ही नोंद पक्षपातीपणाने केलेली आहे. पण हा कोणाचं नुकसान करणारा पक्षपातीपणा नाही. एका अर्थी भावनिक भूमिका घेऊन होत असलेली ही नोंद आहे. शिवाय, त्यात 'रेघे'संबंधी एक मुद्दा आहेही, पण त्यावर स्पष्टपणे काही बोलता येणार नाही.
***
***
ह्या नोंदीची सुरुवात आजच्या 'लोकसत्ते'मधे गिरीश कुबेरांनी 'आठवावं असं काही...!' या शीर्षकाखाली 'बुक-अप!' या त्यांच्या सदरामधे लिहिलेल्या लेखातून झाली. हॅरॉल्ड इव्हान्स यांच्या 'गुड टाइम्स, बॅड टाइम्स' या पुस्तकाबद्दल कुबेरांनी लिहिलंय. आपण पुस्तक वाचलेलं नाही, पण हा लेख मुळातून वाचता येईल.
आपला विषय थोडा वेगळा आहे.
या लेखात कुबेर सुरुवातीला एक असं म्हणतात : मग पुण्यात पत्रकारितेची पदवी घेत असताना रानडे इन्स्टिट्यूटच्या वाचनालयात
हॅरॉल्ड इव्हान्स यांचं हे पुस्तक हाताळायला मिळालं. चांगली पुठ्ठ्याच्या
बांधणीची काळ्या कागदावर सोनेरी अक्षरानं नावं लिहिलेली प्रत होती. अत्यंत
आदरणीय अशी. त्या पुस्तकाला हात लावला तरी लेखकाचं वजन कळेल अशी. वाचायचा प्रयत्न केला, पण फारसं काही तेव्हा त्यातलं कळलं नाही.
***
रानडे इन्स्टिट्यूटच्या ज्या लायब्ररीचा उल्लेख कुबेरांच्या लेखात आलाय,
त्या संदर्भात तिथे शिकून गेलेल्या एका विद्यार्थ्याने आपल्याकडे एक मजकूर
आधी पाठवलेला. तो आपण आज इथे नोंदवूया. वाचनाच्या सोईसाठी बहुधा इथे ओळी
मोडलेल्या असाव्यात, पण हा गद्य मजकूर आहे.
लायब्ररी : एक |
रद्दीचे गठ्ठेच्या गठ्ठे
प्रत्येक महिन्याचा गठ्ठा सुतळीने बांधलेला
फक्त कामापुरते लोक आता ते गठ्ठे सोडतात
त्यातल्या बातम्या नाहीतर फोटो कापतात
आणि स्वतःच्या कामाला घेऊन जातात
पण बाकी त्या पेपरांकडे कोणाचं लक्ष नाही
म्हणजे लक्ष देऊन उपयोग नाहीच म्हणा
त्याच्यात सगळ्या शिळ्या बातम्या
म्हणजे छापल्या तेव्हा शिळ्या नव्हत्या
पण मग हळूहळू शिळ्या होत गेल्या
आता रोज नवंनवं काहीतरी घडतंच की
मग काहीतरी जुनं होणारच की
ते पेपर लायब्ररीत पडलेत म्हणून
नाहीतर रद्दीवाल्याकडे तरी गेले असते
पण आता ते इथे साठून ऱ्हाणार
ह्या लायब्ररीची परंपराच आहे ती
अनेक गोष्टी साठवून ठेवायच्या
मग त्या कामाच्या नसल्या तरी
कित्येक पुस्तकं, ज्ञानकोश, विश्वकोश, डिक्शनऱ्या
पीएचडीचे थिसीस, डेझर्टेशनं असं सगळं
जुनाट लाकडी कपाटांमध्ये
तिथे धूळ खात पडलंय
पेपरसुद्धा धूळ खातात
पण त्यांना कपाटात ठेवलेलं नाही
एका कोपऱ्यात पडून ते कपाटांबाहेरची धूळ खातात
पावसाळ्यात एक कुत्रा येतो
आणि त्या गठ्ठ्यांवर झोपतो
इतर वेळी तो बाहेर कुठेही झोपतो
पण पावसाळ्यात इथे येतो
आणि शांतपणे त्या पेपरांवर झोपतो
तसे पावसाळ्यात ते गठ्ठे कुबट होतात
पण कुत्र्याला त्या कुबटपणाचा फारसा त्रास होत नसावा
कारण तो शांतपणे त्या पेपरांवर झोपलेला असतो.
(रविवार, २४ जानेवारी २०१०)
***
लायब्ररी : दोन |
त्या भिंतींमधे
शंभर वर्षं बसून राहिलेले
अनेक दगड
प्रत्येक दगड वेगवेगळा
वेगवेगळा ओबडधोबडपणा असणारा
ऊन पाऊस वारा
अनेक वेळा आले नि गेले
दगड आपले जसेच्या तसे
जागच्या जागी
दगडांवर साचलेत
धुळीचे कण
असंख्य कण म्हणता येणार नाहीत
कारण मोजायचे तर मोजता येतील
पण काम अवघड होईल
आणि मोजून उपयोग काय
दगडांवरच्या त्या धुळीच्या कणांमध्ये
अनेक शब्दांचे कण
माणसांच्या तोंडून बाहेर पडलेले
मोबाईलमधून बाहेर पडलेले
पुस्तकांमधून बाहेर पडलेले
वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेले
एकमेकात अडकून
धुळीत एकत्र झालेले
अनेक शब्दांचे कण
प्रत्येक दगडाच्या ओबडधोबडपणात
अडकलेला ओबडधोबड अर्थ
कधी कधी दिसणारा
पण दिसला तरी
अस्पष्ट दिसणार
सपाट स्पष्टता नाही
दगडांना हात लावला की
हाताला धूळ लागते
धूळ झटकली की
शब्द खाली पडतात
(७ फेब्रुवारी २०१०)
***
एका कादंबरीतला ओबडधोबड मजकूर :
दगडी इमारतीच्या मागच्या बाजूच्या भागात लायब्ररीची छोटी जागा आहे. चौकोनी काचांची दारं असलेली पंधरा बुटकी जुनाट लाकडी कपाटं – तीन जरा मोठी लोखंडी कपाटं – कपाटांमधून एक छोटासा बोळ – उजवीकडे वळून एक दगडी पायरी – डावीकडे एक छोटीशी खोली – तिथे जरा मोठं टेबल, चारपाच खुर्च्या – एका कोपऱ्यात एक बंद लाकडी दार – दगडी पायरीच्या उजवीकडे थोडा लांब बारका बोळ – डावीकडच्या भिंतीत मोठ्या लाकडी चौकोनी धुरकट काचांच्या खिडक्या – त्याच भिंतीत लांबच्यालांब काळा कडाप्पा लावलेला टेबलासारखा वापरायला – बाकी इकडेतिकडे सातआठ खुर्च्या – तिकडेइकडे आठसात पेपर – वरती एक बंद एक चालू असे दोन पंखे – पंख्यांच्या वर आणि उरलेल्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये कोळीष्टकं.
२००८चा ऑगस्ट होता. आणि तो डिपार्टमेन्टच्या अंधाऱ्या लायब्ररीत. बाहेर पाऊस पडेल असं वातावरण होतं. बाहेरच्या झाडांच्या फिकट सावल्या कडाप्प्यावर. लोकसत्ता – सकाळ – इंडियन एक्सप्रेस – प्रभात – नवाकाळ – टाईम्स ऑफ इंडिया – नवभारत टाईम्स – केसरी – महाराष्ट्र टाईम्स – डीएनए – हिंदुस्तान टाईम्स – फ्री प्रेस जर्नल – एशियन एज – हिंदू - हे पेपर त्या दिवशीचे वाट्टेल तसे पसरलेले. दुपारी तीनपर्यंत ते खूपच अस्ताव्यस्त होऊन जातात. जुन्या पेपरांची उंच रद्दी कडाप्प्याच्या एका कोपऱ्यात.
----------
‘इकॉनॉमिस्ट’मधे वाचकांच्या पत्रव्यवहारात चे गव्हेराला एकाने bloodthirsty satan म्हटलेलं. एवढं काय गरज नव्हती. पण ठिकाय. इकॉनॉमिस्टसुद्धा शेवटी एक वर्तमानपत्रच होतं, आठवड्याला येणारं. दोनशे रुपये किंमतीत बारका अंक. गुडलक चौकातल्या स्टॉलवर किती अंक संपतात माहीत नाही. पण लायब्ररीत एक अंक न चुकता येतो, पांढऱ्या फोल्डरमधून.
इकॉनॉमिस्ट – टाईम – साधना – आऊटलूक – इंडिया टुडे – न्यूजवीक – फ्रंटलाईन – समाज प्रबोधन पत्रिका – अर्थबोध पत्रिका – नॅशनल जिऑग्राफिक – असे कित्येक अंक. वाचणारे वाचतात, न वाचणारे वाचत नाहीत. लायब्ररी आहे म्हणून असं नाही पण पत्रकारितेचा आणि वाचनाचा संबंध आहे असं एक आपलं म्हणण्यासारखं होतं. पण तसं म्हणण्यात अर्थ नव्हता, तरी दसनूरकर तसं म्हणतात.
काहीही असलं तरी हे असं सगळं लायब्ररीत येऊन साठत होतं. तो चे गव्हेराला शिव्या घालणारा अंक असाच कधीतरी २००८च्या पावसाळ्यातल्या एका महिन्यातल्या कुठल्यातरी आठवड्यातला. असं सगळं येऊन साठत होतं. काही नंतर कधीतरी रद्दीतपण जात असेल. काही कोणी घरी नेत असेल ते तिकडे. बाकी उरलेलं सगळं धुळीसारखं लायब्ररीत.
चांगलं आहे पण. लायब्ररीची ही सगळी धूळ आणि बाकी सगळं हे चांगलंच आहे. म्हणजे इकॉनॉमिस्ट, टाईमवाले एकाच बाजूचा बोंगा वाजवतात किंवा असा प्रत्येक छापील गोष्टीचा एकेक एकतर्फी बोंगा असतो हे सगळं खरंच. पण तरी लायब्ररी शांत आहे.
-----------
तो लायब्ररीत चाललेला. आत गेल्यावर उजवीकडच्या काचेच्या कपाटात एक 'एम. एन. रॉय' नाव एम्बॉस केलेला निळं बाईन्डिंग, कव्हर गेलेला खंड आहे, त्याची जागा कधीही हलत नाही, पण लक्ष जाईल एवढा आणि असा तो गप तिथे असतो. त्याच्यावर आडवं नेमकं आज संजय संगवईचं 'द रिव्हर अँड लाईफ' आहे, आकाशी रंगाचं, आकडे – मुद्दे – नर्मदेचं पाणी – धरण. त्याच्या बाजूला उभं गिचमिडीत अक्षरात नाव लिहिलेलं कुठल्यातरी कम्युनिकेशन थियरीचं पुस्तक आहे. अशा पुस्तकांची प्रचंड गिचमिड त्या कपाटात आहे, पण ती सोडून इतर पुस्तकं थोडी मधेच उपटलेली आहेत. खालच्या कप्प्यातल्या डाव्या कोपऱ्यात 'इंडिया – अ मिलियन म्युटिनीज नाऊ' असं व्ही. एस. नायपॉल सांगत होता आणि त्यातल्या मधल्या प्रकरणातून आधीचा सुरुवातीचा नामदेव ढसाळ म्हणाला की, 'स्वातंत्र्य हे कोणत्या गाढवीचं नाव आहे'. त्याच कप्प्यात खरं म्हणजे फिडेल कॅस्ट्रोचं छोटं ते 'माय अर्ली इयर्स'सुद्धा आहे. असायला काय कुठेही काहीही असू शकतं. 'अर्ली इयर्स'ला प्रस्तावना 'वन हन्ड्रेड इयर्स'च्या मार्खेजची. समोर गुलाबी सन्मायका लावलेल्या टेबलावर लोकसत्ता आणि एशियन एज एकमेकांशेजारी.
त्याने होते ते दोन पेपर घेतले नि तो आत गेला. आधीच कोणी ना कोणी येऊन वेगवेगळे पेपर आणलेले, ते होते कडाप्प्यावर, काही नीट घड्या, काही विस्कटलेले. बाकी अजून आतमधे कोणी नव्हतं. तो बसला. समोर खिडकीतून विचित्र प्रकाश, बाहेर हलणारी झाडं. थोडा वारा आला तेव्हा त्या कोपऱ्यातला पडायला आलेला एक पेपर पडला. खिडकीला लागलेली कोळ्याची जाळी हलली. ऊन हललं. थंड थोडं.
***