आज आंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस आहे. इंग्रजी नाटककार शेक्सपिअर, स्पॅनिश लेखक सर्व्हांटिस अशा कोणाकोणाच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आणि आणखी काही लेखकांच्या जयंतीच्या निमित्तानं हा दिवस पुस्तकांचा म्हणून साजरा केला जातो, असं संयुक्त राष्ट्र संघटनेचं संकेतस्थळ सांगतं. या निमित्तानं ही नोंद होतेय.
शिवाय, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भाषावैज्ञानिक आणि समीक्षक अशोक केळकर यांचं निधन झालं होतं, त्याबद्दल आपण रेघेवर काही करू शकलो नव्हतो. काही करायलाच हवं अशी सक्ती नव्हती. तरी संबंधित विषयातल्या कोणा व्यक्तीकडून केळकरांबद्दल काही मजकूर रेघेवर आणायचा प्रयत्न होता, पण ते जमलं नाही. अजूनही जमलेलं नाही. पण आज, पुस्तक दिवसाच्या या नोंदीला मात्र केळकरांच्या आठवणीचंही निमित्त आहे. असं का बरं?
अशोक केळकर (२२ एप्रिल १९२९-२० सप्टेंबर २०१४) छायाचित्र: 'रुजुवात'च्या मलपृष्ठावरून/कुमार गोखले |
तर, केळकरांच्या निवडक लेखनाचं 'रुजुवात' (पहिली आवृत्ती- २००८) हे लोकवाङ्मयगृहातर्फे प्रकाशित झालेलं एक पुस्तक आहे. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता २०१० साली. (शिवाय, त्यापूर्वी, २००२मध्ये केळकरांना पद्मश्री सन्मानही मिळालेला). या पुस्तकातल्या लेखकाच्या मनोगतात केळकर काय म्हणतात हे जागतिक पुस्तक दिवशी आपण नोंदवायला हवं. मगच मराठीत हा दिवस साजरा केल्यासारखं होईल. या मनोगतामध्ये केळकरांनी या पुस्तकाच्या प्रकाशनासंबंधीची हकिगत सांगितलेय तेवढाच भाग इथं नोंदवला आहे. केळकर राहत होते ते पुणे शहर, त्यांचा प्राध्यापकीचा पेशा, साहित्यातल्या काही मंडळींशी असलेली आपसूक ओळख, शिवाय मूलभूत कामामुळं नावाला असलेलं वजन, या सगळ्या पार्श्वभूमीवरही त्यांना हा अनुभव आलेला आहे. शिवाय याच पार्श्वभूमीवर त्यांनी वापरलेले मराठी वाङ्मयजगत्, वाचकांची पिढी असे शब्द पाहायला हवेत असं वाटतं. या शब्दांचा अर्थ नक्की काय आहे, हे रेघेला समजू शकलेलं नाही, आणि त्यामुळं केळकरांनी या गोष्टींबद्दल जी अपेक्षा व्यक्ती केलेय, तीही आपल्याला अजून तरी नीट समजून आलेली नाही, एवढं नोंदवू. म्हणजे हे शब्द वापरल्यावर जेवढा आकार अपेक्षित आहेसं वाटतं, त्या तुलनेत खरा आकार काय आहे, हे कळेनासं होतं. रेघेची मर्यादा असेल ही. तरी पण एकूण पुस्तक प्रकाशनाबद्दल केळकरांनी जे नोंदवलंय, ते आपण इथं वाचू. बाकी, वाचकांनाही याबद्दल काही वेगळं म्हणायचं असेल, तर प्रतिक्रियेला जागा आहेच.
तर, केळकर (२००८मध्ये) म्हणतात:
ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या पत्नी शीलवती यांना एका प्रसंगी असे वाटून गेले की, 'मीच हे सांगितले पाहिजे' आणि तेच त्यांनी आपल्या आत्मनिवेदनपर पुस्तकाला (१९६९) नाव दिलं. मलाही सध्या असेच वाटतेय की मलाच ते सांगितले पाहिजे.
तुमच्यापैकी काही जणांना आठवेल की १९८३ साली मी आपल्या साहित्य, कला, साहित्याची भाषा या विषयांवरच्या लेखसंग्रहाची पूर्वसूचना 'रुजवात' या नावाने दिली होती. तसे म्हटले तर पुस्तक केव्हाच तयार होते, पण नंतर बराच उशीर झाला हे खरे. त्याबद्दल विचारणाही होत राहिली. या उशिराची जशी कारणे आहेत तसे परिणामही आहेत. ही कारणे आणि परिणाम केवळ व्यक्तिगत नाहीत तर सार्वजनिकही आहेत.
सतीश काळसेकरांच्या एका टिपणामुळे हे माझ्या ध्यानात आले. ते लिहितात (लोकवाङ्मयगृहाच्या वाङ्मयवृत्त पत्रिकेतील त्यांचा 'वाचणाऱ्याची रोजनिशी' हा स्तंभ, ऑगस्ट २००५) : ''अनेकदा त्या त्या काळासाठी महत्त्वाचे लेखन नियतकालिकांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत येते, पण ते योग्य त्या तत्परतेने ग्रंथबद्ध होत नाही. त्यामुळे बाहेरचे वाचक त्या लेखनाला मुकतात.'' (मला तर दिसते की नियतकालिकांच्या वाचकांनाही असे लेखन दखलपात्र वाटत नाही!) समीक्षात्मक आणि सर्जनात्मक अशी दोन्ही प्रकारची उदाहरणे काळसेकर देतात. ''यात दोष कुणाचा- प्रकाशकांनी तत्परता न दाखवल्याचा, लिहिणाऱ्यांना ग्रंथरूप आणण्यात उदासीनता असल्याचा की वाचकांची मागणी नसल्याचा, यावर आता चर्चा कामाची होणार नाही.'' असेही ते पुढे म्हणतात. का बरे अशी चर्चा कामाची होणार नाही? पुढच्यास काय ठेच लागली हे कळून मागचा शाहणा होणार नाही का? म्हणूनच तर प्रस्तुत पुस्तकाच्या संबंधीची हकिगत जरा मोकळेपणाने पण थोडक्यात सांगायचे योजले आहे.
माझे भाषा, साहित्य, कला याविषयीचे चिंतन मराठी भाषेत वाचकांपर्यंत जरा उशिराच पोचायला लागले- म्हणजे माझ्या चाळिशीच्या जवळपास. (इंग्रजीतले साहित्य, कला विषयीचे लेखनही त्याच सुमारास वाचकांपर्यंत पोचले. मात्र इंग्रजीतला भाषाविषयक पहिला लेख १९५७ साली बाहेर पडला- म्हणजे डॉक्टरेट मिळून माझी लांबलेली विद्यार्थीदशा उरकण्याच्या वर्षभर अगोदरच). माझे काही मराठी लेख बाहेर पडल्यावर मौज प्रकाशनातर्फे श्री. पु. भागवतांनी त्यांचे पुस्तक काढण्यात रस दाखवला. मी त्यावर म्हटले : वैज्ञानिक आणि समीक्षात्मक अशा भिन्न वळणाचे आणि भाषा आणि साहित्य-कला अशा भिन्न विषयांवरचे हे लेखन आहे, थोडा समान वाचकवर्ग सोडला तर बाकीचा बराचसा वेगवेगळा आहे, तेव्हा सगळ्या लेखांचा एकत्र संग्रह काढणे व्यवहार्य होणार नाही, बरे, दोन संग्रह काढायचे तर तेवढा ऐवज जमेपर्यंत थांबावे लागेल. भागवतांना ते पटले. नंतर ऐवज जमला. तेवढ्यात मॅजेस्टिक प्रकाशनाचे केशव कोठावळे मला म्हणतात : ललित आणि धार्मिक या सुरक्षित पुस्तकांखेरीज वैचारिक पुस्तकेही काढण्याच्या विचारात आम्ही आहोत, तुमच्या भाषाविषयक लेखांचा संग्रह काढण्यात आम्हाला रस आहे. १९८३मधे वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार पुस्तक निघालेही. (त्याला चार पारितोषिके मिळूनही माफक किमतीतली ५००ची आवृत्ती संपवायला मराठी वाचक आणि ग्रंथालयांनी तब्बल सतरा वर्षे घेतली!) साहित्य, कला, साहित्याची भाषा विषयक लेखसंग्रहाची मुद्रणप्रत पाहिल्यावर भागवतांच्या मनात आले : केळकर, तुमच्या मनात तशी योजना नसावी, पण तुमची एक सुसंगत भूमिका असल्यामुळे हे लेख जणू काही एका ग्रंथाची प्रकरणे वाटतात, थोडे संपादन करून एक सलग प्रकरणशः ग्रंथ नाही का होणार? मला ही कल्पना पटली, पण ती तडीला जायची नव्हती.
निवांतपणे अध्ययन, चिंतन करायला मी तेव्हा मोकळा नव्हतो. अध्यापन, संशोधन, मार्गदर्शन, चर्चा, व्याख्याने, लोकशिक्षण, संस्थागत जीवन असे माझे उद्योग भरात आले होते. लेखन चालूच होते. तेही भाषा, साहित्य, कला, चिन्हव्यवहार, संलग्न तत्त्वविचार अशा विविध विषयांवर आणि इंग्रजी, मराठी, हिंदी या त्रिभाषासूत्रानुसार. त्यामुळे संकल्पित ग्रंथसंपादनाला काही हात लागेना. दुसरी एक अडचण होती. भूमिकेच्या सातत्यामुळे अशा लेखांना जसा प्रकरण-संदर्भ असतो तसा त्या त्या वेळच्या वाचकसंवादामुळे अशा लेखांना एक प्रसंग-संदर्भही लाभलेला असतो. त्यामुळे लेखांना संपादनासाठी हात लाववेना. लेखांचा ताजेपणा जाऊन एक सुरक्षित पाठ्यपुस्तक तयार करायचे माझ्या मनातही नव्हते. प्रकरणशः ग्रंथाचा बेत मी मनात सोडून दिला, तरी भागवतांना तसे सांगायला माझी जीभ रेटेना आणि भागवतांना स्वतःहून माझी अडचण असल्याचे काही ओळखेना. थोडक्यात सांगायचे म्हणजे मी आणि भागवत दोघेही चकलो आणि चुकलोही. एवढ्यात काही अंतर्गत अडचणींमुळे मौज प्रकाशनाने मला वचनमुक्त केले.
मग मी हरिभाऊ मोट्यांकडे लेखांची फाइल घेऊन गेलो. (कृष्णाबाई-बाळूताई या खरेमास्तरांच्या मुली माझ्या वडिलांच्या लोभातल्या विद्यार्थिनी असल्यामुळे ओळख होती.) त्यांनी आठवडाभर फाइल ठेवून घेतली, नंतर ते म्हणाले : मला समीक्षाक्षेत्रातले फार कळते असे नाही, पण मी नेहमी वेगळ्या लेखनाच्या शोधात असतो तसे हे नक्कीच आहे. सध्या माझ्या हातात एक पुस्तक आहे, दीडदोन महिन्यांत मी त्यातून मोकळा होईन, मग ताबडतोब तुमचे पुस्तक हाती घेऊ. दुर्दैवाने तेवढ्यात मोट्यांचे निधन झाले (१९८२). मोट्यांनी पुस्तक स्वीकारले यात मी भरून पावलो. इकडे मौजेची अंतर्गत अडचण दूर झाली आणि त्यांनी पुन्हा रस दाखवला. पण प्रकरणशः ग्रंथाचा बेत तर मी सोडून दिलेला. इकडे नवीन लेखांची भर पडत गेल्याने पुस्तकाचे आकरमान आटोपसर न राहता क्रमाने वाढतच राहिले. नंतर माझ्या एका लोभातल्या विद्यार्थ्यामार्फत देशमुख आणि कंपनीने रस दाखवला, पण त्यांना लेखांची संख्या कमी करून पाहिजे होती- जे मला लेखनाची तार्किक वीण ध्यानात घेता पटण्यासारखे नव्हते. पॉप्युलर प्रकाशनानेही रस दाखवला, पण नंतर माझ्या स्मरणपत्राला त्यांनी उत्तरही पाठवले नाही, त्यांचा विचार बदलला असावा. मराठी प्रकाशनव्यवहार पुढे पूर्वीइतका पारदर्शक राहिला नाही त्याची ही सुरुवात तर नव्हती? नंतर माझ्या त्या विद्यार्थ्याने पद्मगंधा प्रकाशनाच्या अरुण जाखड्यांना विचारले. ते म्हणाले : समीक्षेची दोन-तीन पुस्तके मी नुकतीच काढली आहे, तेव्हा वर्षभर तरी आणखी एक जोखमीचे पुस्तक मी घेणार नाही. त्यांचा हा प्रांजळपणा मला खरोखरी आवडला.
पुस्तकाची घोषणा झाल्यापासून वाचकांची अधूनमधून त्याबद्दल चौकशी चालूच होती. दिवस चालले होते. वाचकांच्या पिढ्या उलटत गेल्या. काहींनी तर मला भाषातज्ज्ञ या कप्प्यात बंदिस्त केले. काहींनी मी मराठीत पुरेसे समीक्षात्मक लेखन करीत नाही अशी तक्रार केली. काहींनी तर स्पष्टच म्हटले : या इंग्लिश साहित्याच्या अभ्यासकांची मराठी समीक्षेत लुडबूड हवी कशाला? मी पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल उदासीन झालो नाही, पण उदास मात्र झालो. या काळ्या ढगाला एक चंदेरी अस्तर होते. (इंग्रजी म्हणीतले silver lining म्हणजे piping किनार नव्हे तर अस्तर. उंच डोंगरावरून किंवा उंच उडणाऱ्या विमानातून हे विलोभनीय दृश्य तुम्ही पाहिले आहे का?) एक तर, नंतरच्या पिढ्यांची माझ्या अनलंकृत आणि 'घट्ट' भाषेबद्दल तक्रार नव्हती- जशी ती आधीच्या पिढ्यांची नक्कीच होती. ('घट्ट' हा धनंजयराव गाडगिळांनी आमच्या पिढीला दिलेला शब्द.) त्याहून म्हणजे नव्या पिढीतल्या एकाने जरा वैतागूनच म्हटले : दिलीप चित्रे, अशोक केळकर, राम बापट, भा. ल. भोळे यांचे समीक्षात्मक व वैचारिक लेखन पुरेशा प्रमाणात आणि वेळच्या वेळी पुस्तकरूपाने प्रकाशित न झाल्यामुळे आमच्या पिढीचे फार नुकसान झाले आहे.
काही दिवसांपूर्वी दुसऱ्या काही निमित्ताने काळसेकरांचे एक पत्र आले, त्याच्या शेवटी एक लहानसा ताजा कलम होता : आपल्या पुढच्या लेखनाच्या संग्रहाचे काम कुठे अडत आहे? कुठे अडत आहे हे मी त्यांना सांगितल्यावर लोकवाङ्मयगृहाने त्याचे प्रकाशन मनावर घेतले, आणि ही प्रकाशनपूर्वी कहाणी संपते. ती प्रातिनिधिक आहे का?
यात दोष कुणाचा? इथे 'दोष ना कुणाचा' असे म्हणण्याची सोय नाही. दोष म्हणायचा तर प्रकाशकांची उदासीनता, लेखकांची अ-तत्परता, आणि आपल्या वाचन-संस्कृतीचा एकारलेपणा असा संमिश्र आहे. मराठी वाङ्मयजगत् भारतात त्यातल्या त्यात पुढारलेल्यांपैकी एक आहे असे म्हणायचे तर आपल्यासमोरचे हे उदाहरण फारसे उत्साहजनक नाही. जेव्हा पुस्तक प्रकाशित होते तेव्हा या त्रयीत आणखी दोन घटक हिशोबात घ्यावे लागतात. त्यांतला एक वितरक- उत्तर भारतात लुटारू पद्धतीने या त्रयीचे शोषण करणारा पापग्रह असे त्याचे वर्णन माझ्या कानांवर आले आहे, मराठी वाङ्मयजगतामधली वितरणासंबंधीची स्थिती काय आहे याची मला कल्पना नाही. राहता राहिला पाचवा घटक म्हणजे ग्रंथपरीक्षण लिहिणारा, पारितोषिकाच्या निवडसमितीचा सदस्य इत्यादी. या घटकाला कितपत महत्त्व आहे याबद्दल मला शंका आहे. हा घटक जेव्हा प्रकाशकाचा सल्लागार म्हणून काम करतो तेव्हा त्याला थोडेबहुत महत्त्व असावे.
पुस्तक प्रकाशित होऊनदेखील दुर्लक्षित कसे राहते याचा माझा एक अनुभव या संदर्भात सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. प्राचीन भारतीय साहित्यमीमांसेविषयी एक-दोन मराठी पुस्तके वाचली. (शाळेत संस्कृतऐवजी फ्रेंच भाषा घेतली होती त्यामुळे थेट संस्कृतपर्यंत पोचण्याचा प्रश्न नव्हता.) पण विशेष प्रभाव पडला नाही. नंतर दि. के. बेडेकर आणि ग. त्र्यं. देशपांडे यांच्या लेखनामुळे तिकडे गंभीरपणे पाहू लागलो- विशेषतः तिच्यामधल्या रससिद्धांताकडे. मल लक्षात आले की बेडेकर आणि देशपांडे यांचे विवेचन परस्परपूरक आहे, त्यांचा एकत्र विचार करणे जरुरीचे आहे. त्याप्रमाणे मी एक दीर्घ लेख लिहिला. सुरेंद्र बारलिंगे त्यांच्या नेहमीच्या उत्साहात पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे परामर्श हे नवीन नियतकालिक काढत होते. त्याच्या पहिल्या अंकात लेख छापून आला. त्याच कंपोजवरून लेखाची प्राचीन मराठी साहित्यमीमांसा : एक आकलन नावाची पुस्तिकाही पाठोपाठ निघाली. बेडेकरांचे इतक्यात निधन झाले, पण देशपांड्यांना मी ती दाखवू शकलो. ते म्हणाले : बेडेकरांचे लेखन वाचल्यावर माझ्या पुस्तकाची फेरमांडणी करावी लागेल हे माझ्या लक्षात आले, पण मध्यंतरी मी वैदिक संशोधनात गुरफटून गेलो, माझ्या पुस्तकात किरकोळ सुधारणा करण्याखेरीज मी काही करू शकलो नाही याची रूखरूख होती. तुझ्या पुस्तिकेने ती दूर झाली, त्याबद्दल शाबास! नंतर देशपांडेही निधन पावले. या पुस्तकेची कुणकूण लागल्यावर हिंदीभाषक आणि गुजरातीभाषक यांनी तिचे अनुवाद करवले. हिंदी अनुवादाला मध्यप्रदेश साहित्य अकादेमीने पुरस्कार दिल्याची बातमी आली. यावर मराठीच्या काही प्राध्यापकांनी मला विचारले : तुम्ही हे पुस्तक अगोदर मराठीत का लिहिले नाही? आता बोला! मूळ मराठी पुस्तक अर्थात् अजूनही दुर्लक्षित आहे. (म. वा. धोंडांचे त्याच्याकडे लक्ष गेले, त्यांना ते आवडले आणि त्यांनी एका पारितोषिकाच्या निवड समितीत असताना त्याची शिफारसही केली, पण उपयोग झाला नाही. धोंड मला सांगतात : इतर सदस्यांनी त्यांनी बरोबर नेलेले पुस्तक उघडलेही नाही, केवळ नव्वद पानांच्या चोपड्याला काय बक्षीस द्यायचे हा त्यांचा अभिप्राय). मला आता राग येत नाही की वाईट वाटत नाही.
मराठी वाङ्मयजगत् पुढारलेले असेल, पण ते परवापरवापर्यंत स्वतःतच मश्गूल असे. इंग्रजी आणि संस्कृतखेरीज इतर लेखनाशी कुणाला फारसा संपर्क ठेवावासा वाटत नाही. ज्या मराठी मंडळींचा असा संपर्क असतो त्यांनी मराठी वाङ्मयजगताशी संपर्क ठेवावा असे वाटेलच असे नाही, किंबहुना त्यांना मराठी वाङ्मय फारशा गांभीर्याने घ्यावेसे वाटत नाही. इंग्रजी शिकवणाऱ्या वासुदेव बळवंत पटवर्धनांची (१८७०-१९२१) परंपरा पुढे क्षीण झाली. गेल्या एक-दोन वाङ्मयीन पिढ्यांमध्ये या दशेत थोडा बदल होत आहे अशी चिन्हे आहेत.
पुढच्यास काय ठेच लागली हे कळून मागचा शाहणा व्हावा या हेतूनं केळकरांनी ही चर्चा केल्याचं म्हटलंय. असं काही झालेलं दिसतंय काय? मुद्दा जुनाच आहे, म्हणतील काही लोक, पण त्यावर काही चर्चा पुढं गेलेली आहे काय? तसं काही होत नाही तोपर्यंत मराठी वाङ्मयजगत्, वाचकांची पिढी या शब्दांचे अर्थ ढोबळ पातळीवर तरी निश्चित कसे करायचे?
No comments:
Post a Comment