Tuesday, 2 October 2018

राष्ट्रातली प्रतीकं

‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी ‘स्वच्छता ही सेवा आंदोलना’चा आहे, असं पंतप्रधानांनी अलीकडे जाहीर केलं. गांधींना खरी आदरांजली देण्याची ही संधी असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, २९ सप्टेंबर हा ‘सर्जिकल स्ट्राइक दिवस’ म्हणून साजरा करायची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगानं शिक्षणसंस्थांना केली. ‘हे राजकारण नसून राष्ट्रभक्ती आहे,’ असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी म्हटलंय (टीका झाल्यावर, हा दिवस साजरा करणं अनिवार्य नसल्याचंही ते म्हणाले). गेल्या वर्षी ‘स्क्रोल’ या संकेतस्थळावर एक लेख (दुवा: http://tiny.cc/scroll-sewer) आला होता. ११ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या या लेखात (साउथ एशिया टेररिझम पोर्टल आणि सफाई कर्मचारी आंदोलन यांनी दिलेल्या) काही आकडेवाऱ्यांची तुलना होती. उदाहरणार्थ, २०१० ते (ऑगस्ट) २०१७ या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये प्राण गमवाव्या लागलेल्या सैनिकांची संख्या ४११ होती, म्हणजे वार्षिक सरासरी ५१ माणसं. याच कालावधीत गटारांत-नाल्यांमध्ये काम करताना मृत्युमुखी पडलेल्या सफाई कामगारांची संख्या होती ३५६, म्हणजे वार्षिक सरासरी ४४ माणसं. केवळ २०१७ या एका वर्षात, तो लेख प्रकाशित झाला तोपर्यंतची आकडेवारी पाहिली तर, काश्मीरमध्ये ५४ सैनिकांना प्राण गमवावे लागले होते, तर त्याच कालावधीत मृत्युमुखी पडलेल्या सफाई कामगारांची संख्या किमान ९० होती! सैनिकांच्या मृत्यूंची आकडेवारी जितकी अद्ययावत व बहुतांशी सर्वांगीणरित्या उपलब्ध होते, तितकी सर्वांगीण आकडेवारी सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूंबाबत उपलब्ध होणं अवघडच. पण या लेखात न आलेली आणि इतरत्र उपलब्ध होणारी आकडेवारी पाहिली, तर देशभरात वर्षाकाठी सरासरी १३०० कामगार मैलासफाई करताना मृत्युमुखी पडतात. हाती मैला उचलावा लागणारे सफाई कामगार गटारांमध्ये मरतात त्यामागं विषारी वायू, गुदमरणं, इतर अपघात, अशी विविध कारणं असतात. शिवाय त्वचेचे विकार, श्वसनाचे विकार, हे आहेच. 

तर, सैनिकी कारवाईत कोणालाही कुठल्याही सीमेवर प्राण गमवावा लागणं दुःखदच आहे, पण त्यात किमान जगताना व मरणोत्तर मान मिळतो (यातही अधिकारी वर्ग व सर्वसामान्य सैनिक यांच्यातील भीषण वसाहतवादी तफावत टिकवलेली आहे), काहीएक आर्थिक सुरक्षा मिळते. या तुलनेत, सफाई कर्मचाऱ्यांना मिळणारा मान, मानधन, सुरक्षितता यांचा विचार केला तर काय चित्र दिसतं? (कायमस्वरूपी नसलेल्यांमध्ये) महिन्याला जेमतेम चार-पाच हजार रुपयांपर्यंत कमावणारी सफाई कामगार मंडळी आहेत, त्यांना सुरक्षासाधनंही नाहीत, मान मिळण्याचा तर प्रश्नच नाही. साधारण ९५ टक्के सफाई कामगार दलित समुदायांमधून येतात. राष्ट्रातील मैला साफ करणाऱ्यांचं मरण ‘राष्ट्रभक्ती’च्या कक्षेत येत नाही, आणि मानवी जीवाचं मूल्य इतक्या विषम निकषांवर मोजलं जातं, हे क्रूर आहे.

(वरचे दोन परिच्छेद लोकसत्ता या वर्तमानपत्रात वाचक-पत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते.)

या संदर्भात ‘गांधी मला भेटला’ ही वसंत दत्तात्रेय गुर्जर यांनी लिहिलेली कविता (पहिलं प्रकाशन- जानेवारी १९८३) ही कविता आठवते. महापुरुषाची बदनामी व अश्लीलता, अशा मुद्द्यांवरून काही काळापूर्वी ही कविता न्यायालयीन खटल्याद्वारे गाजली. पण गुर्जरांची कविता ही खरं तर मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तीविषयीची नाही. या व्यक्तीतून निर्माण झालेल्या प्रतीकाविषयीची ही कविता आहे. तिची सुरुवात अशी:
गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० x १२च्या खोलीत ६ x २१/५च्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेव्हा तो म्हणाला-
सत्याहून सौंदर्य वेगळे असू शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे, त्या सत्याच्या द्वारा मी सौंदर्य पहातो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
ही कविता करणाऱ्याचं स्थान विचारवंत, कार्यकर्ता, इत्यादी प्रकारांमधलं नाही. तर चाळीतल्या दहा बाय बाराच्या खोलीत जगणाऱ्या साध्याशा माणसाचं आहे. या कवितेच्या प्रकाशनाला याच वर्षी पस्तीस वर्षं झाली. शिवाय, गांधींचं शतकोत्तर सुवर्णजयंतीचं वर्ष आता सुरू होतंय. रेडियोवर रोज ‘गांधीवंदना’ कार्यक्रम लागायचा. एका बाजूला तो ऐकायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यापासून दुरावलेलं वास्तव पाहायचं, या गुंत्यातून ही कविता लिहिली गेल्याचं गुर्जर यांनी एका संवादात म्हटलंय. त्यांचेच शब्द असे: 
'आता मी फिरत असतो आणि शेकडो माणसं बघत असतो. काही रस्त्यांवर. . . संवादसुद्धा ऐकू येतात म्हणजे. एकदा मी इराण्याच्या हॉटेलात चहा पिताना, एक गांधीवादी माणूस दुसऱ्याशी बोलताना ऐकलं. तो स्वातंत्र्यसैनिक वगैरे होता. तो सांगत होता की, 'बघा स. का. पाटील, केशवराव बोरकर, आम्ही सगळे वगैरे एकत्र काम केलंय. आता स. का. पाटील कुठेयत, बोरकर कुठेयत आणि माझी अवस्था काय आहे'. ते एक उदाहरण झालं. आणि लहानपणापासून रेडियोवर मी 'गांधीवंदना' हा कार्यक्रम ऐकतोय. काय होतं, अप्रत्यक्ष असा परिणाम होत असतो. कित्येक वर्षं ती 'गांधीवंदना' ऐकून ‘गांधी मला भेटला’, ती तयार झाली कविता. म्हणजे कित्येक वर्षं मी ते ऐकतोय. समाजात कायकाय बघत असतो वगैरे, म्हणजे माणसं, त्याच्यातून ती कविता स्फुरत जाते.'
तर, सर्वसामान्य माणसाला जाणवलेल्या किंवा त्याच्यावर रोजच्यारोज थोपवण्यात आलेल्या ‘गांधी’ या प्रतीकाच्या निमित्तानं ही कविता आहे. सत्याशी केलेल्या तडजोडीतूनच ही प्रतीकं उभारली जातात. ती कल्पित आदर्श रंगवणारी असतात, त्यामुळं वास्तवापासून त्यांची फारकत झालेली असते. ती फारकत कवीनं टिपली. काँग्रेसच्या घराणेशाहीपासून सदाशिवपेठेतल्या समाजवाद्यांपर्यंत, आणि उक्ती व कृतीमध्ये फेरफार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत कित्येक पातळ्यांवर ही भीषण तडजोड सुरू असल्याचं कवी नोंदवतो. हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन या धार्मिक घटकांमधल्या अंतर्विरोधांचीही नोंद करतो. सध्याचा काळ तर याहून अधिक प्रतीकं लादणारा झालेला आहे. जगडव्याळ तंत्रज्ञान आणि माध्यमांचा वापर करून प्रतीकांचा भ्रम निर्माण करणं अधिक सुकर झालेलं आहे. ‘स्वच्छ भारत’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्मार्ट सिटी’- इथपासून विविध पातळ्यांवर हा भ्रम आपल्याला दिसतो. वास्तव अर्थातच प्रतीकांपेक्षा विपरित असतं. पण आता हा प्रतीकांचा एकांगी मारा उबग येईल इतका वाढलाय, असं वाटतं. पस्तीस वर्षांपूर्वी लिहिलेल्या गुर्जरांच्या कवितेतल्या ओळी आता अधिक तीव्र आशयासह वाढत जातायंत, असं हे वास्तव वाटतं.

स्वच्छ भारत अभियानाचं एक पोस्टर

No comments:

Post a Comment