Sunday 3 November 2019

आजच्या जगण्याच्या दोन जाहिराती

काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रांमधे पहिल्या पानावर दिसलेले हे दोन फोटो आहेत. एक फोटो उघडच जाहिरातीचा आहे, दुसऱ्या फोटोत दिसणारा फोटो हासुद्धा एक प्रकारे जाहिरातच करणारा आहे.


'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' अशी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाची टॅगलाइन आहे. यात प्रश्न चुकीचा असण्याची शक्यता आपोआप पुसली जाते. जे काही आहे त्याचं उत्तर शोधत जा. प्रश्न विचारू नका, प्रश्न तपासू नका. तीन वर्षांपूर्वी रेघेवर वॉल्टर बेंजामिन/बेन्यामिनचा एक उपरोधिक वेचा आपण मराठीत नोंदवला होता, तो असा:
टीकेचा (criticism) ऱ्हास झाल्याचा शोक करणं हे मूर्खांचं काम आहे. कारण आता ते दिवस गेले. टीका हा योग्य अंतर राखण्याशी संबंधित मुद्दा होता. दृष्टिकोन व पूर्वचिकित्सा यांना किंमत होती नि काहीएक भूमिका घेणं शक्य होतं त्या काळात हा मुद्दा लागू होता. आता गोष्टी मानवी समाजाच्या खूपच निकट येऊन राहिलेल्या आहेत. 'नितळ', 'निरागस' दृष्टी हे एक झूठ आहे, किंवा ती अकार्यक्षम भाबडी अभिव्यक्ती आहे असं म्हटलं तरी चालेल. सध्या सर्व गोष्टींच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणारी सर्वाधिक सच्ची व्यापारी दृष्टी म्हणजे जाहिरात. चिंतनाचा अवकाश ती नष्ट करून टाकते. चित्रपटाच्या पडद्यावर एखादी गाडी अवाढव्य आकार धारण करून आपल्या अंगावर येते, तसा हा प्रकार असतो. [...] जाहिरातीला टीकेपेक्षा वरचष्मा प्राप्त होण्याचं कारण काय? याचं उत्तर लाल रंगाच्या फिरत्या निऑनी चिन्हांमधे नसून डांबरी रस्त्यावर त्या चिन्हांना परावर्तित करणाऱ्या प्रकाशझोतात आहे.
तर, असं डोळे दिपलेल्या अवस्थेत वावरणं अपेक्षित आहे, मग खालच्या फोटोसारखं वाटतं. '[कोल्हापूर] शहर वेगाने विस्तारत आहे आणि विविध सुविधांनी सज्ज होत आहे'- याचं चिन्ह काय तर कमी शटर स्पीड ठेवला की कॅमेऱ्यात चित्रित होणाऱ्या दिव्यांच्या रेषा. गाड्या अधिकाधिक स्पीडने जाऊ पाहतात हे खरंच, पण त्यांच्या दिव्यांच्या या रेषा कमी शटर स्पीडमुळे दिसतात. याहून कमी शटर-स्पीड ठेवला तर आकाशातल्या चांदण्याही इतक्या वेगाने फिरतायंत असा भास होतो, हे आपल्याला काही छायाचित्रांवरून माहीत असेलच. तर हा रोज आजपासून सुरू होणारा कार्यक्रम आहे. वास्तविक वरच्या छायाचित्रात प्रकाशापेक्षा अंधाराने जास्त अवकाश व्यापलाय, आणि वेगाने हलणाऱ्या वस्तूंपेक्षा गप्प उभ्या वस्तू-जीवांची-झाडांची संख्या जास्त आहे, ते सगळंच कॅमेऱ्यात आलेलं नसलं, तरी आपल्याला तसं डोळ्यांना दिसतंच, अनुभवावरून ताडता येतंच. कोल्हापुरात काही वर्षांपूर्वी १८०हून अधिक मर्सिडिझ बेन्झ गाड्यांच्या खरेदीसाठी एकाच वेळी नोंदणी झाल्याची बातमी होती (डीएनए, १५ डिसेंबर २०१०). औरंगाबादमध्ये एकाच वेळी ११५ मर्सिडिझ बेन्झ विकत घेण्यासाठी नोंदणी झाल्यावर त्यांना मागे टाकण्यासाठी कोल्हापुरातल्या मंडळींनी हा असा पुढाकार घेतला होता. त्यामुळे हे दुसरं छायाचित्रही विशिष्ट मनोवृत्तीची जाहिरात करणारंच दिसतं.