Saturday, 9 March 2013

ह्युगो चावेझ, बराक ओबामा आणि एक पुस्तक

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचं ५ मार्चला निधन झालं.

ज्यांना त्यांच्याबद्दल प्राथमिक माहिती हवी असेल त्यांना हे चार लेख वाचता येतील. (यात प्रत्येक प्रकाशनाचा आपापला पक्षपातीपणा आहे, पण तरी-) : एकदोनतीन (मराठी)। चार

याशिवाय चावेझ यांच्या निधनाच्या निमित्ताने आपण 'रेघे'वर काय नोंद करणार, असं कोणाला वाटलं असेल, तर आपण एका पुस्तकाबद्दल ही नोंद करणार आहोत. पुस्तक साधंसुधं नाही. सध्याच्या काळात 'बेस्टसेलर' ठरणाऱ्या पुस्तकांपैकीही हे पुस्तक नव्हतं. पण एप्रिल २००९मधे ते अचानक 'बेस्टसेलर' ठरलं. काही क्षणांमधे त्याचा 'बेस्टसेलर'पणाचा प्रवास झाला. 'अॅमेझॉन' या वेबसाइटच्या क्रमवारीत ते ५४हजारांहून खालच्या क्रमांकावर होतं आणि एका दिवसात ते दुसऱ्या क्रमांकावरचं खपाऊ पुस्तक ठरलं. कसं? तर त्यासाठी तुम्हाला हा फोटो पाहावा लागेल.

बराक ओबामा, पुस्तक आणि ह्युगो चावेझ (फोटो - इथून)
एप्रिल २००९मधे अमेरिकी राष्ट्रांच्या परिषदेदरम्यान चावेझ यांनी ओबामा यांना एक पुस्तक दिलं. ते पुस्तक देतानाचा हा फोटो. (त्याचा व्हिडियोही पाहाता येईल). या पुस्तकाचं नाव : 'ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका'. एदुआर्दो गॅलिनो यांनी लिहिलेलं. मूळ पुस्तक स्पॅनिश भाषेतलं आणि चावेझनी ओबामांना दिलेली प्रत स्पॅनिशच होती.

काय आहे या पुस्तकात आणि चावेझनी ते ओबामांना का दिलं असेल? आणि एकूणच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि लॅटिन अमेरिकी राष्ट्रं यांच्या संबंधांच्या संदर्भात या पुस्तकाचा काही संबंध आहे का? एका लॅटिन अमेरिकी राष्ट्राच्या अध्यक्षाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या अध्यक्षाला हे पुस्तक भेट देण्यातला मजबूत अर्थ काय असेल? या कृतीचा आणि पर्यायाने चावेझ कशाचं प्रतीक ठरत होते याचा शोध घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला ह्या पुस्तकात शिरावं लागेल.

'आम्ही शांतता राखलेय
मूर्खपणाच्या जवळपास जाणारी'

 - या दोन ओळी एका 'क्रांतिकारी जाहीरनाम्या'तल्या. हा जाहीरनामा १६ जुलै १८०९चा. या ओळी देऊन 'ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका'मधे वाचकाचं स्वागत केलं जातं.

ही शांतता म्हणजे वसाहतवादी शक्तींविरोधात उर्वरित जगाने राखलेली असं आपल्याला आपसूक पुढच्या पुस्तकातल्या मजकुरावरून कळून येतं. कारण, पुढच्या पुस्तकभर पसरलेला मजकूर आहे तो आपला इतिहास आपण सांगत जाणारा. इथे 'आपण' म्हणजे लॅटिन अमेरिकी. पाचशे वर्षांची पिळवणूक आणि वसातवादी सत्तांना सहन केलेला प्रांत. चिली, व्हेनेझुएला, बोलिव्हिया, पेरू, कोलंबिया, अर्जेन्टिना, उरुग्वे, ब्राझील, क्युबा, इत्यादींनी बनलेला. गॅब्रिएल गार्सिआ मार्क्वेझ, ऑक्ताव्हिओ पाझ, आताचा रॉबर्तो बोलॅनो या लेखक मंडळींचा प्रांत (अधिक वाचन असलेले लोक यात आणखी नावांची, योग्य उच्चारांसह भरही घालू शकतील). काही बाबतीत आपल्याशी जुळणारा इतिहास असलेला, आणि 'तिसऱ्या जगा'तला प्रांत. त्यामुळे तिथली मंडळी जेव्हा 'आपण' असं म्हणतील तेव्हा आपण भारतीय उपखंडातली मंडळीही क्वचित त्यात सामील होऊ शकतो. आणि वसाहतवादी इतिहासाकडे पाहण्याच्या संदर्भात तर होऊच शकतो.

आपण इतिहासाचे विद्यार्थी किंवा जाणकार नसू तरीसुद्धा हे पुस्तक आपण वाचू शकतो. 'रेघे'वर इतिहासाशी संबंधित थेट नोंद करावी एवढं त्यातलं ज्ञान आपल्याकडे नाही, पण आपण सामान्य वाचक म्हणून हे पुस्तक वाचू शकतो म्हणूनच 'रेघे'वर त्याबद्दल नोंद होऊ शकतेय. लॅटिन अमेरिकी नावांचे उच्चार आपण मूळाबरहुकूम करू शकूच असं नाही, तरीही आपल्याला हे पुस्तक वाचता येतं. 'रेघे'वरच्या या नोंदीत आपण उच्चारांपेक्षा पुस्तकातल्या आशयाकडे पाहूया.

खरं तर इतिहासाशी संबंधित हे पुस्तक असलं तरी पत्रकारी कौशल्य आणि गोष्ट सांगण्याचं कौशल्य या दोन पायांवर उभं राहून त्यात इतिहासाची आठवण जागवलेली आहे. याचमुळे 'रेघे'वर त्याची नोंद होऊ शकते.

उरुग्वीयन असलेले एदुआर्दो मूळचे पत्रकार आणि त्यांनी १९७० हे वर्ष संपतानाच्या तीन महिन्यांमधे 'ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका' या ग्रंथाचं लेखन करून टाकलं. त्यापूर्वीची चार वर्षं त्यांना संदर्भ शोधण्यात घालवावी लागली. हा साधारण काळ असा होता जेव्हा क्युबामधे कॅस्ट्रो सत्तेवर होते, पण चिलीमधलं लोकशाही मार्गाने निवडून आलेलं साल्वादोर आयेंदे यांचं सरकार उलथून तिथे जनरल ऑगस्तो पिनोशेत यांची सत्ता अमेरिकेच्या कृपेने वावरू लागली होती. त्यातून संपूर्ण खंडामधे अस्थिरतेचं वातावरण होतं. उरुग्वेमधेही ही अस्थिरता होती, त्याचा परिणाम म्हणून एदुआर्दो यांनाही देश सोडावा लागला, मग कालांतराने सरकार बदललं आणि त्यांना परतही येता आलं, वगैरे इतिहासात आपण आत्ता जाण्याचं कारण नाही. फक्त इसाबेल आयेंदे पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगतात ते एक वाक्य लक्षात ठेवू : '(एदुआर्दो यांना).. माझ्या माहितीतल्या इतर कोणाहीपेक्षा लॅटिन अमेरिका अधिक जवळून माहिती आहे. आणि या माहितीचा वापर करून ते इथल्या लोकांची स्वप्नं, निराशा, आशा, अपयश यांच्या कथा जगाला सांगत आहेत.'

फेबर अँड फेबर आवृत्ती, २००९
पुस्तकाच्या मुख्य मजकुराची सुरुवात या वाक्याने होते :

राष्ट्रांमधल्या श्रमविभागणीचा अर्थ काही राष्ट्रं जिंकण्यामधे कुशल असतात तर काही हरण्यामधे.

या वाक्यानं सुरू झालेलं हे पुस्तक इतिहास 'हरलेल्या' लॅटिन अमेरिकेच्या अंगाने सांगत जातं. संपत्तीनिर्मिती, तिचा साठा, त्यातून निर्माण होणारी आर्थिक दरी, यामध्ये तथाकथित महासत्तांचा हात यांची मांडणी एदुआर्दो करतात. हे करताना ते आकडेवारी देतात, तथ्यांचा तपशील देतात. त्यात क्वचित केवळ तथ्यांची मालिकाच वाचल्यासारखंही वाटतं, पण मधेच ते एकदम विधान वजा शेरा करून आपल्या तथ्यांच्या मालिकेला वाचनीय करून टाकतात.

ख्रिस्तोफर कोलंबसाने या खंडावर पाऊल ठेवलं तिथपासून सुरू झालेल्या स्थानिकांच्या पिळवणुकीची नोंद करून एदुआर्दो इतिहासाची मांडणी करत जातात. तटस्थपणापेक्षा आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना जाब विचारण्याच्या पद्धतीने ते इतिहास सुनावत जातात. यात आकडेवारीचीही रांग आहेच. उदाहरणार्थ, सतराव्या शतकाअखेरच्या फ्रेंच कागदपत्रांवरून आपल्याला समजतं की, स्पेनकडे त्याच्या वसाहतींपैकी केवळ पाच टक्के व्यापाराचाच ताबा होता. त्यांच्या वसाहतींपैकी जवळपास एक तृतीयांश व्यापार डच व फ्लेमिश लोकांच्या हातात होता, एक चतुर्थांश भाग फ्रेंचांकडे, इंग्रजांकडे एक दशांश व काही भाग जर्मनांकडे होता. लॅटिन अमेरिका ही युरोपीयनांचा धंदा ठरली होती.

आत्ता जे प्रांत सर्वाधिक दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत, तेच इतिहासात सर्वांत जास्त नागरीकरण झालेले आणि सुबत्ता अनुभवलेले होते, असा संदर्भ देऊन एदुआर्दो बोलिव्हियातल्या पोटोसी या शहराचं उदाहरण देतात. मोठ्या प्रमाणात चांदी राखून असलेली इथली जमीन आणि इथली माणसं दोघांच्या विल्हेवाटीची सुरुवात वसाहतवादी काळात झाली आणि पूर्ण पिळून काढून इथून वसाहतवादी मंडळी निघून गेली तेव्हा मागे राहिलं ते दारिद्र्य. (गेल्या वर्षी ऑगस्टमधे बोलिव्हियाच्या सरकारने कॅनडीयन कंपनीच्या मालकीच्या एका खाणीचं राष्ट्रीयीकरण करून टाकलं, हे या पार्श्वभूमीवर पाहाता येईल.)

या वसाहतवादी पिळवणुकीविरोधात उभ्या ठाकलेल्या बंडखोरांचे दाखलेही एदुआर्दो देत जातात. यात पेरूमधल्या थुपाक आमरू याचं उदाहरण देताना एदुआर्दोंनी थुपाकला पकडल्यानंतरचा एक प्रसंग सांगितला आहे. थुपाकने आपल्या सहअपराध्यांची नावं सांगितली तर त्याला सोडून देण्यात येईल, असं आश्वासन घेऊन एक स्पॅनिश अधिकारी त्याच्या तुरुंगात गेला, त्यावर थुपाक म्हणाला की, 'तुझ्या आणि माझ्याशिवाय यात कोणीच सहअपराधी नाही. तू, दमनकर्ता म्हणून आणि मी स्वातंत्र्यवादी म्हणून मरून जाऊयात.' 

इतिहासासोबत सध्याच्या परिस्थितीतल्या तथ्यांचीही मांडणी एदुआर्दो करतात आणि त्यातून लॅटिन अमेरिकेच्या पिळवणुकीचं एक चित्र उभं करतात. जगातील तांब्याच्या साठ्यांपैकी काही मोठे साठे (सुमारे एक तृतीयांश) चिलीमधे अँडीज् पर्वताच्या उतारावर आहेत. चिलीतील हे तांबं अनेकदा सोनं, चांदी आदी धातूंना सोबत राखून असतं, त्यामुळे इथल्या तांब्याच्या उत्खननाला भाव आहे. आणि चिलीत कामगार अतिशय स्वस्तात मइळतात. १९६४ साली केनेकॉट कंपनी अमेरिकेतील आपल्या कामगारांना जितकं वेतन देत होती, त्याच्या एक अष्टमांश वेतनामधे चिलीत खाणकामगार मिळत असत. आणि दोन्ही ठिकाणी कामगारांची उत्पादकता मात्र सारखीच. या कंपन्यांमधील अधिकारी वर्गाचं वेगळंच जग असतं, तिथे फक्त इंग्रजी बोलली जाते. या कंपन्यांच्या मालकीच्या खाणींची तांब्याची उत्पादकता १९४५पासून पन्नास टक्क्यांनी वाढली पण कामगारांची संख्या एक तृतीयांशाने कमी झाली - असं सांगून एदुआर्दो तिथे झालेल्या पिळवणुकीच्या वाढीकडे बोट दाखवतात.

लॅटिन अमेरिका प्रांताच्या नसा कायम खुल्या राहिल्या. सुरुवातीपासून इथली प्रत्येक गोष्ट युरोपात व नंतर अमेरिकेतल्या भांडवलामधे परावर्तित झाली आणि दूरवरच्या सत्ताकेंद्राकडे साठवून ठेवण्यात आली - हे एदुआर्दोंच्या पुस्तकाचं विधान आहे. आणि या विधानाच्या संदर्भात लॅटिन अमेरिकी नेत्यांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला उद्देशून केलेल्या विधानांकडे आणि चावेझ यांच्या असण्याकडे (/नसण्याकडे), लॅटिन अमेरिकेतल्या डाव्या विचारसरणीच्या सरकारांकडे पाहिलं तर पेपरांमधे आलेल्या बातम्यांपलीकडचे आणखी काही संदर्भ आपल्याला इकडून तिकडे पाहाताना उलगडू शकतात आणि एकदम कुठलीही बाजू घेण्याचं आपण टाळू शकतो.
****


पाहुनिया ग्रंथ     करावे कीर्तन।
तेव्हा आले जाण     फळ त्याचे।।
- तुकाराम

4 comments:

  1. Sadly, I have yet to read a balanced article on the late Mr. Chavez. Hindu lionizes him and even our Loksatta demonizes him.

    Where is the reality? We live in Anglo-Saxon world and our thinking is shaped by Anglo-Saxon values.

    Sad.


    ReplyDelete
  2. चावेझबद्दल, आणि महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकाविषयी लिहिल्याबद्दल धन्यवाद...अजून एक म्हणजे तू 'मजबूत' हा शब्द खूप सुंदर प्रकारे वापरतोस...उदा. 'हे पुस्तक म्हणजे पत्रकारितेशी मजबूत संबंधित आणि पुन्हा स्वतंत्र पुस्तक म्हणूनही सुंदर अशी गोष्ट असल्यामुळे आपण तिची नोंद करतोय'...'एका लॅटिन अमेरिकी राष्ट्राच्या अध्यक्षाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या अध्यक्षाला हे पुस्तक भेट देण्यातला मजबूत अर्थ काय असेल? ' इ. बाकी तुकारामांबद्दल आपण काय बोलणार? 'पाहुनिया ग्रंथ| करावे कीर्तन।|' _/\_

    ReplyDelete
  3. Most of the times we share our thoughts when a one revolutionary dies.But (in the narrow thinking people who control the media) there is nobody enabled to argue whether Chavez was ''Dominant - माजलेला'' or not. He was
    against the destructive capitalism. 'Open veins of Latin America'... this book gives real answers. How such powers destroyed the nature and culture... and ruined the lives of people.

    ReplyDelete
  4. रेघ...समांतर...गोंगाटावरचा उतारा..एवढे सगळे संदर्भ देऊन सामान्य वाचकाला एवढी माहिती सध्या शब्दात इथं मिळते. अगदी फुकटात. खुश व्हावं कि गंभीरपणे विचार करावा कळत नाही.
    स्नेहलच्या मताशी पूर्ण सहमत. 'मजबूत' शब्द 'मजबुतपणे' वापरता 'मजबूत' ठिकाणी.
    Thank you.

    ReplyDelete