Tuesday 28 January 2014

एका मजकुराचा प्रवास : रेघ < दैनिक भास्कर < द हिंदू

१० ऑगस्ट २०१३ रोजी 'रेघे'वर एक नोंद प्रसिद्ध झाली होती. 'नावात काय आहे? बरंच काही' या शीर्षकाचा मोहम्मद नदीमुल्लाह खान यांनी लिहिलेला हा मजकूर होता. मुस्लीम नाव असलेल्या व्यक्तीला अहमदाबादमधे घर शोधताना आलेला अनुभव सांगणारा हा लेख होता. रेघेसाठीच खान यांनी लिहिलेला हा मजकूर मुळात इंग्रजीत होता, तो आपण मराठीत केला होता. हा मजकूर त्यानंतर लगेचच १४ ऑगस्टला 'दैनिक भास्कर'च्या नागपूर आवृत्तीमधे संपादकीय पानावर (डेंजर शीर्षकासह) प्रसिद्ध झाला होता. मुळात रेघेसाठी लिहिलेला हा मजकूर हिंदीतही प्रसिद्ध झाल्याचं इथं नोंदवता आलं असतं, पण राह्यलं. काही दिवसांपूर्वी हा मजकूर 'द हिंदू'मधे वाचकांच्या लेखनाला प्रसिद्धी देणाऱ्या 'ओपन पेज' या पानावरही प्रसिद्ध झाला नि त्यानंतर आता या घडामोडींची एक बारकी नोंद रेघेच्या मूळ वाचकांपर्यंत पोचवणं आवश्यक वाटलं.

या घडामोडीत 'दैनिक भास्कर'मधे मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर मूळ लेखकाला चारशे का पाचशे रुपये मानधन मिळालं, हे आपल्या दृष्टीनं एक नोंदवण्यासारखं. आणि 'द हिंदू'मधे मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर लेखकाकडे ऐंशीहून अधिक प्रतिसाद ई-मेलद्वारे आले. रेघेवर आपण आर्थिक मानधन देऊ शकत नसल्यामुळे इथला मजकूर दुसऱ्या कुठे मुख्य प्रवाहातल्या व्यासपीठावर छापून आला तर बरं, कारण त्यातून मूळ लेखकाला किमान आर्थिक परतावा मिळू शकतो, असा एक प्रयत्न. ह्या मजकुराच्या बाबतीत हे झालं. (लेखकाला मानधनाची अपेक्षा किंवा गरज तर अजिबातच नव्हती, पण माध्यमांसंबंधी एक आर्थिक बाजूचा मुद्दा आपण वेळो-वेळी नोंदवलाय, त्या संदर्भात हे आहे). आणि 'हिंदू'त इंग्रजी मजकूर छापून आल्यामुळे त्याला जरा जास्त प्रसिद्धी मिळाली नि आणखी तामीळमधेही अनुवादाची परवानगी मागणारी विचारणा लेखकाकडे झालेय, हेही एक या नोंदीबद्दल घडलेलं चांगलं.

रेघेवर नोंद करण्याच्या निमित्तानं लेखकानं मुद्दाम त्याचा अनुभव लिहून काढला होता, ते पुढे जाऊन जरा मूळ लेखकाला जास्त समाधान देणाऱ्या घडामोडी घडवणारं ठरलं, तर मोहम्मद नदीमुल्लाह खान यांनी हे  समाधान रेघेच्या इथल्या वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी खालील मजकूर पाठवला आहे :
''अहमदाबादमधे घर शोधत असताना एक मुस्लीम इसम म्हणून मला ज्या नकारांना सामोरं जावं लागलं त्यानं मी दुःखी झालो होतो, ही सुरुवात. त्यानंतर ज्यांच्या-ज्यांच्याशी बोलताना हा विषय निघायचा त्यांच्यापाशी मी ह्या दुःखातून निघालेला माझा राग व्यक्त करायचो. त्यावेळी 'रेघे'च्या माध्यमातून माझ्या रागाला वाट करून देण्याचा पर्याय माझ्यापुढे ठेवण्यात आला. मी माझा अनुभव इंग्रजीत लिहीन नि नंतर तो मराठीत भाषांतरित करून माझ्या कक्षेत अन्यथा न येणाऱ्या वाचकांपर्यंत तो पोचेल, असा हा पर्याय होता. मी तेवढं केलं नि आठवड्याभरात काही बऱ्या-वाईट प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्या. बहुसंख्य प्रतिक्रिया माझ्या म्हणण्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणाऱ्या होत्या.

दरम्यान, माझा एक जुना मित्र नि 'दैनिक भास्कर'च्या नागपूर आवृत्तीचा संपादक प्रकाश दुबे याला मी हा असा मजकूर लिहिल्याचं कळलं आणि त्याच्या पेपरसाठी मी या मजकुराचं हिंदी भाषांतर करून द्यावं असा आग्रह त्यानं केला. त्याला या लेखासंबंधी काय प्रतिक्रिया मिळाल्या ते मला कळू शकलं नाही, पण आणखी वेगळ्या प्रकारच्या वाचकांपर्यंत लेख पोचला, एवढं तरी झालं. त्यानंतर काही मित्रांनी सुचवलं की, मूळचा इंग्रजी मजकूर तसाही पडून आले, तर तोही कुठे प्रसिद्ध होईल का पाहायला हवं. त्या प्रयत्नातून 'द हिंदू'च्या 'ओपन पेज'वर १९ जानेवारीच्या रविवारी हा लेख छापून आला. आणि त्या दिवसापासून माझ्या ई-मेल बॉक्समधे पत्रांची आवक वाढत चाललेय. हा मजकूर लिहीपर्यंत (२४ जानेवारी) ऐंशीहून अधिक प्रतिक्रिया ई-मेलद्वारे मिळाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात वाचक माझ्या मुद्द्याशी सहमत आहेत. या लेखाच्या निमित्तानं मला मुस्लिम समुदायातली माझ्यासारखी नास्तिक मंडळी सापडली. ह्या देशात असा मी एकटाच आहे, हा माझा समज त्या निमित्तानं दूर झाला! काही मुस्लिम मंडळींनी मला पापक्षालन करण्याचा प्रमाणिक सल्ला देऊन काही पुस्तकं वाचण्याची शिफारस केली. मी जो मुद्दा मांडू पाहत होतो त्यातून हिंदू-मुस्लिम यांच्यातली असमानता दाखवायची असल्याचा समज काही वाचकांनी करून घेतला असावा, असं काही प्रतिसादांवरून कळलं. मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया बिगरमुस्लिम समुदायातल्या वाचकांकडून आल्या, त्यातल्या जवळपास सगळ्यांनी आपला समाज ज्या कुठल्या दिशेनं जातोय त्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुस्लिम भाडेकरू ठेवण्याबद्दल नकाराची भूमिका घेणाऱ्या हिंदू मंडळींचं समर्थन दोन वाचकांनी केलंय. हरयाणात कुठंतरी असलेल्या ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीतून मला व्याख्यान द्यायला बोलावणं आलं. नव्वद वर्षांच्या एका वाचकानं धर्मावर माझी श्रद्धा पुन्हा बसावी यासाठी माझं मन वळवायचा प्रयत्न सुरू केला. विचाराचा प्रवास सुरू आहे. ती विचाराची रेघ अशीच लांब लांब जाईल. आत्ता ह्या क्षणापर्यंत हे सगळं आनंद देणारं आहे. ह्या रेघेचं वर्तुळ पूर्ण होऊन ती माझ्या पाठीत घुसली नाही म्हणजे मिळवलं.''

पाठ