Wednesday 24 June 2015

शेवटचा पावसाळा (बहुतेक)

कोणी किती पावसाळे बघितलेत यावर माणसांमध्ये काही तरी ठरवतात. जास्त पावसाळे म्हणजे जास्त अनुभव, असं मोजमाप असावं. त्या मोजमापानं रेघेचा हा पाचवा पावसाळा आहे. रेघेच्या या पत्त्यावर दिसणाऱ्या नोंदी २०१० ऑक्टोबरपासून आहेत, त्यामुळं २०११पासूनचा पावसाळा धरला, तर हा २०१५चा पाचवा पावसाळा. (खरी तर रेघेच्या प्रवासाची सुरुवात २००८च्या शेवटाकडं नि २००९च्या सुरुवातीला अशी झालेली आहे, त्यामुळं तिच्यापुरता २००९चा पावसाळाही गृहीत धरायला हवा. मग दोन पावसाळे आणखी वाढतील. पण सध्या इथले पाचच मोजू.)

पाच-सात पावसाळे म्हणजे फारसे नाहीत, पण तरी आता बहुतेक हा रेघेचा शेवटचा पावसाळा आहे असं दिसतंय, त्यामुळं त्या निमित्तानं ही नोंद होतेय. शेवटचा पावसाळा असं का म्हटलं? तर, आता रेघेवर नोंद करावी असं वाटत नाहीये. मुद्दे नाहीत असं नाही, पण अनेक गोष्टी आधी जुळवून आणणं शक्य होत होतं ते आता होत नाहीये. मग अर्धवट कायतरी करण्यापेक्षा थांबलेलं बरं, असं वाटलं. सध्यातरी, हा शेवटचा पावसाळा असं वाचकांना कळवतो आहे. आलीच काही पुन्हा झड, तर सुरू करू. पण सध्या थांबा.

शिवाय, आपण मुळात प्रसारमाध्यमांबद्दल काही नोंदी करण्याचा हेतू समोर ठेवलेला. त्याला धरून गेल्या पाच वर्षांत बऱ्यापैकी नोंदी झाल्या. सुरुवातीला थोडी अडखळ जाणवतेय, पण मग बरं चाललं होतं. यातून माध्यमांच्या व्यवहारातला काही थोडासा तरी पॅटर्न स्पष्ट झाला असेल, तर बरं. दरम्यानच्या काळात, क्रमानं तेहेलका, झेड मॅगझिन, द हूट अशा नियतकालिकं-संकेतस्थळांशी थोडीशी हातमिळवणी करून काही भाषांतरित मजकूर इथं आणला गेला. त्यामध्ये जेवढं करायचं होतं, ते सगळं जमलं नाही. हे पर्याय आणखी चांगल्या पद्धतीनं वापरता आले असते, तर रेघेच्या या प्रयत्नाला आर्थिक पाठबळाचा प्रश्नही सुटला असता, पण ते जमवता आलं नाही. पण पर्याय चाचपले हे एक चांगलं झालं, असं वाटत. 

साहित्याविषयी काही दस्तावेज स्वरूपातलं काम रेघेला समांतर असं सुरू होतं. आणि रेघेवरही सुरू होतं. त्याबद्दल आपण इथं वेगळ्या नोंदी केल्या नाहीत कधी. पण त्या दस्तावेजाचा उपयोग झाल्याचं अधूनमधूून दिसत होतं. चिपळूणला मराठी साहित्य संमेलन झालं त्यावेळी हमीद दलवाईंच्या घरावरून दिंडी नेण्यासंदर्भात काही  वाद झाला. त्यावेळी आलेल्या बातम्यांमध्ये अनेकदा या दस्तावेजातल्या फोटोंचा फायदा झालेला दिसला. अलीकडं 'गांधी मला भेटला'च्या निमित्तानं वसंत गुर्जरांचा जो फोटो माध्यमांमधून मुख्यत्त्वे आला, तोही इथलाच. मध्यंतरी भाऊ पाध्यांचा रेघेवर नोंदवलेला लेख एका मासिकानं स्वतःहून मागितला. त्यांची त्यांना याबद्दल माहिती होऊन रेघेचा उपयोग झाला, हे बरं झालं. याशिवायही इथले काही फोटो आपसूक पसरलेले दिसले. मुळात हे दस्तावेज तयार करताना कुठून ना कुठून कात्रणांसारखं जमा करून ठेवण्याचा प्रयत्न होता. त्या त्या वेळी आपल्याला ज्या व्यक्तींबद्दल कात्रणं जमा करावी वाटली, ती जमा करून ब्लॉगवर चिकटवली, एवढाच प्रयत्न. यात मराठी साहित्यातल्या राजकारणापेक्षा व्यक्तिगत आवडनिवडीचा भाग होता. त्यामुळं भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, कमल देसाई, श्री. दा. पानवलकर, हमीद दलवाई, सदानंद रेगे, तुळसी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर असे ब्लॉग केले. आपण कात्रणं जमवल्यासारखं म्हटलं असलं, तरी प्रत्यक्षात इथं टायपिंग करण्यापासून, ज्यांचा मजकूर आहे त्यांची परवानगी घेण्यापर्यंत इतर अनेक खटपटींमध्ये वेळ गेला. यात फोटो जमवण्यात, मजकूर मिळवण्यात, ज्यांची मदत झाली त्याची नोंदही तिथं तिथं केली आहे. एकूण हा वेळ चांगला गेला आणि त्याचा बऱ्यापैकी उपयोग झाला असं वर्तमानपत्रांमधले किंवा इतर ब्लॉगवर दिसणारे फोटो बघून वाटतं. हे चांगलंच झालं.  पण काही वेळा इथला मजकूर योग्य ते शब्द गाळून, म्हणजे पूर्वप्रसिद्धी कळणार नाही, अशा रितीनं पसरवलाही गेला. काही वेळा त्याचा प्रसार होत आपल्याच रेघेच्याच ई-मेल पत्त्यापर्यंतही आला. काही वेळा या ब्लॉगांच्या घडवणीचं श्रेय वेगळ्याच स्वरूपात वेगळ्याच व्यक्तीच्या नावावर दिलेलंही दिसलं- एक दोन. हे आश्चर्यकारक नसेल फारसं, पण उबग आणणारं आहे.


प्रतिक्रियांबद्दल बोलायचं, तर नोंदींखाली तशा फारशा नोंदवल्या गेल्या नाहीत, पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या वाचकांकडून रेघ वाचली जात असल्याचं कळावं इतपत प्रतिक्रिया आल्या. पत्रकारांपुरतं बोलायचं तर, सोलापुरात एखाद्या वर्तमानपत्रात उप-संपादक/बातमीदार असलेल्या व्यक्तीपासून मुंबईत वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या पॉप्युलर व्यक्तीपर्यंत वाचक असावेत, किमान अधूनमधून ते रेघ चाळत असावेत, असं वाटण्यासारख्या प्रतिक्रिया आल्या. पत्रकारितेबाहेरच्या वाचकांबद्दल- इतिहास, वगैरे गोष्टींमध्ये संशोधन करणाऱ्या कोणाकोणापासून ते नागपुरात प्राध्यापक असलेल्या कोणाकोणापर्यंत तरी अशा बऱ्यापैकी प्रतिक्रिया अधूनमधून आल्या. व्यक्तींची नावं लिहिण्यापेक्षा ठिकाणं सांगायची तर रेघेच्या वाचकांमधलं कोणी कुठल्यातरी परदेशात, किंवा कोलकाता, मुंबई, सोलापूर, नागपूर, नाशिक, नगर, रत्नागिरी अशा कुठं ना कुठं असल्याचं कळावं एवढं काम या प्रतिक्रियांनी केलं. यातल्या काही प्रतिक्रिया टिंगल स्वरूपातल्याही होत्या, आणि बऱ्यापैकी सकारात्मकसुद्धा होत्या. एकूण मिळून हेही बरं वाटलं. 

रेघेवर ठरवलेलं असूनही न करता आलेल्याही काही नोंदी होत्या. नोम चोम्स्की यांचा 'मुख्य प्रवाहातील माध्यमं असतात तशी का असतात?' हा लेख आपण मराठीत इथं नोंदवला, पण त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट या पुस्तकाबद्दलची नोंद राहिलीच. काही जुन्या नियतकालिकांमधल्या निवडक लिखाणाच्या खंडांसंबंधी- द बेस्ट ऑफ क्वेस्ट, निवडक माणूस- नोंदी करायची बऱ्यापैकी तयारी करूनही त्या नोंदी झाल्या नाहीत. आणखीही काही मराठी पुस्तकं होती, पण ते जमवता आलं नाही. परत पावसाची झड आली तरच हे शक्य होईल. 

आणखी एक पूर्वीपासून असेलही कदाचित, पण सध्या प्रसारमाध्यमं एवढी वाढूनही, काही ठराविक गोष्टींचा, काही ठराविक व्यक्तींचा व्हॉल्यूम मोठमोठा होत जातो आणि अनेकांचा म्यूट होत जातो, असं वाटलं. अशा म्यूट व्यक्तींच्या आधारानं आपण रेघ चालवायचा प्रयत्न करत होतो. पत्रकारितेत म्यूट होऊन काम करत राहिलेले असतील किंवा बाहेरही आपापलं काम करताना दुसरं काहीतरी निसटल्यामुळं म्यूट झालेले असतील- या लोकांमुळंच रेघ सुरू झाली आणि सुरू राहिली. वरती आपण काही प्रतिक्रिया आल्याचं म्हटलंय, त्यात काही ज्येष्ठ आणि समाजात जास्त ओळखले जाणारे असे लोक आहेतच, त्यांच्या प्रतिक्रियांनाही महत्त्व आहे, पण या म्यूट राहिलेल्या कितीतरी प्रतिक्रिया रेघेला आधार देत होत्या. क्वचितच कधीतरी बोलून या प्रतिक्रिया आल्या असतील, बाकी म्यूट. या प्रतिक्रियांमध्ये अजिबात ढोंग नव्हतं, हे सगळ्यांत सुंदर. अशा बोलक्या आणि म्यूट प्रतिक्रिया देणाऱ्या सगळ्यांचे आभार. त्यांच्याच उल्लेखानं ही नोंद संपवू. 
***

काही ठराविक नोंदी सारख्या जास्त वाचल्या जात असलेल्या म्हणून दिसत राहिल्यानं, त्याच त्याच परत वर दिसतात. त्यावर थोडासा तोडगा म्हणून इथं काही निवडक नोंदींची यादी जोडून ठेवूया. म्हणजे कदाचित काही म्यूट झालेल्या नोंदीही अधूनमधून बोलत्या राहतील.-
***

म्यूट मान्सून (फोटो : स्टीव्ह मॅकरी)

4 comments:

  1. Replies
    1. धन्यवाद.. स्मायली इथं दिसत नाहीयेत, पण ही प्रतिक्रिया रेघेच्या ई-मेलवर दिसली, तिथं स्मायली मूळच्या रूपात दिसल्या. :)

      Delete
  2. रेघ अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, खूप चांगल्या नोंदी आहेत इथे, विशेषता भाऊ पाध्ये यांच्या विषयी, कमल ताई, रेगे चित्रे कोल्हटकर २०१२ पासून नियमित भेट दिली आहे, चार चांगल्या वाचकांना रेघ वाचण्यास सांगितल तरी पण मी प्रतिसाद म्हणून काहीही लिहिलं नाही, इथे आले की इथलं वाचून गुंगून जातो, मग आपण काही लिहायला पाहिजे होते हे हे सुचलं नाही.

    ReplyDelete
  3. रेघ अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, खूप चांगल्या नोंदी आहेत इथे, विशेषता भाऊ पाध्ये यांच्या विषयी, कमल ताई, रेगे चित्रे कोल्हटकर २०१२ पासून नियमित भेट दिली आहे, चार चांगल्या वाचकांना रेघ वाचण्यास सांगितल तरी पण मी प्रतिसाद म्हणून काहीही लिहिलं नाही, इथे आले की इथलं वाचून गुंगून जातो, मग आपण काही लिहायला पाहिजे होते हे हे सुचलं नाही.

    ReplyDelete