Friday, 27 March 2015

मी हासतो लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला!

पाऊस मी म्हणत होता.
टीव्हीवरचा अँकर सारखं मी मी करत होता.
- असे वाक्प्रचारांचे वाक्यात उपयोग केले जातात.

शिवाय, 'मी हासतो लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला' अशी एक म्हणही आहे.

आणि नुकतंच 'मी मराठी लाइव्ह' या नावाचं एक मराठी दैनिकही सुरू झालेलं आहे. 'मी मराठी' ही वृत्तवाहिनी ज्यांनी काही काळापूर्वी विकत घेतली, ते ‘समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड’चे अध्यक्ष महेश मोतेवार यांनी हे वर्तमानपत्रही सुरू केलेलं आहे. तेच त्याचे सल्लागार संपादकही आहेत. २७ फेब्रुवारी २०१५ रोजी, मराठी भाषा दिवसालाच हे वर्तमानपत्र सुरू झालं. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर इत्यादी उपस्थित होते, त्या कार्यक्रमात मोतेवार म्हणाले, 'सत्याची कास धरीत, अडचणींवर मात आणि दुसऱ्याचा विचार केला की, परमेश्वरही आपल्या पाठीशी उभा राहून यश देतो याचा अनुभव मी घेतला आहे. आपल्या शेतकऱ्यांना जोडधंदा मि‌ळाला पाहिजे, महिला बचत गट सशक्त झाल्या पाहिजेत यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. त्यामुळेच मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. आता ‘मी मराठी लाइव्ह’च्या माध्यमातून पुन्हा लोकांशी जोडला गेलो आहे. समृद्धीपासून सुरू झालेला हा प्रवास ‘मी मराठी’च्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पोहोचला पाहिजे.'

दुसऱ्याचा विचार मी केला, हे बोलणं महत्त्वाचं असतं. 

याच 'समृद्ध' कंपनीविरोधात चिटफंड घोटाळ्याचे अनेक आरोप यापूर्वी झालेले अनेकांना आठवत असतील. आठवणीला तजेला देण्यासाठी- १) चाळीसगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भातली 'सकाळ'मधे आलेली एक बातमी. २) भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंबंधी केलेल्या आरोपाची 'एबीपी माझा'वरची बातमी ३) 'समृद्ध जीवन फूड्स'च्या व्यवहारात गफलत आढळल्यामुळं कंपनीनं गुंतवणूकदारांकडून ठेवी घेऊ नयेत, असे आदेश 'सेबी'ने (सिक्युरिटीज् अँड एक्सेन्ज बोर्ड ऑफ इंडिया) दिले होते. ४) या कंपनीविरोधात आलेल्या तक्रारींची पोलिसांनी जी काय दखल घेऊ पाहिली त्यासंबंधी लोकसत्तेत आलेली बातमी. ५) शिवाय, आता क्रिकेट विश्वचषक सुरू आहे, तर त्या संदर्भात- चार वर्षांपूर्वी भारतानं ही स्पर्धा जिंकली तेव्हा भारतीय संघातील सर्व खेळाडूंना समृद्ध जीवन कंपनीनं प्रत्येकी एक 'टाटा मान्झा' गाडी भेट दिली होती.

चाळीसगावच्या 'सकाळ'च्या बातमीत म्हटलंय, ''---लांडगे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, समृद्ध जीवन फूड्‌स इंडिया लि. या पुण्याच्या कंपनीने पशुधनाची स्कीम सुरू केली. हिरापूर व ब्राह्मणशेवगे (ता. चाळीसगाव) शिवारात कंपनीतर्फे सुमारे २८३ एकर जागा खरेदी करण्यात आली होती. शाखा उद्‌घाटनाच्यावेळी मोठा कार्यक्रम घेतल्याने या कंपनीने अल्पावधीतच परिसरातील शेतकऱ्यांना आपलेसे केले. त्यामुळे कंपनीकडे बहुतांश ठेवीदार हे शेतकरी होते. ठेवीदाराने पैसे दिल्यानंतर त्याच्या पैशातून कंपनीतर्फे म्हैस अथवा बकरी विकत घेतली जाईल. ती म्हैस अथवा बकरी प्रजनन योग्य झाल्यावर संबंधित ठेवीदाराला ती परत करण्यात येईल किंवा तिच्या किमती एवढी रक्कम देण्यात येईल, असे सांगून कंपनीने परिसरातील हजारो शेतकऱ्यांकडून पैसा गोळा केला. यावेळी कंपनीने शेतकऱ्यांशी तसा करार केल्यामुळे अल्पावधीतच विश्‍वास संपादन होत गेला. प्रत्यक्षात मात्र म्हैस किंवा बकरीचे संगोपन कंपनीने न करता दुसऱ्या शेतकऱ्यांकडून केले. त्याचे दूध मात्र कंपनी घेत होती. यातून मिळणाऱ्या नफ्याची कुठलीच नोंद केली जात नव्हती. जनावराचे दूध देणे बंद झाल्यानंतर भाकड जनावर गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला दिले जायचे. करारानुसार गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला दुसरा पर्यायच नसायचा.--''

तर, असं आहे. तरीही मी मराठी. आणि प्रत्येक बातमीतला मी.

मी मराठी लाइव्ह : ११ मार्च २०१५ रोजीच्या मुंबई आवृत्तीचं पहिलं पान

स्वतःच्या नाकाला काय लागलंय त्याबद्दल चाचपत केलेली ही नोंद आहे. 'मी मराठी लाइव्ह' हे वर्तमानपत्र मी मी म्हणत सुरू झालंय. हरकत नाही. (मालकांच्या इतिहासामुळं ह्या वर्तमानपत्रात संपादकीय नोकरी करणाऱ्यांबद्दलही लोक संदर्भाशिवाय टिंगल वजा बोलतील कदाचित. पण सगळ्यांनाच नाक आहे, हे आपण कसं विसरणार. मालकाबद्दल बोलणं आपल्याला महत्त्वाचं वाटतंच. त्याचसोबत निव्वळ कोणाची नोकरी कुठं आहे, एवढ्यावरून लगेच काही निष्कर्ष काढणं बरोबर वाटत नाही. पत्रकारी कामावरून, विरोधाभासावरून काही बोलायचं असेल, तर गोष्ट वेगळी. हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. आपल्याला न सुटलेला. शिवाय शेंबूड न येणारं एकही नाक आपल्या पाहण्यात आलेलं नाही. आरशातही नाही. फक्त शेंबूड येतो हे उघड मान्य तरी करायला हरकत नाही. आणि अगदी नाक कापलंच जाऊ नये, म्हणून रेघोट्या मारायच्या). तर, हे वर्तमानपत्र सुरू करण्याच्या कार्यक्रमात पत्रकारितेतले दिग्गज, नेते इत्यादी होते, पण 'मी मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या बातमीत ज्यांचं मनोगत प्रामुख्यानं छापलंय, ते आहेत मालक आणि म्हणून सल्लागार संपादक असलेले मोतेवार. शेवटी त्यांचं प्रोफाइल घडवण्याचाही मुद्दा असणार. आणि इकडं आपणही आपापल्या प्रोफाइलांवर/पडद्यांवर मी मी म्हणतोय. हरकत नाही. थोडं शेरा वजा बोलायचं तर, आपण प्रोफाइलवर जसं थोडं सामाजिक, कलात्मक, राजकीय, इत्यादी शेअर करतो नि मुख्यत्त्वे नैतिक प्रोफाइल घडवतो, तसंच जास्त पैसेवाल्या मंडळींना हे असं प्रोफाइल घडवण्यासाठी सरळ एखाद्या चॅनलमधे किंवा पेपरात गुंतवणूक करायची शक्यता प्रत्यक्षात आणता येते. मग रिलायन्सची आयबीएनमधली गुंतवणूक नि मोतेवारांचं 'मी मराठी' म्हणणं, हे साधारण त्याच प्रकारचं वाटतं. पण मग जनमाध्यमं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांच्या ठिकाणी तरी 'मी'च्या बाहेरचं काय तरी कळणं अपेक्षित असायला हवं का? पण तिथंही परत मीच मीच केलं, तर मग कसं काय होईल! किंवा कदाचित प्रत्येक बातमीत 'मी'ची गुंतवणूक कशी आहे, असा काही 'मी मराठी लाइव्ह'च्या टॅगलाइनचा अर्थ असेल. किंवा कदाचित आपल्याला त्याचा अर्थ कळलाच नसेल.

दोन वर्षांपूर्वी, ९ एप्रिल २०१३ रोजी आपण रेघेवर एक नोंद केली होती- दस्तयेवस्कीचं टिपण आणि माध्यम नियंत्रित माणूस. रशियन कादंबरीकार दस्तयेवस्कीच्या 'नोट्स फ्रॉम अंडरग्राउन्ड' या छोट्याशा कादंबरीतल्या छोट्याशा भागाचा अनुवाद नोंदवायचा प्रयत्न त्यात होता. त्या नोंदीचा शेवट असा होता:
तरीही पुढे बोलायचं तर - एखाद्या सभ्य माणसाला कशाबद्दल बोलताना सर्वाधिक आनंद होईल?

उत्तर : स्वतःबद्दल.

बरंय, तर मग मीही स्वतःबद्दलच बोलत जाईन.
म्हणून 'मी मराठी लाइव्ह'ची सभ्य टॅगलाइन आहे तशी आहे का? असेल. चला, काढा रूमाल आता! हसलात तरी चालेल, पण आपापला रूमाल आपापल्या सोबत ठेवायला हवा.

***

आतली हवा दिसत नाही, तोपर्यंत बरंय!
मुंबई :२१ मार्च २०१५ (फोटो: रेघ)

3 comments:

 1. शाब्बास मित्रा, याला म्हणतात शौर्य!
  आमच्या पेपरच्या मालकाबद्दल तू केलेल्या विधांनाचा खुलासा कंपनीतील संबंधित व्यक्ती करतीलच. त्यामुळे तू 'मी मराठी Live'मध्ये काम करणाऱ्या आम्हा संपादकीय विभागातील लोकांबद्दल जे लिहिले आहेस, त्याबद्दलच बोलतो.
  ''मालकांच्या इतिहासामुळं ह्या वर्तमानपत्रात संपादकीय नोकरी करणाऱ्यांबद्दलही लोक संदर्भाशिवाय टिंगल वजा बोलतील कदाचित. पण सगळ्यांनाच नाक आहे, हे आपण कसं विसरणार. मालकाबद्दल बोलणं आपल्याला महत्त्वाचं वाटतंच. त्याचसोबत निव्वळ कोणाची नोकरी कुठं आहे, एवढ्यावरून लगेच काही निष्कर्ष काढणं बरोबर वाटत नाही. पत्रकारी कामावरून, विरोधाभासावरून काही बोलायचं असेल, तर गोष्ट वेगळी. हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. आपल्याला न सुटलेला.''
  ही तुझी वाक्ये भारीच आहेत. तुलासुद्धा आमच्याबद्दल टिंगलवजा बोलायची मुभा आहे. कुणीही ती नाकारलेली नाही. आमच्याबद्दल हवे ते निष्कर्ष तुसुद्धा काढू शकतोस. त्यासाठी तुला इतरांच्या खांद्यांवर बंदूक ठेवायची अजिबात गरज नाही. तुझी आमच्याबद्दल नेमकी काय मते आहेत ते तरी आम्हाला कळेल. तुझ्यासारख्या आधुनिक रामशास्रयाकडून आमचा न्यायनिवाडा झाला तर आम्ही तुझे आभारी राहू. तेव्हा तेही पुण्यकर्म तुझ्याकडून अवश्य घडू दे. आम्ही त्याची नितांत निकडीने वाट पाहत आहोत.

  ReplyDelete
 2. फार नाही पण दहा-बारा वर्षांपूर्वी ऑटो रिक्षा चालवणारा महेश मोतेवार यांनी 1700 कोटी रुपयांची माया जमवली. हजारो गोरगरिबांच्या कष्टाच्या कमाईतून त्यांनी हे महापाप केले. आता हे महापाप लपविण्यासाठी व यापुढेही असेच कुकर्म चालू ठेवण्यासाठी त्यांनी मी मराठी लाईव्ह व मी मराठी या दोन माध्यम कंपन्यांची स्थापना केली. यासाठी कोट्यवधी रुपये ओतले. दिग्गज पत्रकारांच्या माध्यमातून सरकार दरबारीही अकुंश ठेवण्याचा व आपली कुकर्म झाकण्याचा महेश मोतेवार हे प्रयत्न करीत आहेत. - उन्मेष गुजराथी

  Plz read:: http://www.unmeshgujarathi.com/2015_06_01_archive.html

  ReplyDelete
 3. जगताप यांची येथील प्रतिक्रिया वाचून त्यांच्याबद्दल जालावर धुंडाळले असता खालील दुवा आढळला-
  http://aisiakshare.com/node/947
  या दुव्यावर जगतापांच्या हास्यास्पद लेखांचे सडेतोड विश्लेषण प्रतिक्रियांमधून झालेले आहेत. त्यातील एका प्रतिक्रियेत जगतापांचे लेखन रामशास्त्र्याचा आव आणणारे आहे असे म्हटले आहे. "सामान्य माणसांना स्वत:ची स्वतंत्र मतं नसतात, तसा त्यांचा अभ्यास नसतो. त्यांची मतं बनवण्याचं आणि भूमिका घडवण्याचं काम पत्रकारांचं आणि संपादकांचंच असतं", अशा प्रकारची विधाने करणारे जगताप या पोस्टवरून एवढे आक्रस्ताळे का झाले, याचेही स्पष्टीकरण मिळाले.
  याचबरोबर वाचनसंस्कृतीवरील त्यांच्या एका लेखाचे विश्लेषणही याच संकेतस्थळावरील वेगळ्या दुव्यावर वाचायला मिळाले-
  http://aisiakshare.com/node/805
  "हा लेख मी वाचन तर करायचं आहे, त्याला दिशाही द्यायची आहे आणि नंतर त्याविषयी पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ द्यायची नाही अशा वाचकांसाठी म्हणजे ज्यांना वाचक म्हणून क्रमाक्रमाने एकेक इयत्ता गाठावयाची आहे, त्यांच्यासाठीच लिहिला आहे. ज्यांना ही रितसर शिक्षणाची पद्धत मान्यच नाही, त्यांच्यासाठी हा लेख नाही." हे जगतापांचे विधान वाचले आणि त्यांचा आत्मगौरवात्मक भ्रम स्पष्ट झाला. असो.

  ReplyDelete

डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.