Friday 13 March 2015

एक शिवी आणि भाऊ पाध्यांचा 'बगीचा'

रामोशी गेटच्या बाजूने भवानी पेठेत घुसल्यावर डाव्या बाजूला प्लायवूड, फर्निचर वगैरेची दुकानं आहेत. उजवीकडे जुनाट चाळीसारख्या लाकडी इमारती आहेत. रस्ता छोटासाच आहे.

दुपारी दीडच्या सुमारास नेहमीसारखीच डाव्या उजव्या बाजूंनी माणसं येत जात होती. काही रस्त्याच्या मधून चालत होती. असं सगळं सुरळीत सुरू होतं, तर मधेच एक मोठा आवाज आला, ''ए... भेन्चोद''. आवाजाकडे लक्ष गेलं तर एक मध्यमवयीन मनुष्य दिसला. तोही चालत होता. करड्या रंगाची पॅन्ट, मळलेला हाफ शर्ट, असा नेहमी दिसेल असा तो माणूस होता. पाच- दहा सेकंद गेली तर पूर्ण जोर काढून, गळ्याच्या शीरा ताणलेल्या, त्या माणसाने परत आरोळी ठोकली, ''ए... मादरचोद". नंतर पुढे आलो आणि बाकीचं सगळं सुरळीत चालू होतं.

या दृश्यात कोणताही अतिरंजितपणा नाही. खरोखर दिसलेली गोष्ट. 
(मार्च २०१०मधलं हे दृश्य या रेघेवर आलेलं नसल्यामुळं आता २०१५च्या मार्चमधे इथं नोंदवून ठेवूया)
__________________

भाऊ पाध्यांच्या 'बगीचा' या कथेची सुरुवात:

रोज संध्याकाळी टिळक ब्रिजवरून एक माणूस जातो. अगदी सामान्य इसम. कुटुंबवत्सल. तसा काही खास विशेष नाही. चारचौघात खपून जाण्यासारखा! संध्याकाळी कचेऱ्यांतून घरी परतणाऱ्यांची गर्दीही टिळक ब्रिजवर बेसुमार असते. त्या गर्दीमध्ये कुणाचं त्या इसमाकडे लक्षही जात नाही.

पण चालता चालता तो मध्येच दणकून ओरडतो, "केकू दमाणिया की मा. . की च्यूत!" तेव्हा त्याच्या आजूबाजूची माणसं दचकतात. सारे जण त्याच्याकडेच चौकसपणे पाहू लागतात! त्यांच्या नजरा जणू त्याला विचारीत असतात, 'कोण ओरडलं आता?- तुम्ही का?' पण त्या इसमाला त्याची दखलही नसते. तो नाकासमोर पाऊल उचलत असतो अगदी थंडपणे. अगदी निर्विकारपणे.

रोजचाच हा प्रकार!

त्या माणसाच्या मनावर काहीतरी परिणाम झाला असावा म्हणा, किंवा त्याला वेड लागलं असावं म्हणा, म्हणून तो असा वागतो.- म्हणजे तो रोज संध्याकाळी टिळक ब्रिजवरून नेमाने जातो आणि कुणालाही कल्पना नसताना, अगदी अकल्पितपणे, 'केकू दमाणिया' या नावाच्या कुणा पारशाला अगदी तारस्वरात तीच इरसाल शिवी देतो. यापलीकडे तो कधीही वावगा वागत नाही. त्याचा कधी कुणाला उपद्रव होत नाही. काही वेडेवाकडे प्रकार नाहीत. चाळे नाहीत! अगदी सदगृहस्थाला साजेशी चालचलवणूक.

त्या माणसाचं नाव भास्कर राणे. मुंबईतल्या सटोडियांच्या लहरीनुसार चालणाऱ्या एका कापड गिरणीमध्ये तो कारकून होता. गिरणीतला कारकून म्हणजे त्याची जात ओळखलीच असेल तुम्ही! शिक्षण जेमतेम एस. एस. सी. पर्यंत. स्वभावात भयानक लाचारी व लुबरेपणा. मूळ पगार थोडा आणि महागाई भत्ता फार. यामुळं सदा बोनसवर लक्ष, पण कामगारांच्या संपात कामावर हटकून हजर राहणार. आपल्या गिरणीपलीकडे बाह्य जगाची काही माहिती नाही. षोक मटण-सागुती खाण्याचा आणि दारूचा. त्यामधेच त्याची सारी लाचारी, मनस्ताप आणि उपेक्षा बुडवून टाकावी. राहाणार शिवाजी पार्कच्या अद्ययावत परिसरात. गणपत वाण्याच्या जुन्या मोडकळीस आलेल्या दोन खोल्यांच्या गाळ्यात. भाडं रुपये बारा. आजच्या जागेच्या टंचाईमध्ये त्याला सुदैवी मानणारे लोक निघतीलच. शेजार- त्याच्यासारख्या- गिरणीबाबूंचा. त्याचं कुणाशीही वाकडं नाही. तो कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. अगदी सरळमार्गी.

त्याचा ताप फक्त त्याच्या बायकोला. आताच तिचं सातवं बाळंतपण झालं.

भाऊ पाध्ये
__________________

वरच्या दोन मजकुरांमधून परस्पर संबंध स्पष्ट होतोयच, तरीही पुढचा मजकूरही योग्य वाटला तर पाहावा.

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी भाऊ पाध्यांच्या कथेसंबंधी लिहिलंय. त्यातल्या 'बगीचा' या कथेसंदर्भातील भागामधला हा निवडक अंश:

'बगीचा' ही भाऊ पाध्यांच्या 'कठीण' पण निर्विवादपणे श्रेष्ठ कथांपैकी एक. ही कथा 'कठीण' असण्याचे एक कारण तिच्यातील घडणाऱ्या घटनांमध्ये प्राधान्याने असणारे योगायोग. हे योगायोग अतिमानवी शक्तींमुळे घडणारे आहेत, असे लेखकाने दाखवले असते, त्यांचा संबंध दैवाशी किंवा कर्माशी किंवा इतर परंपरागत समजुतींशी लावला असता तर ती इतकी 'कठीण' राहिली नसती. भाऊ पाध्यांनी असे अतिमानुष शक्तीवादी, दैववादी, नियतीवादी भाष्य आपल्या निवदानात येऊ दिलेले नाही. तसेच लेखक म्हणून प्रेषितवजा किंवा उपदेशकवजा भूमिकेतून कथावस्तूची राजकीय अथवा नैतिक चिकित्साही केलेली नाही. एखादी वास्तवात घडू शकेल अशी पण अतिवास्तव वाटतील अशा भयंकर योगायोगांमुळे अंगावर शहारे आणणारी गोष्ट जाणकार शेजाऱ्यापाजाऱ्याच्या माहितगार स्वरात सांगावी अशा रीतीने 'बगीचा' ही कथा सांगण्यात आलेली आहे.

भास्कर राणे ह्या मुंबईच्या गिरणीत कारकून असलेल्या आणि दादरला एका चाळीत राहाणाऱ्या एका इसमाच्या 'नशिबा'ची ही कहाणी आहे. भास्कर राणे सात पोरांचा बाप असून तरीही तो आपल्या बायकोचं, अनूचं गर्भारपण टाळण्याच्या बाबतीत मख्ख आहे. जसजशी त्याच्या पोरांत भर पडत गेली तसतशी त्याच्या संसाराची दुर्दशा होत गेलेली आहे. पण याची त्याला पर्वा नाही. भास्कर राणेला त-हेत-हेचे गुलाब कुंडीत वाढवायचा शौक आहे. चाळीत राहूनही आपला हा शौक त्याने जोपासला आहे. एक दिवस केकू दमाणिया नावाचा पारशी गृहस्थ सपत्नीक भास्कर राणेचा पत्ता शोधात त्याच्या चाळीत येतो. हे पारशी जोडपं गुलाबाचं शौकीन असून 'रोझ सोसायटी'चं सभासद आहे. 'रोझ सोसायटीत'च्या वार्षिक गुलाब स्पर्धेत भाग घेण्यासाठी भास्कर राणेचे गुलाब खरेदी करायला ते आलेलं आहे. पैशाच्या मोहानं भास्कर राणे आपला कुंड्यांमधला बगीचा केकू दमाणियाला विकतो. पण बगीचा विकून मिळवलेला पाचशे रुपयांचा चेक ज्या दिवशी वटवतो त्याच दिवशी भास्करची मुलगी साधना हिला मोटारची ठोकर बसून तिच्या पायाचं हाड मोडतं. ह्या प्रकारात ते पाचशे रुपये केव्हाच खर्चून जातात. यानंतर भास्कर आपल्या पुन्हा नव्यानं गरोदर असलेल्या बायकोसकट आपल्या सर्व मुलांना जिवंत जाळून टाकण्यासाठी रात्री खोलीला बाहेरून कुलूप लावून आग लावतो. दोन मुलींसह गरोदर अनू त्यात भाजते. बाकी पोरं वाचतात. मरण्यापूर्वी पोलिसाला जबानी देऊन अनू आपल्या नवऱ्याची खुनाच्या संभाव्य आरोपातून सोडवणूक करते. त्यानंतर वेड लागलेला भास्कर केकू दमाणियाला शिव्या घालत आणि सरतेशेवटी पारशी कॉलनीतल्या त्याच्या घराच्या खिडकीवर मध्यरात्री धोंडा भिरकावत वारंवार घिरट्या घालत राहातो.

'बगीचा'चं कथानक थोडक्यात वर सांगितल्याप्रमाणे आहे. ह्या कथानकात अशक्य काहीच नाही: असंभवनीयसुद्धा वस्तुत: काहीच नाही. फक्त बगीचा विकताच भास्कराच्या मुलीला अपघात होणे आणि त्यानंतर लवकरच त्याने स्वत:चा संसारच जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करणे हा एक प्रकारचा योगायोग आपल्यावर ह्या एकूण प्रकाराची संगती लावण्याची जबरदस्ती करतो. नेमकं हेच 'कठीण' आहे. आपल्याला ही संगती लावता येत नाही. पण भास्करने ही संगती स्वत:पुरती लावलेली आहे. त्याने ह्या सर्व प्रकाराला केकू दमाणियाला जबाबदार धरलेला आहे. जर दमाणियाने भास्करचा बगीचा खरीदला नसता तर भास्कर आणि त्याचं कुटुंब टिकून राहिलं असतं काय?

. . . महत्त्वाची गोष्ट म्हणजे भास्कर राणे हा चारचौघातला आणि चारचौघांसारखा माणूस एक पात्र म्हणून भाऊ पाध्ये आपल्यापुढे निर्माण करतात आणि त्याच वेळी त्याला ते हे 'बगीचा'चं अफलातून परिमाण देऊन टाकतात. प्रत्येक मानवी व्यक्तीला असलं काही एक अद्भुत परिमाण असतं हेही ते ह्यातून सूचित करतात. मुंबईच्या अफाट मानवी गर्दीकडे निव्वळ लोकसंख्येचा एक एकसंध पहाड म्हणून भाऊ पहात नाहीत. लोकसंखेच्या ह्या अभंग आणि अभेद्य भासणाऱ्या डोंगरात त्यांनी विविध चेहऱ्यामोहऱ्यांची, वैशिष्ट्यपूर्ण चरित्रांची आपली पात्रं खोदून अजरामर करून ठेवलेली आहेत. भास्कर राणे, त्याची बायको अनू, त्यांची मुलंबाळं ही अशीच पात्रं आहेत. रस्त्यात चालताना अचानक ओरडणाऱ्या एखाद्या वेड्याला पाहून यापुढे आपल्याला भास्कर राणे आठवेल. वर्तमानपत्रात बातम्या वाचताना एखादं कुटुंब आगीत जळाल्याचं वाचून आपल्याला अनू आणि तिची मुलं आठवतील. शहरी लोकसंखेच्या दाटीवाटीत प्रचंड मानवी तपशील लपलेले आहेत याची भाऊ पाध्ये आपल्याला सतत जाणीव करून देतात. स्वत:च्या माणुसकीची अस्वस्थ करणारी जाणीव ह्यातूनच आपल्याला होते आणि हा भाऊ पाध्यांचा मानवतावादी कलावंताचा स्पर्शच होय.
 __________________

जाड ठसा रेघेचा.
 __________________

भाऊ पाध्यांच्या 'थालीपीठ' या कथासंग्रहाची नवीन आवृत्ती शब्द पब्लिकेशनने काही काळापूर्वी प्रकाशित केली, हे आणखी एक निमित्त या नोंदीसाठी शोधता येईल-

 __________________

रेघेवरचा एक जुना प्रकल्प- bhaupadhye.blogspot.com
 __________________

साधारण अशा प्रकारच्या या पूर्वीच्या दोन नोंदी-
कोसळणाऱ्या इमारती, कोसळणारी माणसं नि 'वैतागवाडी'
एक एस्टी व पानवलकरांची एक कथा

1 comment:

  1. यापूर्वी अशी माणसं दुर्लक्षित केली होती पण रस्त्यात चालताना अचानक ओरडणाऱ्या एखाद्या वेड्याला पाहून यापुढे मला भास्कर राणे आठवेलच....अश्विनी

    ReplyDelete