Friday, 15 May 2015

गांधी मला भेटणार होता, पण दुर्दैवानं आपल्याकडं वेळ फार थोडा आहे!

गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० x १२च्या खोलीत
६ x २ १/२च्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेव्हा तो म्हणाला-
सत्यापासून सौंदर्य वेगळे असू शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे. त्या सत्याच्या द्वारा मी सौंदर्य पहातो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहुनही कठोर आणि कुसुमाहूनही कोमल आहे
- या ओळींपासून सुरू होणाऱ्या 'गांधी मला भेटला' या वसंत दत्तात्रेय गुर्जरांच्या कवितेवरची बंदी आता सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवली आहे. (न्यायालयाच्या निकालाची प्रत) कवितेच्या ज्या प्रकाशनावरून (बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन, औरंगाबादचं 'बुलेटिन') न्यायालयात खटला सुरू होता, त्या प्रकाशनाचे प्रकाशक म्हणून लातूरचे देविदास तुळजापूरकर यांना न्यायालयात माफी मागावी लागली आणि मग खटला मिटला, असं यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून कळतं. (शिवाय, मुळात कवितेपेक्षाही या सगळ्या घडामोडींना समांतर असा आणखी एक संदर्भ असल्याचंही बोललं जातं. बँक ऑफ महाराष्ट्रनं विजय मल्ल्या यांच्या 'किंगफिशर' या कंपनीला दिलेल्या कर्जाच्या व्यवहारामध्ये काळंबेरं असल्याचा आरोप २०१२ साली झाला होता. हा आरोप तुळजापूरकर यांच्या 'जागलेपणा'मुळं झाला असल्याच्या संशयावरून बँकेनं वेगळी कुरापत काढून या कवितेवरून त्यांच्यावर कारवाईची तयारी केल्याची बातमीही दोन वर्षांपूर्वी 'द हिंदू' या वर्तमानपत्रात आली होती. (सुधारीत माहिती- संघटनेने संपाची हाक दिल्यावर या कारवाईचा धोका टळल्याची माहिती तुळजापूरकर यांनी फोनवरच्या बोलण्यात रेघेला दिली.) अर्थात, कवितेवर खटला सुरू झाल्यानंतर बराच काळ गेल्यावरची ही घडामोड आहे आणि आपण आपल्या बळावर त्याचा आणखी काही तपास करू शकलेलो नाहीयोत, त्यामुळं त्यावर काही बोलता येणार नाही. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियनच्या नियतकालिकात कविता छापून आली तेव्हा तुळजापूरकर त्याचे संपादन करत होते व संघटनेची प्रशासकीय जबाबदारीही त्यांच्याकडं होती. ही संघटना ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनला संलग्न आहे, त्यामुळं खटला शिखर संस्थेतर्फे चालवला जात होता).

सध्या, प्रकाशकांची या खटल्यातून मुक्तता झाली असली, तरीही या कवितेतून गांधीजींची बदनामी झालेली नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी कवी वसंत गुर्जर यांच्यावरच असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. आणि त्यासंदर्भातील पुढील कामकाजासाठी खटला लातूरमधल्या सत्र न्यायालयाकडं वर्ग केला आहे. यासंबंधी काही तपशील पुढील बातम्यांमधून मिळू शकतो: महाराष्ट्र टाइम्सलोकमत लोकसत्ता डीएनए.

वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या (आणि वर ज्यांच्या लिंक दिल्या आहेत त्या सर्व) बातम्यांमध्ये कवीला अजूनही यासंबंधी पूर्ण दिलासा मिळाला नसल्याचं म्हटलं असूनही वृत्तवाहिन्यांमध्ये मात्र खटला संपून चर्चा सुरू झालेल्या दिसल्या. १४ मे रोजी दोन वाहिन्यांवर यासंबंधी रात्रीच्या चर्चा झालेल्या दिसतात. आणखी कुठं असल्यास या नोंदीत दुरुस्ती करावी लागेल. यातल्या 'जय महाराष्ट्र' या वाहिनीनं विषय काय ठेवला, तर: का होते महापुरूषांची बदनामी?

'जय महाराष्ट्र'च्या फेसबुक पानावरून

या चर्चेच्या शेवटी, साहित्यिकांनीही महापुरुषांची बदनामी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, या आशयाचं वाक्य संबंधित अँकरांनी म्हटलं, पण या चर्चेचा व्हिडिओ इंटरनेटवर आपल्याला न सापडल्यामुळं त्याबद्दल आपण अधिक काही इथं नोंदवत नाहीयोत. तरीही मुळात चर्चेच्या विषयावरूनही एवढं स्पष्ट होतंच की, 'गांधी मला भेटला' या कवितेनं बदनामी झाल्याचं न्यायालयाचं मत मान्य करून, मग अशी एकुणातच महापुरुषांची बदनामी का होते, असा काही जाब विचारण्याची जबाबदारी वाहिनीनं अंगावर घेतलेली आहे.

'एबीपी माझा' वाहिनीवर यासंबंधी झालेल्या चर्चेतही काही गोष्टी कळतात. एक तर, कवितेचं नाव 'गांधी मला भेटला होता' असंही असू शकेल, असं मधे मधे पडद्यावर दिसणाऱ्या शब्दांवरून कळत होतं. शिवाय, या चर्चेचं शीर्षक होतं- 'कवितेच्या वादात 'गांधी' हरले की जिंकले?' हे तसं फारच महत्त्वाकांक्षी शीर्षक आहे, त्यामुळं आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना त्याचं उत्तर मिळू शकत नाही, हेही या चर्चेतून कळलं. 

कविता अश्लील-बीभत्स असण्यासंदर्भात, या चर्चेतील सहभागी व्यक्तींपैकी महेश केळुसकर, या कवितेच्या बाजूनं काही म्हणणं मांडतात. दुसरे, समर खडस शेवटी उपरोधानं म्हणतात की, आपण तुकारामाचे अभंगही कोर्टात नेऊ, ते अभंगही बॅन करू, भैरप्पांच्या पर्व कादंबरीत श्रीकृष्णापासून अनेक लोक गोमांस खाताना दाखवले आहेत, अशी एक आपण यादी करू व ते सगळं बॅन करू आणि मग टिनटिन, फॅन्टम अशाच पुस्तकांचा प्रसार करूया.

यू-ट्युबवरील व्हिडिओतील चित्र : एबीपी माझा वाहिनी

आणि त्यानंतर चर्चेचा शेवट करताना अँकर व्यक्ती म्हणाली की, ''आपल्याकडे वेळ फार कमी आहे दुर्दैवाने, परंतु अत्यंत हा मोठा विषय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार, त्यामधला बॅलन्स आपल्याला साधायचा आहे, अनेक मुद्दे आपल्या मान्यवरांनी मांडले होते, अनेक कवितांचा आणि लेखांचा दाखला आपल्याला देण्यात आला, खरं तर दुसरा मुद्दा असाही असू शकतो की यातले काही अभंग किंवा कविता शालेय पाठ्यपुस्तकातसुद्धा नाहीयेत, हेसुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये, त्यामुळे जे आपल्या मान्यवरांनी मुद्दे मांडलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या परीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, योग्य की अयोग्य याविषयी वेगळी चर्चा होऊ शकते, आजच्या या चर्चेसाठी आपल्याला या सर्व मान्यवरांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार, माझा विशेषमधे आज इथेच थांबतोय, बघत राहा एबीपी माझा.''

तर, आधीच्या एका मान्यवरांनी ज्याबद्दल उपरोधानं काही बोलू पाहिलं, त्यावर पाणी फिरवून पुन्हा आपल्याला असंच सांगण्यात येतं की, 'काही साहित्य शालेय पाठ्यपुस्तकातसुद्धा नसतं, याकडं आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही!' यावरून काय सिद्ध होतं ते आपल्याला कळू शकत नाही. शालेय पाठ्यपुस्तकात येईल, असंच साहित्य असायला हवं, असा काही सूर आहे काय, तेही कळत नाही. आणि मुळात सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी मांडलेले मुद्दे त्या त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि योग्य की अयोग्य यावर वेगळी चर्चा करता येईल, त्यामुळं मुद्दा लटकता ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे, यावरच आजची चर्चा थांबू शकते. तुम्ही पाहात राहा--

आता आज जशा वृत्तवाहिन्या आहेत, तशा काही ही कविता कवीनं लिहिली तेव्हा नव्हत्या, तरीही कवीनं कवितेचं दुसरं कडवं काय लिहिलं पाहा:
गांधी मला
आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या
५३७.६ किलोसायकल्सवर
गांधीवंदना या कार्यक्रमात भेटला
तेव्हा तो बोलला-
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास न उतरल्यास त्याचा त्याग करा
आकाशवाणीच्या निवेदिकेनं सांगितलं-
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
६ वाजून ५५ मिनिटं ते ७ वाजून २ मिनिटंपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकू शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत
म्हणजे या सगळ्या माध्यमांच्या व्यवहारातलं तांत्रिक महत्त्व तेव्हा कवीच्या डोक्यात गच्चकन घुसलं असेल असंही असेल. शेवटी कवी पडला १० बाय १२च्या खोलीत राहणारा सर्वसाधारण इसम. यात निवेदिकेचा दोष नाही. काही असेल प्रॉब्लेम तर मूळच्या रचनेत असेल. हेच वृत्तवाहिन्यांना पण लागू होईल का? रचनेचं काही शोधावं वाटलं, तर बरं. नायतर व्यक्तिगत अँकरांची टिंगल केल्यासारखं होईल, आपला तो हेतू नाही, पण तसं ओझरतं होत असेल तर ती रेघेची चूक. तर, हे सगळ्या विषयांवर तांत्रिक पातळी कायम ठेवण्याचं काम आता एवढं वाढलंय,  नि इकडं कवितेवर बंदी येतेय म्हणजे पाहात राहा आता-

आपण ज्याला कडवं असं म्हटलं, तसे ओळींचे चाळीस पुंजके या कवितेत आहेत. त्यातले दोन उदाहरणादाखल आपण दिले. वास्तविक आजूबाजूच्या वास्तवातून काही घटना पाहिल्या की त्यातला एकेक पुंजका वाचकांना आठवत जाऊ शकतो. काही नावं बदलतील, काही तपशील बदलतील, उदाहरण म्हणून हा अठ्ठाविसावा पुंजका पाहा:
गांधी मला
आम जनताकी संपत्ती असलेल्या पृथ्वीवर
बेवारस मुलांच्यात नवरा-बायकोचा खेळ करताना भेटला
तेव्हा तो म्हणाला
निधर्मी देशकी क्या पहचान!
छोडो चड्डी मारो गांड!
हा पुंजका तसा अजूनही कायम आहे. आत्ता परवाच नाही का देशाचे पंतप्रधान छत्तीसगढमधल्या बस्तरमधे जाऊन आले. आणि मग देशाची प्रगती, कोळशाच्या खाणी, असे काही मुद्दे निधर्मी बातम्यांमध्ये आले. चर्चा तर ऐकल्याच असतील तुम्हीही. तर हा पुंजका जसाच्या तसाच लागू होईल.

आणि त्या नंतरचा हा एकोणतिसावा पुंजका:
गांधी मला
हाजी मस्तानच्या साम्राज्यांत दिसला
तेव्हा त्यानं चक्क पंचा सोडला
त्याच्या पंच्यावर मी कधीच गेलो नाही
पंचा काय धोतर काय नि पटलून काय
सत्याचे प्रयोग कशातूनही होतात
हो
अगदी कवितेतूनसुद्धा
परवा 'दीवार' नावाचा चित्रपट लागला होता एका वाहिनीवर, तर त्यात मधे मधे काही पूरक माहिती सांगत-दाखवत होते, त्यात या चित्रपटातील हिरो अमिताभ बच्चन यांची अलीकडची काही मुलाखत थोडी थोडी दाखवत होते, त्यात मुलाखत घेणारी व्यक्ती अमिताभ यांना म्हणते, 'तुमच्या या व्यक्तिरेखेवर हाजी मस्तान साहेब यांचा प्रभाव असल्याचं म्हणतात, तर त्याबद्दल...' मग त्याबद्दल बोलणं होतं. असं आहे. मस्तान साहेबांचे प्रयोग किती महत्त्वाचे ठरलेत पाहा. आणि हे काय कवितेतून करतात काय माहीत!

आणि मग रोजच्यासारखे अग्रलेख वाचले कीसुद्धा ही कविता कोणाला आठवू शकते. कवितेतला एकोणचाळिसावा पुंजका पाहा ना:
गांधी मला
अत्र्यांच्या शिवशक्तीत
गांधीवर अग्रलेख लिहिताना दिसला
गांधीत अग्रलेख लिहिताना दिसला
गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले
धन्य झालो
अब्जावधी वर्षात आता ईश्वर पृथ्वीवर येणार नाही
स्वदेशी राहा-स्वदेश बना
असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं
तर, अत्र्यांचे पत्रकारितेतले प्रयोगही अजून टिकून आहेत. म्हणजे हजार वर्षांना पुरून उरेल असा आत्मविश्वास, जमेल तेवढी समोरच्याला व्यक्तिगत पातळीवर हलक्यात काढणारी भाषा, हे सगळं कायम आहे. फक्त वृत्तपत्रंच नाही, तर वृत्तवाहिन्यांनीही ते प्रयोग कायम ठेवलेत असं आपलं १० बाय १२ मत आहे. आणि रेघेचा विषय आहे म्हणून सारखं ते आठवत असेल. पण ते तितकंसं महत्त्वाचं नाही. मुद्दा आहे तो, आता कवीवरचा आरोप अजूनही कायम आहे, त्यावर काही मत आहे काय आपलं? तर, रेघेपुरतं मत एवढंच की, या कवितेत गांधीजींची बदनामी झालेली नाही आणि ही कविता बीभत्स किंवा अश्लील नाही. न्यायालयानं निकाल दिलाय म्हणून आणि कवीला अडचणीत आणणं बरोबर नाही म्हणून, आपण ही कविता इथं पूर्ण देत नाहीयोत. तरीही आपल्या सगळ्यांना वाचक म्हणून यावर काही बोलता यावं एवढ्यापुरतं दाखला म्हणून काही पुंजके जोडलेत, त्यातून काही कायदेभंग झाला असेलच, तर तो सविनय आहे.

तर, या सगळ्या चर्चेच्या शेवटी मग गांधीजींचं काय झालं? ते कवीला भेटले असा दावा केलाय कवीनं, तर मग आपल्याला भेटणार होते, असं नोंदीच्या शीर्षकात लिहिलंय त्याचं काय झालं?
गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हात ठेवून म्हणाला-
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानांच्या विश्वात मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणि देवमाणसाला तर नाहीच नाही
असं सगळं असताना, आत्तापर्यंत या खटल्यात मानसिक काही त्रास झाला असला तरी कवीला आर्थिक आणि शारीरिक तोशीस पडलेली नाही, असा उल्लेख आपण मागं एका नोंदीत केला होता. आता कधी लातूरच्या कोर्टात सुनावणी होईल तेव्हा कवीला आपल्या कवितेचं समर्थन करायला जावं लागेल, तोपर्यंत तुम्ही गुर्जरांना याबद्दल काही विचारलंत, तर ते म्हणतील- हो हो सगळं ती संघटनाच बघतेय (बँक कर्मचारी संघटना), तर आता ते सांगतील, वकील सांगतील तेव्हा कोर्टात जायला लागेल, तोपर्यंत काय नाय काय नाय त्रास. आणि हसतील!

Monday, 4 May 2015

निळ्या डोळ्यांची मुलगी

गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये प्रकाशित झालेल्या एका कादंबरीबद्दलची ही नोंद. आज बौद्ध पौर्णिमा आहे, हे निमित्त ठरवलेलं नव्हतं, पण थोडंसं ते जुळून आलंय आपसूक.

गोदा प्रकाशन, औरंगाबाद । मुखपृष्ठ: सरदार जाधव

एक

उल्का चाळके कोण आहे? तिची स्टोरी काय आहे? – या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर शिल्पा कांबळे यांनी लिहिलेली नि गोदा प्रकाशनानं प्रकाशित केलेली ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी वाचावी लागेल. ही कादंबरी म्हणजे उल्का चाळके या बौद्ध मुलीची गोष्ट आहे.

इथं सुरुवातीला थोडं वेगळं बोलू. गौतम बुद्ध नावाच्या माणसानं आपलं म्हणणं वेगवेगळ्या गोष्टी सांगूनच मांडलं. म्हणजे मुद्दाम असं काही सिद्धांत मांडलाय, असं केलं नाही, तर गोष्टी सांगत गेला. त्यातून समोरच्यानं बोध करून घ्यावा. म्हणजे गोष्ट सांगण्याचं महत्त्व इतकं आहे! सिद्धांतांना महत्त्व नाही असं नाही, पण गोष्ट कशी किती खोलवर समोरच्यापर्यंत पोचते याचा एक दाखला बुद्धानं दाखवून दिला. असा दाखला आपापल्या परीनं लेखक घडवत असतात. साहित्य ही अशी गोष्ट आहे. ती आपल्याला आपल्या परिसराबद्दल, समाजाबद्दल असं कायतरी सांगते, जे एखादा काटेकोर अभ्यास-अहवाल सांगू शकत नाही. हे म्हणणं मान्य केलं तर मग ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी आपल्याला काय सांगते?

उल्का चाळके या मुलीची शाळकरी वयापासून ते लग्नाच्या वयाची तरुणी होईपर्यंतची गोष्ट ही कादंबरी सांगते. या मुलीचा बाप दारूबाजीत कामातून गेलेला. या नवऱ्याची दारू त्याच्या बायकोच्या, म्हणजे उल्काच्या आईच्या जीवावर उठली तेव्हा आईनं पोरीला घेऊन मुंबई गाठली. इथून उल्काची गोष्ट सुरू होते..

सहावीत असलेल्या उल्काला तिच्या शाळेतल्या ढगेबाई ‘डायरी ऑफ अॅन फ्रँक’ हे पुस्तक वाचायला देतात. त्या पुस्तकानं प्रभावित होऊन उल्कासुद्धा रोजनिशी लिहायचं ठरवते नि आपल्या रोजनिशीला ‘सुबी’ असं नाव देते. आपल्या आईच्या वडिलांच्या घरात राहत असलेली उल्का आपली सगळी दुःखं, सुखं सुबीला सांगत राहते. शाळेतल्या, घरच्या, इतर बाहेरच्या घडामोडी असं सगळं त्यात येतं. उदाहरण म्हणून ६ डिसेंबर १९८७ रोजीची तिच्या रोजनिशीतली ही नोंद पाहा :
प्रिय सुबी,
काल आमच्या कॉलनीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाणदिनाचा कार्यक्रम होता. सकाळपासूनच घरातील माणसे किचनमध्ये खुडबूड करीत बसली होती. एका मोठ्या पातेल्यात बेसन बनवले होते. एका गोणीत भाकरी बांधून ठेवल्या होत्या. रात्री हे जेवण टेम्पोमध्ये भरून दादरला पाठवले. बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांनी जेवण पाठवले होते. मैथलीने तिचा बिस्कीटचा डबा आम्हाला दिला. तिच्या घरातून कुणी जेवण पाठवले नाही. आज आजी, भाऊ, मये आम्ही सगळे जण ट्रेनने दादरला गेलो. तिकडच्या गर्दीला बघून मी खूप घाबरले. मला मयेने ट्रेनमधून खाली ओढले. त्यात माझ्या ड्रेसची ओढणी ट्रेनमध्ये राहिली. आम्ही दर्शन घ्यायला चौपाटीवर गेलो. तिकडे तर ट्रेनपेक्षा जास्त माणसे होती. इतक्या माणसांना शाळेत अगणित म्हटले असते. समुद्र इतका मोठा असतो. मला पहिल्यांदाच कळाले. सर्व किनाऱ्यावर खूप लोकांनी शी केली होती. समुद्राचे पाणी अंगावर येईल आणि आपल्या पोटात घाण जाईल असे मला वाटते. मी मम्मीला विचारले, ‘‘आपण इथे कशाला आलो?’’ मम्मी डोळे पुसीत म्हणाली, ‘‘आजच्या दिवशी बाबा गेले. त्यांची पूजा करायला आलो.’’ मयेला रडताना बघून मला पण खूप रडायला आले. म्हणून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मी या डायरीच्या पानावर लावला आहे.
तुझी उल्का
६ डिसेंबर १९८७
उल्काच्या आईच्या डोळ्यांत आलेलं पाणी कशामुळं होतं? या प्रश्नाच्या उत्तराचा तपास करायचा असेल तर कादंबरी मुळातून वाचावी लागेल. उल्काची आई कुठकुठल्या परिस्थितीत मुलीला लहानाचं मोठं करते, शिकवते, घडवते हा भाग कादंबरीत आहेच. त्या दुःखानं आईच्या डोळ्यांत पाणी येत असेलच. पण त्याशिवायही डोळ्यात पाणी उभं राहतं. आपल्या दुःखात कोणीतरी आधाराला सतत आहे, या जाणिवेतूनही ते येत असेल. बाबासाहेबांनी दिलेल्या या जाणिवेनं गहिवरूनही ते होत असेल. हा आधार काटेकोर स्पष्टीकरण करून सांगता येत नाही. आईच्या डोळ्यांत पाणी येण्याएवढा तो मोलाचा आहे, याचं आणखी काय स्पष्टीकरण द्यायला हवं?

आईचं दुःख हा एक भाग झाला, शिवाय उल्का हीसुद्धा एक बाई आहे. एका बाईला मुंबईसारख्या शहरात जगताना कशाकशाला सामोरं जावं लागतं, ती आपल्या आसपासच्या जगाला कसं समजून घेते, हेही या कादंबरीत आहे. यात प्रेमप्रकरणांमधेच गुंतत राहून भिरभिरत गेलेली नि पोट पाडणारी जवळची मैत्रीण आहे, सासू-नवऱ्यानं गर्भ पाडायला लावल्यामुळं उस्कटून गेलेली शेजारची बाई आहे, बाई नसूनही पुरुषांना प्रेमात पाडून पैसे कमावणारी तृतीयपंथीय सुमन आहे. या कादंबरीतल्या बायका एका साच्यातल्या नाहीत. प्रत्येकीचं आपापलं जग आहे. कोणी आत्मविश्वासानं जगतंय, तर कोणाचा जगण्यावरचाच विश्वास उडालाय. कोणी मीरा नावाची मुलगी आपल्या वाया जाण्याचं खापर आपल्या पळून गेलेल्या आईवर फोडते नि म्हणते, ‘आईनं मरून जावं, पण पळून जाऊ नये’. कोणी एक भय्याणीन दुःखाला कोळून प्यालेली- प्रियकरानं दगा दिल्यामुळं त्याला विसरायचा प्रयत्न करणाऱ्या उल्काला एकदा ही भैय्यीण म्हणते, ‘अगर भूलना इतना आसान होता तो याद नामका कोई शब्दही न होता’. कोणी एक राणी आहे- ‘मॅडयॅम, मी पण बोलते बघा. यॅ- यॅ, बी, शी, डी, ई मलाबी शिकवा इंग्लीश. मीबी पैसे देईन तुम्हाला’, असं म्हणत उल्काकडे इंग्रजी शिकायला येणारी. शिवाय ज्या वातावरणात उल्का वाढतेय त्या वातावरणाचं वर्णन करणारे शब्द पण कसे आहेत पाहा – ‘संध्याकाळची लोकल पकडणाऱ्या विचारहीन प्रकाशासारखा’ घड्याळाचा काटा, ‘गिलावा दिलेल्या सिमेंटच्या ओट्यासारखी’ घट्ट मैत्री, कुठूनच मदत मिळाली नाही तर ‘बिनशिटीच्या कुकरसारखं’ झालेलं आयुष्य, ‘कॉलसेंटर’ झालेली झोप, ‘शेअरमार्केटसारखा पडलेला’ धरमशेठचा चेहरा. असं सगळं जिवाची मुंबई करणारं वातावरण उल्काच्या आजूबाजूला आहे. आणि या वातावरणात उल्काला सांभाळणारी, दहा बाय दहाच्या खोलीत मुलीला इंजीनियरींगपर्यंत शिक्षण घ्यायला पाठिंबा देत राहणारी, टी.बी. होऊनही तगणारी आई आहे- वैजयंता. या वैजयंतेची आई, म्हणजे उल्काची आजी, आता दूर गावीच आहे. तिथून बिचारी सारखी आपल्या पोरीला पत्रं पाठवत राहते. तीही या कादंबरीत मधे मधे येत राहतात. उदाहरणार्थ, हे शेवटचं पत्र पाहा :
वजयंता,
खूप दिवस पत्र टाकलं नाही म्हणून काळजी करू नकोस. माज्या दोन्ही डोल्यात फूल पडलंय. तरी मला अंधूक अंधूक दिसतंय. झालय असं ज्या पारध्याच्या पोराकडून मी पत्र लिवून घ्यायचे तो देवाघरी गेला. त्याच नाव शिवाजी. पाटलाच्या वावरात चोरी झाली, तशी पारध्यांची आणि मराठ्यांची गावात जुंपली. पोरांनी शिवाजीला ढकलला. तो दगडाला डोकं लागून मेला. गावात पोलीस जीप आली होती. पण पारध्यांना काय न्याव मिळाला नाय. आता हा कुंभारणीचा भाचा सुट्टीत आलाय त्याच्याकडून पत्र लिवून घेते. तुझ्या तब्येतीला आराम पडावा म्हणून सोमाच्या पुतणीकडून झाडपाला पाठवते. तो रोज अनशापोटी खा. उल्काला सांग पायरीनं राहत जा. शेजारीपाजाऱ्यांशी गोड बोलत जा. जमाना खूप उलटा आलाय माणसाच्या जीवाचा कुणाला अप्रूप रायल नाही.
-    तुझी आई
तर अशा आजीची नात उल्का उलट्या जमान्यातही जगतेय. जातीमुळं आणि बाई असण्यामुळं समाजात जगताना पडलेली बंधनं ढिली करू पाहतेय. तिची गोष्ट या कादंबरीत आहे.  पण जात किंवा बाईपण याबद्दल  गोष्टीत जे काही असेल, ते आत्मविश्वासानं आल्यासारखं वाटलं. म्हणजे वरच्या-खालच्या जाती, स्त्री-पुरुष, याबद्दलचा सूर स्पष्टीकरणाचा किंवा गोंधळलेला नाहीये. कुठल्याही जातीतल्या नि लिंगातल्या माणसानं लिहिलं, तरी असा सूर कुठंतरी येऊ शकतो, म्हणजे फक्त उल्काची जात आणि बाई असणं याच्याशी हे संबंधित नाहीये. फक्त त्या निमित्तानं हे नोंदवलं. (हे खरं म्हणजे नोंद लिहिणाऱ्यानं स्पष्टीकरण दिल्यासारखं झालं! पण त्यातून मुद्दा स्पष्ट व्हायला मदत होईल- का). तर, त्यामुळं गोष्टीत एकसुरीपणा नाही वाटत. 

दोन

उल्का चाळके ज्या बंधनांमधून बाहेर यायचा प्रयत्न करतेय, त्या बंधनांचं आकलन करून घ्यायला तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चष्मा- त्यांनी दिलेली दृष्टी- महत्त्वाची वाटतेय. या दृष्टीतूनच तिचा एका सामाजिक संघटनेशीही संबंध येतो. आंबेडकराइट पीपल फॉर जस्टिस अशा संस्थेची शाखा असलेली ‘आक्रोश’ ही ती संघटना. या संघटनेच्या निमित्तानं उल्काला आणखी एका अनुभवविश्वाची ओळख होते. इथंही पुरुषी वर्चस्व आहे, छोटीमोठी राजकारणं आहेत, तरीही उल्का आता बाहेरच्या जगात शिकून मजबूत झालेली आहे. ती सगळं पाहते, टाळायचं ते टाळते, टीका करायची त्यावर टीका करते, स्वतः स्वतःला तपासत राहते. यात एकदा तिला ‘दलित ब्राह्मण’ म्हणून हिणवणारा एक मार्क्सवादी युवक भेटतो. याआधी तिनं फी-माफीचा फॉर्म भरताना ‘सरकारी ब्राह्मण’ ही निंदा ऐकलेली असते, पण हे आणखी एक नवीन काय, म्हणून ती त्या तरुणाचं ऐकून घेते. तो आपलं ज्ञान पाझळत तिला स्वतःच्या ज्ञानाबद्दल कमीपणा वाटायला लावतो. आणि मग घरी गेल्यावर उल्काला एक कविता सुचते, त्याची सुरुवात अशी-
प्रिय मार्क्स,
    तू मला ओळखत नाहीस
    पण मी तुला ओळखते
    तुझा जन्म जर्मनीचा
    वंशाने ज्यू   
    जेनी बायको
    एंजल्स मित्र
    आणि हेगेल गुरू
    ही तुझी जुजबी माहिती

    आता माझ्याबद्दल ऐक
मी कु. उल्का बा. चाळके.
वय वर्षं बावीस.
धर्माने बौद्ध, पूर्वीची महार, ढोर, चांभार, ढक्कलवार
किंवा कोळी, न्हावी, कोष्टी, गावित, कातकरी, वडार
किंवा वाणी, गोसावी, जोशी
शेवटी धनगर, बामन, सोनार
ही माझी जुजबी माहिती.
मार्क्सला आपल्या दुःखाची खोलवर कल्पना नसल्याची भावना उल्का या कवितेत नंतर मांडते. पण त्यात तक्रारीचा सूर नाही. मार्क्स भारतापासून एवढा दूर राहत होता, त्यामुळं त्याला इथलं आकलन पूर्णपणे झालं नाही, असं तिला वाटतं. धर्माबद्दलचं मार्क्सचं मतही पटत नाही, तेही ती कवितेत सांगून टाकते. बाबासाहेबांना ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ असं म्हणायचं होतं की ‘बुद्ध व कार्ल मार्क्स’ असं म्हणायचं होतं- यावर विचारवंत, पत्रकार-संपादक, नेते किंवा तशी कोणी मंडळी वाद घालत राहतीलही कदाचित. पण उल्का पडली सामान्य मुलगी. ती तिच्या स्तरावर हा प्रश्न सोडवून टाकते, नि कवितेच्या शेवटी म्हणते :
प्रिय मार्क्स,
तू बाबांना भेटायला हवं होतंस
नको रे,
काठमांडूच्या भाषणाला इतकं
मनाला लावून घेऊ नकोस.
त्यांनाही थेट तुझ्यासारखं वाटायचं
स्वातंत्र्य, लोकशाही, मानवमुक्ती, समता.
त्यांनीही टाकली होती,
पोरेबाळे तुझ्यासारखी उपाशी-तापाशी तत्त्वासाठी
पण मार्क्स,
तुझी-त्यांची भेट झाली असती
म्हणजे सुटाबुटातले बाबासाहेब
हातात पुस्तक घेतलेले
धारदार आवाजाचे
अस्सल इंग्लिश बोलणारे
सडेतोड मुद्दे मांडणारे बाबा,
खरं सांगते तुलाही इंप्रेस करून गेले असते.
डोळ्यावरचा चष्मा काढत
तुझ्या खांद्यावर हात ठेवत
हसत हसत बोलले असते,
‘मि. मार्क्स, तू इथे जन्मला असतास
तर थेट माझ्यासारखा वागला असतास.
मी जर्मनीत जन्मलो असतो
तर थेट तुझ्यासारखा वागलो असतो.’
उल्का चाळके तिच्यापुरता हा जो निष्कर्ष काढते तो तसा सामान्य माणसं काढतील असा. म्हणजे इंग्लिश बोलणारे बाबासाहेब मार्क्सला इंप्रेस करतील असंही त्यात येऊ शकतं मग! उल्काकडं इंग्रजी शिकायला येणाऱ्या राणीचाही निष्कर्ष हाच असू शकतो. सिद्धांतांपेक्षा आपल्या जगण्यातून, व्यवहारातून उल्काला जे काही वाटलं त्यातून काढलेला हा निष्कर्ष. त्यात काही कमी-जास्त असेल, तर ती तिच्या अनुभवातून सुधारेल ना मग. तो तिचा निर्णय. ही कादंबरी आपल्याला अशा सर्वसामान्यांच्या जगण्यातून निघालेले निष्कर्ष सांगते. असे सर्वसामान्यांचे निष्कर्ष सांगणं हे काम साहित्य/गोष्टीतून असं सहजपणे होत असेल, तर मग ते किमान समजून घ्यायला तरी ही कादंबरी वाचायला हरकत नाही.

निळ्या डोळ्यांची मुलगी- शिल्पा कांबळे, गोदा प्रकाशन, पानं- १८८, किंमत- २५० रुपये.