Tuesday, 30 April 2013

सैलीचा हँग-ओव्हर व प्रामाणिक लेखनाचा एक नमुना

 मुखपृष्ठ : अंजलीन इला मेनन यांच्या
कन्डोलिम (१९८५, ४८ X ३६) - या चित्राचा भाग
श्रीकांत सिनकर हे नाव ज्यांना माहीत असेल, त्यांना ते बहुधा पोलीस चातुर्यकथा नि तश्याच पद्धतीच्या कादंबऱ्यांच्या संदर्भात माहीत असण्याची शक्यता जास्त आहे. पण सिनकर हे त्यापलीकडेही काही लिहून गेले. याचा एक दाखला आपल्याला यापूर्वी 'रेघे'वरच्या एका नोंदीत दिसला आहे, तो 'निवडक अबकडइ'तल्या एका लेखासंबंधी. पण आता हा दाखला अधिक ठळकपणे, एका पुस्तकातूनही आपल्याला सापडू शकतो. हे पुस्तक आहे 'सैली : १३ सप्टेंबर'. हा खरं म्हणजे व्यक्तिचित्रणपर पाच लेखांचा संग्रह आहे, पण सिनकरांच्या मते हा कथासंग्रह आहे, किंवा वाचकाला असंही वाटतं की, लेखक आपल्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तींच्या सोबतीने घालवलेल्या काळाची नि त्यातल्या आनंदाची, चुकांची प्रामाणिक कबुली या लिखाणातून देतोय, म्हणजे आत्मकथनासारखं काहीतरी दिसतंय. तर साधारण असं हे सगळंच असलेला मजकूर या पुस्तकात आहे. आणि या सगळ्या मजकुराचा एक अतिशय चांगला नि महत्त्वाचा गुण आहे तो प्रामाणिकपणा. 

या पुस्तकाची पहिली आवृत्ती फेब्रुवारी १९८१मध्ये पुण्याच्या 'रविराज प्रकाशना'तर्फे आली होती. त्यानंतर आता तीस वर्षांनी दुसरी आवृत्ती (एका लेखाची भर टाकून) 'लोकवाङ्यमय गृहा'ने काढलेय. 

'न्यूयॉर्कचा जगन', 'दत्तू बॉयलर', 'सैली : १३ सप्टेंबर', 'जिन 'जिमलेट'' आणि 'सुंदर सावली सापडली' असे पाच लेख आहेत या पुस्तकात. यात 'न्यूयॉर्क' म्हणजे मटक्याचा अड्डा, दत्तू बॉयलर हा एका दारूच्या गुत्त्यावरचा पोऱ्या असलेला आणि नंतर दुसरीकडे मॅनेजर झालेला गडी, सैली म्हणजे सिनकरांनी जिच्यावर मनापासून प्रेम केलं नि जिच्याशी लग्न करण्याची त्यांची इच्छा होती अशी वेश्या. सिनकरांचं अनुभवविश्व हे असं होतं. पण केवळ त्यातल्या अनुभवविश्वाला भुलून आपण हे पुस्तक चांगलं आहे असं म्हणत नाहीयोत, तर अनुभव कोणताही असला तरी तो सांगण्यातला लेखकाचा प्रामाणिकपणा हा गुण अतिशय महत्त्वाचा, असं मानून आणि तो गुण या पुस्तकात मुबलक प्रमाणात आहे म्हणून ही नोंद करतोय. शिवाय इतर कोणत्या गोष्टीपेक्षाही 'लिहिण्याचं काम' हा 'रेघे'चा अगदीच महत्त्वाचा भाग असल्यामुळे ही आणि अशा नोंदी 'रेघे'वर आपण करत आलोय नि करत राहू शक्यतो.

तर सैली... ह्या पुस्तकातल्या फक्त 'सैली : १३ सप्टेंबर' या लेखाबद्दलच आपण बोलूया. कारण पुस्तकाचा सगळ्यात सुंदर भाग हाच आहे, असं मला वाटतं. आणि त्याबद्दल बोललं की बाकीच्या लेखांचाही अंदाज येऊ शकतो. 

सैली ही नेपाळी वेश्या होती. सिनकरांच्या आयुष्यात ती आली. किंवा खरं तर सिनकर तिच्या आयुष्यात गेले असं म्हणणं जास्त बरोबर आहे. तर हे दोघंही एकमेकांच्या आयुष्यात आले. आणि त्यांनी एकमेकांवर मनापासून प्रेम केलं. हे 'मनापासून' म्हणजे इतकं की ते सगळं ह्या लेखात सारखं वाचकाच्या मनालाही धक्का देईल इतकं. १९६४ साली सैली नि सिनकर एकमेकांच्या आयुष्यात आले आणि १९७१ साली त्यांचं प्रकरण संपलं. हे प्रकरण म्हणजेच हा लेख.

सिनकरांच्या लिखाणात आपण असं असं जगलो याचं फुशारक्या मारणारं वर्णन नाही, आपण असं जगलो म्हणून बाकीचे जगतात ते भुक्कड आहे असला आव नाही. (तरी सिनकरांबद्दल जे तुरळक लोक बोलतील ते मात्र असंच बोलतील. त्यांनी अधोविश्वाबद्दल लिहिलं वगैरे, याचाच गवगवा होईल आणि त्यांच्यावर काहीतरी शिक्का बसवला जाईल. अधोविश्वाबद्दल लिहिलं हे एक वैशिष्ट्य आहेच, पण त्यातले प्रामाणिकपणासारखे इतर गुण असतील, ते शोधायला हवेत. पण आपण एखादं वैशिष्ट्यच फक्त बोलल्यामुळे लेखक म्हणून त्यांच्याबद्दल अधिकचं काही बोलणं थांबेल. आणि असली वरवरची वैशिष्ट्यं आपल्यातही आहेत असंही काही लोकांना वाटत राहील. ठीकच तेही).

जे आहे ते आहे, जे झालं ते झालं - असं साधारण सिनकरांचं दिसतं. अशाच जगण्यात त्यांचं सैलीवर प्रेम बसलं. वास्तविक वेश्यावस्तीत ज्या कामासाठी जातात त्या कामासाठीच सिनकर गेलेले, पण सैलीच्या बाबतीत त्यांना जे वाटायला लागलं ते केवळ एवढ्या कामापुरतं उरलं नाही. आणि नुसतं हे शारीरिक काम तर सिनकर तसंही बाहेर मैत्रिणींच्या संगतीत भागवू शकत होते, असं तेच सांगतात. पण सैलीची गोष्टच वेगळी होती. तिच्यासोबत संसार मांडणंच सिनकरांच्या मनात होतं, पण सैलीने या प्रस्तावाला दाद दिली नाही :
नवीन आवृत्तीत बाळ ठाकूरांच्या रेखाचित्रांचीही
जोड लेखांना दिलेय. त्यातली सैली.
कोणत्या भाषेत नि कोणत्या शब्दांत या मूर्ख मुलीला समजावू की माझ्याबरोबर लग्न करण्यात तुझं भलं आहे? मी तिला नेहमी म्हणायचो, मी जगाची पर्वा करत नाही. जेव्हा मी असं ठरवतो, तेव्हा सर्व गोष्टींचा सर्व बाजूंनी मागचा-पुढचा विचार केलेला असतो. माझ्या डोक्यात किडा वळवळत होता, तो हाच की अगोदर लग्न करून मग कादंबरी लिहायची. सैली वेश्या आहे म्हणून मला तिचा उद्धार करायचा नव्हता. उद्धार वगैरे गोष्टी मला समजल्याच नाहीत. मला एक आणि एकच कळत होतं, सैली हीच माझ्या जीवनातील यशस्वी जोडीदारीण होऊ शकते. सेक्सचा काहीच प्रश्न नव्हता. सेक्सपेक्षा जास्त जमल्या होत्या एलिमेंट्स गेल्या सहा वर्षांत! दोन उदाहरणं देतो :
एकदा अचानक आजारी पडलो. तीन दिवस सैलीकडेच होतो. काही फ्ल्यू वगैरे असेल. पण बाई घाबरली. फॉकलंड रोडवरील बहुतेक सर्व वेश्या नजीकच्या 'गोल देवळा'पाशी असलेल्या डॉक्टर मंडळींकडे उपचारासाठी जातात आणि तिथून परतताना त्या देवळात जात. मी आजारी असताना ती म्हणाली,
''तुम जल्दी ठीक हो जाओगे!''
''कैसे?''
''मैने मंदिर में भगवान की प्रार्थना की है।''
मी मंद स्मित केलं. मी देवळात जात नाही. माझ्या विचारी बुद्धीला जाणं शोभणारं नाही. मी बरा होईन तो कुणा एम.बी.बी.एस. डॉक्टरच्या ट्रिटमेंटनेच होईन हे मला कळतंय. प्रार्थनेने तर अजिबात बरा होणार नाही. पण तरीही कुठेतरी असं भोळंभाबडं रूप जवळ असावं, कायमचं असावं, असं मला नेहमीच वाटायचं.
दुसरं उदाहरण इथे देत नाही. पण अशा काही गोष्टी जुळल्या नि त्यामुळे सिनकरांनी सैलीशी लग्न करायचं ठरवलं. अर्थात सैलीला सिनकरांबद्दल प्रेम वाटत असूनही तिला लग्न करण्यासाठी तयार होता येईना. का? माहीत नाही. पण लग्न काही झालं नाही. अर्थात लग्न करायचं ठरल्यावर सिनकर कुठेतरी त्याबद्दल बोलले नि मग झाली चर्चा सुरू :
... मग माझ्या लग्नाची चर्चा गावभर सुरू झाली. जो तो विचारायचा, ''हे खरंय?'' मी म्हणायचो, ''हो हे खरं आहे.'' एकदा लायब्ररीत बसलो असताना एका विद्वान गृहस्थांनी मला संदर्भ विभागातून बाहेर काढलं.
''द्या, द्या, तुमची एक सिगरेट!''
मला या गाडीचा पुढचा सिग्नल समजला होता. आम्ही खाली भटाच्या बाकावर चहा घेऊ लागलो... आणि मग त्यांच्या स्टाइलमध्ये ते, ''तो हा कोण तो आपला परवा भेटला होता, काय त्याचं नाव...''
''ठीक आहे. नाव सोडून द्या! म्हणत काय होता तो?''
''म्हणजे तसं तो म्हणत होता, हं... काय बरं...''
''तो हेच म्हणत असेल की मी एका नेपाळी वेश्येबरोबर लग्न करतोय!''
''अं... हो... असंच काहीतरी!''
''काहीतरी नाही. ते खरं आहे.''
आपल्या विद्यार्थ्यांवर प्राणापलीकडे प्रेम करणारे हे मध्यमवर्गीय विद्वान प्राध्यापक ज्यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे.. आता ते हाताने डोकं खाजवू लागले.
''मी जर लग्न केलं तर तुम्ही याल ना?''
''हो, हो, येईन ना!''
''मग सर...'' मी सिगरेट पेटवीत म्हणालो, ''मी टॅक्सी थांबवतो. चला, येता माझ्याबरोबर फॉकलंड रोडवर? मी तुमची आणि तिची आत्ताच ओळख करून देतो.''
सरांना घाम फुटला. ''नाही. मी आलो असतो पण आता लेक्चर आहे...'' वगैरे म्हणून गायब!
चर्चांमध्ये जसे वरचे प्रोफेसर भेटतात तसेच कार्यकर्ता प्रकारातले लोकही आहेत. पण सिनकरांना त्यांच्यातही इंटरेस्ट दिसत नाहीये :
एका प्रसिद्ध युवक संघटनेचा कार्यवाह येऊन भेटला. ''हे तू फार चांगलं करतोयस. असं धाडस कोणी दाखवत नाही.'' मनात म्हटलं, ''मग तू दाखव!'' तो पुढे असंही म्हणाला, ''तू लग्न करच. आमची संघटना तुला संपूर्ण सहकार्य करील.''
मी म्हणालो, ''मित्रा, आभारी आहे. तुमच्या संघटनेचं संपूर्ण सहकार्य लाभावं म्हणून काही मी सहा वर्षं घालवली नाहीत. मी जेव्हा या प्रकरणात पडलो तेव्हा तुमची संघटना जन्मली पण नव्हती. आणि कधीकाळी एक संघटना जन्मणार आहे, आणि ती आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहे; तेव्हा आपण वेश्येबरोबर लग्न करावं, असा विचार काही माझ्या डोक्यात आलेला नव्हता.''
मी जे करणार होतो ते पूर्णपणे माझ्या जबाबदारीवर करणार होतो. पुढील बऱ्यावाईट परिणामांची पूर्ण जबाबदारी माझीच होती. माझ्या खाजगी जीवनात कोणत्याही सामाजिक संघटनेचा स्पर्श किंवा राजकीय रंग मला नको होता.
असं होतं सिनकरांना सैलीबद्दल जे वाटत होतं ते. त्यात आपल्याला वाटतंय त्याची जाणीव फक्त होती, बाकी त्यातून काही दाखवू पाहावं असला हेतू नाही. हे दाखवेगिरी न करण्याच्या भूमिकेमुळे सिनकरांचं या पुस्तकातलं लेखन तरी सुंदर झालंय.

एखाद्या सभ्य माणसाला कशाबद्दल बोलताना सर्वाधिक आनंद होईल? < उत्तर : स्वतःबद्दल. < बरंय, तर मग मीही स्वतःबद्दलच बोलत जाईन. : या दस्तयेवस्कीच्या 'नोट्स फ्रॉम अंडरग्राउन्ड' कादंबरीतल्या शब्दांचा आणि त्या कादंबरीचाही संदर्भ 'रेघे'वर मागे एकदा माध्यमांसंबंधी येऊन गेलाय. हे किती ठिकाणी जुळतंय बघा! सिनकरांनीही या पुस्तकात स्वतःबद्दलच लिहिलंय. पण तरी ते 'फेसबुक'वरती असतं तसं नैतिकतेच्या प्रदर्शनासारखं होत नाही. याचं कारण काय? तर आपण आधी म्हटलंय तेच : प्रामाणिकपणा.

प्रामाणिकपणामुळेच सिनकर सैलीबद्दल झालेल्या आपल्या चुकांचीही जबरदस्त कबुली देतात. आणि ही कबुली अशी नाहीये की ती एकदा करून झाली की आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटेल. उलट आपल्यालाही हा काय वेडेपणा चाललाय असं वाटून राग येऊ लागेल. म्हणजे सैलीने सिनकरांच्या दारू पिण्याबद्दल केलेल्या तक्रारीचा राग डोक्यात घालून निव्वळ एका क्षणाच्या दारूच्या नशेत हा माणूस पोलीस स्टेशनात जाऊन सैलीविरोधात खोटी तक्रार देतो. कसली तर, आपण रस्त्यावरून जाताना ह्या बाईने वरतून 'शुक शुक' करून पाणी फेकल्याची. पोलीस येऊन सैलीला उचलतात. नंतर सिनकरांना शुद्ध येते तेव्हा ते पोलिसांना आपलं साधं भांडण झालेलं नि त्याचा राग म्हणून आपण असली तक्रार केल्याचं सांगतात नि तक्रारीचा भाग मिटतो. पण सैली पुन्हा सिनकरांना जवळ करत नाही कधीच :
माझ्या उभ्या आयुष्यात मी कोणाविरुद्ध तक्रार नोंदवली नव्हती. नोंदवली ती पहिलीच! चक्क सैलीविरुद्ध!! तीही निखालसपणे खोटी!! माझ्याविरुद्ध मीच तक्रार नोंदवल्यासारखं झालं मला. वास्तविक ड्यूटी-ऑफिसरने माझ्या कानफटात मारून किंवा किमान माझी कानउघाडणी करून मला अगोदरच हाकलून दिलं असतं तर ते मला जास्त बरं वाटलं असतं.
अधिकारी तक्रार लिहून घेत असताना सैली माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. मी अवाक् होऊन तिची नजर टाळू लागलो. कसेबसे शब्द उच्चारत सैली सावकाश म्हणाली,
''तेरी कसम लेकर कहती हूँ...''
माझं हृदय धडधडू लागलं.
''इसके बाद मेरे पास कभी गलती से भी मत आना राजा!''
सैलीने केलेला अंतिम वार मी सहन करू शकत नव्हतो. तक्रार आठ मिनिटांत नोंदवून झाली. पण या एकाच तक्रारीने आठ वर्षांच्या आमच्या एलिमेंट्स खसकन तुटल्या. सैलीकडे परत जायचं नाही? ही कल्पनाच मला सहन होत नव्हती. त्यापेक्षा कोणतीही सक्तमजुरी भोगायला मी तयार होतो. सैली सावकाश बोलली होती. पण तिच्या प्रत्येक शब्दामागचा ठाम निर्धार मलाच समजला होता.
सैलीचा निर्धार कायम राहिला आणि सैली सिनकर याचं प्रकरण कायमचं तुटलं. सिनकरांच्या चुकीमुळे तुटलं याचा आपल्याला राग येऊ शकतो. आणि येतोच. पण आपली चूक एवढ्या ढळढळीतपणे सांगणाऱ्या माणसाला आता करणार तरी काय? हा माणूस तसा त्याच्या हयातीतच यशस्वी झाला होता. हिंदीतही पोलीसकथा लिहिल्यामुळे, मराठीतही कथा-कादंबऱ्यांचा नियमित पुरवठा केल्यामुळे पैसाही मिळत होता. पण तेवढं पुरेसं नव्हतंच अर्थात :
१९६४ साली सैली अठरा वर्षांची होती आणि मी चोवीस वर्षांचा होतो तेव्हा आमची पहिली भेट झाली. आणि १९७१ साली ती पंचवीस वर्षांची असताना आणि मी एकतीस वर्षांचा असताना आमची ताटातूट झाली. आयुष्यातील ठरावीक आठ वर्षांचा हा इतिहास! लोक म्हणायचे, ''हे तुमचं फ्रस्ट्रेशन लाइफ सुरू आहे.'' खरोखरच गाढव होते हे लोक. सैलीचे माझे संबंध सुटले आणि माझं फ्रस्ट्रेशन लाइफ सुरू झालं. १९७१ साली जितकं नाव नव्हतं त्याच्या दसपट मिळवलं. पण निराश होतोय. पाहिला नाही एवढा पैसा पाहिला आणि तेवढाच उधळून लावला. हे फ्रस्ट्रेशन लाइफ. आज तर मी कुठल्या कुठे आहे. अजूनही असं वाटतं की तिची साथ मिळाली असती तर आणखीन कुठच्या कुठे गेलो असतो. पंख कापलेल्या पक्ष्यासारखी अवस्था झाली एवढं मात्र खरं!
असा आहे हा चाळीसेक पानांचा लेख. लेखाच्या शीर्षकात १३ सप्टेंबर ही तारीख का आहे? तर ही सैलीची जन्मतारीख होती म्हणून. आणि ह्या दिवशी सिनकर आणि सैली न चुकता 'नॉव्हेल्टी' किंवा 'नाझ'ला पिक्चर पाह्यला जायचे म्हणून. १९७१नंतरचा कोणताच १३ सप्टेंबर सिनकरांसाठी आधीच्या आठ वर्षांसारखा नव्हता. आठ वर्षं... :
१९६४ ते १९७१ हा आठ वर्षांचा सैलीचा माझा सहवास! बरोबर आठ वर्षांनी आमची ताटातूट झाली. मी आठ वर्षं मन जबरदस्त घट्ट केलं, कोणी करू शकणार नाही एवढं केलं. १९७९! मला पाहायचं होतं, या आठ वर्षांत सैली कशी झाली आहे? कशी दिसते आहे? कशी बोलते आहे? कशी वागते आहे? कारण आता मी तिला जो भेटणार होतो तेव्हा ती असणार तेहतीस वर्षांची आणि मी आहे एकोणचाळीस वर्षांचा!
अठरा वर्षांची सैली पण मी पाहिली आणि तेहतीस वर्षांची पण पाहिली.
सैली मला म्हणाली होती - जेव्हा 'तुम ना जाने' गाण्याच्या बाबतीत मी तिला विचारलं होतं तेव्हा - ती म्हणाली होती, ''मैं समझी तुम पुना में खो गया!''
आज गेली आठ वर्षं सैली हेच गाणं गुणगुणत असेल का? 'तुम न जाने किस जहाँ में खो गये!' आणि समजा, गुणगुणत असेल तर ती काय समजत असेल? मी कुठे कुठे 'खो गया' म्हणून?
... १९७२नंतर रश्मी दिवाणचा (सिनकरांचा मित्र) पत्ता नाही. तो जिवंत आहे. मला का भेटत नाही, मला माहीत नाही...
आज मी जिवंत आहे. सैली जिवंत आहे. रश्मी जिवंत आहे. पण माझ्या हृदयात फक्त माझेच ठोके पडताहेत आणि मी ते एकटाच ऐकतोय!
... मधे काय घडेल सांगता येत नाही. पण बरोबर आणखीन आठ वर्षांनी सैलीकडे जाण्याचा गंभीर विचार मी आत्तापासूनच करतोय. ती तारीख असेल...
१३ सप्टेंबर १९८७!
... तेव्हा मी असेन सत्तेचाळीस वर्षांचा आणि सैली एकोणचाळीस वर्षांची!
सिनकर आता नाहीत. सैलीबद्दल आपल्याला काही माहिती असू शकत नाहीत. पण सैलीबद्दल सिनकरांनी लिहिलेलं आपल्याला वाचायला मिळू शकतं. यात आत्तापर्यंत आपण अनेकदा बोललोय तो वेडेपणा आहे. तो मुद्दामहून आणलेला नाही, त्या वेडेपणात झिंग आहे तीसुद्धा मुद्दामहून आणलेली नाही. ते सगळंच प्रामाणिकपणातून आलेलं असावं. हे प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा फार होतंय असं वाटतंय ना? पण ते आहेच ह्या पुस्तकात. म्हणजे या पुस्तकातल्या शेवटच्या 'सुंदर सावली सापडली' या लेखात सिनकर एकदा असंही म्हणतात पाहा (हे अधोबिधोलोक पाहिलेले सिनकर आहेत) : 'चाकू, सुरे, तलवारी, अॅसिड किंवा रिव्हॉल्वर घेऊन जरी कुणी अंगावर आला, तरीही माझ्या शक्तीच्या कुवतीप्रमाणे (खरं म्हणजे कोणीही फुंक मारून मला खाली पाडावं) मी प्रतिकार करीन किंवा करण्याचा प्रयत्न करीन. पण मी इथे प्रामाणिकपणे सांगतो की मी इंजेक्शनला महाभयानक घाबरतो. खूप वेळा जेव्हा मी या गोष्टीचा विचार करतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं, एक सुई टोचल्यामुळे माणूस मरत नाही. परंतु कोणीतरी आपल्याला सुई टोचतं आहे आणि आपण काडीचाही प्रतिकार करू शकत नाही हेच माझं इंजेक्शन या संदर्भातलं मत असावं.' असंय हे सिनकरांचं. म्हणजे हा 'सुंदर सावली'चा लेख आहे तो त्यांच्या लग्नाची कथा सांगणारा. त्यात त्यांनी आपल्या होऊ घातलेल्या पत्नीला काय वाचायला द्यावं, तर 'सैली : १३ सप्टेंबर' हे पुस्तक, (म्हणजे त्याची पहिली आवृत्ती). त्याबद्दल ते लिहितात : 'मी स्वतः लिहिलेलं एक पुस्तक - ज्या पुस्तकात मी माझ्या आयुष्यातील काही ठळक घटना मांडल्या आहेत, ते पुस्तक - मी तिला वाचायला दिलं. पुस्तकाचं नाव 'सैली : तेरा सप्टेंबर'. एका रात्रीत तिने पुस्तक वाचून संपवलं. मला पूर्ण खात्री होती, आता मी हिच्या मनातून जास्तीत जास्त उतरणार. पण घडलं वेगळंच. आमची जेव्हा भेट झाली तेव्हा ती म्हणाली, ''तू खूप प्रामाणिक आहेस. आता मात्र मी नक्कीच तुझ्याबरोबर लग्न करणार!' असंय हे सिनकरांचं. प्रामाणिकपणाचा पुन्हा 'शो' उभा करता आला असता आणि तो उर्वरित जगात केला जातोच. पण शोबाजी न करता नुसतं असणं हे ह्या पुस्तकात आहे. आता हेही कमी म्हणून की काय, अजून एक याच लेखातलं उदाहरण देतो (हे प्रामाणिकपणाबद्दल शेवटचं) : 'सबंध जगाचा भार माझ्यावर असला तरी तो एकवेळ चालेल, पण माझा भार वाळूच्या कणावरही नसावा, हा माझा प्रामाणिक दृष्टिकोन आहे.'

बाकी सिनकरांचं इतर काही तुम्ही वाचाल किंवा नाही, ते प्रत्येकाच्या आवडीचं असेल किंवा नाही, हे सगळंच वेगळं. पण 'सैली'चा 'हँग-ओव्हर' काही काळ तरी राहील याची ग्यारंटी.

कादंबरी. पहिली आवृत्ती : ऑगस्ट १९८१

Wednesday, 24 April 2013

कोसळणाऱ्या इमारती, कोसळणारी माणसं नि 'वैतागवाडी'

ठाण्यात लकी कंपाउंड परिसरात वर्षभरापूर्वी तीनेक महिन्यांत बांधलेली एक सात मजली इमारत आत्ताच्या चार एप्रिलला कोसळली आणि चौऱ्याहत्तर लोकांचा त्यात मृत्यू झाला. इमारत पडून उडालेला धुरळा आता खाली बसत आलाय. दरम्यानच्या काळात, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यापूर्वी तिथल्या रहिवाशांच्या निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था व्हायला हवी, अशा पद्धतीच्या मागण्या करत राजकीय पक्षांनी 'ठाणे बंद' पाळला. त्याला प्रतिसाद मिळाला. ते सगळं साहजिकच आहे. ह्या घटनेला वीस दिवस झाल्यानंतर आपण एका कादंबरीविषयी 'रेघे'वर नोंद करणार आहोत. कादंबरी आहे भाऊ पाध्ये यांची 'वैतागवाडी'. ही नोंद का, तर कोसळणाऱ्या इमारतींसंदर्भात राजकीय नेते आणि पत्रकार जितकं बोलले तितकं बोलण्याची संधी सामान्य समजल्या जाणाऱ्या आणि इमारतींसोबत कोसळलेल्या माणसांना मिळाली नाही आणि ती मिळण्याची शक्यता नाही. हेही तसं साहजिकच. पण अशा माणसांना ज्यांच्या कादंबऱ्यांमधून बोलता आलं त्या भाऊंची आठवण इथे ठेवणं आवश्यक.

पाचवी आवृत्ती : २००७. शाल्मली प्रकाशन.
मुखपृष्ठ : सुधीर पटवर्धन
'वैतागवाडी' ज्याच्या डोक्याची झालेय त्याचं नाव आहे श्रीकांत सोहोनी. गरोदर बायको असलेला श्रीकांत मुंबईत घर शोधतोय. आणि त्याची ह्या शोधासाठीची रोजची हतबल हालचाल म्हणजे भाऊंनी मांडलेली 'वैतागवाडी'. भाऊंच्या कादंबऱ्या ह्या शहरी जगण्याविषयी (आणि पर्यायाने एकूणच जगण्याविषयी) काय सांगू पाहतात, हे स्पष्टपणे सांगणं अवघड आहे. पण त्यांचं सांगणं वाचताना आपल्याला जाणवलं तर आपल्यासकट तयार होत असलेल्या 'लोक' नावाच्या गोष्टीचा काहीएक अंदाज कदाचित येऊ शकतो. आणि हेच लोक कोसळणाऱ्या इमारतींमध्ये राहत असतात किंवा शेजारी चाळीस मजली टॉवर उभा राहिलेल्या तीन मजली चाळीतल्या झिजलेल्या लाकडी जिन्यांवर रोज चढ-उतार करत असतात. त्यातले काही चाळीत राहत-राहतही श्रीमंत होत जातात आणि पार्किंगला जागा नाही म्हणून फोर-व्हिलर घ्यायचं टाळत राहायची वेळ त्यांच्यावर येते. काही लोक टू-व्हिलरसुद्धा घेऊ शकत नाहीत. काहींना असला काही विचार करायलाच वेळ नसतो; ते नुसतेच राहत असतात. 'वैतागवाडी'च्या मुखपृष्ठावर सुधीर पटवर्धनांच्या चित्रात दिसतोय तो माणूस म्हणजेच आपण म्हणतोय तो नुसता 'राहणारा' माणूस.

असाच अनेक लोकांपैकी एक असलेला श्रीकांत सोहोनी घर शोधतोय. त्याची गोष्ट सांगताना भाऊंची 'वैतागवाडी' अशी सुरू होते :

माझा पाठीवरचा संसार घेऊन मी अखेर धरमपाड्याला येऊन ठाकलो होतो. मुंबईच्या उपनगरामध्ये धरमपाडा या नावाची वस्ती आहे हे पुष्कळांना ठाऊकसुद्धा नसेल. कांदिवली स्टेशनच्या पूर्वेला कान्हेरी लेणी डोळ्यांसमोर ठेवून पाऊण तासाचा खडकाळ आणि धुळीने भरलेला रस्ता तुडवीत चालून गेल्यावर ही वस्ती लागते. या वस्तीविषयी तसे विशेष सांगण्यासारखे असे काही नाही. काही जुन्या, म्हणजे टिळक-आगरकर जेव्हा हयात होते त्या काळातल्या, बैठ्या किंवा दुमजली चाळी - बहुधा मारवाड्यांनीच बांधलेल्या. त्यांच्या माफक भाड्यामुळे किराणा मालाचे गुजराथी व्यापारी, प्राथमिक शाळेतले मास्तर, कुठे एखादा सिंधी, एखादा हातभट्टीचा धंदा करणारा किरिस्तांव, एक वाट चुकलेला सधन परंतु कंजुष सारस्वत ब्राह्मण आणि अधूनमधून दाढी वाढवणारा देशभक्त काँग्रेसवाला, यांची त्या चाळीतून वस्ती. त्यांच्यामध्येच मी जाऊन पडलो होतो.

धरमपाड्याला काळू भिकाच्या चाळीमधल्या ज्या दहा-बाय-दहाच्या सिंगल रूममध्ये मी माझे बस्तान बसवले होते, ती खोलीही माझ्या मालकीची नव्हती. आमच्या ऑफीसमधल्या कर्पे नावाच्या शिपायाच्या मालकीची होती. त्याने दोन वर्षांकरता आपले बिऱ्हाड गावी हलवले होते आणि तोपर्यंत माझ्याकडून पाचशे रूपये अनामत घेऊन ती खोली माझ्या हवाली केली होती. घरटंचाईच्या आजच्या काळात यापेक्षा अधिक सोयीस्कर सौदा मला करता आला असता का? मला तर उभ्या हयातीत, 'एक दिवस माझ्या हक्काची खोली घेता येईल' अशी आशाच वाटेनाशी झाली आहे. जागा म्हणजे पैसा हे आजच्या जगाचे समीकरण आहे. या धरमपाड्याला टिनपाट जागेसाठी कर्पे शिपुरड्याच्या बोडक्यावर पाचशे रूपये मारायचे म्हणजे अंजलीचे दागिने आणि लग्नातील प्रेझेंट्सही मला बाजारात काढावी लागली. तिथे हजार दीड हजार... दोन हजार आकड्यांपुढे माझा काय पाड लागणार?

इथे धरमपाड्याला काही तसे वाईट नव्हते. जसजसे दिवस जातात, तसतसा माणूस सरावतो भोवतालच्या वातावरणाला.

तर हे असं होतं. दिवस जात जातात, तसा माणूस सरावतो वातावरणाला. याला काही पर्याय आहे का? माहीत नाही. अशीच आपल्या कोसळू शकणाऱ्या इमारतींना सरावलेली माणसं शहरात राहतायंत. त्यांच्या पर्यायी निवासाची व्यवस्था करायची तर पर्यायी शहरंच उभारावी लागतील. आणि ती पुन्हा कुठे उभी करणार? एकूण प्रश्नाचं मूळ शोधायचं असतं, तर खरं म्हणजे वर्तमानपत्रांनी किंवा टीव्ही चॅनलांनी या माणसांशी बोलून काही शहरी विकासाचं चित्र उभं करायला हवं होतं. चर्चांमधून ते झालं असेल, पण समूहमन जोखण्याच्या पातळीवर ते झालेलं दिसत नाही.

मी रोज वर्तमानपत्र घेतो. वाचत मात्र नाही. रोजच्याप्रमाणे मथळ्यावरून नजर फिरवीत फिरवीत सगळी 'नवसत्ता' पालथी घातली. काही नाही! जगात प्रचंड घडामोडी झाल्या होत्या; या देशात जनहिताची प्रचंड कामे सरकारने हाती घेतली होती. बातम्या. जागेविषयी कोणीच काही केले नव्हते. वर्तमानपत्र हाताच पडताच एक वेडी आशा काळीज उसवून बाहेर येते. वाटते, 'आज घरबांधणी खात्याच्या मंत्र्याने घोषणा केली की सरकार खास नाडलेल्या लोकांकरिताच घरबांधणीची विस्तृत योजना हाती घेणार आहे. त्यानुसार अशा नागरिकांची माफक भाड्यात राहण्याची सोय होईल!' असे वृत्त छापून आले असेल. परंतु, तसे कसचे घडते? आणि मग, ती आशा ठार होते हे रोजचेच! 'नवसत्ता' हातून गळून पडला.

हे श्रीकांत सोहोनीच्या मनात येतं, तसंच सगळं गळून गेलेलं आहे. खोटा भावनिक उमाळा दाखवण्यात अर्थ नाही, पण माध्यमांमधून तो मोठ्या प्रमाणावर दिसत आलाय. त्याऐवजी आपण म्हटलं तसं समूहमन जोखण्याचा काही प्रयत्न होतोय का? तसं केलं तर 'हतबल' ह्या विशेषणाला जुळणारं काही तरी हाताशी लागू शकतं. श्रीकांत सोहोनीच्या डोक्यासारखंच.

मला काही परिचित चेहरे स्टेशनवर दिसतात. मला काही संभाषण छेडण्याची इच्छा नाही. उगीच ते हटकून 'कुठे राहतोस?' विचारतील. पत्ता आपल्या डायरीतही लिहून घेतील. आणि थोड्याच दिवसांनी माझा बदललेला असेल. परत 'मला खोली नाही- शोधात आहे' वगैरे सांगण्यातही काही अर्थ नाही. त्यांना माझ्याविषयी इतकी काही आस्था आहे, असे मी मानत नाही. आयुष्यात स्थिर न झालेल्या माणसाला त्यांच्या हिशेबात फारशी किंमत नाही.

भाऊंनी खरं म्हणजे हे सगळं इतकं पक्कं पकडून ठेवलंय ह्या फक्त १५७ पानांच्या कादंबरीत की, ते वाचून कायतरी तरी वाचकांच्या, पत्रकारांच्या मनात व्हायला हरकत नव्हती. पत्रकार मंडळी मग कदाचित अधिकाधिक लोकांच्या बाजू तपासत काही चित्र उभं करू शकली असती. आपण हे खूप वेळा का बोलतोय, तर तेच आपल्या हातात आहे म्हणून. 

श्रीकांत सोहोनीही असंच आपल्याला हातात आहे म्हणून अनेक लोकांशी आपल्या जागेच्या गरजेविषयी बोलून ठेवत असतो. राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या आपल्या मित्रासारख्या व्यक्तीपासून, ऑफिसातल्या लोकांपासून ते अगदी लोकल ट्रेनमध्ये भेटलेल्या अनोळखी इसमापर्यंत सगळ्यांना. सगळ्यांना सांगत जातो, जागा बदलत जातो आणि तेवढंच. सरकारी वसाहती, सरकारी योजना, नातेवाईकांच्या भावना अशा सगळ्या गोष्टींमधून फिरून फिरूनही श्रीकांत सोहोनीला स्वतःचं हक्काचं छप्पर काही मिळतच नाही. एकदा श्रीकांत सोहोनीला एक असामी भेटते. आणि त्यातूनच भाऊ कादंबरीच्या शेवटाकडे येतात :

मला एक असामी भेटले. वय ४६ एक. व्यवसायाने पत्रकार. त्यांचे नाव नामदेव फौजदार. त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या अभ्यासूवृत्तीने माझ्यावर छाप टाकली होती. त्यांनी मुंबईतील घराच्या प्रश्नाचा खास अभ्यास केला होता.

तो म्हणाला, 'मुंबईमध्ये पाच लाखापेक्षा अधिक किंमतीच्या घरांचा एफ.एस.आय. किती शिल्लक आहे, तुम्हाला कल्पना आहे? फाइव्ह परसेंट!'

तो सारखा एफ.एस.आय. हा शब्द वापरायचा. पाच परसेंट म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे फार मोठे प्रमाण असावे. त्याने याच्यावर एक योजना आखली होती. आपण धान्याचे जसे रेशन करतो त्याप्रमाणे जागेचे रेशन करणारी, पण आपल्या मंत्र्यांच्या मालकीचेच दोन दोन फ्लॅट्स रिकामे आहेत. त्यांच्या इंटरेस्टला ते स्वतःच कसा हात लावतील. मुंबईतील सगळ्या एक्झीक्युटिव्हजनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर फ्लॅट्स अडकवून ठेवले आहेत. कुठच्याही बिल्डिंगचा जेव्हा प्लॅन पास होतो त्या वेळी त्या एक्झीक्युटिव्हसाठी एक फ्लॅट काढून ठेवावा लागतो. तुमच्या 'ब्ल्यू बर्ड' इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर एक असाच रिकामा फ्लॅट आहे पहा. आगाशे नावाचा एक एक्झिक्युटिव्ह आहे. निपुत्रिक आहे. तुम्ही म्हणाल, निपुत्रिक माणसाला हवी कशाला जागा? पण या मंडळींना त्यांच्या नातेवाईकांचे भलं करायचं असतं. त्याने आपल्या तीन वर्षांच्या भाच्याच्या नावाने तो फ्लॅट केलाय. आता हा भाचा वयात कधी येणार आणि त्या फ्लॅटचा वापर कधी करणार! हे असं आहे.

तो मला सांगू लागला - 'लोक या प्रश्नावर कसे गप्प बसले आहेत हे मला कळत नाही. रिकाम्या फ्लॅट्सच्या प्रश्नाला कुणीतरी वाचा फोडली पाहिजे. अहो, या फ्लॅटचे दरवाजे फोडून त्यात घुसलं पाहिजे. आपण मध्यमवर्गीय माणसं फारच शेळपट आहोत. नुस्ते बोलतो. कृती कोणीही करत नाही.'

काल जप्तीचे प्रकरण, आज फौजदारांची भेट. काल मी जप्ती थंडपणे पाह्यली. काल मी पेटलो नव्हतो. पण असा थंडपणा मी सहन किती करावा? जप्ती आलेला माणूस जितका असुरक्षित आहे तितकाच मीही असुरक्षित आहे.. आपण पांढरपेशे लोक गांडू आहोत. आपण कधीच पेटत नाही.. नुसता पुढचा मागचा विचार करत बसतो. कम व्हॉट मे, आपण कृती केली पाहिजे!

मी आज निर्धार केला होता. माझ्या रक्तातील पांढरपेशा रक्ताचा मी आज निचरा करून टाकायचं ठरवलं. कम व्हॉट मे - आज कृती करायची. अॅक्शन. घर फोडून आत घुसायचं. पोलीस पकडतील. कम व्हॉट मे, विचार करायचा नाही. कृती करायची.

या मॉडर्न फ्लॅट्सचं घर तोडायचं म्हणजे सोपं काम नाही. त्यांच्या दाराला लॅच-की असते. ती कशी तोडणार? कुणातरी माहितगाराकडून माहिती काढावी.

मी एका बिल्डिंग काँट्रॅक्टरला भेटलो. मी गेले कित्येक दिवस डोकं थंड ठेवून याच कामात आहे, घर कसे तोडायचे याची संपूर्ण माहिती मिळाली. बिल्डिंग काँट्रॅक्टर म्हणाले, 'छिन्नी नि हातोडा पुरेल. पण आवाज मोठा होईल.'

'ठीक. आवाज मोठा झाला तर लोक पोलिसांना बोलावतील एव्हढंच ना! कम व्हॉट मे.'

ते एक्झीक्युटीव्ह ऑफिसर आगाशे - त्यांच्या तीन वर्षाच्या भाच्याच्या ब्ल्यू-बर्ड इमारतीतील सातव्या माळ्यावरील फ्लॅट. त्या फ्लॅटसमोर मी सर्व सामुग्रीसह उभा. शेजारच्या फ्लॅटचं दार बंद होतं. फक्त जा-ये होती.

मी सज्ज झालो. मन घट्ट बनवलं. लिफ्टपासून तीन पावले दूर व फ्लॅटपासून पाच फूट अंतरावर उभा. फ्लॅटच्या दरवाजाकडे एकटक पाहत होतो. फ्लॅट तोडायचा.

फ्लॅट तोडायचा! कम व्हॉट मे.

डोक्यामध्ये भणभण.

पावले जागच्या जागी गोठून गेली होती. जणू आता तिथून माझे सारेच शरीर वर वर गोठत जाणार होते.

माझ्या कपाळाच्या डाव्या बाजूची शीर तोंडात बसल्याप्रमाणे थडाथडा उडत होती. मस्तक नरम झाले होते.

छिन्नी-हातोडा हातातून गळून जाईल काय असे वाटत होते. तो सावरून कसाबसा धरला होता.
लिफ्टमधून एक मोलकरणीसारखी बाई आली आणि माझ्याकडे खरखरीत दृष्टिक्षेप टाकून शेजारच्या फ्लॅटमध्ये शिरली. मला घाम फुटला. तिला दिसायला नको होते.

तिने फ्लॅटमध्ये शिरून लोकांना माझ्याबद्दल जागं केलं तर पळून जाऊ या!

मुळीच नाही. कम व्हॉट मे - मला फ्लॅट तोडायचाच आहे.. फ्लॅट तोडायचाच आहे!

'कम व्हॉट मे. विचार करायचा नाही. कृती करायची' हा श्रीकांत सोहोनीचा निष्कर्ष कोसळणाऱ्या लोकांनी काढला तर एकूण अवघडच होऊन बसेल. तसं व्हायला नको असेल तर भाऊंच्या १९६५ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या 'वैतागवाडी' ह्या कादंबरीतलं म्हणणं समजून घ्यावं लागेल. पण तेवढा वेळ कोण देईल?

***

हा कसला भुलभुलैय्या?
दुसरी आवृत्ती : १९८७. डिंपल पब्लिकेशन.
मुखपृष्ठ : वसंत सरवटे

Sunday, 21 April 2013

वेश्यावस्तीतली आई आणि फोटोग्राफर मुलगा । दोन कविता

एखाद्या सभ्य माणसाला कशाबद्दल बोलताना सर्वाधिक आनंद होईल? < उत्तर : स्वतःबद्दल. < बरंय, तर मग मीही स्वतःबद्दलच बोलत जाईन. : या दस्तयेवस्कीच्या 'नोट्स फ्रॉम अंडरग्राउन्ड' कादंबरीतल्या शब्दांचा आणि त्या कादंबरीचाही संदर्भ 'रेघे'वर मागे एकदा माध्यमांसंबंधी येऊन गेलाय.

एका पातळीवर माध्यमं आता व्यक्तीला जोडली जातायंत आणि 'स्वतः'भोवती फिरतायंत. पण स्वत:बद्दल काय बोललं की आनंद होईल ते आधी ठरवूनच माध्यमातून ते व्यक्त केलं जात असावं. किंवा काय बोलल्यावर लोकांकडून आपल्याला आनंद मिळेल तेही आधी ठरवलं जात असेल. 

शंकर सरकार
शंकर सरकारने स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आईबद्दल फोटोग्राफीच्या माध्यमातून बोलताना आतमधून काय ठरवलं  असेल त्याची कल्पना आपल्याला येऊ शकत नाही. शंकरची आई वेश्याव्यवसाय करत असे. 

कविता सरकार यांना ओडिशातल्या माल्कनगिरीमधून कोलकात्यातल्या सेठबागान परिसरात आणलं गेलं आणि या 'रेड लाइट एरिया'  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात त्यांना शरीरविक्री करावी लागली. त्या ओडिशात असतानाच शंकरचा जन्म झाला होता. अगदी सुरुवातीची वर्षं तो ओडिशातच होता. पण तीन वर्षांचा असताना तो आपल्या आईच्या शोधात आजीच्या सोबत कोलकात्यात आला. दोन महिन्यांच्या शोधानंतर त्यांना कविता यांचा पत्ता सापडला. मोठं होत जाताना शंकरला आपली आई आणि तिचा व्यवसाय यांच्याबद्दल मनात गोंधळाची भावना निर्माण होत गेली. ही भावना त्याने तपासायला सुरुवात केली ती कॅमेऱ्याच्या लेन्समधून आणि त्यातून त्याला आईशी नव्यानं भावनिक बांध जोडता आला.

साधारण २००० सालच्या आसपास सेठबागान परिसरातल्या मुलांना फोटोग्राफीच्या मदतीने व्यक्त होता यावं यासाठी  'युनिसेफ'ने उपक्रम राबवला. त्यात सहभागी झालेल्या शंकरने तेव्हापासून आपल्या आईचे फोटो काढायला सुरुवात केली. आता शंकर बावीस वर्षांचा आहे. त्याच्या छायाचित्रांची प्रदर्शनं देशात आणि परदेशातही भरून गेली. आता त्याची आई वेश्याव्यवसाय करत नाही.

शंकरचे फोटो आपल्याला 'गल्ली'वरती 'फेसिंग वन्स ओन' या शीर्षकाखालच्या फोटोमालिकेत पाहता येतील. काही फोटो 'रेघे'वरच्या नोंदीत वापरण्यासंबंधी आपण केलेल्या विचारणेला शंकरने आनंदाने परवानगी दिल्यामुळे खाली त्याचे काही फोटो देतो आहे.


शंकरची आई, सेठबागान परिसरातील इमारतीजवळ उभी असताना, जानेवारी २०००''माझ्या आईशेजारी झोपलेला इसम माझे वडील नाहीत. मी त्यांना 'काका' म्हणतो.''
जानेवारी २०००
''आई आणि काकांनी आयुष्य असं सोबतीनं घेतलं होतं.''


शंकरही आपल्या आईला विकतोय, असे आरोप त्याच्यावर केले जातात. पण त्याच्या आईचा त्याला पाठिंबा आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो फोटोंच्या माध्यमातून ही गोष्ट सांगतो, कारण त्याला माहीत असलेली हीच सगळ्यांत मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट त्याला अजूनही कधी कधी स्तब्ध करून सोडते. ('तेहेलका'मधला लेख). कविता सरकार आता कापडनिर्मिती कारखान्यात काम करतात.

''या सहा बाय सहाच्या खोलीत आम्ही झोपतो, आई जेवण बनवते, आम्ही जेवतो.'' (जुलै २०१०)


''माझी आई कविता सरकार, माझे काका आणि आमचे शेजारी.'' जून २०१२


'मी आणि माझ्या आईमधला कॅमेऱ्याच्या माध्यमातून साधलेला हा संवाद आहे', असं शंकर म्हणतो. आपल्या भावना या फोटोंमध्ये साठवलेल्या आहेत, असं सांगून तो म्हणतो, ''मी लहान असतानापासून आईचे फोटो काढायला सुरुवात केली. हे सगळं मी, आई आणि आम्ही राहतो ती जागा यांनी व्यापलेल्या एखाद्या प्रकल्पामध्ये पूर्णत्वाला जाणार आहे याची मला कल्पना नव्हती.'' ('संडे गार्डियन'मधला लेख.)

शंकरची आई कविता सरकार, त्यांनी पाळलेला पिंजऱ्यातला पोपट आणि एक मुलगी. सप्टेंबर २०११

'फोटोग्राफीचा तुला उमजलेला अर्थ काय?' असा प्रश्न आपण 'रेघे'मार्फत शंकरला विचारला, त्यावर तो म्हणाला, ''फोटोग्राफी हा माझा जग धुंडाळण्याचा मार्ग आहे. आयुष्यभर शिकण्याची भूमिका घेतलेल्यासाठी हे एक शिक्षणाचं सर्वोत्तम साधन आहे. नवीन काहीतरी शिकण्यासारखं कायमच असतं. त्यातली सर्जनशीलता आणि आव्हान मला भावतं.''

शंकरने आपल्याला त्याचे फोटो वापरायची परवानगी दिल्याबद्दल त्याचे आभार मानून नोंदीचा हा भाग संपवू. 'फेसबुक'वर शंकरच्या फोटोग्राफीचं पान : www.facebook.com/shankarsarkarphoto

शंकरने त्याची आई कविता सरकार यांच्यावर फोटोंच्या माध्यमातून केलेली कविता पाहिल्यानंतर आता नामदेव ढसाळांची एक कविता आपण वाचू.

नामदेव ढसाळ : गोलपिठा : पान ४-५


उघडझाप चालूहे

          उघडझाप चालूहे
          झाडे सादळलेली
          लूत पसरलेली दवदारी चौखूर
कुत्रं हुंगतंय भिंत : भिंत डचडचतेय ओलीचिक
या आर्द्रतेत तुम्हांवर फुल्ली मारणं
आत्यंतिक सोयिस्कर
परंतु तुमचे स्थितिस्थापक इतिहास बदलता येत नाहीत
मला माझ्या भल्याबुऱ्यासह
इथल्या कुंडात पडलेली सूर्यचंद्राची प्रतिबिंबं
          अस्खलित व्यभिचारी निघालीयत
या बेदिल हिवलाटेत
तुमच्या गुदमरत्या छात्या मी करतोय स्क्रिनिंग
भाडोत्री रिलेशन्सपेक्षा मी पहातोय
तुम्हाला निकटवर्ती आणि आसपास
तुमचं उतवणी गंगेच्या पाण्याहून पवित्र
बिनखोलीचा माणूस फिरवला जावा शहरभर तसा मी
तुमच्या उंचावत जाणाऱ्या हाडीव्रणावर सपटलोशन
तुम्ही माझ्या आया व्हा
तुमच्या फदफदत्या कुशीत मला निवारा द्या
मी माझे ३।। इंची प्रसरण पसरतोय तुमच्या बेमतलब
सेन्सस करतोय तुमच्या यारांना बाप म्हणून
तुमचे छपरी भडवे माझे खापरपंजोबा
आणि तुमचे लवंडे - काका, मामा, चुलते वगैरे
या जडजंबाल अंधारात तुम्ही पेरून ठेवलीय क्रांतीची ऋचा
तुम्ही ध्वनी सुधारकांचा पहिला आणि शेवटचा
मी नमतोय फक्त तुमच्यापुढे प्रारंभ आणि अस्त
टंकन करतोय तुमचे संभोगशिल्प
मी तुमच्यापुढे स्वच्छ निरागस
अंगावरली मखमल ढाळून
माझ्या क्रिएटिव्ह अंगरख्यांनो
तुमचे अश्रू जुलमी रुस्तमाना करतोय नमूद मी
कारण मंदिर मस्जिद चर्च तुम्ही एका दोऱ्यात ओवलीयत
तुम्हाला गिळत सुटलेलं बदफैली संस्कृतीकरण
लांडंभुंडं पहातोय चिरफाळलेल्या डोळ्यांनी
          खद्र्या मैनांनो
तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी निःपक्ष भाष्यकार
समस्त वारकऱ्यांचा कर्दनकाळ
मी सावरतोय तुमच्या वरंगळलेल्या रक्तबंबाळ धुरा
तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी
त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलीय आढी
तुम्ही छिन्नभिन्न पंखांनी पिसारत या
माझा देहोदय मी मांडलाय रस्त्यात
आणि भिरभिरताहेत माझ्या काळजात
कुणीतरी हागून ठेवलेली ओयासिसं
          उघडझाप चालूहे
          झाडे सादळताहेत
          लूत पसरते चौखूर दवदारी

Friday, 19 April 2013

माध्यमांचा गोंगाट, गुंगी आणि एडवर्ड बर्नेस

'प्रॉपगॅन्डा' नावाच्या गोष्टीचा बाप जो एडवर्ड बर्नेस त्याचा एकदा स्पष्ट उल्लेख 'रेघे'वर नोम चोम्स्कींच्या लेखात येऊन गेलाय. 

आय.जी. पब्लिशिंग, २००४ आवृत्ती
माध्यमांचा गोंगाट वापरून लोकांना गुंगीत ठेवणं शक्य असतं. ते कसं, याचा एक अग्रगण्य दाखला म्हणून एडवर्ड बर्नेसच्या 'प्रॉपगॅन्डा' असं नाव असलेल्या पुस्तकाचा धांडोळा घेणं उपयोगी पडू शकेल. अमेरिकेच्या संदर्भात १९२८ साली लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्यापूर्वी साधारण चौदा वर्षं मागे गेलं, तर पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिकेला युद्धात उतरण्यास भाग पाडण्यासाठी तिथल्या नागरिकांना युद्धखोरीला फशी पाडण्यासाठी मुख्य सूत्रं हलवणाऱ्यांपैकी एक माणूस बर्नेस होता. साधारण पावणेदोनशे पानांच्या या पुस्तकातल्या काही मुद्द्यांची यादी आपण 'रेघे'वर करणार आहोत. वास्तविक मूळ पुस्तकात काही उदाहरणं देऊन मुद्दे अधिक स्पष्ट करण्यात आलेत, त्यामुळे त्यांना जोर मिळतो. इथे आपण ते स्पष्टीकरण जसंच्या तसं देत बसायचं ठरवलं तर संपूर्ण पुस्तकच अनुवादित करावं लागेल, त्यामुळे मुद्दा पटवून देण्यासाठीची स्पष्टीकरणं या यादीत टाळल्येत. अर्थात मुद्दे वाचल्यावर त्याचे प्रत्यक्षातले पुरावे आपल्याला रोजच्या रोज आजूबाजूला दिसतीलच, त्यामुळे ही यादी वाचली की आपोआप वाचक माध्यमांबद्दल, आपल्याला पुरवण्यात येणाऱ्या एकूणच माहितीबद्दल आणि वरती नोंदवलेल्या समकालीन संदर्भांबद्दल साशंक होतील आणि त्याबद्दल फेसबुकावर मत व्यक्त करण्यापूर्वी बरोब्बर साडेतीन सेकंद थांबतील याची ग्यारंन्टी. किंवा वॉरंन्टी. (मी देत नाही).

१) लोकशाही समाजामध्ये लोकांच्या एकत्रित सवयी आणि मतांचा जाणीवपूर्वक व कौशल्याने केलेला वापर हा एक महत्त्वाचा घटक आहे. समाजाच्या या अदृश्य रचनेचा वापर जे करू शकतात ते देशाची सत्ता ज्याच्याकडे असते त्या अदृश्य शासन नावाच्या गोष्टीचा भाग बनतात. (पान ९)

२) तत्त्वतः प्रत्येक नागरीक सार्वजनिक प्रश्नांबद्दल आणि खाजगी वर्तणुकीबद्दल स्वतःचे निर्णय घेत असतो. पण प्रत्यक्षात प्रत्येक प्रश्नामधल्या गुंतागुंतीच्या आर्थिक, राजकीय व नैतिक तपशिलांचा शोध घ्यायचं सगळ्यांनी ठरवलं तर कशावरच निष्कर्षाला येणं अशक्य होऊन बसेल. त्यामुळे विविध विषयांमधल्या तपशिलांमधे जाण्याचं काम आपण स्वतःहून अदृश्य रूपातल्या शासनावर सोडलेलं असतं आणि स्वतःकडे फक्त प्रत्यक्षातल्या निवडीचा भाग राखलेला असतो. नेत्यांडून आणि माध्यमांकडून ते आपल्यापर्यंत पोचतं; त्यांच्याकडून आपण सार्वजनिक प्रश्नांसंबंधीची विभागणी स्वीकारतो आणि कोणा नैतिक गुरूकडून, मग तो मंत्री असेल किंवा स्तंभलेखक असेल, आपण सामाजिक वावराचे सर्वमान्य निकष स्वीकारतो. (पान १०-११)

३) एकूण जीवन गुंतागुंतीचं झालेलं असताना आणि अदृश्य शासनाची गरज वाढत असताना, विकसित होत असलेल्या तांत्रिक साधनांच्या माध्यमातून मतांचा प्रसार करता येईल. छपाईयंत्र व वर्तमानपत्र, रेल्वेयंत्रणा, टेलिफोन, टेलिग्राफ, रेडियो आणि विमानं यांच्यामदतीने विविध कल्पना वेगाने किंवा काही क्षणांत सर्व अमेरिकाभर पोहचू शकतात. (पान १२)

४) एमिल लुडविगने नेपोलियनबद्दल लिहिलंय : 'कायम लोकमताचा अदमास घेत असलेला, कोणत्याही सूत्रात बसू न शकणारा लोकांचा आवाज सतत ऐकणारा, नेपोलियन त्या काळात म्हणत असे की, तुम्हाला माहितेय का, मला सगळ्यात जास्त कशाचं आश्चर्य वाटतं? कोणतीही गोष्ट सुसंघटित करता न येण्यामागे असलेल्या सत्तेच्या/बळाच्या षंढपणाचं.' (पान १८)

५) समूहमन नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेची रचना स्पष्ट करणं आणि एखादी विशिष्ट कल्पना किंवा वस्तू लोकांनी स्वीकारावी यासाठी विशिष्ट तज्ज्ञाला हे मन कसं वापरता येतं याची माहिती देणं या पुस्तकातून योजलं आहे. (पान १८)

६) आज अल्पसंख्याक (सत्ताधारी) बहुसंख्यांवर प्रभाव कसा टाकावा याची ताकदीची साधनं बाळगून आहेत. आपली ताकद विशिष्ट दिशेने वळवण्यासाठी लोकांच्या मनाला वळवणं शक्य आहे. सध्याच्या सामाजिक रचनेमध्ये हा प्रकार अपरिहार्य आहे. राजकारण, अर्थकारण, उत्पादन क्षेत्र, शेती, सेवा, शिक्षण किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात सध्या जे काही सामाजिक महत्त्वाचं केलं जातं ते 'प्रॉपगॅन्डा'च्या मदतीनेच करावं लागतं. अदृश्य शासनाचा कार्यकारी हात म्हणजे 'प्रॉपगॅन्डा' / प्रचारतंत्र. (पान १९)

७) जगातल्या बहुतेक गोष्टींप्रमाणेच 'प्रॉपगॅन्डा' या शब्दालाही विशिष्ट तांत्रिक अर्थ आहेत, 'ना चांगलं ना वाईट, तर प्रथेनुसार जे असेल ते' अशा स्वरूपाचा हा अर्थ असतो. (पान २०-२१)

आधुनिक 'प्रॉपगॅन्डा' म्हणजे एखाद्या उद्योगाशी, कल्पनेशी किंवा गटाशी असलेल्या लोकांच्या संबंधांवर प्रभाव पाडण्यासाठी घटना घडवणं नि त्यांना आकार देण्यासाठी याचा एक नियमित आणि टिकाऊ प्रयत्न करणं.

लाखो लोकांच्या मनात काही चित्र तयार करण्यासाठी परिस्थितीची मांडणी करणं हे अतिशय सरसकटपणे केलं जातं. चर्च उभं करण्याचा उद्योग असो, की विद्यापीठ उभारणं असो, की चित्रपटाची जाहिरात असो, की अगदी राष्ट्राध्यक्षाची निवड असो, कुठलंही महत्त्वाचं काम आता अशा मांडणीशिवाय केलं जात नाही. लोकांवरचा हा प्रभाव तयार करण्यासाठी कधी व्यावसायिक प्रचारतंत्रतज्ज्ञांची (प्रॉपगॅन्डिस्ट) मदत घेतली जाते किंवा एखाद्या नवख्या व्यक्तीकडून हे काम होतं. महत्त्वाची गोष्ट ही की, ही वैश्विक आणि सतत चालू असलेली प्रक्रिया आहे आणि सैनिकांच्या शरीरांचं संगठन सैन्यात ज्याप्रमाणे केलं जातं त्याप्रमाणे या प्रक्रियेतून समूहमनाचं संगठन केलं जातं. (पान २५)

८) बुद्धिमान अल्पसंख्यांनी 'प्रॉपगॅन्डा'चा नियमितपणे आणि व्यवस्थित वापर करणं गरजेचं आहे हे अगदीच स्पष्ट आहे. स्वार्थी आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरूपांतले हेतू ज्यांच्यात एकत्रितपणे नांदतात त्या अल्पसंख्यांना सक्रिय प्रोत्साहन देण्यामध्येच अमेरिकेचा विकास आणि प्रगती आहे. मूठभर बुद्धिमान लोकांच्या सक्रिय ऊर्जेमुळेच नवीन कल्पनांबद्दल बहुसंख्य लोक जागृत होतात आणि कृतिशील होतात. एखाद्या विशिष्ट विषयासंबंधी त्यांना काय वाटतं हे लहान गटांमधले लोक आपल्याला सांगू शकतात आणि सांगतात. पण सर्वसाधारणपणे प्रत्येक 'प्रॉपगॅन्डा'चे समर्थक आणि विरोधक असतात आणि ते दोघेही बहुसंख्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी तितकेच आतूर असतात. (पान ३१)

९) अदृश्य शासन काही जणांच्या हातात केंद्रित असतं कारण लोकांची मतं व सवयी यांचं नियंत्रण करणारी सामाजिक यंत्रणा वापरणं हे खर्चिक काम आहे. पन्नासेक लाख लोकांपर्यंत पोचणाऱ्या जाहिराती करणं महागडं आहे. लोकांचे विचार आणि कृती यांच्यावर नियंत्रण असलेल्या नेत्यांपर्यंत पोचणं आणि त्यांचं मन वळवणं हेही तसंच महागडं आहे. (पान ३७)

१०) सरकार... मग ते राजेशाही असो, घटनात्मक असो, लोकशाही असो की साम्यवादी असो... ते आपल्या प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी लोकमताच्या संतुष्टतेवर अवलंबून असतं. खरं तर लोकांच्या संतुष्टतेवरच सरकार हे सरकार असतं. (पान ३८)

११) म्हणूनच आधुनिक संपर्कयंत्रणांच्या मदतीने आणि सामाजिक गटांसोबत काम करणारा 'जनसंपर्क सल्लागार' (पब्लिक रिलेशन्स/ पीआर) एक प्रकारे वकिलासारखाच असतो. वकील ज्याप्रमाणे आपल्या गिऱ्हाईकाच्या व्यापारासंबंधी कायदेशीर सल्ला देतो, त्याप्रमाणे 'पीआर'वाला आपल्या गिऱ्हाईकाच्या लोकसंपर्कावरती लक्ष केंद्रित करतो. 

आपल्या गिऱ्हाईकाच्या उत्पादनासंबंधी लोकांना माहिती देण्यासाठी 'पीआर'वाल्याकडे विविध साधनं असतात : उदाहरणार्थ, संभाषणं, पत्रं, व्यासपीठं, चित्रपट, रेडियो, व्याख्यानं, नियतकालिकं, दैनंदिन वर्तमानपत्रं. 'पीआर' सांभाळणारा माणूस हा जाहिरातवाला नसतो, तर तो जिथे जाहिरात यायला हवी तिथे जाहिरातीला प्रोत्साहन देतो. (पान ३९)

१२) समूह मानसशास्त्र हे अजूनही अचूक विज्ञान नाहीये आणि मानवी प्रेरणेचं गूढही अजून उलगडलेलं नाही. पण तरीही या शास्त्राचं ग्रांथिक ज्ञान आणि प्रात्यक्षिक हे पुरेसं यशस्वी झालेलं आहे. त्यामुळे पेट्रोलचा वापर करून चालक गाडीचा वेग ज्या प्रमाणे नियंत्रित करू शकतो, त्याप्रमाणे विशिष्ट यंत्रणा राबवून काही वेळा बऱ्यापैकी अचूकपणे लोकमतात बदल घडवता येतात असं आपल्याला मानता येईल. 'प्रॉपगॅन्डा' हे प्रयोगशाळेतलं शास्त्र नाही, पण समूह मानसशास्त्राचा अभ्यास होण्यापूर्वीच्या काळाएवढं ते ढोबळही उरलेलं नाही. समूहमनाच्या थेट निरीक्षणांवरून निश्चित करण्यात आलेल्या माहिती आधारे आपण ही यंत्रणा उभी करत असल्यामुळे त्या अर्थी ते एक शास्त्र आहे. (पान ४७-४८)

१३) जाणीवपूर्वक सहकार्यासह किंवा त्याशिवाय तुम्ही जर नेत्यांवर प्रभाव टाकू शकलात तर साहजिकपणेच तुम्ही ते नेते ज्यांच्यावर ताबा ठेवून असतात त्यांच्यावर प्रभाव पाडता. समूह मानसशास्त्राच्या प्रभावाखाली येण्यासाठी लोकांनी प्रत्यक्षात एखाद्या सार्वजनिक सभेत किंवा रस्त्यावरच्या दंगलीत एकत्र यायला हवं असं नाही. कारण माणूस हा स्वभावतःच संगतिप्रिय असल्यामुळे तो एखाद्या कळपाचा सदस्य असल्याप्रमाणेच वागतो, पडदे लावून तो खोलीत एकटा बसला तरीसुद्धा तो तसाच वागतो. समूहप्रभावाने उमटवलेले ठसे त्याचं मन वागवत असतं.

(उदाहरणार्थ,)  एक माणूस त्याच्या ऑफिसात बसून कुठले शेअर विकत घ्यावेत याचा विचार करतोय. तो स्वतःच्याच निर्णयक्षमतेनुसार या खरेदीचं नियोजन करेल अशी अर्थातच त्याची कल्पना असते. पण वास्तवात तो बाहेरच्या प्रभावांच्या  त्याच्या मनावर उमटलेल्या प्रतिमांनुसार निर्णय घेत असतो. कालच्या बातम्यांमध्ये ठळकपणे उल्लेख दिसला म्हणून तो एखाद्या रेल्वे कंपनीचे शेअर घेईल, किंवा त्या कंपनीच्या ट्रेनमधून केलेल्या प्रवासादरम्यान केलेलं उत्तम जेवण त्याच्या आठवणीत असेल किंवा त्या कंपनीचं कामगारविषयक उदार धोरण त्याच्या ऐकिवात असेल किंवा जे.पी. मॉर्गनने त्या कंपनीचे शेअर घेतलेत असं त्याच्या कानावरून घेलं असेल, म्हणून तोही त्या कंपनीचे शेअर विकत घेईल. (पान ४९)

१४) जेव्हा समोर नेता नसेल तेव्हा कळपाला स्वतःच स्वतःचा विचार करावा लागेल. अशा वेळी तो गुळगुळीत साच्यांच्या (क्लिशे) मदतीने विचार करतो...

अशा साच्यांचा वापर करून किंवा नवीन साचे निर्माण करून प्रॉपगॅन्डिस्ट एखाद्या समूह भावनेला वळण देऊ शकतो. जुन्या साच्यापासून समुहाला दूर करू पाहणं जवळपास अशक्य असतं, पण नवीन साचा मात्र त्याठिकाणी बसू शकतो. (पान ५१)

१५) आपल्या कृतीमागच्या खऱ्या कारणांबद्दलची जाणीव माणसाला क्वचितच असते. बाजारात उपलब्ध असलेल्या सगळ्या उत्पादनांच्या तांत्रिक बाजूंचा काळजीपूर्वी अभ्यास करूनच आपण ही सर्वांत चांगली मोटर कार घेतोय असा विश्वास एखादा माणूस बाळगून असेलही. पण तो स्वतःला मूर्ख बनवत असतो. त्याने ती गाडी विकत घेतलेय कारण त्याला त्याच्या ज्या मित्राच्या आर्थिक स्तराबद्दल आदर वाटतो, त्याने गेल्याच आठवड्यात तसली गाडी घेतली होती, किंवा त्या माणसाच्या शेजाऱ्यांना वाटायचं की त्याला तशी गाडी परवडू शकत नाही, किंवा त्या गाडीचा रंग त्याच्या कॉलेजमधल्या सहकाऱ्यांच्या गाड्यांशी जुळणारा आहे. (पान ५१)

१६) उद्योग आणि समाज यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांमधे आणखी जवळकीचे झालेले आहेत. सध्या उद्योगविश्व समाजाला भागिदारीमध्ये घेतं. याला अनेक कारणं आहेत, काही आर्थिक कारणं आहेत, आणि शिवाय उद्योगविश्वाबद्दल वाढलेली सामाजिक जाणही याला कारणीभूत आहे. उद्योगविश्वाला आता कळून चुकलंय की, त्यांचा समाजासोबतचा संबंध फक्त एखाद्या उत्पादनाची निर्मिती आणि विक्री एवढ्यापुरताच मर्यादित नाहीये तर स्वतःलाच विकणं आता त्यांना भाग आहे. (पान ६२)

... ग्राहक निर्माण करणं हीसुद्धा नवीन समस्या आहे. आता केवळ स्वतःचा व्यवसाय समजून पुरेसं नाही तर वैश्विक समाजाची रचना, व्यक्तिमत्त्व, पूर्वग्रह व क्षमता यांचा अंदाज असावा लागतो. (पान ६३)

लाखो प्रतींचा खप असलेल्या वर्तमानपत्रांची व नियतकालिकांची वाढ आणि जाहिरातीचं आधुनिक तंत्र यामुळे उद्योजक आणि समाज यांच्यात व्यक्तिगत संबंध निर्माण होऊ घातलाय. (पान ६४)

(त्यामुळे) समाजाशी असलेल्या आपल्या सर्वांगीण संबंधांचा अंदाज असलेली तेल कंपनी आता केवळ चांगलं तेल विकणार नाही, तर चांगलं कामगार धोरणही त्यासोबत विकेल. एखादी बँक केवळ आपलं व्यवस्थापन चोख आहे याची जाहिरात करणार नाही, तर आपले अधिकारी सार्वजनिक आणि खाजगी जीवनातही कसे सौजन्यशील आहेत याची जाहिरात करतील. (पान ६५)

समाज म्हणजे काही अनाकार असलेला गोळा नसतो, ज्याला आपल्या इच्छेने नि मर्जीने आकार देता येईल. उद्योग आणि समाज दोघांनाही स्वतःची व्यक्तिमत्त्व असतात, ती मैत्रीपूर्ण पद्धतीने एकत्र आणणं महत्त्वाचं असतं. (पान ६६)

'प्रॉपगॅन्डा' मूलभूत कारणांमध्ये जात असल्यामुळे ज्या पद्धतीने त्याची ओळख करून दिली जाईल त्यावर त्याचा प्रभाव अवलंबून असतो. उदाहरणार्थ, आरोग्याला हानिकारक सौंदर्यप्रसाधनांविरुद्धची मोहीम चालवण्याची सुरुवात वॉश-क्लॉथ आणि साबणाच्या परतीसाठीची मोहीम असल्यासारखी करता येईल. ही मोहीम आरोग्य अधिकारी देशभर पोचवू शकतात. सौंदर्यप्रसाधनांऐवजी वॉश-क्लॉथ आणि साबणाचं गुणगान ते करतील.

सामाजिकदृष्ट्या लाभदायक अशा एखाद्या गोष्टीविषयी लोकांचं मत बनवण्यासाठीचं मूळ कारण कदाचित प्रॉपगॅन्डिस्टांच्या एखाद्या इच्छेमध्ये असू शकतं. पण त्यातून एखादं सामाजिक कामच होऊन जातं.  (पान ७३-७४)

१७) आपल्या आधुनिक लोकशाहीतला सर्वांत मोठी राजकीय समस्या कोणती असेल, तर नेत्यांना नेतृत्त्व करण्यासाठी प्रोत्साहन कसं द्यायचं ही. लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे, हा समज निर्वाचित व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध आपल्या मतदारांचा नोकर करू इच्छितो. काही अमेरिकी टीकाकार ज्या निष्क्रियेतबद्दल तक्रार करतात तिच्यामागे हेही एक कारण आहे.

लोकांचा आवाज कोणत्याही प्रकारे दैवी किंवा अगदी शहाणपणाचाही असतो, यावर आता कोणताही गंभीर समाजशास्त्रज्ञ विश्वास ठेवत नाही. लोकांचा आावाज त्यांचं मन दाखवतो, आणि हे मन कशापासून घडतं, तर लोकमताचा वापर करता येणाऱ्या आणि लोक ज्यावर विश्वास ठेवतात अशा नेत्यांपासून. नेत्यांनी पुरवलेले वारशाने चालत आलेले पूर्वग्रह, चिन्हं, गुळगुळीत साचे आणि मौखिक सूत्रं यांनी हे मन बनलेलं असतं. सुदैवाने प्रामाणिक आणि प्रतिभावान राजकारणी प्रॉपगॅन्डाच्या मदतीने लोकांची इच्छा घडवू व बदलू शकतो. (पान ९२)

क्वचित एखाद्या राजकीय नेत्याला नेतृत्त्वाचं प्रत्येक वैशिष्ट्यं हाताळता येत असतंही. उद्योगविश्वात जसे काही नेते एकाच वेळी चांगले अर्थतज्ज्ञ असतात, कारखाना संचालक असतात, अभियंता असतात, विक्री व्यवस्थापक असतात, जनसंपर्क सल्लागारही असतात, तसंच.

धोरणांची काळजीपूर्वी आखणी करण्याच्या तत्त्वावर मोठा उद्योग चालवला जातो, एखादी कल्पना अमेरिकेतल्या मोठ्या ग्राहक जनतेला विकण्यासाठी असं धोरण आवश्यक असतं. राजकीय नियोजकांनीही तसंच करायला हवं. काही प्राथमिक नियोजनानुसार सगळी मोहीम आखली जायला हवी. व्यासपीठं, प्रतिज्ञा, आर्थिक नियोजन, उपक्रम, व्यक्ती या सगळ्याचा काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा आणि मोठे उद्योग ज्याप्रमाणे आपल्याला हवंय ते मिळवायला या गोष्टींचा उपयोग करतात तसा करता यायला हवा. (पान ९६-९७)

(जमलेल्या निधीतला) पैसा कसा खर्च होईल याचंही उद्योगविश्वात असतं तसंच नियोजन करायला हवं. प्रचारमोहिमेतल्या प्रत्येक टप्प्याच्या महत्त्वानुसार त्यावरचा खर्च निश्चित व्हायला हवा. वर्तमानपत्रांमधल्या, नियतकालिकांमधल्या जाहिराती, पत्रकं, रस्त्यावरचे फलक, भाषणं-बैठकांमध्ये चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचा वापर, अशा प्रॉपगॅन्डाच्या सर्व घटकांवर खर्च निश्चित करायला हवा. (पान ९९)

मोहिमेच्या एकूण आराखड्यात लोकांना आवाहन करण्यासाठी वापरायच्या भावनांचाही भाग असायला हवा. संदर्भाशिवायच्या भावना चटकन हळवेपणाकडे झुकू शकतात आणि महागड्या पडू शकतात, आणि त्यामागचे प्रयत्न फुकट जातात, कारण जाणीवपूर्वक घडवलेल्या पूर्ण नियोजनाचा त्या भाग नसतात. मोठ्या उद्योगांना हे कळून चुकलंय की, प्राथमिक भावनांचा त्यांनी पुरेपूर वापर करून घ्यायला हवा. पण राजकारण्यांनी मात्र फक्त शब्दांनी उचकवायच्या भावनांचाच वापर केलेला दिसतो.

राजकीय प्रचारमोहिमेत लोकांच्या भावनांना आवाहन करणं हे बरोबरच आहे, किंबहुना ते अपरिहार्य आहे, पण हा भावनिक ऐवज असा हवा -
अ) मोहिमेचा प्राथमिक आराखडा व त्यातील बारीकसारीक तपशिलाशी जुळणारा.
ब) समाज ज्या अनेक गटांचा बनलाय त्या सर्वांशी जोडला जाईल असा.
क) कल्पना ज्या माध्यमातून प्रसारित होणार आहेत त्याच्याशी जुळवून घेणारा. (पान १००)

उदाहरणार्थ, लहान मुलांविषयीचं एखादं धोरण प्रचारमोहिमेचा भाग असेल तर एखाद्या बालकाला कडेवर घेऊन त्याच्या गालावर ओठ टेकवणं हे भावनिक प्रचाराचं साधन ठरू शकेल, पण प्रत्येक वेळी ते योग्य नसणारच. म्हणजे हॉकी स्टिकच्या निर्मात्याने हिवाळ्याच्या झाडांच्या पार्श्वभूमीवरच्या चर्चचा फोटो घेऊन जाहिरात केली तर त्याचा उपयोग नसतो. चर्च आपल्या धार्मिक भावनांना हात घालतं हे खरं असलं तरी हॉकी स्टिक विकण्यासाठी त्याचा उपयोग नाही. (पान १०१)

उद्योगविश्वाने आत्मसात केलेल्या युक्ती अजूनही राजकारण्यांनी आत्मसात केलेल्या दिसत नाहीत, त्याचं कारण कदाचित त्यांना असलेला माध्यमांचा सहज संपर्क हे असू शकेल. आणि त्यावरच त्यांची सत्ता अवलंबून असते.

पत्रकार बातम्यांसाठी त्यांच्यावर अवलंबून असतो. माहिती देण्याची किंवा राखून ठेवण्याची आपली ताकद वापरून राजकारणी राजकीय बातम्यांमध्ये 'सेन्सरशिप' लावू शकतो. आणि पत्रकार काही राजकारण्यांवर वर्षानुवर्षं बातम्यांसाठी अवलंबून असल्यामुळे आपल्या स्त्रोतांशी संबंध राखून काम करणं त्यांना भाग आहे. (पान १०५)

नेता प्रॉपगॅन्डा निर्माण करतो की प्रॉपगॅन्डा नेत्याला निर्माण करतो, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. एखादा चांगला माध्यम एजन्ट कुणीही नसलेल्या माणसाला थोर व्यक्ती बनवू शकतो.

वर्तमानपत्रं लोकांचं मत बनवतात की लोकांच्या मतांवरून वर्तमानपत्र बनतं, असाही एक प्रश्न पूर्वापार विचारला जातो. ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तेच आधीच्या प्रश्नाचंही आहे. नेता आणि कल्पना यांना रुजण्यासाठी सुपीक जमीन असावी लागते. अर्थात, नेत्यानेही तिथे चांगलं बी पेरायला हवं. वेगळ्या प्रकारे सांगायचं तर, दोन्ही बाजूंनी प्रभाव पडायचा असेल तर परस्परांची गरज असायला हवी. लोकांना जे ऐकायचंय, मग ते जाणीवपूर्वक असो किंवा गाफिल राहून वाटत असो, तसं काही राजकारण्याकडे सांगण्यासारखं नसेल तर 'प्रॉपगॅन्डा'चा काहीच उपयोग नाही. (पान १०९)

या पुढची पन्नासेक पानं स्त्रियांसाठीचे उपक्रम, शिक्षण, सामाजिक कार्य यांच्या संदर्भात 'प्रॉपगॅन्डा'ची संकल्पना स्पष्ट करण्यात खर्च झालेली आहेत. 'रेघे'वरच्या आजच्या नोंदीसाठी त्याचे तपशील आवश्यक न वाटल्याने त्या पानांचा गोषवारा टाळूया. फक्त पुस्तकाचं शेवटचं वाक्य देऊ ठेवू :
'प्रॉपगॅन्डा' कधीच मरणार नाही. प्रॉपगॅन्डा हे गोष्टी फलदायी करण्यासाठीचं आधुनिक साधन आहे याची जाणीव बुद्धिमान लोकांनी ठेवायला हवी. या साधनाच्या माध्यमातूनच गोंधळात काही सुव्यवस्था राखता येईल.
***
या सगळ्या मजकुरात सत्ताकांक्षी राजकीय नेत्यांसोबत ज्या 'अदृश्य शासना'बद्दल बोललं गेलंय ते म्हणजे आर्थिक सत्ता राखून असलेली मंडळी होत, हे चाणाक्ष वाचकांनी एव्हाना हेरलं असेलच. त्यामुळे या दोन सत्तांच्या संबंधांवरूनच आपण समूहनिर्णय घेणार असू तर त्यावर उपाय काय? कदाचित माध्यमं थोड्याफार प्रमाणात यावर उपाय देऊ शकतात. पण माध्यमांच्या मागेही असलेल्या 'अदृश्य शासना'मुळे तेही होण्याची शक्यता दिसत नाही. अर्थात, समूहच यावर काहीतरी नवीन शक्यता शोधून काढत असेल, तर तेच ठीक म्हणा.

आत्तापर्यंत झालेल्या आणि येऊ घातलेल्या निवडणुका, आत्तापर्यंत झालेली आणि येऊ घातलेली विविध भाषणं, आत्तापर्यंत लिहिले गेलेले आणि येऊ घातलेले वर्तमानपत्रांमधील राजकीय विश्लेषणपर लेख आणि आत्तापर्यंत झालेल्या आणि येऊ घातलेल्या क्रांत्या यांना ही नोंद अर्पण करू आणि थांबू. जय हिंद जय महाराष्ट्र.
***


खुर्ची आणि पेपर (फोटो : रेघ)


ही पाहा बिनसत्तेची खुर्ची
या बसा
वाचा पेपर
पाहा टीव्ही
खोला फेसबुक
नि बोला
लाइफ झिंगालाला


Tuesday, 16 April 2013

भारतीय रेल्वे : मार्क्स । मर्ढेकर । आणि दोन फोटो

भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबईतल्या बोरीबंदर स्टेशनातून (म्हणजे आत्ताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून) ठाण्याच्या दिशेने धावली. ह्या घटनेची तारीख होती १६ एप्रिल १८५३. या घटनेचं १६०वं वर्षं साजरं करत 'गुगल'ने आज त्यांचा लोगो त्यासंबंधी केलाय :हे तुमच्या पाहण्यात आलं असेल. 'गुगल'ने हे डुडल केलंयच तर त्या निमित्ताने आपण काही गोष्टी 'रेघे'वर नोंदवून ठेवू.
***

ज्या वर्षी ही रेल्वेगाडी धावली, त्याच वर्षीच्या जुलै महिन्यात कार्ल मार्क्सनी एक लेख लिहिला होता : भारतातील ब्रिटिश सत्तेचे भविष्यातील परिणाम. भारतात वर्षानुवर्षं रुतून असलेली जातिव्यवस्थाधारित श्रमविभागणी रेल्वेच्या व्यवस्थेने येणाऱ्या आधुनिक उद्योगांमुळे संपेल, असं मार्क्सनी या लेखात म्हटलंय. भारताच्या प्रगतीच्या आणि सत्तेच्या आड येत असलेले हे अडथळे आहेत, आणि रेल्वेच्या आगमनाने ते संपतील, असा अंदाज त्यांनी बांधला. हा फोल गेलेला अंदाज बऱ्यापैकी प्रसिद्धही आहे. रेल्वेच्या पसरलेल्या जाळ्याचं अंतर तपासलं तर भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वेयंत्रणा आहे असं आपल्याला सांगितलं जातं. जातिव्यवस्थेची अशी तपासणी केल्यावर काय हाती लागेल? माहीत नाही. तर मार्क्सरावांचा हा अंदाज चुकला.

याच लेखात मार्क्स असंही म्हणतात की, ब्रिटिशांचं भारतातलं (स्वतःच्या फायद्यासाठीचं) साधारण काम, असलेल्या गोष्टी 'उद्ध्वस्थ करणं' आणि नव्यानं 'उभारणी करणं' अशा स्वरूपाचं आहे. यात मग ब्रिटिशांनी आणलेल्या 'फ्री प्रेस'चाही उल्लेख ते करतात. नवनिर्मितीच्या प्रक्रियेतील एक नवा आणि ताकदवान घटक म्हणजे ही स्वतंत्र माध्यमांची व्यवस्था, असं मार्क्स म्हणतात. या अंदाजात काही तथ्य असेल बहुधा. पण त्याचीही तपासणी मात्र वारंवार व्हायला हवी.

अर्थात, मार्क्सनी एवढ्या लांबून भारताबद्दल अंदाज बांधणं जरा धाडसाचंही आहे आणि त्यात त्रुटी तर उघड उघड आहेतच.

तर, आता आपण आपल्या जवळ राहाणारे बाळ सीताराम मर्ढेकर यांनी रेल्वेशी संबंधित किंवा एकूणच काही संबंध जोडून काही म्हटलंय का पाहूया. मर्ढेकरांची 'फलाटदादा फलाटदादा' ही एक कविता आपल्याला इथे देता येईल, पण एकूण 'रेघे'वर आत्तापर्यंत जोडून आणलेला संदर्भ पाहता आपण मर्ढेकरांना दिसणाऱ्या मुंग्यांकडेच पाहूया.

मी एक मुंगी, हा एक मुंगी,
तो एक मुंगी, तूं एक मुंगी,
ही एक मुंगी, ती एक मुंगी,
पांच एथल्या, पांच फिरंगी;

सहस्त्र जमल्या, लक्ष, कोटिही,
अब्ज अब्ज अन् निखर्व मुंग्या;
अनंत अगणित साऱ्या जमल्या-
किती वारुळी, किती लफंग्या!

कुणी डोंगळे काळे काळे;
कुणी तांबड्या, भुरक्या मुंग्या;
कुणि पंखांच्या पावसाळि वा
बेडर ग्रीष्मांतल्या लवंग्या!

सावधान कुणि रांग धरूनी
एकामागुन एक चालती;
कुणी बावळ्या अप्पलपोट्या
मिळेल साखर तेथे चरती;

व्रतस्थ बनती चावा काढित
कुणि; कुणि पाजित मधुरस इतरां
जन्म कंठती; फळविती कुणि अन्
सम्राज्ञीला प्रसन्न चतुरा!

ह्या मुंग्यांतिल एकेकीला
बनेल खाउनि राजा कोण;
पार्थिवतेच्या पराकोटिचें
अपार्थिवाला नेइल लोण?

- आला आला स्वस्त दरावर आला हो आला
हा मुंग्यांचा लोंढा आला! खोला, फाटक खोला!


दहा दहाची लोकल गाडी
सोडित आली पोकळ श्वास;
घड्याळांतल्या कांट्याचा अन्
सौदा पटला दीन उदास.

ह्या नच मुंग्या : हींच माणसें :
असेच होते गांधीजीही,
येशु क्रिस्त अन् कृष्ण कदाचित्
कालिदास अन् टैकोब्राही.

ह्या नच मुंग्या : हींच माणसें,
मनें अनामिक जरि साऱ्यांचीं,
लक्तरलेल्या मिनिटांचा वर
सदैव बुरखा; लाज स्वतःची.

अंगावरती जिरलेले किति
तऱ्हेतऱ्हेचे मादक धर्म;
अन् वासांची त्यांच्या कॉक्-टेल
तर्र झोकुनी फलाटफार्म.

जशि पाप्याची नजर फिरावी
अनोळखीच्या उरावरूनी,
ह्या साऱ्यांची भेकड वृत्ती
वावरते तशि जगण्यामधुनी.

ह्या नच मुंग्या : हींच माणसें :
मायबाप अन् भाऊबहिणी
ह्यांना असती; होतिल आणिक
मुलें मुली अन् पुतण्यापुतणी.

(मर्ढेकरांची कविता, पान ८८-९०)
ही कविता अजून पुढे आहे, पण आपला संदर्भ स्पष्ट करण्यापुरती इतकीच इथे दिली. पूर्ण वाचण्यासाठी मौज प्रकाशनाने काढलेल 'मर्ढेकरांची कविता' हे पुस्तक पाहता येईल. आपल्या तुलनेने लहान संदर्भाच्या नोंदीमध्ये मर्ढेकरांनी अनेक संदर्भांची गर्दीच करून ठेवलेय, असं आपल्याला वाटलं असेल आणि ही कविता वाचून 'शब्द फुटेनासं होणं' अशी काही परिस्थिती आपली झाली असेल तर शब्दांपेक्षा जास्त बोलके असल्याचा दावा ज्यांच्याबद्दल केला जातो ते फोटो पाहणंच बरं. त्यातून कदाचित आणखी संदर्भ स्पष्ट होतील.

रेल्वे आणि पेपर : फोटो पहिला
रघू राय । चर्चगेट रेल्वे स्टेशन (फोटो : 'मॅग्नम'कडून)रेल्वे आणि पेपर : फोटो दुसरा
फोटो : रेघ

थांबू.

Sunday, 14 April 2013

बाबासाहेब आंबेडकर । माध्यमं । धनंजय कीर

पॉप्युलर प्रकाशन
या नोंदीची साधारण तीन निमित्तं आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरू केलं ती तारीख होती ३ एप्रिल १९२६. बाबासाहेबांच्या जयंतीची तारीख आहे १४ एप्रिल. आणि बाबासाहेबांचं आत्तापर्यंतचं बहुधा सर्वांत लोकप्रिय चरित्र लिहिणाऱ्या धनंजय कीर यांचं जन्मशताब्दी वर्ष २३ एप्रिलला संपतंय. ही निमित्तं साधत कीरांनी लिहिलेल्या चरित्राच्या मदतीने आपण आंबेडकरांच्या पत्रकारितेसंबंधी लहानशी नोंद करून ठेवणार आहोत. धनंजय कीर यांच्यासंबंधी एक कच्च्या स्वरूपातली वेबसाइट (http://dhananjaykeer.com) बहुधा धनंजय कीर स्मारक समितीने तयार केली होती. गेल्या काही दिवसांपर्यंत ती होती, पण आज पाहायला गेल्यावर या वेबसाइटच्या पत्त्याचा कालावधी संपल्याची सूचना येतेय. त्यामुळे कीरांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ही अशी होतेय. मराठी संस्कृतीला हे जुळणारं आहे.

आंबेडकरांनी 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत' अशी दोन पाक्षिकं वेगवेगळ्या टप्प्यांवर काढली. माध्यमांच्या या व्यवहाराशी आंबेडकरांचा संबंध कसा आला आणि त्यांच्या एकूण माध्यम हाताळणीकडे पाहून आपल्याला काही हातास लागावं असा या नोंदीचा हेतू आहे. एकूण या विषयाचा आणि आंबेडकरांसारख्या बुद्धिमान माणसाचा आवाका पाहता ही नोंद खूपच तोकडी ठरेल, पण सुरुवात म्हणून ह्या वर्षी आपण इतपतच पल्ला गाठू शकलोय.
***


पान क्रमांक ४८वर आंबेडकरांच्या पहिल्या 'मूकनायक' या पाक्षिकासंबंधी कीर काही माहिती देतात :
शाहू महाराजांनी आंबेडकरांना आर्थिक साहाय्य देऊन एक पाक्षिक काढावयास लावले. ते 'मूकनायक' नावाचे पाक्षिक ३१ जानेवारी १९२० या दिवशी त्यांनी सुरू केले. त्या दिवसापासून आंबेडकरांनी त्या मूक समाजाचे नायकत्व स्वीकारले. पांडुरंग नंदराम भटकर यांना आंबेडकरांनी संपादक नेमले होते. ते महार समाजापैकी असून पुण्यातील डी. सी. मिशनमधून त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले होते. त्यांची पत्नी ब्राह्मण समाजापैकी होती. त्यापायी त्यांना बराच छळ सोसावा लागला होता. त्या पाक्षिकावर आंबेडकरांचे संपादक म्हणून नाव नसले, तरी ते आंबेडकरांनी सुरू केलेल्या चळवळीचे मुखपत्र होते, हे अनेकांना माहीत होते. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने तो काळ किती प्रतिकूल आणि कठोर होता ह्याची कल्पना 'केसरी'सारख्या वर्तमानपत्राने 'मूकनायका'बद्दल दोन शब्द लिहिणे तर सोडाच, पण पैसे घेऊन त्याची जाहिरात छापण्याचे नाकारले, ह्यावरून येईल. त्या वेळी टिळक हयात होते.

'बंडाचे निशाण उभारले' या प्रकरणात महाडमधील चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या अधिकारासंबंधी आंबेडकरांनी केलेल्या क्रांतिकारी कृत्याचा इतिहास सांगून कीर पान क्रमांक ८९वर नोंदवतात :
आंबेडकरांवर टिकाकारांचे हल्ले होऊ लागले. वर्तमानपत्रातून आपले मत प्रतिपादन करण्याची नि विरोधकांच्या मतांचे नि टीकेचे खंडन करण्याची आवश्यकता आंबेडकरांना आता तीव्रपणे भासू लागली. म्हणून त्यांनी ३ एप्रिल १९२७ रोजी 'बहिष्कृत भारत' नावाचे पाक्षिक धडाक्याने सुरू केले. ध्येयनिष्ठेने वर्तमानपत्र चालविणाऱ्यांनी वर्तमानपत्रावर निर्वाहाकरिता विसंबून राहू नये, असे आपणास वाटत असल्यामुळे आपण वकिलीचा स्वतंत्र धंदा सुरू केला, असे पहिल्या अग्रलेखात त्यांनी आत्मपरिचयात्मक निवेदन केले होते. समाजसेवकाचा आर्थिकदृष्ट्या कणा ताठ असला, तर तो अधिक सुलभरित्या कार्य करू शकतो, असे यापूर्वीच त्यांचे मत झालेले होते. अस्पृश्य समाजाच्या हिताच्या दृष्टीने देशातल्या घडामोडींकडे लक्ष देऊन त्यांचे गाऱ्हाणे, त्यांची मते नि त्यांच्या प्रतिक्रिया यांची सरकारदरबारी नोंद व्हावी आणि भावी राजकीय सुधारणांच्या वेळी अस्पृश्यांना अधिकार मिळावे या हेतूने हे पाक्षिक त्यांनी सुरू केले होते. त्यांचे पहिले वृत्तपत्र 'मूकनायक' हे बंद पडले होते. ते ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप हे गृहस्थ चालवीत असत. १९२० साली बाबासाहेब लंडनला गेले त्या वेळी त्यांनी ते भटकर ह्यांच्या स्वाधीन केले होते. भटकरांनंतर घोलपांकडे सर्व व्यवस्था सोपविण्यता आली. परंतु अव्यवस्थेमुळे नि वर्गणीदारांच्या कमतरतेमुळे पत्र १९२३ पूर्वीच बुडाले. यास्तव 'बहिष्कृत भारत' नावाची एक प्रकाशनसंस्था स्थापून अस्पृश्यांचे मानवी हक्क प्राप्त करण्यासाठी जागृती केली पाहिजे नि झगडले पाहिजे असे बाबासाहेबांनी ठरविले. त्यासाठी वीस सहस्त्र रुपये निधी गोळा करण्यासाठी रामचंद्र कृष्णाजी कदम, भवानी पेठ, पुणे, यांना १९२४च्या डिसेंबरमध्ये नियुक्त केले होते. दोन वर्षांनी काही निधी जमताच 'बहिष्कृत भारत' पाक्षिक सुरू झाले. मध्यंतरी घोलप हे विधिमंडळाचे नियुक्त सभासद होते. त्यांनी पुन्हा 'मूकनायक' पाक्षिक सुरू केले. परंतु ते पुन्हा बंद पडले.

पुढे पान क्रमांक १३६वर कीर म्हणतात :
बहिष्कृत भारत : पहिला अंक (फोटो : इथून)
'बहिष्कृत भारत' पाक्षिक सुरू ठेवण्यासाठी त्यांनी अस्पृश्य जनतेकडे निधीची मागणी केली होती. आपल्या निवेदनात ते म्हणाले की, 'सरकारने देऊ केलेली, दरमहा अडीच हजारपर्यंत वाढू शकणारी नोकरी, समाजकार्य करण्यास मोकळी असावी म्हणून आपण नाकारली. रूढ धर्माचारांतील नि लोकाचारांतील दोषांचे आविष्कार करण्याचे करण्याचे भयंकर कार्य हाती घेतल्यामुळे देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेला शिव्याशापांचा भडिमार आपण एकसारखा सोशीत आहोत. फार दिवसांच्या मित्रांचा दीर्घ रोष पत्करला. त्यामुळे धंद्यात मिळणाऱ्या त्यांच्या साहाय्यास आपण मुकलो आहो. 'बहिष्कृत भारत'चे रकाने भरून जागृतीचे काम केले व ते करताना आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐषआरामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या.' परंतु वेळेवर साहाय्य मिळाले नाही. काही महिने 'बहिष्कृत भारत' बंद पडले.

मध्यंतरी २९ जून १९२८पासून त्यांच्या नेतृत्वाखाली समता संघाचे 'समता' पाक्षिक निघू लागले. 'बहिष्कृत भारता'चा दुसऱ्या वर्षीचा पहिला अंक १६ नोव्हेंबर १९२८ या दिवशी निघाला. 'समता' एका शुक्रवारी तर 'बहिष्कृत भारत' दुसऱ्या शुक्रवारी निघे. असे काही महिने चालून पुन्हा १९२९ साली दोन्ही पाक्षिके बंद पडली.
***

Friday, 12 April 2013

आदिवासी : आदिवाणी

लोगो : http://adivaani.org/
आदिवाणी ही एक प्रकाशनसंस्था आहे. गेल्या वर्षीच सुरू झालेली. आत्ताशी त्यांची तीन पुस्तकं प्रकाशित झाल्येत. त्यातलं पहिलं पुस्तक संथाली भाषेतच होतं. पुढची दोन इंग्रजी. या प्रकाशनसंस्थेच्या संस्थापकांपैकी रूबी हेम्ब्रोम आणि जॉय तुडू ही दोन मंडळी मूळची संथाल आदिवासीच असल्यामुळे त्यांनी पहिलं पुस्तक त्या भाषेतून काढलं, पण एकूण 'आदिवाणी' हा भारतभरच्या आदिवासी संस्कृतीच्या वारशाचं दस्तावेजीकरण करणारा, त्या भाषांमधल्या मौखिक साहित्याला व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम ठरावा असं त्यांना वाटतं. या दोघांना मदत करणारी तिसरी व्यक्ती मॅक्सिकन आहे, लुई गोमेझ.

आपण 'रेघे'वर ही नोंद करतोय त्याची तीन कारणं आहेत. १) साहित्य, संस्कृती याबद्दलच्या चर्चा काही वर्तुळं स्वतःपुरती आपल्या विहिरीमधे राहून करत राहतात किंवा एकदम मुख्य प्रवाह असतो, तो त्याच्या विहिरीत बुडबुडत राहतो. याला फारसा पर्याय नसला तरी यापैकी कुठल्याच प्रवाहांमधे नसलेला अप्रकाशित प्रवाहही असतो, तर तो किमान प्रकाशात आला तर बरं, असं वाटतं. आदिवासी साहित्याचा असाच प्रवाह आहे, असं काही लोक सांगतात. आणि बाहेरून कोणी त्याबद्दल सांगण्यापेक्षा आदिवासी मंडळीच तसं म्हणत असतील तर ते ऐकून घेतलं पाहिजे, म्हणून आपण आपल्या विहिरीत ही नोंद करतोय. २) नक्षलवादाबद्दल जी सर्वसाधारण ढोबळ निरीक्षणं, लेख, बातम्या येतात, त्यात मूळ वादाच्या थिअरीशीही फारसं संबंधित नसलेलं आणि ह्या वादाचं प्रॅक्टिकल जिथे चाललंय तिथल्या लोकांशीही फारसं संबंधित नसलेलं असं काहीतरी आपल्या आजूबाजूला माध्यमांमधून सुरू असतं. यातही आपण काही बोलण्यापेक्षा आदिवासी मंडळीच बोलली तर बरं असं वाटत असल्यामुळे ही नोंद 'रेघे'वर करूया. हे बोलणं प्रत्येक वेळी कुठल्यातरी वादाबद्दलच असेल असं नाही, पण किमान लोकांना स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी जागा तरी देणं आवश्यक आहे. 'आदिवाणी'चं दुसरं पुस्तक ज्यांचं आहे ते ग्लाडसन डुंगडुंग झारखंडमधले मानवाधिकार कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी नक्षलवादी समस्येच्या सरकारी आणि माओवादी अशा दोन बाजूंना सोडून आपली आदिवासी बाजू आत्तापर्यंत धोका पत्करून मांडलेली आहे. 'आदिवाणी'ने काढलेल्या त्यांच्या पुस्तकाचं नाव 'व्हूज कंट्री इज इट एनीवे' असं आहे. ३) 'आदिवाणी' हा काही एक निश्चित हेतू घेऊन पर्यायी प्रवाह म्हणून सुरू असलेला प्रयत्न आहे, हेही सध्या बरं दिसतंय. आणि त्यासाठी काही निधी जमवण्याची त्यांची मोहीम सुरू आहे. नुकतीच सुरुवात असल्यामुळे या प्रकल्पाचं पुढे काय होईल याचा अंदाज बांधता येत नाही. त्यांच्या तीन प्रकाशित पुस्तकातील एका पुस्तकाबद्दल वेगळी नोंद 'रेघे'वर करण्याची उमेद आपण बाळगून आहोत. पुस्तक हातात आल्यावर खरं. तूर्तास, 'आदिवाणी'ची ओळख ते त्यांच्या वेबसाइटवर अशी करून देतात :

व्हूज कंट्री इज इट एनीवे
भारतामध्ये साडेआठ कोटीहून अधिक आदिवासी लोक राहतात. ही संख्या आकर्षक दिसते आणि अनेक आदिवासी मंडळींनाही त्यामुळे हुरूप वाटू शकेल. पण त्यांच्याबद्दल तशी आपल्याला काय माहिती आहे? इंटरनेटवर किंवा एखाद्या पुस्तकात आदिवासी जीवनशैलीचं साचेबद्ध अद्भुतरम्य वर्णन केलेलं सापडेल. आम्ही खरंच असे आहोत का, आमच्याबद्दल लिहिलं जातं ते खरोखरच तसं आहे का, याचं आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटतं.

आदिवासींची एक वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक-राजकीय व सांस्कृतिक ओळख आहे आणि त्यातून त्यांना स्वयंपूर्ण समुदाय म्हणून टिकता आलंय. आदिवासी संगीत, गाणी, नृत्य हे फक्त सरकारी किंवा अन्य नागरी कार्यक्रमांच्या सुरुवातीला किंवा शेवटाला दाखवायची गोष्ट एवढ्यापुरतंच मर्यादित राहतं.

आदिवासी संघर्ष आणि संस्कृतीबद्दल आत्तापर्यंत नेहमी बाहेरच्या म्हणजे मुख्य प्रवाहातल्या इतिहासकारांनीच लिहिलं. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्यामधे आदिवासी नेत्यांनी दिलेलं योगदान बहुतेकसं दुर्लक्षितच राहिलं.

आदिवासी आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला अभिमानाने धरून आहेत, पण त्यांच्या या संपन्न वारशाचं कोणतंही दस्तावेजीकरण उपलब्ध नाही.

सध्याच्या आधुनिकीकरणाच्या आणि औद्योगिकरणाच्या काळात भारतामध्ये लोककलेला बाधा पोहोचण्याची शक्यता लक्षात घेता पारंपरिक मौखिक कथनशैली ही एक मृतप्राय संस्कृती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

'आदिवाणी' हे या परिस्थितीला दिलेलं उत्तर आहे.

आमच्याबद्दल इतरांनी लिहिलं ते समाधानकारक आहे का? आदिवासी संस्कृती, इतिहास, लोककथा, साहित्य याबद्दल विश्वसनीय माहिती हवी असेल तेव्हा आम्ही काय वाचावं?

आम्ही आदिवासींसाठी आणि आदिवासींनी लिहिलेल्या साहित्याचा दस्तावेज करू इच्छितो. कथनाच्या मौखिक रूपांचं दस्तावेजीकरण करू इच्छितो. आदिवासी  लेखक, कवी, संशोधक किंवा या उपक्रमाबद्दल आत्मीयता वाटणाऱ्या सर्वांचा सहभाग 'आदिवाणी'मधे व्हावा अशी इच्छा.

'आदिवाणी'ची आत्तापर्यंतची तीन पुस्तकं ही किंमतीच्या अंगानेही परवडण्याजोगी आणि त्यांच्या हेतूला धरून आहेत. कुठल्याही व्यक्तीचं किंवा संस्थेचं भविष्यात काय होईल हे आपण सांगू शकत नसलो तरी आत्ता जे दिसतंय त्यावरून 'आदिवाणी'चा प्रयत्न दखल घेण्याजोगा वाटतोय. यात कोणाबद्दल खोटी कणव दाखवणं चुकीचंच ठरणार. वरच्या ओळखीत म्हटलंय तसं केवळ 'अद्भुतरम्य' पातळीवरची कणव बाजूला ठेवून किमान सर्वांना व्यासपीठं उपलब्ध असणं तरी आवश्यक आहे, या अंगाने या नोंदीकडे पाहावं. यासंबंधी खरंतर महाराष्ट्रातूनसुद्धा 'ढोल' हे नियतकालिक निघतं त्याचीही नोंद आपण 'रेघे'वर करायला हवेय. पाहू.

जाता जाता शहाद्याचे ज्येष्ठ कवी वाहरू सोनवणे यांची 'स्टेज' ही कविता देऊया :

आम्ही स्टेजवर गेलोच नाही
आणि आम्हाला बोलावलंही नाही.
बोटाच्या इशाऱ्यांनी-
आमची पायरी आम्हाला दाखवून दिली.
आम्ही तिथेच बसलो;
आम्हाला शाबासकी मिळाली.
आणि ‘ते’ स्टेजवर उभे राहून
आमचे दुःख आम्हालाच सांगत राहिले.
‘आमचे दुःख आमचेच राहिले
कधीच त्यांचे झाले नाही...’
आमची शंका आम्ही कुजबुजलो.
ते कान टवकारत ऐकत राहिले
नि सुस्कारा सोडला
आणि आमचेच कान धरून
आम्हालाच दम भरला-
‘माफी मागा; नाही तर..!’

Tuesday, 9 April 2013

दस्तयेवस्कीचं टिपण आणि माध्यम नियंत्रित माणूस

ही नोंद आजच्या काळाला किंवा आजच्या काळातल्या माध्यम नियंत्रित माणसाला किंवा माणूस नियंत्रित माध्यमाला अर्पण करूया. हे असं अर्पण का केलंय त्याचा पत्ता नोंदीच्या शेवटच्या वाक्यात लागेल. किंवा अधूनमधूनही लागेल.

फ्योदोर दस्तयेवस्कीच्या 'नोट्स फ्रॉम अंडरग्राउन्ड' या कादंबरीतल्या पहिल्या प्रकरणाचा हा मराठी अनुवाद आहे (मूळ रशियन मजकुराच्या मिरा गिन्सबर्ग यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादावरून केलेला). त्यामुळे हे झालं दस्तयेवस्कीचं टिपण. ही कादंबरी प्रकाशित झाली त्याला पुढच्या वर्षी दीडशे वर्षं होतील.
***

बंटम क्लासिक्स आवृत्ती
मी घृणास्पद माणूस आहे... मी दुष्ट माणूस आहे. मी अनाकर्षक माणूस आहे. मला माझ्या यकृतातून वेदना जाणवतायंत. पण खरंतर मला माझ्या आजारपणाबद्दल काडीचीही माहिती नाहीये. मला नक्की कुठं दुखतंय त्याबद्दलही मला खात्रीनं काही सांगता यायचं नाही. मी औषधं आणि डॉक्टर, दोघांबद्दही आदर बाळगून असलो तरी मी सध्या उपचार घेत नाहीये, किंबहुना कधीच घेत नव्हतो. शिवाय, मी पराकोटीचा अंधश्रद्धाळू आहे, म्हणजे औषधांवर विश्वास ठेवण्याएवढा तरी नक्कीच. (अंधश्रद्धाळू नसण्याएवढं माझं शिक्षण झालेलं आहे, पण तरीही मी अंधश्रद्धाळू आहे.) नाही साहेब, मी डॉक्टरांकडे जात नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे माझा दुष्टपणा आहे. हां, आता हे बहुधा तुम्हाला समजणार नाही. मी समजू शकतो. पण, यात माझ्या दुष्टपणामुळे मी कोणाला दुखावेन याचं स्पष्टीकरण मला नीटसं देता येईलसं नाही वाटत. मी उपचार न घेतल्याने डॉक्टरांना काही उल्लू बनवल्यासारखं होतं असंही नाहीये याची मला पूर्ण कल्पना आहे. उलट दुसऱ्या कोणाहीपेक्षा याने माझाच तोटा होतोय हे दुसऱ्या कोणाहीपेक्षा मलाच जास्त माहितेय. आणि तरीही मी उपचार करून घेत नाहीये, तर त्याचं कारण माझा दुष्टपणाच आहे. माझं यकृत दुखतंय काय? दुखू देत अजून थोडा काळ.

मी गेला काही काळ असाच जगतोय- साधारण वीस वर्षं. मी पूर्वी प्रशासकीय सेवेत होतो, हल्ली नाहीये. मी एक सुमार अधिकारी होतो. मी निष्ठूरपणे वागायचो आणि त्यातून आनंद घ्यायचो. अर्थात, मी लाच घ्यायचो नाही, त्यामुळे किमान अशा वागण्यातून तरी मी आनंद घ्यायला काय हरकत! (ठिकाय, हा खूप टुकार विनोद दिसतोय, पण मी तो काढून टाकत नाहीये. मी आता ते लिहिलंय, त्याचा विचार करणं खूप गंमतीचं होतं, पण आता लक्षात येतंय की, हा दिखावेबाजीचाच बेकार प्रयत्न होता आणि त्यासाठीच मी ते तसंच ठेवतोय.)

काही माहिती मागत अर्जदार लोक माझ्या टेबलापाशी येत तेव्हा मी त्यांना दात विचकावून दाखवायचो, आणि त्यांना त्रास देण्यात यशस्वी झाल्यानंतर मी तृप्ततेने नजर फिरवायचो. मी बहुतेकदा यशस्वी व्हायचोच. त्यातले बहुतेक लोक बुजरे असायचे : अर्थातच, ते अर्जदार होते म्हणून. तरीही काही दिमाख दाखवणारेही लोक असतच, त्यातल्या एका अधिकाऱ्याचा तर मला फारच राग यायचा. तो सारखा त्याच्या तलवारीचा कटकट आवाज करत राहायचा. मी सुमारे दीड वर्षं त्या मुद्द्यावर त्याच्याशी भांडत होतो. आणि अखेरीस मी जिंकलो. त्याने कडकडाट बंद केला. अर्थात, यालाही खूप वर्षं झाली. तेव्हा मी तरुण होतो. पण सदगृहस्थांनो तुम्हाला माझ्या दुष्टपणासंबंधीचा मुख्य मुद्दा माहितेय का? त्यातला सगळ्यात भुक्कडपणाचा आणि मला कायम माहीत असलेला, अगदी मी हिंसक व्हायचो तेव्हाही माहीत असलेला भाग असा की, मी अजिबात दुष्ट नव्हतो, होय अगदी कोणाला दुखावण्याचीही सवय मला नव्हती. मी चिमण्यांनाही घाबरवायचो ते उगाचच, केवळ माझं लक्ष दुसरीकडे वळवायला. मी अगदी तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत असलो तरी मला एखादा कपभर चहा द्या, की मी एकदम शांत होऊन जायचो. खरंतर मला खूप हळवं व्हायला व्हायचं, मला गलबलून यायचं, आणि मग मी स्वतःकडे पाहूनच दातओठ चावत बसायचो नि कित्येक महिने निद्रानाशात घालवायचो. असं ते माझं व्हायचं.

मी सुमार अधिकारी होतो असं मगाशी मी म्हटलं तेही खोटंच होतं. मी दुष्टपणानेच खोटं बोललो. मी सहज आपली चेष्टा करत होतो, अर्जदारांचं सांगितलं ते आणि अधिकाऱ्याचं सांगितलं तेही. खरंतर मी कधीच कोणाशी वाईट वागू शकलो नसतो. एकमेकांना विरोधात जाणाऱ्या अनेकानेक घटकांची जाणीव मला प्रत्येक क्षणी असायची. ते विरोधी घटक माझ्या आतमधे घुसळताना मला जाणवायचे. आयुष्यभर ते माझ्या आतमधे आहेत, आणि बाहेर येण्याची याचना करतायंत हेही कळायचं, पण त्यांना मी कधी बाहेर येऊ दिलं नाही. त्यांनी मला लाज आणली, त्यांनी मला फेफरं आणलं - अखेरीस मी त्याने अगदी कंटाळून गेलो होतो. सदगृहस्थहो, कदाचित आता तुम्हाला वाटत असेल की, मी कशासाठी तरी तुमची मनधरणी करतोय. क्षमायाचना करतोय असं वाटत असेल. खरंतर, मला खात्री आहे की तुम्हाला असंच वाटत असेल. पण मग मला हेही सांगायला हवं की, तुम्हाला तसं वाटत असेल तर माझं त्याच्याशी काहीच देणंघेणं नाही.

मी कोणाला त्रासदायक होऊ शकत नाही. खरंतर मी काहीच होऊ शकत नाही : वाईट नाही की चांगला नाही. नीच माणूस होऊ शकत नाही नि प्रामाणिकही होऊ शकत नाही. नायकही होऊ शकत नाही नि किटकही होऊ शकत नाही. आणि आता मी इथे कोपऱ्यात माझे दिवस काढतोय. आणि त्यासाठी एक निरुपयोगी तत्त्वज्ञान वापरतोय की, बुद्धिमान माणूस काहीच बनू शकत नाही. होय साहेब, एकोणिसाव्या शतकातला बुद्धिमान माणूस नैतिकदृष्ट्या एक व्यक्तिमत्त्व नसलेला प्राणी आहे; आणि व्यक्तिमत्त्व असलेला, कृती करणारा माणूस हा नक्कीच मर्यादा असलेला प्राणी असणार. हे माझं चाळिसाव्या वर्षी झालेलं मत आहे. चाळीस वर्षं- हे खरंतर सगळ्यांत वयोवृद्ध असण्याचं वर्ष आहे म्हणा ना. चाळीस वर्षांपुढे जगणं म्हणजे अश्लील आहे, अनैतिक आहे! तुम्हीच सांगा बरं, प्रामाणिकपणे सांगा हां पण, चाळीस वर्षांपुढे कोण जगतं? मूर्ख आणि नीच लोक. हे मी अगदी त्या पांढऱ्या केसांच्या नि गोडगोड हसणाऱ्या म्हाताऱ्यांच्या तोंडावरही सांगायला तयार आहे. हे सांगायचा अधिकार मला आहेच, कारण मीच साठ वर्षांपुढे जगणार आहे. सत्तर, ऐंशी... थांबा थांबा मला श्वास घेऊ दे.

सदगृहस्थांनो, तुम्हाला वाटत असेल की, मी इथे तुमचं मनोरंजन करू लागलोय, तुम्हाला हसवतोय. परत तुम्ही चुकलात. तुम्हाला वाटतं तसा मी गंमत्या मनोवृत्तीचा माणूस नाहीये. काही जणांना तसं वाटतं खरं. पण ह्या सगळ्या बडबडीने तुम्हाला वैताग आला असेल (आणि मला वाटतं की तुम्ही वैतागलेले असालच), तर तुम्ही मी कोण आहे ते तुम्ही विचारायला हवं मग मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन की, मी एक महाविद्यालयीन परीक्षक होतो. मी खाणं मिळावं म्हणून काम केलं (आणि फक्त तेवढ्याच कारणाने बरं का), आणि गेल्या वर्षी माझ्या एका दूरच्या नातेवाईकाने मरण्यापूर्वी माझ्या नावावर सहा हजार रुबल ठेवले, तेव्हा मी लगेच निवृत्ती घेतली नि या माझ्या कोपऱ्यात येऊन बसलो. इथे मी पूर्वीही राहिलेलो आहे. माझी खोली खूप भयाण, भिकार आणि शहराच्या एका टोकाला आहे. एक गरीब शेतकरी घरातली बाई माझी नोकर म्हणून काम करते. म्हातारी, मूर्ख आणि मूर्खपणामुळे मुजोर झालेली आणि शिवाय एक दुर्गंध सुटलेली ही बाई.

मला असं सांगण्यात आलं होतं की, पीटर्सबर्गचं हवामान माझ्यासाठी खराब असेल, आणि माझ्या तक्रारी लक्षात घेता याचा अर्थ असा की, पीटर्सबर्गमधे राहणं खूप महागडं असेल. मला हे माहितेय, त्या सगळ्या हुशार, अनुभवी आणि मानडोलव्या कौन्सेलरांपेक्षा मला हे जास्त माहितेय. पण तरी मी पीटर्सबर्गमधे राहतो. मी पीटर्सबर्ग सोडणार नाही. मी हे शहर सोडणार नाही, कारण... पण मी सोडलं काय नि नाही सोडलं काय, त्याने काय फरक पडतो.

तरीही पुढे बोलायचं तर - एखाद्या सभ्य माणसाला कशाबद्दल बोलताना सर्वाधिक आनंद होईल?

उत्तर : स्वतःबद्दल.

बरंय, तर मग मीही स्वतःबद्दलच बोलत जाईन.
***

फ्योदोर दस्तयेवस्की
११ नोव्हेंबर १८२१ - ९ फेब्रुवारी १८८१

Thursday, 4 April 2013

एक वेडा संपादक नि त्याचा अंक : चंद्रकांत खोतांचा 'अबकडइ'

अबकडइ. लोकवाङ्मय गृह. आवृत्ती : २०१२
संपादक : सतीश काळसेकर, अरुण शेवते
मुखपृष्ठ : सतीश भावसार
चंद्रकांत खोत या नावाची साधारण ओळख द्यायची तर १९६०च्या दशकात सुरू झालेल्या अनियतकालिकांच्या चळवळीतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मंडळींमधले एक. त्यांनी कविता केल्या, कादंबऱ्या लिहिल्या (आधी अश्लील आणि नंतर अध्यात्मिक!) आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे 'अबकडइ' नावाचा अंक काढला. हा अंक १९७०च्या आसपासच्या अनियतकालिकांच्या घडामोडीतला होता. १९७३पर्यंत तो अनियतकालिक स्वरूपात निघत होता आणि त्या घडामोडी थंडावल्यानंतर त्यांनी याच नावाचा दिवाळी अंक सुरू केला आणि तो त्यांनी १९७३ ते १९९६ अशी चोवीस वर्षं काढला. त्यातली १९७६-७७-७८ अशी तीन वर्षं सोडता दर दिवाळीला 'अबकडइ' निघाला. असे हे 'अबकडइ' दिवाळी अंक स्वरूपातले एकवीस अंक.

आपण 'रेघे'वर आज करतोय ती नोंद खोतांच्या 'अबकडइ'च्या अंकांमधून निवडून काढलेल्या लेखांच्या 'निवडक अबकडइ' या खंडाविषयी. सहाशेचार पानांचा हा खंड आहे.

इतर दिवाळी अंकांपेक्षा 'अबकडइ'मधे असं काय वेगळं होतं, ज्यामुळे आपण एवढं त्याबद्दल विशेष बोलावं? पहिला वेगळेपणा - अनियतकालिकांच्या घडामोडींमधून हा अंक घडलेला असल्यामुळे आधीच्या घडामोडींमधली आपलं म्हणणं मांडण्यातली मोकळीक या अंकामधे उतरलेली. दुसरा वेगळेपणा - या अंकाचा संपादक वेडा होता. आणि आपण आपल्या मनाने त्याला वेडं म्हणायला नकोय, तो स्वतःच स्वतःला वेडं म्हणवून घेतोय.
***


वेडा संपादक

चंद्रकांत खोत नावाच्या संपादकाचा हा वेडेपणा समजून घ्यायला आपल्याला त्याची 'आणि डायरी एका वेड्या संपादकाची' हा लेख वाचायला लागेल. १९८७ चा 'अबकडइ' 'दैनंदिन, रोजनिशी, वासरी-डायरी' विशेषांक म्हणून काढायचा असं निश्चित केल्यानंतर हा संपादक अभिनेत्री तनुजापासून ते समाजवादी नेते मधू दंडवते यांच्यापर्यंत कोणाकोणाच्या डायऱ्यांचा पाठलाग करायला लागतो. आणि या पाठलागाची स्वतःची डायरी लिहून ठेवतो नि तीही मग 'अबकडइ'च्या अंकाचा भाग होते.

५ जानेवारी १९८७ला करून ठेवलेल्या नोंदीत हा संपादक म्हणतो :
....
(एका) लेखात नाडकर्णी यांनी या कलावंतांच्या छोट्या छोट्या मुलाखती घेतलेल्या दिसल्या. त्यातील तनुजाच्या मुलाखतीनं माझं खास लक्ष वेधून घेतलं. 'या नाटकात काम करायचं म्हणजे तुम्हाला दौऱ्यावर वगैरे जावं लागणार' या प्रश्नाला उत्तर देताना तनुजा म्हणते - 'तेच तर माझ्या संमतीचं आणखी एक कारण आहे. मला प्रवासाची खूप आवड आहे. आम्ही सगळे मिळून प्रवास करणार आहोत. सुमारे महिनाभर आमचं एक कुटुंब असणार! शिवाय माझ्या देशातल्या वेगवेगळ्या लोकांना मी या नाटकामुळे भेटणार. एक माणूस म्हणून त्यांच्यात आणि माझ्यात सुसंवाद साधला जाईल. अशी संधी मला कधीच मिळाली नसती. माझ्या या वेगळ्या अनुभवावर मी एक डायरीच लिहिणार आहे.'
इथे 'डायरी'चा उल्लेख वाचून माझे संपादकीय डोळे लकाकले. उत्तम. तनुजापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. डायरी मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्थात तिनं बहुधा डायरी इंग्रजीतून लिहिलेली असणार. मराठी अनुवाद करता येईल का! आपल्या ग. रा. कामतांना मध्यस्थी करायला सांगायला हवे. पाहू या.


(ह्या मूळ नोंदीत सुरुवातीला दोन परिच्छेद आहेत, इथे ते गाळलेत, त्याऐवजी '....' : रेघ )

दिवाळी येईपर्यंत जे जे भेटतील त्यांना बहुधा ह्या माणसाने आपल्या वेडात सामील करून घ्यायचा प्रयत्न केला असणार :
६ फेब्रुवारी १९८७
कामानिमित्त फोर्टमध्ये संध्याकाळी श्री. बेसिल डेव्हिड या माझ्या परिचित वकिलांना भेटायला गेलो. बराच वेगळ वाट पाहावी लागली. ते कुठं तरी कामानिमित्त बाहेर गेले होते.
भेट झाली. त्यांनी माझं अभिनंदन केलं, 'अबकडइ'ला मुंबई मराठी पत्रकार संघाचं पारितोषिक मिळाल्याबद्दल. माझ्या डोक्यात ८७च्या 'अबकडइ'चं स्वरूप भिरभिरत होतंच. मी श्री. डेव्हिड यांना सरळसरळ आमंत्रणच दिलं. डायरीसंबंधी. एका वकिलाची डायरी. येत्या सहा महिन्यांत एखाद्या महत्त्वाच्या केससंबंधी अथवा तशाच विषयावर डायरी लिहायची. त्यातून सबंध घटना वा व्यक्तिमत्त्व उभे राहिले पाहिजे. त्यांना ही अंकाची कल्पना फार आवडली. त्यांनी लिहिण्याचं कबूल केलं.

ही सगळी डायरीच इथे देत बसावं वाटतंय, पण तसं नको. आपल्याला एवढंच नोंदवायला हवंय की, हा संपादक कसा पिसाटून त्या अंकाच्या मागे लागला असेल. आणि त्याने स्वतःच्या किमान कल्पनेला तरी बंधनं घातली नसणार, त्याशिवाय तो मजकुराच्या एवढ्या उड्या मारू शकला नसता. म्हणजे आपल्या ओळखीतल्या वकिलाला किंवा डॉक्टरला सांगणं हा एक भाग. तिथून थेट सत्यजित रायच्या काकांची डायरीही मिळवायची उमेद हा संपादक बाळगून असतो :
२७ मार्च १९८७
सकाळी अलंकार-कमल टॉकीजच्या परिसरात असलेल्या जुनी पुस्तके-मासिके विकणाऱ्याकडून पन्नास पैशाला 'किशोर' मासिकाचा जानेवारीचा अंक विकत घेतला. संध्याकाळी आमच्या घराच्या बाहेर अंगणात बोगन वेलीखाली बसून सहज चाळत बसलो. त्यात 'जेव्हा मी छोटा होतो' या शीर्षकाखाली सत्यजित राय यांच्या बालपणातल्या आठवणीवजा लेखाचा अनुवाद आढळला. उत्सुकतेने वाचला. त्यात एके ठिकाणी त्यांच्या काकांच्या आठवणी आहेत. त्यात खालील मजकुराने माझे लक्ष वेधून घेतलं. 'काम, विश्रांती, खाणे, फिरणे, गप्पा मारणे या सर्व गोष्टी करीत असताना मधून मधून छोटेकाकांचं डायरी लिहिणं चालू असे. त्यांच्यासारखं डायरी लेखन इतर कुणी केलेलं मी पाहिलं नाही. त्यांच्या डायरीत वर्तमानपत्रातील महत्त्वाचे मथळे असत; प्रत्येक तासाला काय घडले याची नोंद असे. काय वाचलं, काय खाल्लं, कोण भेटायला आले, आपण कुणाकडे गेलो, कुठे गेलो, काय पाहिलं - साऱ्या साऱ्या गोष्टींचं विवरण असे. रेल्वेने ते कधी परगावी गेले तर रेल्वेचं इंजिन कोणत्या 'टाईप'चं - कोणत्या 'प्रकारा'चं होतं, हेदेखील ते डायरीत लिहून ठेवीत... छोटेकाका डायरी लिहीत तीही चार रंगांची वेगवेगळी शाई वापरून. लाल, निळी, हिरवी, काळी - एकाच वाक्यात चार रंगांचा वापर झाला आहे, अशी अनेक उदाहरणं छोटेकाकांच्या डायरीत मी पाहिली आहेत. हे चार रंग वापरण्याचे कारण काय ते बरेच दिवस मला समजलं नव्हतं. नंतर समजलं की निसर्गाचं वर्णन हिरव्या शाईनं लिहायचं, विशेष काही असेल तर लाल शाईत लिहायचं, असा त्यांचा नियम होता. उदाहरणार्थ, 'आज खूप पाऊस पडला. माणिकच्या घरी जाता आलं नाही.' यातील पहिलं वाक्य हिरव्या शाईत होतं, दुसऱ्या वाक्यातील 'माणिकच्या घरी' हे शब्द लाल शाईत होते आणि उरलेले काळ्या शाईत...'
सत्यजित राय यांच्या काकांची ही डायरी बंगालीत प्रसिद्ध झाली आहे की काय यासंबंधी चौकशी करायला हवी. अशोक शहाणे नाही तर कलकत्त्याचे श्री. बा. जोशी यांच्याकडे.

पण कधी तरी हा संपादक थकून जाणंही साहजिकच आहे. एवढ्या खटाटोपामागचं कारण स्वतःच स्वतःला अधूनमधून समजेनासं होऊ शकतं :
२६ मे १९८७
नेहमीप्रमाणे निराशेचा झटका. काहीही करावंसं वाटलं नाही. 'अबकडइ' बंद करून टाकावं. आपल्याला हवं ते मटेरिअल गोळा करताना फार त्रास होतो. एक प्रकारची हमालीच झाली. यात क्रिएशन आहे, नाही असं नाही. पण एकंदरीत हमालीच. दुसऱ्यांच्या हजामती करीत फिरणं.
दुर्गाबाईंना भेटायला जायला हवं होतं. बरेच दिवस भेट नाही. त्यांच्याकडून आर्टिकलही मिळवायला हवं.

बास आता हे. दुर्गाबाईंपाशी येऊन आपण वेड्या संपादकाच्या डायरीबद्दल बोलणं थांबवूया. दुर्गाबाईंचा 'अबकडइ'च्या बहुतेक अंकांमधे वावर होता, हे तर आहेच आणि 'निवडक अबकडइ' या खंडाची सुरुवातही त्यांच्याच 'स्यु दुंग पॉ याची कविता' या लेखाने होते. हा लेख लहानसा आहे आणि मला आवडलेला नाही.
***

वेडा मजकूर

'निवडक अबकडइ'मधे एकूण सत्तावीस लेख आहेत. त्यातले काही लेख वगळता, बाकीच्या बहुतेक लेखांबद्दल स्वतंत्रपणे लिहावं असं वाटतंय. त्यातल्या माधव मोहोळकरांच्या 'अश्कों में जो पाया है, वो गीतो में दिया है' या साहिरवरच्या लेखाबद्दल आपण आधीही 'रेघे'वर बोललो आहोत. या लेखाबद्दल खोतांनी सांगितलेली एक गोष्टही इंटरेस्टिंग आहे : 
जुन्या बाजारातून मी बरीच कात्रणं जी साहिरवर होती ती गोळा करून माधव मोहोळकरांना दिली होती. तेव्हा ग्रँटरोड पुलाखाली सिनेमातल्या गाण्यांच्या चोपड्या मिळत. मी साहिरच्या बऱ्याच गाण्याच्या चोपड्या जमा केल्या होत्या. एकदा मी आणि मोहोळकर साहिरला भेटायला गेलो. साहिरला त्या दुर्मीळ चोपड्या मी दिल्या. नवल म्हणजे साहिर थक्क झाला. खुशीत तो उद्गारला - असलाम आलेकुम! कारण त्यावेळी माझ्या डोक्यावर फरची कॅप होती. विशेष म्हणजे त्यातली काही गाणी खुद्द साहिरकडे नव्हती.

साहिरच्या कवितेबद्दल मोहोळकरांना मनापासून प्रेम वाटलेलं जसं त्यांच्या लेखातून दिसतं, तसा दुसरा एक लेख या खंडात आहे तो श्रीकांत सिनकरांचा : 'आनंदे नाचत पंढरीसी जाऊ'. हे लेख निव्वळ मनापासून दाद देण्यासाठीच लिहिलेले आहेत. आणि ही दाद द्यायला काहीही बंधनं नाहीत याचं एक मोठं श्रेय 'अबकडइ'ला द्यायला हवं. नाहीतर पोलीस चातुर्य कथांसाठी प्रसिद्ध असलेले, (एका अर्थी 'पल्प फिक्शन' म्हणता येईल त्या पद्धतीचे लेखक) सिनकर एकदम एखाद्या संगीतकारावर प्रेमापोटी लेख लिहितील काय? पण एकदा लिहायचा म्हटला की सिनकरांसारखी माणसं मनापासून लिहिणार हेही आलंच. त्यांच्या लेखाचा शेवट असा आहे :
पाच जानेवारी! सकाळी पाचला फिरत असतानाच समजलं, आजचा दिवस भयंकर आहे. दोन्ही पाय शाबूत असूनदेखील जणू काही दोन्ही काखेत कुबड्या धरून मी पार्कला फेऱ्या मारीत होतो. असह्य हे होत होतं की नियमितपणे भेटणारी सारी मंडळी चौकशी करत होती ती केवळ माझ्याजवळच. मला किंवा अण्णासाहेबांना दररोज सकाळी एकटं पाहण्याची शिवाजीपार्कला सवय नव्हती.
पाच जानेवारी! सा रे ग म प ध नि सा. माझ्या दृष्टीने हे सूर त्या दिवश रात्री कायमचे लुप्त झाले. आता हे सूर आणि या सुरांपेक्षाही मला नितांत आवडणारं ते लयबद्ध हास्य मी पुन्हा कधीही ऐकणार नाही.
माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात अण्णासाहेबांसारखा एक थोर महापुरुष का यावा, या कोड्याचं उत्तर मला कोणी देईल का?

सी. रामचंद्र महापुरुष होते की नाही, हे आपल्याला माहीत नाही, कारण आपल्याला त्यांच्या संगीताबद्दलच फारशी माहिती नाही. पण तरीही वाचक म्हणून ह्या लेखातला प्रामाणिकपणा एवढा आपल्याला जाणवत राहतो की आपण त्या लेखाच्या प्रेमात पडतोच. या लेखामागचीही खोतांनी सांगितलेली गोष्ट इंटरेस्टिंग आहे :
श्रीकांत सिनकरची ओळख गुन्हेगारी लेखक म्हणून होती. मी ती पुसून टाकली. अॅडव्हान्स मानधनाशिवाय तो लिहीत नसायचा. सी. रामचंद्र हे माझे आवडते संगीतकार होते. त्यांचं निधन झालं तेव्हा मी श्रीकांतला गाठलं. म्हणालो, सी. रामचंद्रांवर तू मला लेख लिहून दे. सी. रामचंद्र श्रीकांतचाही आवडता होता. तो म्हणाला, मी त्याच्यावर लिहायला लागलो तर माझा हात थरथरेल. मी सांगतो, तुम्हीच लिहून घ्या. म्हणालो, ठीक आहे. माझ्या अंकाची छपाई 'अक्षर प्रतिरूप प्रेस', वडाळ्याला होत असे. त्या वेळी साहित्यिकांचे दोन अड्डे होते. एक मौजेचा प्रेस, दुसरा वडाळ्याचा अक्षर प्रतिरूप प्रेस. सी. रामचंद्रांवरचा लेख याच प्रेसमध्ये बसून लिहिला. दुसऱ्या मजल्यावर मालक अरुण नाईक यांच्या केबिनमध्ये रात्री मी आणि श्रीकांत बसत होतो. श्रीकांत लेख सांगताना ढसाढसा रडत होता. अर्ध्या तासाने तो पंधरा मिनिटं विश्रांती घ्यायचा. त्यावेळी म्हणायचा, मी वॉर्मअप घेऊन येतो. एक-एक पान झालं की मी खाली छपाईसाठी पाठवत असे. श्रीकांत थोडा बोबडा बोलत होता. मोठ्या चिकाटीने सी. रामचंद्रांवरचा लेख पूर्ण झाला. हाच तो उत्कृष्ट लेख 'आनंदे नाचत पंढरीसी जाऊ'. अप्रतिम लेख झाला होता. ते दिवस काही औरच होते. एक नशा होती. एक वेडेपण होतं. एक धमाल होती.
आता आपण परत संपादकाच्याच तोंडून वेडेपणाबद्दल ऐकतोय, त्यामुळे तो वेडेपणा आहे हे उघड मान्य करायलाच हवं. ह्या वेडेपणापायी 'अबकडइ'त खूप गोष्टी अशा सापडतात की ज्या वाचल्यावर 'अरे‍! हे असंसुद्धा लिहायचे!' असं वाटतं. म्हणजे त्या फक्त 'अबकडइ'साठी म्हणूनच होऊन गेल्या की काय? उदाहरणार्थ, अंबरीश मिश्रंची 'एका पक्ष्याची गोष्ट' ही कथा, राजा ढाल्यांच्या 'ढाले राजाच्या झेन गोष्टी'. या मंडळींनी पुन्हा अशा प्रकारचं काही लिहिलं नाही. किंवा ते प्रसिद्ध तरी झालेलं दिसलं नाही. मिश्रंनी लिहिलेली ही सुंदर कथा किमान या खंडात आली हे तरी चांगलं झालं. (मी पुन्हा पुन्हा पक्ष्याचीच गोष्ट का सांगतोय? सांगण्यासारख्या तशा खरं तर पुष्कळ गोष्टी आहेत. निस्तेज संध्याकाळी स्मशानात शांतपणे चुडा फोडणाऱ्या नर्तिकेची गोष्ट. किंवा ख्रिस्ताचे अश्रू आपल्या रुमालानं टिपून घेणाऱ्या वेरोनिकाची गोष्ट. किंवा ऑर्फियसची. किंवा शिसवी आयाळ असलेल्या रोमन सैनिकाची. किंवा कवटींच्या माळा गळ्यात अडकवून काळोखवनात हस्तमैथुन करणाऱ्या आदिपुरुषाची गोष्ट. गोष्टी खूप खूप खूप खूपशा आहेत. पण मला एकच ती आठवते. भावते, पक्ष्याची गोष्ट. चंद्रदिव्यासारखी सदोदित मिणमिणत राहते. आत कुठे तरी सुरंगी जखमीसारखी.)

'ढाले राजाच्या झेन गोष्टीं'बद्दल काय सांगणार? त्यांची पहिली गोष्टच सांगूया.
आजतागायत गावात सुकुमारा नावाची मुलगी राहत होती. चंद्राला म्हणते मावळू नकोस नि सूर्याला म्हणते उगवू नकोस : असं तिचं रूप होतं. आसपासच्या धा-वीस खेड्यांत तिच्या रूपाची बोलवा होती. लोकं भाकऱ्या बांधून तिला बघायला यायची. नेहमी लोकांची जत्रा तिच्या भोवती फिरत असायची. तिनं कधी केस विंचरले नाहीत की फुलं माळली नाहीत की ओठ रंगवले नाहीत की आरसासुद्धा कधी ढुंकून पाहिला नाही. लोकांचे चेहरे हाच माझा आरसा, असं ती म्हणायची. आणि लोक जेव्हा तिच्या सौंदर्याची स्तुती करायचे तेव्हा ती ते उडवून लावायची.
म्हणायची :
: साफ खोट्टं! तुम्ही सुंदर आहात म्हणून मी तशीच दिसते.
: छट्! तूच सुंदर.
: मी तर कधीच स्वतःचं रूप पाहिलेलं नाही. तुम्ही हे पाहू शकता : अनुभवू शकता : त्यातला आनंद लुटू शकता : मी मात्र तुमच्या या आनंदात सहभागी होऊ शकत नाही. तर मी सुंदर आहे हे पाहण्यासाठी मला मजपासून अलग होता येईलसं काही तरी सांगा.
पण त्याचं उत्तर कुणाजवळच नव्हतं.
दिवसेंदिवस साबणाच्या जाहिरातीतल्या चेहऱ्यागत तिचा चेहरा उजळत राहिला. लोकांशी गोड गुलगुलीत बोलण्याचा तिला कंटाळा आला. लोकांच्या अधाशी नजरांची किळस आली. एक दिवस ती समुद्राला उद्देशून म्हणाली
: मी सुंदर आहे हे पाहण्यास माझे डोळे निरुपयोगी आहेत. तर कुणी मला आपले डोळे देईल काय?
तर कुणी काहीच बोललं नाही.
असं हरदिवस होत गेलं नि एकदा गर्दीतनं कुणी तरी एका आंधळ्या तरुणाला समोर धरून आणलं.
: काय झालं?
: बाई तुमच्या सौंदर्याची नुसती तारीफ ऐकली नि यानं डोळेच फोडून घेतले. म्हणाला : हजारो डोळ्यांनी जिचं सौंदर्य बाटवलं असेल तेच कृत्य करायला हे डोळे धजतील म्हणून मी असं केलं. नि असं केल्यानंतर म्हणाला -
: आता मला तिच्याकडं घेऊन चला नि हे डोळे वाटल्यास तिला द्या. हे ऐकून ती हसली. म्हणाली,
: मी सुंदर आहे हे आजवर ऐकून होते. आता ते दिसलं आणि माझ्यासारखेच इतरही सुंदर असतीलसं वाटलंवतं ते खोटंच. फक्त हा तरुण अत्यंत सुंदर आहे. याच्याशीच माझं लग्न लावा.
त्या ओबडधोबड तरुणाला शिव्या घालत लोक घरोघर गेले.

श्री. दा. पानवलकरांची 'पिंपळ सळसळला' ही कथा, विलास सारंगांची 'खडकांमधली दुपार' ही कथा अशा गोष्टी या खंडात आहेत. हे असं खूप काही या खंडात आहे. म्हणजे मूळ 'अबकडइ'च्या अंकामधे केवढं असेल!

जयंत पवारांनी घेतलेली 'पासवाला : कृष्णा गोविंद मोहिते' ही मुलाखत पण सुंदर. वरळीच्या स्मशानात एंट्री पास देणाऱ्या मोहित्यांची पवारांनी घेतलेली मुलाखत मुळातूनच वाचण्यासारखी आहे. त्याबद्दल वेगळं काहीच इथे बोलायला नको. नामदेव ढसाळांचा 'दलित पँथरची गणगौळण' हा 'पँथर'च्या घडामोडींचं एक (आणि एकतर्फी) व्हर्जन सांगणारा लेखही अन्यथा कुठेच प्रसिद्ध झालेला नाही आणि तोही रोचक व मुळातून वाचण्यासारखा. स्वतंत्र लेखांशिवाय या खंडात अनुवाद आहेत. डेव्हिड लोच्या आत्मकथनाचा संक्षिप्त अनुवाद, व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या 'ख्रिस्तीन' या लेखाचा अनुवाद - असं किती नि काय सांगायचं..

जर्मन प्रियकरासोबत जर्मनीला निघून चाललेल्या फोरासरोडवरच्या वेश्येची कहाणी सांगणारी एका डॉक्टरची डायरी म्हणजे 'फोरासरोडवरलं रक्तकमळ' हा डॉ. नारायण तेरेदेसाईंचा लेख पण. शांता नावाच्या या बाईंच्या प्रियकराचं नाव 'शीतल'. किमान त्यांनी डॉक्टरांना सांगितलेलं नाव तरी हे आहे. डॉक्टर आपले सारखे प्रामाणिकपणे चकितच होत राहिलेत.
३० जुलै १९८७
शांता डोक्यात गुलाब घालून येते. सहज विचारतो, ''शांता काश्मीरला जातेस काय?''
खरोखरच शांता शीतलबरोबर काश्मीरला जाणार असते. जर्मनीला जाण्याचे ठरलेले असते. कायदेकानून अडवीत असणार. आज ना उद्या ती जर्मनीला जाईलही. दवाखान्याची उधारी देते. पाच रुपये बाकी ठेवते. हीही एक पद्धत आहे. पैसे द्यावयास नाहीत असे नाही. कदाचित डॉक्टरांच्या 'लिस्टात' आपले नाव राहावे अशी पेशंटची इच्छा असावी. शांता एकटी काश्मीरला जाणार असते. शांताला शक्य आहे. तसे 'रिस्कीच' आहे. कोठचा कोण माणूस त्याच्याबरोबर लांबवर जावयाचे. धोका हा आहेच.
अमेरिकेतून नवरदेव भारतात येतात. भारतातील कुलवंत शीलवान वधू घेऊन अमेरिकेत जातात. कित्येकांची तेथे खराब हालत होते. आपणही येथे राहून कायदेशीर त्यांना काही करू शकत नाही. वधूच्या नातेवाइकांना नुसते रडण्याशिवाय गत्यंतर नसते. 'मुलगी दिली तेथे मेली', हेच उद्गार ऐकावयास मिळतात.
शांताची केसच निराळी आहे. नागपाड्यात वेश्याव्यवसायात आई-वडिलांनी लोटली तेव्हाच मेलेली असते. परत संजीवनी घेऊन जिवंत व्हावयाचा हा प्रयत्न असतो तिचा एकटीचाच. भारतीय उच्च परंपरा आहेच. द्रौपदी, सीता ह्यांच्या मदतीला कोणी आले नाही. शांताच्या कोण येणार? असलेला किंवा नसलेला प्रत्यक्ष भगवानच.
आता आपण फक्त एका लेखाचा उल्लेख करून नोंदीचा हा भाग संपवू.

भाऊ पाध्यांचा 'बाबू : बाकी उरलेला समाजवादी!' असा एक लेख या खंडात आहे. भाऊंनी राजकीय घडामोडींसंबंधीही लेख लिहिले आणि बहुधा 'पिचकारी' हा त्यांचा लेखसंग्रह अशाच लेखांचा आहे. पण तो कधी कुठे दिसूही शकलेला नाही. तरीही इथे जो लेख आहे तो वाचून त्यांनी एकूण आपल्या पारदर्शक पाहण्यातून काय चित्रं रंगवली असतील त्याचा अंदाज येऊ शकतो. समाजवादी चळवळीची अवस्था राममनोहर लोहियांनंतर काय झाली असेल आणि मुळात कुठल्याही चळवळ नावाच्या गोष्टीत कार्यकर्ता नावाच्या गोष्टीचं काय होऊ शकतं, त्यातही बहुतेक कार्यकर्त्यांचं नाही तरी प्रामाणिक राहिलेल्या व्यक्तीचं काय होऊ शकतं, त्याचा दाखला या लेखात आहे :
बाबूला एकदा मी सवाल केला, ''बाबू, तू जे जीवन जगलास, त्याचा तुला पश्चात्ताप होतो का कधी?''
तो तत्काळ म्हणाला, ''नाही - गावडे समाजात जन्माला येऊन मी मिलमध्ये जॉबर झालो असतो म्हणजे अस्मान ठेंगणे झाले असते. पण, त्यापेक्षा मी खूप कमावलंय!''
बाबूने जे उत्तर दिलं ते असाच प्रश्न वार्ताहरांनी प्रेमासाठी राज्यत्याग करणाऱ्या इंग्लंडच्या आठव्या एडवर्ड राजाला विचारला असता, त्याने जे उत्तर दिलं होतं, त्या स्टाईलचं!
बाबूने काय साधले - ही स्वतःला पोळून घेण्याची किमया साधून! कदाचित एखाद्याला त्याचं वागणं भलतंच रोमँटिकही वाटेल! त्यापेक्षा या देशामध्ये स्वतःपुरते पाहणे, मला अधिक रोमँटिक वाटते. आपल्याला पाय पसरण्यासाठी अंथरुण नाही. याची कल्पना असताना स्वास्थ्याच्या, गोधडीसाठी चिंध्या जमवण्याशिवाय आम्ही कल्पनादरिद्री माणसे काय करतो आहोत : एकूणच या देशातल्या लोकांच्या लेख सारीच मूल्यं उफराटी झाली आहेत. बाबूसारख्या माणसाच्या जीवनाचा विचार केला म्हणजे, हे नीटपणे लक्षात येते.
***

वेडा अंक

१९७३च्या पहिल्या दिवाळी अंकातले निवेदन

वास्तविक हा अंक म्हणजे 'अबकडइ' या लघुपत्रिकेचे एकूण सहा अंक आहेत. या लघूला गुरुत्व कसे आले? हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. त्याचे उत्तरही माझ्याजवळ आहे. माझ्या एक लक्षात आलं आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर अशा प्रकारचा मार्ग तुडवायलाच हवा. आता 'अबकडइ' दर वर्षी दिवाळीत येईल. पुढील अंकांत आमच्या मनासारखा मजकूर देण्याचा खास प्रयत्न होईल.
आमच्या वाचकांस ही दिवाळी, इतकंच नव्हे तर पुढील वर्षातील होळी, गटारी अमावास्या देखील सुखात जावोत.
रेशनिंगच्या तांदूळकी जय!
----------
 'निवडक अबकडइ'मधल्या मुलाखतीतून :
अबकडइ हा एकखांबी तंबू होता. अंकाला खूप मागणी असायची. पाच हजार अंक हातोहात खपत. तरीही आर्थिक चणचण शेवटपर्यंत पाठ सोडत नव्हती. २१ दिवाळी अंकांनंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे भांडवल नव्हतं. अंक बाजारात आला की मी लोकांची बिलं भागवत असे. एजंट लोक ऐन दिवाळीत माझ्या घरी ठाम बसलेले असायचे. पैशासाठी तगादा लावायचे. या अंकाच्या कारकिर्दीत मी एकही दिवाळी नीट पाहिली नाही. अनुभवली नाही. ऐन दिवाळीत टेन्शनमधे असायचो. नंतर नंतर या सगळ्याचा मला वीट आला होता. अंकाला फायदा जाहिरातीतून होत असे. विक्रीतून नव्हे. या जाहिरातींसाठी खूप आटापिटा करावा लागे. अंकाची विक्री उत्तम होती. पण त्यातील पैशाने मी बिलं भागवत असे. शेवटी माझ्या हाती शून्य उरे. या सगळ्यात दम निघायचा. शेवटी १९९६ साली मी 'अबकडइ' बंद करून टाकला. त्यानंतर मोठी गंमत झाली. नंतर मला फोन यायला लागले जाहिरात कंपन्यांकडून. आपके अबकडइ के लिए फुल पेज अॅड रखा है, लेके जाव. कारण अंकाचं नाव झालं होतं. या मंडळींना मी अंक बंद केलाय हे ठाऊक नव्हतं. नंतर मात्र जाहिराती सुरू झाल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी सगळं बंद केलं होतं.
***

वेडा लेखक

अनियतकालिकांच्या घडामोडींमधे सहभागी व्यक्तींमधे 'स्टंटबाजी' नावाची एक गोष्ट दिसते का? असा एक प्रश्न आहे. उदाहरणार्थ, 'फक्त' या अनियतकालिकाच्या अंकाच्या कव्हरवर संपादकांनी स्वतःची करून दिलेली ओळख. त्यात खोतांच्या ओळखीत 'मृत्यूकडे विलक्षण ओढ. मरण बहुधा आत्महत्येत', 'अखिल कवितेत खळबळ उडवून देणारा पहिला कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर' असे उल्लेख आहेत. यातून फायद्यापेक्षा तोटेच होतात आणि ते मूळ कामाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याच्या रूपात होतात. आणि असं लिहिणारे लोक पंच्याहत्तरी गाठून आहेत.

याशिवाय, खोतांच्या आयुष्यात आलेल्या 'सौंदर्याच्या आइटमबॉम्ब'चाही असा अनेकदा उल्लेख होत आलेला आहे. स्वतः तेही मुलाखतींमधून तो उल्लेख करतच राहतात. इतरांचे दोन अधिक दोन म्हणजे चार होतात, पण माझे साडेचार झाले, असं त्यांनी म्हटलेलं आहे. या बॉम्बचा स्फोट खोतांना एवढं उडवून गेला की ते थेट हिमालयात गेले आणि तिथून आल्यावर मुंबईला चिंचपोकळीला दत्ताच्या देवळात बसू लागले. त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्या 'अश्लील' होत्या म्हणतात. आणि नंतर ते एकदम अध्यात्माकडे वळले आणि रामकृष्ण परमहंस, साईबाबा अशा मंडळींवर कादंबऱ्या लिहू लागले. या कादंबऱ्या आता उपलब्ध आहेत.

खाजगी गोष्टींबद्दल बोलण्याबद्दल काही आपलं म्हणणं नाही, पण मराठीतल्या आधीच तोकड्या आणि खुज्या असलेल्या वाचनाच्या नि लेखनाच्या जगात मूळ कामाकडे दुर्लक्ष करण्याइतका खाजगी गोष्टींचा गदारोळ होतो का? हाही एक प्रश्न आहे. पण यालाही काही पर्याय नाही.  कदाचित या सगळ्यासकटच मजा असेल.

नव्याने घडलेल्या घडामोडींनुसार खोतांच्या 'उभयान्वयी अव्यय', 'बिनधास्त' आणि 'विषयांतर' या 'अश्लील' कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या 'डिंपल प्रकाशना'तर्फे बहुधा ११ एप्रिलला अधिकृतरित्या प्रकाशित होणार आहेत.
किमान आता या कादंबऱ्या वाचनासाठी सहजी उपलब्ध तरी होतील. आधी तसं नसल्यामुळे त्या वाचताही आलेल्या नाहीत, त्यामुळे त्याबद्दल बोलणार काय?

पण 'अबकडइ'चं खोतांनी केलेलं काम इतकं महत्त्वाचं आहे की त्याची दखल घेणं हे तरी आपलं काम बनतंच. शिवाय कादंबऱ्यांवरही वाचल्यावर बोलण्यासारखं असेल तर पाहू.

याशिवाय खोत आत्मचरित्रही लिहिणारेत म्हणतात. एकवीस खंडांमधे. त्याचं त्यांनी सांगितलेलं नाव आहे : 'करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो'
***

टीप : या लेखात वेडेपणा असं जिथे म्हटलंय तिथे ते शहाणपणा असं आहे.
***चंद्रकांत खोत (फोटो : प्रहार । इथून)