Thursday, 30 January 2014

एक्स्क्युज मी, प्लीज । वी आर गोइंग टू बी वर्ल्ड फेमस

वार गुरुवारच्या निमित्तानं ही नोंद.

You got to have some English Tuka
if you want to get ahead in the world
- Arun Kolatkar (From an Undated Sheet, The Boatride & Other Poems, page 234)

***

निळू दामले यांच्या 'यू-ट्यूब' वाहिनीवरचा व्हिडियो-


व्हिडियोतील काही :
किंग ऑफ इंग्लिश आणि क्विन ऑफ इंग्लिश असे उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत काय करायचं, तर असे दहा शब्द आम्ही लिहायचे. आम्ही लिहितो किंवा एखाद्या मुलाचं चांगलं हस्ताक्षर असेल तर त्याला लिहायला सांगतो. एक ते चारच्या सिलॅबसमधले ते शब्द निवडून आम्ही त्याची एक फाइल केलेली आहे. त्यातले शब्द द्यायचे रोज. रोज आम्ही जाणीवपूर्वक मुलांना सांगत नाही की, 'हे शब्द बघा, लिहून घ्या, पाठ करा'. फळ्याची जागा रोज बदलतो, मुलं जाता येता त्याच्याकडे पाहत असतात. पंधरा दिवसांनी आम्ही तुम्हाला हे शब्द विचारणारे. भले ते लक्षात ठेवा रोज किंवा लिहून पाठ करा. पंधरा दिवसांनी ज्याला जास्तीत जास्त शब्द सांगता येतील त्याचा आम्ही सत्कार करणार. पंधरा दिवसांनी रोजचे जे शब्द होते ते मुलांनी वहीत लिहून दाखवायचे. त्याचं स्पेलिंग, त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ. आम्ही ते तपासतो. ज्याला जास्त शब्द लक्षात आहेत, तो किंग ऑफ इंग्लिश. आणि आम्ही एक किरीट, एक मुकुट आणलेला आहे. बाहेरून चाललेल्या गावकऱ्याला इथे बोलवून अनौपचारिक वातावरणात त्या विद्यार्थ्याला तो मुकुट घालायचा. दिवसभर तो मुकुट घालून शाळेत वावरणार, गावात वावरणार, संध्याकाळी पण तो मुकुट घालून घरी जाणार. दुसऱ्या दिवशीच तो परत आणणार. म्हणजे त्याला एक, आपण इंग्रजीचा राजा झालो. अशीच एक मुलगी निवडायची, क्विन ऑफ इंग्लिश. म्हणजे त्याला एक अभिमान वाटतो. म्हणजे मुलांच्यात एक ओढ वाटते. त्यांना मुद्दाम हे सांगावं लागत नाही, की हे वाचा. त्यामुळं मुलांकडे आज हजार-दोनतीन हजार शब्द आहेत. आमचा गुरुवारचा उपक्रम असतो, इंग्रजीत बोलायचं. -- इंग्रजीतल्या ऑर्डर आहेत, इंग्रजीतली देशभक्तिपर गीतं आहेत, इंग्रजीतली प्रार्थना मुद्दामहून घेतलेली आहे. -- असा प्रयत्न आमचा छोटासा दहा वर्षांपासूनचा सुरू आहे.-- मुलगा आमचा परिसराच्या आवारात 'एक्स्युज मी' म्हटल्याशिवाय बोलत नाही. सहज कोणाहीबरोबर बोलत असेल, तरी सराईतपणे 'एक्स्युज मी' हा त्याचा शब्द झालेला आहे. 'एक्स्युज मी, मामा', असा त्याचा एक जनरल शब्द झालेला आहे. आपण 'ए मामा', 'ओ मामा' असं म्हणतो, तर ते 'एक्स्युज मी' त्यांच्या व्यवहारात -
इथं आमच्या चौथी यत्तेपर्यंत तरी मुलं आहेत, आम्ही हे पाच-दहा वर्षांपूर्वी शिकवलेलं आहे, पण पहिलीला येणाऱ्या मुलाला हे शिकवलेलं नाही, पण तो (आधीच्यांचं) अनुकरण करतो नि बोलतो. म्हणजे इंग्रजीचा मुलं इतक्या सराईतपणे वापर करतात.
***

Like it or not
I'll make you world famous
          not you alone but both of us
we're going to be famous Tuka
you and I together

These translations are going to make me famous throughout the world

- Arun Kolatkar ((From an Undated Sheet, The Boatride & Other Poems, page 234)
***

अरुण कोलटकर
अरुण कोलटकर (१ नोव्हेंबर १९३२ - २५ सप्टेंबर २००४) यांनी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमधे कविता लिहिल्या. 'द बोटराइड अँड अदर पोएम्स' या 'प्रास प्रकाशना'नं प्रकाशित केलेल्या नि अरविंद कृष्ण मेहरोत्रा यांनी संपादित केलेल्या पुस्तकात त्यांच्या काही इंग्रजी कविता, त्यांच्याच काही मराठी कवितांचे इंग्रजी तर्जुमे, तुकारामांसह काही संतकवींच्या कवितांची त्यांनी केलेली भाषांतरं, इत्यादी मजकूर वाचकांना मिळू शकतो. कोलटकर मूळचे कोल्हापूरचे.

नोंदीत ज्या शाळेचा व्हिडियो जोडला आहे, ती शाळा सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या तुंग या गावात आहे. त्या शाळेतील शिक्षक कृष्णनाथ पाटोळे यांना आपण व्हिडियोत बोलताना पाहिलं.

अरुण कोलटकर व कृष्णनाथ पाटोळे यांना आपण शेजारी-शेजारी बसवलं, हे अनेकांना आवडणार नाही किंवा पटणार नाही. ते दोघं जे काही बोलले, त्यावर तज्ज्ञ मंडळी आणखी काही बोलू शकतील. आपल्याला फक्त ते एकमेकांशेजारी दिसले, म्हणून नोंदवलं. आणि जाता जाता एक टांगतं राहणारं वाक्यही लिहूया. ह्या वाक्यापुढे पूर्णविराम, प्रश्न चिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह यांपैकी कुठलं चिन्ह दिलेलं बरोबर नि कुठलं चूक हेच ठरवता आलं नाही राव ह्याला नि नोंद कसली करतोय.?! जाऊ दे. आता वाचकांनीच आपापल्या इच्छेनुसार किंवा मतानुसार किंवा गरजेनुसार या वाक्यापुढे त्यांना योग्य वाटेल ते चिन्ह उमटवावं-

जगात पुढे जाण्यासाठी इंग्रजीची गरज आहे

***


जगी मान्य केले     हा तुझा देकार। 
की काही विचार     आहे पुढे।।
- तुकाराम

6 comments:

  1. जगात पुढे जाण्यासाठी इंग्रजीची गरज आहे.

    ReplyDelete
  2. This is absolutely true, even Tagore's poetry became world famous through his translated version and he was awarded Nobel prize. Arun Kolatkar's translations has that potential though not a Nobel necessarily.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. इंग्रजी शिकण्याची ,बेफाम सुटलेल्या या भवतालच्या जागा बरोबर बरोबरी करण्याचे गाव खेड्यातल्या लोकांचे प्रयत्न विचित्र का वाटतात
    हा इंग्रजीच्या आव्हानाला आणि समस्त अभिजनचि भाषा होवून बसलेल्या इंग्रजीशी जी त्यांच्या जगण्याच्या प्रश्नाशी जोडली गेलेली आहे तिच्याशी त्यांनी उभारलेला लढा आहे आस का वाटत नाई? नाही तर कोल्हटकर आणि तुकारामांच्या कविता आणि अभंगा सोबत या विडेओला सोबत ठेवून काय अर्थ उपस्थित करायचा आहे?
    संस्कृत ही कधीच बहुजनांची भाषा नव्हती कारण ती शिकायलाच बंदी होती. पण इंग्रजी शिकायला कोणाची बंदी आहे?जगण्याच्या असंख्य संकटाना तोंड देत शिक्षण घ्याव लागत,म्हणजे शिक्षण घेण हाच मोठा संघर्ष आहे त्यात इंग्रजी ची भर . अशी कोंडी करून ठेवलेली आहे कि इंग्रजी शिकायला कोणाची हरकत हि नाही आणि सोयही नाही.ज्या भाषेने जगण्याचे प्रश्न सोडवले त्या भाषेला कायमच लोकांनी आपलस केलेलं आहे .कृष्णनाथ सर करत असलेला प्रयत्न कौतुकास पदच आहे कदाचित याच मुलांपैकी कोणीतरी नवीन तुकाराम ,नामदेव किंवा अरुण कोल्हटकर होवून मराठी भाषेची कक्षा रूंदावतील कारण जी भाषा आपल्यात इतर भाषा सामवून घेवू शकते ती भाषा स्वताचा विस्तार करत असते अस मला वाटत .
    पुण्यासारख्या शहरत आयुष्य काढलेल्या,साहित्याची जान असलेल्या लोकांना जसा अचानक साक्षात्कार होतो कि ग्रामीण जीवन किती नैसर्गिक आणि पोषक आहे आणि शहरी जीवन पद्धतीने जीवन कसे संकटमय करून टाकले आहे आणि मग कसा तो अचानक गावच्या त्या सगळ्या गोष्टींचा उदो उदो करायला लागतो ज्या त्याने कधी काळी सोडलेल्या होत्या. सोडल्या तेव्हाही त्याने स्वताचा विचार केला आणि आताही तो स्वतचा विचार करूनच परत येतोय आणि मग परत आल्यावर गाव च गाव पण मिळत नाही म्हणून सगळ्या ग्रामीण जगण्याला आधुनिक परिप्रेक्ष्यात बसवून त्याला वाचण्याचे प्रयत्न करण्यात काय आर्थ आहे.… ?

    ReplyDelete
    Replies
    1. ''अरुण कोलटकर व कृष्णनाथ पाटोळे यांना आपण शेजारी-शेजारी बसवलं, हे अनेकांना आवडणार नाही किंवा पटणार नाही. ते दोघं जे काही बोलले, त्यावर तज्ज्ञ मंडळी आणखी काही बोलू शकतील. आपल्याला फक्त ते ''एकमेकांशेजारी'' दिसले, म्हणून नोंदवलं.'' वरतील लेखामधे कोल्हटकर आणि पाटोळे यांच्या दृष्टीकोनांमधे काही समानता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते.
      त्याबद्दल चूक किंवा बरोबर असे काही बोलणे लेखकाला शक्य नसावे असे दिसते.

      Delete
  5. "जगात पुढे जाण्यासाठी इंग्रजीची गरज आहे"..That depends..Shakespeare or Tukaram or Homer or Vyasa can last for more than one life time...If I knew no English, I don't know if I would be happier or sadder...Once I did not know it, life was Ok...now, I do, it's still OK...God forbid, when it turns terror, neither will save me from certain extinction...It didn't my mother...

    ReplyDelete