंतर, के.चा नाइटगाउन वगैरे हे वॉर्डर लोक तपासतात. आता त्याला दुसरे कपडे वापरावे लागतील, त्याचे मूळचे कपडे आपण ताब्यात घेऊ, मग खटला वगैरे जिंकला गेला तर हे सामान के.ला परत मिळेल, असं ही मंडळी के.ला सांगतात. या संदर्भातला मजकूर येताना इंग्रजीत एका वॉर्डराच्या पोटाचाही उल्लेख येतो:
"[...] the belly of the second warder- they could of course only be warders- bumped into him again and again in quite a friendly fashion, but when he looked up he saw that this fat body was out of keeping with the dry bony face, its prominent nose bent to one side, which was exchanging glances with the other warder over his head."  
हे वर्णन मराठी मजकुरात आलेलं नाही.

सकाळपासून आपल्यासोबत घडत असलेल्या घडामोडींचा अंदाज के.ला येत नसतो. मग त्याला वाटतं की, आज त्याचा तिसावा वाढदिवस म्हणून बँकेतल्या मित्रमंडळींनी आपली चेष्टा चालवली असावी. यासंबंधीचा इंग्रजीतला मजकूर असा:
"K. saw a very slight danger that people might say later he could not take a joke but, even though it had not been usual foe him to learn from experience, he now recalled certain incidents, not important in themselves, when, unlike his friends, he had deliberately set out to behave rashly without the slightest regard for possible consequences and had suffered as a result. This was not to happen again, not this time anyway; if this is just a bit of make-believe, he would go along with it." 
याला समांतर असलेला मराठी भाषांतरातला मजकूर असा:
"यात एक धोका के.ला जाणवला: त्याचे मित्र कदाचित म्हणतील की त्याला थट्टामस्करी कळतच नाही. अनुभवानं शिकण्याची सवय त्याला नव्हती. पण इतःपर ते घडू देता कामा नये. निदान या वेळी तरी." (पान ११४).

अशी अर्थातच आणखीही अनेक उदाहरणं पाहता येतील. यातल्या पहिल्या नि दुसऱ्या उदाहरणांमधे वर्णनं गाळली गेली आहेत. त्यासंबंधी आत्ता आपण काही नोंदवूया नको. पण यातला खासकरून पहिल्या उदाहरणातला तपशील कादंबरीच्या एका धाग्यासाठी महत्त्वाचा आहे, तो असा: "which consequently seemed eminently practical, though one could not be quite sure what its purpose was." प्रॅक्टिकल असेलही पण त्याचं पर्पज काय ते कळेना, हे काफ्काच्या गोष्टीसाठी आधाराचं सूत्र आहे. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणात आलेला 'if this is just a bit of make-believe, he would go along with it' हा उल्लेखही असाच कादंबरीचा महत्त्वाचा धागा आहे असं वाटलं. हे सोंग असेल तरी त्यात सहभागी व्हायचं के.नं ठरवलं, हे खास काफ्काच्या जगातलं म्हणणं आहे. असे काही महत्त्वाचे धागेच काढल्यानं मराठीत ही कादंबरी उसवलेली गेलेय, असं वाटलं.

'थोडाबहुत काफ्का' हे पुस्तक एकूण २५९ पानांचं (छायाचित्रांची वगैरे सोळाएक पानं वेगळी जास्तीची) आहे. 'नवी क्षितिजे प्रकाशना'नं १९९३ साली काढलेलं पुस्तक २०० रुपयांना आहे. साधारण तेवीस वर्षांपूर्वीच्या हिशेबानं पाहिलं तर पानांच्या तुलनेत किंमत जास्त वाटू शकेल. पुस्तकाचा साधारण नकाशा असा: दोन पानांवर पसरलेला एकोणिसाव्या शतकातल्या प्रागचा नकाशा, त्यानंतर दोन पानांवर पसरलेला काफ्काच्या वंशावळीचा तक्ता, त्यानंतर फ्रान्झ काफ्काची, त्याच्या घरच्यांची, त्याच्या इतर काही जवळच्या व्यक्तींची, आणि त्याच्या जवळच्या रस्त्यांची व ठिकाणांची छायाचित्रं- असा भाग पुस्तकाच्या सुरुवातीला आहे. त्यानंतर 'जडणघडणीची वर्षं' (पान १ ते ४२), 'निमित्तमात्र फेलिस' (पान ४३-१११) आणि 'द ट्रायल' (पान ११२-२३५) हे पुस्तकाचे तीन मुख्य भाग येतात.

हा मजकूर वाचनीय पद्धतीनं लिहिलेला आहे. काफ्काचं चरित्र, त्याचं फेलिससोबतचं नातं, आणि साहजिकपणे त्या नात्यातून नि काफ्काच्या मनस्थितीतून 'ट्रायल'चं लेखन झालं, इत्यादी तपशील एकमेकांना जोडून या पुस्तकात दिला आहे. कादंबरीचा मजकूर असलेला भाग झाल्यावर परिशिष्टं आहेत, ती अशी: एक- 'बिफोर द लॉ' : काही टिपणं, दोन- चरित्रपट, तीन- कथा-कादंबऱ्यांची मूळ जर्मन शीर्षकं, चार- प्रकाशित साहित्य.

यातलं 'बिफोर द लॉ: काही टिपणं' हे पहिलं परिशिष्ट विश्वास पाटील यांनी लिहिलेलं आहे. हे विश्वास पाटील म्हणजे 'नवी क्षितिजे' नावाचं त्रैमासिक चालवलेले, नित्शे, मार्क्स, फ्रॉइड इत्यादींवर पुस्तकं लिहिलेले. साधारण इतरांच्या लेखनातील उल्लेखांवरून कळतं त्यानुसार बरंच वाचलेले आणि बरीच पुस्तकं राखून असलेले हे गृहस्थ होते. त्यांची नित्शे व मार्क्स यांच्यावरची पुस्तकं रेघेला तितकीशी भावली नाहीत. त्यामधेही क्वचित काही निरीक्षणं व मतं रोचक होती, पण संदर्भांचा अभाव वाटला. त्यामुळं एखाद्या निरीक्षणाबद्दल, आशयाबद्दल शंका पडली, तर शोधायला काहीच मार्ग दिसत नाही. पण हा आपला विषय नाही, आणि आपण काही यात खोदकामही केलेलं नाही, त्यामुळं हे आपल्या मर्यादेवर सोडून पुढं जाऊ.

'थोडाबहुत काफ्का' हे लक्ष वेधून घेणारं पुस्तक वाटलं. चरित्राच्या भागात लिहिलेला मजकूर वाचनीय वाटला. काफ्काशी प्राथमिक ओळख करून देणारं हे पुस्तक आहे. 'द ट्रायल'च्या भाषांतराबद्दल काय वाटलं ते आधी लिहिलं आहेच. पुस्तकाच्या नावातंच 'थोडंबहुत' असणं नोंदवलेलं असल्यानं हे संक्षिप्त भाषांतर केलेलं असावं. पण तशी नोंद पुस्तकात स्पष्टपणे केलेली नाही. शिवाय, हे संक्षिप्त असलं तरी खूप जास्त संक्षिप्तही नाहीये, त्यामुळं पूर्णच भाषांतर असावं, असं वाटण्याची शक्यता वाढते. मधेमधे काही भाग कमी करण्यात आलेले आहे, त्यासंबंधीची तीन उदाहरणं आपण नोंदवली आहेत. बाकी, चरित्रातील लेखनासंबंधीचे संदर्भ दिलेले नाहीत, पण त्याचीही सूचना करणाऱ्या (तुकारामांच्या अभंगातल्या) ओळी पुस्तकाच्या सुरुवातीला नोंदवलेल्या आहेत:
फोडिलें भांडार धन्याचा हा माल।
मी तंव हमाल भारवाही।।

प्रत्येक मालाचा मूळ भांडारातील तपशील देणं शक्य नसलं, तरी साधारण कुठकुठली भांडारं धुंडाळली ते नोंदवलं तर बाकीच्या हमालांना काही आधार मिळतो, शिवाय आपल्या भारवाहीपणात काही कमी-जास्त राहिलं असेल तर ते पुढच्या हमालांना तपासता येतं, असं वाटलं.

याबाबतीत एक मुद्दा नोंदवायला हवा. केवळ व्यावसायिक हिशेबानं निघणारी काही पुस्तकं भाषांतराच्या वेळीच संक्षिप्त करण्यासंबंधीची सूचना प्रकाशकच भाषांतरकाराला करण्याची शक्यता असते, असं एक रेघेला लक्षात आलेलं आहे. काही वेळा ही मंडळी संक्षिप्तपणाचा उल्लेख करतात, काही वेळा करत नाहीत. काही वेळा संपादक व्यक्ती स्वतःच्या मनानुसार काही बदल करते, तेव्हा अशा काही उल्लेखांची जबाबदारी आपल्यावर असते हे संपादकीय भान ती व्यक्ती ठेवतही नाही. काही वेळा उल्लेख करणार असल्याचं आधी म्हणतात, नंतर तसा उल्लेख केलेला नसतो. इत्यादी अनेक मुद्दे बाजाराचे म्हणून असतात. हेही काही बरोबर नाहीच, पण 'थोडाबहुत काफ्का' हे तसं व्यावसायिक हेतूला प्राधान्य देणारं पुस्तक दिसत नाही. त्यामुळं खरंतर त्यातले उल्लेख अधिक मोकळेपणानं करणं जास्त शक्य असायला हवं, असं वाटतं.

दरम्यान, या शकु. नी कनयाळकर या बाईंचा म्हणजे हे टोपणनाव कोणी घेतलं याचा शोध घ्यावा, असंही वाटलं. आपण नोंदवलेल्या शंका त्यांना विचारता आल्या असत्या. म्हणून काही शोधाशोध नेटवर करू पाहिली. 'नवी क्षितिजे' व 'विश्वास पाटील' ही नावं शोध घेण्यासाठी सोईची होती. विश्वास पाटील वारल्यावर त्यांच्याबद्दल 'लोकसत्ता' या वर्तमानपत्रात आलेला एक लेख या शोधात सापडला. 'विश्वास पाटील: ज्येष्ठ अभ्यासक, अभिजात वाचक' अशा शीर्षकाचा हा लेख होता. हा लेख लिहिलेले हरिश्चंद्र थोरात यांच्याकडं यासंबंधी माहिती असेल, असं वाटलं. म्हणून मग त्यांचा ई-मेल पत्ता मिळवून त्यांना या 'थोडाबहुत काफ्का'बद्दल विचारणा केली. तर, यासंबंधीची माहिती प्रदीप कर्णिक यांना असू शकेल, असं त्यांनी सुचवलं आणि कर्णिक यांचा संपर्क दिला. कर्णिक यांना ई-मेलद्वारे विचारणा केली, तर जया दडकर यांनी हे पुस्तक लिहिल्याचं कर्णिक म्हणाले. दडकरांची काही पुस्तकं मौज प्रकाशनानं काढलेली आहेत, त्यामुळं त्यांच्या ऑफिसात फोन केला, एक वाचक असल्याचं सांगितलं, आणि दडकरांचा नंबर मागितला. नंबर मिळाला. दडकर यांच्या एका कामाचा उपयोग आपण 'श्री. दा. पानवलकर' यांच्यासंबंधीच्या कात्रणवहीसाठी मोठ्या प्रमाणात केला होता. पण तेव्हा परवानगीसाठी त्या भांडाराच्या प्रकाशकांची फोनवरून परवानगी घेतली होती. तेव्हा दडकरांचा संपर्क मिळाला नव्हता. तो वेगळा विषय झाला. आता  रेघेनं दडकर यांना फोन करून 'थोडाबहुत काफ्का'संबंधी विचारलं. तर हे पुस्तक आपणच 'शकु. नी कनयाळकर' या टोपणनावानं लिहिल्याचं दडकरांनीही सांगितलं. पुस्तकात 'द ट्रायल' कादंबरीचं संक्षिप्त भाषांतर देण्याबद्दल त्यांना विचारलं तर ते म्हणाले, 'ते प्रचंड मोठं होत होतं. आधीच मराठीत वाचक कमी.. त्यात असलेले कमी वाचतात'. विविध कारणांमुळं फोनवर याहून जास्त बोलणं होऊ शकलं नाही. 'शकु नी. कनयाळकर' या नावाचे संदर्भ काय, हेही आपण विचारलं. पण सहजच हे टोपणनाव घेतलं, एवढंच दडकर म्हणाले. या शोधामधे संबंधित व्यक्तींनी रेघेशी परिचय नसतानाही मदत केल्याबद्दल आभार. हे गेल्या वर्षी जूनमधे घडलं होतं, पण विविध कारणांमुळं नोंद थोडी उशिरा होते आहे.

शेवटी दोनच मुद्दे: एक, या पुस्तकाची नवीन आवृत्ती कोणाला काढावी वाटली, तर चांगलं होईल. फक्त त्यात सुरुवातीला 'द ट्रायल'चं भाषांतर संक्षिप्त स्वरूपात असल्याचं नोंदवता येईल. योग्य वाटलं तर. दोन, 'निवडक काफ्का' असं एक लहानसं पुस्तक (संपादन-अनुवाद- नीती बडवे) साहित्य अकादमीनं काढलेलं आहे. त्यात काफ्काचे काही वेचे, गोष्टी, 'वडिलांना पत्र' इत्यादी मजकूर आणि त्याची काही चरित्रात्मक माहिती आहे. शिवाय, त्र्यं.वि. सरदेशमुखांनी 'काफ्काशी संवाद' (पद्मगंधा प्रकाशन) असं गुस्ताव यानुशच्या बारक्याशा पुस्तकाचं भाषांतर केलं आहे. शिवाय, काफ्काच्या कादंबऱ्यांची किंवा त्यावर आधारीत नाट्यरूपांतरंही असल्याचं दिसतं. पण 'थोडाबहुत काफ्का'इतकं तपशिलातलं काफ्काविषयीचं पुस्तक मराठीत बहुधा नाहीये. असेल तर रेघेच्या मर्यादित माहितीमधे ते दिसलेलं नाही.

Monday 6 March 2017

लालसू नोगोटी यांची मुलाखत

अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्हापरिषदेत सदस्य म्हणून निवडून गेलेल्यांमध्ये सैनू गोटा व लालसू नोगोटी या खास उमेदवारांचाही समावेश आहे. यांचं वैशिष्ट्य काय, तर हे थेट ग्रामसभांनीच उभे केलेले उमेदवार होते. म्हणजे त्यांना कोणत्याही पक्षानं उमेदवारी दिलेली नव्हती, किंवा तसे ते सुटे अपक्ष उमेदवार म्हणूनही उभे नव्हते. ते ग्रामसभांचे प्रतिनिधी म्हणून (अपक्ष) निवडणूक लढत होते. यातील नोगोटी यांचा आरेवाडा-नेलगुंडा मतदारसंघातून विजय झाला, तर गोटा यांनी गट्टा-पुरसलगोंदी या मतदारसंघातून विजय मिळवला. राष्ट्र-राज्य अशा विविध पातळ्यांवर चाललेल्या घडामोडी व चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही घटना लक्षणीय आहे. खासकरून गडचिरोलीतल्या प्रस्तावित खाणप्रकल्पांना होणाऱ्या विरोधातून ग्रामसभांनी उमेदवार उभे करण्यासाठी पुढाकार घेतलेला असला, तरी या सर्व घटनांमागं आणखीही काही अर्थ असतातच. या पार्श्वभूमीवर लालसू नोगोटी यांच्याशी रेघेनं फोनवरून संवाद साधला. (प्रभू राजगडकर यांनी संपर्कासाठी मदत केली). चार मार्च २०१७ रोजी नोगोटी यांची रेघेनं फोनवरून घेतलेली मुलाखत पुढं दिली आहे. यात अर्थातच आणखी विविध प्रश्न व उत्तरं यायला हवीत, अनेक मुद्द्यांवर आणखी चर्चा व्हायला हवी. स्थानिकांचं आणखी म्हणणं मोठ्या प्रमाणात नोंदवलं जायला हवं. सध्या, प्राथमिक पार्श्वभूमीसाठी ‘गडचिरोली वार्ता’ या संकेतस्थळावरचा ‘मूठभर तांदूळ आणि २० रुपये मागून ‘ते’ जिंकले जिल्हापरिषदेची निवडणूक!’ हा वार्तालेख वाचता येईल. आपण यापूर्वी आपल्या मर्यादेमधे प्रत्यक्ष दिसलेल्या गोष्टींच्या काही नोंदी रेघेवर केलेल्या आहेत, त्यातली 'भारतीय प्रजासत्ताकाची बस व ‘पेसा’' (२६ जानेवारी २०१६) ही नोंद या संदर्भात सवडीनुसार वाचता येईल. आणि ९ ऑगस्ट २०१५ रोजी केलेली 'आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस । एक प्रसिद्धी-पत्रक' ही नोंदही चाळता येईल. याशिवायही काही आसपासच्या नोंदी आहेत, त्या सगळ्या नोंदींच्या पार्श्वभूमीवर आता नोगोटी यांची मुलाखत नोंदवूया. 
 *
लालसू नोगोटी
लालसू नोगोटी यांनी दहावीपर्यंत हेमलकशामधील लोकबिरादरी प्रकल्पाच्या शाळेत शिक्षण घेतलं, त्यानंतर बारावीपर्यंत वरोऱ्यातील आनंदवन इथं ते शिकले. नंतर, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी मराठी विषयामधे बी.ए. केलं. पुढं आय.एल.एस. लॉ कॉलेजात कायद्याची पदवी घेतली. दरम्यान, टिळक महाराष्ट्र विद्यापिठातून पत्रकारितेचं पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षणही घेतलं. शिवाय, त्यांनी समाजशास्त्रातही एम.ए. केलेलं आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठानं फिलिपाइन्स इथं २०११ साली घेतलेला मानवाधिकारासंबंधीचा एक आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम त्यांनी केलेला आहे. आणि अलीकडेच संयुक्त राष्ट्रांतर्फे आदिवासी तरुणांकरिता दिल्या जाणाऱ्या अभ्यासवृत्तीसाठी त्यांची निवड झाली असून जून-जुलै २०१७मध्ये ते यासाठी जीनिव्हालाही जाणार आहेत. छत्तीस वर्षांचे नोगोटी भामरागडमधील जुव्वी या त्यांच्या मूळ गावी राहतात.
 *
प्रश्न: ‘लोकशाही’ या शब्दाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
नोगोटी: लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या वतीनं वगैरे व्याख्या लोकशाहीसाठी दिल्या जातात. सर्व मोठमोठे पक्ष, त्यांचे उमेदवार हे सतत लोकांसोबत नसतात. लोकांच्या समस्या त्यांच्यासोबत समजून घेण्याचं काम हे नेते करत नाहीत. हे नेते काय निर्णय घेतात, काय काम करतात, हे लोकांना माहिती नसतं, प्रत्यक्ष त्याचं काम लोकांना माहीत नसतं. पण आपला प्रतिनिधी- ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतचा प्रतिनिधी- काय काम करतोय, हे माहीत असलं पाहिजे. नाहीतर नेते तिकडे काहीतरी निर्णय घेतात, आमच्याविरोधातले कायदेही करतात, पण ते इथल्या लोकांना माहिती देऊन केलेलं नसतं. मोठ्या पक्षांचे उमेदवार हे लोकांचे प्रतिनिधी असण्यापेक्षा पक्षांचेच प्रतिनिधी उरतात. निवडून आल्यावरही नेत्यांवर लोकांचं नियंत्रण असायला हवं. आमच्यावर आता ग्रामसभांचं असं नियंत्रण असेल. ग्रामसभांसोबतच्या संवादातूनच आम्ही निर्णय घेऊ.

प्रश्न: ‘विकास’ या शब्दाविषयी तुम्हाला काय वाटतं?
नोगोटी: विकास म्हणजे रस्ते आले पाहिजेत, घरात टीव्ही आला पाहिजे, असं नाही. मी माडिया आहे, माडियात मला व्यवस्थित बोलता येतं, मी तुमच्याशी बोलतोय ही माझ्यासाठी फॉरेन लँग्वेज आहे. माझे विचार मी माडिया भाषेत व्यवस्थित सांगून शकेन, तरीही मी भामरागडच्या चौकात मराठीत बोललो, तर मी विकसित झालो असं लोक म्हणतील. इंग्रजीत बोललो तर विकसित झालं असं बोलतील. म्हणजे माडिया विसरलो की विकास झाला, असं लोक म्हणतील. पण विकास म्हणजे काय? विकास म्हणजे आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक संसाधनांमधून समृद्धता आली पाहिजे. संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टींमधून ही समृद्धता आली पाहिजे. प्रॉपर्टी म्हणजे पैसा, अशी आमची संकल्पना नाही. घरासमोर दोन ताडीचे झाड पाहिजे, बैल-बकरी पाहिजे, अशी इथल्या लोकांची प्रॉपर्टीची संकल्पना आहे. रस्ता आली की माणूस विकसित होतो असं नाहीये. विकासाची संकल्पना त्याही पुढं जाऊन पाहिली पाहिजे. विचाराचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. स्वतःचं मत काय, आत्ताची आपली गरज काय, हे सगळं व्यक्त करता आलं पाहिजे. आमच्या इथं ‘गोटूल’ (विविध सामूहिक चर्चा-कार्यक्रमांसाठी नेमलेली एक खुली जागा) असतं, तर सरकार काय करतं, विकासाच्या नावाखाली या गोटुलला चार भिंती न् स्लॅब टाकून बंदीस्त करून टाकतं, खुर्चीत बसून बोला, वगैरे सांगतात. पण गोटूल हे एक ‘डेमोक्रॅटिक कम्युनिकेशन सेंटर’ आहे असं मी म्हणतो. तिथं अनौपचारिकपणे लोक बोलतात. ही अनौपचारिकता घालवण्याला विकास म्हणता येणार नाही.

प्रश्न: ‘संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टींमधून समृद्धता आली पाहिजे’, असं तुम्ही म्हणालात. बाहेरची संस्कृती व आपली संस्कृती यांच्यातला संघर्ष आणि उतरंड, हा मुद्दा आपण बोललो. अशा वेळी आपल्याच संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टींसोबत येणाऱ्या वाईट वाटणाऱ्या गोष्टींशी कशा प्रकारे वाटाघाटी कराव्यात, असं तुम्हाला वाटतं?
नोगोटी: काही उदाहरणं सांगतो. आमच्याकडं हुंडापद्धती नाही. मुलगी जन्मली की तिच्यामुळं आपले संबंध वाढतात, अशा विचारानं लोक आनंदी होतात. पण त्याच वेळी मासिक पाळीच्या वेळी बायकांनी घराबाहेर निराळ्या जागेत राहायची पद्धत आमच्याकडे आहे. यातून काही समस्या निर्माण होतात. दोनच दिवसांपूर्वी झालेली एक घटना सांगतो. नेलगुंडा गावातल्या शाळेमधे एक शिक्षिका मासिक पाळीच्या वेळीही शाळेत येते, यावर काही गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. ही बाई मासिक पाळीच्या वेळीही शाळेत येत असल्यानं गावात रोगराई पसरते, असं काही लोक बोलत होते. दरम्यान, निवडणुकीतला आमचा विजय लोक स्वतःहून साजरा करत होते, पक्षांचे उमेदवार निवडून आल्यावर पैसे खर्च करून, फटाके फोडून उत्सव केला जातो. इथं आमच्या विजयावर लोक स्वतःहून गावागावांमधून आनंद व्यक्त करत होते, ढोल वाजवत होते, गोटूलमधे नाचत होते. अशा वातावरणात मी नेलगुंडामधे गेलो तेव्हा तिथल्या लोकांशी शाळेतल्या शिक्षिकेच्या मुद्द्यावर बोललो. त्यावर गावातल्या पुजारी व्यक्तीनं यासंबंधी तक्रार केल्याचं या लोकांनी सांगितलं. पण आता यासंबंधी आपल्याला आडमुठं राहून चालणार नाही, मासिकपाळीसाठी सुट्टीची तरतूद नसते, त्यामुळं त्या शिक्षिकेला शाळेत यावंच लागेल, तिला येऊ द्यायला हवं, असं मी त्यांना समजावलं. त्यांनाही ते पटलं. अशा पद्धतीनं हा मुद्दा सुटला. असे इतरही अनेक लहान-मोठे मुद्दे आदिवासी समाजांतर्गत सोडवले जायला हवेत. यावरही आम्ही विचार करतो आहोतच. बदलत्या युगामधे काही गोष्टी बदलायला हव्यातच. फक्त सगळं कोलॅप्स न करता काय करता येईल, असा विचार मी करत असतो.

प्रश्न: सीजी-नेट-स्वरा या मोबाइल रेडियोचा प्रयोग करणाऱ्या संकेतस्थळाशी तुम्ही जोडलेले होतात, त्या संदर्भाला धरून एकूण प्रसारमाध्यमांच्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं?
नोगोटी: लॉ करत असताना मी पत्रकारितेचा डिप्लोमा, नंतर बीजे (बॅचलर ऑफ जर्नलिझम), एमजे (मास्टर ऑफ जर्नलिझम) हेही अभ्यासक्रम केले. त्यामागं माझे हेतू हेच होते. आदिवासी किंवा एकूणच ग्रामीण समाज हा शहरी समाजापेक्षा संख्येनं मोठा आहे. पण गावातल्या लोकांबद्दल खूप कमी लिहिलं जातं. अजिबात नाही असं नाही. पण खूपच कमी माहिती दिली जाते. त्यातही आदिवासी भाषा, संस्कृती याबद्दल शहरी अँगलनी लिहिलेलं असतं. ज्या व्यक्तीची समस्या आहे, प्रश्न आहेत, ती व्यक्ती स्वतः कधीच बोलताना दिसत नाही, ती व्यक्ती लिहीत नाही, ती बोलतच नाही. टीव्ही वगैरेमुळं पीडीत व्यक्तीचं म्हणणं थोडंथोडं येतं. पण भामरागडबद्दल किंवा जुव्वीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल लिहिणारा गडचिरोलीत किंवा दुसऱ्या शहरात बसलेला असतो. त्याला स्थानिक माहिती नसते. नक्षलवादींनी इतक्यांना मारलं आणि पोलिसांनी इतक्यांना मारलं, एवढेच आकडे तो पत्रकार लिहितो. पण या पाठीमागं खूप अर्थ असतात. ते कधीच बोलले जात नाहीत.

प्रश्न: हे हिंसेच्या आकडेवारीमागचे अर्थ काय असतात, असं तुम्हाला वाटतं?
नोगोटी: पोलीस लोक काय करतात, नक्षलवाद्यांना जेवण देता म्हणून बेकायदेशीर अटक करतात, मारतात, अत्याचार करतात. खाणप्रकल्पांना विरोध केला तरी नक्षलसमर्थक म्हणून शिक्का मारतात. इथली परिस्थिती वेगळी असते. बाहेरून येणारे तरुण पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) किंवा दुसरे अधिकारी यांना आदिवासी संस्कृतीची, इथल्या गरजांची माहिती नसते. आम्ही पंडुमसाठी (एक प्रकारचा उत्सव) जंगलात जेवण बनवत असलो, तरी नक्षलवाद्यांसाठी जेवण बनवत असल्याचा आरोप करून ते ताब्यात घेतात. शिवाय, इथं परिस्थिती वेगळी असते. इथं राहणाऱ्या व्यक्तीसमोर काही पर्याय नसतो. इकडंही बंदूक आहे आणि तिकडंही बंदूक असते.

प्रश्न: आता जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार आहात?
नोगोटी: पेसा कायदा, वनाधिकार कायदा यातून ग्रामसभांना त्यांच्या नैसर्गिक संसाधनांवरचा मालकीहक्क दिलेला आहे. हा संपूर्ण एरिया- भामरागड, एटापल्ली, कोरची, धानोरा, हा बराचसा अनटच्ड आहे. इथं खनिजं आहेत, जंगल आहे. लोकांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. जंगलाशिवाय हा समाज जिवंत राहू शकणार नाही. यांची संपूर्ण संस्कृती निसर्गपूजक आहे. दगड, नदी, नाले, अशा अनेक गोष्टी, जिथं पाणी आहे, अशा गोष्टींना हे लोक पूजतात. या स्त्रोतांमधून आपण जिवंत आहोत. यामुळंच आपण जिवंत आहोत. त्यामुळं हे त्यांना पूजतात. अशा परिस्थितीत सरकार विकासाच्या नावाखाली जंगल, पहाडी इथं खाणप्रकल्प मंजूर करतं. पंचवीसहून जास्त प्रकल्प या ठिकाणी प्रस्तावित आहेत. ग्रामसभांच्या माध्यमातून लोक याला विरोध करत आहेत. आता न्यायालयात याचिका टाकण्याचाही आमचा विचार आहे. या शिवाय, इथल्या शाळांमधले शिक्षक चाळीस हजार रुपये पगार घेतात पण शाळेत येत नाहीत. आरोग्यसेवेचाही प्रश्न आहे. याचसोबत धानाची विक्री ग्रामसभांच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. या प्रश्नांबद्दल आम्ही जिल्हापरिषदेच्या सभागृहात आवाज उठवू.
 *

लालसू नोगोटी
(दोन्ही फोटो पुरवल्याबद्दल नोगोटी यांचे आभार. पहिला फोटो रेघेवर सोईसाठी थोडा कापला आहे).