Sunday 1 May 2016

रेघेचे दोन आर्थिक संसार

एक

मराठवाडा साहित्य परिषद. पहिली आवृत्ती: १९७७
'मराठी भाषेचा आर्थिक संसार' ही अशोक केळकरांची एक सुंदर पुस्तिका आहे. 'पुस्तिका सुंदर आहे' आणि 'अनुष्का शेट्टी सुंदर आहे' या वाक्यांमधे फरक असतो, तो आपल्याला आपसूक समजून येतो. आपण जे पहिलं वाक्य लिहिलंय त्यात 'सुंदर पुस्तिका' याचा अर्थ तुम्ही कसा घेतलात? पुस्तिकेतला आशय, केळकरांचे विचार, मांडणीची पद्धत अशा काही गोष्टींशीच तो सुंदरपणा जोडलात ना? म्हणजे स्पष्ट-अस्पष्टपणे तसा तो आपसूक जोडला गेला असेल. आपणही त्याच अर्थानं ते लिहिलं. पण 'अनुष्का शेट्टी सुंदर आहे' या वाक्यातलं सुंदरपण तिच्या दिसण्याशी संबंधित आहे. तेही पुस्तिकेतल्या आशयाएवढं सुंदर वाटणं शक्य आहेच. पण तिचा स्वभाव किंवा वागणं असा बाकीचा आशय, ही नोंद लिहिणाऱ्याच्या प्रत्यक्ष अनुभवात असणं शक्य नाही, हा अंदाजही आपल्याला आपसूक येतो. किंवा काहींना अनुष्का शेट्टी हे नाव माहीत नसेल तरी ती कोणीतरी स्त्री असेल आणि ही नोंद लिहिणारा पुरुष असेल, त्यामुळं मग आपसूक तो तिला का सुंदर म्हणत असेल, याचा काही अस्पष्ट अंदाज बांधला जातो. तर, 'सुंदर' हा शब्द बाहेरच्या नुसत्या दिसण्याशी किंवा आतल्या मजकुराशी/त्याच्या अर्थाशी असा दोन्ही अंगांनी जोडता येतो. पण 'पुस्तिका देखणी आहे', असं म्हटलं असतं तर कदाचित असं झालं नसतं. देखणेपणा तसा दिसण्याशीच संबंधित राहतो. 'सुंदर' या शब्दाचा अर्थ मात्र तसा व्यापक आहे. हे शब्द आणि अर्थाचं जे आपसूक रसायन आपल्या डोक्यात तयार होतं, त्याबद्दलच केळकरांची ही ९४ पानांची भारी पुस्तिका आहे. इथं 'भारी' म्हणजे काय तेही आपसूक आपल्याला कळून जातं.

आपण भाषाविज्ञानाचे विद्यार्थी नसलो, विद्यापीठीय परिभाषेशी आपली फारशी ओळख नसली, व्याकरणाचीही फारशी माहिती नसली, तरीही ही पुस्तिका आपल्याशी संवाद साधणारी आहे. ही नोंद लिहिणाऱ्याशी ती म्हणूनच संवाद साधू शकली. सार्वजनिक व्याख्यानांची ही पुस्तिका असल्यामुळंही कदाचित ही व्यापकता आली असेल, किंवा केळकरांच्या लिहिण्यात थोडं असं व्यापकपण सुटंही होतं असेल, ते आपल्याला त्यांच्या 'रुजुवात' या पुस्तकातूनही जाणवतं. औरंगाबादला डॉ. ना.गो. नांदापूरकर स्मारक व्याख्यानमालेत १-२-३ मार्च १९७६ या दिवसांमध्ये केळकरांनी ही तीन व्याख्यानं दिलेली. पुस्तिकेत छापलेल्या प्रकाशनाच्या तपशिलावरून कळतं की, १९७७ साली या पुस्तिकेची पहिली आवृत्ती छापण्यात आली, ती अर्थातच एक हजार प्रतींची होती. आणि ही नोंद लिहिणाऱ्यानं १ मे २०१२ रोजी एका दुकानात पाच कप्प्यांच्या एका कपाटात खालून दुसऱ्या कप्प्यात एक गठ्ठा पाहिला. सहज पाहिलं तेव्हा तो गठ्ठा या पुस्तिकेचा असल्याचं दिसलं. दहाएक प्रतींचा गठ्ठा होता असेल, त्यातली एक विकत घेतली, तेव्हा ती पंचवीस रुपयांना मिळाली. आजही १ मे आहे, हा निव्वळ योगायोग समजूया.

या पुस्तिकेत केळकरांनी भाषेला पहिल्यापासूनच सरळ चिन्हव्यापार म्हणून पाहिलेलं आहे आणि वाचकांनाही त्याच अंगानं तिच्या काही अंगांचा उलगडा करून दाखवलेला आहे. भाषा ही एका व्यापक चिन्हव्यापाराचा एक अवयव फक्त आहे, आणि आता २०१६ साली या चिन्हव्यापाराचं स्वरूप कितीतरी जास्त व्यापक झाल्यासारखं आहे, त्यामुळं ही पुस्तिका वाचणं अजूनच सुंदर वाटतं.

यात सुरुवातीलाच एका ठिकाणी केळकर म्हणतात:
[...] चिन्हव्यापाराचे स्वरूप समजायचे तर तो ज्याच्याशी संबद्ध आहे तो अर्थव्यापार आपल्याला समजावून घ्यायला हवा. अर्थव्यापार हा एकंदर जीवनव्यापारावरच आधारलेला आहे. जीवनव्यापार समजावून घ्यायचा तर विश्वाचे दोन भाग पाडावे लागतात. एक जीव, दुसरा म्हणजे उरलेले विश्व. त्यातल्या त्यात त्या जिवाला स्थलकाल दृष्टीने जवळ ठरणारा त्याचा परिसर. तो जीव आणि त्याचा परिसर ह्यांमध्ये सदोदित घडामोड, क्रिया-प्रतिक्रिया चालू असते. ही घडामोड म्हणजेच त्या जिवाचे जगणे. जीव आणि त्याचा परिसर ह्या दोहांमध्ये जी आपण सीमारेषा ओढली त्या सीमारेषेच्या बाहेरच्या अंगाला आपण उभे राहिलो तर आपण म्हणून की, जिवाची अखंड घालमेल, चळवळ चालू आहे, आपण त्याचे आचरण पाहतो आहोत. आचरण आणि अनुभव ह्या जीवनव्यापाराच्या दोन बाजू आहेत. जीवनव्यापार समजावून घेणे म्हणजे परिसर, अनुभव, आणि आचरण ह्यांमध्ये जी जी घटिते घडत असतात त्यांच्यामध्ये संगती, कार्यकारणभावाची साखळी शोधणे. परिसर आणि अनुभव, अनुभव आणि आचरण, आचरण आणि परिसर असे दुवे जुळत जातात आणि जीव जगतो. मानव व इतर वरच्या श्रेणीमधले जे जीव आहेत त्यांच्या बाबतीत केवळ हे दुवे जुळत नाहीत तर हे दुवे शोधले जातात. जसजसे हे दुवे सापडत जातील आणि बांधले जातील तसतसा जीवनात अर्थ भरत जातो. चिन्हव्यापाराचा हा आदिम आधार आहे. (पान ४-५)
रेघेची सुरुवात आपण बिरबल-बादशहाच्या गोष्टीनं केलेली, त्यातून थोडंसं अडखळत आता आपण जे काही दुवे जोडत असतो ते केळकरांच्या या परिच्छेदाशी खूप जुळलेले वाटले. माणसाला वरच्या श्रेणीत बसवण्याचा त्यातला भाग थोडा बाजूला ठेवला, तर बाकीचे सगळे शब्द आता आपण इथं रेघेवर नोंदवतोय, याचं कारणही काही दुवे जुळवणं एवढंच आहे. ही नोंद लिहिणाऱ्यासाठी हे कारण वैयक्तिक असेल. तुम्हाला वाचक म्हणूनही ते बरं वाटत असेल, तर ते या भाषेमुळं शक्य होतंय, त्यामुळं तिच्या मर्यादांसकट आपल्याला ती सुंदर वाटायला लावतेय, हा रेघेचा पहिला आर्थिक संसार आहे.

हे दुवे का जोडायचे, किंवा का जोडावेसे वाटतात, याची कारणं शोधत राहणं- हा या संसारातला एक नेहमीचा भाग आहेच. यातलं एक कारण केळकरांच्या पुस्तिकेत सापडलं, ते असं:
प्राचीन चीनमधील विचारवंत, समाज आणि संस्कृती यांचा समीक्षक कुंग फु-त्स (ज्याला साहेब कन्फ्यूशिअस म्हणतो) ह्याला त्याच्या एका शिष्याने विचारले की, वेई प्रांतातील राज्याच्या कारभाराची सूत्रे जर गुरुजींच्या हाती आली तर ते प्रथम कोणते पाऊल उचलतील? गुरुजी म्हणाले: "पी येह चंग मिंग हु." (म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या भाषेत सांगायचे तर कशाले काय म्हनवा आनी कशाले काय म्हनू नहीं ह्याबद्दल शिस्त आणणे). (पान ६६)
केळकर जी शिस्त म्हणतायंत, ती शुद्ध-अशुद्ध, पुस्तकी व्याकरण, प्रमाण-अप्रमाण भाषा अशा अर्थानं नाही, हे तर झालंच. शिवाय, ही शिस्त सत्ताधाऱ्यांनी प्रजेला लावणं, हा मुद्दा बाजूला ठेवू. आपलं आपल्याला या दुव्यांमधल्या सुसंगतीचं काही वाटतं का, हा आपल्यापुरता नोंदवण्यासारखा मुद्दा आहे. कुठल्याही चिन्हाला काही संदर्भ असतात, त्या संदर्भांना सोडून चिन्ह वापरलं तर ती बेशिस्त होते, नि संवादच कोलमडतो असं साधारण केळकरांचं म्हणणं आहे. हे संदर्भ म्हणजे साचा नसतो, प्रवाही-बदलतं असं हे प्रकरण असतं. पण आता चिन्हांचा वावर प्रचंड वाढलेल्या काळात हे संदर्भ शोधायचे कसे, दुवे जोडायचे कसे, असं आपल्याला वाटू शकतं. फेसबुकवरचं 'लाइक' बटन, त्यात अलीकडं त्यांनी घातलेली आणखी काही भावनांची भर हे याचं अगदीच लहानसं उदाहरण आहे. 'राष्ट्र', 'राजकारण', 'विचारवंत', 'पत्रकारिता', 'इव्हेंट', 'मार्केटिंग', 'यश', 'पुरस्कार', 'बंडखोरी'- अशा बहुधा असंख्य चिन्हांच्या बाबतीत असा अस्पष्ट दुव्यांचा व्यापार सुरू असतो. प्रसारमाध्यमं तर यावरच उभी असतात. तर,  हा व्यापार चालवणारे कोण असतात? आपल्याला कितीही वाटत असलं, तरी त्यावर आपला अधिकार किती असतो आणि काही ठराविक लोकांच्या व्यापारी गणितांचा अधिकार किती असतो? हे प्रश्न आपल्याला तपासावेसे वाटतात. यात काही वेळा आपले-आपण काही बिंदू टिपतो, तर काही वेळा इतरांचे (पटलेले/न पटलेले/रोचक वाटलेले) असे बिंदू टिपतो, या अर्थी या नोंदी म्हणजे टिपणं आहेत. इथं २०१०पासून नोंदवली गेलेली रेघेची सुरुवात व्यक्तिगत पातळीवर २००८च्या शेवटाकडं झालेली होती,  त्यामुळं तेव्हापासूनची सात-आठ वर्षं धरली, तर आपण अशा या काही नोंदी किंवा टिपणं इथं करत आलोय.

दोन
पैशाची भक्ती आता एखादा धर्म म्हणवण्याएवढ्या थराला पोचलेली आहे, हे त्याच्या लक्षात आलं नि काळ पुढं जात गेला तसं अधिकच प्रकर्षानं हे त्याला जाणवत गेलं. किंवा बहुधा आपल्याकडे सोपवण्यात आलेला हाच एकमेव खरा धर्म आहे- खराखुरा जाणवणारा धर्म. देवाच्या जागी आता पैसा आहे. सत् आणि असत् यांना आता काही अर्थ राहिलेला नाही. अर्थ फक्त अपयश नि यश यातच आहे. म्हणूनच बहुधा 'चला झाली राव कायतरी भरपाई'सारखे गहन महत्त्वाचे शब्दप्रयोग वापरात आले असतील.
- जॉर्ज ऑर्वेल ('किप द अॅस्पिडिस्ट्रा फ्लाइंग'मधून भाषांतरित).
गॉर्डन कॉमस्टॉक या मुख्य पात्राच्या संबंधीचे विचार. 

२६ जानेवारी २०१६ रोजी रेघेच्या पानावरच्या उजव्या समासात निधी भरायचा एका पर्याय वाचकांसमोर ठेवला होता. निधीसंकलनासाठी मंच उपलब्ध करून देणाऱ्या एका संकेतस्थळाद्वारे ही सोय केली. त्यात पंधरा हजार रुपये असं लक्ष्य ठेवलेलं होतं आणि निधीसंकलनासाठीचा कालावधी सरळ डिसेंबर २०१६पर्यंतचा देऊन ठेवला होता. पर्यायाची तपासणी करण्यासाठी पहिले शंभर रुपये आपणच त्यात भरून पाहिले, आणि त्यानंतरचा निधी वर्षभरात जमा झाला तर झाला, असं मनात धरलं होतं. यात फारशी अपेक्षा ठेवलेली नव्हती, त्यामुळं अनपेक्षितपणे तीन महिन्यांच्याही आत हा सगळा निधी भरला गेला, हे थोडं आश्चर्यकारक वाटलं. तर १० एप्रिललाच हा निधी पूर्ण जमा झाला. साधारण अठरा वाचकांनी या निधीत विविध रकमांचा सहभाग नोंदवल्याचं दिसतं. एकूण १५,००० रुपयांपैकी १,५०० रुपये संबंधित संकेतस्थळाच्या कामाचं शुल्क (१० टक्के) म्हणून वजा, २१० रुपये सेवा कर (१४ टक्के) वजा, ७.५० रुपये स्वच्छ भारत कर (०.५ टक्के) वजा, असं गणित होऊन रेघेच्या बँक खात्यात १३,२८२.५० रुपये इतकी रक्कम जमा झाली. याशिवाय काही वाचकांनी सुटी रक्कम जमा केलेली (यातली काही रक्कम जानेवारीपूर्वीची आहे), ती एकूण मिळून बरोब्बर सात हजार आहे. म्हणजे सगळं मिळून साधारण चार महिन्यांमधे सुमारे वीस हजार रुपये इतका निधी रेघेच्या नावावर जमा झाला.

हे आपण कशाला केलं?

ब्लॉग म्हणजे मूळचे शब्द वेब-लॉग, म्हणजे महाजालावरची वही ही. तर लिहिणारा वहीत लिहू शकतो, वर्तमानपत्रात, साप्ताहिका-मासिकांमधे, खास दिवाळी अंकांमधे, असं कुठं जमेल तिथं लिहू शकतो. रेघेवर आपण लिहितो त्याला पत्रकारी भाषेत 'स्फुट' म्हणता येईल. त्यासाठीचा सोपा शब्द आहे 'फुटकळ'. अशा काही नोंदी आपण करतो. आणि आपल्याला हे करायला मजा येते, आनंद वाटतो. मराठीतल्या ज्या छापील माध्यमांशी संपर्क आला त्यात हा आनंद रेघ लिहिणाऱ्याला वाटलेला नाही. लिहिण्याचा म्हणून आनंद असतो त्याला तसा कोणी हे हात लावू शकत नाहीत, पण लिहिल्यानंतर ते छापून येणं नि त्यासंबंधीचा मराठीतला व्यवहार भीषण खालावलेला आहे, असं आपलं मत आहे. यासाठीची काही उदाहरण रेघेवरच्या काही नोंदींमधेही कुठं ना कुठं आहेत. त्यावर फार इथं आत्ता बोलावं वाटत नाहीये. आणि हे वैयक्तिक मत आहे, असं म्हणून तुम्ही सोडूनही देऊ शकता.

'ब्लॉगर' हीसुद्धा 'गुगल' या कंपनीची सेवा आहे. त्यांच्या मनात आलं तर ते काही सेकंदात हा आपला पत्ता कापू शकतात, हे आहेच. त्यावर उपाय करण्याएवढी तांत्रिक ताकद रेघेकडं आत्ता नाही. शिवाय यात आर्थिक ताकदही महत्त्वाची ठरत असेल थोडी तरी. आणि ताकदीपेक्षाही या बाबतीत वेगळा काही पत्ता उभारण्याची गरज आणि आकांक्षा आपल्यात नाही. तसंही आपला पत्ता गुगलवाले कापतील असं नाही. पण शेवटी आपण त्यांची मोफत सेवा वापरून हे लिहितोय, एवढं तर आहेच. तरी, ब्लॉगलेखनात अधिक मोकळीक आहे. इथं शब्दांसोबत इतर चिन्हांचा वापरही अधिक नीटपणे करता येतो. म्हणजे लेखकाच्या लिहिण्याची साधनं वाढतात, हे सुंदर वाटतं. कुठले शब्द वापरावेत, यासंबंधी संपादकीय कमजोरीचा अडथळा नाही. मुख्य प्रवाहातल्या छापील माध्यमांसारखी तथाकथित प्रतिष्ठा अजून इथं नसल्यामुळं कोणाच्या फार काही अपेक्षा नसतात, उणिवाही वाचक उघडपणे बोलू शकतात, प्रतिक्रिया म्हणून नोंदवू शकतात, त्यामुळं अधिक खुलेपणा आहे. वर्तमानपत्रांसारखं माध्यम लाखो लोकांपर्यंत पोचतं, मराठी मासिकं-साप्ताहिकंही पाचशेपासून पाच हजारांच्या आसपास वाचकांपर्यंत पोच असलेली दिसतात, तेवढी पोच मराठीत तरी ब्लॉग या माध्यमाची अजून नाही, हे खरं. पण हा मुद्दा लिहिण्याच्या आनंदाएवढा महत्त्वाचा वाटत नाही. अगदीच महत्त्वाचा नाही असं नाही. पण ब्लॉगमधे शब्दांसोबतच इतर चिन्हव्यवहारही लेखकाच्या आर्थिक संसारात आणता येतो, ही सुंदर गोष्ट या बऱ्याच गोष्टींना पुरून उरणारी आहे.

मराठीत, कविता हा सर्वोच्च वाङ्मयप्रकार आहे, कथा हा क्षुद्र वाङ्यमप्रकार आहे, कविता म्हणजे सगळ्यापेक्षा सर्वोच्च अशी काही थोर गोष्ट आहे, लेखकाची (दिखाऊ) नैतिकता असते, (जाहिराती नि कविता एकत्र लिहूनही) कवी मंडळी बाजारपेठेच्याविरोधात असतातच, साठोत्तरी-नवदोत्तरी अशा कवींच्या पिढ्या असतात- अशा कित्येक गोष्टी बोलल्या जातात. यातून हाताला काय लागतं, माहीत नाही. समाजातल्या इतर सर्वांची एक वयानं ठरलेली पिढी असते, त्यातही काही श्रेणी लावून लेखक-कवींची वेगळी पिढी लावणं सोईचं जात असावं. पण हे सगळं कंटाळवाणं वाटतं. साहित्यापुरतं बोलायचं तर, छापील माध्यमांमधून ही कंटाळवाणी परंपराही आपसूक जास्त प्रमाणात साचलेली असते, तो अडथळाही ब्लॉगलेखनात नाही. नैतिकता, बाजारपेठविरोध, वाङ्यमप्रकाराचा सर्वोच्चपणा या गोष्टी इतक्या सोप्या वाटत नाहीत, एवढंच बोलून हे सोडून देऊ. पण यापासून दूर असण्याची मोकळीक ब्लॉगलेखनात मिळते, हेही सुंदर वाटतं.

पण समजा एखाद्याला कादंबरी लिहिण्याचीही आवड नि सवय असेल, तर त्यानं ब्लॉगही लिहावा का? कादंबरीतून वास्तव-अवास्तव अधिक गुंतागुंतीसह, अधिक व्याप वाढवून मांडता येत असेल, तर ब्लॉगसारख्या गोष्टीत वेळ का घालवावा? या प्रश्नांचं ठोस उत्तर माहीत नाही. पण हे लेखन कादंबरीलेखनाला पूरक ठरणारं लेखन असतं, असं छोटंसं मत नोंदवू. ही मतं शेवटी वैयक्तिकच राहतात आणि खरं तर ज्याचा त्याचा लिहिण्याचा कल असतो, एवढंच उत्तरही पुरेल. या वहीतली एकेक नोंद आपण सोईसाठी सुटी लिहितो आणि सुटी एकेक नोंद वाचतो, पण एकत्र मिळून या सगळ्या नोंदींची रचना नक्की काय करू पाहते? त्यातून काही सर्जनशील समाधान लेखकाला मिळतं का? वाचकालाही तसं वाटतं का? हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. लेखकाला यात सर्जनशील आनंद मिळतोय, एवढं उत्तर ठामपणे देता येईल. एकाच नोंदीपुरतं बघितलं तर वेगळं वाटेल, पण एकूण मिळून पाहिलं तर ही वही म्हणजे एखाद्या कादंबरीकाराला पुरवणी-टिपणांसारखी वापरता येऊ शकते. वाचकांना काय वाटतं, ते वाचकच सांगू शकतील.

पुस्तक रूपात छापलं तर गोष्ट वेगळी, पण बाकी छापील माध्यमांमधून केलेलं असं स्फुट/फुटकळ लिखाण सुटं-सुटं असतं. ते एकत्र कात्रणांसारखं ठेवलं तर कदाचित एकसंधता जाणवू शकते. इथं मात्र आपसूकच ते एकसंधपणे या वहीत नोंदवलं जातं, हाही या रचनेचा चांगला भाग वाटतो. म्हणजे इथं या नोंदी-टिपण-निबंध वजा लेखनालाही एकसंध रचनेसारखं असण्याची सोय आहे. चुकाही समजायला बरं जातं, बरं-वाईट एकत्र राहतं.

तर, म्हणून आपण रेघ चालवतो आणि ती चालवण्यासाठीचं आपलं कारण पहिल्या आर्थिक संसाराचंच आहे, पण त्यासोबत दुसरा आर्थिक संसारही थोडासा जोडून ठेवलेला आहे. पैसा ही गोष्ट सगळ्यांना लागते, सगळ्यांकडे तो कमी-अधिक असतो, आणि ऑर्वेलच्या कादंबरीत नोंदवलं गेलंय ते आता मोठ्या प्रमाणात जाणवतंही. त्यासंबंधीचा रेघ लिहिणाऱ्याचा मार्ग सुटा वेगळा एक आहेच, ही नोंद वाचणाऱ्यांप्रमाणे त्याचंही त्याबाबतीतलं काहीएक गणित आहेच, त्यात रेघेचा हा निधी खूप मोठा आधार वगैरे नाही, त्याचं दुसरं गणित व्यवस्थित सुरू आहे, पण तरीही हा इथला निधीचा प्रयोग आपण करत राहणारोत. त्यात यश-अपयश असं काहीच होणार नाहीये. आणि ही धार्मिक रुढी म्हणूनही समासात नोंदवली जाणार नाहीये. उलट त्यातली धार्मिकता कमी करता आली इथल्यापुरती तरी बरं. चार महिन्यांत वीस हजार, म्हणजे महिन्याला पाच हजार अशी या निधीतली सरासरी भर आहे. नियमितपणे आपण हा पर्याय समासात ठेवून दिला, तर कायम या वेगानं रक्कम जमा होणार नाही, हे तर आहेच. दुसरं म्हणजे, कित्येक लोकांचं महिन्याचं उत्पन्न पाच हजारांपर्यंतही नसतं आणि काही लोकांचा दिवसाचा किंवा एक वेळच्या जेवणाचा खर्चही एवढा किंवा यापेक्षा जास्त असतो, आणि अशी माणसं एकमेकांपासून एखाद्या किलोमीटर अंतराच्या अवकाशातही नांदत असतात, हे या धर्माचं खतरनाक रूप कोणालाही पाहायला मिळू शकतं. त्यामुळं आपण यात काही यश-अपयश शोधू शकतही नाही. पण इथल्या लेखनाला पूरक गोष्ट म्हणून या निधीचं काही उभं करायचा प्रयत्न तरी आपण करत राहू. तिथेच वाचकांना त्यांच्या इच्छेनुसार-मतानुसार क्रेडिट-डेबिट कार्ड-ऑनलाइन बँकिंग अशा मार्गांनी रेघेच्या निधीत भर टाकता येईल. 'पे-यू-मनी' या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता ही कायमस्वरूपी वर्गणीची पिशवी समासात अडकवलेली राहील. त्यासाठी आपण आधीही आवाहन असं वेगळं काही केलं नव्हतं, आणि आताही तसं आवाहन म्हणून काही नाही. (मोबाइलवर रेघ वाचणाऱ्यांना उजवीकडचा समास दिसत नाही).

उपसंहार

पहाटे लवकर संडासला जायला लागलं, तर कुठं जायचं लांब, म्हणून रोज रात्री न जेवता झोपणारा एक इसम रेघेच्या ओळखीचा आहे. त्याच्याकडं जेवण्यापुरते पैसे तर असतातच, पण घर नसल्यामुळं आणि वयामुळं काही तडजोडी कराव्या लागतात. संडास-झोप इत्यादी बाबतीतल्या या तडजोडी आहेत. नोकरीचं वय आता ओसरलं असलं तरी त्याचा त्याचा म्हणून पैशांचा काही हिशेब असतो, तो आधीच्या आर्थिक बचतीद्वारे बरोबर साधला जातो. ही नोंद लिहीत असताना हा इसम शब्दशः एक मिनिटाच्या (पायी लागणारा वेळ) अंतरावर बसलेला आहे. 

दुसरीकडं रेघेच्या ओळखीची दोन वर्षांची एक मुलगी गेल्या काही काळात, 'टटटटटट, तततततत, त्ती... (हत्ती), दलाप (जिराफ), त्त्या (आत्त्या), एपीबदेतूयू... (हॅपी बर्थ डे टू यू)', वगैरे शब्द तिच्या तिच्या व्याकरणानं बोलू लागतेय. दोन-तीन आठवड्यांच्या अंतरात ती जुनं व्याकरण कोलमडवून, नवं व्याकरण उभं करू शकते. तिचा चिन्हांचा अर्थव्यापार प्रचंड धगधगता आहे. ही नोंद लिहीत असताना ही मुलगी बारा तासांच्या (बसनं लागणारा वेळ) अंतरावर आहे.

वरच्या दोन परिच्छेदांमधे नोंदवलेली वाक्यं म्हणजे काही महान माहिती नाही, बातमी नाही, मराठीत ज्याला वैचारिक लेखन म्हणतात ते नाही, फेसबुक-व्हॉट्सअॅपवरची संवेदनशील पोस्टही नाही. या वाक्यांचा काहीच व्यावहारिक, आर्थिक उपयोग नाही. आपल्या आजूबाजूच्या असंख्य तीव्र संदर्भांमधले हे दोन संदर्भ आहेत, एवढंच खरं आहे. जमलंच तर ते जोडण्यासाठीचा तिसरा संदर्भ म्हणून रेघ मारायचा प्रयत्न आपण करत असतो.
०००

लहानपणी मी आत्मसात केलेली जीवनदृष्टी पूर्णपणे सोडून देण्याची क्षमता माझ्यात नाही, आणि तशी इच्छाही मला होत नाही. मी जिवंत असेन तोपर्यंत लेखनशैलीबद्दल, या भूमीबद्दल माझ्या तीव्र भावना कायम राहू देत; (विविध) घन वस्तू व निरुपयोगी माहितीच्या रद्दीतून मला आनंद मिळवता येत राहू दे. माझं हे अंग लपवण्यात काहीच अर्थ नाही. माझ्यात मुरलेल्या आवडीनिवडी आणि सध्याच्या युगानं आपल्या सर्वांवरच लादलेल्या मूलतः सार्वजनिक स्वरूपाच्या- अव्यक्तिगत क्रिया यांच्यात संगती शोधणं हे (माझं) काम आहे.
- जॉर्ज ऑर्वेल ('व्हाय आय राइट' या निबंधातून भाषांतरित)


निरुपयोगी वस्तूंमधली संगती । पेंग्वीन, २००९ । १३५० रुपये
मुखपृष्ठ छायाचित्र: जॉन हिंड । रचना: जिम स्टॉडर्ट