Sunday 21 January 2024

निवडक रेघ: पुस्तक

'रेघे'वर गेली सुमारे तेरा-चौदा वर्षं अनियमितपणे काही नोंदी होत आल्या आहेत. त्यातल्या निवडक नोंदींचं पुस्तक करण्याबद्दल क्वचित काही विचारणा होत आली. पण कधी पानसंख्या खूपच मर्यादित अपेक्षित असल्यामुळे किंवा कधी संबंधित प्रस्ताव मांडणारी संस्थाच बंद झाल्यामुळे त्यातलं काही पुढे गेलं नाही. त्यानंतर दोनेक वर्षांपूर्वी 'शब्द पब्लिकेशन'कडून असा प्रस्ताव आला. त्यांनी पानसंख्येची मर्यादा घातली नाही, आणि इतरही काही मर्यादा नव्हती. त्यामुळे ती वाट निवडावी वाटली. त्यानंतर काही नोंदी निवडून 'माध्यमं', 'भाषावापर', 'साहित्य', 'आजूबाजूचं काही' अशा चार विभागांमध्ये त्यांची मांडणी केली. बहुतेकशा नोंदींचं आवश्यक वाटेल तिथे पुनर्लेखन केलं, इंटरनेटवरच्या लिंकांसाठी टिपा टाकल्या, काही नोंदी परस्परांमध्ये मिसळल्या, काही टिपांमध्ये घेतल्या, इत्यादी संपादनाचा प्रयत्न केला. हे सगळं लिहिण्यासाठी ब्लॉगचं माध्यम का निवडलं, मुळातच रेघ ओढत बसावंसं का वाटतं, इत्यादी थोडा अंदाज देणारी प्रस्तावना जोडली. आणि मग रेघेवरच्या साधारण साठ-सत्तर नोंदींचा मजकूर सामावून घेणारा साठ प्रकरणांचा, ५६८ पानांचा, ८५० रुपये किंमतीचा, पुठ्ठाबांधणी असलेला खंड तयार झाला. तो आता २७ जानेवारी २०२४ रोजी छापून येईल, असं कळलं. त्यासंबंधी प्रकाशकांनी फेसबुकवर अधिक माहिती दिलेली आहे.

या खंडात घेतलेल्या बहुतांश नोंदी काही महिन्यांसाठी ब्लॉगच्या इथल्या पत्त्यावरून काढल्या आहेत; खोडलेल्या नाहीत. काहीएक पैशातली किंमत लावलेलं पुस्तक बाजारात विक्रीला असताना इथे त्याच नोंदी मोफत उपलब्ध असणं खरेदी-विक्रीच्या नियमाला धरून उरणार नाही, असं. तात्पुरतं.

 पुस्तकाचं पूर्ण कव्हर खाली चिकटवलं आहे.

मुखपृष्ठ: एम. प्रणव / शब्द पब्लिकेशन

पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा मजकूर असा:

गडचिरोलीत पाचेक हजार आदिवासींनी वनहक्कांसंदर्भात मोर्चा काढला, त्याची छोटीशीही बातमी मुख्यप्रवाही माध्यमांमधून का आली नसेल?

अमुकएक बिस्कीट खाण्यापेक्षा आमचं हे बिस्कीट खाणं ही 'इंटरनॅशनल' निवड असल्याचं एका जाहिरातीत का सांगण्यात आलं?

'डॅगर', म्हणजे खंजीर किंवा कट्यार, अशा नावाची बाइक 'रस्ते चिरत जा' असं जाहिरातीतून का सांगते?

एखादा नेता एकमेवाद्वितीय आहे, असं ठसवण्यासाठी माध्यमं नि चिन्हं कशी वापरली जातात?

एखाद्या नेत्याची किंवा विचारसरणीची मर्यादा सांगताना माध्यमं नि चिन्हं यांचा वापर कसा होतो?

एखाद्या कवीने ‘वर्ल्ड फेमस’ होण्यासंबंधी इंग्रजीचा उल्लेख करणं आणि कम्प्युटर हार्डवेअरचा कोर्स केलेल्या तरुणाने उपजीविकेच्या निकडीतून इंग्रजीचा उल्लेख करणं, यात काही सांगड घालणं शक्य आहे का? 

काही लेखकव्यक्तींच्या एखाद्या पुस्तकांबद्दल कधीतरी ऐकायला मिळतं, पण त्यांचं लेखक असणं अगदीच परिघावर का जातं?

'लेखकाचं क्षेत्र' म्हणजे काय? त्यात लेखकव्यक्तीला कितपत खटपट करता येते? समाज, बाजार, यांच्याशी लेखकव्यक्तीच्या वाटाघाटी कशा असतात?

एका मागून एक कोणत्या ना कोणत्या स्क्रिनवरची दृश्यं सरकावत राहणं, एकामागून एक दृश्यं स्वीकारत राहणं, हे काय आहे?

'दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं', ही सोपी म्हण आहे. पण खरं तर सगळं दिसत असूनही जग स्वतःला फसवून घेत नाही का?

या प्रश्नांमधल्या घटना नि तपशील वेगवेगळे असतील, तरी हे प्रश्न परस्परांहून तुटलेले नाहीत. उलट, असे प्रश्न अनेक सूक्ष्म धाग्यांनी परस्परांशी जोडलेले असतात. या धाग्यांच्या जमतील तशा नोंदी ठेवायचा प्रयत्न 'रेघ' या ब्लॉगवर गेली सुमारे तेरा-चौदा वर्षं अनियमितपणे सुरू आहे. यातल्या निवडक नोंदींचा वापर करून काहीएक सलग आकृती साकारण्याचा प्रयत्न सदर खंडामध्ये केला आहे.