Wednesday 3 October 2018

पाणी अश्लील?

‘पाणी कसं अस्तं’ ही दिनकर मनवर यांची कविता मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली होती. पण त्यात आदिवासी स्त्रीविषयी अश्लील ओळ असल्याचा आरोप काही संघटनांनी व आता राजकीय पक्षांनीही केला, ही कविता अभ्यासक्रमातून काढून टाकण्याच्या आक्रमक मागण्या झाल्या. आता ती कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेय. इथवर हे सगळं थांबलेलं नाही. कवीच्या नावानं वैयक्तिक शिवीगाळ चालू आहे, त्याच्या विरोधात आणि मुंबई विद्यापीठाविरोधातही ‘अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमा’खाली (अॅट्रॉसिटी कायदा) तक्रार दाखल करायची मागणी काही संघटनांनी केली आहे. कठोर किंवा अगदी कटू टीका समजून घेता आली असती. कविता कशी आहे, बरी आहे का वाईट आहे, तिच्या आशयातून कोणकोणते अर्थ निघू शकतात, त्यात काही आक्षेप वाटतो का किंवा वरपांगी वाटतंय त्याहून वेगळा काही अर्थ त्यात आहे का, हे सगळंच बोलता येऊ शकतं. या सगळ्यावर लिहिता येऊ शकतं. पण कविता लिहिलेल्या व्यक्तीवर इतक्या आक्रमकतेनं तुटून पडणं खेदजनक आहे. कवितेचे काही सुटे 'स्क्रिनशॉट' समाजमाध्यमांवरून फिरत आहेत. आपण रेघेवरची मागची नोंदही एका कवितेच्या संदर्भात केली होती. ती कविता सर्वोच्च न्यायालयालाही अश्लील वाटली होती! आणि आता पुन्हा हा कवितेवरून गदारोळ. तर या गदारोळापेक्षा ही पूर्ण कविता वाचणंच अधिक योग्य होईल, असं वाटलं, त्यामुळं ही कविता खाली नोंदवली आहे. 

पाणी कसं अस्तं

पाणी हा शब्द
मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीये
मी ऐकू शकत नाही पाण्याचा आवाज
की चालून जाऊ शकत नाही पाण्याच्या पायरीवरून

पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार
किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या
रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर
पाणी कसं अस्तं स्वच्छ पातळ की निर्मळ?

काळं असावं पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून?
(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)

जे तुंबवून ठेवलेलं अस्तं तळ्यात ते पाणी अस्तं?
पोहऱ्यानं पाणी उपसून घेतलं तर विहिरीतलं पाणी विटतं?
पाणी धारदार वाहतं झुळझुळतं मंजुळ गाणं गातं ते पाणी अस्तं?
गढूळ, सडकं, दूषित, शेवाळलेलं, गटारीतलं, मोरीलं
या पाण्यावरचे निर्बंध अजूनही उठिले गेले नाहीत काय?
पाणी ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं?
नि दंगली घडवतं ते पाणी नस्तं?

पाणी पावसातून गळतं जमिनीवर
बर्फ वितळल्यावर पसरतं पठारांवर
नदीला पूर आल्यावर वेढून घेतं गावं
धरण फुटल्यावर पांगापांग करतं माण्सांची
ते पण पाणी पाणीच अस्तं?

पाणी स्पृश्य अस्तं की अस्पृश्य?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रह्म?
पाणी ब्राह्मण अस्तं की क्षत्रिय की वैश्य
पाणी शूद्र अस्तं की अतिशूद्र
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात?

आणि पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं
की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं काय बाटतं?
पाणी नदीतलं, नाल्यातलं, ओढ्यातलं, विहिरीतलं
पाणी तळ्यातलं, धरणातलं, सरोवरातलं, समुद्रातलं
पाणी ढगातलं, माठातलं, पेल्यातलं, डोळ्यातलं
हे पाणी कुणाच्या मालकीचं अस्तं?

पाणी नारळात येतं
छातीच्या बरगड्यात साचतं
फुफ्फुसातून पू होऊन स्रवतं
पोटात पाण्याचा गोळा होऊन राहतं
ईश्वराचा कोणता देवदूत हे पाणी न चुकता सोडत अस्तो?

पाणी पारा अस्तं की कापूर?
जे चिमटीत पकडता येत नाही
नि घरंगळून जात राहतं सारखं
किंवा कापरासारखं जळून जातं झर्कssन

पाणी हा शब्द फक्त एकदाच मला उच्चारू द्या
निव्वळ पाण्यासारखाच

(दिनकर मनवर, 'दृश्य नसलेल्या दृश्यात', पॉप्युलर प्रकाशन- पान १४ व १५)

'पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार/ किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या/ रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर' या ओळी आदिवासी समूहांच्याविषयी काय सांगतायंत? 'आणि पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं/ की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं काय बाटतं?' या ओळीही याच कवितेत आहेत, तरीही त्यावर जातीयवादाचा आरोप करायचा? या ठिकाणी इतर जाती-जमातीमधल्या स्त्रीच्या अवयवांचा उल्लेख करून पाहा, मग कसं वाटतं, अशीही विचारणा समाजमाध्यमांवर होताना दिसते. पण खरं तर निरनिराळ्या संदर्भात विविध स्तरांमधील स्त्री-पुरुषांच्या अवयवांचे उल्लेख कथा-कादंबऱ्या-कवितांमध्ये सापडतातच. त्याचा संदर्भ न तपासता एक ओळ वेगळी काढणं धोकादायक वाटतं. शिवाय, लगेच कविता लिहिणाऱ्यावर हेत्वारोपही करणं गैर वाटतं. आधीच्या ओळींमध्ये आलेला 'छाटलेल्या अंगठ्या'चा उल्लेख आदिवासी समुदायाविषयी काहीतरी मत नोंदवू पाहातोय, त्याला धरूनच पुढची स्तनांची ओळही आदिवासी समुदायाविषयी काहीतरी म्हणू पाहतेय. त्यावर चर्चा करता येईल, कोणाला त्यात त्रुटी वाटल्या तर तेही मांडावं, पण यात अश्लीलता दिसत नाही.

*
पॉप्युलर प्रकाशन
*
टीप: 'पाणी निळेभोर । काळे । सावळे' या तुळसी परब यांच्या कवितेत पाण्याची उपमा कदाचित अधिक व्यामिश्रतेनं वाचायला मिळते. तीही या निमित्तानं समांतरपणे वाचता येईल.

Wednesday 1 August 2018

आकारानं मोठं होण्याची स्पर्धा

लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या जाहिरातींविषयीचं हे एक न प्रसिद्ध झालेलं वाचक-पत्र आहे. ते आपण सहज त्यांना पाठवलं होतं. पण ते प्रसिद्ध न होण्यात संपादकीय दोष आहे, असं बहुधा म्हणता येणार नाही. जाहिरात विभागाकडे त्यांनी हे पत्र पाठवलं असेल की नाही, माहीत नाही. पण जाहिरात विभागाच्या कामाविषयीचं असं पत्र नेहमीच्या वाचकपत्रांमधे (लोकमानस) जाणं तसंही कदाचित औपचारिकतेला धरून राहिलं नसतं. किंवा चौकट थोडी अधिक खुली ठेवून तसं करता येईल. पण तो आपला प्रश्न नाही. आपण असंच त्यांच्यापर्यंत पोचवलं. आता ते इथं नोंदवून ठेवू.

अधिक कल्पक जाहिराती आवश्यक

'जाणत्या जनांसाठी' या सूत्राला धरून आपल्या वर्तमानपत्राच्या जाहिराती गेल्या काही काळापासून दिसत आहेत. यामध्ये एखाद्या सार्वजनिक ठिकाणाचं छायाचित्र असतं आणि लोकसत्ता वाचणारी व्यक्ती- म्हणजे प्रत्यक्ष अंक हातात धरून वाचणारी व्यक्ती उर्वरित जगापेक्षा- म्हणजे आजूबाजूची माणसं, गाड्या, इमारती, झाडं या सर्वांच्या तुलनेत दहा-पंधरा पटींनी मोठी दाखवलेली असते, शारीरिकदृष्ट्या महाकाय झालेली असते. सर्वच जाहिरातींमध्ये उच्च-मध्यमवर्गीय वा त्या वरच्या गटातील (कॉर्पोरेट, उच्चशिक्षण, आदी क्षेत्रांत रोजगार करणारी) शहरी व्यक्तीच हा अंक घेऊन दिसतात. 'दृष्टिकोनच देतो व्यक्तिमत्वाला आकार' ही ओळही या जाहिरातींसोबत दिलेली असते, यातून अनेक अर्थांची वलयं तयार होतात. आपल्याला केवळ एका विशिष्ट गटातीलच वाचक अपेक्षित आहे, हा वाचक उर्वरित 'सर्वसामान्यां'पेक्षा वरचढ आहे, या सगळ्याच जगापासून आपला वाचक उंच जातो, असे काही अर्थ यातून दिसतात. सध्याच्या बाजारपेठ वजा जगामध्ये सगळेच आपल्या उत्पादनाची विक्री वाढावी यासाठी विविध खटपटी करतात, हे खरं असलं; तरी हे प्रयत्न इतके बटबटीत असावेत का? 'दृष्टिकोन व्यक्तिमत्वाला आकार' देतो म्हणून प्रत्यक्ष ती व्यक्ती महाकाय दाखवणं, म्हणजे उंच-उंच पुतळे बांधून समाज उंच होतो, असं मानण्यासारखं आहे. उंचीचा एवढा सोस कशाला? दृष्टिकोन ही गोष्ट सखोल जायला मदत करणारी असते ना? महाकाय उंच होऊन उर्वरित जगापासून तुटणारा दृष्टिकोन योग्य होईल का? शिवाय, आपला मुख्य वाचकवर्ग महानगरी असेलही कदाचित (या जाहिराती ते खूप जास्त अधोरेखित करू पाहातात), पण ‘लोकमानस’मधील पत्रांचा अदमास घेतला, तर उर्वरित निमशहरी-ग्रामीण भागांमध्येही वाचक असेल, असू शकतो, हे लक्षात येतं. मग त्यांची काही आठवण जाहिरातींमधून ठेवणं बरं राहील की नाही? सध्या ज्या स्वरूपाच्या या जाहिराती आहेत त्यातून अभिजनशाहीचं सूचन होतं. पण आपण 'लोक'सत्ता आहात, तर त्या छायाचित्रात उर्वरित लोक आहेत याची जाणीव ठेवून अधिक कल्पक जाहिराती शक्य नाहीत का?

लोकसत्ता, ५ जानेवारी २०१८
 ०००

या पत्राच्या विषयाशी जवळीक साधणाऱ्या काही नोंदी यापूर्वीही रेघेवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यातल्या दोन निवडक नोंदी अशा:

Tuesday 31 July 2018

परत

गेल्या वर्षभरात इथं काहीच लिहिलं गेलेलं नाही. कारणं अनेक आहेत. सगळी नमूद करणं अशक्य. बहुधा तशी गरजही नाही. खासकरून माध्यमव्यवहाराविषयीच्या असमाधानातून या ब्लॉगची सुरुवात झाली. त्यात साहित्याविषयीचा रसही आपोआप मिसळून गेला होता. सुरुवातीपासूनच. हे सगळं पहिल्या नोंदीपासून इथं असं आहे. त्यात मग काही समकालीन घडामोडींचा मागोवा घेतला गेला. यातही बरेचदा वैयक्तिक रस/कल यांचाच संदर्भ होता. या घडामोडी कशा निवडल्या गेल्या, त्यांचा कितपत मागोवा ठेवला गेला, हा वेगळा विषय. साहित्याबाबत काही मंडळींविषयी दस्तावेजीकरण या सगळ्या काळात झालं. ते या पानावर कोपऱ्यात कायम दिसेल असं नोंदवलं आहे. हे साधारण २००९ पासून पुढच्या दोन-चार वर्षांमधलं काम आहे. त्या कामाविषयीचा सदर लेखकाचा दृष्टिकोनही बदलत गेला. पण काम झालं.

माध्यमव्यवहाराविषयी इथं जे काही लिहिलं गेलं ते काहींना बरं वाटलं, काहींना पटलं नाही. काहींनी चांगली मतं दिली, कुणी निबंध लिहून परिषदेत सादर करायला सांगितलं, कुणी इथल्या एखाद्-दुसऱ्या नोंदीला छापील माध्यमात पुन्हा प्रकाशित करण्याची विचारणा केली, कुणी शिव्याही घातल्या. तरी, एकूण मिळून माध्यमव्यवहाराचा थोडासा अदमास बांधण्याच्या दृष्टीनं काही नोंदी बऱ्या असाव्यात. यात थोडी पुनरुक्तीही झालेली जाणवतेय. ती काहीशी अपरिहार्य असेल, तरी धोकादायक पातळी ओलांडणारी नको, असंही वाटतं.

ब्लॉग लिहून वेळ का घालवायचा, हे इथं लिहिण्यापेक्षा फेसबुकवर टाकायचं ना, ब्लॉगचं फेसबुक खातं उघडून तिथं हे टाकलं तर जास्त लोकांपर्यंत पोचेल- अशा काही सूचना या सगळ्या काळात बहुतेकदा चांगल्या हेतूनं केल्या गेल्या. त्यावर पुरेसं स्पष्टीकरण असं देता येणार नाही. पण तरी काही नोंदवणं आवश्यक वाटतं.

ब्लॉगचे वाचक तुलनेनं कमी राहातात हे खरं. पण काही काळासाठी सुरू असलेल्या रेघेच्या फेसबुक खात्यालाही तसा प्रचंड प्रतिसाद होता, अशातला भाग नाही. रेघेवरच्या नोंदींची लिंक तेवढी तिथं टाकली जात होती, पण तरीही मित्रयादीतल्या अनेक जणांना ते माहिती व्हायचं नाही, असं त्यांच्या प्रतिक्रियेवरून कळतं. तरीही, काही जणांना तिथून या नोंदींची माहिती मिळतही असणारच. ते त्यांना अधिक सोयीचंही ठरलं असणारच. पण आता ते फेसबुक खातं नाही. इच्छुक वाचक स्वतंत्रपणे या ब्लॉगला अधूनमधून भेट देत असावेत, असं दिसतं. तर तसं आपापल्या इच्छेनुसार कुणी इथं यावं, वाटलं तर वाचावं- ही वाटही बरी आहे. कुणाला सोयीचं वाटलं, तर त्यांच्या इच्छेनुसार इथल्या नोंदी  मेलवर मिळाव्यात, अशी नोंदणीची तजवीजही समासात करून ठेवलेली आहे.

फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचं स्वरूप ब्लॉगपेक्षा वेगळं आहे. देवाणघेवाण/शेअरिंग हा शब्द सोपा वाटला, तरी त्याच्या पातळ्या बहुधा अगणित असतील. शिवाय आपलं अख्खं प्रोफाइल किंवा प्रोफाइल नावाची एक काल्पनिक गोष्ट रचणं, त्यात काही ढोबळ रंग भरणं किंवा त्या रंगांनुसार अभिव्यक्ती करणं, वैयक्तिक अनुभवाची एखादीच बाजू रंगवून सांगणं, एखाद्या विषयात आधी काही म्हटलं गेलंय याची जाणीवही न ठेवता ठामपणे मतं मांडणं, किंवा मतांची वा अभिव्यक्तीची स्पर्धा साधणं, लक्ष वेधून घेण्यासाठी विविध क्लृप्त्या साधणं, अवाजवी स्तुती- हे वेगळं काम असावं. फेसबुकसारख्या ठिकाणी फक्त हेच होतं असं अर्थातच नाही. (किंवा ब्लॉगांच्या अवकाशात असं होतच नाही, असंही नाही). तिथंही अनेक रंग असतातच. पण शेवटी अनेक प्रकारच्या गोष्टींची आणि माणसांची गर्दी अशा समाजमाध्यमांवर आपल्याला जाणवते. (कोणाला जाणवत नसेल, तर त्यांनी याकडं दुर्लक्ष करावं.) ब्लॉगची चौकट त्या तुलनेत थोडीफार स्वतंत्रपणे हाताळता येते. तत्काळ प्रतिसादाची अनाठायी सक्ती राहात नाही. वाचक असू नयेत, असा याचा अर्थ नव्हे. पण वाचक आपापल्या इच्छेनुसार इथंही येऊ शकतात. इच्छा नसेल तर न येण्याचं स्वातंत्र्य त्यांनाही राहातं.

किंवा त्याहून महत्त्वाचं म्हणजे- तांत्रिक पातळीवरती ब्लॉगवरची काही साधनं लेखनाला अधिक सोयीची आहेत. फॉन्ट, फोटोंची मांडणी, आपल्या इच्छेनुसार पार्श्वभूमीचा रंग ठरवणं, नोंदी सलगपणे साठवून ठेवणं, शब्दसंख्येची थोडी अधिक मोकळीक, लेखनाव्यतिरिक्त इतर गोष्टींची गर्दी (किमान या चौकटीपुरती) बाजूला ठेवण्याची शक्यता, अशा काही गोष्टी इथं साधता येतात. वाचकाचं लक्ष विचलित करणाऱ्या अगणित गोष्टी एकाच चौकटीत कोंबण्यापासून ब्लॉग थोडासा वेगळा राहू शकतो. समाजमाध्यमांवर एकाच वेळी अनेक गोष्टींची गर्दी असते. साहजिकपणे त्यातून वाचकही- किंवा प्रेक्षकही जास्त मिळतात. पण शेवटी गोष्टी वेगानं बदलत असल्याचं आपल्याला माहीत आहेच. त्यामुळं कशातच काही स्पष्टपणे बोलता येत नाही, अशी गतही अनेकांच्या अनुभवात असेल. पण आपापल्या माध्यमनिवडीचा आदर करायला तरी काय हरकत आहे? अनेकदा तसा आदर राखला जात नाही, असं वाटतं. बाजारपेठेनं क्रयवस्तूंचे असंख्य वाटावेत असे पर्याय समोर ठेवले, तशी निवडीची विचित्र सक्तीही केली का? अशी ही अदृश्य सक्ती आपल्या अनेकांच्या अनुभवात असेलच. तरीही आपण काहीतरी थोडीफार स्वतंत्र खटपट करू पाहातो. त्यात अपुरेपणाही जाणवत राहातो. त्या अपुरेपणाच्या जाणीवेतूनच रेघेची सुरुवात झालेली आहे. ती रेघ आपण अधेमधे थांबत चालवत राहिलोय. आता परत थोडी चालवेल तेवढी चालवू.